Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 17 Ovya 368 to 380
एर्हवीं भयास्तव आंग कांपे
। नावेक आगळें तरी मन तापे ।
अथवा बुद्धिही वासिपे ।
अभिमानु विसरिजे ॥ ३६८ ॥
३६८) एर्हवी भयामुळे
अंग कापावयास लागतें, आणि तेच भय क्षणभर अधिक वाढलें की मनाला ताप होतो, अथवा
बुद्धि दचकते आणि अभिमान विगलीत होतो.
परी येतुलियाही वेगळा । जो
केवळ आनंदैककळा ।
तया अंतरात्मयाही निश्र्चळा
। शियारी आली ॥ ३६९ ॥
३६९) परंतु या
सर्वांहुन वेगळ, जो केवळ आनंदाचा अंश आहे, असा जो अंतरात्मा, त्या शांत आत्म्यालादेखील
भयानें शहारे आले.
बाप साक्षात्काराचा वेधु ।
कैसा देशधडी केला बोधु ।
हा गुरुशिष्यसंबंधु ।
विपायें नांदे ॥ ३७० ॥
३७०) काय आश्र्चर्य आहे
? विश्वरुपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता ? त्या दर्शनानें माझें
ज्ञान देशोधडीं केलें. असा गुरुशिष्यसंबंध क्वचितच सांपडेल !
देवा तुझां ये दर्शनीं । जें
वैकल्य उपजलें आहे अंतकरणीं ।
तें सांवरावयालागीं गंवसणी
। धैर्याची करितसें ॥ ३७१ ॥
३७१) देवा, तुझ्या या
दर्शनानें अंतःकरणामध्यें जो विस्कळितपणा उत्पन्न झाला आहे, तो विस्कळितपणा
सांवरण्याकरितां मी धैर्याची गवसणी करीत आहे.
तंव माझेनि नामें धैर्य
हारपलें । कीं तयाहीवरी विश्र्वरुपदर्शन जाहलें ।
हें असो परि मज आतुडविलें ।
उपदेशासी ॥ ३७२ ॥
३७२) तों माझ्या
नांवानें धैर्य अगदीच नाहींसे झालें आणि त्यावर विश्र्वरुप दृष्टीस पडलें, मग काय
विचारतां ? हें राहूं द्या. परंतु मला उपदेशांत चांगलें गुरफटून टाकलेंत !
जीव विसंबावयाचिया चाडा ।
धांवाधांवी करितसे बापुडा ।
परि सोय ही कवणेकडा । न लभे
एथ ॥ ३७३ ॥
३७३) विश्रांति
घेण्याच्या इच्छेनें बिचारा जीव धांवाधांव करीत आहे, परंतु या विश्र्वरुपांत
त्याला कोठेंहि आश्रय मिळत नाही.
ऐसें विश्र्वरुपाचिया
महामारी । जीवित्व गेलें आहे चराचरीं ।
जी न बोलें तरि काय करीं ।
कैसेनि राहें ॥ ३७४ ॥
३७४) याप्रमाणे
विक्ष्वरुपाच्या महामारीनें चराचरांतील जीवित्व गेलें आहे महाराज, हें न बोलावें
तर काय करावें न कसें राहावें ?
मूळ श्लोक
दंष्ट्राकरालानि च ते
मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि ।
दिशो न जाने न लभे च शर्म
प्रसीद देवेश जगन्निवास ॥ २५ ॥
२५) आणि दाढांच्या
योगानें विक्राळ आणि प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणें ( दिसणारीं ) तुझी मुखें पाहूनच (
मी इतका गर्भगळित झालों ) आहें की, मला दिशाभूल झाली आहे; मला कांहीं सुख वाटत
नाहीं. हे देवाधिदेवा, जगन्निवासा ( आतां ) प्रसन्न हो.
पैं अखंड डोळ्यांपुढें ।
फुटलें जैसें महाभयाचें भांडें ।
तैशीं तुझीं मुखें वितंडें
। पसरलीं देखें ॥ ३७५ ॥
३७५) ज्याप्रमाणें
मृत्यूचें भांडें फुटावें, तशीं तुझीं विशाल तोंडें डोळ्यांपुढें एकसारखी पसरलेली
मी पाहात आहें.
असो दांतदाढांची दाटी । न
झांकवे मा दोंदों वोठीं ।
सैंध प्रळयशस्त्रांचिया दाट
कांटी । लागलिया जैशा ॥ ३७६ ॥
३७६) हें असूं दे, जशी
प्रळयकाळाच्या शस्त्रांचीं दाट कुंपणें एकसारखीं लागावींत, तशी दांतदाढांची गर्दी
उडून गेली आहे. इतकी कीं प्रत्येक मुखांतील दांत व दाढा, ह्या त्या मुखाच्या दोन
दोन ओठांनी देखील झांकल्या जात नाहीत.
जैसें तक्षका विष भरलें ।
हो कां जे काळरात्रीं भूत संचरलें ।
कीं अग्नेयास्त्र परजिलें ।
वज्राग्नि जैसें ॥ ३७७ ॥
३७७) तक्षक सर्प हा
मूळचाच विषारी असून त्याच्या तोंडांत आणखी विष भरावें किंवा अमावास्येची रात्र ही
जशी पूर्ण काळोखामुळे मूळचीच भय उत्पन्न करणारी असून, तिच्यांत आणखी पिशाच्यांचा
संचार व्हावा, किंवा वज्राग्नि हा असा स्वभावतःच अत्यंत दाहक असून त्यानें आणखी
अग्नीअस्त्र धारण करावें,
तैशीं तुझीं वक्त्रें
प्रचंडें । वरी आवेश हा बाहेरी वोसंडे ।
आले मरणरसाचे लोंढे ।
आम्हांवरी ॥ ३७८ ॥
३७८) त्याप्रमाणें
तुझ्या विश्वरुपाचीं तोंडें मूळचींच भयंकर असून, त्यांत आणखी त्याचा आवेश न मावतां
बाहेर वाहात आहे, ( तेव्हां ) मला असें वाटतें कीं तो वाहात असलेला आवेश नसून ते
जणूं काय आमच्यावर मरणरसाचे लोंढेंच आलें आहेत.
संहारसमयींचा चंडानिळु ॥
आणि महाकल्पांत प्रळयानळु ।
या दोहीं जैं होय मेळु ।
तैं काय एक न जळे ॥ ३७९ ॥
३७९) प्रलयकाळचा प्रचंड
वारा व महाप्रलयकाळचा अग्नि, हे जेव्हां एकाग्र होतात तेव्हां काय एक जळणार नाहीं
?
तैसीं संहारकें तुझीं मुखें
। देखोनि धीरु कां आम्हां पारुखे ।
आतां भुललों मी दिशा न
देखें । आपणपें नेणें ॥ ३८० ॥
३८०) तशीं तुझी संहार करणारीं मुखें पाहून आमचें धैर्य
तर नाहीसें झालें. आतां मी वेडा झाल्यामुळें मला दिशा
दिसत नाहींत. एवढेंच नव्हें, तर माझी मलाहि ओळख
नाहींशी झाली असें झालें आहे.
No comments:
Post a Comment