Shri Dnyaneshwari Adhyay 11
मूळ श्लोक
किरीटिनं गदिनं चक्रिणं च
तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं
समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ॥ १७ ॥
१७) मुकुट, गदा व (
सुदर्शन ) चक्र धारण करणारा, तेजाचा राशि, ज्याचें तेज सर्वत्र पसरलें आहे,
ज्याच्याकडे एकसारखें पाहाणें ( देखील ) अशक्य आहे, असा दीप्तिमान्, अग्नि व सूर्य यांच्या प्रभेसारखी ज्याची प्रभा सर्वत्र
( पसरलेली ) आहे असा व अमर्याद अशा तुला, मी पाहात आहें.
नोहे तोचि हा शिरीं । मुकुट
लेइलासि श्रीहरी ।
परि आतांचें तेज आणि थोरी ।
नवल कीं बहुवें ॥ २९४ ॥
२९४) हे श्रीकृष्णा,
तोच हा मुकुट आपल्या मस्तकावर धारण केला आहेस नव्हे काय ? परंतु त्याचें आतांचें
तेज आणि मोठेपणा, ही कांहीं मोठीं विलक्षण आहेत.
तेंचि हें वरिलिये हातीं ।
चक्र परिजितया आयती ।
सांवरितासि विश्र्वमूर्ती ॥
ते न मोडे खुण ॥ २९५ ॥
२९५) हे विश्वमूर्ति
देवा, तेंच हें चक्र वरच्या हातांत फिरविण्याच्या तयारीनें तूं सावरुन धरीत आहेस;
ती खूण नाहीशी झाली नाही.
येरीकडे तेचि हे नोहे गदा ।
आणि तळिलिया दोनी भुजा निरायुधा ।
वागोरे सांवरावया गोविंदा ।
संसरिलिया ॥ २९६ ॥
२९६) आणि दुसर्या
हातांत असलेली तीच ही गदा नव्हे काय ? आणि चक्र व गदा घेतलेल्या दोन्ही हातांच्या
खालचे हात शस्त्रावांचून असून तेहि, श्रीकृष्णा, घोड्यांचे लगाम सावरुन
धरण्याकरितां सरसावले नाहींत काय ?
आणि तेणेंचि वेगें सहसा ।
माझिया मनोरथासरिसा ।
जाहलासि विश्र्वरुपा
विश्र्वेशा । म्हणोनि जाणें ॥ २९७ ॥
२९७) आणि याच आवेशानें
मी आपली इच्छा प्रदर्शित केल्याबरोबर परमेश्र्वरा, तूं एकाएकीं विष्वरुप झालास,
असें मी जाणतों.
परि कायसें वा हें चोज ।
विस्मयो करावयाहि पवाडु नाहीं मज ।
चित्त होऊनि जात आहे
निर्बुज । आश्र्चर्यें येणें ॥ २९८ ॥
२९८) परंतु हें नवल
कसलें आहे ? मला आश्र्चर्य करावयालाहि अवकाश नाहीं. ( कारण ) या आश्र्चर्यानें
माझें चित्त गोंधळून जात आहे.
हें एथ आथि कां येथ नाहीं ।
ऐसें श्र्वसोंही नये कांहीं ।
नवल अंगप्रभेची नवाई । कैसी
कोंदली सेंध ॥ २९९ ॥
२९९) हें विश्वरुप येथें
आहे कीं नाहीं, अशा विचारानें नुसता श्वाससुद्धा घेता येत नाहीं. काय अंगप्रभेचा
चमत्कार आश्चर्यकारक आहे कीं, ती कशी एकसारखी दाट भरलेली आहे !
एथचीही दिठी करपत । सूर्य
खद्दोतु तैसे हारपत ।
ऐसें तीव्रपण अद्भुत ।
तेजाचें यया ॥ ३०० ॥
३००) येथें (
विश्वरुपाच्या तेजांत ) दृष्टि करपून जाते व सूर्य काजव्यासारखें या तेजांत मावळून
जातात, असें या तेजाचें तीव्रपण अद्भुत आहे.
हो कां जे महातेजाचां
महार्णवीं । बुडोनि गेली सृष्टि आघवी ।
कीं युगांतविजूंचां पालवीं
। झांकलें गगन ॥ ३०१ ॥
३०१) जणूं काय, या
महातेजाच्या महासमुद्रांत सर्व सृष्टि बुडून गेली आहे ! अथवा आकाश तर प्रलयकाळच्या
विजेच्या पदरानें झांकून गेलें आहे.
नातरी संहारतेजाचिया ज्वाळा
। तोडोनि माचु बांधला अंतराळां ।
आतां दिव्य ज्ञानाचांहि
डोळां । पाहवेना ॥ ३०२ ॥
३०२) अथवा प्रळयकाळच्या
तेजाच्या ज्वाळा तोडून त्यांचा आकाशांत मांडव बांधला आहे. आतां असें तें
विश्वरुपाचें तेज दिव्य ज्ञानदृष्टीनेंहि पाहावत नाहीं.
उजाळु अधिकाधिक बहुवसु । धडाडीत
आहे अतिदासु ।
पडत दिव्यचक्षूंही त्रासु ।
न्याहाळितां ॥ ३०३ ॥
३०३) अधिकाधिक पुष्कळ
प्रकाश अतिदाह करणारा असा पेटत आहे, म्हणून तें तेज पाहण्यास दिव्यचक्षूलाहि त्रास
पडतो.
हो कां जे महाप्रळयींचा
भडाडु । होता काळाग्निरुद्राचां ठायीं गूढु ।
तो तृतीयनयनाचा मढु । फुटला
जैसा ॥ ३०४ ॥
३०४) अथवा
महाप्रळयकाळचा अग्नीचा भडभडाट; जो कालाग्निनानक रुद्राच्या ठिकाणीं गुप्त होता, तो
ज्याप्रमाणें शंकराच्या तृतीय नेत्राची ( अग्नीची ) कळी उमलावी, त्याप्रमाणें
पसरला आहे.
तैसें पसरलेनि प्रकाशें ।
सैंध पांचवानिया ज्वाळांचे वळसे ।
पडतां ब्रह्मकटाह कोळिसे ।
होत आहाती ॥ ३०५ ॥
३०५) त्याप्रमाणें त्या
पसरलेल्या प्रकाशामुळें पंचाग्नीच्या ज्वालांचे वेढे जिकडेतिकडे पडत असतां,
ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत.
ऐसा अद्भुत तेजोराशी ।
जन्मा नवल म्यां देखिलासी ।
नाहीं व्याप्ती आणि कांतीसी
। पारु जी तुझिये ॥ ३०६ ॥
३०६) अशा प्रकाशाच्या
अपूर्व तेजाचा जणूं काय राशीच, असें तुझें आश्चर्यकारक रुप, माझ्या जन्मांत आजच मी
पाहिलें, महाराज, आपल्या तेजाला व व्याप्तीला सीमा नाहीं.
त्वमक्षरं परमं वेदितव्यं
त्चमस्य विश्वस्य पर निधानम् ।
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता
सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥ १८ ॥
१८) वेदांकडून
जाणण्याला योग्य असें अविनाशी ब्रह्म तूं आहेस. या विश्र्वाचा अखेरचा आश्रय तूं
आहेस; तूं अव्यय व शाश्वत अशा धर्माचा रक्षण करणारा, सनातन पुरुष तूं आहेस असें
मला वाटतें.
देवा तूं अक्षर । औटाविये
मात्रेसि पर ।
श्रुति जयाचें घर । गिंवसीत
आहाती ॥ ३०७ ॥
३०७) देवा, आपण
परब्रह्म आहांत, आपण ( ॐकाराच्या ) साडेतीन मात्रांच्या पलीकडे आहांत, व आपलें
ठिकाण वेद शोधीत आहेत.
जें आहाराचें आयतन । जें
विश्र्वनिक्षेपनिधान ।
तें अव्यय तूं गहन । अविनाश
जी ॥ ३०८ ॥
३०८) जें
आकारमात्रांचें घर, जें विश्र्वरुपी ठेव्यांची एकच खाण, असें जें अविकार, गहन व
अविनाश, ते महाराज, आपण आहात.
तूं धर्माचा वोलावा ।
अनादिसिद्ध तूं नीत नवा ।
जाणें मी सदतिसावा । पुरुष
विशेष तूं ॥ ३०९ ॥
३०९) तूं धर्माचा
जिव्हाळा आहेस. तूं मूलचाच सिद्ध आहेस व तूं छत्तीस तत्त्वांहून निराळा सदतिसावा
अलौकिक पुरुष आहेस, असें मी जाणतों,
अनादिमध्यान्तमनन्तवीर्यमनन्तबाहु
शशिसूर्यनेत्रम् ।
पश्यामि त्वां
दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥ १९ ॥
१९) ज्याला आदि, मध्य व
अंत नाहीं, ज्याच्या पराक्रमाला अंत नाहीं, ज्याचे हात अनंत आहेत, चंद्र-सूर्य
ज्याचे डोळे आहेत, दीप्तिमान अग्नि ज्याचें मुख आहे व आपल्या तेजानें जो या
विश्वाला ( जणूं काय ) जाळून टाकीत आहे, अशा तुला मी पाहात आहें.
तूं आदिमध्यांतरहितु ।
स्वसामर्थ्यें तूं अनंतु ।
विश्र्वबाहु अपरिमितु ।
विश्र्वचरण तूं ॥ ३१० ॥
३१०) तूं आदि, मध्य व
अंतरहित आहेस. स्वतःच्या सामर्थ्याने तूं अनंत आहेस . तुला सर्व बाजूंनीं असंख्य
हात व पाय आहेत व तुझ्या स्वरुपाला मर्यादा नाहीं.
पैं चंद्रचंडांशुडोळां ।
दावितासि कोपप्रसाद लीळा ।
एकां रुससी तमाचां डोळां ।
एकां पाळितोसि कृपादृष्टी ॥ ३११ ॥
३११) आणि चंद्र व सूर्य
या तुझ्या डोळ्यानीं तूं कोपाच्या व कृपेच्या लीला दाखवीत आहेस व कोणाचा
कृपादृष्टीने सांभाळ करितोस.
जी एवंविधा तूंतें । मी
देखतसें हें निरुतें ।
पेटलें प्रळयाग्नीचें उजितें
। तैसे वक्त्र हें तुझें ॥ ३१२ ॥
३१२) देवा, मी
याप्रमाणें तुझें हें स्वरुप खरोखर पाहात आहें. पेटलेल्या प्रळयाच्या अग्नीचें तेज
जसें असावें, तसें हें तुझें तोंड आहे.
वणिवेनि पेटले पर्वत ।
कवळूनि ज्वाळांचे उभड उठत ।
तैसी चाटीत दाढा दांत । जीभ
लोळे ॥ ३१३ ॥
३१३) वणव्यानें चोहोकडून
पर्वत पेटावेत, म्हणजे जसा ज्वालांचा भडका उठतो, त्याप्रमाणें दांत व दाढा चाटीत असलेली
जीभ लोळत आहे.
इये वदनींचिया उबा । आणि जी
सर्वांगकांतिचिया प्रभा ।
विश्र्व तातलें अति क्षोभा
। जात आहे ॥ ३१४ ॥
३१४) या तोंडाच्या उष्णतेनें आणि सर्व शरीराच्या तेजाच्या
प्रकाशानें संतप्त झालेलें विश्र्व अतिशय खवळलें आहे.
No comments:
Post a Comment