Friday, July 8, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 19 Ovya 397 to 415 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग १९ ओव्या ३९७ ते ४१५

 

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 19 
Ovya 397 to 415 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग १९ 
ओव्या ३९७ ते ४१५

चतुरंगा परिवारा । संजोडियां रहंवरां ।

दांत न लाविसी मा परमेश्र्वरा । कसा तुष्टलासि बरवा ॥ ३९७ ॥

३९७) हत्ती, घोडे, रथ, पायदळ असा चतुरंग सेनेचा परिवार व घोडे जोडलेले रथ यांस परमेश्र्वरा, तूं दांत न लावता गिळित आहेस व त्या योगानें कसा चांगला संतुष्ट झाला आहेस बरें !

हां गा भीष्मऐसा कवणु । सत्यशौर्यानिपुणु ।

तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा ॥ ३९८ ॥

३९८) अहो, भीष्मासारखा खरेपणांत प्रसिद्ध आणि शौर्यांत तरबेज असा दुसरा कोण आहे ? तो देखील आणि द्रोणाचार्य ब्राह्मणहि, अरेरे, तूं गिळलास.

अहा सहस्रकराचा कुमरु । एथ गेला गेला कर्णवीरु ।

आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडिला देखें ॥ ३९९ ॥

३९९) अहाहा ! सूर्याचा मुलगा जो वीर कर्ण, तो आपल्या मुखांत गेला हो गेला आणि आमच्याकडचे सर्व ( योद्धे ) तर तूं केसासारखें नाहीसें केलेलें मी पाहात आहे.  

कटकटा धातया । कसें जाहलें अनुग्रहा यया ।

मियां प्रार्थूनि जगा बापुडिया । आणिलें मरण ॥ ४०० ॥

४००) हाय, हाय ! ब्रह्मदेवा, भगवंताच्या या अनुग्रहानें कसें झालें ? या विपरीत फलप्राप्तीच्या योगानें असें झालें कीं, मला आपले विश्वरुप दाखवा, अशी भगवंताची प्रार्थना करुन, या दीन जगास ( स्थितिकालीं ) मी मरण आणलें.   

मागां थोडिया बहुवा उपपत्ती । येणें सांगितलिया विभूती ।

तैसा नसेचि मा पुढती । बैसलों पुसों ॥ ४०१ ॥

४०१) आणि मागें देवानें थोड्याबहुत युक्तीनें विभूती सांगितल्या; परंतु त्या व्यापकपणा प्रमाणें देव मला दिसेना, म्हणून विनंती करण्यास मी सरसावलों.

म्हणोनि भोग्य तें त्रिशुद्धी न चुके । आणि बुद्धिही होणारासारखी ठाके ।

माझां कपाळीं पिटावें लोकें । तें लोटेल काह्या ॥ ४०२ ॥

४०२) म्हणून जें भोगावयाचें आहे, तें कधीहि चुकणार नाही; आणि जसें होणर असेल, त्यासारखी बुद्धी होते. माझ्या प्रारब्धांत लोकांनी मला दोष द्यावा असें असेल, तें चुकेल कसें ?  

पूर्वीं अमृतही हातां आलें । परि देव नसतीचि उगले ।

मग काळकूट उठविलें । शेवटीं जैसें ॥ ४०३ ॥

४०३) पूर्वीं ( समुद्रमंथनकाली ) अमृतदेखील देवांच्या हातीं लागलें ( तेव्हां देवांनी उगीच बसावें कीं नाहीं ? ) परंतु देव उगीच बसले नाहींत. मग शेवटीं ज्याप्रमाणें कालकूट विष समुद्रमंथनापासून उत्पन्न केलें; 

परि तें एकबगीं थोडें । केलिया प्रतिकारामाजिवडें ।

आणि तिये अवसरींचें तें सांकडें । निस्तरविलें शंभू ॥ ४०४ ॥

४०४) परंतु तें एक प्रकारानें थोडें होतें. कारण ती केलेली गोष्ट निराकरण करण्याजोग्या गोष्टीपैकीं एक होती, आणि त्या वेळचें तें संकट शंकरानें निवारण केलें.

आतां हा जळता वारा कें वेंटाळे । कोणाही विषा भरलें गगन गिळे ।

महाकाळेंसि खेळें । आंगवत असे ॥ ४०५ ॥

४०५) पण हल्लींचा जो हा विश्वरुपाचा प्रकार, हा प्रत्यक्ष पेटलेला वाराच आहे, तर कसा आवरेल ? विषानें भरलेलें आकाश कोणास गिळतां येईल काय ? महाकाळाबरोबर खेळतां येईल काय ? असें कोणाच्या अंगी सामर्थ्य आहे ?

ऐसा अर्जुन दुःखें शिणतु । शोचित असे जिवाआंतु ।

परि न देखे तो प्रस्तुतु । अभिप्रावो देवाचा ॥ ४०६ ॥

४०६) याप्रमाणें अर्जुन दुःखानें कष्टी होऊन मनामध्यें शोक करीत होता, परंतु तो सांप्रत देवाचें मनोगत काय आहे, हे ओळखत नव्हता.

जे मी मारित हे कौरव मरते । ऐसेनि चेंटाळिला होता मोहें बहुतें ।

तो फेडावयालागीं अनंतें । हें दाखविलें निज ॥ ४०७ ॥

४०७) कारण, मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव माझ्या हातून मरणारे, अशा मोठ्या मोहानें तो घेरला होता, ती भुरळ दूर करण्याकरितां, श्रीकृष्णानें हें विश्वरुपरुपी आपलें खास स्वरुप त्याला दाखविलें.   

अरे कोण्ही कोणातें न मारी । एथ मीचि हो सर्व संहारीं ।

हें विश्र्वरुपव्याजें हरी । प्रकटित असे ॥ ४०८ ॥

४०८) ‘ अर्जुना, वास्तविक कोणी कोणाला मारीत नाही. यांत मी स्वतःच सर्वांचा नाश करतों; ‘ हें तत्त्व विश्वरुपाच्या निमित्तानें श्रीकृष्ण उघड करुन दाखवीत आहे.

परि वायांचि व्याकुळता । ते न चोजवेचि पंडुसुता ।

मग अहा कंपु नव्हता । वाढवित असे ॥ ४०९ ॥

४०९) परंतु तें अर्जुनास न कळल्यामुळे तो व्यर्थ शोककुल होऊन नसलेली भीति उगीचच वाढवीत आहे.   

मूळ श्लोक

वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि ।

केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥ २७ ॥

२७) हे ( अगोदर ) भयानक व दाढाच्या योगानें ( अधिक ) भयानक अशा तुझ्या मुखामध्यें त्वरेनें शिरत आहेत. कोणी चूर्ण झालेल्या मस्तकांनीं दांतांमध्ये अडकलेले दिसतात.

तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सासिकवचेंसि दोन्ही दळें ।

वदनीं गेलीं आभाळें । गगनीं कां जैसीं ॥ ४१० ॥

४१०) त्या प्रसंगांत तो अर्जुन म्हणाला, ‘ अहो हें पाहा; ज्याप्रमाणें ढग आकाशामध्यें नाहीसें व्हावेत, त्याप्रमाणें तलवार व चिलखत यांसह दोन्हींकडील सैन्यें एकाच वेळेला तोंडांत गेलीं आहेत.     

कां महाकल्पाचां शेवटीं । जैं कृतांतु कोपला होय सृष्टी ।

तैं एकविसाही स्वर्गा मिठी । पाताळासकट दे ॥ ४११ ॥

४११) अथवा महाकल्पान्ताच्या अखेरीस ज्या वेळेला विश्वावर सर्वनाशक यमाचा रोष होतो, त्या वेळेला पाताळासह एकवीस स्वर्गांना तो ग्रासून टाकतो; 

नातरी उदासीनें दैवें । संचकाचीं वैभवें ।

जेथींचीं तेथ स्वभावें । विलया जाती ॥ ४१२ ॥

४१२) अथवा प्रतिकूल दैवाच्या योगानें कृपणाचे ठेवे सहजच असें जेथल्या तेथे नाश पावतात. 

तैसीं सांचलीं सैन्यें एकवाटें । इये मुखीं जाहलीं प्रविष्टें ।

परि एकही तोंडौनि न सुटे । कैसें कर्म देखा ॥ ४१३ ॥

४१३) त्याप्रमाणें एकत्र झालेलीं सैन्यें या तोंडामध्यें एकदम शिरली आहेत. परंतु कसें कर्म विपरीत आहे पाहा कीं, त्यापैकीं एक देखील तोंडाच्या सपाट्यांतून सुटत नाहीं !

अशोकाचे अंगवसे । चघळिले कर्‍हेनि जैसे ।

वक्त्रामाजीं तैसे । वायां गेले ॥ ४१४ ॥

४१४) ज्याप्रमाणें उंटानें अशोक झाडाचे ढगळे चघळावेत, त्याप्रमाणें हे लोक तोंडामध्यें वाया गेलेले आहेत.

परि सिसाळें मुकुटेंसीं । पडिलीं दाढांचां सांडसीं ।

पीठ होत कैसीं । दिसत आहाती ॥ ४१५ ॥   

४१५) परंतु मुकुटासुद्धा मस्तकें दाढांच्या चिमट्यांत पडलेलीं कशी पीठ होतांना दिसत आहेत !     



Custom Search

No comments: