Thursday, July 7, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 14 Ovya 315 to 331 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग १४ ओव्या ३१५ ते ३३१

 

Shri Dnyaneshwari Adhyay 11 
Part 14 Ovya 315 to 331 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग १४ 
ओव्या ३१५ ते ३३१

मूळ श्लोक

द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।

दृष्ट्वाऽद्भुतं रुपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥ २० ॥

२०) स्वर्ग पृथ्वी यांच्यामधील हा ( सर्व ) प्रदेश ( अंतरिक्ष ) व सर्व दिशाहि तूं एकट्यानें व्यापिल्या आहेस. हे विश्वरुपा, हें तुझें अद्भुत व उग्र रुप पाहून त्रैलोक्य भयानें व्याकुळ झाले आहे.    

कां जे भूर्लोक पाताळ । पृथिवी हन अंराळ ।

अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र ॥ ३१५ ॥

३१५) किंवा जे भू-लोक, पाताळ, पृथ्वी, अंतरिक्ष अथवा दहा दिशा व सर्व क्षितिज

तें आघवेंचि तुवां एकें । भरलें देखत आहें कौतुकें ।

परि गगनाहीसकट भयानकें । आप्लविजे जेवीं ॥ ३१६ ॥

३१६) हे सर्व तूं एकट्यानें भरलेले आहे, हें मी कौतुकानें पाहात आहें; परंतु जसें एखाद्या भयंकर ( वस्तूनें ) आकाशासुद्धा सर्व जग बुडवावें ( तसें तुझ्या भयंकर स्वरुपानें वरील सर्व ठिकाणे व्यापलेलीं मी पाहातों.  )

ना तरी अद्भुतरसाचां कल्लोळीं । जाहली चवदाही भुवनांसि कडियाळी ।

तैसें आश्र्चर्यचि मग मी आकळीं । काय एक ॥ ३१७ ॥

३१७) अथवा ज्याप्रमाणें अद्भुत रसाच्या लाटांनी चौदाही भुवनांना वेढा पडावा, त्याप्रमाणे ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे. मग मी कशा कशाचे आकलन करावें ?

नावरे व्याप्ती हे असाधारण । न साहवे रुपाचें उग्रपण ।

सुख दूरी गेलें परी प्राण । विपायें धरी जग ॥ ३१८ ॥

३१८) तुझी ( विश्वरुपाची ) व्यापकता विलक्षण असल्यामुळें तुझें आकलन होत नाहीं व तुझ्या रुपाची प्रखरता सहन होत नाहीं. ( यामुळें ) सुख तर दूरच राहिलें परंतु जग आपलें प्राण मोठ्या कष्टानें धरुन राहिलें आहे.  

देवा देखोनियां तूंतें । नेणों कैसें आलें भयाचें भरितें ।

आतां दुःखकल्लोळीं झळंबतें । तिन्हीं भुवनें ॥ ३१९ ॥

३१९) देवा, तुला पाहून भयाची भरती कशी आली, हें कळत नाही. प्रस्तुत दुःखांच्या लाटांत तिन्ही लोक गटांगळ्या खात आहेत. 

एर्‍हवीं तुज महात्मयाचें देखणें । तरि भयदुःखासि कां मेळवणें ।

परि हें सुख नव्हेचि जेणें गुणें । तें जाणवत आहे मज ॥ ३२० ॥ 

३२०) सहज विचार करुन पाहिलें तर तूं जो महात्मा, त्याचें दर्शन झालें तर भय व दुःख यांचा योग कां व्हावा ? परंतु हें ( विश्वरुपाचें दर्शन ) सुखकारक ज्या कारणांमुळे होत नाही, तें कारण मला ( आतां ) कळून आलें.

जंव तुझें रुप नोहे दिठें । तंव जगासि संसारिक गोमटें ।

आतां देखिलासि तरी विषयाविटें । उपनला त्रासु ॥ ३२१ ॥

३२१) जोपर्यंत तुझें रुप दृष्टीस पडलें नाही, तोपर्यंत जगास विषयसुख चांगले वाटतें; आतां ज्या अर्थी तुझ्या स्वरुपाचें दर्शन झालें; त्या अर्थी विषयाचा वीट आल्यामुळें कंटाळा उत्पन्न झालेला आहे.

तेवींचि तूंतें देखिलियासाठीं । काइ सहसा तुज देवों येईल मिठी ।

आणि नेदीं तरी संकटीं । राहों केवीं ॥ ३२२ ॥

३२२) त्याचप्रमाणें तुला पाहिल्याबरोबर तुला एकदम आलिंगन देता येईल काय ? बरें आलिंगन न जर न द्यावें तर या संकटांत कसें राहावें ?

म्हणोनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु ।

आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों ॥ ३२३ ॥

३२३) म्हणून ( तुला मिठी न देतां ) मागें सरावें, तर अनिवार असा जन्ममरणरुप संसार मागें सरण्याला आडवा येतो, आणि पुढें असणारा तूं तर अनावर असल्याकारणानें आकळता येत नाहीस.   

ऐसा माझारिलीं सांकडां । बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा ।

हा ध्वनि जी फुडा । चोजवला मज ॥ ३२४ ॥

३२४) याप्रमाणें मध्येच असलेल्या संकटांत ( सापडलेल्या ) बिचार्‍या त्रैलोक्याचा हुरडा होत आहे. असा माझा खरोखर अभिप्राय झाला आहे. 

जैसा आरंबळला आगी । समुद्रा ये निवावयालागीं ।

तंव कल्लोळपाणियांचा तरंगीं । आगळा बिहे ॥ ३२५ ॥

३२५) जसा अग्नीनें पोळलेला ( मनुष्य ) थंड होण्याकरितां समुद्राजवळ येतो, त्या वेळीं खवळलेल्या पाण्याच्या लाटांनीं जसा तो अधिकच भितो;  

तैसें या जगासि जाहलें । तूंतें देखोनि तळमळित ठेलें ।

यामाजीं पैल भले । ज्ञानसुरांचे मेळावे ॥ ३२६ ॥

३२६) या जगाची तशी स्थिति झाली आहे. तुला पाहून ( तुझ्या विश्वरुपाचें दर्शन झाल्यावर ) तें तळमळत राहिलें.    

अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति केचित् भीताः प्राञ्जलयो गृणन्ति ।

स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसंघाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः ॥ २१ ॥

२१) हे देवांचे समुदाय तुझ्यामध्यें प्रवेश करीत आहेत; कोणी भयभीत होऊन हात जोडून ( तुझें ) स्तवन करीत आहेत; महर्षि व सिद्ध यांचे समुदाय ‘ स्वस्ति ‘ असें म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुति करीत आहेत. 

हे तुझेनि आंगिकें तेजें । जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें ।

मिळत तुजआंतु निजें । सद्भावेंसीं ॥ ३२७ ॥

३२७) यांपैकीं पलीकडे गेलेले जे ज्ञानसंपन्न देवांचे चांगले समुदाय आहेत; हे ज्ञानसंपन्न देवांचे समुदाय, तुझ्या अंगाच्या तेजानें सर्व कर्मांची बीजें ( जी अज्ञान, वासना वगैरे ती ) जाळून, आपल्या चांगल्या भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरुपांत मिळतात.

आणिक एक साविया भयभीरु । सर्वस्वें धरुनि तुझी मोहरु ।

तुज प्रार्थिताति करु । जोडोनियां ॥ ३२८ ॥

३२८) आणखी कित्येक जे स्वभावतः भयभीत झालेले आहेत, ते सर्व प्रकारांनी तुझ्या मार्गाचा आश्रय करुन, हात जोडून तुझी प्रार्थना करतात.

देवा अविद्यार्णवीं पडिलों । जी विषयवागुरें आंतुडलों ।

स्वर्गसंसाराचां सांकडलों । दोन्हीं भागीं ॥ ३२९ ॥

३२९) हे देवा, आम्ही अज्ञानरुपीं समुद्रांत पडलों आहोंत व महाराज, विषयरुपी जाळ्यांत गुंतलों आहोंत व स्वर्ग आणि संसार या दोहोंच्या कचाटांत सांपडलो आहोत.

ऐसा आमुचें सोडवणें । तुजवांचोनि कीजेल कवणें ।

तुज शरण गा सर्वप्राणें । म्हणत देवा ॥ ३३० ॥

३३०) अशा आमची मुक्तता, तुझ्या वांचून कोण करील ? देवा, आम्ही तुला सर्व प्राणांनी शरण आलो आहोंत असें ते म्हणतात.

आणि महर्षी अथवा सिद्ध । कां विद्याधरसमूह विविध ।

हे बोलत तुज स्वस्तिवाद । करिती स्तवन ॥ ३३१ ॥  

३३१) आणि महर्षि अथवा सिद्ध ( कृतार्थ पुरुष ) अथवा

 विद्याधरांचे नाना प्रकारचे समुदाय हे ’ तुझें कल्याण

 असो ! ‘ असें म्हणतात आणि स्तुति करतात. 



Custom Search

No comments: