Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 15
मूळ श्लोक
रुद्रादित्या वसवो ये च
साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च ।
गन्ध र्वयक्षासुरसिद्धसंघा
वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥ २२ ॥
२२) ( एकादश ) रुद्र, (
द्वादश ) आदित्य, ( अष्ट ) वसु, साध्य, विश्वेदेव, अश्विनीकुमार, वायु आणि पितर,
गंधर्व, यक्ष, राक्षस व सिद्ध यांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे
पाहात आहेत.
हे रुद्रादित्यांचे मेळावे
। वसु हन साध्य आघवे ।
अश्र्विनौदेव विश्र्वेदेव
विभवें । वायुहि हे जी ॥ ३३२ ॥
३३२) हे अकरा रुद्र आणि
बारा आदित्य यांचे समुदाय, आठ वसु व साध्य नांवाचे बारा देव, हे सर्व, दोन
अश्विनीकुमार, वैभवयुक्त विश्वेदेव आणि वायुदेवता देखील हे महाराज,
अवधारा अग्नि हन गंधर्व ।
पैल यक्षरक्षोगण सर्व ।
जी महेंद्रमुख्य देव । कां
सिद्धादिक ॥ ३३३ ॥
३३३) ऐका; अग्नि आणि
गंधर्व, पलीकडे असलेले यक्षांचे व राक्षसांचे सर्व समुदाय; महाराज, इंद्र
ज्यांमध्यें श्रेष्ठ आहे असे देव आणि सिद्ध आदिकरुन,
हे आघवेची आपुलां लोकीं ।
सोत्कंठित अवलोकीं ।
हे महामूर्ती दैविकी । पाहत
आहाती ॥ ३३४ ॥
३३४) हे सर्व आपआपल्या
लोकांत उत्कंठतेनेआपली दिव्य मूर्ति पाहात आहेत, हें पाहा.
मग पाहात पाहात प्रतिक्षणीं
। विस्मित होऊनि अंतःकरणीं ।
करित निजमुकटीं वोवाळणी ।
प्रभुजी तुज ॥ ३३५ ॥
३३५) मग पाहात पाहात
प्रत्येक क्षणांत मनामधयें चकित होऊन, हे देवा, ते तुला आपल्या मुकुटानें ओवाळीत
आहेत.
ते जय जय घोष कलरवें ।
स्वर्ग गाजविताती आघवे ।
ठेवित ललाटावरी बरवे ।
करसंपुट ॥ ३३६ ॥
३३६) त्या ‘ जय जय ‘
घोषांच्या मंजुळ शब्दानें ते सर्व स्वर्गामध्यें गजर करतात व आपले दोन्ही हात
चांगले जोडून नमस्कार करतात.
तिये विनयदुमाचिये आरवीं ।
सुरवाडली सात्त्विकांची माधवी ।
म्हणोनि करसंपुटपल्लवीं ।
तूं होतासि फळ ॥ ३३७ ॥
३३७) त्या नम्रतारुपी
वृक्षांच्या अरण्यामध्यें, अष्टसात्त्विक भावरुपी वसंत ऋतू अनुकूल झाला, म्हणून (
त्यांच्या ) करसंपुटरुपी पालवीला तूं फल प्राप्त झाला आहेस.
रुपं महत् ते
बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम् ।
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं
दृष्ट्वा लोकाः प्रव्याथितास्तथाहम् ॥ २३ ॥
२३) हे महाबाहो, अनंत
मुखें व नेत्र असलेलें, अनंत बाहु, मांड्या व पाय असलेलें, अनंत उदरें असलेलें,
अनंत दाढांच्या योगे भीषण असलेलें तुझें प्रचंड रुप पाहून, हे लोक व्याकुळ झालेले
आहेत, तसा मीदेखील व्याकुळ झालो आहे.
जी लोचन भाग्य उदेलें । जीवा
सुखाचें सुयाणें पाहलें ।
जे अगाध तुझें देखिलें ।
विश्र्वरुप इहीं ॥ ३३८ ॥
३३८) महाराज, यांनीं
जें तुझें अगाध विश्र्वरुप पाहिलें, तें त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आलें
आहे; अथवा त्यांच्या जीवाला सुखाचा सुकाळ उगवला. ( प्राप्त झाला )
हें लोकव्यापक रुपडें ।
पाहतां देवाही चवकु पडे ।
याचें सन्मुखपण जोडे ।
भलतयाकडूनी ॥ ३३९ ॥
३३९) हे लोकांना
व्यापणारे रुप पाहून देवांनाहि दचका पडतो, वाटेल तिकडून यास पाहिले असतां, हा समोर
असा वाटतो.
ऐसें एकचि परि विचित्रें ।
आणि भयानकें तेवींचि बहु वक्त्रें ।
बहुलोचन हे सशस्त्रें ।
अनंतभुजा ॥ ३४० ॥
३४०) याप्रमाणें आपले
एकच स्वरप आहे, परंतु विचित्र आणि भयानक अशी त्याला अनेक मुखें, अनेक नेत्र व
शस्त्र धारण केलेले असे अगणित हात आहेत.
हे अनंत चारु चरण । बहु उदर
आणि नानावर्ण ॥
कैसें प्रतिवदनीं मातलेपण ।
आवेशाचें ॥ ३४१ ॥
३४१) या विश्वरुपास
अगणित सुंदर पाय आहेत, अनेक पोटें आहेत आणि नाना प्रकारचे रंग आहेत, व प्रत्येक
मुखाच्या ठिकाणी क्षोभाचा मस्तपणा कसा आहे !
हो कां जे महाकल्पाचां
अंतीं । तवकलेनि यमें जेउतलेतीं ।
प्रळयाग्नीचीं उजिती ।
आंबुखिलीं जैसीं ॥ ३४२ ॥
३४२) अथवा महाप्रळयाच्या
शेवटीं जोर बांधलेल्या यमानें जशा कांही जिकडे तिकडे प्रळयाग्नीच्या आगट्या
पेटविल्या आहेत;
नातरी संहारत्रिपुरारीचीं
यंत्रें । कीं प्रळयभैरवांचीं क्षेत्रें ।
नाना युगांतशक्तीचीं
पात्रें । भूतखिचा वोढविलीं ॥ ३४३ ॥
३४३) अथवा संहार करणार्या
श्रीशंकराचा तोफखाना, किंवा प्रळयकाळच्या भैरवदेवांचे समुदाय उत्पन्न व्हावेत, अगर
प्राण्यांच्या नाशासाठीं युगान्तशक्तीचीं पात्रें पुढें सरसावली आहेत,
तैसीं जियेतियेकडे। तुझीं
वक्त्रें जीं प्रचंडें ।
न समाती दरीमाजीं सिंहाडे ।
तैसे दांत दिसती रागीट ॥ ३४४ ॥
३४४) त्याप्रमाणें
जिकडेतिकडे तुझीं प्रचंड तोंडें मावत नाहींत आणि दरीमध्यें जसें सिंह तसें तुझ्या
मुखांत दांत उग्र दिसतात.
जैसें काळरात्रीचेनि
अंधारें । उल्हासत निघती संहारखेंचरें ।
तैस वदनीं प्रळयरुधिरें ।
काटलिया दाढा ॥ ३४५ ॥
३४५) प्रळयकाळच्या गडद
रात्रींत नाश करणारीं पिशाच्चें जशीं उल्हासानें संचार करतात, त्याप्रमाणें
प्रळयकाळच्या नाश पावणार्या प्राण्यांच्या रक्तानें या मुखांतील दाढा भरलेल्या
आहेत.
हें असो काळें अवंतिलें रण
। कां सर्वसंहारें मातलें मरण ।
तैसें अतिभिंगुळवाणेंपण ।
वदनीं तुझिये ॥ ३४६ ॥
३४६) हें असो, काळानें
जसें काय युद्धास आमंत्रण करावें, अथवा सर्वांच्या संहारकालीं जसें मरण माजून
राहातें, त्याप्रमाणें तुझ्या मुखांत अत्यंत भयानकपणा आहे.
हे बापडी लोकसृष्टी ।
मोटकीये विपाइली दिठी ।
आणि दुःखकालिंदीचां तटीं ।
झाड होऊनि ठेली ॥ ३४७ ॥
३४७) त्या बिचार्या
त्रैलोक्यावर जेव्हां थोडीशी नजर टाकली, तेव्हां तें दुःखरुप कालिंदीच्या किनार्यावर
झाड बनून राहिलें आहे ( असें दिसलें )
तुज महामृत्यूचां सागरीं ।
हे त्रैलोक्यजीविताची तरी ।
शोकदुर्वातलहरी । आंदोळत
असे ॥ ३४८ ॥
३४८) तूं जो
महामृत्युरुप समुद्र, त्यांत ही त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरुप प्रतिकूल
वार्यानें उत्पन्न झालेल्या लाटांमुळें झोके खात आहे.
एथ कोपोनि जरी वैकुंठें ।
ऐसें हन म्हणिपैल अवचटें ।
जें तुज लोकांचें काइ वाटे
। तूं ध्यानसुख हें भोगीं ॥ ३४९ ॥
३४९) ‘ तुला या
लोकांचें काय वाटतें ? तूं माझ्या या ध्यानाचें सुख भोग म्हणजे झालें ! ‘ अहो
श्रीकृष्णा, असें जरी आपण आतां एकाएकीं रागावून बोललात तरी-
वरी जी लोकांचें कीर साधारण
। वायां आड सूतसें वोडण ।
केवीं सहसा म्हणें प्राण ।
माझेचि कांपती ॥ ३५० ॥
३५०) पण महाराज,
माझ्याच जीवास भीतीनें कंप सुटला आहे, असें मी एकदम कसें म्हणावें ? म्हणून जगाचें
सर्वसाधारण दुःख उगीच आडपडद्यासारखें खरोखर मध्यें केले आहे.
ज्या मज संहाररुद्र वासिपे
। ज्या मजभेणें मृत्यु लपे ।
तो मी अहाळबाहळी कांपें ।
ऐसें तुवां केलें ॥ ३५१ ॥
३५१) ज्या मला
प्रळयकाळचा रुद्र ( देखील ) भितो, ज्या माझ्या भयानें मृत्यु लपून राहातो, असा जो
मी, तो या ठिकाणी भयानें फार कांपत आहे, असें तूं केलें आहेस,
परि नवल बापा हे महामारी ।
इया नाम विश्र्वरुप जरी ।
हे भ्यासुरपणें हारी ।
भयासि आणी ॥ ३५२ ॥
३५२) परंतु हें पाहा,
ही महामारीच आहे आणि यालाच जर विश्वरुप म्हणावयाचें, तर बापा, हें एक आश्र्चर्यच
आहे. ही महामारी आपल्या विक्राळ स्वरुपानें ( साक्षात् ) भयासहि माघार घ्यावयास
लावतें.
No comments:
Post a Comment