Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 16
मूळ श्लोक
नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥ २४ ॥
२४) हे विष्णो, गगनाला स्पर्श करणार्या,
दीप्तिमान्, अनेक रंगांनीं युक्त, जबडा पसरलेल्या, दीप्तिमान् व विशाल नेत्र
असलेल्या अशा तुला पाहून, ज्याचा अंतरात्मा व्याकुळ झाला आहे, असा मी धैर्य धरुं
शकत नाहीं व शांतिदेखील धरुं शकत नाही.
ठेलीं महाकाळेंसि हटेंतटें । तैसीं कितीएकें
मुखें रागिटें ।
इहीं वाढोनियां धाकुटें । आकाश केलें ॥ ३५३ ॥
३५३) महाकाळाबरोबर ज्यांनीं पैजेनें बरोबरीचा
सामना बांधला आहे, अशीं कित्येक रागीट मुखें असून त्यांनी आपल्या विस्तारानें आकाश
लहान केलें आहे.
गगनाचेनि वाडपणें नाकळे । त्रिभुवनींचियाही
वारिया न वेंटाळे ।
ययाचेनि वाफा आगी जळे । कैसें धडाडीत असे ॥ ३५४ ॥
३५४) आकाशाच्या मोठेपणास जीं आकळलीं जात
नाहींत आणि त्रिभुवनांतील वार्यानेंहि जीं, ( मुखें ) वेष्टिलीं जात नाहीत, त्या
मुखांच्या वाफेनें अग्नि जळतो; या मुखांतून अग्नीचे लोळ कसे बाहेर येत आहेत!
तेवींचि एकसारिखें एक नोहे । एथ वर्णावर्णाचा
भेदु आहे ।
हो कां जे प्रळयीं सावावे लाहे । वह्नि ययाचा ॥
३५५ ॥
३५५) त्याप्रमाणें एकसारखें एक मुख नसून
यांच्यात रंगारंगाचा भेद आहे. फार काय सांगावें ! अशा या मुखांचे प्रळयकाळचा
अग्नीसुद्धां साहाय्य घेतो.
जयाचिये आंगींची दीप्ती येवढी । जे त्रैलोक्य
कीजे राखोंडी ।
कीं तयाही तोंडें आणि तोंडीं । दांत दाढा ॥ ३५६ ॥
३५६) ज्याच्या अंगाचें तेज एवढें आहे की, तें
त्रैलोक्याची राखुंडी करील, त्यालाहि तोंडें आहेत व त्या तोंडात दांत व दाढा आहेत
!
कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र कीं महापुरीं
पडिला ।
विषाग्नी मारा प्रवर्तला । वडवानळासी ॥ ३५७ ॥
३५७) हें कसें झालें पाहा ! जसा वार्याला
धनुर्वात व्हावा, समुद्र महापुरांत पडावा किंवा विषाग्नि वडवानळाचा नाश करण्यास
प्रवृत्त व्हावा.
हळाहळ आगीं पियालें । नवल मरण मारा पेटलें ।
तैसें संहारतेजा या जाहलें । वदन देखा ॥ ३५८ ॥
३५८) अग्नीनें जसें हालाहल विष प्यावें, अथवा
आश्चर्य हें कीं, मरण जसें मारण्यास तयार व्हावें, त्याप्रमाणें या संहारतेजाला
दुःख झालें आहे, असे समजा !
परी कोणें मानें विशाळ । जैसें तुटिलिया अंतराळ ।
आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें ॥ ३५९ ॥
३५९) परंतु ती मुखें किती मोठी आहेत म्हणून
म्हणाल, तर आकाश तुटून पडल्याने जशी आकाशास खिंड पडून राहाते,
नातरी काखे सूनि वसुंधरी । जैं हिरण्याक्षु
रिगाला विवरीं ।
तैं उघडलें हाटकेश्र्वरीं । जेवीं पाताळकुहर ॥
३६० ॥
३६०) अथवा बगलेंत पृथ्वी मारुन जेव्हां
हिरण्याक्ष दैत्य गुहेंत शिरला तेव्हां हाटकेश्र्वरानें जसें पाताळरुपी गुहेचे दार
उघडलें.
तैसा वक्रांचा विकाशु ।
माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु ।
विश्र्व न पुरे म्हणोनि
घांसु । न भरीचि कोंडें ॥ ३६१ ॥
३६१) त्याचप्रमाणें तोंडें पसरलेलीं आहेत व त्यामध्यें
जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहेत; त्यांच्या घासास
विश्व पुरें पडणार नाहीं, म्हणून हें विश्वरुप या विश्वाचा
लीलेनें घास घेत
नाही.
आणि पाताळव्याळांचां
फूत्कारीं । गरळज्वाला लागती अंबरीं ।
तैसी पसरलिये वदनदरी--।
माजीं हे जिव्हा ॥ ३६२ ॥
३६२) आणि ज्याप्रमाणें
पाताळांतील सर्पांच्या फूत्कारानें त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशांत पसराव्यात,
त्या ज्वालांप्रमाणें जिव्हा या वदनरुपी दरींत पसरली आहे.
काढूनि प्रळयविजूंचीं जुंबाडें
। जैसे पन्नासिले गगनाचे हुडे ।
तैसे आवाळुवांवरी आंकडे । धगधगीत
दाढांचे ॥ ३६३ ॥
३६३) प्रळयकाळच्या
विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत, तशी ओठांबाहेर तीक्ष्ण अशा
दाढांची टोकें दिसत आहेत.
आणि ललाटपटाचि खोळे । कैसें
भयातें भेडविताती डोळे ।
हो कां जे महामृत्युचे
उमाळे । कडवसां राहिले ॥ ३६४ ॥
३६४) आणि ललाटरुप
वस्त्राच्या खोळींत असलेले डोळे, हे जसें कांही भयासच भेडसावीत आहेत. अथवा ते
डोळे, महामृत्युचे लोटच असून ( भिवयांच्या ) अंधारांत राहिले आहेत.
ऐसें वाऊनि महाभयाचें भोज ।
एथ काय निपजवूं पाहतोसि काज ।
तें नेणें परी मज । मरणभय
आलें ॥ ३६५ ॥
३६५) असें हें
मृत्युचें कौतुक धारण करुन ( म्हणजे आपल्या स्वरुपीं दाखवून ) या ठिकाणीं तूं काय
कार्यसिद्धी करुं पाहतोस, तें मला कळत नाही ! परंतु मला मात्र मृत्युचें भय वाटूं
लागलें आहे.
देवा विश्र्वरुप पहावयाचे
डोहाळे । केले तियें पावलो प्रतिफळें ।
बा देखलासि आतां डोळे । निवावे
तैसे निवाले ॥ ३६६ ॥
३६६) अहो, देवा,
विश्वरुप पाहण्याचे डोहाळे झाले होते, त्याची पूर्ण फलप्राप्ति होऊन, बापा, तुमचें
विश्वरुप आतां पाहिल्यानें डोळे शांत व्हावे, तसें झालें.
अहो देहो पार्थिव कीर जाये
। ययाची काकुळती कवणा आहे ।
परि आतां चैतन्य माझें
विपायें । वांचे कीं न वांचे ॥ ३६७ ॥
३६७) अहो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्यानें तो तर
निश्चयेंकरुन नाश पावणारच, त्याची काळजी कोणीं
केली आहे ? परंतु आतां माझें चैतन्य वाचतें की नाही
असें मला वाटूं लागलें आहे.
No comments:
Post a Comment