Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 18 Ovya 381 to 3९6
मोटकें विश्र्वरुप डोळां
देखिलें । आणि सुखाचें अवर्षण पडिलें ।
आता जापाणीं जापाणीं आपुलें
। अस्ताव्यस्त हें ॥ ३८१ ॥
३८१) विश्र्वरुप
डोळ्यानें जरासें पाहिलें नाहीं, तोंच सुखाचा दुष्काळ पडला. म्हणून आतां तूं आपलें
अस्ताव्यस्त रुप आंवरुन घे आंवरुन घे.
ऐसें करिसी म्हणोनि जरि
जाणें । तरि हे गोष्टि सांगावी कां मी म्हणे ।
आतां एक वेळ वाचवीं जी
प्राणें । यां स्वरुपप्रळयापासोनि ॥ ३८२ ॥
३८२) तूं असें करशील
असें जर मला ठाऊक असतें, तर ‘ ही गोष्ट मला सांगा, ‘ असें मी कशाला म्हटलें असतें
? आतां या स्वरुप-प्रळयापासून माझें एकवार प्राण वांचवा महाराज !
जरी तूं गोसावी आमुचा अनंता
। तरि सुईं वोडण माझिया जीविता ।
सांटवीं पसारा हा मागुता ।
महामारीचा ॥ ३८३ ॥
३८३) अहो श्रीकृष्णा,
जर आपण आमचे स्वामी आहांत तर माझ्या जीविताच्या आड ढाल घाला, व हा विश्वरुपी
महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरुपाच्या ठिकाणीं सांठवा.
आइकें सकळ देवांचिया
परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्र्व वसतें ।
तें विसरलासी हें उपरतें ।
संहारुं आदरिलें ॥ ३८४ ॥
३८४) हे सर्व
देवांपेक्षां श्रेष्ठ अशा देवा, ऐक. तूं जो चैतन्य, त्या तुझ्यामुळें सर्व विश्र्व
वसतें आहे तें विसरलास व उलटें संहार करण्याचें काम आरंभलें आहेस.
म्हणोनि वेगीं प्रसन्न होईं
देवराया । संहरीं संहरीं आपुली माया ।
काढीं मातें महाभया--। पासोनियां
॥ ३८५ ॥
३८५) एवढ्याकरितां हे
देवांतील राजा, श्रीकृष्णा, लवकर प्रसन्न हो व आपल्या मायाशक्तीला आवर; आणि मल या
मरणासारख्या मोठ्या भयांतून बाहेर काढ.
हा ठायवरी पुढतपुढती ।
तूंते म्हणिजे बहुवा काकुळती ।
ऐसा मी विश्र्वमूर्ती ।
भेडका जाहलों ॥ ३८६ ॥
३८६) इतकें तुला मोठ्या
दीनपणे वारंवार म्हणावें, असा मी विश्वरुपाच्या योगानें खरोखर भ्यालों आहें.
जें अमरावतीये आला धाडा ।
तैं म्यां एकलेनि केला उवेडा ।
जो मी काळाचियाही तोंडा ।
वासिपु न धरीं ॥ ३८७ ॥
३८७) ज्या वेळीं
अमरावतीवर राक्षसांचा हल्ला आला, त्या वेळीं मी एकट्यानें तो परतविला व साक्षात्
काळ समोर आला, तरी भय न धरणारा असा मी आहें,
परि तया आंतुल नव्हे हे
देवा । एथ मृत्युसही करुनि चढावा ।
तुवां आमुचाचि घोटु भरावा ।
या सकळ विश्र्वेंसी ॥ ३८८ ॥
३८८) परंतु देवा, ही
विश्वरुप गोष्ट त्यांतील नव्हे. येथें तूं मृत्युवर ताण करुन या सर्व विश्वासकट
माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस.
कैसा नव्हता प्रळयाचा वेळु
। गोखा तूंचि मिनलासि काळु ।
बापुडा हा त्रिभुवनगोळु ।
अल्पायु जाहला ॥ ३८९ ॥
३८९) प्रळयाची वेळ
नसतांना मध्येंच कसा तूं काळ प्राप्त झालास ? हें त्रैलोक्य बिचारें अल्पायुषी
झालें असें वाटतें.
अहा भाग्या विपरीता । विघ्न
उठिलें शांत करितां ।
कटा विश्र्व गेलें आतां ।
तूं लागलासि ग्रासूं ॥ ३९० ॥
३९०) अरेरे ! विपरीत
दैवा ! विश्वरुप दर्शनानें शांत व्हावें म्हणून खटपट केली, तों अकल्पित विघ्न
उत्पन्न झाले. हाय ! हें त्रैलोक्य आतां नाहीसें होत चाललें ! तूं हे आतां
गिळावयास लागलास !
हे नव्हे मा रोकडें । सैंध
पसरुनिया तोंडें ।
कवळितासि चहूंकडे । सैन्यें
इयें ॥ ३९१ ॥
३९१) एकसारखीं तोंडें
पसरुन हीं सैन्यें चारी बाजूंनी तूं ग्रासीत आहेस, हें प्रत्यक्ष ( दिसत ) नाहीं
काय !
मूळ श्लोक
अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे
सहैवावनिपालसंघैः ।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि
योधमुख्यैः ॥ २६ ॥
२६) तसेंच राजांच्या समुदायांसहवर्तमान हे
धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, भीष्म, द्रोण, तसाच कर्ण, त्याप्रमाणेंच आमच्या
पक्षाच्या देखील मुख्य योद्ध्यांसह----
नोहेति हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया
धृतराष्ट्राचे कुमर ।
हे गेले गेले सपरिवार । तुझां वदनीं ॥ ३९२ ॥
३९२) हे कौरवांच्या वंशातील वीर, आंधळ्या
धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत का ? अरे अरे, हे तर आपल्या परिवारांसुद्धां तुझ्या
तोंडांत पूर्णपणे गेलेच म्हणावयाचे !
आणि जे जे यांचेनि सांवायें । आले देशोदेशींचे
राये ।
तयांचें सांगावया जावों न लाहे । ऐसें सरकटितु
आहासी ॥ ३९३ ॥
३९३) आणि जे जे याच्या मदतीकरितां देशोदेशीचे
राजे आले आहेत, त्यांची वार्ताहि सांगू जाता उरणार नाहीं, ( कोणी उरणार नाहीं, )
असा तूं सर्वांचा सरसकट ग्रास करीत आहेस.
मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटां ।
आरणीं हन थाटा । देतोसि मिठी ॥ ३९४ ॥
३९४) मदोन्मत्त हत्तीचे समुदाय तू घटाघट
गिळीत असून, युद्धभुमीवरील सेनासमुदाय तू गिळून टाकीत आहेस.
जंत्रावरिचील मार । पदातींचे मोगर ।
मुखाआंत भार । हारपताति मा ॥ ३९५ ॥
३९५) तोफांवरुन मारा करणारे लोक व पायांनी
चालणारे पायदळ, यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहेत, नाही कां ?
कृतांताचिया जावळी । जें एकचि विश्र्वातें गिळी ।
तियें कोटीवरील सगळीं । गिळितासि शस्त्रें ॥ ३९६
॥
No comments:
Post a Comment