Tuesday, July 21, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part 12 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १२


Dnyaneshwari Adhyay 2 Part 12 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १२
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या २७६ ते ३००
म्हणोनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होईं स्थिरु ।
मनें करीं अव्हेरु । फळहेतूचा ॥ २७६ ॥  
२७६) म्हणून भक्तियोग हाच भक्कम पायावर उभारलेला आहे. त्यावर अर्जुना, तूं आपले मन स्थिर कर व मनानें फलाशेचा त्याग कर.
जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले ।
इहीं उभय संबंधीं सांडिले । पापपुण्यीं ॥ २७७ ॥ 
२७७) जें बुद्धियोगाचा आश्रय करतात, तेच संसारसागराच्या पलीकडे जातात; त्यांचीच पाप व पुण्य दोहोंच्याहि बंधांतून सुटका होते.  
ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळ नातळती ।
आणि यातायाती लोपती । अर्जुना तयां ॥ २७८ ॥
२७८) ते ( निष्काम कर्मयोगी ) कर्मे तर करतात, पण कर्मफलाला ( मनानेहि ) शिवत नाहीत. म्हणून अर्जुना, जन्ममरणाच्या त्यांच्या येरझारा बंद पडतात.
मग निरामयभरित । पावती पद अच्युत ।
ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥ २७९ ॥
२७९) मग अर्जुना, ते बुद्धियोगाचें आचरण करणारे लोक ( सर्व उपद्रवरहित म्हणून ) ब्रह्मानंदानें ओथंबलेले व कधींहि न ढळणारें असें पद पावतात.   
तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें या सांडिसी ।
आणि वैराग्य मानसीं । संचरेल ॥ २८० ॥
२८०) अर्जुना, ज्या वेळेला हा मोह तूं टाकशील आणि तुझ्या मनांत वैराग्याचा संचार होईल, त्या वेळेला तूं असा होशील.
मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । 
तेणें निचाडें होईल मन । अपैसें तुझें ॥ २८१ ॥
२८१) मग शुद्ध व गंभीर असें आत्मज्ञान ( तुझ्या ठिकाणीं ) उत्पन्न होईल व त्यायोगानें तुझें मन सहजच निरिच्छ होईल. 
तेथ आणिल कांहीं जाणावें । कां मागिलातें स्मरावें ।
हें अर्जुना आघवें । पारुषेल ॥ २८२ ॥
२८२) तेथें ( तशी तुझी स्थिति झाल्यावर ) आणखी ( पुढें ) कांहीं समजून घ्यावें किंवा जें ( कांहीं ज्ञान ) मागें मिळविलें, तें पुन्हां आठवावें, हें सर्व अर्जुना, केवळ जागच्या जागीं राहील. 
इंद्रियांचिया संगती । जिये पसरु होतसे मती ।
ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरुपीं ॥ २८३ ॥
२८३) इंद्रियांच्या संगतीनें जी बुद्धि फांकते, ती पुन्हा आपल्या स्वरुपाच्या ठिकाणीं स्थिर होईल.
समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्र्चळ ।
तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥ २८४ ॥
२८४) मग केवळ समाधीच्या सुखांत ( शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणीं ) ज्या वेळेला बुद्धि स्थिर होईल, त्या वेळेला संपूर्ण निष्काम कर्मयोग तुझ्या हातांत आला, असें समज. 
तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा ।
मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधि ॥ २८५ ॥
२८५) त्या वेळीं अर्जुन म्हणाला, देवा, हाच सर्व अभिप्राय मी आतां विचारतों; हे करुणासागरा, तो तूं सांग.
मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें ।
तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि ॥ २८६ ॥
२८६) मग श्रीकृष्ण म्हणाला, ‘ अर्जुना, तुला जें योग्य वाटेल , तें मोकळ्या मनानें खुशाल विचार. ‘
या बोला पार्थें । म्हणिलें सांग पां श्रीकृष्णातें ।
काय म्हणिपे स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं ॥ २८७ ॥
२८७) या बोलन्यावर अर्जुनानें श्रीकृष्णाला म्हटलें, देवा, स्थितप्रज्ञाला ( ज्याची बुद्धि स्थिर झाली त्याला ) काय म्हणतात व त्याला ओळखावें कसें ? सांग बरें ! 
आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसां चिन्हीं जाणिजे ।
जो समाधिसुख भुंजे । अखंडित ॥ २८८ ॥
२८८) आणि ज्याला स्थिरबुद्धि म्हणतात व जो समाधिसुखाचा निरंतर अनुभव घेतो; त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावें ? 
तो कवणे स्थिती असे । कैसेनि रुपीं विलसे । 
देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ॥ २८९ ॥
२८९) तो कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या प्रकारें वागतो, हे लक्ष्मीपति श्रीकृष्णा, मला सांगावें.
तव परब्रह्मअवतरणु । जो षड्गुणाधिकरणु ।
तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥ २९० ॥
२९०) तेव्हां ऐश्र्वर्यादि सहा गुणांचें आश्रयस्थान असा जो श्रीकृष्ण, तो काय बोलतां झाला, ( तें ऐका ).
 म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं ।
तो अंतराय स्वसुखेंसी । करीत असे ॥ २९१ ॥
२९१) ( श्रीकृष्ण ) म्हणाला, अर्जुना ऐक, मनांत जी उत्कट विषयासक्ति असते, ती आत्मसुखांत अडथळा आणते. 
जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरणभरितु ।
परी विषयामाजी पतितु । जेणें संगें कीजे ॥ २९२ ॥
२९२) जो सदा तृप्त असतो, ज्याचें अंतःकरण नेहमी आनंदानें भरलेलें असतें, परंतु अशा जीवात्म्याचेंहि ज्याच्या ( कामाच्या ) संमतीनें विषयांमध्यें पतन होतें,  
तो कामु सर्वथा जाये । जयाचें आत्मतोषीं मन राहे।
तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणें ॥ २९३ ॥
२९३) जो काम ज्याचा सर्वथैव गेलेला असतो व ज्याचें मन ( निरंतर ) आत्मसुखांत ( निमग्न ) राहातें, तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असें समज. 
नाना दुःखीं प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं ।
आणि सुखाचीया आर्ती । अडपैजेना ॥ २९४ ॥ 
२९५) कितीहि दुःखें प्राप्त झाली, तरी ज्याचें चित्त खिन्न होत नाहीं, आणि जो सुखाच्या अभिलाषेनें कधीं अडकला जात नाहीं, 
अर्जुना तयांचा ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं ।  
आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्ण तो ॥ २९५ ॥ 
२९५) अर्जुना, त्याच्या ठिकाणीं स्वभावतःच कामक्रोध नसतात आणि त्याला भय हें केव्हांच माहीत नसतें; ( असा ) तो परिपूर्ण होय.
ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि ।
जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥ २९६ ॥
२९६) असा जो अमर्याद आहे व जो ( देहप्रपंचादि ) उपाधि सोडून भेदरहित झालेला असतो, तो स्थिरबुद्धि होय, असे समज.
जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्ण चंदु कां जैसा ।
अघमोत्तम प्रकाशा-। माजीं न म्हणे ॥ २९७ ॥
२९७) परिपूरण चंद्र आपला प्रकाश देतांना हा उत्तम, हा अधम, असें ज्याप्रमाणें म्हणत नाहीं, त्याप्रमाणें जो सदा सर्वत्र सारखा ( समबुद्धिनें ) वागतो;
ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रीं सदयता ।
आणि पालटु नाहीं चित्ता । कवणे वेळे ॥ २९८ ॥
२९८) ( ज्याच्या ठिकाणीं ) अशी अखंड समान व भूतमात्राविषयीं सदयता असते, आणि कोणत्याहि वेळीं ज्याच्या चित्तांत पालट म्हणून कसा तो नाही,
गोमटें कांहीं पावे । तरी संतोषें तेणें नाभिभवे ।
जो ओखटेनि नागवे । विषादासी ॥ २९९ ॥
२९९) कांहीं चांगले प्राप्त झालें, तरी त्यापासून होणार्‍या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाहीं व वाईट गोष्ट झाल्यामुळें जो खिन्नतेच्या तावडींत सांपडत नाही; 
ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु ।
तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥ ३०० ॥

३००) त्याप्रमाणें जो हर्षशोकरहित असतो व आत्मज्ञानानें संपन्न असतो, तो स्थिरबुद्धि होय, असें अर्जुना जाण.




Custom Search

No comments: