Sunday, July 19, 2020

ShriRamcharitmans Part 29 श्रीरामचरितमानस भाग २९


ShriRamcharitmans Part 29 
श्रीरामचरितमानस भाग २९ 
दोहा १७४ ते १७६
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—भूपति भावी मिटइ नहिं 
जदपि न दूषन तोर ।
किएँ अन्यथा होइ नहिं 
बिप्रश्राप अति घोर ॥ १७४ ॥
( ब्राह्मण म्हणाले, ) हे राजा, जरी तुझा काही दोष नसला, तरी होणारे चुकत नाही. ब्राह्मणांचा शाप हा फार भयानक असतो. तो टाळला तरी टाळता येत नाही.’ ॥ १७४ ॥
अस कहि सब महिदेव सिधाए । 
समाचार पुरलोगन्ह पाए ॥
सोचहिं दूषन दैवहि देहीं । 
बिरचत हंस काग किय जेहीं ॥
असे म्हणून सर्व ब्राह्मण निघून गेले. नगरवासीयांनी जेव्हा हे वर्तमान ऐकले, तेव्हा ते काळजीत पडले आणि विधात्याला दोष देऊ लागले. विधात्याने हंस बनविण्याऐवजी हंसाचा कावळा करुन टाकला. ( अशा पुण्यात्म्या राजाला देवता बनवावयास हवे होते, तर राक्षस करुन टाकले. ) ॥ १ ॥
उपरोहितहि भवन पहुँचाई । 
असुर तापसहि खबरि जनाई ॥
तेहिं खल जहँ तहँ पत्र पठाए । 
सजि सजि सेन भूप सब धाए ॥
( इकडे ) पुरोहिताला त्याच्या घरी पोहोचविल्यावर असुर कालकेतूने कपटी तपस्व्याला सर्व वार्ता सांगितली. त्या दुष्टाने जिकडे-तिकडे पत्रे पाठविली. त्यामुळे प्रतापभानू राजाचे सर्व शत्रू राजे सेना सज्ज करुन चालून आले. ॥ २ ॥
घेरेन्हि नगर निसान बजाई । 
बिबिध भाँति नित होइ लराई ॥
जूझे सकल सुभट करि करनी । 
बंधु समेत परेउ नृप धरनी ॥
त्यांनी रणभेरी वाजवून नगराला वेढा घातला. सतत तर्‍हेतर्‍हेने लढाया होऊ लागल्या. प्रतापभानूचे सर्व शूर योद्धे लढत-लढत धारातीर्थी पडले. भावाबरोबर राजाही ठार झाला. ॥ ३ ॥
सत्यकेतु कुल कोउ नहिं बाँचा । 
बिप्रश्राप किमि होइ असाँचा ॥
रिपु जिति सब नृप नगर बसाई । 
निज पुर गवने जय जसु पाई ॥
सत्यकेतूच्या कुळातील कोणीही वाचले नाही. ब्राह्मणांचा शाप खोटा कसा ठरणार ? शत्रूला जिंकल्यावर, नगर पुन्हा वसवून सर्व राजे विजय व कीर्ती मिळवून आपपल्या देशी परतले. ॥ ४ ॥
 दोहा—भरद्वाज सुनु जाहि 
जब होइ बिधाता बाम ।
धूरि मेरुसम जनक जम 
ताहि ब्यालसम दाम ॥ १७५ ॥
( याज्ञवल्क्य म्हणतात-) ‘ हे भरद्वाज, विधाता जेव्हा प्रतिकूल होतो, तेव्हा एखादा धूलिकण मेरुपर्वतासारखा ( अवजड व चिरडून टाकणारा ) होतो. प्रत्यक्ष बाप कर्दनकाळ होतो व दोरी सापाप्रमाणे ( दंश करणारी ) होते.  ॥ १७५ ॥
काल पाइ मुनि सुनु सोइ राजा । 
भयउ निसाचर सहित समाजा ॥
दस सिर ताहि बीस भुजदंडा । 
रावन नाम बीर बरिबंडा ॥ 
हे मुनी, ऐका. यथाकाल तोच राजा रावण नावाचा राक्षस झाला. त्याला दहा शिरे व वीस हात होते. तो प्रचंड शूर होता. ॥ १ ॥
भूप अनुज अरिमर्दन नामा । 
भयउ सो कुंभकरन बलधामा ॥
सचिव जो रहा धरमरुचि जासू । 
भयउ बिमात्र बंधु लघु तासु ॥
अरिमर्दन नावाचा जो राजाचा धाकटा भाऊ होता, तो बलाढ्य कुंभकर्ण झाला. त्याचा जो धर्मरुची नावाचा मंत्री होता, तो रावणाचा सावत्र धाकटा भाऊ झाला. ॥ २ ॥
 नाम बिभीषन जेहि जग जाना । 
बिष्नुभगत बिग्यान निधाना ॥
रहे जे सुत सेवक नृप केरे । 
भए निसाचर घोर घनेरे ॥
त्याचे नाव बिभिषण. त्याला सर्व जग जाणते. तो विष्णुभक्त व ज्ञान-विज्ञानाचे भांडार होता. राजाचे जे पुत्र व सेवक होते, ते सर्व फार भयानक राक्षस झाले. ॥ ३ ॥
कामरुप खल जिनस अनेका । 
कुटिल भयंकर बिगत बिबेका ॥
कृपा रहित हिंसक सब पापी । 
बरनि म जाहिं बिस्व परितापी ॥
ते सर्व राक्षस अनेक जातींचे, मनास येईल ते रुप धारण करणारे, दुष्ट, कुटिल, भयंकर, विवेकहीन, निर्दयी, पापी आणि जगाला इतकी यातना देणारे होते की, त्यांचे वर्णन करता येत नाही. ॥ ४ ॥
दोहा--उपजे जदपि पुलस्त्यकुल 
पावन अमल अनूप ।
तदपि महीसुर श्राप 
बस भए सकल अघरुप ॥ १७६ ॥
जरी ते पुलस्त्य ऋषींच्या पवित्र, निर्मल आणि अनुपमेय कुळात जन्मले होते, तरी ब्राह्मणांच्या शापाने ते सर्व पापरुप झाले. ॥ १७६ ॥
कीन्ह बिबिध तप तीनिहुँ भाई । 
परम उग्र नहिं बरनि सो जाई ॥
गयउ निकट तप देखि बिधाता । 
मागहु बर प्रसन्न मैं ताता ॥
तिन्ही भावांनी ( रावण, कुंभकर्ण, बिभिषण ) अनेक प्रकारची इतकी उग्र तपस्या केली की, ती सांगता येणे शक्य नाही. त्यांचे उग्र तप पाहून ब्रह्मदेव त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले-' बाबांनो, मी प्रसन्न झालो आहे. वर मागा. ॥ १ ॥   
करि बिनती पद गहि दससीसा । 
बोलेउ बचन सुनहु जगदीसा ॥
हम काहू के मरहिं न मारें । 
बानर मनुज जाति दुइ बारें ॥
रावणाने विनयपूर्वक त्यांचे चरण धरले आणि म्हटले, ' हे जगदीश्वर, ऐका. वानर आणि मनुष्य या दोन जाती सोडून कुणीही मारले, तरी मला मरण येऊ नये. ' ( हा वर द्या ) ॥ २ ॥
एवमस्तु तुम्ह बड़ तप कीन्हा । 
मैं ब्रह्माँ मिलि तेहि बर दीन्हा ॥
पुनि प्रभु कुंभकरन पहिं गयऊ । 
तेहि बिलोकि मन बिसमय भयऊ ॥
( शिव म्हणतात-) ' मी आणि ब्रह्मदेवांनी मिळून त्याला वर दिला- " तथास्तु " कारण तू मोठे तप केलेले आहेस. मग ब्रह्मदेव कुंभकर्णाकडे गेले. त्याला पाहून त्यांना मोठे आश्र्चर्य वाटले. ॥ ३ ॥
जौं एहिं खल नित करब अहारु । 
होइहि सब उजारि संसारु ॥
सारद प्रेरि तासु मति फेरी । 
मागेसि नीद मास षट केरी ॥

( ब्रह्मदेवांनी विचार केला की, ) हा दुष्ट नित्य आहार करु लागला तर जग ओसाड होईल. तेव्हा ब्रह्मदेवांनी सरस्वतीला प्रेरणा केली की, याची बुद्धी पालटून टाक. ( त्यामुळे ) त्याने एक दिवसाची जाग व सहा महिन्यांची झोप मागितली. ॥ ४ ॥




Custom Search

No comments: