Tuesday, July 21, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part13 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १३


Dnyaneshwari Adhyay 2 Part13
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १३ 
ज्ञानेश्र्वरी दुसरा ओव्या ३०१ ते ३२५
 कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी ।
ना इच्छावशें आवरी । आपुले आपण ॥ ३०१ ॥
३०१) किंवा ज्याप्रमाणें कासव खुषींत असतांना आपलें अवयव पसरतें, किंवा मनाला वाटल्यास आपल्या आपण आवरुन घेतें;
तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातलीं असे ॥ ३०२ ॥
३०२) त्याप्रमाणें ज्याची इंद्रियें ताब्यांत असतात व तीं तों जें म्हणेल तें करतात , त्याची बुद्धि स्थिर झालेली आहे, असें समज.
आतां अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक ।
या विषयांतें साधक । त्यजिती नियमें ॥ ३०३ ॥
३०३) अर्जुना, आतां आणखी एक नवलाईची गोष्ट सांगतों, ऐक. जे साधक निग्रहानें विषयांचा त्याग करतात,  
श्रोत्रादि इंद्रियें आवरिती । परि रसने नियमु न करिती ।
ते सहस्त्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥ ३०४
३०४) ( जे ) श्रोत्रादि इंद्रियें आवरतात, पण जिभेला आळा घालीत नाहींत, त्यांना हे विषय हजारों प्रकारांनीं घेरुन टाकतात.
जैसी वरिवरी पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे ।
तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥ ३०५ ॥
३०५) ज्याप्रमाणें एखाद्या झाडाची वरवरची पालवी खुडून टाकली पण मुळाला पाणी घातलें, तर त्या झाडाचा नाश कसा होणार ?
तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवेनि आंगें फांकें ॥
तैसा मानसीं विषो पोखे । रसनाद्वारें ॥ ३०६ ॥
३०६) तें झाड पाण्याच्या जोरावर आडव्या अंगानें ज्याप्रमणें अधिक विस्तारतें, त्याप्रमाणें रसनेंद्रियांच्या द्वारानें विषयवासना मनांत पोसतात.  
येरां इंद्रियां विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटें ।
जे जीवन हें न घटे । येणेंविण ॥ ३०७ ॥
३०७) ( ज्याप्रमाणें ) इतर इंद्रियांचे विषय तुटतात, त्याप्रमाणें हा ( जिभेचा ) विषय ( रस ) निग्रहानें तोडतां येत नाहीं; कारण त्यावांचून जगणें व्हावयाचें नाहीं. 
मग अर्जुना स्वभावें । ऐसियाही नियमातें पावे ।
जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाइजे ॥ ३०८ ॥
३०८) पण अर्जुना, जेव्हां ( साधक ) अपरोक्षानुभव घेऊन परब्रह्म होऊन जातो, तेव्हां ( त्याला ) अशाहि रसनेंचें सहज नियमन करतां येतें. 
तैं शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती ।
जैं सोहंभावप्रतीति । प्रकट होय ॥ ३०९ ॥
३०९) ज्या वेळीं तें ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो, त्या वेळी शरीराचे काम-क्रोधादि विकार नष्ट होतात आणि इंद्रियें आपले विषय विसरतात. 
येर्‍हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना।
जे राहाटताती जतना । निरंतर ॥ ३१० ॥
३१०) एर्‍हवीं अर्जुना, हीं इंद्रियें साधनानां दाद देत नाहींत. जे ( ती इंद्रियें उच्छृखल होऊं नयेत म्हणून ) ती स्वाधीन ठेवण्याकरितां खटपट करतात; 
( एरवीं, हे अर्जुना, ( बुद्धि स्थिर होण्याकरितां ) प्रयत्न करीत असलेल्या विवेकी पुरुषांचेहि मन उच्छृंखल इंद्रियें बलानें ( विषयांकडे ) ओढतात. ) 
जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी ।
जे मनातें सदा मुठी । धरुनि आहाती ॥ ३११ ॥
३११) ( जे आपल्यावर ) अभ्यासाचा पहारा ठेवतात, यमनियमांचें ( मनाला ) कुंपण घालतात व जे मनाला नेहमीं मुठींत धरुन असतात;  
तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी ।
जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥ ३१२ ॥
३१२) त्या साधकांनादेखील ( हीं इंद्रियें ) अगदीं कासावीस करुन टाकतात. ह्या इंद्रियांचा प्रताप हा असा आहे. ज्याप्रमाणें हडळ मांत्रिकाला चकविते; 
देखें विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धिचेनि मिषें ।
मग आकळिती स्पर्शें । इंद्रियांचेनी ॥ ३१३ ॥
३१३) त्याप्रमाणें पाहा, हे विषय ऋद्धिसिद्धिंच्या रुपानें प्राप्त होतात आणि मग तें इंद्रियांच्या द्वारें ( साधकाच्या मनाला ) ग्रासून टाकतात.
तिये संधी मन जाये । मग अभ्यासीं ठोठावलें ठाये ।
ऐसे बळकटपण आहे । इंद्रियांचें ॥ ३१४ ॥
३१४) अशा पेंचांत मन सांपडलें, म्हणजे तें मन आभ्यासाच्या कामीं पंगू होऊन राहतें. ( त्याचा अभ्यास जागच्या जागीं राहतो. )
म्हणोनि आइकें पार्था । यांतें निर्दळी जो सर्वथा ।
सर्व विषयीं आस्था । सांडूनिया ॥ ३१५ ॥
३१५) म्हणून अर्जुना, ऐक. सर्व विषयांवरील आसक्ति सोडून यांचें ( ( इंद्रियांचें ) जो सर्वस्वी दमन करतो; 
तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण ।
जयाचें विषयसुखें अंतःकरण । झकवेना ॥ ३१६ ॥
३१६) ज्याचें अंतःकरण विषयसुखाच्या लालसेनें फसलें जात नाहीं, तोच पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे, असे तूं समज.
जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु ।
जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥ ३१७ ॥
३१७) तो आत्मज्ञानानें निरंतर संपन्न असतो. त्याचप्रमाणें मला अंतःकरणांत कधीं विसरत नाहीं.
एर्‍हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांहीं ।
तरी साद्यंतुचि हा पाहीं । संसारु असे ॥ ३१८ ॥
३१८) एरवीं ( एखाद्यानें ) बाह्यतः विषयांचा त्याग केला, पण मनांत जर कांहीं विषय ( वासना ) असतील तर हा संपूर्ण संसार त्याला आहेच, असें समज.
जैसा का विषाचा लेशु । घेतलियां होय बहुवसु ।
मग निभ्रांत करी नाशु । जीवितासि ॥ ३१९ ॥
३१९) ज्याप्रमाणें विषाचा एक थेंब घेतला, तरी तो फार होतो, आणि मग निःसंशय प्राणांची हानि करतो;
तैसी या विषयांची शंका । मनीं वसती देखा ।
घातु करी अशेखा । विवेकजाता ॥ ३२० ॥
३२०) त्याचप्रमाणें पाहा, या विषयांचें नुसते सूक्ष्म संस्कार जरी मनांत राहिले, तरी ते संपूर्ण विचारमात्राचा घात करतात. 
जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती ।
संगीं प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥ ३२१ ॥
३२१) अंतःकरणांत विषयांची जर नुसती आठवण असेल, तर, संग टाकलेल्यासहि पुन्हां विषयासक्ति येऊन चिकटते व त्या विषयासक्तिमुळें विषयप्राप्तीची इच्छा प्रगट होते.
जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला ।
क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणें ॥ ३२२ ॥
३२२) जेथें काम उत्पन्न होतो, तेथें क्रोधानें आपलें बिर्‍हाड अगोदरच ठेवलेलें असतें, आणि जेथें क्रोध आला तेथें कार्याकार्याविषयीं अविचार ठेवलेला आहेच, असे समज.
संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति ।
चंडवातें ज्योति । आहत जैसी ॥ ३२३ ॥
३२३) ज्याप्रमाणें सोसाट्याच्या वार्‍यांत दिवा नाहींसा होतो, त्याप्रमाणें संमोहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृति नाश पावते.
कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्यतेजातें ग्रासी ।
तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥ ३२४ ॥
३२४) किंवा सूर्य मावळावयाच्या वेळेला रात्र सूर्यतेजाला ज्याप्रमाणें गिळून टाकते, त्याप्रमाणें स्मृति नाहींशी झाली म्हणजे प्राण्यांची दुर्दशा होते. 
मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्लविजे सकळ ।
तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामा जीं॥ ३२५ ॥

३२५) मग सर्वत्र अज्ञानाचा केवळ अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडतें, अशा वेळीं हृदयांत बुद्धि व्याकूळ होते,




Custom Search

No comments: