Tuesday, July 21, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part 14 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १४


Dnyaneshwari Adhyay 2 Part 14 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १४ 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या ३२६ ते ३५०

जैसें जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धांवे ।
तैसे बुद्धीसि होती भवें । धनुर्धरा ॥ ३२६ ॥
३२६) जसा जन्मांध पळापळींत सांपडला म्हणजे निरुपायानें दीन होऊन सैरावैरा धांवू लागतो, तसें अर्जुना, बुद्धीला मग भ्रांति होते,   
ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे ।
तेथ समूळ हें उघडे । ज्ञानजात ॥ ३२७ ॥
३२७) अशा रीतीनें स्मृतीला भ्रंश झाला, म्हणजे मग बुद्धीची सर्व प्रकारें कुचंबणा होते; त्याप्रसंगीं जेवढें म्हणून ज्ञान आहे, तेवढें सर्व समूळ नष्ट होतें.
चैतन्याचां भ्रंशीं । शरीरा दशा जैशी ।
पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखें ॥ ३२८ ॥
३२८) प्राण निघून गेलें असतां शरीराची जशी दशा होते, त्याप्रमाणें बुद्धीचा नाश झाला असतां पुरुषाची तशी स्थिती होते, असें समज.
म्हणोनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुलिंग लागे इंधन ।
मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ॥ ३२९ ॥
३२९) म्हणून अर्जुना, ऐक, लाकडाला ठिणगी लागली व ती एकदा कां भडकली म्हणजे त्रिभुवनाला ( जाळण्याला ) ज्याप्रमाणें तीं समर्थ होते, 
तैसें विषयांचें ध्यान । जरी विपायें वाहे मन ।
तरी येसणें हें पतन । गिंवसीत पावे ॥ ३३० ॥
३३०) त्याप्रमाणें विषयांचें चिंतन मनाकडून चुकून ( अल्पहि ) जरी झालें, तरी एवढें हें ( मोठें ) पतन शोधीत येतें. 
म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे । 
मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥ ३३१ ॥
३३१) म्हणून हे सर्व विषय पूर्णपणें मनांतूनच काढून टाकावे, मग रागद्वेष आपोआप नष्ट होतील.  
पार्था आणिक एक । जरी नाशले रागद्वेष । 
तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाहीं ॥ ३३२ ॥
३३२) अर्जुना, आणिक एक गोष्ट ( ऐक ). रागद्वेषांचा ( एकदां ) नाश झाल्यावर ( मग ) इंद्रियें विषयांत जरी ( कदाचित् ) रममाण झालीं तरी ( ते विषय ) बाधक होत नाहीत. 
जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरीं जगातें स्पर्शतु ।
तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिंचेनि ॥ ३३३ ॥
३३३) ज्याप्रमाणें आकाशांत असलेला सूर्य जगाला आपल्या किरणरुपी हातांनी स्पर्श करतो, पण त्या संगदोषानें लिप्त होतो काय ?
तैसा इंद्रियार्थीं उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न ।
जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥ ३३४ ॥
३३४) त्याप्रमाणें जो विषयांच्या ठिकाणीं अनासक्त, आत्मानंदांत तल्लीन व कामक्रोधरहित झालेला असतो;   
तरी विषयांतुही कांहीं । आपणपेंवाचुनि नाहीं ।
मग विषय कवण कायी । बाधितील कवणा ॥ ३३५
३३५) आणि विषयांतहि ( ज्याला ) आत्मस्वरुपावांचून दुसरें कांही दिसत नाहीं, त्याला कसले काय ? आणि कसली कोणाला बाधा करणार ?
जरी उदकें उदकीं बुडिजे । कां अग्नि आगी पोळिजे ।
तरी विषयसंगें आप्लविजे । परिपूर्ण तो ॥ ३३६ ॥
३३६) जर पाणी पाण्यांत बुडेल किंवा अग्नि आगीनें पोळेल, तर ( मात्र ) तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयांच्या संगतीनें लिप्त होईल.  
ऐसा आपणचि केवळ । होऊनि असे निखळ ।
तयाची प्रज्ञा अचळ । निभ्रांत मानीं ॥ ३३७ ॥
३३७) असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरुप होऊन राहतो, त्याची बुद्धि स्थिर झालेली आहे, असें तूं निःसंशय समज.  
देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । 
तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ ३३८ ॥
३३८) पाह, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते, तेथें कोणत्याहि संसार-दुःखाचा प्रवेश होत नाही.
जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।
तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥
३३९) ज्याप्रमाणें अमृताचा झरा ज्याच्या पोटांतच उत्पन्न होतो, त्याला तहानभुकेची भीति कधीं नसते;
तैसे हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ।
तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरुपीं ॥ ३४० ॥
३४०) त्याप्रमाणें अंतःकरण प्रसन्न झालें तर मग दुःख कसलें, आणि कोठलें ? त्या वेळीं परमात्मस्वरुपाच्या ठिकाणीं बुद्धि सहजच स्थिर होते.
जैसा निवातीचा दीपु । सर्वथा नेणे कंपु ।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरुपु । योगयुक्तु ॥ ३४१ ॥ 
ज्याप्रमाणे वारा नसलेल्या ठिकाणीं असलेल्या दिव्याची ज्योत मुळींच हालत नाहीं, त्याप्रमाणें योगयुक्त पुरुष स्वस्वरुपीं स्थिर बुद्धीनें राहतो.  
ये युक्तीचि कडसणी । नाहीं जयाचां अंतःकरणीं ।
तो आकळिला जाण गुणीं । विषयादिकीं ॥ ३४२ ॥
३४२) योगयुक्त होऊन राहाण्याचा हा विचार ज्याच्या अंतःकरणांत नाहीं, त्याला ( शब्दादि ) विषय ( आपल्या ) पाशांनीं जखडून टाकतात.   
तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा ।
आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥ ३४३ ॥
३४३) अर्जुना, त्याची बुद्धि स्थिर तर केव्हांच होत नाहीं आणि तशी बुद्धि स्थरतेची उत्कट इच्छाहि त्याच्या मनांत उत्पन्न होत नाहीं. 
निश्र्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखें मना ।
तरी शांति केवी अर्जुना । आपु होय ॥ ३४४ ॥
३४४) आणि पाहा, निश्चलत्वाची नुसती कल्पनाहि जर त्याच्या मनाला शिवत नाहीं, तर अर्जुना, त्याला शांतीचा लाभ कसा होणार ? 
आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं ।
जैसा पापियाचां ठायीं । मोक्षु न वसे ॥ ३४५ ॥
ज्याप्रमाणें पापी मनुष्याच्या ठिकाणी मोक्षाचा वास नसतो, त्याप्रमाणें जेथें शांतीचा ओलावा नाहीं, तेथें सुख चुकूनसुद्धां कधीं पाय टाकीत नाहीं.
देखें अग्निमाजी घापती । तियें बिजें जरी विरुढती ।
तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ॥ ३४६ ॥
३४६) पाहा, विस्तवांत घातलेलें ( भाजलेलें ) बीं जर उगवेल, तर शांतिहीन पुरुषाला सुखप्राप्ती होऊ शकेल. 
म्हणोनि अयुक्तपण मनाचें । तेंचि सर्वस्व दुःखाचें ।
या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥ ३४७ ॥
३४७) म्हणून मनाची चंचलता हेंच दुःखाचें सार आहे; याकरितां इंद्रियांचा निग्रह करावा, हे चांगलें.
ये इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती ।
ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ॥ ३४८ ॥
३४८) हीं इंद्रियें जें जें म्हणतील , तेंच जे पुरुष करतात ( इंद्रियांच्या नादानें जे वागतात, ते विषयसागराच्या पलीकडे पैलतीरापर्यंत गेले असले, तरी ते खरोखर गेले नाहींत, ( असे समजावें ). 
जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता ।
तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥ ३४९ ॥
३४९) ज्याप्रमाणें नाव तीराला लागल्यावरहि जर वादळांत सांपडली, तर ज्या अपायाला ती चुकवून आली, तोच अपाय तिला पुन्हां पोंचतो.  
तैसीं प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें ।
तरी आक्रमिला देख दुःखें । सांसारिकें ॥ ३५० ॥

३५०) पाहा, त्याप्रमाणें आत्मप्राप्ति झालेल्या पुरुषानें जर इंद्रियांचे सहज लाड केले, तर तो देखील पुन्हा संसारदुःखानें व्यापला जातो.   


Custom Search

No comments: