Dnyaneshwari Adhyay 2 Part 15
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १५
ज्ञानेश्र्वरी दुसरा ओव्या ३५१ ते ३७५
म्हणोनि आपुलीं आपणपेया । जरी यें इंद्रियें येती आया ।
तरी अधिक कांहीं धनंजया । सार्थक असे ॥ ३५१ ॥
३५१) म्हणून आपल्याला आपलीं ही इंद्रियें जर आकळतां येतील तर, अर्जुना, दुसरें कांहीं त्याहून मिळवावयाचें आहे काय ?
देखें कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी ।
ना तरी इच्छावशें आवरी । आपणपेंचि ॥ ३५२ ॥
३५२) पाहा, ज्याप्रमाणें कांसव प्रसन्न झालें असतां आपलें हातपाय इत्यादिक अवयव पसरतें किंवा मनांत आल्यास आपोआप आंत आखडून घेतें;
तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३५३ ॥
३५३) त्याप्रमाणें ज्याचीं इंद्रियें ताब्यांत असतात व तो म्हणेल तसें करतात, त्याची बुद्धि स्थिर झालेली आहे, असे समज.
आतां आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह ।
अर्जुना तुज सांगेन । परिस पां ॥ ३५४ ॥
३५४) आतां आणखी एक पूर्णावस्थेला पोंचलेल्या पुरुषाचें गूढ ( सहसा लक्षांत न येणारें ) लक्षण तुला सांगतों; ऐक.
देखें भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें ।
आणि जीव जेथ चेइले । तेथ निद्रितु जो ॥ ३५५ ॥
३५५) पाहा, सर्व मनुष्यें ज्या आत्मस्वरुपाच्या ठिकाणीं निजलेलीं ( अज्ञानी ) असतात, त्या ठिकाणीं ज्याला उजाडलेलें असतें ( म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेलें असतें ); आणि जीव ज्या ( देहादि प्रपंचाच्या ) ठिकाणीं जागे ( विषयसुख अनुभवणारे ) असतात, त्या ठिकाणीं तो निजलेला ( विषयनिवृत्त ) असतो,
तोचि तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि ।
तोचि जाणें निरवधि । मुनीश्र्वर ॥ ३५६ ॥
३५६) तोच तो खरा निरुपाधि होय. अर्जुना, त्याचीच बुद्धि स्थिर झालेली आहे आणि तोच अखंड मुनीश्र्वर आहे, असें समज.
पार्था आणीकही परी । तो जाणों येईल अवधारीं ।
जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित ॥ ३५७ ॥
३५७) अर्जुना, आणखी एका प्रकारानें त्याला ओळखतां येईल. तो प्रकार ऐक. जशी समुद्रांत निरंतर शांतता असते,
जरी सरिताओघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत ।
तरी अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ॥ ३५८ ॥
३५८) जरी सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरुन ( त्या समुद्राला ) मिळतात, तरी तो त्यामुळें जराहि फुगत नाहीं व आपली मर्यादा थोडीहि सोडीत नाहीं,
ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाती समस्ता ।
परी न्यून नव्हे पार्था । समुद्र जैसा ॥ ३५९ ॥
३५९) किंवा, उन्हाळ्याच्या वेळीं जरी सर्व नद्या आटून गेल्या. ( जरी त्यास एकहि नदी मिळाली नाहीं, ) तरी त्या वेळीं अर्जुना, समुद्र जसा मुळींच कमी होत नाहीं,
तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धी । तयासि क्षोभु नाहीं बुद्धी ।
आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ॥ ३६० ॥
३६०) त्याप्रमाणें ऋद्धिसिद्धि प्राप्त झाल्या असतांहि, त्याचें मन ( हर्षानें ) उचंबळत नाहीं आणि त्या जर प्राप्त झाल्या नाहींत, तर अधैर्याची त्याला बाधा होत नाहीं.
सांगें सूर्याचां घरीं । प्रकाशु काय वातीवेरी ।
कीं न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ॥ ३६१ ॥
३६१) सांग बरें, सूर्याच्या घरीं प्रकाशाला दिवा लागतो का ? आणि दिवा लावला नाहीं तर तो सूर्य अंधारानें कोंडून जाईल का ?
देखें ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी ।
तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥ ३६२ ॥
३६२) पाहा. त्याप्रमाणें ऋद्धिसिद्धि आल्या का गेल्या, याचें त्याला भानहि नसतें. तो अंतःकरणानें महासुखांत निमग्न असतो.
जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे ।
तो केवि रंजे पालिवणें । भिल्लांचेनि ॥ ३६३ ॥
३६३) जो आपल्या ऐश्र्वर्यापुढें इंद्रभुवनालाहि तुच्छ समजतो, तो भिल्लांच्या पालांच्या खोपटांत कसा रमेल ?
जो अमृतासि ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी ।
तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥ ३६४ ॥
३६४) जो अमृताला नांवें ठेवतो, तो ज्याप्रमाणें कांजीला हात लावीत नाहीं, त्याप्रमाणें ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला, तो ऋद्धीचा भोग घेत नाहीं.
पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाहीं ।
तेथ ऋद्धिसिद्धि कायी । प्राकृता होती ॥ ३६५ ॥
३६५) अर्जुना, काय आश्र्चर्य आहे पाहा ! जेथें स्वर्गसुखाची खिजगणती नाहीं, तेथें बापड्या ऋद्धिसिद्धींचा काय पाड !
ऐसा आत्मबोधें तोषला । जो परमानंदें पोखला ।
तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळका तूं ॥ ३६६ ॥
३६६) असा जो आत्मज्ञानानें तुष्ट झालेला व परमानंदानें पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थिरबुद्धि आहे, असें तू जाण.
तो अहंकारातें दंडुनी । सकळ कामु सांडोनी ।
विचरे विश्र्व होऊनि । विश्र्वाचि माजीं ॥ ३६७ ॥
३६७) तो अहंकाराला घालवून सर्व कामना सोडून व ( अनुभवाच्या अंगानें ) जगद्रूप बनून जगांत वावरतो.
हे ब्रह्मस्थिति निःसीम । जे अनुभवितां निष्काम ।
पातले परब्रह्म । अनायासें ॥ ३६८ ॥
३६८) ही ब्रह्मस्थिति अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात, ते अनायासें परब्रह्माला पोंचतात.
जे चिद्रूपीं मिळतां । देहांतीची व्याकुळता ।
आड ठाकों न शके चित्ता । प्राज्ञा जया ॥ ३६९ ॥
३६९) कारण कीं, चिद्रूपीं ( ज्ञानरुपीं ) मिळाल्यावर प्राण जाते वेळीं होणारी व्याकुळता ( चित्ताची तळमळ ) ज्या ब्रह्मस्थितीमुळें ज्ञान्याच्या चित्तांत लुडबुड करीत नाहीं,
तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति ।
सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥ ३७० ॥
३७०) तीच ही स्थिति, श्रीकृष्णानें स्वमुखानें अर्जुनास सांगितली, असें संजय म्हणाला.
ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुनें मनीं म्हणितलें ।
आतां आमुचियाचि काजा आलें । उपपत्ती इया ॥ ३७१ ॥
३७१) असें श्रीकृष्णाचें बोलणें ऐकून अर्जुनानें असें मनांत म्हटलें कीं, आतां ( देवाच्या ) ह्या विचारसरणीनें आमचेंच ( आयते ) कार्य झालें.
जें कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें ।
तरी पारुषलें म्यां झुंजावें । म्हणूनियां ॥ ३७२ ॥
३७२) कारण कीं, जेवढें कर्म म्हणून आहे, तेवढें सर्व देवानें निषधिलें ( त्याज्य ठरविलें ) तर मग माझें युद्ध करणें आयतेंच थांबलें.
ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरु उवायिला ।
आतां प्रश्र्नु करील भला । आशंकोनियां ॥ ३७३ ॥
३७३) श्रीकृष्णाचें बोलणें ऐकून अर्जुन आपल्या चित्तांत असा प्रसन्न झाला. यापुढें त्याच्या मनांत शंका येऊन तो ( श्रीकृष्णाला ) चांगला प्रश्र्न करील.
तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासि आगरु ।
कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥ ३७४ ॥
३७४) तो प्रसंग मोठा बहारीचा आहे. ( जणूं काय तो ) सर्व धर्माचे आगरच किंवा विचाररुपी अमृताचा अमर्याद सागरच आहे !
जो आपण सर्वज्ञनाथु । निरुपिता होईल श्रीअनंतु ।
ते ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तिदासु ॥ ३७५ ॥
३७५) सर्व ज्ञान्यांचा शिरोमणि जो श्रीकृष्ण तोच स्वतः जें निरुपण करील, ती हकीकत निवृत्तिनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल.
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानसंन्यासयोगो नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
( श्र्लोक ७२, ओव्या ३७५ )
॥ ॐ सच्चिदानन्दार्पणमस्तु ॥
Custom Search
No comments:
Post a Comment