Showing posts with label ओव्या १९७ ते २१७. Show all posts
Showing posts with label ओव्या १९७ ते २१७. Show all posts

Wednesday, April 27, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 8 Ovya 197 to 217 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ८ ओव्या १९७ ते २१७

 

Shri Dnyaneshwari
Adhyay 11 Part ८
Ovya 197 to 217 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ८ 
ओव्या १९७ ते २१७

अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् ।

अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥ १० ॥

१०) ज्यामध्यें अनेक मुखें व डोळे होते, ज्यामध्यें अनेक आश्र्चर्यकारक देखावे होते, अनेक दिव्य अलंकारांनी युक्त, अनेक दिव्य आयुधें धारण केलेले हात,

मग तेथ सैंध देखे वदनें । जैसी रमानायकाची राजभुवनें ।

नाना प्रकटलीं निधानें । लावण्यश्रियेचीं ॥ १९७ ॥

१९७) मग तेथें त्यानें अनेक मुखें पाहिलीं. तीं मुखें ( जणु काय ) लक्ष्मीकांत श्रीकृष्ण यांच्या राजमंदिरासारखीं होतीं. अथवा सौंदर्यलक्ष्मीचीं प्रकट झालेलीं भांडारेंच होती.

कीं आनंदाचीं वनें सासिन्नलीं । जैसी सौंदर्या राणीव जोडली ।

तैसी मनोहरें देखिलीं । हरीचीं वक्त्रें तेणें ॥ १९८ ॥

१९८) किंवा आनंदाचे बगीचेच बहराला आलेले, किंवा जणूं काय सौंदर्याला राज्य प्राप्त झालें; तशीं त्यानें मन हरणकरणारी श्रीकृष्णाची मुखें पाहिली.

तयांही माजीं एकैकें । सावियाचि भयानकें ।

काळरात्रीचीं कटकें । उठावलीं जैसीं ॥ १९९ ॥

१९९) त्यांतदेखील कित्येक मुखें जणूं काय प्रळयरात्रीच्या सैन्यानें उठाव केला आहे, अशी सहजच भयंकर होतीं,

कीं यें मृत्यूसीचि मुखें जाहलीं । हो कां जें भयाचीं दुर्गें पन्नासिलीं ।

कीं महाकुंडें उघडलीं । प्ररळयानळाचीं ॥ २०० ॥

२००) किंवा हीं मृत्यूलाच तोंडें उत्पन्न झालेलीं आहेत, अथवा जणूं काय भयाचे किल्लेच रचलेले आहेत, अथवा प्रळयाग्नीचीं महाकुंडेंच उघडलेली आहेत; 

तैसीं अद्भुतें भयासुरें । तेथ वदनें देखिलीं वीरें ।

आणिकें असाधारणें साळंकारें । सौम्यें बहुतें ॥ २०१ ॥

२०१) अशीं अद्भुत व भयंकर मुखें शूर अर्जुनानें तेथें ( विश्वरुपांत ) पाहिली. आणखी किती एक निरुपम अलंकारयुक्त अशीं मुखें पाहिलीं व पुष्कळ सौम्य मुखें पाहिली.

पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें । परि वदनांचा शेवटु न टके ।

मग लोचन ते कवतिकें । लागला पाहों ॥ २०२ ॥

२०२) अर्जुनानें तीं मुखें ज्ञानदृष्टीनें पाहिली, परंतु मुखांचा अंत लागेना; म्हणून मुखें पाहणें सोडून देऊन, तो मग कौतुकानें ( विश्र्वरुपाचे ) डोळे पाहूं लागला.  

तंव नानावर्णें कमळवनें । कीं विकासिलीं तैसे अर्जुनें ।

डोळे देखिले पालिंगनें । आदित्यांचीं ॥ २०३ ॥

२०३) तेव्हां जणूं काय अनेक रंगांच्या कमळांचे बाग प्रफुल्लित झाले आहेत, तसे ( विस्तृत व तेजाने ) सूर्याच्या समुदायासारखे डोळे अर्जुनानें पाहिले.

तेथेंचि कृष्णमेघाचिया दाटी--। माजीं कल्पांत विजूंचिया स्फुटी ।

तैसिया वन्हि पिंगळा दिठी । भ्रूभंगातळीं ॥ २०४ ॥

२०४) डोळे पाहात होता, तेथेंच काळ्या मेघांच्या गर्दीमध्यें प्रळयकाळची वीज चमकावी तशा अग्नीनें पिंगट झालेल्या दृष्टि, चढवलेल्या भिवयांच्या खालीं त्यानें पाहिल्या.   

हें एकेक आश्र्चर्य पाहतां । तिये एकेचि रुपीं पांडुसुता ।

दर्शनाची अनेकता । प्रतिफळली ॥ २०५ ॥

२०५) हें एक एक आश्र्चर्य पाहात असतां, अर्जुनाला त्या एकाच विश्वरुपामध्ये दर्शनाची अनेकता फलद्रूप झाली.

मग म्हणे चरण ते कवणेकडे । केउते मुकुट कें दोर्दंडें ।

ऐसी वाढविताहे कोडें । चाड देखावयाची ॥ २०६ ॥

२०६) मग अर्जुन म्हणाला, विश्वरुपाचे पाय कोणीकडे आहेत ? मुकुट कोठे आहे? व त्या बळकट भुजा कोठें आहेत ? अशी कौतुकानें तो पाहण्याची इच्छा वाढवीत आहे.

तेथ भाग्यनिधि पार्था । कां विफलत्व होईल मनोरथा ।

काय पिनाकपाणीचां भातां । वायकांडीं आहाती ॥ २०७ ॥    

२०७) तेथें अर्जुन दैवांचा ठेवा असल्यानें त्याची इच्छा व्यर्थ कां होईल ? पिनाक नांवाचें धनुष्य हातांत असलेल्या शंकराच्या भात्यामध्यें निष्फळ बाण असतात काय ?    

ना तरी चतुराननाचिये वाचे । आहाती लटिकिया अक्षरांचे सांचे ।

म्हणोनि साद्यंतपण अपारांचें । देखिलें तेणें ॥ २०८ ॥

२०८) अथवा ब्रह्मदेवाच्या जिव्हेवर खोट्या अक्षरांचे ठसे असतात काय ? म्हणून अर्जुनानें अमर्याद विश्वाचा आदि व अंत पाहिला. 

जयाची सोय वेदा नाकळे । तयाचे सकळावयव एकेचि वेळे ।

अर्जुनाचे दोन्ही डोळे । भोगिते जाहले ॥ २०९ ॥

२०९) ज्या विश्वरुपाचा मार्ग वेदाला कळत नाहीं त्या विश्वरुपाचीं सर्व अंगे अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळीं पूर्णपणे पाहिलीं.   

चरणौनि मुकुटवरी । देखत विश्र्वरुपाची थोरी ।

जे नाना रत्न अलंकारीं । मिरवत असे ॥ २१० ॥

२१०) जें विश्वरुप अनेक प्रकारच्या रत्नांच्या अलंकारांनीं शोभत होतें, त्या विश्वरुपाचा विस्तार अर्जुन पायापासून मुकुटापर्यंत पाहूं लागला. 

परब्रह्म आपुलेनि आंगें । ल्यावया आपणाचि जाहला अनेगें ।

तियें लेणीं मी सांगें । काइसयासारिखीं ॥ २११ ॥

२११) जे अनेक अलंकार, देव ( परब्रह्म ) आपल्या अंगावर घालण्याकरितां आपण बनला, ते अलंकार कशासारखे आहेत म्हणून मी सांगू ? 

जिये प्रभेचिये झळाळा । उजाळु चंद्रादित्यमंडळा ।

जे महातेजाचा जिव्हाळा । जेणें विश्र्व प्रकटे ॥ २१२ ॥

२१२) ज्या प्रभेच्या कांतीनें चंद्रसूर्यमंडळें प्रकाशित होतात व जी प्रभा महातेजाचें ( प्रळयकाळच्या तेजाचें ) जीवन आहे व ज्या प्रभेनें विश्व दिसावयास लागतें,    

तो दिव्यतेज शृंगारु । कोणाचिये मतीसी होय गोचरु ।

देव आपणपेंचि लेइले ऐसें वीरु । देखत असे ॥ २१३ ॥

२१३) तें दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीस विषय होतील ? असे दागिने देवानें स्वतःच आपल्या अंगावर धारण केले आहेत, असें अर्जुनानें पाहिलें.

आपण आंग आपण अलंकार । आपण हात आपण हातियेर ।

आपण जीव आपण शरीर । देखे चताचर कोंदलें देवें ॥ २१४ ॥

२१४) देवआपणच, आपणच अवयव, आपणच दागिने, आपणच हात, आपणच शस्त्र, आपणच जीव व आपणच देह वगैरे सर्व बनले होते. हार काय सांगावें ! सर्व स्थावरजंगमात्मक विश्व देवानेंच भरलें आहे. असे अर्जुनाने पाहिलें. 

मग तेथेंचि ज्ञानाचां डोळां । पहात करपल्लवां जंव सरळा ।

तंव तोडित कल्पांतीचिया ज्वाळा । तैसीं शस्त्रें झळकत देखे ॥ २१५ ॥

२१५) मग तेथें ( विश्वरुपात ) ज्ञानदृष्टीनें अर्जुन तेव्हां हाताचे सरळ पंजे पाहूं लागला, तेव्हां तेथें त्या हाताच्या पंजांत प्रळयकाळच्या अग्नीच्या ज्वाळांना तोडणारीं शस्त्रें झळकत असलेलीं त्यानें पाहिलीं. 

जयांचिया किरणांचेनि निखरेपणें । नक्षत्रांचे होत फुटाणे ।

तेजें खिरडला वह्नि म्हणे । समुद्रीं रिघों ॥ २१६ ॥

२१६) ज्यांच्या ( शस्त्रांच्या ) किरणांच्या प्रखरपणानें मागें सरलेला अग्नि ‘ समुद्रांत प्रवेश करावा ‘ असें म्हणावयास लागला.

मग काळकूटकल्लोळीं कवळिलें । नाना महाविजूंचे दांग उमटलें ।

तैसे अपार कर देखिले । उदितायुधीं ॥ २१७ ॥

२१७) मग काळकूट विषाच्या ( जणूं काय ) लाटाच

 बनल्या आहेत अथवा प्रलयकाळच्या विजेचें अरण्य

 प्रकट झालें आहे, तसे उगारलेल्या शस्त्रांसहित अगणित

 हात ( त्यानें ) पाहिले.  

 


Custom Search