Showing posts with label श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४. Show all posts
Showing posts with label श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४. Show all posts

Sunday, October 18, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 4 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४

 

Shri Dnyaneshwari Adhyay 4 
Ovya 1 to 25 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ 
ओव्या १ ते २५

आजि श्रवणेंद्रिया पिकलें । जे येणें गितानिधान देखिलें ।

आतां स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ॥ १ ॥

१) आज श्रवणेंद्रियाला सुकाळ झाला; कारण गीतेसारखा ठेवा त्याला पाहावयास मिळाला. जसें कांहीं स्वप्नच खरें व्हावें, तसें आतां हें झालें आहे.

आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी ।

आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥ २ ॥

२) अगोदरच ही विवेकाची कथा, त्यांत तिचें प्रतिपादन जगांत अत्यंत प्रतापशाली असे श्रीकृष्ण करीत असून भक्तांमध्यें श्रेष्ठ असणारा अर्जुन तें ऐकत आहे.  

जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु ।

तैं भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥ ३ ॥

३) ज्याप्रमाणें पंचम स्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुची यांच्या गोड मिलाफाचा योग यावा, ( त्याप्रमाणें ), या कथेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे.

कैसी आगळिक दैवाची । जे गंगा वोळली अमृताची ।

हो कां जपतपें श्रोतयांचीं । फळा आलीं ॥ ४ ॥

४) काय दैवाचा जोर पाहा ! ही अमृताची गंगाच लाभली म्हणावयाची; किंवा श्रोत्यांची जपतपादि अनुष्ठानें ( या कथेच्या रुपानें ) फळास आलीं आहेत.

आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें ।

मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥ ५ ॥

५) आतां एकूण एक इंद्रियांनीं श्रवणेंद्रियाचा आश्रय करावा; आणि मग गीता नांवाच्या संवादाचें सुख भोगावें.

हा अतिसो अतिप्रसंगें । सांडूनि कथाचि ते सांगे ।

जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥ ६ ॥

६) हा अप्रासंगिक पाल्हाळ पुरे कर व कृष्ण आणि अर्जुन हे दोघे जें कांहीं बोलत होते ती हकीकतच सांग, ( असें श्रोते म्हणाले. )  

ते वेळीं संजयों रायातें म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला दैवगुणें ।

जे अतिप्रीती नारायणें । बोलिजतु असे ॥ ७ ॥

७) ( ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात, ) त्या वेळीं संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर भाग्यानेंच अर्जुनाचा आश्रय केला. कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमानें बोलत आहेत.  

जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी ।  

जें न संगेचि बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशीं बोलत ॥ ८॥

८) पिता वसुदेव याला जें सांगितलेंच नाहीं. आई देवकी हिला जें सांगितलेंच नाहीं, बळिभद्र याला जें सांगितलेंच नाहीं, तें रहस्य अर्जुनाजवळ श्रीकृष्ण बोलत आहेत. 

देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । तेही न देखे या प्रेमाचें सुख ।

आणि कृष्णस्नेहाचें पिक । यातेंचि आधी ॥ ९ ॥

९) ( श्रीकृष्णदेवाच्या ) जवळ असणारी एवढी देवी लक्ष्मी पण या ( कृष्णाच्या ) प्रेमाचें सुख तिलाहि ( कधीं ) दिसलें नाहीं. कृष्णाच्या प्रेमाचे सर्व फळ यालाच ( अर्जुनालाच ) आज लाभत आहे.

सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतिया कीर बहुवसा ।

परी त्याही येणें मानें यशा । येतीचिना ॥ १० ॥

१०) सनकादिकांच्या ( परमात्मसुखाबद्दलच ) आशा खरोखर खूपच बळावल्या होत्या; पण त्या इतक्या प्रमाणांत यशाला आल्याच नाहींत.

या जगदीश्र्वराचें प्रेम । एथ दिसतसे निरुपम ।

कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ॥ ११ ॥

११) या जगदीश्र्वराचें प्रेम येथें ( या अर्जुनावर ) अगदीं निरुपम दिसत आहे. या पार्थानें कसें उत्कृष्ट पुण्य केलें आहे बरें !

हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती ।

मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥ १२ ॥

१२) पाहा, ज्या अर्जुनाच्या प्रीतीमुळें हा कृष्ण, ( वास्तविक ) निराकार असून साकार झाला, त्या अर्जुनाची ( देवांशीं ) एकरुपता मला चांगलीच पटते. 

एर्‍हवीं हा योगियां नाडळे । वेदार्थासी नाकळे ।

जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥ १३ ॥

१३) नाहीं तर हा योग्यांना सांपडला नाहीं, वेदांच्या अर्थाला सांपडत नाहीं. ध्यानाचीहि नजर जेथपर्यंत पोंचत नाहीं,

तें हा निजस्वरुप । अनादि निष्कंप ।

परी कवणें मानें सकृप । जाहला आहे ॥ १४ ॥

१४) अशी जी आत्मस्थिति, तद्रुप असणारा हा श्रीकृष्ण मूळचाच अचल आहे; पण ( आज या अर्जुनावर ) किती बरें कृपावंत झाला आहे ! 

हा त्रैलोक्यपटाची घडी । आकाराची पैलथडी ।

कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥ १५ ॥

१५) हा त्रैलोक्यरुप वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे; ( पण ) या अर्जुनाच्या प्रेमानें कसा आटोक्यांत आणला आहे !

मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता ।

कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची ॥ १६ ॥

१६) मग देव म्हणाला, अरे अर्जुना, हाच योग आम्हीं सूर्याला सांगितला; परंतु ती गोष्ट फार दिवसांपूर्वीची आहे.

मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी ।

निरुपिली बरवी । मनु प्रती ॥ १७ ॥

१७) मग त्या विवस्वान् सूर्यानें या योगाची संपूर्ण माहिती वैवस्वत मनूला उत्तम प्रकारें सांगितली.  

मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ।

ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥ १८ ॥

१८) वैवस्वत मनूनें यांचें स्वतः आचरण केलें आणि मग ( आपला मुलगा जो ) इक्ष्वाकु त्याला उपदेश केला. अशी ही परंपरा मूळापासून चालत आलेली आहे.

मग आणिकहि या योगातें । राजर्षि जाहले जाणते ।

परि तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोणी ॥ १९ ॥

१९) मग आणखीहि ह्या निष्काम कर्मयोगाला जाणणारे राजर्षि पुढें होऊन गेले; पण तेव्हांपासून आतां हल्लीं हा कोणाला ठाऊक नाहीं.

जे प्राणियां कामीं भरु । देहाचिवरी आदरु ।

म्हणोनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ॥ २० ॥

२०) कारण प्राण्यांचा सगळा भर विषयवासनेवर ( पडला ) व त्यांचा सगळा जीव काय तो देहावर आहे; म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला.

अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि ।

जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ॥ २१ ॥

२१) आत्मबोधाची आस्था ज्या बुद्धीनें बाळगावयाची ती आडमार्गाला लागल्यामुळें ( लोकांना ) विषयसुख हेच आत्यंतिक सुख वाटूं लागलें व देहादिक प्रपंच हा प्राणाप्रमाणें प्रिय झाला. 

एर्‍हवीं तरी खवणेयांचां गांवीं । पाटाउवें काय करावीं ।

सांगें जात्यंधा रवी । काय आथी ॥ २२ ॥

२२) नाहीं तर, नग्न लोकांच्या गावीं उंची वस्त्रें काय करायचीं ? जन्मांधाला सूर्य काय होय ? सांग, बरें

कां बहिरयांचा आस्थानीं । कवण गीतातें मानी ।

कीं कोल्हेया चांदणीं आवडी उपजे ॥ २३ ॥

२३) किंवा, बहिर्‍यांच्या सभेंत गाण्याला कोण किंमत देणार ? किंवा, कोल्ह्याच्या मनांत चांदण्याबद्दल प्रेम कधीं उत्पन्न होईल काय ? 

पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते ।

ते काउळे केवीं चंद्रातें । वोळखती ॥ २४ ॥

२४) चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे , ( निरुपयोगी होतात ) ते कावळे चंद्राला कसे बरें ओळखणार ?  

तैसे  वैराग्याची शिंव न देखती । जे विवेकाची भाषा नेणती ।

ते मूर्ख केंवीं पावती । मज ईश्र्वरातें ॥ २५ ॥

२५) त्याप्रमाणें वैराग्यरुपी नगराच्या शिवेचेंही ज्यांनी कधीं दर्शन घेतलें नाहीं, विवेक कशाला म्हणतात हें ज्यांना माहीत नाही, त्या मूर्खांना, माझी ईश्र्वराची कशी बरें प्राप्ति होणार ? 



Custom Search