Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग ५३. Show all posts
Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग ५३. Show all posts

Wednesday, October 21, 2020

ShriRamcharitmans Part 53, श्रीरामचरितमानस भाग ५३


 


ShriRamcharitmans Part 53 
Doha 246 to 248 
श्रीरामचरितमानस भाग ५३ 
दोहा २४६ ते २४८ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—जानि सुअवसरु सीय तब पठई जनक बोलाइ ।

चतुर सखीं सुंदर सकल सादर चलीं लवाइ ॥ २४६ ॥

मग योग्य वेळी राजा जनकांनी सीतेला बोलावणे पाठविले . सर्व चतुर व सुंदर सख्या तिला आदराने घेऊन आल्या. ॥ २४६ ॥

सिय सोभा नहिं जाइ बखानी । जगदंबिका रुप गुन खानी ॥

उपमा सकल मोहि लघु लागीं । प्राकृत नारि अंग अनुरागीं ॥

रुप व गुणांची खाण असलेल्या जगज्जननी जानकीच्या सौंदर्याचे वर्णन कोण करु शकेल ? तिच्यासाठी मला सर्व उपमा तुच्छ वाटतात. कारण त्या लौकिक स्त्रियांच्या अंगांविषयीच्या आहेत. ( त्यांचा सीतेसाठी उपयोग करणे हे जगज्जननीचा अपमान करण्यासारखे आहे. ) ॥ १ ॥

सिय बरनिअ तेइ उपमा देई । कुकबि कहाइ अजसु को लेई ॥

जौं पटतरिअ तीय सम सीया । जग असि जुबति कहॉं कमनीया ॥

सीतेच्या वर्णनामध्ये त्याच उपमा देऊन कोण कवी कुकवी ठरेल आणि अपकीर्तीचा भागीदार होईल ? जर कुणा स्त्रीबरोबर सीतेची तुलना करायची, तर जगात अशी सुंदर स्त्री आहेच कुठे ? ॥ २ ॥

गिरा मुखर तन अरध भवानी । रति अति दुखित अतनु पति जानी ॥

बिष बारुनी बंधु प्रिय जेही । कहिअ रमासम किमि बैदेही ॥

देवांच्या स्त्रिया आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक दिव्य व सुंदर आहेत. पण ( त्यांच्यातही दोष आहेत. ) सरस्वती ही फार बडबडी आहे, पार्वती अर्धांगिनी आहे. अर्धनारीनटेश्र्वराच्या रुपात तिचे अर्धे अंगच स्त्रीचे आहे, आणि अर्धे पुरुषाचे-शिवांचे आहे. कामदेवाची पत्नी रती ही आपला पती शरीराविना ( अनंग ) असल्यामुळे दुःखी असते आणि विष व मद्य समुद्रात उत्पन्न झाल्यामुळे ते जिचे भाऊ आहेत, त्या लक्ष्मीसारखी जानकीला कसे म्हणता येईल ? ॥ ३ ॥

जौं छबि सुधा पयोनिधि होई । परम रुपमय कच्छपु सोई ॥

सोभा रजु मंदरु सिंगारु । मथै पानि पंकज निज मारु ॥

ज्या लक्ष्मीबद्दल सांगितले आहे, ती खार्‍या समुद्रातुन निघाली होती. त्या समुद्राचे मंथन करण्यासाठी भगवंतांनी अत्यंत कठोर पाठीच्या कच्छपाचे रुप घेतले होते. महाविषधारी वासुकी नागाची दोरी बनविली होती. रवीचे काम अत्यंत कठोर अशा मंदराचल पर्वताने केले आणि सर्व देवांनी व दैत्यांनी मंथन केले. ज्या लक्ष्मीला अत्यंत शोभेची खाण आणि अनुपम सुंदरी असे म्हणतात, तिला प्रकट करण्यासाठी ही सर्व असुंदर आणि स्वभावतः कठोर अशी उपकरणे होती. अशा उपकरणांमुळे प्रकट झालेली लक्ष्मी ही जानकीची बरोबरी कशी करु शकेल ? या उलट, लावण्यरुपी अमृत-समुद्र असेल, परम रुपमय कच्छप असेल आणि त्या रुप-लावण्याच्या समुद्राचे स्वतः कामदेवाने आपल्या करकमालांनी मंथन केले असेल, ॥ ४ ॥

दोहा—एहि बिधि  उपजै लच्छि जब सुंदरता सुख मूल ।

तदपि सकोच समेत कबि कहहिं सीय समतूल ॥ २४७ ॥

अशा योगायोगाने जरी सौंदर्य व सुखाची खाण असलेली लक्ष्मी उत्पन्न झाली, तरीही कवी मोठ्या संकोचाने तिला जानकीसारखी म्हणतील. ॥ २४७ ॥

( ज्या सौंदर्याच्या समुद्राचे कामदेव मंथन करील, ते सौंदर्यही प्राकृत, लौकिक सौंदर्यच असणार. कारण कामदेव हा स्वतःसुद्धा त्रिगुणमय प्रकृतीचाच विकार आहे. म्हणून त्या सौंदर्याचे मंथन करुन प्रकट झालेली लक्ष्मीसुद्धा वर सांगितलेल्या लक्ष्मीपेक्षा काहीशी अधिक सुंदर व दिव्य असली, तरीही प्राकृतच आहे, म्हणून तिच्याबरोबर जानकीची तुलना करणे हे कवींना संकोचाचेच वाटते. ज्या सौंदर्याने जानकीची दिव्यातिदिव्य परम दिव्य मूर्ती बनली आहे, ते सौंदर्य वर सांगितलेल्या सुंदरतेहून वेगळे अप्राकृत आहे. वस्तुतः लक्ष्मीचे अप्राकृत रुपसुद्धा हेच आहे, म्हणून ते तिच्याहून वेगळे नाही आणि उपमा ही तर भिन्न वस्तूची दिली जाते. याखेरीज जानकी प्रकट झाली, ती स्वतः आपल्या महिम्यामुळे तिला प्रकट करण्यासाठी इतर कोणत्याही उपकरणाची अपेक्षा नाही. अर्थात शक्ती ही शक्तिमानाशी अभिन्न व अद्वैत असे तत्त्व आहे. म्हणून आहे, हेच गूढ तात्त्विक तत्त्व भक्तशिरोमणी कवीने या अभूतोपमालंकाराने मोठ्या कौशल्याने व्यक्त केले आहे. )

चलीं संग लै सखीं सयानी । गावत गीत मनोहर बानी ॥

सोह नवल तनु सुंदर सारी । जगत जननि अतुलित छबि भारी ॥

चतुर सख्या सीतेला घेऊन मधुर वाणीने गात निघाल्या. सीतेच्या अलौकिक शरीरावर सुंदर साडी शोभून दिसत होती. जनज्जननीचे विलक्षण लावण्य अतुलनीय होते. ॥ १ ॥

भूषन सकल सुदेस सुहाए । अंग अंग रचि सखिन्ह बनाए ॥

रंगभूमि जब सिय पगु धारी । देखि रुप मोहे नर नारी ॥

सर्व आभूषणे आपापल्या जागी शोभून दिसत होती. सख्यांनी ती जनकीच्या अवयवांवर काळजीपूर्वक सजवून घातली होती. जेव्हा सीतेने रंगभूमीवर पाय ठेवला, तेव्हा तिचे दिव्य रुप पाहून सर्व स्त्री-पुरुष मोहून गेले.  ॥ २ ॥

हरषि सुरन्ह दुंदुभीं बजाईं । बरषि प्रसून अपछरा गाईं ॥

पानि सरोज सोह जयमाला । अवचट चितए सकल भुआला ॥

देवांनी आनंदाने दुंदुभी वाजविल्या आणि पुष्पवर्षा करीत अप्सरा नाचू लागल्या. सीतेच्या करकमलांमध्ये जयमाला शोभत होती. तिने सर्व राजांना एकाच दृष्टिक्षेपात पाहून घेतले. ॥ ३ ॥

सीय चकित चित रामहि चाहा । भए मोहबस सब नरनाहा ॥

मुनि समीप देखे दोउ भाई । लगे ललकि लोचन निधि पाई ॥

सीता चकित मनाने श्रीरामांना पाहू लागली, तेव्हा सर्व राजे लोक मोहवश झाले. सीतेने मुनींच्याजवळ ( बसलेल्या ) दोघा भावांना पाहिले आणि तिचे नयन आपला खजिना मिळाल्याचे बघून तेथेच श्रीरामांवर स्थिरावले. ॥ ४ ॥

दोहा—गुरजन लाज समाजु बड़ देखि सीय सकुचानि ।

लागि बिलोकन सखिन्ह तन रघुबीरहि उर आनि ॥ २४८ ॥

परंतु गुरुजनांच्या लाजेने व फार मोठा जमाव पाहून सीता संकोचली. ती श्रीरामचंद्रांना आपल्या हृदयात आणून सखींच्याकडे पाहू लागली. ॥ २४८ ॥

राम रुपु अरु सिय छबि देखें । नर नारिन्ह परिहरीं निमेषें ॥

सोचहिं सकल कहत सकुचाहीं । बिधि सन बिनय करहिं मन माहीं ॥

श्रीरामांचे रुप व सीतेचे लावण्य पाहून स्त्री-पुरुष एकटक तिच्याकडे पाहू लागले. सर्वजण मनात विचार करीत होते, परंतु प्रकटपणे सांगताना त्यांना संकोच वाटत होता. ते मनातल्या मनात विधात्याला विनवत होते- ॥ १ ॥                

हरु बिधि बेगि जनक जड़ताई । मति हमारि असि देहि सुहाई ॥

बिनु बिचार पनु तजि नरनाहू । सीय राम कर करै बिबाहू ॥

‘ हे विधात्या, जनकांचा वेडेपणा ताबडतोप नाहीसा करा आणि विचार न करता आपला पण सोडून देऊन सीतेचा विवाह रामांशी करावा, अशी बुद्धी त्यांना द्या. ॥ २ ॥

जगु भल कहिहि भाव सब काहू । हठ कीन्हें अंतहुँ उर दाहू ॥

एहिं लालसॉं मगन सब लोगू । बरु सॉंवरो जानकी जोगू ॥

जग त्यांना चांगलेच म्हणेल, कारण ही गोष्ट सर्वांनाच पसंत आहे. पणाचा हट्ट धरल्यास शेवटी हृदयाला पश्र्चात्तापाचे चटके बसतील. जानकीसाठी सावळ्या रंगाचा वरच योग्य आहे, असे सर्वांनाच वाटत होते. ॥ ३ ॥

तब बंदीजन जनक बोलाए । बिरिदावली कहत चलि आए ॥

कह नृपु जाइ कहहु पन मोरा । चले भाट हियँ हरषु न थोरा ॥

मग राजा जनकांनी भाटांना बोलाविले. ते वंशाची कीर्ती 

गात-गात आले. राजांनी सांगितले, ‘ माझा पण सर्वांना 

जाऊन सांगा. ‘ भाट मोठ्या आनंदाने निघाले. ॥ ४ ॥



Custom Search