Monday, February 22, 2021

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 3 अयोध्याकाण्ड द्वितीयसोपान भाग ३

 

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 3 
Doha 11 to 16 
अयोध्याकाण्ड द्वितीयसोपान भाग ३ 
दोहा ११ ते १६

दोहा—बिपति हमारि बिलोकि बड़ि मातु करिअ  सोइ आजु ।

रामु जाहिं बन राजु तजि होइ सकल सरकाजु ॥ ११ ॥

ते म्हणाले होते की, ‘ हे माते, आमचे संकट बघून असे काहीतरी करा की, श्रीरामचंद्र राज्य सोडून वनात जातील आणि देवांची सर्व कार्ये सिद्ध करतील.’ ॥ ११ ॥

सुनि सुर बिनय ठाढ़ि पछिताती । भइउँ सरोज बिपिन हिमराती ॥

देखि देव पुनि कहहिं निहोरी । मातु तोहि नहिं थोरिउ खोरी ॥

देवांची विनंती ऐकून सरस्वती उभी राहून पश्र्चात्ताप करीत होती की, ‘ अरेरे, मी कमलवनासाठी हेमंत ऋतूमधील रात्र झाले.’ ती असा पश्र्चात्ताप करीत होती, तेव्हा देव पुन्हा विनवणी करुन म्हणू लागले की, ‘ माते, यामध्ये तुम्हांला कोणताही दोष लागणार नाही. ॥ १ ॥

बिसमय हरष रहित रघुराऊ । तुम्ह जानहु सब राम प्रभाऊ ॥

जीव करम बस सुख दुख भागी । जाइअ अवध देवहित लागी ॥

श्रीरघुनाथ हे हर्षविषादापासून अलिप्त आहेत. त्यांचा संपूर्ण प्रभाव तुम्हांला माहीत आहे. जीव हा आपल्या कर्मामुळे सुख-दुःख प्राप्त करतो. म्हणूनच देवांच्या हितासाठी तुम्ही अयोध्येला जा. ‘ ॥ २ ॥

बार बार गहि चरन सँकोची । चली बिचारि बिबुध मति पोची ॥

ऊँच निवासु नीचि करतूती । देखि न सकहिं पराइ बिभूती ॥

देवांनी वारंवार पाया पडून सांगितले, तेव्हा सरस्वतीला भीड पडली. मग ती विचार करीत निघाली की, देवांची बुद्धी किती क्षुद्र आहे. यांचा निवास उच्चस्थानी आहे, परंतु यांचे विचार क्षुद्र आहेत. यांना दुसर्‍याचे ऐश्वर्य पाहावत नाही. ॥ ३ ॥

आगिल काजु बिचारि बहोरी । करिहहिं चाह कुसल कबि मोरी ॥

हरषि हृदयँ दसरथ पुर आई । जनु ग्रह दसा दुसह दुखदाई ॥

परंतु श्रीराम वनांत गेल्याने राक्षसांचा वध होईल व जग सुखी होईल, या पुढील कामाचा विचार करुन चतुर कवी माझी कामना पुर्ण करतील, असा विचार करुन सरस्वती मनात आनंदून अयोध्येला आली. जणु ती दुःसह दुःख देणारी ग्रहदशा आली होती. ॥ ४ ॥

दोहा—नामु मंथरा मंदमति चेरी कैकइ केरि ।

अजस पेटारी ताहि करि गई गिरा मति फेरि ॥ १२ ॥

मंथरा नावाची कैकयीची एक मंदबुद्धीची दासी होती. तिला अपकीर्तीचा पेटारा बनवून सरस्वती तिची बुद्धी पालटून निघून गेली. ॥ १२ ॥

दीख मंथरा नगरु बनावा । मंजुल मंगल बाज बधावा ॥

पूछेसि लोगन्ह काह उछाहू । राम तिलकु सुनि भा उर दाह ॥                 

मंथरेला दिसले की नगर सजविले आहे. सुंदर आनंदोत्सव चालले आहेत. तिने लोकांना विचारले की, ‘ हा कसला उत्सव आहे ?’ श्रीरामचंद्रांच्या राजतिलकाची वार्ता ऐकताच तिचे मन जळफळू लागले. ॥ १ ॥

करइ बिचारु कुबुद्धि कुजाती । होइ अकाजु कवनि बिधि राती ॥

देखि लागि मधु कुटिल किराती । जिमि गवँ तकइ लेउँ केहि भॉंती ॥

ती दुर्बुद्धी व नीच जातीची दासी विचार करु लागली की, कशा प्रकारे हे कार्य रात्रीतल्या रात्री बिघडून टाकता येईल. ज्याप्रमाणे एखादी भिल्लीण मधाचे पोळे पाहून दबा धरुन बसते की, हे कसे उपटून टाकावे ? ॥ २ ॥

भरत मातु पहिं गइ बिलखानी । का अनमनि हसि कह हँसि रानी ॥

ऊतरु देइ न लेइ उसासू । नारि चरित करि ढारइ आँसू ॥

ती उदास होऊन भरताची माता कैकेयी हिच्याकडे गेली. राणी कैकेयीने विचारले की, ‘ तू अशी उदास का ?’ मंथरेने काहीही उत्तर दिले नाही. फक्त मोठ्याने उसासे टाकू लागली आणि स्त्रीस्वभावानुसार अश्रू ढाळू लागली. ॥ ३ ॥

हँसि कह रानि गालु बड़ तोरें । दीन्ह लखन सिख अस मन मोरें ॥

तबहुँ न बोल चेरि बड़ि पापिनि । छाड़इ स्वास कारि जनु सॉंपिनि ॥

राणी हसून म्हणाली की, तुझे गाल रागाने फुगलेले आहेत. मला वाटते की, लक्ष्मणाने तुला शिक्षा केली असावी.’ तरीही ती महापापी दासी काहीही बोलली नाही. ती असे दीर्घ श्वास सोडत राहिली की, जणू काळी नागीण फूत्कार टाकीत असावी. ॥ ४ ॥

दोहा—सभय रानि कह कहसि किन कुसल रामु महिपालु ।

लखनु भरतु रिपुदमनु सुनि भा कुबरी उर सालु ॥ १३ ॥

तेव्हा राणी कैकयीने घाबरुन विचारले, ‘ अग, सांगत का नाहीस ? राजा, श्रीरामचंद्र, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे सुखरुप तर आहेत ना ?’ हे ऐकून कुबड्या मंथरेच्या हृदयात फार वेदना झाली. ॥ १३ ॥

कत सिख देइ हमहि कोउ माई । गालु करब केहि कर बलु पाई ॥

रामहि छाड़ि कुसल केहि आजू । जेहि जनेसु देइ जुबराजू ॥

ती म्हणू लागली,’ हे माई, मला कोण शिक्षा देणार ? मी कुणाच्या जोरावर बडबड करणार ? रामचंद्राला सोडून आज कोण सुखरुप आहे ? कारण महाराज त्याला युवराजपद देत आहेत. ॥ १ ॥

भयउ कौसिलहि बिधि अति दाहिन । देखत गरब रहत उर नाहिन ॥

देखहु कस न जाइ सब सोभा । जो अवलोकि मोर मनु छोभा ॥

कौसल्येला आता विधाता फारच अनुकूल आहे, हे पाहून तिच्या मनात गर्व मावेनासा झाला आहे. तुम्ही स्वतः जाऊन सर्व शोभा का पाहून येत नाही ? त्यामुळे माझ्या मनात क्षोभ उत्पन्न झाला आहे. ॥ २ ॥

पूतु बिदेस न सोचु तुम्हारें । जानति हहु बस नाहु हमारें ॥

नीद बहुत प्रिय सेज तुराई । लखहु न भूप कपट चतुराई ॥

तुमचा पुत्र परदेशी आहे आणि तुम्हांला त्याची काही काळजी नाही. राजा आपल्या मुठीत आहे, असे तुम्हांला वाटते. तुम्हांला तर गाद्या-गिरद्या व पलंगावर झोप घ्यायला फार आवडते. राजांचे कपटी चातुर्य तुम्हांला दिसत नाही.’ ॥ ३ ॥

सुनि प्रिय बचन मलिन मनु जानी । झुकी रानि अब रहु अरगानी ॥

पुनि अस कबहुँ कहसि घरफोरी । तब धरि जीभ कढ़ावउँ तोरी ॥

मंथरेचे बोलणे ऐकून व ती खोट्या मनाची आहे, असे समजून राणी रागावून म्हणाली, ‘ बस्स. आता गप्प बैस. घरात दुफळी माजविणारी कुठली ! पुन्हा कधी असे बोललीस तर तुझी जीभ हासडून टाकीन. ‘ ॥ ४ ॥

दोहा—काने खोरे कूबरे कुटिल कुचाली जानि ।

तिय बिसेषि पुनि चेरि कहि भरतमातु मुसुकानि ॥ १४ ॥

चकण्या, लंगड्या व कुबड्यांना दुष्ट आणि वाईट चालीचे मानले पाहिजे. त्यांतली स्त्री आणि विशेषतः दासी.’ असे म्हणत भरताची माता कैकेयी हिने हास्य केले. ॥ १४ ॥

प्रियबादिनि सिख दीन्हिउँ तोही । सपनेहुँ तो पर कोपु न मोही ॥

सुदिनु सुमंगल दायकु सोई । तोर कहा फुर जेहि दिन होई ॥

मग म्हणाली, ‘ हे प्रिय वचन बोलणार्‍या मंथरे, मी तुला शिक्षा म्हणून रागावले. मला तुझा स्वप्नातही राग येणार नाही. ज्यादिवशी तुझे म्हणणे खरे होईल, अर्थात रामाला राजतिलक होईल, तोच मंगलदायी शुभ दिवस ठरेल. ॥ १ ॥

जेठ स्वामी सेवक लघु भाई । यह दिनकर कुल रीति सुहाई ॥

राम तिलकु जौं सॉंचेहुँ काली । देउँ मागु मन भावत आली ॥

मोठा भाऊ हा स्वामी आणि लहान भाऊ सेवक असतो. ही सूर्यवंशातील सुयोग्य रीत आहे. जर खरोखर उद्याच श्रीरामाचा राज्याभिषेक असेल, तर हे सखी, मनाला आवडेल ते माग. मी देईन. ॥ २ ॥

कौसल्या सम सब महतारी । रामहि सहज सुभायँ पिआरी ॥

मो पर करहिं सनेहु बिसेषी । मैं करि प्रीति परीछा देखी ॥

रामांना सरळ स्वभावामुळे सर्व माता कौसल्येसारख्याच प्रिय आहेत. माझ्यावर तर ते विशेष प्रेम करतात. मी त्यांच्या प्रेमाची परीक्षा घेऊन पाहिली आहे. ॥ ३ ॥

जौं बिधि जनमु देइ करि छोहू । होहुँ राम सिय पूत पुतोहू ॥

प्रान तें अधिक रामु प्रिय मोरें । तिन्ह कें तिलक छोभु कस तोरें ॥

जर विधात्याने मला कृपा करुन पुढचा जन्म दिला, तर मला श्रीरामचंद्र पुत्र व सीता ही सून म्हणून मिळो. श्रीराम हा मला प्राणांहून अधिक प्रिय आहे. त्याच्या राजतिलकामुळे तुला क्षोभ का झाला ? ॥ ४

दोहा—भरत सपथ तोहि सत्य कहु परिहरि कपट दुराउ ।

हरष समय बिसमउ करसि कारन मोहि सुनाउ ॥ १५ ॥

तुला भरताची शपथ आहे. कपट सोडून खरे खरे सांग. तू आनंदाच्या प्रसंगी दुःख का करीत आहेस, याचे कारण मला सांग. ‘ ॥ १५ ॥

एकहिं बार आस सब पूजी । अब कछु कहब जीभ करि दूजी ॥

फोरै जोगु कपारु कपारु अभागा । भलेउ कहत दुख रउरेहि लागा ॥

मंथरा म्हाणाली, सर्व आशा एकाच वेळी बोलण्यामुळे पूर्ण झाल्या. आता दुसरी जीभ लावून सांगते. माझे दुर्दैवी कपाळ फोडून टाकण्याजोगे आहे. चांगली गोष्ट सांगितल्यावर सुद्धा तुम्हांला दुःख वाटते. ॥ १ ॥

कहहिं झूठि फुरि बात बनाई । ते प्रिय तुम्हहि करुइ मैं माई ॥

हमहुँ कहबि अब ठकुरसोहाती । नाहिं त मौन रहब दिनु राती ॥

जे खर्‍या-खोट्या गोष्टी रचून सांगतात, हे माई, तेच तुम्हांला आवडतात आणि मी कडवट वाटते. आता मी सुद्धा तोंडदेखली गोष्ट बोलेन. नाहीतर दिवस-रात्र गप्प राहीन. ॥ २ ॥

करि कुरुप बिधि परबस कीन्हा । बवा सो लुनिअ लहिअ जो दीन्हा ॥

कोउ नृप होउ हमहि का हानी । चेरि छाड़ि अब होब कि रानी ॥

विधात्याने कुरुप बनवून मला पराधीन केले आहे. यात दुसर्‍याचा काय दोष ? जे पेरले ते घेते, दिले ते मिळविते. कुणी का राजा होईना, आमचे काय जाते ? दासी होण्याशिवाय तुम्ही आता राणी थोड्या राहाणार ? ॥ ३ ॥

जारै जोगु सुभाउ हमारा । अनभल देखि न जाइ तुम्हारा ॥

तातें कछुक बात अनुसारी । छमिअ देबि बड़ि चूक हमारी ॥

आमचा स्वभाव तर जाळणयाजोगाच आहे. कारण मला तुमचे अहित पाहावत नाही, म्हणून मी सूतोवाच केले होते. परंतु हे देवी, आमची मोठी चूक झाली, क्षमा करा. ‘ ॥ ४ ॥

दोहा—गूढ़ कपट प्रिय बचन सुनि तीय अधरबुधि रानि ।

सुरमाया बस बैरिनिहि सुहृद जानि पतिआनि ॥ १६ ॥

स्त्री अस्थिर बुद्धीची असल्यामुळे आणि देवांच्या मायेला बळी पडल्यामुळे कैकेयी राणी ही मंथरेची कपटपूर्ण रहस्यमय वाणी ऐकून वैरीण मंथरेला आपली हितचिंतक समजून तिच्यावर विश्वास करु लागली. ॥ १६ ॥

सादर पुनि पुनि पूँछति ओही । सबरी गान मृगी जनु मोही ॥

तसि मति फिरी अहइ जसि भाबी । रहसी चेरि घात जनु फाबी ॥

वारंवार राणी आदरपूर्वक विचारत होती. भिल्लिणीच्या गाण्याने हरिणी मोहित व्हावी, तशी राणी मोहित झाली. जसे घडायचे होते, त्याप्रमाणे कैकेयीची बुद्धी फिरली. आपला डाव साधलेला पाहून मंथरा खूष झाली. ॥ १ ॥

तुम्ह पूँछहु मैं कहत डेराऊँ । धरेहु मोर घरफोरी नाऊँ ॥

सजि प्रतीति बहुबिधि गढ़ि छोली । अवध साढ़साती तब बोली ॥

‘ तुम्ही विचारता, परंतु सांगतांना भीती वाटते. कारण तुम्ही पूर्वीच माझे नाव घरात फूट पाडणारी असे ठेवले आहे. ‘ अशाप्रकारे घोळून घोळून आणि राणीला पूर्ण विश्वास वाटू लागल्यावर ती अयोध्येची साडेसाती असलेली मंथरा म्हणाली, ॥ २ ॥

प्रिय सिय रामु कहा तुम्ह रानी । रामहि तुम्ह प्रिय सो फुरि बानी ॥

रहा प्रथम अब ते दिन बीते । समउ फिरें रिपु होहिं पिरीते ॥

‘ हे राणी, तुम्ही जे म्हणालात की, मला सीता-राम प्रिय आहेत व रामांना तुम्ही, ही गोष्ट खरी आहे. परंतु ही गोष्ट पूर्वी होती. आता ते दिवस सरले. दिवस फिरले की, मित्रसुद्ध शत्रु बनतात. ॥ ३ ॥

भानु कमल कुल पोषनिहारा । बिनु जल जारि करइ सोइ छारा ॥

जरि तुम्हारि चह सवरि उखारी । रुँधहु करि उपाउ बर बारी ॥

सूर्य हा कमळाच्या ताटव्याचे पालन करणारा आहे, परंतु

 पाण्याविना तोच सूर्य कमळांना करपून टाकतो. सवत

 कौसल्या ही तुम्हांला समूळ उपटून टाकू इच्छिते.

 म्हणून उपाय करुन चांगले कुंपण घालून तिला आवर

 घाला. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: