Saturday, February 27, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 12 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १२

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 12 
Ovya 331 to 360 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १२ 
ओव्या ३३१ ते ३६०

देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता ।

मा अनुभवें तल्लीनता । नव्हेल केवीं ॥ ३३१ ॥

३३१) देवा, योगाचें हें वर्णनच केवळ ऐकलें असतां चित्तांत ज्ञान उत्पन्न होतें, तर मग अनुभवानें तल्लीनता कशी होणार नाहीं ?    

म्हणऊनि एथ कांहीं । अनारिसें नाहीं ।

परी नावभरी चित्त देईं । बोला एका ॥ ३३२ ॥

३३२) म्हणून तुझ्या सांगण्यांत कांहीं अन्यथा नाहीं; परंतु क्षणभर माझ्या एक बोलण्याकडे लक्ष दे.

आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु ।

परि न शके करुं पांगु । योग्यतेचा ॥ ३३३ ॥

३३३) कृष्णा, तूं जो आतां योग सांगितलास, तो माझ्या मनाला तर चांगलाच पटला. परंतु माझ्या ठिकाणीं अधिकाराची उणीव असल्यामुळें मी त्याचें अनुष्ठान करुं शकत नाहीं. 

सहजें आंगिक जेतुली आहे । तेतुलियाची जरी सिद्धि जाये ।

तरी हाचि मार्गु सुखोपायें । अभ्यासीन ॥ ३३४ ॥

३३४) माझ्या अंगांत स्वभावतःच जितकी योग्यता आहे, तेवढ्याच योग्यतेनें जर हा अभ्यास सिद्धीला जाईल, तर याच मार्गाचा मी सुखानें अभ्यास करीन.

नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपां जरी न ठकेल ।

तरी योग्यतेवीण होईल । तेंचि पुसों ॥ ३३५ ॥

३३५) अथवा देव जसें सांगतील तसें जर आपल्या हातून होणार नसेल, तर योग्यतेशिवाय जे होण्याजोगें असेल तेंच विचारुं,

जीवींचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहलें कारण ।

मग म्हणे तरी आपण । चित्त देइजो ॥ ३३६ ॥

३३६) माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून पुसण्याचें प्रयोजन पडलें; म्हणून मी म्हणतों, आपण ( इकडे ) लक्ष द्यावें.

हां हो जी अवधारिलें । हें जें साधन तुम्हीं निरुपिलें ।

आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ॥ ३३७ ॥

३३७) अहो महाराज, ऐकलें का ? तुम्ही जें हें साधन सांगितलें, त्याचें वाटेल त्यानें अनुष्ठान केलें, तर तें साध्य होईल काय ?

कीं योग्यतेवीण नाहीं । ऐसें हन आहे कांहीं ।

तेथ कृष्ण म्हणती तरी काई । धनुर्धरा ॥ ३३८ ॥

३३८) अथवा, योग्यतेशिवाय प्राप्त होत नाहीं, असें कांहीं ( येथें ) आहे ? ( असें अर्जुनानें विचारलें. ) तेव्हां श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, हें तूं काय विचारतोस ?

हें काज कीर निर्वाण । परि आणिकहि जें कांहीं साधारण ।

तेंहि अधिकाराचे वोडवेविण । काय सिद्धि जाय ॥ ३३९ ॥

३३९) ही तर अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे; पण इतर कांहीं साधारण काम असतें, तें तरी अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जातें काय ?

पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची आधीन जाणिजे ।

का जें योग्य होऊनि कीजे । तें आरंभीं फळे ॥ ३४० ॥

३४०) परंतु योग्यता जी म्हणावयाची ती प्राप्तीच्या आधीन आहे, असें समजावें; कारण योग्य होऊन जें करावें तें आरंभींच फलदायक होते.

तरी तैसी एथ कांहीं । सावियाचि केणी नाहीं ।

आणि योग्यांची काई । खाणी असे ॥ ३४१ ॥

३४१) तर तसा कांहीं येथें योग्यता हा सहज बाजारांत मिळणारा माल नाहीं; आणि योग्य पुरुषाची खाणी आहे काय ?

नावेक विरक्तु । जाहला देहधर्मीं नियतु ।

तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ॥ ३४२ ॥

३४२) थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्यानें आवरल्या आहेत, तोच या कामीं योग्य अधिकारी नाहीं काय ?

येतुलालिये आयणीमाजि येवढें । योग्यपण तूंतेंही जोडे ।

ऐसें प्रसंगें सांकडे । फेडिलें तयाचें ॥ ३४३ ॥

३४३) एवढ्या युक्तिनें एवढी योग्यता तुलाहि प्राप्त होईल. ( ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात कीं, ) अशी त्याची अडचण देवांनी ओघानेंच दूर केली.

मग म्हणे गा पार्था । ते हे ऐसी व्यवस्था ।

अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥ ३४४ ॥

३४४) मग देव पुढें म्हणतात, अर्जुना, त्याचा असा नियम आहे कीं, जो अनियमित वागतो त्यास मुळीच योग्यता नाहीं.

मूळ श्लोक

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।

न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ १६ ॥

१६) पण हे अर्जुना, अति खाणारा, ( अथवा ) अगदींच न खाणारा ( किंवा ) अति झोप घेणारा ( अथवा ) मुळींच झोप न घेणारा, असा ( जो असेल ) त्याला योग प्राप्त होणार नाहीं.

जो रसनेंद्रियाचा अंकिला । कां निद्रेसी जीवें विकला ।

तो नाहीं एथ म्हणितला । अधिकारिया ॥ ३४५ ॥

३४५) जो जिव्हेच्या आधीन आहे किंवा झोपेला जीवापासून वाहिलेला आहे, तो योगाविषयीं अधिकारी आहे असें म्हणतां येत नाहीं.

अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी ।

आहारातें तोडी । मारुनियां ॥ ३४६ ॥

३४६) अथवा जो हट्टाच्या बंधनानें भूक व तहान कोंडतो व भुकेला मारुन आहार तोडतो;

निद्रेचिया वाटा नवचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे ।

तें शरीरचि नव्हे तयाचें । मा योगु कवणाचा ॥ ३४७ ॥

३४७) व जो निद्रेच्या वाटेस जात नाहीं; याप्रमाणें ज्याच्या ठिकाणीं हट्टाचा पूर्ण संचार होऊन जो नाचतो, त्याचें तें शरीरच त्याच्या ताब्यांत राहणार नाहीं, तर मग योग कोण करणार ?    

म्हणोनि अतिशयें विषय सेवावा । तैसा विरोध न व्हावा ।

कां सर्वथा निरोधु करावा । हेंही नको ॥ ३४८ ॥

३४८) म्हणून विषयांचें अतिसेवन करावें अशी विरोधी बुद्धि नसावी; किंवा वाजवीपेक्षां फाजील नियमन करणें हेंहि कामाचें नाहीं. 

मूळ श्लोक

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।

युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ १७ ॥

१७) ज्याचें खाणें व हिंडणें परिमित आहे, जो सर्व कर्म मापून करतो, ज्याच्या निद्रा व जागर परिमित आहेत, त्याला ( हा ) योग ( संसाररुपी ) दुःखाचा नाश करणारा होतो.

आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापें मविजे ।

क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ॥ ३४९ ॥

३४९) अन्न तर सेवन करावें, परंतु नियमाच्या मापानें मोजलेलें असावें; त्याचप्रमाणें इतर सर्व क्रिया कराव्यात.

मपितलां बोलीं बोलिजे । मितलां पाउलीं चालिजे ।

निद्रेही मानु दीजे । अवसरें एकें ॥ ३५० ॥

३५०) मोजके शब्द बोलावेत, नितमित पावलांनीं चालावें व एका योग्य वेळीं झोपेलाहि मान द्यावा.

जागणें जरी जाहलें । तरी व्हावें तें मितलें ।

येतुलेनि धातुसाम्य संचलें । असेल सुखें ॥ ३५१ ॥

३५१) जागावयाचें जरी झालें तरी तेंहि परिमितच असावें; एवढ्यानें अनायासें कफवातादि सर्व धातूंची समता राहील.

ऐसें युक्तिचेनि हातें । जैं इंद्रियां वोपिजे भातें ।

तैं संतोषासी वाढतें । मनचि करी ॥ ३५२ ॥

३५२) अशा नियमितपणानें इंद्रियांना विषय दिले असतां मनच संतोषाला वाढवितें.

मूळ श्र्लोक

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।

निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युचते तदा ॥ १८ ॥  

१८)  जेव्हां नियमन केलेलें असें चित्त आत्म्याच्या ठिकाणीं लय पावतें, ( आणि जेव्हां ) सर्व प्रकारच्या इच्छांविषयीं ( साधक ) निरिच्छ होतो, तेव्हां त्याला योग सिद्ध झाला असें म्हणतात.  

बाहेर युक्तीची मुठा पडे । तंव आंत सुख वाढे ।

तेथें सहजेंचि योगु घडे । नाभ्यासितां ॥ ३५३ ॥

३५३) बाह्येंद्रियांना नियमितपणें वळण पडतें आणि मग अंतःकरणांत सुख वाढतें. अशा स्थितींत अभ्यासाचे कष्ट न पडतां योगाचा अभ्यास सहजच होतो.   

जैसें भाग्याचिये भडसे । उद्यमाचेनि मिसें ।

मग समृद्धिजात आपैसें । घर रिघे ॥ ३५४ ॥ 

३५४) ज्याप्रमाणें दैवाचा उदय झाला असतां, मग उद्योगाचें निमित्त होतें; नंतर सर्व ऐश्र्वर्ये आपोआप घरीं चालत येतात;   

तैसा युक्तिमंतु कौतुकें । अभ्यासाचिये मोहरा ठाके ।

आणि आत्मसिद्धीचि पिके । अनुभवु तयाचा ॥ ३५५ ॥

 ३५५) त्याप्रमाणें नियमानें वागणारा पुरुष ज्या वेळेस लीलेनें आपला मोर्चा योगाभ्यासाकडे वळवितो, त्याच वेळेला त्याचा अनुभव आत्मप्राप्तिरुपानें पिकतो. 

म्हणोनि युक्ति हे पांडवा । घडे जया सदैवा ।

तो अपवर्गीचिये राणिवा । अळंकरिजे ॥ ३५६ ॥

३५६) म्हणून अर्जुना, हा नियमितपणा ज्या भाग्यवानाच्या हातून घडतो तो पुरुष मोक्षाच्या राज्यानें अलंकृत होतो.

मूळ श्र्लोक

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।

योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ १९ ॥

१९) निवार्‍याच्या (ज्या ठिकाणी वारा नाही ) जागीं असलेला दीवा ज्याप्रमाणें हालत नाहीं, तीच उपमा चित्ताचें नियमन केलेल्या व आत्मयोगाचें अनुष्ठान करणार्‍या योगी मनुष्यासंबंधानें जाणावी.    

युक्ति योगाचें आंग पावे । ऐसें प्रयाग होय जें बरवें ।

तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें । मानस जयाचें ॥ ३५७ ॥

३५७) नियम आणि योग ज्या वेळीं एकत्र होतात व असा दोहींचा प्रयागरुप चांगला संगम जेथें होतो, त्या ठिकाणीं ज्याचें मन क्षेत्रसंन्यास करुन स्थिर होतें,

तयातें योगयुक्त म्हण । हेंही प्रसंगें जाण ।

तें दीपाचें उपलक्षण । निर्वातींचिया ॥ ३५८ ॥

३५८) त्याला तूं योगयुक्त म्हण. त्या पुरुषाच्या मनाच्या स्थितीला निर्वात स्थळींच्या दिव्याची उपमा योग्य होईल, हेंहि तूं प्रसंगानुसार समज.

आतां तुझें मनोगत जाणोनि । कांहीं एक आम्ही म्हणोनि ।

तें निकें चित्त देऊनि । परिसावें गा ॥ ३५९ ॥

३५९) आतां तुझ्या मनांतीलअभिप्राय ओळखून तुला मी कांहीं थोडें सांगतों, तें तूं चांगलें चित्त देऊन ऐक.

तूं प्राप्तीची चाड वाहसी । परि अभ्यासीं दक्षु नव्हसी ।

तें सांग पां काय बिहसी । दुबाडपणा ॥ ३६० ॥

३६०) तूं प्राप्तीची इच्छा बाळगतोस, परंतु अभ्यास

 करण्याविषयीं तत्पर असत नाहींस; तर सांग बाबा, तूं

 कठीणपणाला भितोस काय ? 



Custom Search

No comments: