Saturday, February 13, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 8 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ८

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 8 
Ovya 211 to 240 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ८ 
ओव्या २११ ते २४०

ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पाखर पडे ।

तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ॥ २११ ॥

२११) याप्रमाणें शरीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते व आंतल्या बाजूस मनाच्या चंचलतेचा जोर नाहींसा होतो.

कल्पना निमे । प्रवृत्ती शमे ।

आंग मन विरमे । सावियाचि ॥ २१२ ॥

२१२) कल्पना नाहींशी होते, मनाची बाह्य विषयांकडे असणारी धांव थांबते व सहजच शरीर आणि मन शांत होतें.

क्षुधा काय जाहली । निद्रा केउती गेली ।

हे आठवणही हारपली । न दिसे वेगां ॥ २१३ ॥

२१३) भूक काय झाली,झोप कोठें गेली, याची आठवणदेखील राहिली नाहीं.

जो मूळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला ।

तो सवेंचि वरी सांकडला । फुगु धरी ॥ २१४ ॥

२१४) जो अपानवायू मूळबंदधानें कोंडलेला असतो तो ऊर्ध्वगतीनें मा घारी फिरुन सहजच वर अवघडल्यामुळें फुगवटा धरतो, 

क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायीं गाजे ।

मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां ॥ २१५ ॥

२१५) खवळून तो अपानवायु माजतो व पसरल्या ठिकाणी गुरगुरुं लागतो व तेथेंच राहून मणिपूरचक्राला धक्के देतो.

मग थांबली ते वाहटुळी । सैंध घेऊनि घरडहुळी ।

बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ॥ २१६ ॥

२१६) मग ती अपानवायूची बळावलेली वाहुटळ सर्व शरीराच्या आंत शोध करुन लहानपणाची पोटांतील कुजकी घाण बाहेर काढते. 

भी तरीं वळी न धरे । कोठ्यामाजी संचरे ।

कफपित्तांचे थारे । उरों नेदी ॥ २१७ ॥  

२१७) त्या अपानवायूला आंत वळण्याला कोठें जागा नसल्यामुळें, तो मग कोठ्यांत प्रवेश करतो व तेथें असलेले कफ आणि पित्त यांचा थारा राहूं देत नाहीं.

धातूंचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी ।

आंतली मज्जा काढी । अस्तिगत ॥ २१८ ॥

२१८) सप्तधातूचे समुद्र पालथे करतो; मेदाचे पर्वत फोडतो व हाडांमधील मज्जा बाहेर काढतो;

नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी ।

साधकातें भेडसावी । परि बिहावें ना ॥ २१९ ॥

२१९) नाड्या खुल्या करतो, अवयव शिथिल करतो व साधकाला भीति दाखवतो. परंतु त्यानें भिऊं नये. 

व्याधीतें दावी । सवेंचि हरवी ।

आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥ २२० ॥

 २२०) ( तो ) रोगांना दाखवितो. परंतु लागलीच त्यांना नाहींसे करतो आणि शरीरांत जे पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश आहेत ते एकांत एक कालवितो.

तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा ।

शक्ती करी उजगरा । कुंडलिनीये ॥ २२१ ॥

२२१) अर्जुना, ( कोंडलेला अपानवायु असे प्रकार करतो तों ) दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागे करते.

नागाचें पिलें । कुंकुमें नाहलें ।

वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥ २२२ ॥

२२२) केशरानें न्हालेलें नागाचें पिल्लू वेढे घेऊन जसे निजावें; 

तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी ।

अधोमुख सर्पिणी । निजैली असे ॥ २२३ ॥

२२३) त्याप्रमाणें नेमकी साडेतीन वेढ्यांची ती कुंडलिनीरुपी नागीण खाली तोंड करुन निजलेली असते.

विद्दुलतेची विडी । वह्निज्वाळांची घडी ।

पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥ २२४ ॥

२२४) ती नागीण ज्याप्रमाणें मूर्तिमंत बनविलेली विजेची वाटोळी कडी किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची केलेली घडी अथवा जणूं काय उत्तम सोन्याचे चकचकीत वेढे,

तैसी सुबद्ध आटली । पुटीं होती दाटली ।

ते वज्रासनें चिमुटली । सावध होय ॥ २२५ ॥

२२५) त्याप्रमाणें व्यवस्थितपणें आकुंचित असलेली व नाभीजवळच्या संकुचित जागेंत ती वज्रासनानें दाटून बसलेली चिमटल्यामुळे जागी होते. 

तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें ।

तेजाचें बीज विरुढलें । अंकुरेंशीं ॥ २२६ ॥

२२६) त्या ठिकाणी नक्षत्र जसें तुटून पडावें अथवा सूर्यानें जसें आपलें आसन सोडून खालीं यावें किंवा प्रकाशरुप बिजासच अंकुर फुटावा ,

तैशी वेढियातें सोडिती । कवतिकें आंग मोडिती ।

कंदावरी शक्ती । उठली दिसे ॥ २२७ ॥

२२७) त्याप्रमाणें वेढ्याला सोडीत असलेली व लीलेनें अंग मोडीत असलेली ती कुंडलिनी शक्ति नाभिस्थानाखालील कंदावर उठलेली दिसते.

सहजें बहुतां दिवसांची भूक । वरि चेवविली तें होय मिष ।

मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥ २२८ ॥

२२८) आधींच तिला पुष्कळ दिवसांची भूक लागलेली असते व तशांत तिला डिवचल्याचें निमित्त होतें, मग ती जोरानें सरळ वरती तोंड पसरते. 

तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी ।

तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥ २२९ ॥

२२९) अर्जुना, हृदयकोशाच्या खालच्या बाजूस जो वारा भरलेला असतो, त्या सगळ्या वायूस ती खाऊन टाकते.

मुखींचां ज्वाळीं । तळीं वरी कवळी ।

मांसाची वडवाळी । आरोगूं लागे ॥ २३० ॥

२३०) मुखाच्या ज्वाळांनीं खालीवर व्यापते आणि मांसाचे घास खावयास लागते.

जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस ।

पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥ २३१ ॥

२३१) जें जें ठिकाण मांसल असेल त्या ठिकाणी वरच्या वरच मोठा लचका तोडते; शिवाय हृदयाच्या ठिकाणचेहि एक-दोन घांस काढते.  

मग तळवे तळहात शोधी । ऊर्ध्वीचे खंड भेदी ।

झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ॥ २३२ ॥

२३२) नंतर तळहात व तळपाय यांतील रक्त, मांस वगैरे खाऊन वरच्या भागाचें भेदन करते व प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते.

आधार तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी ।

त्वचा धुऊनि जडी । पांजरेंशीं ॥ २३३ ॥

२३३) आपला आश्रय तर सोडीत नाहीं, पण तेथेंच राहून नखांचें देखील सत्त्व काढून घेते व त्वचा धुऊन पुसून त्या त्वचेला हाडाच्या सापळ्यास चिटकवून ठेविते.  

अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे ।

तंव बाहेरी विरुढी करपे । रोमबीजांची ॥ २३४ ॥

२३४) हाडांच्या नळ्या निरपून घेते व शिरांच्या काड्या काड्या ओरपून घेते. त्या वेळीं बाहेरच्या केसांच्या बीजाची वाढ होण्याची शक्ति जळून जाते.  

मग सप्तधातूंचां सागरीं । ताहानेली घोट भरी ।

आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ॥ २३५ ॥

२३५) मग तहानेनें पीडित अशी ती सप्त धातूंचा समुद्र एका घोटांत पिऊन टाकते व लागलीच शरीरात जिकडे तिकडे खडखडीत उन्हाळा करते.

नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळें वारा ।

तो गचिये धरुनि माघारा । आंतु घाली ॥ २३६ ॥

२३६) दोन्हीं नाकपुड्यांतून बारा बोटें वाहात असलेल्या वायूला गच्च धरुन त्यास आंत मागें घालते.  

तेथ अध वरौतें आकुंचे । ऊर्ध्व तळौतें खाचे ।

जया खेवामाजि चक्रांचे । पदर उरती ॥ २३७ ॥

२३७) तेव्हां खालचा अपानवायु वरती आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायु खालीं खेचतो; त्या प्राणापानांच्या भेटीमध्यें षड्चक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात.     

एर्‍हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परी कुंडलिनी नावेक दुश्र्चित होती ।

ते तयातें म्हणे परौती । तुम्हीचि कायसीं एथें ॥ २३८ ॥

२३८) एर्‍हवीं तरी प्राण व अपान या दोहोंचा तेव्हांच मिलाफ झाला असता; परंतु कुंडलिनी तेथें क्षणभर क्षोभलेली असते, म्हणून ती त्यांना म्हणते, तुम्ही येथें कोण ? चालते व्हा.   

आइकें पार्थिव धातु आघवी । आरोगितां कांहीं नुरवी ।

आणि आपातें तंव ठेवी । पुसोनियां ॥ २३९ ॥

२३९) अर्जुना, ऐक. पृथ्वीचे सर्व धातु खाऊन कांहीं एक शिल्लक ठेवीत नाहीं आणि पाण्याचा भाग तर तेव्हांच चाटूनपूसून टाकते.

ऐसी दोनी भूतें खाये । ते वेळीं संपूर्ण धाये ।

मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशीं ॥ २४० ॥

२४०) याप्रमाणें पृथ्वी व जल, हीं दोन्हीं भूतें खाल्ल्यावर

 तिची संपूर्ण तृप्ति होते, आणि मग ती शांत होऊन

 सुषुम्नेजवळ राहाते.



Custom Search

No comments: