Monday, February 22, 2021

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 5 अयोध्याकाण्ड द्वितीयसोपान भाग ५

 

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 5 
Doha 23 to 28 
अयोध्याकाण्ड द्वितीयसोपान भाग ५
दोहा २३ ते २८

दोहा—प्रमुदित पुर नर नारि सब सजहिं सुमंगलचार ।

एक प्रबिसहिं एक निर्गमहिं भीर भूप दरबार ॥ २३ ॥

नगरातील सर्व स्त्री-पुरुष आनंदित होऊन शुभ मंगलाचाराचे सर्व सामान सजवीत होते. कोण आत जात होता, कोणी बाहेर जात होता. धावपळ चालली होती. राजद्वारी फार गर्दी जमत होती. ॥ २३ ॥

बाल सखा सुनि हियँ हरषाहीं । मिलि दस पॉंच राम पहिं जाहीं ॥

प्रभु आदरहिं प्रेमु पहिचानी । पूँछहिं कुसल खेम मृदु बानी ॥

श्रीरामचंद्रांचे बाल-मित्र राजतिलकाची वार्ता ऐकून मनातून हरखून गेले होते. ते दहा-पाचाच्या गटाने श्रीरामचंद्रांकडे येत होते. त्यांचे प्रेम पाहून प्रभू रामचंद्र त्यांना आदर देत होते व कोमल वाणीने त्यांची खुशाली विचारीत होते. ॥ १ ॥

फिरहिं भवन प्रिय आयसु पाई । करत परसपर राम बड़ाई ॥

को रघुबीर सरिस संसारा । सीलु सनेहु निबाहनिहारा ॥

आपला लाडका मित्र श्रीरामचंद्र यांची आज्ञा घेऊन ते परस्परांना श्रीरामांची थोरवी सांगत घरी गेले आणि म्हणाले, ‘ जगात श्रीरघुनाथांच्यासारखा शीलवान व स्नेह करणारा कोण आहे ? ॥ २ ॥

जेहिं जेहिं जोनि करम बस भ्रमहीं । तहँ तहँ ईसु देउ यह हमहीं ॥

सेवक हम स्वामी सियनाहू । होउ नात यह ओर निबाहू ॥

परमेश्र्वर आम्हांला एवढेच देवो की, आम्ही आपल्या कर्माप्रमाणे भ्रमण करीत ज्या ज्या योनीला जन्मू, त्या त्या योनीत आम्ही सेवक असावे आणि सीतापती श्रीरामचंद्र आमचे स्वामी असावेत. हे नाते शेवटपर्यंत टिकून राहो.’ ॥ ३ ॥

अस अभिलाषु नगर सब काहू । कैकयसुता हृदयँ अति दाहू ॥

को न कुसंगति पाइ नसाई । रहइ न नीच मतें चतुराई ॥

नगरामध्ये सर्वांची हीच अभिलाषा होती, परंतु कैकेयीच्या मनात चडफडाट होत होता. कुसंगती लाभल्यावर कोण बरे अधोगतीला जाणार नाही ? क्षुद्र विचारांच्या लोकांच्या सल्ल्याने वागल्यामुळे शहाणपण उरत नसते. ॥ ४ ॥

दोहा—साँझ समय सानंद नृपु गयउ कैकई गेहँ ।

गवनु निठुरता निकट किय जनु धरि देह सनेहँ ॥ २४ ॥

संध्याकाळी राजा दशरथ आनंदाने कैकेयीच्या महालात गेले. जणू प्रत्यक्ष स्नेहच देह धारण करुन निष्ठुरतेकडे गेला होता. ॥ २४ ॥

कोपभवन सुनि सकुचेउ राऊ । भय बस अगहुड़ परइ न पाऊ ॥

सुरपति बसइ बाहँबल जाकें । नरपति सकल रहहिं रुख ताकें ॥

कोपभवनाचे नाव ऐकताच महाराज घाबरले. भयामुळे त्यांचा पाय उचलत नव्हता. प्रत्यक्ष देवराज इंद्र ज्यांच्या बाहुबलामध्ये वसतो, आणि संपूर्ण राजे लोक ज्यांचा कल पाहून वागतात, ॥ १ ॥

सो सुनि तिय रिस गयउ सुखाई । देखहु काम प्रताप बड़ाई ॥

सूल कुलिस असि अँगवनिहारे । ते रतिनाथ सुमन सर मारे ॥

तेच महाराज दशरथ स्रीचा क्रोध ऐकून सुकून गेले. कामदेवाचा प्रताप आणि महिमा तर पाहा. जे त्रिशूळ, वज्र, तलवार इत्यादींचे घाव अंगावर सहज झेलत, ते रतिनाथ कामदेवाच्या पुष्पबाणाला बळी पडले. ॥ २ ॥

सभय नरेसु प्रिया पहिं गयऊ । देखि दसा दुखु दारुन भयऊ ॥

भूमि सयन पटु मोट पुराना । दिए डारि तन भूषन नाना ॥

राजा घाबरलेल्या अवस्थेत आपली लाडकी राणी कैकेयी, हिच्याजवळ गेले. तिने जुने जाडेभरडे वस्त्र नेसले होते व शरीरावरील नाना दाग-दागिने फेकून दिले होते. ॥ ३ ॥

कुमतिहि कसि कुबेषता फाबी । अनअहिवातु सूच जनु भाबी ॥

जाइ निकट नृपु कह मृदु बानी । प्रानप्रिया केहि हेतु रिसानी ॥

त्या दुर्बुद्ध कैकेयीचा तो अभद्र वेष असा वाटत होता की, जणू भावी वैधव्य सूचित होत होते. राजे तिच्याजवळ जाऊन कोमल शब्दांत तिला म्हणाले, ‘ हे प्राणप्रिये, कशासाठी हा रुसवा ?’ ॥ ४ ॥

छं०—केहि हेतु रानि रिसानि परसत पानि पतिहि नेवारई ।

मानहुँ सरोष भुअंग भामिनि बिषम भॉंति निहारई ॥

दोउ बासना रसना दसन बर मरम ठाहरु देखई ।

तुलसी नृपति भवतब्यता बस काम कौतुक लेखई ॥

हे राणी, का रागावली आहेस ?’ असे म्हणत राजांनी तिला हाताने स्पर्श केला, तेव्हा तिने तो झटकून टाकला आणि क्रोधित नागिणीप्रमाणे क्रूर दृष्टीने ती त्यांच्याकडे पाहू लागली. दोन वरदानांची वासना म्हणजे त्या नागिणीच्या दोन जिभा होत्या आणि दोन वर म्हणजे दात होते. ती डसण्यासाठी मर्मस्थान पाहात होती. तुलसीदास म्हणतात, राजा दशरथ भवितव्याच्या अधीन झाल्यामुळे तिचे रागावणे व हात झटकणे ही जणू कामदेवाची क्रीडाच समजत होते.

सो०—बार बार कह राउ सुमुखि सुलोचनि पिकबचनि ।

कारन मोहि सुनाउ गजगामिनि निज कोप कर ॥ २५ ॥

राजा वारंवार म्हणत होते की, ‘ हे सुमुखी, हे सुलोचनी, हे कोकिलवचनी, हे गजगामिनि मला आपल्या क्रोधाचे कारण तर सांग. ॥ २५ ॥

अनहित तोर प्रिया केइँ कीन्हा । केहि दुइ सिर केहि जमु चह लीन्हा ॥

कहु केहि रंकहि करौं नरेसू । कहु केहि नृपहि निकासौं देसू ॥

हे प्रिये, कोणी तुझे वाईट केले आहे ? कुणाला दोन डोकी आहेत ? यमराज कोणाला आपल्या लोकी घेऊन जाऊ इच्छितो ? सांग, कुणा कंगालाला राजा करु की कुणा राजाला देशातून निर्वासित करु ? ॥ १ ॥

सकउँ तोर अरि अमरउ मारी । काह कीट बपुरे नर नारी ॥

जानसि मोर सुभाउ बरोरु । मनु तव आनन चंद चकोरु ॥

तुझा शत्रु देवही असला, तरी मी त्याला मारु शकतो. मग बिवार किड्यामुंगीसारखे नर-नारी ते काय ? हे सुंदरी, तुला माझा स्वभाव ठऊक आहे की, माझे मन सदा तुझ्या मुखरुपी चंद्रम्यासाठी चकोर आहे. ॥ २ ॥

प्रिया प्रान सुत सरबसु मोरें । परिजन प्रजा सकल बस तोरें ॥

जौं कछु कहौं कपटु करि तोही । भामिनि राम सपथ सत मोही ॥

हे प्रिये, माझी प्रजा, कुटुंबीय, सर्व संपत्ती, पुत्र इतकेच काय, माझे प्राणसुद्धा तुझ्या अधीन आहेत. हे मी तुला खोटे सांगत असेन तर हे भामिनि, मला श्रीरामाची शांभरवेळा शपथ आहे. ॥ ३ ॥

बिहसि मागु मनभावति बाता । भूषन सजहि मनोहर गाता ॥

घरी कुघरी समुझि जियँ देखू । बेगि प्रिया परिहरहि कुबेषू ॥

तू हसून मला मनपसंत गोष्ट माग आणि आपली मनोहर अंगे अलंकारांनी सजव. वेळ-अवेळ याचा तरी विचार कर. हे प्रिये, पटकन हा अमंगळ वेष टाकून दे.’ ॥ ४ ॥

दोहा—यह सुनि मन गुनि सपथ बड़ि बिहसि उठी मतिमंद ।

भूषन सजति बिलोकि मृगु मनहुँ किरातिनि फंद ॥ २६ ॥

हे ऐकून आणि मनात रामाच्या शपथेचा विचार करुन मंदबुद्धीची कैकेयी हसत-हसत उठली आणि दागिने घालू लागली. जणू मृगाला पाहून एखादी भिल्लीण फासा तयार करीत होती. ॥ २६ ॥

पुनि कह राउ सुहृद जियँ जानी । प्रेम पुलकि मृदु मंजुल बानी ॥

भामिनि भयउ तोर मन भावा । घर घर नगर अनंद बधावा ॥

राजा दशरथाला आपल्या मनात वाटले की, कैकेयी चांगल्या मनाची आहे. ते प्रेमाने पुलकित होऊन कोमल-सुंदर वाणीने म्हणाले की, ‘ हे भामिनि , तुझ्या मनाजोगते झाले. नगरातील घरोघरी आनंदाची वाद्ये वाजत आहेत. ॥ १ ॥

रामहि देउँ कालि जुबराजू । सजहि सुलोचनि मंगल साजू ॥

दलकि उठेउ सुनि हृदउ कठोरु । जनु छुइ गयउ पाक बरतोरु ॥

मी उद्याच श्रीरामाला युवराजपद देत आहे. म्हणून हे सुनयने, मंगल श्रृंगार कर. ‘ हे ऐकताच तिचे कठोर हृदय विदीर्ण होऊ लागले. जणू पिकलेल्या फोडास धक्का लागला. ॥ २ ॥

ऐसिउ पीर बिहसि तेहिं गोई । चोर नारि जिमि प्रगटि न रोई ॥

लखहिं न भूप कपट चतुराई । कोटि कुटिल मनि गुरु पढ़ाई ॥

ज्याप्रमाणे चोराची बायको रहस्य उघडे पडू नये, म्हणून उघडपणे रडू शकत नाही, त्याप्रमाणे कैकेयीने ते प्रचंड दुःख हसून लपविले. राजांना तिचे कपट-चातुर्य दिसले नाही. कारण तिला कोटी कुटिलांची शिरोमणी असलेल्या मंथरेने पढवून ठेवले होते. ॥ ३ ॥

जद्यपि नीति निपुन नानाहू । नारिचरित जलनिधि अवगाहू ॥

कपट सनेहु बढ़ाइ बहोरी । बोली बिहसि नयन मुहु मोरी ॥

जरी राजे नीति-निपुण होते, तरी स्त्री-चरित्र हे अगाध समुद्र असते. मग ती कपटी वरवरचे प्रेम दाखवत डोळे व तोंड वळवून हसत-हसत म्हणाली, ॥ ४ ॥

दोहा—मागु मागु पै कहहु पिय कबहुँ न देहु न लेहु ।

देन कहेहु बरदान दुइ तेउ पावत संदेहु ॥ २७ ॥

‘ हे प्रियतम, तुम्ही माग माग असे म्हणत तर असता, परंतु कधीही काही देत-घेत नाही. दोन वर द्यायचे कबूल केले होते, पण तेही मिळण्याची मारामार. ॥ २७ ॥

जानेउँ मरमु राउ हँसि कहई । तुम्हहि कोहाब परम प्रिय अहई ॥

थाती राखि न मागिहु काऊ । बिसरि गयउ मोहि भोर सुभाऊ ॥

राजांनी हसून म्हटले की, ‘ आता मला तुझा अर्थ समजला. तुझे रुसणेही मला खूप आवडते. तू ती वरांची ठेव पुन्हा कधी मागितली नाहीस आणि विसरणे हा माझा स्वभाव असल्यामुळे मला तो प्रसंग आठवला नाही. ॥ १ ॥

झूठेहुँ हमहि दोषु जनि देहू । दुइ कै चारि मागि मकु लेहू ॥

रघुकुल रीति सदा चलि आई । प्रान जाहुँ बरु बचनु न जाई ॥

खोटेपणाचा दोष मला देऊ नकोस. हवे तर दोनच्या ऐवजी चार वर मागून घे. प्राण गेले तरी बेहत्तर, पण दिलेले वचन मोडता कामा नये, हीच परंपरा रघुकुलात नेहमी चालत आलेली आहे. ॥ २ ॥

नहिं असत्य सम पातक पुंजा । गिरि सम होहिं कि कोटिक गुंजा ॥

सत्यमूल सब सुकृत सुहाए । बेद पुरान बिदित मनु गाए ॥

असत्यासारखी पापांची रास नाही. कोट्यावधी गुंजा जमा केल्या तरी कुठे डोंगराएवढ्या होतील काय ? ‘ सत्य ‘ हेच सर्व उत्तम पुण्यांचे मूळ आहे. वेद-पुराणांत ही गोष्ट प्रसिद्ध आहे आणि मनूनेसुद्धा हेच सांगितले आहे. ॥ ३ ॥

तेहि पर राम सपथ करि आई । सुकृत सनेह अवधि रघुराई ॥

बात दृढ़ाइ कुमति हँसि बोली । कुमत कुबिहग कुलह जनु खोली ॥

त्याशिवाय श्रीरामाची शपथ माझ्या तोंडून निघाली आहे, श्रीरघुनाथ माझ्या सुकृताची व स्नेहाची परिसीमा आहे. ‘ अशा प्रकारे राजांकडून वदवून घेऊन दुर्बुद्धी कैकेयीने वचन पक्के करुन घेतले. मग तिने बहिरी ससाण्याला सोडण्यासाठी त्याच्या डोळ्यांवरची टोपी काढली. ॥ ४ ॥

दोहा—भूप मनोरथ सुभग बनु सुख सुबिहंग समाजु ।

भिल्लिनि जिमि छाड़न चहति बचनु भयंकरु बाजु ॥ २८ ॥

राजांचे मनोरथ हे सुंदर वन होते, त्यांचे सुख म्हणजे सुंदर पक्ष्यांचा थवा होता. कैकेयी त्यावर भिल्लिणीप्रमाणे आपले वचनरुपी भयंकर ससाणा सोडू पाहात होती. ॥ २८ ॥

मासपारायण, तेरावा विश्राम

सुनहु प्रानप्रिय भावत जी का । देहु एक बर भरतहि टीका ॥

मागउँ दूसर बर कर जोरी । पुरवहु नाथ मनोरथ मोरी ॥

ती म्हणाली, हे प्राणप्रिय, ऐका तर. माझ्या मनाला आवडणारा एक वर असा द्या की, भरताला राजतिलक करा आणि हे नाथ, दुसरा वरसुद्धा मी हात जोडून मागते. माझे मनोरथ पूर्ण करा. ॥ १ ॥

तापस बेष बिसेषि उदासी । चौदह बरिस रामु बनबासी ॥

सुनि मृदु बचन भूप हियँ सोकू । ससि कर छुअत बिकल जिमि कोकू ॥

तपस्व्यांच्या वेषात अत्यंत उदासीन भावनेने विरक्त मुनींप्रमाणे रामाने चौदा वर्षे वनात राहावे.’ कैकेयीचे हे ( कपटपूर्ण ) विनययुक्त बोलणे ऐकून चंद्र-किरणांच्या स्पर्शाने चक्रवाक पक्षी जसा व्याकूळ होऊन जातो, त्याप्रमाणे राजांच्या हृदयात शोक पसरला. ॥ २ ॥

गयउ सहमि नहिं कछु आवा । जनु सचान बन झपटेउ लावा ॥

बिबरन भयउ निपट नरपालू । दामिनि हनेउ मनहुँ तरु तालू ॥

महाराजांना एकदम धक्का बसला. त्यांना काही बोलता येईना. जणू ससाण्याने लावा पक्ष्यावर हल्ला केला होता, ताडवृक्षाला विजेने होतपळून टाकले होते, तीच अवस्था राजांची झाली. ॥ ३ ॥

माथें हाथ मूदि दोउ लोचन । तनु धरि सोचु लाग जनु सोचन ॥

मोर मनोरथु सुरतरु फूला । फरत करिनि जिमि हतेउ समूला ॥

डोक्याला हात लावून व डोळे बंद करुन राजे पश्चाताप करु लागले की, जणू प्रत्यक्ष पश्चातापच साकार बनून पश्चाताप करु लागला होता. ते विचार करु लागले की, ‘ हाय माझे मनोरथरुपी कल्पवृक्ष फुलला होता, परंतु त्याला फळे लागताना कैकेयीरुपी हत्तिणीने मुळासकट उपटून तो नष्ट केला. ॥ ४ ॥            

अवध उजारि कीन्हि कैकेईं । दीन्हिसि अचल बिपति कै नेईं ॥

कैकेयीने अयोध्येला उध्वस्त करुन टाकले आणि

विपत्तीचा पाया घातला. ॥ ५ ॥



Custom Search

No comments: