Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 7
म्हणोनि
तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें ।
राहेल तेथ
रचावें । आसन ऐसें ॥ १८१ ॥
१८१)
म्हणून तें स्थान, तसें आहे कीं, नाहीं, तें पाहावें; आणि राहात असेल, तर तेथें
असें आसन लावावें.
वरी चोखट
मृगसेवडी । माजी धूतवस्त्राची घडी ।
तळवटीं
अमोडी । कुशांकुर ॥ १८२ ॥
१८२)
तळास साग्र दर्भ घालून त्यावर कृष्णजिन घालून, त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी
घालावी.
सकोमळ सरिसे
। सुबद्ध राहती आपैसे ।
एकें पाडें
तैसे । वोजा घालीं ॥ १८३ ॥
१८३) ते
दर्भ कोवळे असून सारखे आणि सहजच एकमेकांना लागलेले एकसारखे राहतील असे व्यवस्थेनें
घालावेत.
परि
सावियाचि उंच होइल । तरि आंग हन डोलेल ।
नीच तरी
पावेल भूमिदोषु ॥ १८४ ॥
१८४)
परंतु तें ( आसन ) कदाचित् जर उंच होईल तर शरीर डोलेल आणि सखल होईल तर, जमिनीचे (
गारवा वगैरे ) दोष ( त्याला ) प्राप्त होतील;
म्हणोनि
तैसें न करावें । समभावें धरावें ।
हे बहु असो
होआवें । आसन ऐसें ॥ १८५ ॥
१८५)
म्हणून आसन उंच अथवा सखल होऊ देऊ नये, तर तें सारखें ( उंचसखल न होईल असें )
घालावें. आतां हें फार वर्णन करणें पुरे. अशा प्रकारचें आसन असावें.
मग तेथ आपण
। एकाग्र अंतःकरण ।
करुनि
सद्गुरुस्मरण । अनुभविजे ॥ १८६ ॥
१८६) मग
तेथें आपण एकाग्र अंतःकरण करुन मनांत सद्गुरुचे स्मरण करावें.
तैसें
स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्त्विकें भरे ।
जंव कठिणपण
विरे । अहंभावाचें ॥ १८७ ॥
१८७)
त्या स्मरणाच्या आदरानें अहंकाराचा कठीणपणा इतका नाहींसा होतो की, तो ( स्मरण
करणारा ) आंतबाहेर सात्त्विक भावांनीव्याप्त होतो;
विषयांचा
विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे ।
मनाची घडी
घडे । हृदयामाजीं ॥ १८८ ॥
१८८) (
त्याला ) विषयांचा विसर पडतो, ( त्याच्या ) इंद्रियांची रग मोडते, अंतःकरणाच्या
ठिकाणीं मनाची स्थिरता होते.
ऐसें ऐक्य
हें सहजें । फावे तंव राहिजे ।
मग तेणेंचि
बोधें बैसिजे । आसनावरी ॥ १८९ ॥
१८९)
याप्रमाणें ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावें व मग त्यांच ऐक्यबोधानें आसनावर
बसावें.
आतां
आंगातें आंग करी । पवनातें पवनुचि वरी ।
ऐसी
अनुभवाची उजरी । होंचि लागे ॥ १९० ॥
१९०)
आता अंगाला अंग आपण होऊन सावरुन धरतें, वायूला वायूच आपण होऊन आंवरुन धरतो;
याप्रमाणें अनुभवाचा उदय होऊं लागतो.
प्रवृत्ति
माघौति मोहरे । समाधि ऐलाडी उतरे ।
आघवें
अभ्यासूं सरे । बैसतखेवो ॥ १९१ ॥
१९१)
प्रवृत्ति माघारी फिरते, समाधि अलीकडील तीराला प्राप्त होते ( आटोक्यांत येते ) व
बसतांक्षणीच सर्व अभ्यास संपतो.
मुद्रेची
प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आतां परियेसीं ।
तरी उरु या
जघनासी । जडोनि घालीं ॥ १९२ ॥
१९२)
मुद्रेची थोरवी अशी आहे; तीच आतां सांगतों. ऐक. तर पोटर्याला चिकटून मांडी
घालावी;
चरनतळें
देव्हडीं । आधारद्रुमाचां बुडीं ।
सुघटितें
गाढीं । संचरीं पां ॥ १९३ ॥
१९३)
दोन्ही तळपाय वांकडे करुन ते आधारचक्राखालीं ( गुदस्थानावर शिवणीपाशीं ) चांगले
सुस्थिर राहतील असे बळकट बसवावेत.
सव्य तो
तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यु पीडिजे ।
वरी बैसे तो
सहजें । वामचरणु ॥ १९४ ॥
१९४) (
पण त्यांत ) उजव्या पायाची टांच खालीं घालावी व तिनें शिवण दाबावी म्हणजे उजव्या
पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो.
गुदमेढ्रांआंतौतीं
। चारी अंगुळें निगुतीं ।
तेथ सार्ध
प्रांतीं । सांडुनियां ॥ १९५ ॥
१९५)
गुद व शिश्न यांमधील बरोबर जी चार बोटें जागा आहे त्यापैकीं दीड बोट वर व दीड बोट
खाली जागा सोडून,
माजि अंगुळ
एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तरभागें ।
नेहेटिजे
वरि आंगें । पेललेनि ॥ १९६ ॥
१९६)
मध्यें जी एक बोट जागा राहाते, तेथें उजव्या पायाच्या टांचेच्या वरच्या बाजूनें
आपलें अंग वर तोलून घट्ट दाबावें.
उचलिलें कां
नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे ।
गुल्फद्वय
धरिजे । तेणेंचि मानें ॥ १९७ ॥
१९७)
उचलला आहे कीं नाहीं हें न कळेल अशा तर्हेनें पाठीचा खालचा भाग उचलावा व त्याच
प्रकारें दोन्ही घोटे उचलून धरावेत.
मग शरीरसंचु
पार्था । अशेषही सर्वथा ।
पार्ष्णीचा
माथा । स्वयंभु होय ॥ १९८ ॥
१९८)
अर्जुना, मग हा सर्व शरीराचा आकार जसा कांहीं अगदीं खालच्या पायाच्या टांचेचा वरचा
स्वयंभू भागच आहे असा होऊन जातो.
अर्जुना हें
जाण । मूळबंधाचें लक्षण ।
वज्रासन गौण
। नाम यासी ॥ १९९ ॥
१९९)
अर्जुना, हें मूळबंधाचे लक्षण आहे, असें समज; याचेंच वज्रासन असें गौण नांव आहे.
ऐसी आधारीं
मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे ।
तेथ अपानु
आंतलीकडे । वोहोटों लागे ॥ २०० ॥
२००)
याप्रमाणें आधारचक्रावर मूळबंध बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे
अपानवायू आंतल्या बाजूस संकुचित होऊं लागतो.
तंव करसंपुट
आपैसें । वामचरणीं बैसे ।
बाहुमूळीं
दिसे । थोरीव आली ॥ २०१ ॥
२०१)
तेव्हा द्रोणाकार झालेली हस्तांजुळी सहज डाव्या पावलावर बसते व त्यामुळें दोन्ही
खांदे वर चढलेले दिसतात.
माजि
उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें ।
नेत्राद्वारींचीं
कवाडें । लागूं पाहती ॥ २०२ ॥
२०२)
पाठीच्या उभ्या कण्याच्या योगानें वर चढलेल्या खांद्यांत मस्तक घट्ट राहतें व
डोळ्यांच्या पापण्या झांकावयास लागतात.
वरचिलें
पातीं ढळती । तळींचीं तळीं पुंजाळती ।
तेथ
अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ॥ २०३ ॥
२०३)
वरच्या पापण्या ढळतात, खालच्या पापण्या खाली पसरतात; तेव्हां अर्धी उघडी अशी त्या
डोळ्यांची स्थिति होते.
दिठी राहोनी
आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडें ।
ते ठायीं
ठावो पडे । नासाग्रपीठीं ॥ २०४ ॥
२०४)
दृष्टि ही आंतल्या आंत डोळ्यांतच राहते. जर कौतुकानें बाहेर आलीच, तर ती नेमकी
नाकाच्या शेंड्यावर पडते.
ऐसें
आंतुचां आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे ।
म्हणोनि
राहणें आघिये दिठीचें । तेथेंचि होय ॥ २०५ ॥
२०५)
अशी आंतल्या आंतच दृष्टि राहते, ती पुन्हां बाहेर येत नाहीं; म्हणून अर्ध्या
दृष्टीचें राहाणें नाकाच्या शेंड्यावरच होतें.
आतां
दिशांची भेटी घ्यावी । कां रुपाची वाट पाहावी ।
हे चाड सरे
आघवी । आपैसया ॥ २०६ ॥
२०६)
आतां दिशांची गांठ घेण्याची ( चोहोंकडे पाहण्याची ) अथवा रुप-विषय पाहण्याची ही
सर्व इच्छा आपोआप नाहींशी होते.
मग कंठनाळ
आटे । हनुवटी हे हडौती दाटे ।
ते गाढी
होवोनी नेहटे । वक्षःस्थळीं ॥ २०७ ॥
२०७) मग
गळा आकुंचित होऊन गळ्याखालच्या खळगींत हनुवटी अडकून बसते. ती तेथें घट्ट बसून
छातीवर दाबून असते.
माजि घंटिका
लोपे । वरी बंधु जो आरोपे ।
तो जालंधरु
म्हणिपे । पंडुकुमरा ॥ २०८ ॥
२०८)
अर्जुना, त्यामध्यें कंठमणी ( गळ्याची घाटी ) अदृश्य होतो; असा जो बंध पडतो, ‘
त्यालाच जालंधरबंध ‘ म्हणतात.
नाभी वरी
पोखे । उदर हें थोके ।
अंतरीं
फांके । हृदयकोशु ॥ २०९ ॥
२०९)
वोढियाणा बंध बेंबीवर पुष्ट होतो. पोट खपाटीला जातें आणि हृदयकमल आंत प्रफुल्लित
होतें.
स्वाधिष्ठानावरिचिले
कांठी । नाभिस्थानातळवटीं ।
बंधु पडे
किरीटी । वोढियाणा तो ॥ २१० ॥
२१०) अर्जुना, शिश्नावरील कांठास ( व ) बेंबीच्या
खालच्या भागास जो बंध पडतो, त्यास वोडियाणा बंध ‘
असें म्हणतात.
No comments:
Post a Comment