Friday, February 19, 2021

Shri RamCharitManas Part 80 श्रीरामचरितमानस भाग ८०

 

Shri RamCharitManas Part 80 
Doha 357 to 361 
श्रीरामचरितमानस भाग ८० 
दोहा ३५७ ते ३६१
श्रीरामचरितमानस बालकाण्ड 

दोहा—राम प्रतोषीं मातु सब कहि बिनीत बर बैन ।

सुमिरि संभु गुर बिप्र पद किए नीदबस नैन ॥ ३५७ ॥

श्रीरामचंद्रांनी विनयाने गोड बोलून सर्व मातांना आनंदित केले. नंतर शिव, गुरु आणि ब्राह्मण यांचे स्मरण करुन ते झोपले. ॥ ३५७ ॥

नीदउँ बदन सोह सुठि लोना । मनहुँ सॉंझ सरसीरुह सोना ॥

घर घर करहिं जागरन नारीं । देहिं परसपर मंगल गारीं ॥ 

झोपेमध्येही त्यांचा अत्यंत सुंदर चेहरा असा शोभून दिसत होता की, जसे संध्याकाळच्या वेळेस लाल कमळ शोभून दिसते. घरोघरी स्त्रिया जागून परस्पर मंगलमय थट्टामस्करी करीत होत्या. ॥ १ ॥

पुरी बिराजति राजति रजनी । रानीं कहहिं बिलोकहु सजनी ॥

सुंदर बधुन्ह सासु लै सोईं । फनिकन्ह जनु सिरमनि उर गोईं ॥

राण्या म्हणत होत्या की, ‘ हे साजणी, बघ, आज रात्रीची शोभा कशी आहे. तिच्यामुळे अयोध्यापुरी विशेष शोभून दिसत आहे. ‘ असे म्हणत सासवा सुंदर सुनांना बरोबर घेऊन झोपल्या. जणू सर्पांनी आपल्या फणांवरील मणी हृदयात लपविले होते. ॥ २ ॥

प्रात पुनीत काल प्रभु जागे । अरुनचूड़ बर बोलन लागे ॥

बंदि मागधन्हि गुनगन गाए । पुरजन द्वार जोहारन आए ॥

प्रातःकालच्या पवित्र ब्राह्ममुहूर्तावर प्रभू राम जागे झाले. कोंबडे आरवू लागले. भाट व मागध गुण-गान गाऊ लागले आणि नगरातील लोक मुजरा करण्यासाठी राजद्वारावर आले. ॥ ३ ॥

बंदि बिप्र सुर गुर पितु माता । पाइ असीस मुदित सब भ्राता ॥

जननिन्ह सादर बदन निहारे । भूपति संग द्वार पगु धारे ॥

ब्राह्मण, देव,गुरु, पिता आणि माता यांना वंदन करुन आणि आशीर्वाद घेऊन सर्व भाऊ प्रसन्न झाले. मातांनी मोठ्या आदराने त्यांची मुखे न्याहाळली. नंतर ते राजा दशरथांच्या बरोबर द्वारावर आले. ॥ ४ ॥

दोहा—कीन्हि सौच सब सहज सुचि सरित पुनीत नहाइ ।

प्रातक्रिया करि तात पहिं आए चारिउ भाइ ॥ ३५८ ॥

स्वभावतःच पवित्र असलेल्या चारी भावांनी प्रातर्विधीनंतर पवित्र शरयू नदीत स्नान केले आणि संध्या-वंदनादी कर्मे करुन ते वडिलांजवळ आले. ॥ ३५८ ॥

नवाह्नपारायण, तिसरा विश्राम

भूप बिलोकि लिए उर लाई । बैठे हरषि रजायसु पाई ॥

देखि रामु सब सभा जुड़ानी । लोचन लाभ अवधि अनुमानी ॥

राजांनी त्यांना पाहताच हृदयाशी धरले. त्यानंतर ते आज्ञा होताच आनंदाने आसनावर बसले. श्रीरामचंद्रांचे दर्शन करणे म्हणजे नेत्रांच्या लाभाची परिसीमा आहे, असे मानून सर्व सभा त्रिविध तापांपासून मुक्त झाली. ॥ १ ॥

पुनि बसिष्टु मुनि कौसिकु आए । सुभग आसनन्हि मुनि बैठाए ॥

सुतन्ह समेत पूजि पद लागे । निरखि रामु दोउ गुर अनुरागे ॥

नंतर मुनि वसिष्ठ व विश्र्वामित्र आले. राजांनी त्यांना सुंदर आसनांवर विराजमान केले आणि पुत्रांसमवेत त्यांची पूजा करुन त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. दोन्ही गुरु श्रीरामांना पाहून प्रेम-मुग्ध झाले. ॥ २ ॥

कहहिं बसिष्टु धरम इतिहासा । सुनहिं महीसु सहित रनिवासा ॥

मुनि मन अगम गाधिसुत करनी । मुदित बसिष्ट बिपुल बिधि बरनी ॥

वसिष्ठ मुनी धर्माचा इतिहास सांगत होते आणि राणीवशासह राजा तो ऐकत होते. मुनींच्या मनालाही जे अगम्य आहे, ते विश्र्वामित्रांचे कर्तृत्व वसिष्ठांनी आनंदित होऊन अनेक प्रकारे सांगितले. ॥ ३ ॥

बोले बामदेउ सब सॉंची । कीरति कलित लोक तिहुँ माची ॥

सुनि आनंदु भयउ सब काहू । राम लखन उर अधिक उछाहू ॥

वामदेव म्हणाले, ‘ हे सर्व सत्य आहे. विश्र्वामित्रांची उज्ज्वल कीर्ती त्रैलोक्यात पसरलेली आहे.’ हे ऐकून सर्वजणांना आनंद वाटला. श्रीराम व लक्ष्मण यांच्या मनाला तर विशेष आनंद झाला. ॥ ४ ॥

दोहा—मंगल मोद उछाह नित जाहिं दिवस एहि भॉंति ।

उमगी अवध अनंद भरि अधिक अधिक अधिकाति ॥ ३५९ ॥

नित्यच मंगल व आनंद यांनी संपन्न उत्सव होत होते. अशा प्रकारे दिवस आनंदात जात होते. अयोध्या आनंदाने परिपूर्ण होऊन ओसंडत होती. आनंद दिवसें दिवस अधिकच वाढत होता. ॥ ३५९ ॥

सुदिन सोधि कल कंकन छोरे । मंगल मोद बिनोद न थोरे ॥

नित नव सुखु सुर देखि सिहाहीं । अवध जन्म जाचहिं बिधि पाहीं ॥

शुभ मुहूर्तावर लग्नाची कंकणे सोडली. मांगल्य, आनंद व विनोद खूप चालला होता. अशा प्रकारे नित्य नवीन सुख पाहून देवांनाही हेवा वाटत होता आणि ते अयोध्येमध्ये जन्म मिळवा म्हणून ब्रह्मदेवांची विनवणी करीत होते. ॥ १ ॥

बिस्वामित्रु चलन नित चहहीं । राम सप्रेम बिनय बस रहहीं ॥

दिन दिन सयगुन भूपति भाऊ । देखि सराह महामुनिराऊ ॥

विश्र्वामित्र मुनी रोजच आपल्या आश्रमाला परतू इच्छित होते, परंतु श्रीरामचंद्रांच्या प्रेमामुळे व विनयामुळे राहात होते. दिवसेंदिवस राजा दशरथांचा प्रेमभाव शतपट वाढत चललेला पाहून महामुनिराज विश्र्वामित्र त्यांची वाखाणणी करीत असत. ॥ २ ॥

मागत बिदा राउ अनुरागे । सुतन्ह समेव ठाढ़ भे आगे ॥

नाथ सकल संपदा तुम्हारी । मैं सेवकु समेत सुत नारी ॥

शेवटी विश्र्वामित्रांनी जेव्हा निरोप मागितला, तेव्हा राजा प्रेममग्न झाले आणि पुत्रांसमवेत त्यांच्यासमोर उभे राहून म्हणाले,' हे नाथ, ही सर्व संपदा तुमची आहे. मी तर स्त्री-पुत्रांसह तुमचा सेवक आहे. ॥ ३ ॥

करब सदा लरिकन्ह पर छोहू । दरसनु देत रहब मुनि मोहू ॥

अस कहि राउ सहित सुत रानी । परेउ चरन मुख आव न बानी ॥

हे मुनी, मुलांवर नेहमी प्रेम ठेवा आणि मलाही दर्शनाचा लाभ देत राहा.’ असे म्हणून पुत्र व राण्या यांच्यासह राजा दशरथांनी विश्र्वामित्रांच्या चरणी लोटांगण घातले. भाव-विव्हळ झाल्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. ॥ ४ ॥

दीन्हि असीस बिप्र बहु भॉंती । चले न प्रीति रीति कहि जाती ॥

रामु सप्रेम संग सब भाई । आयसु पाइ फिरे पहुँचाई ॥

विश्र्वामित्र ऋषींनी अनेक आशीर्वाद दिले आणि ते निघाले. प्रीतीची रीत सांगत येत नाही. श्रीराम सर्व भावांना घेऊन प्रेमाने मुनींना पोहोचवून व त्यांची आज्ञा घेऊन परत आले. ॥ ५ ॥

दोहा—राम रुपु भूपति भगति ब्याहु उछाहु अनंदु ।

जात सराहत मनहिं मन मुदित गाधिकुलचंदु ॥ ३६० ॥

गाधिकुलातील चंद्रमा विश्र्वामित्र मोठ्या आनंदाने श्रीरामचंद्रांचे रुप-लावण्य, राजा दशरथांची भक्ती, चारी भावांच विवाह आणि सर्वांचा आनंद-उत्साह यांची मनातल्या मनात वाखाणणी करीत जात होते. ॥ ३६० ॥

बामदेव रघुकुल गुर ग्यानी । बहुरि गाधिसुत कथा बखानी ॥

सुनि मुनि सुजसु मनहिं मन राऊ । बरनत आपन पुन्य प्रभाऊ ॥

वामदेव आणि रघुकुलाचे गुरु ज्ञानी वसिष्ठ हे पुन्हा एकदा विश्र्वामित्रांची कथा वर्णन करुन सांगू लागले. मुनींचे सुयश ऐकून त्यांची कृपा लाभल्यामुळे राजांना मनोमन आपल्या पुण्याईचा प्रभाव जाणवला. ॥ १ ॥

बहुरे लोग रजायसु भयऊ । सुतन्ह समेत नृपति गृहँ गयऊ ॥

जहँ तहँ राम ब्याहु सबु गावा । सुजसु पुनीत लोक तिहुँ छावा ॥

आज्ञा झाल्यावर सर्व लोक परतले. राजा दशरथसुद्धा पुत्रांसह राजमहालात परतले. जिकडे तिकडे सर्वजण श्रीरामचंद्रांच्या विवाहाची गाथा गात होते. श्रीरामचंद्रांची पवित्र सुकीर्ती त्रैलोक्यात पसरली. ॥ २ ॥

आए ब्याहि रामु घर जब तें । बसइ अनंद अवध सब तब तें ॥

प्रभु बिबाहँ जस भयउ उछाहू । सकहिं न बरनि गिरा अहिनाहू ॥

श्रीरामचंद्र विवाह करुन घरी आल्यापासून सर्व प्रकारचा आनंद अयोध्येमध्ये येऊन वसत होता. प्रभू रामांच्या विवाहामध्ये जसा आनंद व उत्साह उसळला होता, त्याचे सरस्वती व सर्पराज शेष हे सुद्धा वर्णन करु शकणार नाहीत. ॥ ३ ॥

कबिकुल जीवनु पावन जानी । राम सीय जसु मंगल खानी ॥

तेहि ते मैं कछु कहा बखानी । करन पुनीत हेतु निज बानी ॥

श्रीरामांची कीर्ती ही कविकुळाचे जीवन पवित्र करणारी व मांगल्याची खाण समजून मी आपली वाणी पवित्र करण्यासाठी थोडीशी वर्णन करुन सांगितली आहे. ॥ ४ ॥

छं०—निज गिरा पावनि करन कारन राम जसु तुलसीं कह्यो ।

रघुबीर चरित अपार बारिधि पारु कबि कौनें लह्यो ॥

उपबीत ब्याह उछाह मंगल सुनि जे सादर गावहीं ।

बैदेहि राम प्रसाद ते जन सर्बदा सुखु पावहीं ॥

स्वतःची वाणी पवित्र करण्यासाठी तुलसीने श्रीरामांची कीर्ती वर्णन केली आहे. तसे पाहिले तर श्रीरघुनाथांचे चरित्र हा अपार समुद्र आहे. कोणता कवि तो पार करु शकेल ? जे लोक श्रीरामांच्या मुंज व विवाह या मंगलमय उत्सवांचे वर्णन आदराने ऐकून गात राहतील, ते श्रीसीतारामांच्या कृपेने सदा सुख प्राप्त करतील.

सो०—सिय रघुबीर बिबाहु जे सप्रेम गावहिं सुनहिं ।

तिन्ह कहुँ सदा उछाहु मंगलायतन राम जसु ॥ ३६१ ॥

श्रीसीता व श्रीरामचंद्र यांचा विवाह-प्रसंग जे लोक प्रेमाने

 गातील, ऐकतील, त्यांच्याकरिता सदा उत्साह-आनंदच

 आहे, कारण श्रीरामचंद्रांची कीर्ती ही मांगल्याचे धाम

 आहे. ॥ ३६१ ॥

मासपारायण, बारावा विश्राम

इति श्रीमद्रामचरितमानसे सकलकलिकलुषविध्वंसने प्रथमः सोपानः समाप्तः ।

कलियुगांतील संपूर्ण पापांचा विध्वंस करणार्‍या श्रीरामचरितमानसाचा हा प्रथम सोपान समाप्त झाला.

बालकाण्ड समाप्त 

                                 


Custom Search

No comments: