Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 11
ते वेळीं
कुंडलिनी हे भाष जाये । मारुत ऐसें नाम होये ।
परि शक्तिपण
तें आहे । जंव न मिळे शिवीं ॥ ३०१ ॥
३०१)
त्या वेळीं कुंडलिनी ही भाषा जाते व तिला मारुत असें नांव येतें. पण जोपर्यंत ती
शिवाशीं एक होत नाहीं, तोपर्यंत तिचें शक्तिपण असतेंच.
मग जालंधर
सांडी । ककारांत फोडी ।
गगनाचिये
पाहाडीं । पैठी होय ॥ ३०२ ॥
३०२) मग
ती प्राणवायुरुप शक्ति जालंधर बंधाचें उल्लंघन करुन टाळ्यावरती नऊ इंद्रियांचें
ऐक्य होण्याचें काकीमुख म्हणून स्थान आहे, त्याचा भेद करुन, मग मूर्ध्न्याकाशरुपी
पहाडावर जाऊन राहाते.
ते
ॐकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी ।
पश्यंतीचिये
पाउटी । मागां घाली ॥ ३०३
॥
३०३) ती
ॐकाराच्या पाठीवर तत्काळ पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी मागें टाकते.
पुढां
तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाचां अंतरीं ।
भरती गमे
सागरीं । सरिता जैशी ॥ ३०४ ॥
३०४)
पुढें समुद्रांत जशा नद्या मिळालेल्या दिसतात, त्याप्रमाणें अर्धमात्रापर्यंतच्या
ॐकाराच्या मात्रा मूर्ध्निआकाशांत मिळतात.
मग
ब्रह्मरंध्रीं स्थिरावोनी । सोऽहंभावाचिया बाह्या पसरुनीं ।
परमात्मलिंगा
धांवोनी । आंगा घडे ॥ ३०५ ॥
३०५) मग
ब्रह्मरंध्राच्या ठिकाणीं स्थिर होऊन, ‘ तें ब्रह्म मी ’ या भावनारुप बाहु पसरुन
त्वरेनें परब्रह्मरु लिंगाशीं ऐक्य पावते.
तंव
महाभूतांची जवनिक फिटे । मग दोहींसि होय झटें ।
तेथ गगनासकट
आटे । समरसीं तिये ॥ ३०६ ॥
३०६)
तेव्हां पंचमहाभूतांचा पडदा नाहींसा होऊन मग शक्ति आणि परमात्मा यांचें ऐक्य
होतें; त्या ऐक्यांत मूर्ध्निआकाशासकट सगळ्यांचा लय होतो.
पैं
मेघाचेनि मुखीं निवडला । समुद्र कां वोघीं पडिला ।
तो मागुता
जैसा आला । आपणपेयां ॥ ३०७ ॥
३०७)
मेघांच्या द्वारानें समुद्रापासून वेगळें झालेलें समुद्राचें पाणी, नदीच्या ओघांत पडून
नदीच्या रुपानें जसें पुनः समुद्रास मिळतें, ( तो समुद्रच नदी रुपानें आपण आपणास
मिळतो. )
तेवीं
पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे ।
तें एकत्व
होय तैसें । पंडुकुमरा ॥ ३०८ ॥
३०८) हे
अर्जुना, त्याप्रमाणें शरीराच्या द्वारें जेव्हां शक्तिरुप टाकून शिवच शिवांत
मिळतो, तेव्हां तें एकत्व वरील समुद्राच्या ऐक्याप्रमाणें आहे.
आतां दुजें
हन होतें । कीं एकचि हें आइतें ।
ऐशिये
विवंचनेपुरतें । उरेचिना ॥ ३०९ ॥
३०९)
आतां द्वैत होतें कीं हें स्वरुप स्वतःसिद्ध एकच होतें, असा विचार करण्यापुरतीहि
जागा उतरतच नाहीं.
गगनीं गगन
लया जाये । ऐसें जें कांहीं आहे ।
तें अनुभवें
जो होये । तो होऊनि ठाके ॥ ३१० ॥
३१०)
चिदाकाशांत मूर्ध्निआकाश लयास जातें, अशी जी कांहीं स्थिति आहे, ती अनुभवानें जो
होईल, त्यालाच ती प्राप्त होईल.
म्हणोनि
तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु ।
जेणें
संवादाचिया गांवआंतु । पैठी कीजे ॥ ३११ ॥
३११)
म्हणून त्या स्थितीचें वर्णन शब्दांनीं सांगताच येत नाहीं आणि शब्दांनी सांगता
येईल तेव्हांच ती गोष्ट संवादाच्या गांवांत स्थापित करतां येईल.( अर्थात
शब्दांनींच सांगतां येत नाहीं तर तिजविषयीं संवादहि होणें शक्य नाही. )
अर्जुना एर्हवीं
तरी । इया अभिप्रायाचा जे गर्वु धरी ।
ते पाहें
पां वैखरी । दुरी ठेली ॥ ३१२ ॥
३१२)
अर्जुना, सहज विचार करुन पाहिलें तर हा अभिप्राय सांगण्याचा गर्व जी वैखरी धरते,
ती वाचा या ब्रह्मस्थितीपासून फार दूर राहिली.
भ्रूलता
मागिलीकडे । मकाराचेंचि आंग न मांडे ।
सडेया
प्राणा सांकडें । गगना येतां ॥ ३१३ ॥
३१३)
भुवईच्या मागल्या बाजूस ( आज्ञाचक्रांत ) मकाराचें स्वरुप राहात नाहीं; इतकेंच
नव्हे, तर एकट्या प्राणवायूला गगनास येण्याला संकट पडतें,
पाठीं
तेथेंचि तो भासळला । तव शब्दांचा दिवो मावळला ।
मग तयाहि
वरी आटु भविन्नला । आकाशाचा ॥ ३१४ ॥
३१४)
नंतर तो प्राणवायु तेथेंच ( मूर्ध्निआकाशांत ) मिळाल तेव्हां शब्दाचा दिवस मावळला.
मग त्यानंतर आकाशाचाहि लय झाला.
आतां
महाशून्याचां डोहीं । जेथ गगनासीचि ठावो नाहीं ।
तेथ तागा
लागेल काई । बोलाचा या ॥ ३१५ ॥
३१५)
आतां परब्रह्मरुपी डोहांत जेथें आकाशाचाच थांग लागत नाहीं, तेथें या शब्दरुपी (
नाव ढकलण्याच्या ) वेळूचा लाग लागेल काय ?
म्हणूनि
आखरामाजि सांपडे । कीं कानावरी जोडे ।
हें तैसें
नव्हे फुडें । त्रिशुद्धी गा ॥ ३१६ ॥
३१६) या
कारणास्तव ती ब्रह्मस्थिति अक्षरांत सापडेल ( शब्दांनीं सांगता येईल ) अथवा
कानांनीं ऐकतां येईल, अशी खरोखर नाहीं, हें त्रिवार सत्य आहे.
जैं कहीं
दैवें । अनुभविलें फावे ।
तैं आपणचि
हें ठाकावें । होऊनियां ॥ ३१७ ॥
३१७)
जेव्हां कधीं तरी दैवयोगानें तें अनुभवाला प्राप्त होईल, तेव्हां तें आपण होऊन
राहावें, असें तें आहे.
पुढती
जाणणें तें नाहींचि । म्हणोनि असो किती हेंचि ।
बोलावें
आतां वायांचि । धनुर्धरा ॥ ३१८ ॥
३१८) अर्जुना,
तद्रुप झालें म्हणजे त्यापुढें आतां जाणणें कांहीं उरलें नाहीं, म्हणून आतां हें
राहूं दे, हेंच व्यर्थ किती बोलावें ?
ऐसें
शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे ।
वाराही जेथ
न शिरे । विचाराचा ॥ ३१९ ॥
३१९)
याप्रमाणें शब्दमात्र जेथून माघारी परततो, जेथें संकल्प नाहींसा होतो व विचाराचा
वाराहि जेथें प्रवेश करुं शकत नाहीं;
जें
उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य ।
अनादि जें
अगण्य । परमतत्त्व ॥ ३२० ॥
३२०)
जें परमात्म तत्त्व मनरहित अवस्थेचें सौंदर्य आहे व चौथ्या ज्ञानरुप अवस्थेचें
तारुण्य आहे आणि जें नित्यसिद्ध व अमर्याद आहे;
जें आकाराचा
प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु ।
जेथ आदि आणि
अंलतु । विरोनी गेले ॥ ३२१ ॥
३२१) जें
आकाराचा शेवट आहे, जें मोक्षाचें निश्चयाचें ठिकाण आहे, ज्या ठिकाणीं आरंभ आणि
शेवट हीं नाहींशीं झाली आहेत;
जें
विश्र्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ ।
जें
आनंदाचें केवळ । चैतन्य गा ॥ ३२२ ॥
३२२)
जें त्रैलोक्याचें कारण आहे, जे अष्टांगयोगरुप वृक्षाचें फळ आहे व जें आनंदाची
केवळ जीवनकला आहे,
जें
महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज ।
एवं पार्था
जें निज । स्वरुप माझें ॥ ३२३ ॥
३२३) जे
पंचमहाभूतांचें बीज आहे, जें सूर्याचें तेज आहे; त्याप्रमाणें अर्जुना, जें माझे
खास स्वरुप आहे.
ते हे
चतुर्भुज कोंमेली । जयाची शोभा रुपा आली ।
देखोनि
नास्तिकीं नोकिलीं । भक्तवृदें ॥ ३२४ ॥
३२४)
नासतिकांनी भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्याची ( निर्गुण स्वरुपाची ) शोभा
व्यक्ततेला आली, तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ति होय.
ते
अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले ते पुरुष ।
जयांचे कां
निष्कर्ष । प्राप्तिवेरीं ॥ ३२५ ॥
३२५)
ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात ते पुरुष असें हें शब्दांतील
उत्कृष्ट सुख आपणच बनतात.
आम्हीं साधन
हें जें सांगितलें । तेंचि शरीर जिहीं केलें ।
ते आमुचेनि
पाडें आले । निर्वाळलेया ॥ ३२६ ॥
३२६)
आम्हीं जें हें अष्टांगयोगरुपी साधन सांगितलें, त्या साधनाची मूर्तीच आपलें शरीर
ज्यंनी केले, ते योगाभ्यासानें शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले.
परब्रह्माचेनि
रसें । देहाकृतीचीये मुसे ।
वोतींव
जाहले तैसें । दिसती आंगें ॥ ३२७ ॥
३२७)
देहकृतीच्या मूशींत परब्रह्मरुप ओतून तयार केलेली ( जणू काय ) मूर्तीच तें
शरीरानें दिसतात.
जरि हे
प्रतीति हन अंतरीं फांके । तरी विश्र्वचि हें अवघें झांके ।
तंव अर्जुन
म्हणे निकें । साचचि जी हें ॥ ३२८ ॥
३२८) जर
हा अनुभव अंतःकरणांत प्रकाशला तर हें सर्व जग मावळेल. तेव्हां अर्जुन म्हणाला, ठीक
हें खरें आहे महाराज.
कां जे आपण
आतां देवो । हा बोलिले जो उपावो ।
तो
प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥ ३२९ ॥
३२९)
कारण कीं, आतां देवा, आपण जो हा उपाय सांगितला, तो ब्रह्मप्राप्तीचें ठिकाण आहे;
म्हणून त्या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते,
इये
अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसोनि ब्रह्मत्वा येती ।
हें
सांगतियाचि रीती । कळळें मज ॥ ३३० ॥
No comments:
Post a Comment