Wednesday, May 27, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part 4 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ४


Dnyaneshwari Adhyay 2 Part 4 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ४ 

ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या ७६ ते १००    
तयापरी तो धनुर्धरु । जाहलासे दुःखें जर्जरु ।
जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥ ७६ ॥
७६) ज्याप्रमाणें उन्हाळ्यांत एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापला, त्याप्रमाणें अर्जुन दुःखानें जर्जर झाला होता.
म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु ।
तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥ ७७ ॥
७७) म्हणून जात्याच अत्यंत सांवळा व कृपामृतरुप जीवनानें युक्त, असा तो गोपाळरुपी महामेघ ( अर्जुनाकडे ) वळला.
तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युलता झळकती ।
गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ ७८ ॥
७८) ( श्रीकृष्णरुपी मेघाच्या ठिकाणीं ) सुदर्शनाचें तेज हीच जणूं काय चमकणारी वीज होय आणि गंभीर बोल हाच गडगडाचा थाट होय.
आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल ।
मग नवी विरुढी फुटेल ॥ उन्मेषाची ॥ ७९ ॥
७९) आतां तो उदार ( श्रीकृष्णमेघ ) कसा वर्षाव करील व त्यामुळे अर्जुनरुपी पर्वत कसा शांत होईल, आणि मग ज्ञानरुपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल, 
ते कथा आइका । मनाचिया आराणुका ।
ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥ ८० ॥
८०) हें पाहा. ती कथा समाधानवृत्तीनें ऐका, असें निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.
ऐसें संजयो सांगतु । म्हणे राया तो पार्थु ।
पुनरपि शोकाकुलितु । काय बोले ॥ ८१ ॥
८१) याप्रमाणें संजयानें ( धृतराष्ट्राला ) सांगितले. तो ( मग ) म्हणाला, राजा, अर्जुन पुन्हां शोकाकुल होऊन काय म्हणाला.
आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । 
मी सर्वथा न झुंजें येथें । भरवंसोनि ॥ ८२ ॥
८२) तें ऐक. तो खिन्न होऊन श्रीकृष्णांना म्हणाला, आतां तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करुं नका. मी कांहीं झालें तरी ह्या वेळीं निश्चित लढणार नाही.  
ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन करुनि ठेला ।
तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥ ८३ ॥
८३) असें एकच वेळीं बोलला. मग स्तब्ध होऊन राहिला. त्या प्रसंगी त्याला ( तसा ) पाहून श्रीकृष्णांना विस्मय वाटला. 
मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें ।
अर्जुन सर्वथा कांहीं नेणे । काय कीजे ॥ ८४ ॥
८४) मग ( श्रीकृष्ण ) आपल्या मनांत म्हणाला, या प्रसंगीं, यानें हें काय आरंभिले आहे ! या अर्जुनाला मुळींच कांहीं कळत नाहीं, काय करावें !
हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरु स्वीकारी ।
जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ॥ ८५ ॥
८५) हा आतां कशानें उमजेल ? कशानें धीर धरील ? ज्याप्रमाणें एखादा मांत्रिक पिशाच्चाला ( तें कोणतें आहे व तें कसें दूर करतां येईल याचा ) विचार करतो;
ना तरी असाध्य देखोनी व्याधी । अमृतासम दिव्य औषधी ।
वैद्य सूची निरवधि । निंदानींची ॥ ८६ ॥
८६) किंवा रोग असाध्य पाहून, ज्याप्रमाणें वैद्य निर्वाणीच्या अमृततुल्य, दिव्य औषधाची ताबडतोप योजना करतो;
तैसे विवरतु असे श्रीअनंतु । तया दोहीं सैन्याआंतु ।
जयापरी पार्थु । भ्रांति सांडी ॥ ८७ ॥
८७) त्याप्रमाणें अर्जुन कोणत्या उपायानें मोह टाकील, याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागीं श्रीकृष्ण विचार करीत होते.
तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें ।
जैसे मातेचां कोपीं थोकलें । स्नेह आधी ॥ ८८ ॥
८८) तो ( श्रीकृष्णांनीं ) हेतु मनात धरला; मग ( ते ) रागानें बोलावयास लागले, ज्याप्रमाणें आईच्या रागांत गुप्त माया असते,
कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी ।
ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥ ८९ ॥
८९) किंवा, औषधाच्या कडूपणांत ज्याप्रमाणें अमृताची जोड असते; ती वर दिसत नाहीं मग गुणाच्या रुपाने पुढें स्पष्ट होते,
तैसीं वरिवरि पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें ।
तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥ ९० ॥
९०) त्याप्रमाणें वरवर पाहतां उदास ( कठोर ), पण आंत अति सुरस ( परिणामीं अत्यंत हितकर ) असें उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलूं लागले.
मग अर्जुनातें म्हणितलें । आम्हीं आजि हें नवल देखिलें ।
जें तुवां येथ आदरिलें । माझारींचि ॥ ९१ ॥
९१) मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हें जें तूं मध्येंच आरंभिलें आहेस, तें आम्हीं आज एक आश्र्चर्यच पाहिलें.
तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी ।
आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥ ९२ ॥
९२) तूं आपल्याला जाणता तर म्हणवितोस, पण मूर्खपणा टाकीत नाहींस. बरें, तुला कांहीं शिकवावें म्हटलें तर तूं नीतीच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतोस !
जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें ।
तुझें शहाणपण तैसें । दिसतसे ॥ ९३ ॥
९३) जन्मांधाला वेड लागलें म्हणजे तें जसे सैरावैरा धांवतें, तसें तुझें शहाणपण दिसतें.
तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांतें शोचूं पहासी ।
हा बहु विस्मय आम्हांसीं । पुढतपुढती ॥ ९४ ॥
९४) तूं स्वतःला तर जाणत नाहींस, परंतु या कौरवांकरितां शोक करुं पाहतोस, याचा आम्हांला वारंवार फारच विस्मय वाटतो.
तरी सांग पां मज अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना ।
हे अनादि विश्र्वरचना । तें लटकें कायी ॥ ९५ ॥
९५) तर अर्जुना, मला सांग बाबा, तुझ्यामुळें या त्रिभुवनाचें अस्तित्व आहे काय ? ही विश्वाची रचना अनादि ( आहे असें म्हणतात ) तें खोटें आहे काय ?
एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती ।
तरी हें वांयाचि काय बोलती । जगामाजीं ॥ ९६ ॥
९६) तर येथें सर्वशक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून प्राणी उत्पन्न होतात, असें जें जगांत बोलतात तें उगीचच काय ?
हो कां सांप्रत ऐसें जहालें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिले ।
आणि नाशु पावे नाशिले । तुझेनि कायी ॥ ९७ ॥
९७) आतां असें झालें कां कीं, हे जन्ममृत्यु तूं उत्पन्न केलेस ? आणि तूं मारशील तर हें मरतील होय ?
तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसि घातु न करिसी चित्तीं ।
तरी सांगे कायि हे होती । चिरंतन ॥ ९८ ॥
९८) तूं भ्रमानें अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनांत आणिलें नाहींस, तर सांग, हे काय चिरंजीव होणार आहेत ?  
कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता ।
ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ॥ ९९ ॥
९९) किंवा, तूं एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांति ( कदाचित ) तुझ्या चित्ताला होईल, तर ती होऊं देऊं नकोस.
अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें ।
तरी तुवां कां शोचावें । सांगे मज ॥ १०० ॥
 १००) हे सगळें ( सृष्टि ) आपोआप होतें व जातें, असा हा क्रम अनादि कालापासून असाच अव्याहत चालू आहे. तर मग तूं शोक कां करावास ? सांग मला.


Custom Search

Saturday, May 23, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part 3 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ३


Dnyaneshwari Adhyay 2 Part 3 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ३
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या ५१  ते ७५
हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला ।
म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ॥ ५१ ॥
५१) हें जाणून अर्जुन कचरला, मग पुन्हां बोलूं लागला, तो म्हणाला, देव या ( माझ्या ) बोलण्याकडे कां बरें लक्ष देत नाहींत ?
येर्‍हवीं माझां चित्तीं जें होतें । तें मी विचारुनि बोलिलों एथें ।
परि निकें काय यापरौतें । तें तुम्ही जाणा ॥ ५२ ॥
५२) बाकी माझ्या मनांत जें होतें, तें मी येथें स्पष्ट करुन बोललों; परंतु, याच्यापेक्षां चांगलें काय, तें तुम्हांलाच ठाऊक !
पैं विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलींचि प्राणु सांडिजे ।
ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥ ५३ ॥
५३) पण ज्यांच्याशीं वांकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्यावर आम्ही प्राण सोडावे, ते येथें युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत.
आतां ऐसेयांतें वधावें । कीं अव्हेरुनिया निघावें ।
या दोहोंमाजीं काइ करावें । तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥
५४) आतां अशांचा वध करावा किंवा याना सोडून येथून निघून जावें या दोहोंपैकीं काय करावें, तें आम्हांला समजत नाही.
आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ ।
जे मोहें येणें चित्त । व्याकूळ माझें ॥ ५५ ॥
५५) आम्हांला काय करणें उचित आहे, हें या वेळीं विचार करुन पाहिलें तरी सुचत नाहीं; कारण या मोहामुळे माझें चित्त व्याकूळ झालें आहे.
तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशे ।
मग पांसींच असतां न दिसे । वस्तुजात ॥ ५६ ॥
५६) डोळयांवर सारा आला म्हणजे दृष्टीचें तेज लोपतें. मग जवळ असलेली कोणतीहि वस्तु दिसत नाहींशीं होते.
देवा मज तैसें जाहलें । जें मन हें भ्रांती ग्रासिलें ।
आतां काय हित आपुलें । तेंही नेणें ॥ ५७ ॥
५७) देवा, तसे मला झालें आहे. कारण माझे मन भ्रांतीनें ग्रासलें आहे. आतां आपले हित कशांत आहे हेहिं मला समजत नाहीं.
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें ।
जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ॥ ५८ ॥
५८) तरीं कृष्णा, तूं ( यासंबंधाचा ) विचार करुन पाहा आणि कल्याणकारक तें आम्हांला सांग; कारण आमचा सखा, ( आमचें ) सर्व कांहीं तूंच आहेस.
तूं गुरु बंधु पिता । तूं आमची इष्ट देवता ।
तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुते  ॥ ५९ ॥
५९) तूं आमचा गुरु, बंधु, पिता, तूं आमची इष्ट देवता; संकटसमयीं नेहमी तूंच आमचे रक्षण करणारा आहेस.
जैसा शिष्यांते,गुरु । सर्वथा नेणे अव्हेरु ।
कीं सरितांतें सागरु । त्यजी केवीं ॥ ६० ॥
६०) शिष्याचा अव्हेर करण्याची गोष्ट गुरुच्या मनांतहि मुळीं ज्याप्रमाणें येत नाहीं, किंवा, समुद्र नद्यांचा त्याग कसा करील ?   
नातरी अपत्यातें माये । सांडुनि जरी जाये ।
तरी तें कैसेंनि जिये । ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥
६१) किंवा, कृष्णा ऐका मुलाला आई जर सोडून गेली तर तें कसें जगेल ?
तैसा सर्वांपरी आम्हांसि । देवा तूंचि एक आहासि ।
आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥ ६२ ॥
६२) त्याप्रमाणें देवा, सर्वतोंपरी तूंच एक आम्हांला आहेस आणि आतांपर्यंतचें माझें बोलणें जर तुला पटत नसेल; 
तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा ।
तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥ ६३ ॥
६३) तर जें आम्हांला उचित असून, धर्माला विरुद्ध नसेल, तें पुरुषोत्तमा चटकन आतां सांग पाहूं.
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपजलासे मनीं ।
तो तुझिया वाक्यावांचुनि । न जाय आणिकें ॥ ६४ ॥
६४) हें सर्व कुळ पाहून मनामध्यें जो शोक उत्पन्न झाला आहे, तो, तुझ्या उपदेशावांचून ( दुसर्‍या ) कशानेंहि जाणार नाहीं. 
एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल ।
परि मोह हा न फिटेल । मानसींचा ॥ ६५ ॥
६५) या वेळीं सबंध पृथ्वी जरी हातीं आली, किंबहुना, इंद्रपदहि जरी मिळालें, तरी माझ्या मनांतला मोह दूर होणार नाहीं.
जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जर्‍ही पेरिलीं ।
तरी न विरुढती सिंचलीं । आवडे तैसीं ॥ ६६ ॥
६६) ज्याप्रमाणें पूर्ण भाजलेलें बी उत्तम जमिनींत पेरलें व त्यास हवें तितके पाणी जरी घातलें, तरी, त्यास अंकुर फुटणार नाहीं;
ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें कांहीं नोहे ।
एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥ ६७ ॥
६७) किंवा आयुष्य संपलें असलें म्हणजे औषधानें कांहीं होत नाहीं; ( पण ) तेथें एका परमामृताचाच ( ज्याप्रमाणें ) उपयोग होतो; 
तैसें राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीवबुद्धि ।
एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥ ६८ ॥
६८) त्याच प्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धि ही उत्तेजन ( देऊं शकणार ) नाहीं, या वेळीं, कृपानिधे, तुझी कृपाच माझा आधार.
ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांती सांडिला ।
मग पुनरपि व्यापिला । उर्मीं तेणें ॥ ६९ ॥
६९) जेव्हां क्षणभर अर्जुनाची भ्रांति दूर झाली, तेव्हां अर्जुन असें बोलला. ( पण ) मग त्याला पुन्हां मोहाच्या लहरीनें व्यापलें.
कीं मज पाहतां उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे ।
तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥ ७० ॥
७०) ( ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात ) किंवा विचार केला असतां मला असें वाटतें कीं, ही मोहाची लहर नाहीं, तर दुसरेंच कांहीं असावें. ( तें दुसरें हें कीं ) महामोहरुपी काळसर्पानें त्याला ग्रासलें असावें.
सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचां भरीं ।
लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ॥ ७१ ॥
७१) मर्माचें स्थान जें हृदयकमळ, त्या ठिकाणीं करुणारुपी भर सांजवेळेला, ( ऐन दुपारीं ) त्या महामोहरुपी काळसर्पानें त्याला दंश केला, म्हणून या लहरी उतरतच नाहींत.
हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टिसवें विष फेडी ।
तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥ ७२ ॥
७२) त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपाकटाक्षानेंच विषाची बाधा दूर करतो, तो गारुडी श्रीहरि,अर्जुनाच्या हाकेला धावून आला.   
तैसिया पंडुकुमरा  व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा ।
तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥ ७३ ॥
७३) तशा त्या व्याकुळ झालेल्या अर्जुनाशेजारी श्रीकृष्ण गारुड्यासारखा शोभत होता; तो आपल्या कृपेच्या बळानें ( त्याचें ) आतां लीलेनें रक्षण करील. 
म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु ।
म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ ७४ ॥
७४) हा अभिप्राय लक्षांत घेऊनच त्या अर्जुनास मोहरुपी सर्प चावला आहे, असें मी म्हटलें.
मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु ।
जैसा घनपडळीं भानु । आच्छादिजे ॥ ७५ ॥
ज्याप्रमाणें मेघपटलानें सूर्य आच्छादला जावा, त्याप्रमाणें 
त्या प्रसंगीं अर्जुन भ्रांतीने घेरला होता, असें समजा.  


Custom Search

Dnyaneshwari Adhyay 2 Part 2 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग २


Dnyaneshwari Adhyay 2 Part 2 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग २

ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या २६ ते ५०
तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपजलें ।
हें नेणिजे परि कुडें केलें । अर्जुना तुवां ॥ २६ ॥
२६) मग आतांच काय झालें ? ही ममता कोठून उत्पन्न झाली, हें मलाच कांहीं कळत नाहीं; पण अर्जुना वाईट केलेंस तूं.
मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल ।
आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥
२७) अशी ममता धरल्यास असें होईल कीं, असलेला मोठेपणा जाईल आणि तूं इहलोकासह परलोकास अंतरशील.
हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण ।
हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २८ ॥
२८) ह्या वेळीं अंतःकरणाचा ढिलेपणा हा कांहीं चांगलें होण्याला कारण होणार नाही; लढाईंत ढिलेपणा ठेवल्यानें क्षत्रियांना अधोगति असते, हे लक्षांत ठेव.
ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवतु ।
हें ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥
२९) याप्रमाणें त्या कृपाळु श्रीकृष्णानें अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला ?
देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं ।
आधीं तूंचि चित्तीं विचारीं । संग्रामु हा ॥ ३० ॥
३०) देवा, ऐक. इतकें बोलण्याचें कांहीं कारण नाहीं. आधी तूंच चित्तात विचार कर. हे युद्ध आहे कां ?
हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु ।
हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हां ॥ ३१ ॥
३१) हें युद्ध नव्हे; मोठा अपराध आहे. हा करण्यांत दोष दिसत आहे. हें उघड उघड थोरांच्या उच्छेदाचें कृत्य आमच्यावर येऊन पडलें आहे.
देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोष पावविजती ।
तियें पाठीं केवीं वधिजती । आपुलां हातीं ॥ ३२ ॥
३२) पाहा, आईबापांची सेवा करावी, सर्व प्रकारें त्यांस संतोषवावें आणि पुढें आपल्याच हातांनीं त्यांचा वध कसा बरें करावा ?
देवा संतवृंदु नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे ।
हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ॥ ३३ ॥
३३) देवा, संतसमुदायाला वंदन करावें, अथवा घडलें तर त्यांचें पूजन करावें, ( पण ) हें टाकून आपणच वाचेनें त्यांची निंदा कशी करावी ? 
तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे ।
मज बहुत भीष्मद्रोणांचें । वर्ततसे ॥ ३४ ॥
३४) त्याप्रमाणें आमचें भाऊबंद व गुरु आम्हांला सदैव पूज्य आहेत. भीष्म व द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे !
जयालागीं मनें विरु । आम्ही स्वप्नींही न शकों धरुं ।
तया प्रत्यक्ष केवीं करुं । घातु देवा ॥ ३५ ॥
३५) ज्यांच्याविषयी मनानें वैर आम्हांला स्वप्नांतहि धरतां यावयाचें नाहीं, त्यांचा, देवा, आम्ही प्रत्यक्ष घात कसा बरें करावा ?
वर जळो हें जियालें । एथ आघवेयांसि हेंचि काय जाहलें ।
जे यांचां वधीं अभ्यासिलें । मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥
३६) यापेक्षा आग लागो या जगण्याला ! सगळ्यांनाच आज असें काय झालें आहे ? जो आम्ही ( शस्त्रविद्येचा ) अभ्यास केला त्याची प्रौढी यांचा वध करुन मिरवावयाची कां ?
मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला ।
तेणें उपकारें काय आभारैला । वधीं तयातें ॥ ३७ ॥
३७) मी पार्थ, द्रोणांनीं तयार केलेला ( त्यांचा चेला ) आहें. त्यांनींच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकारांनीं दडपलेला मी त्यांचा वध करावा काय ?
जेथींचिया कृपा लाभिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु ।
तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥
३८) अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेनें वराची प्राप्ती करुन घ्यावी, त्यांच्यावरच मनानें उलटावें, असा मी काय भस्मासूर आहे ?    
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे ।
परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥ ३९ ॥
३९) देवा, समुद्र गंभीर आहे, असें ऐकतों; तथापि तोहि तसा वरवरच आहे, असें दिसतें. परंतु या द्रोणाचार्यांच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच नाहीं.
हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान ।
परि अगाध भलें गहन । हृदय याचें ॥ ४० ॥
४०) हें आकाश अमर्याद आहे खरें, पण ( एखाद्यावेळीं ) त्याचेंहि मोजमाप होईल; पण त्यांचे हृदय अत्यंत गहन व खोल आहे ( त्याचा ठाव लागावयाचा नाहीं. ).
वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे ।
परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ॥ ४१ ॥
४१) एक वेळ अमृत विटेल किंवा कालवशात वज्र भंगेल; पण यांच्या मनांत विकार उत्पन्न करण्याचा कसाहि प्रयत्न जरी केला तरी, यांचे मन आपला ( अविकारी ) धर्म सोडणार नाही.
स्नेहालागी माये । म्हणिपे तें कीरु होये ।
पण कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥ ४२ ॥
४२) ममता आईनेंच करावी असें म्हणतात, तें खरें आहे; परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता ही मूर्तिमंत आहे.  
हा कारुण्याची आदि । सकळ गुणांचा निधि ।
विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥
४३) अर्जुन म्हणाला, हे दयेचें माहेरघर, सर्व गुणांचें भांडार, विद्येचा अमर्याद सागर आहे.  
हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागी कृपावंतु ।
आतां सांग पां येथ धातु । चिंतूं येईल ॥ ४४ ॥
४४) इतके हे मोठे आहेत; शिवाय आमच्यावर यांची कृपा आहे ! अशा स्थितींत यांच्या घाताची कल्पना तरी मनांत आणता येईल कां ? सांग.
ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें ।
तें मना नये आघवें । जीवितेंसी ॥ ४५ ॥
४५) अशांना युद्धांत मारावें आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा , ही गोष्ट अंतःकरणापासून मनांतसुद्धा येत नाही.
हें येणें मानें दुर्भर । जे याहीहुनि भोग सधर ।
ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥
४६) द्रोणाचार्यांसारख्यांना मारावें तेव्हां आपण राज्यसुख भोगावें, अशा प्रकारें राज्यसुख भोगणें हें दुर्घट आहे. आतां राज्यसुख भोगणेंच काय पण ह्याहूनहि अधिक श्रेष्ठ ( इंद्रपदादिक ) भोग मिळाले, तरी आम्हांला ते द्रोणाचार्यांसारख्यांची हत्या करुन नकोत, यापेक्षा भीक मागितलेली बरी.
ना तरी देशत्यागें जाइजे । का गिरिकंदर सेविजे ।
परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥ ४७ ॥
४७) अथवा देशत्याग करुन जावें, किंवा गिरिकंदरांचा आश्रय करावा; पण त्यांच्यावर आतां शस्र धरुं नये.
देवा नवनिशतीं शरीं । वावरोनि यांचां जिव्हारीं ।
भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८ ॥
४८) देवा, नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानांवर प्रहार करुन त्यांच्या रक्तांत बुडालेले जे भोग कवटावयाचे,
ते काढूनि काय कीजती । लिप्त केवीं सेविजती ।
मज न ये हे उपपत्ति । याचिलागीं ॥ ४९ ॥
४९) ते मिळवून तरी काय करायचे आहेत ? रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे सेवन तरी कसें करावें ? याचकरितां तुझा हा युक्तिवाद मला पसंत नाहीं.
ऐसें अर्जुन तिये अवसरीं । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं ।
परि तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ॥ ५० ॥

५०) त्या वेळीं ‘ कृष्णा ऐक ‘ असें अर्जुन म्हणाला. पण 

ते ऐकून कृष्णाच्या मनाला ते पटलें नाही.


Custom Search

Thursday, May 21, 2020

ShriDnyaneshwari Adhyay 2 Part 1 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १


श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १ 
ओव्या १ ते २५
ShriDnyaneshwari Adhyay 2 Part 1
Stanzas 1 to 25

मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें ।
शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥ १ ॥
१) मग संजय, राजा धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्या वेळीं रडूं लागला.
तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद]भुत ।
 तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥
२) तो सर्व आप्तसमुदाय पाहून ( त्याला ) विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्यायोगानें त्याचें चित्त द्रवलें. कसें म्हणाल तर,
जैसें लवण जळे झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले ।
तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३ ॥
३) ज्याप्रमाणें पाण्यानें मीठ विरघळतें किंवा वार्‍यानें मेघ हालतात, त्याप्रमाणें त्याचें हृदय खंबीर खरें, परंतु त्या वेळीं द्रवलें;
म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला ।
जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥
४) म्हणून मोहाधीन झालेला ( तो अर्जुन ) चिखलांत रुतलेल्या राजहंसाप्रमाणें अगदी कोमेजून गेलेला दिसला.
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु ।
देखौनी । श्रीशर्ङ्गधरु । काय बोले ॥ ५ ॥
५) पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणें महामोहानें जर्जर झालेला पाहून शार्ङ्गधर काय बोलला ( तें ऐका ).
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं ।
तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥
६) तो म्हणाला, अर्जुना, ह्या ठिकाणीं हें करणें योग्य आहे काय ? तूं कोण आहेस आणि हें काय करीत आहेस त्याचा अगोदर विचार कर. 
तुज सांगें काय जाहलें । कवण उणें आलें ।
कंरितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥
७) सांग, तुला झालें तरी काय ? काय कमी पडलें ? काय करायचें राहिलें ? हा खेद कशाकरितां ?
तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहींच न संडिसी ।
तुझेनि नामें अपयशीं । दिशा लंघिजे ॥ ८ ॥
८) ( एरव्हीं ) तूं अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाहींस; कधीहि धीर सोडीत नाहींस. तुझे नांव ऐकल्याबरोबर अपयशानें देशोधडी पळून जावें.
तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।
तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥
९) तूं शूरवृत्तीचें ( शौर्याचें ) ठिकाण आहेस; क्षत्रियांचा राजा आहेस; तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकांत आहे.
तुवां संग्रामीं हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला ।
पवाडा तुवां केला । गंधर्वासी ॥ १० ॥
१०) तूं युद्धांत शंकरांना जिंकलेंस; निवातकवचांचा ठावठिकाणा नाहींसा केलास; तूं गंधर्वांवरहि पराक्रम गाजविलास;
हें पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें ।
ऐसें पौरुष चोखडें । पार्था तुझें ॥ ११ ॥
११) तुझ्या मानानें पाहिलें असतां, हें त्रैलोक्यही लहानच वाटतें. पार्था, तुझा पराक्रम असा चांगला आहे. 
तो तूं कीं आजि एथें । सांडुनिया वीरवृत्तीतें ।
अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥ १२ ॥
१२) पण, तोच तूं या वेळीं आपली वीरवृत्ति टाकून, खालीं मान घालून रडत आहेस !
विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें कीजसी दीनु ।
सांग पा अंधकारें  भानु । ग्रासिला आथी ॥ १३ ॥
१३) विचार कर. तूं अर्जुन, आणि करुणेनें तुला दीन करुन सोडावें ! सांग बरें, अंधकार सूर्याला कधी ग्रासील काय ?
ना तरी पवनु मेधासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे ।
पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ॥ १४ ॥
१४) अथवा वारा मेधाला कधीं भ्याला आहे कां ? किंवा अमृताला मरण आहे कां  ? अरे, विचार कर. लाकूड अग्नीला गिळून टाकील कां ?
कीं लवणेंचि जळ विरे । संसर्गें कालकूट मरे ।
सांग महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ॥ १५ ॥
 १५) किंवा मिठानें पाणी विरेल कां ? दुसर्‍याच्या संसर्गाने कालकूट मरेल काय ? सांग बरें, बेडूक महासर्पाला गिळील कां ?
सिंहासी झोंबि कोल्हा । ऐसा अपाडु आथि कां जाहला ।
परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥
१६) कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करील काय ? असें अघटित कधीं घडलें आहे काय ? पण तो अघटित प्रकार तूं ( मात्र ) आज येथें खरा करुन दाखविलास.
म्हणोनि अझूनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना ।
वेगीं धीर करुनियां मना । सावधान होई ॥ १७ ॥
१७) म्हणून, अर्जुना, अजून तरी या अनुचित गोष्टींकडे तूं लक्ष देऊं नकोस; तूं लवकर आपल्या मनाला खंबीर करुन सावध हो.
सांडीं हें मूर्खपण । उठी घे धनुष्यबाण ।
संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ॥ १८ ॥
१८) हा मूर्खपणा सोडून दे. ऊठ, धनुष्यबाण हातीं घे. युद्धाच्या वेळीं ही कोण करुणा तुझी ?  
हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां ।
सांगें झुंजावेळें सदयता । उचित कायी ॥ १९ ॥
१९) अरे, तूं जर चांगला जाणता आहेस; तर मग आतां विचार करुन कां पाहात नाहींस ? युद्धाच्या वेळीं कारुण्य उचित आहे काय ? बोल.
हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु ।
म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥
२०) जगन्निवास ( पुढें ) अर्जुनाला म्हणाला, ( या वेळची तुझी दया ) ही ( तुझ्या ) असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकविणारी आहे.
म्हणोनि शोक न करीं । तूं पुरता धीरु धरीं ।
हे शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥ २१ ॥
२१) म्हणून शोक करुं नकोस; तूं पुरता धीर धर; अर्जुना, हा खेद टाकून दे.
तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत ।
तूं अझुनिवरी हित । विचारीं पां ॥ २२ ॥
२२) तुला हें योग्य नाहीं. ( आजपर्यंत ) जें काय पुष्कळ ( यश वगैरे ) तूं जोडलें आहेस, त्याचा यामुळें नाश होईल, तूं अजुनतरी आपल्या हिताचा विचार कर. 
येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे ।
हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ॥ २३ ॥
२३) लढाईच्या या ऐन प्रसंगीं कृपाळूपणा कामाचा नाहीं. हे तुझें आतांच कां सोयरे झाले आहेत ?
तूं आधींचि काय नेणसी । कीं हे गोत्र नोळखसी ।
वायांचि काय करिसी । अतिशो आतां ॥ २४ ॥
२४) या पूर्वींच तूं हें जाणत नव्हतास कां ? किंवा, या भाऊबंदांची ओळख तुला नव्हती कां ? आतांच ( त्यांच्याबद्दल ) विनाकारण हा फाजील कळवळा कां ?  
आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज ।
हें परस्परें तुम्हां व्याज । सदाचि आथी ॥ २५ ॥

२५) आजचें युद्ध तुला जन्मांत नवीन का आहे ? तुम्हां 

एकमेकांना लढावयास निमित्त हें नेहमीचेंच आहे.


Custom Search