Wednesday, May 31, 2017

Samas Aathava Sakhya Bhakti समास आठवा सख्यभक्ति


Dashak Choutha Samas Aathava Sakhya Bhakti 
Samas Aathava Sakhya Bhakti is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Bhakti. Sakhya Bhakti is eight from Navavidha Bhakti. Sakhya means to become friend of God. It is not easy to be a riend of God. We have to deelop all the necessary qualities, virtues and change our nature so that God will accept us as his friend. That is described in here.
समास आठवा सख्यभक्ति
श्रीराम ॥
मागां जालें निरुपण । सातवें भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । आठवी भक्ती ॥ १ ॥
१) मागील समासांत सातव्या भक्तीचे वर्णन झाले. आतां आठवी भक्ति नीट लक्षपूर्वक ऐका.
देवासी परम सख्य करावें । प्रेम प्रीतीनें बांधावें ।
आठवें भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २ ॥
२) देवाशी दृढ मैत्री करावी. प्रेम भावनेने देवाला जणु बांधुनच ठेवावे. हे आठव्या भक्तीचे लक्षण समजुन घ्यावे. 
देवास जयाची अत्यंत प्रीती । आपण वर्तावें तेणें रीतीं ।
येणें करितां भगवंतीं । सख्य घडे नेमस्त ॥ ३ ॥
३) देवाला अतिशय आवडणार्‍या गोष्टी आपण कराव्यात. त्यामुळे भगवंताशी दाट मैत्री जडते.
भक्ति भाव आणी भजन । निरुपण आणी कथाकीर्तन ।
प्रेमळ भक्तांचें गायन । आवडे देवा ॥ ४ ॥
४) भक्ति, प्रेमाचा भाव, भजन, निरुपण, कथा-किर्तन, प्रेम भावनेने गाणार्‍या भक्तांचे गायन देवाला आवडते.
आपण तैसेंचि वर्तावें । आपणासि तेंच आवडावें ।
मनासारिखें होतां स्वभावें । सख्य घडे नेमस्त ॥ ५ ॥ 
५) आपण त्याप्रमाणे वागावे. देवाला जे आवडते ते आपल्यालाही आवडावे.देवाच्या मनाप्रमाणे झाले की मैत्री जडते.
देवाच्या सख्यत्वाकारणें । आपलें सौख्य सोडून देणें ।
अनन्यभावें जीवें प्राणें । शरीर तेंहि वेंचावें ॥ ६ ॥
६) देवाच्या मैत्रीसाठी आपण आपले देहसौख्य सोडून द्यावे. आपला जीव, प्राण व शरीर देवाला अर्पून मी देवासाठी आहे असा भाव ठेवावा.
सांडून आपली संसारवेथा । करित जावी देवाची चिंता ।
निरुपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याचि सांगाव्या ॥ ७ ॥
७) आपल्या संसारांतील सुख-दुःख बाजूस ठेवून देवाच्या सुखाची कामाची काळजी घ्यावी. देवाच्या कथा, किर्तन, निरुपण व गोष्टी सांगाव्या. 
देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी ।
सर्व अर्पावें सेवटीं । प्राण तोहि वेचावा ॥ ८ ॥
८) देवाच्या मैत्रीसाठी जीवलग मित्र व नातेवाईकांशी संबध तुटले तरी चालेल.सर्व देवाला अगदी प्राणसुद्धा अर्पावा.
आपुलें आवघें चि जावें । परी देवासीं सख्य राहावें ।
ऐसी प्रीती जिवें भावें । भगवंतीं लागावी ॥ ९ ॥
९) आपले सर्व गेले तरी चालेल पण भगवंताशी मैत्री तुटु देऊ नये. अशी मैत्री जीवाभावाने देवाशी व्हावी. 
देव म्हणिजे आपुला प्राण । प्राणासी न करावें निर्वाण ।
परम प्रीतीचें लक्षण । तें हें ऐसें असें ॥ १० ॥
१०) देव म्हणजे जणुकांही आपला प्राणच समजाव. देव आपल्याला प्राणाहून प्रिय असावा. दृढ मैत्रीचे लक्षण असे असते. 
ऐसें परम सख्य धरितां । देवास लागे भक्ताची चिंता ।
पांडव लाखाजोहरीं जळतां । विवरद्वारें काढिले ॥ ११ ॥
११) देवाशी अशी उत्कट मैत्री जोडली म्हणजे देवाला अशा भक्ताची काळजी लागते. पांडवांचा सख्य भाव एवढा उत्कट होता की लक्षाघरांत ते आगींत सापडले असतां भगवंताने त्यांना गुप्त गुहेंतून सुखरुप बाहेर काढले.   
देव सख्यत्वें राहे आपणासी । तें तों वर्म आपणाचि पासीं ।
आपण वचनें बोलावीं जैसीं । तैसीं येती पडसादें ॥ १२ ॥
१२) आपले जितके शुद्ध प्रेम, मैत्री असते, तशीच देवही आपल्याशी मैत्री ठेवतो. आपण जसे  बोलतो तसेच प्रतिध्वनी आपल्याला ऐकावयास येतात. आपली श्रद्धा देवावर अनन्य भावाने असेल तर देवही आपली काळजी घेतो. 
आपण असतां अनन्यभावें । देव तत्काळचि पावे ।
आपण त्रास घेतां जीवें । देवहि त्रासे ॥ १३ ॥
१३) आपला भाव जर अनन्य असेल तर व एका भगवंतावरच आपला विश्र्वास, श्रद्धा, निष्ठा असेल तर भगवंत आपल्याला तत्काळ प्रसन्न होतो. पण आपण त्याला कंटाळलो तर तोही आपल्याला कंटाळतो.  
श्र्लोक 
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ॥
जे लोक मला ज्याप्रकारें भजतात त्याप्रकारे मी त्यांच्यावर अनुग्रह करतो.
जैसें जयाचे भजन । तैसाचि देवहि आपण ।
म्हणौन हें आवघें जाण । आपणासि पासीं ॥ १४ ॥
१४) ज्या भावनेने आपण भगवंताचे भजन करतो, त्याच भावनेने भगवंत आपल्यावर अनुग्रह करतो.   
आपुल्या मनासारिखें न घडे । तेणें गुणें निष्ठा मोडे ।
तरी गोष्टी आपणाकडे । सहजचि आली ॥ १५ ॥
१५) एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर त्यामुळे भगवंतावरील आपले प्रेम, निष्ठा, श्रद्धा कमी होते. तसेच भगवंताचेही आपल्यावरील प्रेम, ममत्व कमी होते.
मेघ चातकावरी वोळेना । तरी चातक पालटेना ।
चंद्र वेळेसि उगवेना । तर्‍ही चकोर अनन्य ॥ १६ ॥
१६) चातक मेघाचेच पाणी पितो. मेघाने वृष्टी केली नाही तर चातकाची तहान  शमत नाही. पण तो मेघावरील प्रेम कमी करत नाही. तसाच चकोर चंद्राला उगवायला उशीर झाला तरी तो चकोर तसाच भुकेलेला उपाशी राहतो. पण चंद्रावरील प्रेम कमी करत नाही.
ऐसें असावें सख्यत्व । विवेकें धरावें सत्व ।
भगवंतावरी ममत्व । सांडूंचि नये ॥ १७ ॥
१७) सख्य, मैत्री अशी असावी. भगवंताची मैत्री मोठ्या विवेकाने धरुन ठेवावी. त्याच्याशी असलेले सख्य, मैत्री, प्रेम कमी होऊन देऊ नये. 
सखा मानावा भगवंत । माता पिता गण गोत ।
विद्या लक्ष्मी धन वित्त । सकळ परमात्मा ॥ १८ ॥
१८) भगवंताला सखा मानावा. तोच माता, तोच पिता, तोच नातेवाईक व सगेसंबधीही तोच मानावा. तसेच विद्या, लक्ष्मी, धन व वित्तसुद्धा भगवंतच. आपले जे जे ते ते सर्व तो परमात्मा भगवंतच अशी भावना बाळगावी. 
देवावेगळें कोणी नाहीं । ऐसें बोलती सर्वहि ।
परंतु त्याची निष्ठा कांहीं । तैसीच नसे ॥ १९ ॥
१९) आपल्याला देवाखेरीज कोणीच नाही. असे सर्वच म्हणतात. परंतु त्यांचा खरा भाव तसा नसतो.  
म्हणौनि ऐसें न करावें । सख्य तरी खरेंचि करावें । 
अंतरी सदृढ धरावें । परमेश्र्वरासी ॥ २० ॥
२०) म्हणुन असे खोटे वागु नये. देवाशी सख्य, मैत्री खरी भावना ठेवूनच करावे. मनांत देवाबद्दल प्रेम दृढ धरुन ठेवावे.
आपुलिया मनोगताकारणें । देवावरी क्रोधास येणें । 
ऐसीं नव्हेत किं लक्षणें । सख्यभक्तीचीं ॥ २१ ॥  
२१) आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर देवावर रागावणे, नाराज होणे हे खर्‍या सख्य भक्तीचे लक्षण नव्हे.     
देवाचें जें मनोगत। तेंचि आपुलें उचित ।
इच्छेसाठी भगवंत । अंतरुं नये कीं ॥ २२ ॥
२२) भगवंताच्या इच्छेने जे घडून येईल तेच आपल्यासाठी योग्य आहे. आपली इच्छापूर्ती 
करण्यासाठी भगवंत अशा भावनेने भगवंतास दुरावी नये.
देवाचे इच्छेनें वर्तावें । देव करील तें मानावें ।
मग सहजचि स्वभावें । कृपाळु देव ॥ २३ ॥
२३) देवाच्या इच्छीनेच आपले वर्तन असावे. देव करील ते स्वीकारावे. मग सहजच कृपाळु
असलेला देव आपल्याला हवे ते देइल. 
पाहातां देवाचे कृपेसी । मातेची कृपा कायेसी ।
माता वधी बाळकासी । विपत्तिकाळीं ॥ २४ ॥
२४) देवाची कृपा ही मातेच्या ममत्वापेक्षा मोठी असते. संकट ओढवले तर माता आपल्याच बाळाचा वध करते. देवाचे तसे नाही. 
देवें भक्त कोण वधिला । कधीं देखिला ना ऐकिला ।
शरणागतांस देव जाला । वज्रपंजरु ॥ २५ ॥
२५) शरण आलेल्याचा देव कधीच वध करत नाही उलट त्याचे रक्षणच करतो.त्याचा देवाने वध केला असे कधीच कोणी ऐकलेले नाही.  
देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसि तारी ।
देव होये साहाकारी । अनाथांचा ॥ २६ ॥
२६) देव हा भक्तांवर कृपा करणारा आहे. देव पतितांचा उद्धार करणारा आहे. देव हा अनाथांचा सहाय्यकर्ता आहे.
देव अनाथांचा कैपक्षी । नाना संकटांपासून रक्षी ।
धाविन्नला अंतरसाक्षी । गजेंद्राकारणें ॥ २७ ॥
२७) देव हा अनाथांचा पक्ष घेणारा आहे. तो त्यांना अनेक संकटांतून वाचवितो. गजेन्द्राला मगरीच्या तावडींतून सोडविण्यासाठी तो तत्काल धावला. 
देव कृपेचा सागरु । देव करुणेचा जळधरु ।
देवासि भक्तांचा विसरु । पडणार नाहीं ॥ २८ ॥
२८) देव हा कृपेचा सागर आहे. तो करुणारुपी मेघ आहे. देवाला भक्तांचा कधीच विसर पडत नाही.  
देव प्रीती राखों जाणे । देवासी करावें साजणें । 
जिवलगें आवघी पिसुणें । कामा न येती ॥ २९ ॥
२९) आपल्या भक्ताचे प्रेम कसे राखावें त्याला प्रेमांकित कसा करावा. व त्याचे प्रेम कसे वृधिंगत करावे. हे सर्व देवाला माहीत आहे. म्हणून देवाशी खर्‍या भावनेने सख्यत्व करा. आपले नातेवाईक हे स्वार्थ बुद्धिने जमा होतात. प्रसंगी आपल्या सहाय्यास
येत नाहीत.
सख्य देवाचें तुटेना । प्रीती देवाची विटेना ।
देव कदा पालटेना । शरणागतांसी ॥ ३० ॥
३०) देवाशी सख्य जोडले की ते तुटत नाही. देवाचे प्रेम कमी होत नाही. ते वाढतच जाते. देव शरणागताला कधी निराश करत नाही.
म्हणोनि सख्य देवासी करावें । हितगुज तयासी सांगावें ।
आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३१ ॥
३१) म्हणून देवाशी सख्य, मैत्री खर्‍या भवनेने करावी. त्याल आपले सर्व सुख-दुःख सांगावे.आठव्या भक्तीचे हे असे लक्षण जाणून घ्यावे. 
जैसा देव तैसा गुरु । शास्त्रीं बोलिला हा विचारु ।
म्हणौन सख्यत्वाचा प्रकारु । सद्गुरुसीं असावा ॥ ३२ ॥
३२) जसा देव तसाच सद्गुरु असे शास्त्रांत सांगितले आहे. म्हणुन सख्यत्व सद्गुरुशी ही याचप्रकारे करावे. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सख्यभक्तिनिरुपणनाम समास आठवा॥
Samas Aathava  Sakhya Bhakti
 समास आठवा सख्यभक्ति


Custom Search

Monday, May 29, 2017

Samas Satava Dasya Bhakti समास सातवा दास्यभक्ति


Dashak Choutha Samas Satava Dasya Bhakti 
Samas Satava Dasya Bhakti is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Bhakti. Dasya Bhakti is sixth from Navavidha Bhakti. Dasya means to be in service of God.
समास सातवा दास्यभक्ति
श्रीराम ॥
मागा जालें निरुपण । साहावे भक्तीचे लक्षण ।
आतां ऐका सावधान । सातवी भक्ती ॥ १ ॥
१) मागील समासांत सहाव्या भक्तीचें वर्णन झाले. आतां सातवी भक्ती लक्ष देऊन ऐकावी. 
सातवें भजन तें दास्य जाणावें । पडिले कार्य तितुकें करावें ।
सदा सन्निधचि असावें । देवद्वारीं ॥ २ ॥
२) देवाचें दास्य करणें म्हणजे सातवी भक्ति होय. देवाच्या दाराशी त्याची सेवा करण्यासाठी 
असणे, देवाचे जे काम असेल ते आपण करणे.   
देवाचें वैभव सांभाळावें । न्यूनपूर्ण पडोंचि नेदावें ।
चढतें वाढतें वाढवावें । भजन देवाचें ॥ ३ ॥
३) देवाच्या वैभवाचे रक्षण करणे, ते कमी होऊं न देणे,  ते वाढेल तसे वाढवणे व वाढवण्याचा प्रयत्न करणे. 
भंगलीं देवालयें करावीं । मोडली सरोवरें बांधावीं ।
सोफे धर्मशाळा चालवावीं । नूतन चि कार्यें ॥ ४ ॥  
४) भंगलेली देवालयें दुरुस्त करावी. मोडलेले तलाव, पाण्याचे साठे दुरुस्त करावे. 
सोपे, धर्मशाळा बांधाव्या. मोडल्या असतील तर त्यांचे नूतनीकरण करावे.    
नाना रचना जीर्ण जर्जर । त्यांचे करावें जीर्णोद्धार ।
पडिलें कार्य तें सत्वर । चालवित जावें ॥ ५ ॥
५) जुन्या मोडकळीसआलेल्या धर्मशाळा वगैरे बांधकामांचा जीर्णोद्धार करावा. देवाचे जे जे कार्य असेल ते ते लगोलग करीत जावे.
गज रथ तुरंग सिंहासनें । चौकिया सिबिका सुखासनें ।
मंचक डोल्हारे विमानें । नूतन चि करावीं ॥ ६ ॥
६) हत्ती, रथ, घोडे, सिंहासनें, चौरंग, पालख्या, सुखासने, पलंग, डोलारे, विमानें वगैरे
सर्व नविन करावें.  
मेघडंब्रें छत्रें चामरें । सूर्यापानें निशाणें अपारें ।
नित्य नूतन अत्यादरें । सांभाळित जावीं ॥ ७ ॥
७) मेघडंबर्‍या, छत्रें, चारें, अबदागिर्‍या, पुष्कळ निशाणें, या वस्तु साफ करुन निट जतन कराव्या.
नाना प्रकारीचीं यानें । बैसावयाचीं उत्तम स्थानें ।
बहुविध सुवर्णासनें । येत्ने करीत जावीं ॥ ८ ॥
८) देवाचीं नाना प्रकारची वाहनें,  बसावयासाठी उत्तमोत्तम जागा, निरनिराळी सोन्याची आसनें, वगैरे प्रयत्नपूर्वक करावीत. 
भुवनें कोठड्या पेट्या मांदुसा । रांझण कोहळीं घागरी बहुवसा ।
संपूर्ण द्रव्यांश ऐसा । अति येत्नें करावा ॥ ९ ॥
९) घरें, खोल्या, पेट्या, पेटारे, रांजण, पाण्यासाठी मोठी भांडी, पुष्कळ घागरी,  
अशा किमती वस्तु देवासाठी द्याव्या.
भुयेरीं तळघरें आणी विवरें । नाना स्थळें गुप्त द्वारें ।
अनर्घ्ये वस्तूंची भांडारें । येत्नें करीत जावीं ॥ १० ॥
१०) अनेक ठिकाणी भुयारे, तळघरे, बोगदे करावेत. त्यांना गुप्त दारे ठेवावीत.मौल्यवान वस्तु ठेवण्यासाठी कोठारे प्रयत्नपूर्वक करावीत.
आळंकार भूषणें दिव्यांबरें । नाना रत्नें मनोहरें ।
नाना धातु सुवर्णपात्रें । येत्नें करीत जावीं ॥ ११ ॥
११) देवासाठी, त्याच्या उत्सवासाठी दागिने, भूषणें, उंची वस्त्रे, सुंदर रत्नें, अनेक धातुंची व सोन्याची भांडी मोठ्या प्रयत्नाने मिळवावीत. 
पुष्पवाटिका नाना वनें । नाना तरुवरांचीं बनें ।
पावतीं करावीं जीवनें ।  तया वृक्षांसी ॥ १२ ॥
१२) फुलबागा, रानें, झाडांच्या राया, तयार कराव्या, त्यांना पाणीवगैरे देऊन त्यांची निगा राखावी.  
नाना पशूंचिया शाळा । नाना पक्षी चित्रशाळा ।
नाना वाद्यें नाट्यशाळा । गुणी गायक बहुसाल ॥ १३ ॥
१३) निरनिराळ्या जनावरांसाठी, तबेले, निरनिराळे पक्षी, अनेक चित्रांचा संग्रह, अनेक वाद्ये, नाटकशाळा व रंगभूमी, पुष्कळ चांगले गायक, 
स्वयंपाकगृहें भोजनशाळा । सामग्रीगृहें धर्मशाळा ।
निद्रिस्तांकारणें पडशाळा । विशाळ स्थळें ॥ १४ ॥
१४) स्वयंपाकघरे, जेवण्यासाठी पाकशाळा, स्वयंपाकाचे सामान ठेवण्यासाठी कोठ्या, झोपण्यासाठी कोठ्या, सर्व कोठ्या मोठ्या ठेवाव्यात.
नाना परिमळद्रव्यांचीं स्थळें । नाना खाद्यफळांचीं स्थळें  ।
नाना रसांची नाना स्थळें । येत्नें करीत जावीं ॥ १५ ॥
१५) अनेक प्रकारच्या सुवासिक वस्तु ठेवण्यासाठी जागा, निरनिराळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ व फळे ठेवण्यासाठी जागा, पातळ पदार्थ ठेवण्यासाठी जागा, प्रयत्नपूर्वक बनवाव्यात. 
नाना वस्तांचीं नाना स्थानें । भंगलीं करावीं नूतनें ।
देवाचें वैभव वचनें । किती म्हणौनि बोलावें ॥ १६ ॥
१६) निरनिराळ्या वस्तु ठेवण्याच्या जागा जर जुन्या झाल्या असतील अगर मोडकळीस आल्या
असतील तर नविन कराव्या, देवाचे वैभव वर्णन करुन सांगावे तेवढे थोडेच.    
सर्वां ठाईं अति सादर । आणी दास्यत्वास हि तत्पर ।
कार्यभागाचा विसर । पडणार नाहीं ॥ १७ ॥
१७) देवाकडे येणार्‍या सर्व भक्तांविषयी आदर बाळगावा. त्यांची व भगवंताची सेवा करण्यास 
तत्पर असावे. आपल्या वाट्याचे काम लगेच करावे.
जयंत्या पर्वें मोहोत्साव । असंभ्याव्य चालवी वैभव ।
जें देखतां स्वर्गींचे देव । तटस्थ होती ॥ १८ ॥
१८) देवाच्या जयंत्या, पर्वे मोठ्या वैभवाने करावेत की जे पाहून स्वर्गांतील देवसुद्धा थक्क होतील.
ऐसे वैभव चालवावें । आणी नीच दास्यत्वहि करावें ।
पडिले प्रसंगी सावध असावें । सर्वकाळ ॥ १९ ॥
१९) देवाचे वैभव वाढवत ठेवावे. तसेच हलक्यांतील हलकी देवाची सेवा करण्यासही तत्पर नेहमी तयार असावे. 
जें जें कांहीं पाहिजे । तें तें तत्काळचि देजे ।
अत्यंत आवडीं कीजे । सकळ सेवा ॥ २० ॥
२०) देवासाठी जें  जें आवश्यक असेल तें तें त्वरित द्यावे. अत्यंत आवडीने देवाची सर्व सेवा करावी.
चरणक्षाळणें स्नानें आच्मनें । गंधाक्षतें वसनें भूषणें ।
आसनें जीवनें नाना सुमनें । धूप दीप नैवेद्य ॥ २१ ॥
२१) देवाचे पाय धुण्यासाठी, स्नानासाठी, आचमनासाठी पाणी ठेवावे. गंधक्षता, वस्त्रे, अलंकार, आसनें, निरनिराळी फुलें, धूप, दीप, नैवेद्य तयार ठेवावा.
शयेनाकारणें उत्तम स्थळें । जळें ठेवावीं सुसीतळें ।
तांबोल गायनें रसाळें । रागरंगें करावीं ॥ २२ ॥
२२) देवाला निद्रा घेण्यासाठी चांगल्या खोल्या, पिण्यासाठी गार पाणी, विडा, रागदारीने रसाळ
गायन गावे. 
परिमळद्रव्यें आणी फुलेलें । नाना सुगंधेल तेलें ।
खाद्य फळें बहुसालें । सन्निधचि असावीं ॥ २३ ॥
२३) सुगंधी पदार्थ, फुलांची तेले, निरनिराळी सुगंधी तेलें, पुष्कळ खाण्याचे पदार्थ, फळे,देवाच्या जवळच ठेवावीत व प्रसाद म्हणून लोकांना पण द्यावीत.   
सडे संमार्जनें करावीं । उदकपात्रें उदकें भरावीं ।
वसनें प्रक्षालून आणावीं । उत्तमोत्तमें ॥ २४ ॥
२४) झाडलोट करावी, सडा घालावा, रांगोळ्या काढाव्या, पाण्याच्या भंड्यांत स्वच्छ पाणी भरुन 
ठेवावे, देवाचे कपडे, वस्त्रे स्वच्छ धुवून ठेववीात.
सकळां करावें पारपत्य । आलयाचें करावें आतित्य ।
ऐसी हे जाणावी सत्य । सातवी भक्ती ॥ २५ ॥
२५) देवाच्या दर्शनास येणार्‍या सर्वांचे आदरातिथ्य करावे. अशी ही सातवी भक्ती आहे.
वचनें बोलावीं करुणेचीं । नाना प्रकारें स्तुतीचीं ।
अतंरे निवती सकळांची । ऐसें वदावें ॥ २६ ॥
२६) देवाच्या दासाचे बोलणे करुणेने भरलेले दयाद्र असावे, दुसर्‍याबद्दल व देवाबद्दल चांगले बोलावे की त्यामुळे सर्वांना समाधान वाटेल. 
ऐसी हे सातवी भक्ती । निरोपिली येथामती ।
प्रत्यक्ष न घडे तरी चित्तीं । मानसपूजा करावी ॥ २७ ॥
२७) अशी ही सातवी भक्ती माझ्या अल्पबुद्धिने वर्णन केली. प्रत्यक्षांत सर्व करता आली नाही तरी मानसपूजेंत करावी.
ऐसें दास्य करावें देवाचें । येणेंचि प्रकारें सद्गुरुचें ।
प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचें । करित जावें ॥ २८ ॥
२८) असे देवाचे व तसेच सद्गुरुचे दास्यत्व करावे. जरी प्रत्यक्ष करता आले नाही तरी मानसपूजेंत करावे.  इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दास्यभक्रिनिरुपणनाम समास सातवा ॥
Samas Satava Dasya Bhakti
समास सातवा दास्यभक्ति


Custom Search

Thursday, May 25, 2017

Samas Sahava Vandan Bhakti समास सहावा वंदनभक्ति


Dashak Choutha Samas Sahava Vandan Bhakti
Samas Sahava Vandan Bhakti is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Bhakti. Vandan Bhakti is sixth from Navavidha Bhakti.
 समास सहावा वंदनभक्ति
श्रीराम ॥
मागां जालें निरुपण । पांचवे भक्तीचे लक्षण ।
आतां ऐका सावधान । साहावी भक्ती ॥ १ ॥
१) मागील समासांत पांचवी भक्तीचे निरुपण झाले. आतां सहावी भक्ती मन लावून ऐका. 
साहावी भक्ती तें वंदन । करावें देवासी नमन ।
संत साधु आणी सज्जन । नमस्कारीत जावे ॥ २ ॥
२) नमस्कार करणें ही सहावी भक्ती. देवाला नमस्कार करावा. संत, साधु व सज्जन यांना
नमस्कार करीत जावे.
सूर्यासि करावे नमस्कार । देवासि करावे नमस्कार ।
सद्गुरुस करावे नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३ ॥
३) सूर्याला नमस्कार घालावा. देवाला नमस्कार घालावा. सद्गुरुला मनापासून 
साष्टांग नमस्कार घालावा.  
साष्टांग नमस्कारास अधिकारु । नाना प्रतिमा देव गुरु ।
अन्यत्र नमनाचा विचारु । अधिकारें करावा ॥ ४ ॥
४) साष्टांग नमस्कार करण्यास अनेक प्रकारच्या देवाच्या प्रतिमा, भगवंत आणी
सद्गुरु हे योग्य अधिकारी आहेत. इतरांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नमस्कार करावा. 
छपन्न कोटी वसुमती । मधें विष्णुमूर्ती असती ।
तयांस नमस्कार प्रीती । साष्टांग घालावे ॥ ५ ॥
५) आपल्या पृथ्वीचा व्यास छपन्न कोटी आहे. त्यामध्यें अनेक विष्णुमूर्ति आहेत.त्या सर्वांना साष्टांग नमस्कार करावा. 
पशुपति श्रीपति आणी गभस्ती । यांच्या दर्शनें दोष जाती ।
तैसाचि नमावा मारुती । नित्य नेमें विशेष ॥ ६ ॥
६) शंकर, विष्णु व सूर्य यांच्या दर्शनाने पापें नाहीशी होतात. त्यांना व मारुतीला विशेष करुन नित्यनेमाने नमस्कार घालावा.
श्र्लोकः
शंकरः शेषशायी च मार्तंडो मारुतिस्तथा ।
एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः ॥
भक्त ज्ञानी आणी वीतरागी । माहानुभाव तापसी योगी ।
सत्पात्रें देखोनि वेगीं । नमस्कार घालावे ॥ ७ ॥
७) भक्त, ज्ञानी, वैरागी, स्वानुभवी, तापसी, योगी आणि श्रेष्ठ व्यक्ति यांना बघितल्यावर लगेच नमस्कार घालावा.
वेदज्ञ शास्त्रज्ञ आणी सर्वज्ञ । पंडित पुराणिक आणी विद्वजन ।
याज्ञिक वैदिक पवित्रजन । नमस्कारीत जावे ॥ ८ ॥
८) वेद जाणणारे, शास्त्रज्ञ, सर्व विद्या जाणणारे, पंडित, पुराणिक, विद्वान, आणी पवित्र व्यक्ति या सर्वांना नमस्कार घालावा. 
जेथें दिसती विशेष गुण । तें सद्गुरुचें अधिष्ठान ।
या कारणें तयासी नमन । अत्यादरें करावें ॥ ९ ॥
९) ज्या व्यक्तिमध्ये विशेष गुण दिसतील ती व्यक्ति सद्गुरु योग्यतेची मानून आदराने त्यांस नमस्कार करावा.
गणेश शारदा नाना शक्ती । हरिहरांच्या अवतारमूर्ती ।
नाना देव सांगों किती । पृथकाकारें ॥ १० ॥
१०) गणेश, शारदा, निरनिराळ्या शक्ति देवता, हरिहरांच्या अवतारमूर्ति, निरनिराळे देव किती सांगावे सर्वांना नमस्कार करीत जावे. 
सर्व देवांस नमस्कारिलें । तें एका भगवंतास पावलें ।
येदर्थीं येक वचन बोलिलें । आहे तें ऐका ॥ ११ ॥
११) सर्व देवांस नमस्कार करावा. तो एक भगवान विष्णुनाच पोहोचतो.याबद्दल एक वचन सांगितले आहे ते ऐका. 
श्र्लोकः 
आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरं ।
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥
आकाशांतून पडलेले पाणी ज्याप्रमाणे समुद्रास जाऊन मिळते त्याचप्रमाणें सरर्व देवांना केलेले नमस्कार श्रीविष्णुला जाऊन पोहोचतात.   
या कारणें सर्व देवांसी । नमस्करवें अत्यादरेंसीं ।
अधिष्ठान मानितां देवांसी । परम सौख्य वाटे  ॥ १२ ॥
१२) या कारणाने सर्व देवांना अति आदराने नमस्कार करावेत. सर्व देवांमध्ये भगवंताचे वास्तव्य आहे अशी भावना ठेवली तर भगवंताला मोाठा आनंद होतो.
देव देवांचीं अधिष्ठाने सत्पात्रें सद्गुरुचीं स्थानें ।
या कारणें नमस्कार करणें । उभय मार्गीं ॥ १३ ॥ 
१३) सगळ्या देवांमध्ये भगवंताचे चास्तव्य आहे. सर्व साधु-संत-सज्जन यांचे ठिकाणी श्रीसद्गुरुचे वास्तव्य आहे ही भावना ठेवून दोघांना नमस्कार करावेत.              
नमस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे ।
नमस्कारें सख्य घडे । नाना सत्पात्रासीं ॥ १४ ॥
१४) नमस्कारानें नम्रता येते. तसेच अहंकार कमी होत असल्याने विकल्प कमी होतो. अनेक सज्जनांशी स्नेह निर्माण होतो.
नमस्कारें दोष जाती । नमस्कारें अन्याय क्ष्मतीं । 
नमस्कारें मोडलीं जडतीं । समाधानें ॥ १५ ॥
१५) नमस्कारानें अंगांतील दोष जातात.  नमस्काराने माणुस चुकलेला असेल तर त्याला क्षमा मिळते. परत स्नेह जडतो. 
सिसापरता नाहीं दंड । ऐसें बोलती उदंड ।
याकारणें अखंड । देव भक्त वंदावें ॥ १६ ॥
१६) माणसाचें डोके उडविणे ही मोठी शिक्षा आहे. असे पुष्कळ लोक म्हणतात.म्हणुन देवांना व भक्तांना डोके झुकवून नमस्कार घालावे. 
नमस्कारें कृपा उचंबळे । नमस्कारें प्रसन्नता प्रबळे ।
नमस्कारें गुरुदेव वोळे । साधकांवरी ॥ १७ ॥ 
१७) नमस्काराने ज्याला नमस्कार केला त्याची कृपा लाभते. तो प्रसन्न होतो.सद्गुरु साधकाकडे लवकर येतात.
निशेष करितां नमस्कार । नासती दोषांचे गिरिवर ।
आणी मुख्य परमेश्र्वर । कृपा करी ॥ १८ ॥
१८) अगदीं मनापासून कोणताही विकल्प मनांत न ठेवता भगवंताला नमस्कार केला तर पापाचे डोंगर नष्ट होतात. आणि परमेश्र्वराची कृपा संपादन होते.
नमस्कारें पतित पावन । नमस्कारें संतांसी शरण ।
नमस्कारें जन्ममरण । दुरी दुर्‍हावे ॥ १९ ॥
१९) नमस्काराने भ्रष्ट माणसें पवित्र होतत. नमस्कार करुन संताना शरण जाता येते. नमस्काराने जन्म-मरणापासून मुक्ती मिळू शकते.
परम अन्याय करुनि आला । आणी साष्टांग नमस्कार घातला ।
तरी तो अन्याये क्ष्मा केला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ २० ॥
२०) एखादा माणूस फार गुन्हेगार असला व त्याने साष्टांग नमस्कार घातला तर श्रेष्ठींनी अधिकारी व्यक्तींनी क्षमा केली पाहीजे.
या कारणें नमस्कारापरतें । आणीक नाहीं अनुसरतें ।
नमस्कारें प्राणीयातें ॥ सद्बुद्धि लागे ॥ २१ ॥
२१) या कारणानें आचरणांत आणण्यास नमस्कारासारखे दुसरे सोपे साधन नाही. नमस्कार केल्याने अंगात सद्बुद्धि निर्माण होते. 
नमस्कारास वेचावें नलगे । नमस्कारास कष्टावें नलगे ।
नमस्कारास कांहींच नलगे । उपकरण सामग्री ॥ २२ ॥
२२) नमस्कार करण्यासाठी कांही खर्च येत नाही. कांही कष्ट करावे लागतनाहीत. किंवा कांही इतर साधन सामुग्री लागत नाही.  
नमस्कारा ऐसें नाहीं सोपे । नमस्कार करावा अनन्यरुपें ।
नाना साधनीं साक्षपें । कासया सिणावें ॥ २३ ॥
२३) नमस्काराइतकें सोपे साधन नाहीपण नमस्कार अत्यंत मनापासून करावा. अधिक साधने वापरुन उगाच कष्ट का करावेत.
साधक भावें नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली ।
सुगम पंथे नेऊन घाली । जेथील तेथें ॥ २४ ॥
२४) जो साधक अत्यंत श्रद्धेने व भावाने नमस्कार साधुस करतो, त्याची काळजी साधु घेतो. तो साधु त्या माणसाला सोप्या मार्गाने भगवंताकडे पोहोचवितो.  
या कारणें नमस्कार श्रेष्ठ । नमस्कारें वोळती वरिष्ठ ।
येथें सांगितली पष्ट । साहावी भक्ती ॥ २५ ॥
२५) यामुळे नमस्कार करणे हे मोठे साधन आहे. नमस्कार केल्याने भगवंत व सद्गुरु नमस्कार करणार्‍याकडे खेचले जातात. अशारीतीने सहावी भक्ति स्पष्टपणे सांगितली.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वंदनभक्तिनाम समास सहावा ॥
Samas Sahava Vandan Bhakti 
समास सहावा वंदनभक्ति


Custom Search

Tuesday, May 23, 2017

Samas Pachava Archan Bhakti समास पांचवा अर्चनभक्ति


Dashak Choutha Samas Pachava Archan Bhakti 
Samas Pachava Archan Bhakti is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Bhakti. Archan Bhakti is fifth from Navavidha Bhakti.
समास पांचवा अर्चनभक्ति
श्रीराम ॥ 
मागां जालें निरुपण । चौथे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । पांचवी भक्ती ॥ १ ॥
१) मागील समासांत चवथ्या भक्तीचे लक्षण सांगितले. आतां सावधान होऊन पांचव्या भक्तीचे लक्षण ऐका. 
पांचवी भक्ति तें आर्चन । आर्चन म्हणिजे देवतार्चन ।
शास्त्रोक्त पूजांवेधान । केलें पाहिजे ॥ २ ॥
२) पांचवी भक्ती म्हणजे अर्चन म्हणजेच देवतांची शास्त्रोक्त पूजा करणे हे होय. आणी तशी पूजा केली पाहिजे.
नाना आसनें उपकर्णें । वस्त्रें आळंकार भूषणें ।  
मानसपूजा मूर्तिध्यानें । या नाव पांचवी भक्ती ॥ ३ ॥
३) नाना आसनें, पूजेची उपकरणे, वस्त्रे, अलंकार, भूषणें आदि वापरु देवांची पूजा करावी. तसेच देवाच्या मूर्तीचे ध्यान करुन मानसपूजा करावी. या पूजेला पांचवी भक्ती म्हणतात. 
देवब्राह्मणअग्निपूजन । साधुसंतअतीतपूजन ।
यतिमाहानुभावगाइत्रीपूजन । या नाव पांचवी भक्ती ॥ ४ ॥
४) देव, ब्राह्मण, अग्नि, साधुसंत, अतिथि संन्यासी, महात्मा, गाय यांची पूजा
करावी. त्याला पांचवी भक्ती म्हटले आहे.
धातुपाषाणमृत्तिकापूजन । चित्रलेपसत्पात्रपूजन ।
आपलें गृहीचें देवतार्चन । या नाव पांचवी भक्ती ॥ ५ ॥
५) सोनें, चांदी, तांबें  आदी धातुंच्या देवतांच्या मूर्ति, दगडी व मातीच्या मूर्ति, चित्रें, तसबिरी आणी उत्तम भांडी यांची पूजा करावी. तसेच घरांतील देवांची पूजा करावी.याला पांचवी भक्ती हे नांव आहे. 
सीळा सप्तांकित नवांकित । शालिग्राम शकलें चक्रांकित।
लिंगें सूर्यकांत सोमकांत । बाण तांदळे नर्बदे ॥ ६ ॥
६) सात व नऊ शुभचिन्हें असलेले दगड, शाळिग्राम, चक्राचे चिन्ह असलेले दगडाचे तुकडे,  
पिंडी, उन्हांत धरल्यावर ज्यांतून अग्नि बाहेर पडतो असे सूर्यकांत मणी, चांदण्यांत ज्यांतून पाझर बाहेर
पडतो असे चंद्रकांत मणी, बाण, शेंदूर लावलेले दगड, नर्मदेंतील गोटे,
भैरव भगवती मल्लारी । मुंज्या नृसिंह बनशंकरी ।
नाग नाणी नानापरी । पंचायेत्नपूजा ॥ ७ ॥
७) भैरव, भगवती, मल्लारी, मुंज्या, नृसिंह, बनशंकरी, नाग, अनेक प्रकारची नाणीं, पंचायतनें, 
गणेशशारदाविठ्ठलमूर्ती । रंगनाथजगंनाथतांडवमूर्ती ।
श्रीरंगगनुमंतगरुडमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ८ ॥
८) गणेश, शारदा, विठ्ठल, रंगनाथ, जगन्नाथ, नटराज, श्रीरंग, हनुमंत, गरुड,
मत्छकूर्मवर्‍हावमूर्ती । नृसिंहवामनभार्गवमूर्ती ।
रामकृष्णहयग्रीवमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ९ ॥
९) मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, हयग्रीव, अशा सर्वांच्या मूर्तिची
पूजा करावी.
केशवनारायणमाधवमूर्ती । गोविंदविष्णुमदसुदनमूर्ती ।
त्रिविक्रमवामनश्रीधरमूर्ती । रुषीकेश पद्मनाभि ॥ १० ॥ 
१०) केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णु, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, हृषिकेश, पद्मनाभ,    
दामोदरसंकर्षणवासुदेवमूर्ती । प्रद्युम्न अनुरधपुरुषोत्तममूर्ती ।
अधोक्षजनारसिंहअच्युतमूर्ती । जनार्दन आणि उपेंद्र ॥ ११ ॥
११) दामोदर, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह, अच्युत, जनार्दन, उपेंद्र,  
हरिहरांच्या अनंत मूर्ती । भगवंत जगदात्माजगदीशमूर्ती ।
शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ १२ ॥
१२) याप्रमाणें हरिहरांच्या अनंत मूर्ति, भगवंत, जगदात्मा, जगदीश, यांच्या मूर्ति, आणि शिवशक्तीच्या अनेक मूर्ति घेऊन त्यांची पूजा करावी.
अश्र्वत्थनारायेण सूर्यनारायेण । लक्ष्मीनारायेण त्रिमल्लनारायेण ।
श्रीहरीनारायण आदिनारायण । शेषशाई परमात्मा ॥ १३ ॥
१३) त्याचप्रमाणें अश्वत्थनारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, त्रिमल्लनारायण, श्रीहरिनारायण, आदिनारायण, शेषशायी परमात्मा,
ऐश्या परमेश्र्वराच्या मूर्ती । पाहों जातां उदंड असती ।
त्यांचे आर्चन करावें भक्ती । पांचवी ऐसी ॥ १४ ॥
१४) अशा परमेश्र्वराच्या अगणित मूर्ति आहेत. त्यांचे पूजन करावे. ही पाचवी भक्ती होय.
याहि वेगळे कुळधर्म । सोडूं नये अनुक्रम ।
उत्तम अथवा मध्यम । करीत जावें ॥ १५ ॥
१५) याशिवाय आपल्या घराण्यांतील कुलधर्म असतील ते जसे चालत असतील तसेच करावेत. ते उत्तम वा 
मध्यम जसे असतील तसे करावे.
जाखमाता मायराणी । बाळा बगुळा मानविणी ।
पूजा मांगिणी जोगिणी । कुळधर्में करावीं ॥ १६ ॥
१६)  जाखमाता, मायराणी, बाळा, बगुळा, मानविणी, मांगिणी, जोगिणी, या क्षुद्र देवतांची व स्त्रियांची पूजा
जर कुळधर्मांत असेल तर ती सुद्धा करावी. 
नाना तीर्थां क्षेत्रांस जावें । तेथें त्या देवाचें पूजन करावें ।
नाना उपचारीं आर्चावें । परमेश्र्वरासी ॥ १७ ॥
१७) निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांत जावें, तेथील देवांची पूजा करावी. अनेकप्रकारच्या साधन सामग्रीने परमेश्र्वराची पूजा करावी.
पंचामृतें गंधाक्षतें । पुष्पें परिमळद्रव्यें बहुतें ।
धूपदीप असंख्यातें । नीरांजनें कर्पुरार्ती ॥ १८ ॥
१८) पंचामृत, गंधाक्षता, फुलें, अत्तरादि, पुष्कळ सुगंधी द्रव्यें, धूपदीप, नाना प्रकारच्या आरत्या व निरांजने, 
नाना खाद्य नैवेद्य सुंदर । नाना फळें तांबोलप्रकार ।
दक्षणा नाना आळंकार । दिव्यांबरें वनमाळा ॥ १९ ॥    
१९) वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे नैवेद्य, निरनिराळी फळे, तांदूळ, दक्षणा, अलंकार, भारी वस्त्रें, वनमाला,   
सिबिका छत्रें सुखसनें । माहि मेघडंब्रे सूर्यापानें ।
दिंड्या पताका निशाणें । टाळ घोळ मृदांग ॥ २० ॥
२०) पालख्या, छत्रें, आरामशीर आसने, छत्र्या, पालखीच्या छत्र्या, अबदागिर्‍या, दिंड्या, पताका, 
निशाणें, टाळ, मृदंग, घोळ,
नाना वाद्यें नाना उत्साव । नाना भक्तसमुदाव ।
गाती हरिदास सद्भाव । लागला भगवंतीं ॥ २१ ॥
२१) अनेक वाद्यें, अनेक प्रकारचे उत्सव, त्यांत जमा होणारे भक्तजन, आणि तेथें हरिदास 
भगवंताचे गुणगान करुं लागले म्हणजे भगवंताबद्दल श्रद्धा निर्माण होते.  
वापी कूप सतोवरें । नाना देवळायें सिखरें ।
राजांगणें मनोहरें । वृंदावनें भुयारीं ॥ २२ ॥
२२) पाण्याचे आड, विहिरी, तळीं, नाना प्रकारची देवळें व त्यांची शिखरें, मोठी आंगणें, सुंदर वृंदावने,
तळघरें, 
मठ मंड्या धर्मशाळा । देवद्वारीं पडशाळा ।
नाना उपकर्णें नक्षत्रमाळा । नाना वस्त्र सामग्री ॥ २३ ॥
२३) मठ, दुकानांच्या जागा, धर्मशाळा, देवाच्या दाराशी ओसर्‍या, इतर अनेक साधने, रंगीत कागदी 
फुलांच्या माला, अनेक प्रकारची वस्त्रें, 
नाना पडदे मंडप चांदोवे । नानारत्नघोष लोंबती बरवे ।
नाना देवळाईं समर्पावे । हस्थि घोडे शक्कटें ॥ २४ ॥
२४) वेगवेगळे पडदे, मंड्या, छतें, मोत्यांचे लोंबणारेघोस, हत्ती, घोडे, रथ व गाड्या निरनिराळ्या देवळांना अर्पण करावे.
आळंकार आणी आळंकारपात्रें । द्रव्य आणी द्रव्यपात्रें ।
अन्नोदक आणी अन्नोदकपात्रें । नाना प्रकारीची ॥ २५ ॥
२५) अलंकार व ते ठेवण्याच्या पेट्या, द्रव्य व ते ठेवण्याच्या पेट्या, अन्नोदक व ताटें, वाट्या, पातली, 
हंडे, व इतर भांडी,
वनें उपवनें पुष्पवाटिका । तापस्यांच्या पर्णकुटिका ।
ऐसी पूजा जगन्नायका । येथासांग समर्पावी ॥ २६ ॥
२६) जंगलें, बागा, फुलवाड्या, तापसी साधकांसाठी झोपड्या, अशा प्रकारचे उपचार अर्पण करुन 
जगन्नाथ ईश्र्वराची पूजा होते. आपण ते उपचार त्याला मनापासून अर्पण करावेत. 
शुकशारिका मयोरें । बदकें चक्रवाकें चकोरें ।
कोकिळा चितळें सामरें । देवाळईं समर्पावी ॥ २७ ॥
२७) पोपट, साळुंख्या, मोर, बदकें, चक्रवाक, चकोर, कोकिळा, हे पक्षी आणी चितळ, सांबर या
प्रकारची हरणें, देवालयांत अर्पण करावी.
सुगंधमृगें आणी मार्जरें । गाई म्हैसी वृषभ वानरें ।
नाना पदार्थ आणी लेंकुरें । देवाळईं समर्पावी ॥ २८ ॥
२८) त्याचप्रमाणें कस्तुरी मृग, मांजरें, गाई, म्हशी, बैल, वानरें, हीं जनावरें, अणखी नाना प्रकारचे 
पदार्थ व लहान मुलें देवालयांना अर्पण करावीं. 
काया वाचा आणी मनें । चित्तें वित्तें जीवें प्राणें ।
सद्भावें भगवंत आर्चनें । या नांव आर्चनभक्ती ॥ २९ ॥
२९) काया, वाचा, मन, चित्त, वित्त, जीव व प्राण हीं सगळीं भगवंताच्या पायीं अर्पण करुन अगदी मनापासून त्याची पूजा करणें यास अर्चनभक्ति म्हणतात.
ऐसेचि सद्गुरुचें भजन । करुन असावें अनन्य ।
या नाव भगवद्भजन । पांचवी भक्ती ॥ ३० ॥  
३०) अशाच रीतीनें श्रीसद्गुरुची पूजा करुन त्याच्याशी अनन्य शरणागत होणें, ही भगवंताची पूजा समजावी.
यालाच पांचवी भक्ती म्हणतात.  
ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी । 
मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्र्वरासी ॥ ३१ ॥
३१) बाहेरील उपचार वापरुन अशी पूजा घडूं शकत नाही. ती मनाने अंतर्यामी करावी. मानसपूजा करणे अगत्याचे आहे.
मनें भगवंतास पूजावें । कल्पून सर्व हि समर्पावें ।
मानसपूजेचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३२ ॥
३२) मनाने अंतर्यामी भगवंताची पूजा करुन त्याला सर्व अर्पावे. हा मानसपूजा विधी आहे. 
जें जें आपणास पाहिजे । तें तें कल्पून वाहिजे ।
येणें प्रकारें कीजे । मानसपूजा ॥ ३३ ॥
३३) जे जे आपणास हवे ते ते कल्पना करुन देवास द्यावे. हे मानसपूजेंत करावे. 
इति श्रीदासबोधे गुरुचरित्रसंवादे आर्चनभक्तिनाम समास पांचवा ॥ 
Samas Pachava Archan Bhakti
समास पांचवा अर्चनभक्ति
Custom Search