Thursday, May 11, 2017

Samas Dahava Vairagya Nirupan समास दहावा वैराग्य निरुपण


Dashak Tisara Samas Dahava Vairagya Nirupan 
Samas Dahava Vairagya Nirupan is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Vairagya. Nobody can avoid death. However everybody is acting as if there is no Mrutyu or death for him. He is under the influence of Maya. Only Aatmadnyani people who become one with the God have out of maya and Mrutyu. In this Samas the importance of Vairagya is told by Samarth Ramdas.
समास दहावा वैराग्य निरुपण  
॥ श्रीराम ॥
संसार म्हणिजे माहापूर । माजीं जळचरें अपार ।
डंखूं धावती विखार । काळसर्प ॥ १ ॥
१) हा संसार म्हणजे महापूर आहे. त्यामध्यें  पुष्कळ जलचर आहेत. विषारी काळसर्प डसावयास धांवतात.   
आशा ममता देहीं बेडी । सुसरी करिताती तडातोडी ।
नेऊन दुःखाचे सांकडी । माजीं घालिती ॥ २ ॥
२) आशा व ममता या देहाच्या बेड्या आहेत. सुसरी देहाचे लचके तोडतात आणि दुःख देतात. 
अहंकारनक्रें उडविलें । नेऊन पाताळीं बुडविलें ।
तेथुनियां सोडविलें । नवचे प्राणी ॥ ३ ॥
३) देहाभिमानरुपी मगर जीवाला पाताळांत नेऊन बुडवितो. तेथून जीवाची मग सुटका होत नाही. 
काममगरमिठी सुटेना । तिरस्कार लागला तुटेना ।
मद मत्सर वोहटेना । भूलि पडिली ॥ ४ ॥
४) कामवासनेची मगरमिठी सुटत नाही. कामवासना मनांतून जात नाही. तिरस्काराची वृत्ती जात नाही.दुसर्‍याचा तुच्छ लेखण्याची सवय जात नाही. मदव मत्सर हे विकार कमी होत नाहीत. एकप्रकारच्या मोहित अवस्थेंत माणूस राहतो.
 वासनाधामिणी पडिली गळां । घालून वेंटाळें वमी गरळा ।
जिव्हा लाळी वेळोवेळां । भयानक ॥ ५ ॥
५) वासनारुपी धामण गळ्यांत वेटोळे घालून बसते. सारखी वीष ओकत असते. चिंता व सदा भीति ह्यांनी अस्वस्थ व असमाधानी ठेवते.
माथां प्रपंचाचे वोझें । घेऊन म्हणे माझें माझें ।
बुडतांहि न सोडी फुंजे । कुळाभिमानें ॥ ६ ॥
६) प्रपंचाचे ओझे डोक्यावर घेऊन माणुस माझे माझे म्हणत राहतो. तो स्वतः बुडायला लागला तरी ते ओझे तो कुळाभिमानास सोडत नाही . 
पडिलें भ्रांतीचें अंधारें । नागविलें अभिमानचोरें ।
आलें अहंतेचें काविरें । भूतबाधा ॥ ७ ॥
७) भ्रांतीचा अंधार पडला, त्यांत अभिमान नावाच्या चोराने लुटले, अहंता भूतबाधा झालेल्या माणसाप्रमाणे वागविते व माणसाला भगवंतापासून दूर नेते. 
बहुतेक आवर्ती पडिले । प्राणी वाहातचि गेले ।
जेंहि भगवंतासी बोभाइलें । भावार्थबळें ॥ ८ ॥
८) जन्माला आलेले बहुतेक जण या महापुरांत वाहुन गेली. पुष्कळशी माणसे देहबुद्धिच्या मागे लागुन भगवंतास मुकले. कांहीजण मात्र मोठ्या भक्तिने भगवंतास हांक मारीत राहीले. 
देव आपण घालूनि उडी । तयांसी नेलें पैलथडी ।
येर तें अभाविकें बापुडीं । वाहातचि गेलीं ॥ ९ ॥
९) ज्यांनी मोठ्या भक्तीभावाने भगवंताचा धावा केला, त्यांना भगवंताने उडी मारुन पैलतीरास मुक्तीच्या मार्गी नेले. उरलेले मात्र अशाश्वत संसार सागरांत वाहात गेले.
भगवंत भावाचा भुकेला । भावार्थ देखोन भुलला ।
संकटीं पावे भाविकाला । रक्षितसे ॥ १० ॥
१०) भगवंत हा भावाचा भुकेला आहे. खर्‍या भक्तीभावााने जो त्याला भजतो, त्याला तो प्रसन्न होतो. संकटांत तो त्या भाविकाला मदत करतो व त्याचे रक्षण करतो.  
जयास भगवंत आवडे । तयाचें देवासीं सांकडें ।
ससंसारदुःख सकळ उडे । निज दासाचें ॥ ११ ॥
११) ज्याला देव मनापासून आवडतो, त्याचे संसारदुःखाचे ओझे देवावर पडते. तो त्या दुःखांतून मोकळा होतो. 
जे अंकित ईश्र्वराचे । तयांस सोहळे निजसुखाचे ।
धन्य तेचि दैवांचे । भाविक जन ॥ १२ ॥
१२) जे ईश्र्वराचे स्वाधीन होतात, त्यांना स्वानंदाचा आनंद मिळतो. असे दैववान भविक लोक धन्य होत.
जैसा भाव जयापासीं । तैसा दैव तयासी । 
जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणीमात्रांचा ॥ १३ ॥
१३) जसा ज्याचा भाव असतो तसा भगवंत त्याला मिळतो. भगवंत अंतःकरण पहात असल्याने प्र्येकाचा भाव तो जाणतो. 
जरी भाव असिला माईक । तरी देव होये माहा ठक ।
नवल तयाचें कौतुक । जैशास तैसा ॥ १४ ॥
१४) जर भाव खोटा असेल तर भगवंत त्या माणसाशी ठकास माहाठक याच न्यायाने वागतो. ही त्याची आश्र्चर्यकारक लिलाच आहे. 
जैसें जयाचें भजन । तैसेंचि दे समाधान ।
भाव होता किंचित न्यून । आपणहि दुरावे ॥ १५ ॥
१५) जशी ज्याची आराधना, उपासना त्याचप्रमाणे देव त्याला समाधान देतो. भाव थोडाही कमी झाला तरी त्या भाविकाला देव दुरावतो.
दर्पणीं प्रतिबिंब दिसे । जैस्यास तैसें भासे ।
तयाचें सूत्र असे । आपणाच पासीं ॥ १६ ॥
१६) आरश्यांत आपले प्रतिबिंब दिसते. जसे आपण असतो तसेच ते दिसते. ते प्रतिबिंब कसे दिसावे याचे रहस्य किंवा मर्म आपल्याजवळच असते.  
जैसें आपण करावें । तैसेंचि तेणें व्हावें ।
जरी डोळे पसरुनि पाहावें । तरी तेंहि टवकारे ॥ १७ ॥
१७) जसे आपण करु तसेच तेही दिसते. आपण डोळे पसरुन भुवया उंचावून पाहिले. तर आपले प्रतिबिंबही तसेच टवकारुन बघते. 
भृकुटी घालून मिठी । पाहाता क्रोधें तेंहि उठी ।
आपण हास्य करितां पोटीं । तेंहि आनंदे ॥ १८ ॥  
१८) आपण कपाळाला आठ्या घालून पाहिले तर प्रतिबिंबही रागीटमुद्रेने बघते. आपण हसून बघितले तर तेही आनंदाने बघते.   
जैसा भाव प्रतिबिंबला । तयाचाचि देव जाला ।
जो जैसें भजे त्यास । तैसाचि वोळे ॥ १९ ॥
१९) याचप्रमाणे ज्याचा जसा भाव तसाच देव होतो. जो जसा भगवंताला भजतो तसाच भगवंत त्याला फळ देतो. 
भावें परमार्थाचिया वाटा । वाहाती भक्तीचिया पेंठा ।
भरला मोक्षाचा चोहाटा । सज्जनसंगें ॥ २० ॥ 
२०) भावाने परमार्थाचे मार्ग भक्तीच्या बाजारपेठेंत घेऊन जातात. त्या बाजारपेठेंत संतसज्जनांच्या समुदायामध्ये मोक्षाच्या चव्हाट्यावर गर्दी जमते.
शुद्ध भाव असेल तर परमार्थाचे साधन बरोबर होते. आणि भगवंताच्या भक्तीची गोडी लागते. 
भावें भजनीं जे लागले । ते ईश्र्वरीं पावन जाले ।
भावार्थ उद्धरिले । पूर्वज तेहीं ॥ २१ ॥
२१) खर्‍या भक्तीभावाने जे भगवंताची आराधना करतात. ते  भगवंत चरणी लीन होऊन पावन होतात. त्यांच्यामुळे त्यांच्या पूर्वजांचाही उद्धार होतो. 
आपण स्वयें तरले । जनासहि उपेगा आले ।
कीर्तिश्रवणें जाले । अभक्त भावार्थी  ॥ २२ ॥
२२) ईश्र्वर दर्शनाने पवित्र झालेले भाविक आपण स्वतः तरतात व लोकांच्याही उपयोगी पडतात. त्यांच्याकडून देवाचा महिमा ऐकून अभक्त जनसुद्धा भाविक बनतात.
धन्य तयांची जननी । जे लागले हरिभजनीं ।
तेहिंच येक जन्म जनीं । सार्थक केला ॥ २३ ॥
२३) जे हरिभक्तीला लागले त्यांची माता धन्य होय. तसेच त्यांनी जन्माचे सार्थक केले असे मानावे.
तयांची वर्णूं काय थोरी । जयांचा भगवंत कैवारी ।
कासे लाऊन उतरी । पार दुःखाचा ॥ २४ ॥
२४) ज्यांच्या बाजूने भगवंत त्यांचा मोठेपणा काय वर्णावा. भगवंत त्यांना सांभाळून दुःखच्या पलिकडे घेऊन जातो.
बहुतां जन्माचे सेवटीं । जेणें चुके अटाटी । 
तो हा नरदेह भेटी । करी भगवंतीं ॥ २५ ॥
२५) पुष्कळ जन्म झाल्यानंतरच नरदेह मिळतो. त्याच्यामुळे यातायात चुकते. तोच भगवंताची भेट घडवून आणतो.  
म्हणौनि धन्य ते भाविक जन । जेंहि जोडिलें हरिनिधान ।
अनंत जन्मांतरीचें पुण्य । फळासि आलें ॥ २६ ॥
२६) म्हणुन ज्या भाविकांनी भगवंतरुपी धन मिळवले ते धन्य समजावेत. पुष्कळ जन्मांचे पुण्य फळाला आले.
आयुष्य हेचि रत्नपेटी । माजीं भजनरत्नें गोमटीं ।ड
ईश्र्वरीं अर्पूनिया लुटी । आनंदाची करावी ॥ २७ ॥
२७) माणसाचे जीवन ही रत्नांची पेटीच समजावी. त्या पेटींत ईश्र्वरभजनाची उत्तम रत्ने आहेत. ती देवाला अर्पण करावी आणि आनंद लुटावा.
हरिभक्त वैभवें कनिष्ठ । परी तो ब्रह्मादिकां वरिष्ठ ।
सदा सर्वदा संतुष्ट । नैराशबोधें ॥ २८ ॥
२८) हरिभक्त हा वैभवाने कमी असला तरी तो ब्रह्मादिकांना वरिष्ठ असतो. त्याला कांहीच हवेपणा नसल्याने तो नेहमी समाधानी असतो.  
धरुन ईश्र्वराची कास । केली संसाराची नैराश ।
तयां भाविकां जगदीश । सबाह्य सांभाळी ॥ २९ ॥  
२९)  ईश्र्वराचा पक्का आधार धरुन तो संसार सोडतो. त्यांना भगवंत आतून व बाहेरुनसुद्धा सांभाळतो. म्हणजे प्रपंचही सांभाळतो व त्यांची परमार्थ वृत्तीही सांभाळतो.    
जया संसाराचें दुःख । विवेकें वाटे परम सुख ।
संसारसुखाचेनि पढतमूर्ख । लोधोन पडती ॥ ३० ॥
३०) वास्तविक संसारांत दुःख आहे. देहबुद्धीच्या विवेकाने हे दुःख ज्याला सुखच वाटते, तो पढतमूर्ख समजावा.  असे पढतमूर्ख संसारसुखाला जणु झाोंबतात.
जयांचा ईश्र्वरीं जिव्हाळा । ते भोगिती स्वानंदसोहळा ।
जयांचा जनावेगळा । ठेवा आक्षै ॥ ३१ ॥
३१) ज्यांचा जीव ईश्र्वरामध्ये आत्मीयतेने गुंतलेला असतो, ते भाविक स्वानंद सोहळा भोगतात. त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो. पण तो व्यवहारामध्ये दृश्य नसतो. 
ते आक्षै सुखे सुखावले। संसारदुःखें विसरले ।
विषयेरंगीं वोरंगले। श्रीरंगरंगी ॥ ३२ ॥
३२) स्वानंदरुपी अक्षय सुखामध्ये रंगलेले भाविक भक्त संसारांतील दुःखे विसरतात. श्रीरंगाच्या म्हणजे भगवंताच्या प्रेमाच्या रंगामध्ये रंगतात व संसार त्याज मानतात. 
तयांस फावली नरदेह पेटी । केली ईश्र्वरेंसिं साटी ।
येरें अभाविकें करंटीं । नरदेह ॥ ३३ ॥
३३) नरदेहरुपी पेटी त्यांनी ईश्र्वराला देऊन टाकली व ईश्र्वराला जोडून घेतले. बाकीच्या करंट्यांनी नरदेह फुकट घालवला. 
आवचटें निधान जोडलें । तें कवडिच्या बदल नेलें ।
तैसें आयुष्य निघोनि गेलें । अभाविकाचें ॥ ३४ ॥
३४) एखाद्याला मोठे किमती रत्न मिळते पण त्याची किंमत माहीत नसल्याने तो ते कवडीच्या बदल्यांत घालवितो. तसेच तो मनुष्य देह मिळूनही त्याचे सार्थक न करता आयुष्य व्यर्थ दवडतो. 
बहुत तपाचा सांठा । तेणें लाधला परीस गोटा ।
परी तो ठाइचा करंटा । भोगूंच नेणे ॥ ३५ ॥
३५) कोणी एकाने पुष्कळ तप करुन पुण्याचा सांठा केला त्यामुळे त्याला परिस मिळाला. पण तो करंटा असल्याने त्याचा उपभोग कसा घ्यावा हे माहीत नसल्याने तो फुकट गेला.  
तैसा संसारास आला । मयाजाळीं गुंडाळला । 
अंती येकलाचि गेला । हात झाडुनी ॥ ३६ ॥
३६) तसाच  नरदेह घेऊन माणुस जन्मास येतो पण देवाला विसरुन मायाजाळी गुंतल्याने शेवटी एकटाच हात झाडुन जातो. तात्पर्य नरदेहाचे तो सार्थक करत नाही. 
या नरदेहाचेनि संगतीं । बहुत पावले उत्तम गती ।
येकें बापुडीं यातायाती । वरपडीं ॥ ३७ ॥
३७) या नरदेहाचे संगतीने पुष्कळजणांनी उत्तम गती प्राप्त करुन घेतली. परंतु कांही मात्र बापुडी यातायातीचे दुःख भोगीत राहीली.
या नरदेहाचेनि लागवेगें । सार्थक करावें संतसंगें ।
नीच योनी दुःख मागें । बहुत भोगिलें ॥ ३८ ॥
३८) या मिळालेल्या नरदेहाचे उपयोगाने संतसंगतीने सार्थक करुन घ्यावे. याआधी खालच्या योनींत जन्म झाल्याने जीवाने पुष्कळ दुःख भोगले आहे.   
कोण समयो येईल कैसा । याचा न कळे किं भर्वसा ।
जैसे पक्षी दाही दिशा । उडोन जाती ॥ ३९ ॥
३९) केव्हां कशी काय वेळ येईल याचा भरवंसा नसतो. झाडावर एकत्र राहणारे पक्षी क्षणार्धांत दाही दिशांना उडून जातात. 
तैसें वैभव हे सकळ । कोण जाणे कैसी वेळ ।
पुत्रकळत्रादि सकळ । बिघडोन जाती ॥ ४० ॥
४०) त्याप्रमाणे आपले सगळे वैभव, बायको, मुलें सर्व कोणाला माहीत कशी वेळ येते पण हे वैभव नष्ट होते. 
पाहिली घडी नव्हे आपुली । वयसा तरी निघोन गेली । 
देह पडतांच ठेविली । आहे नीच योनी ॥ ४१ ॥
४१) जो क्षण आला व आपण पाहिला तो लगेचच आपल्या हातून निसटला व असेच आयुष्य निघुन जाते व मग देह पडला की नीच योनींत जन्म घ्यावा लागतो.  
स्वान शुकरादि नीच याती । भोगणें घडे विपत्ती ।
तेथे कांहीं उत्तम गती । पाविजेत नाहीं ॥ ४२ ॥
४२) कुत्रा, डुक्कर यांच्यासारख्या खालच्या प्रतीच्या देहांत दुःख भोगावे लागते. त्या देहामुळे उत्तम गती निळत नाही. 
मागां गर्भवासीं आटाटी । भोगितां जालासि रे हिंपुटी ।
तेथुनियां थोरां कष्टीं । सुटलासि दैवें ॥ ४३ ॥
४३) पूर्वी गर्भवासाच्या यातना भोगिलेल्या असतात त्यामुळे जीव कष्टी, निराश होतो. तेथून तो सुदैवाने अत्यंत कष्टाने तो सुटतो. 
दुःख भोगिलें आपुल्या जीवें । तेथें कैंचिं होतीं सर्वें ।
तैसेंचि पुढें येकलें जावें । लागेल बापा ॥ ४४ ॥
४४) गर्भवासाचे दुःख भोगताना एकट्यालाच भोगावे लागते तेथे कोणी मदतीस नसतो. तसेच आयुष्य संपल्यावर एकटेच जावे लागते.  
कैंची माता कैंचा पिता । कैंची बहिण कैंचा भ्राता ।
कैंची सुहृदें कैंची वनिता । पुत्र कळत्रादिक ॥ ४५ ॥
४५) कसली आई, कसला पिता, कसली बहिण, कसला भाऊ, कसले नातेवाईक, कसली बायको, कसली मुलेंबाळें व इतर माणसे,
हे तूं जाण मावेचीं । आवघीं सोइरीं सुखाचीं ।
हे तुझ्या सुखदुःखाचीं । सांगातीनव्हेती ॥ ४६ ॥
४६) ही सर्व माणसे ममत्वाने आपली मानलेली असतात. ही सर्व मंडळी त्यांना तुमच्याजवळ सुख मिळेल या इच्छेने गोळा झालेली असतात. 
मात्र तुमच्या सुखदुःखाची वाटेकरी नसतात.
कैंचा प्रपंच कैंचें कुळ । कासया होतोसी व्याकुळ ।
धन कण लक्ष्मी सकळ । जाइजणें ॥ ४७ ॥
४७) कसला प्रपंच नि कैसे कुळ, कशासाठी व्याकुळ होतोस ? धन, धान्य व ऐश्र्वर्य  हे सगळे जाणारे नाश पावणारे आहे. 
कैंचे घर कैंचा संसार । कासया करिसी जोजार ।
जन्मवरी वाहोन भार । सेखीं सांडून जासी ॥ ४८ ॥
४८) कसले घर आणि कसला संसार त्यासाठी एवढे कष्ट, आटापीट करण्याचे कारण नाही. जन्मभर त्याचे ओझे वाहातोस पण हे सर्व सोडून जातोस. 
कैंचें तारुण्य कैंचें वैभव । कैंचे सोहळे हावभाव ।
हें सकळहि जाण माव । माईक माया ॥ ४९ ॥
४९) कसले तारुण्य आणि कसले वैभव कसला सोहळा कसला नखरा हा सगळा देखावा, भ्रम आहे. जीवाला भुल पाडणारा आहे.
येच क्षणीं मरोन जासी । तरी रघुनाथीं अंतरलासी ।
माझें माझें म्हणतोसी । म्हणौनियां ॥ ५० ॥
५०) याच क्षणी जर मृत्यु आला तर देवाला मुकतोस कारण माझे माझे म्हणुन संसारांत गुंतलेला असतोस.
तुवां भोगिल्या पुनरावृत्ती । ऐसीं मायबापें किती ।
स्त्री कन्या पुत्र होती । लक्षानलक्ष ॥ ५१ ॥
५१) तुझे अनेकानेक जन्म-मृत्यु होऊन गेले आहेत.  किती माय बाप किती बायका व लक्षावधी मुलेबाळे.   
कर्मयोगें सकळ मिळालीं । येके स्थळीं जन्मास आलीं ।
तें तुवा आपुलीं मानिली । कैसीं रे पढतमूर्खा ॥ ५२ ॥
५२) पूर्वकर्माच्या ऋणानुबंधाने संसारांत माणसे एके ठिकाणी भेटतात, येतात. ती आपण आपली मानतो. हे पढतमूर्खाचे लक्षण आहे.
तुझें तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा कोण विचार ।
आतां येक भगवंत साचार । धरीं भावार्थबळें ॥ ५३ ॥
५३) आपले म्हणून मिळालेले हे शरीरसुद्धा आपले नाही तर इतरांचा काय विचार करावा. एका भगवंतावाचून खरे आपले कोणी नाही.
म्हणुन भगवंताला घट्ट धरुन ठेवावे.   
येका दुर्भराकारणें । नाना नीचांची सेवा करणें ।
नाना स्तुती आणी स्तवनें । मर्यादा धरावी ॥ ५४ ॥
५४) आपल्या पोटासाठी आपल्याला नीच लोकांचीसुद्धा सेवा चाकरी करावी लागते. त्यांची स्तुती करावी लागते. त्यांना मान द्यावा लागतो.
जो अन्न देतो उदरासी । शेरीर विकावें लागे त्यासी ।       
मां जेणें घातलें जन्मासी । त्यासी कैसें विसरावें ॥ ५५ ॥
५५) जो पोटाला अन्न देतो त्याला शरीर विकावे लागते. मग ज्या भगवंताने आपल्याला जन्मास घातले त्याला कसा विसरतोस?
अहिर्निशीं ज्या भगवंता । सकळ जीवा लागली चिंता ।
मेघ वरुषे जयाची सत्ता । सिंधु मर्यादा धरी ॥ ५६ ॥
५६) त्या भगवंताला सर्व जीवांना सांभाळण्याची काळजी कायम लागलेली असते. त्याच्या सत्तेनेच मेघ पाऊस पाडतो. समुद्र मर्यादेंत राहतो.
भूमि धरिली धराधरें । प्रगट होईजे दिनकरें ।
ऐसी सृष्टी सत्तामात्रें । चालवी जो कां ॥ ५७ ॥
५७) शेष पृथ्वी आपल्या डोक्यावर धरतो. सूर्य वेळेवर उगवतो. भगवंत अशारीतीने आपल्या सत्तेने भगवंत सृष्टी चालवितो.  
ऐसा कृपाळू देवाधिदेव । नेणवे जयाचें लाघव ।
जो सांभाळी सकळ जीव । कृपाळुपणें ॥ ५८ ॥
५८) देवांचा तो देव कृपाळूपणाने आणि कौशल्याने सर्व जीवांना सांभाळतो. त्याची ही लिला आपल्याला समजतही नाही. 
ऐसा सर्वात्मा श्रीराम । सांडून धरिती विषयकाम ।
ते प्राणी दुरात्मे अद्धम । केलें पावती ॥ ५९ ॥
५९) असा सर्वांच्या अंतर्यामी असणारा श्रीराम सोडून जे लोक विषयवासनांच्यामागे लागतात ते दुरात्मेच समजावेत. 
रामेविण जे जे आस । तितुकी जाणीव नैराश ।
माझें माझें सावकाश । सीणचि उरे ॥ ६० ॥
६०) एका भगवंताशिवाय जी जी इच्छा करावी त्यांतून शेवटी निराशाच होते. माझे माझे करत करत शेवटी व्यर्थ श्रमच होतात. 
जयास वाटे सीण व्हावा । तेणें विषयो चिंतीत जावा ।
विषयो न मिळतां जीवा । तगबग सुटे ॥ ६१ ॥
६१) ज्याला फुकट श्रम व्हावेत असे वाटते त्याने विषयांच्या मागे लागावे. पण विषयाची प्राप्ती झाली नाही तर जीव तळमळायला लागतो.  
सांडून राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन ।
त्यासी कैंचें समाधान । लोलंगतासी ॥ ६२ ॥
६२) आंतबाहेर आनंदाने भरलेला श्रीराम सोडून जो सारखे विषयचिंतन करतो, त्याला समाधान कसे मिळणार ?  
जयास वाटे सुखची असावें । तेणें रघुनाथ भजनीं लागावें ।
स्वजन सकळहि त्यागावे । दुःखमूळ जे ॥ ६३ ॥
६३) ज्याला सुखी व्हावयाचे आहे त्याने रघुनाथाचे भजन करावे. दुःखच निर्माण करणारे सर्व स्वजन दूर सारावेत.
जेथें वासना झोंबोन पडे । तेणेंचि अपाय दुःख जडे ।
म्हणौनि विषयवासना मोडे । तो येक सुखी ॥ ६४ ॥
६४) ज्या दृश्य वस्तूंवर वासना जाते त्यामुळे दुःखच निर्माण होते. म्हणून जो विषयवासनेचा त्याग करतो तोच सुखी होतो.
विषयजनित जें जें सुख । तेथेंचि होतें परम दुःख । 
पूर्वीं गोड अंती शोक । नेमस्त आहे ॥ ६५ ॥
६५) विषयांपासून निर्माण होणारे सुख तेथेच शेवटी दुःख निर्माण होते. आधी गोड तरी शेवटी दुःखदायक होते हे ठरलेलेच आहे.   
गळ गिळितां सुख वाटे । वोढून घेतां घसा फाटे ।
कां तें बापुडें मृग आपटे । चारा घेऊन पळतां ॥ ६६ ॥
६६) गळाला कणकेची गोळी लावलेली असते. ती खातांना माशाला सुख वाटते. पण गळ ओढायला लागल्यावर घासा फाटायला लागतो. किंवा
हरिण चारा घेऊन पळायला लागते पण दगडावर आपटून पडते.
तैसी विषयसुखची गोडी । गोड वाटे परी ते कुडी ।
म्हणोनियां आवडी । रघुनाथीं धरावी ॥ ६७ ॥
६७) त्याचप्रमाणे देहसुख विषयवासनेने मिळालेले आधी गोड वाटते पण नंतर दुःखच निर्माण करते. म्हणून भगवंताची आवड धरावी. 
ऐकोनि बोले भाविक । कैसेनि घडे जी सार्थक ।
सांगा स्वामी येमलोक । चुके जेणें ॥ ६८ ॥
६८) हे ऐकून भाविक श्रोता विचारतो कीं, स्वामी या देहाचे सार्थक कसें घडेल ? कोणत्या उपायाने यमयातना चुकतील ? 
देवासी वास्तव्य कोठें । तो मज कैसेंनि भेटे ।
दुःखमूळ संसार तुटे । कोणेपरी स्वामी ॥ ६९ ॥
६९) देव कोठेराहतो ? तो मला कसा भेटेल ? स्वामी, हा दुःख निर्माण करणारा संसार कसा, कोणत्या उपायाने सुटेल ? 
धडपुडी भगवत्प्राप्ती । होऊन चुके अधोगती ।
ऐसा उपाये कृपामूर्ती । मज दिनास करावा ॥ ७० ॥
७०) अहो कृपामूर्ति नक्की भगवंताची प्राप्ती होऊन माझी अधोगती चुकेल असा उपाय मला दिनाला सांगा. 
वक्ता म्हणे हो येकभावें । भगवद्भजन करावें ।
तेणें होईल स्वभावें । समाधान ॥ ७१ ॥
७१) हें श्रोत्याचे प्रश्र्ण ऐकून वक्ता  म्हणाला कीं, अगदी मनापासून एकनिष्ठेने भगवंताचे भजन करावें. त्यामुळे समाधान व सुख लाभेल.
कैसें करावें भगवद्भजन । कोठें ठेवावें हें मन ।
भगवद्भजनाचें लक्षण । मज निरोपावें ॥ ७२ ॥
७२) त्यावर श्रोता म्हणाला, भगवंताचे भजन कसे करावे ? त्यावेळी हे मन कोठे ठेवावे? भजनाचे लक्षण काय ? हें सगळे मला सांगा. 
ऐसा म्लानवदनें बोले । धरिले सदृढ पाउलें ।
कंठ सद्गदित गळाले । अश्रुपात दुःखें ॥ ७३ ॥
७३) दीनवदनाने श्रोत्याने अशी प्रार्थना केली व चरण घट्ट धरले. सद्गदीत कंठाने त्याचे डोळ्यांतून दुःखाने अश्रुपात होऊ लागला.
देखोन शिष्याची अनन्यता । भावें वोळला सद्गुरु दाता  ।
स्वानंद तुंबळेल आतां । पुढिले समासीं ॥ ७४ ॥
७४) सद्गुरु शिष्याची अनन्यता पाहून प्रसन्न झाला. आतां पुढीले समासीं स्वानंद उचंबळून येईल. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वैराग्यनिरुपण नाम समास दहावा ॥  
   Samas Dahava Vairagya Nirupan 
  समास दहावा वैराग्य निरुपण  
   

Custom Search

No comments: