Sunday, October 16, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 34 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ३४

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 34 
Ovya 691 to 708 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ३४ 
ओव्या ६९१ ते ७०८

तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणवें ।

जाणितला तरी स्वभावें । दृष्ट होय ॥ ६९१ ॥

६९१) ( असें ज्या वेळीं होईल ), त्याच क्षणाबरोबर मी ( भगवंत ) विश्वरुप आहें असें कळेल; आणि असा मी समजल्यावर, साहजिक रीतीनें मी तसा ( विश्वरुप ) दिसेन.

मग इंधनीं अग्नि उद्दिपे । आणि इंधन हे भाष हारपे ।

तें अग्निचि होऊनि आरोपे । मूर्त जेवीं ॥ ६९२ ॥

६९२) मग काष्ठांत ( घर्षणानें ) अग्नि उत्पन्न झाल्यावर, काष्ठ हा शब्द नाहींसा होऊन, तें काष्ठच जसें मूर्तिमंत अग्नि बनतें;      

कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें ।

मग उदेलियां एकसरें । प्रकाशु होय ॥ ६९३ ॥

६९३) अथवा जोपर्यंत सूर्यानें उदय केला नाहीं, तोपर्यंत आकाशच अंधार होऊन असतें, मग सूर्योदय झाल्यावर तें आकाशच एकसारखें प्रकाश होतें;

तैसें माझां साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी ।

अहंकारलोपीं अवधारीं । द्वैत जाय ॥ ६९४ ॥

६९४) त्याप्रमाणें माझें प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर अहंकाराची येरझार संपते आणि अहंकाराचा नाश झाल्यावर द्वैत जातें, हें लक्षांत ठेव.

मग मी तो हें आघवें । एक मीचि आथी स्वभावें ।

किंबहुना सामावे । समरसें तो ॥ ६९५ ॥   

६९५) मग मी, तो आणि सर्व ( विश्व ) हें एक मीच स्वभावतः आहे फार काय सांगावें ? तो ऐक्यभावानें माझ्यामध्यें सामावला जातो.

मूळ श्लोक

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः ।

निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ५५ ॥

५५) हे पांडवा, जो मत्प्रीत्यर्थ कर्म करणारा, मीच ज्यांचें प्राप्तव्य आहे, असा माझा भक्त, संसारसंगरहित, कोणाहि भूतांशीं वैर नसलेला असा तो ( पुरुष ) मजप्रत येतो.  

जो मजचि एकालागीं । कर्में वाहातसे आंगी ।

जया मीवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ॥ ६९६ ॥

६९६) जो ( भक्त ) माझ्या एकट्याकरितांच शरीरानें कर्में आचरतो आणि ज्याला जगामध्यें माझ्यावांचून दुसरें कांहीं चांगलें नाहीं;

दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ ।

जेणें जिणयाचें फळ । मजचि नाम ठेविलें ॥ ६९७ ॥

६९७) ज्याचा इहपरलोक, हें सर्व केवळ मीच होऊन राहिलों आहें व ज्यानें आपलें जगण्याचें प्रयोजन माझीच प्राप्ति होणे, हेंच ठरविलें आहे,  

भूतें हे भाष विसरला । जे दिठी मीचि आहे बांधला ।

म्हणोनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥ ६९८ ॥

६९८) तो, भूतें ही भाषा विसरला; कारण त्याच्या दृष्टीला माझ्याशिवाय दुसरा विषय नाहीं; म्हणून तो निर्वैर झाला असतां तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझी भक्ति करतो.

ऐसा जो भक्तु होये । तयाचें त्रिधातुक हें जैं जाये ।

तैं मीचि होऊनि ठाये । पांडवा गा ॥ ६९९ ॥

६९९) अरे अर्जुना, असा जो भक्त आहे, त्याचें हें शरीर ज्या वेळी पडतें, त्या वेळी तो मीच होऊन राहतो. 

ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें ।

संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें ॥ ७०० ॥

७००) उदरामध्यें जगत् असल्यामुळें दोदिल झालेले व करुणेच्या रसाने रसाळ, असें जे श्रीकृष्णदेव, ते याप्रमाणे बोलले, असें संजय ( धृतराष्ट्राला ) म्हणाला. 

ययावरी तो पांडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु ।

आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगीं ॥ ७०१ ॥

७०१) याप्रमाणें श्रीकृष्ण बोलल्यानंतर तो अर्जुन आनंदरुपी धनाने थोर झाला; कारण श्रीकृष्णाच्या चरणांचे सेवन करण्यांत जगामध्ये तोच एक चतुर होता.

तेणें देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहाळिलिया चित्तीं ।

तंव विश्र्वरुपाहूनि कृष्णाकृती । देखिला लाभु ॥ ७०२ ॥

७०२) त्यानें देवाच्या दोन्ही मूर्तिचित्तामध्ये चांगल्या न्हाहाळून पाहिल्या, तेव्हां विश्वरुपापेक्षां कृष्णाच्या सगुण रुपामध्यें फायदा आहे, असे त्यास आधळून आले. 

परि तयाचिये जाणिवे । मानु न कीजेचि देवें ।

जें व्यापकाहूनि नव्हे । एकादेशी ॥ ७०३ ॥

७०३) परंतु त्याच्या या समजुतीला देवानें मान दिला नाहीच, कारण व्यापक रुपापेक्षां ( विश्वरुपापेक्षा ) एकदेशी रुप ( चतुर्भुज रुप ) बरें नव्हे, असें श्रीकृष्ण म्हणाले.

हेंचि समर्थावयालागीं । एक दोन चांगी ।

उपपत्ती शङ्गी । दाविता जाहला ॥ ७०४ ॥ 

७०४) आणि हेंच ( चतुर्भुज ) रुपापेक्षां विश्वरुप बरें ही गोष्ट स्थापित करण्याकरितां एक दोन चांगल्या युक्ति श्रीकृष्णांनी दाखविल्या.

तिया ऐकोनी सुभद्राकांतु । चित्तीं आहे म्हणतु ।

तरी होय बरवें दोन्हींआंतु । तें पुढती पुसों ॥ ७०५ ॥

७०५) त्या युक्ति ऐकून अर्जुन मनांत म्हणतो, या दोन्ही रुपांमध्यें कोणतें बरें आहे, ते देवाला आतां यापुढें विचारुं.  

ऐसा आलोचु करुनि जीवीं । आतां पुसती वोज बरवी ।

आदरील ते परिसावी । पुढां कथा ॥ ७०६ ॥

७०६) याप्रमाणें मनांत विचार करुन आतां तो प्रश्न विचारण्याचा चांगला प्रकार स्वीकारील; ती कथा पुढें आहे, ती ऐकावी.

प्रांजळ ओंवीप्रबंधें । गोष्टी सांगिजेल विनोदें ।

निवृत्तिपादप्रसादें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७०७ ॥

७०७) निवृत्तीनाथांच्या पायांच्या कृपेनें ती कथा सोप्या अशा ओंवी छंदांत मजेनें सांगता येईल असे ज्ञानेश्रवरमहाराज म्हणतात. 

भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोंवियाफूलें मोकळीं ।

अर्पिली अंघ्रियुगुलीं । विश्र्वरुपाचां ॥ ७०८ ॥

७०८) मी शुद्ध भावनारुप ओंजळींत हीं ओव्यारुपी

 मोकळी फुलें भरुन विश्वरुपाच्या दोन्ही पायांवर अर्पण

 केली. ( असें ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात. )

इति श्रीनद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरुपदर्शनयोगो नाम एकादशोऽध्यायः ॥

( श्लोक ५५; ओव्या ७०८ )

॥ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥     



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 33 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ३३

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 33
Ovya 673 to 690 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ३३ 
ओव्या ६७३ ते ६९०

मूळ श्लोक

श्रीभगवानुवाच – सुदर्दर्शमिदं रुपं दृष्टवानसि यन्मम ।

देवा अप्यस्य रुपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः ॥ ५२ ॥

५२) श्रीकृष्ण म्हणाले, महत्प्रयासानेंहि दिसण्याला कठीण, असें जें माझें हें रुप तूं पाहिलेंस, त्या रुपाचें दर्शन घेण्यासाठीं देव देखील नित्य उत्सुक आहेत. 

यया पार्थाचिये बोलासवें । हें काय गा म्हणितलें देवें ।

तुवां प्रेम ठेवुनि यावें । विश्र्वरुपीं कीं ॥ ६७३ ॥

६७३) या अर्जुनाच्या भाषणाबरोबर भगवंत म्हणाले, हें काय रें ? तूं विश्वरुपाच्या ठिकाणीं प्रेम ठेवून ( सगुणाकडे )

मग इये श्रीमूर्ती । भेटावें सडिया आयती ।

ते शिकवण सुभद्रापती । विसरलासि ॥ ६७४ ॥

६७४) मग या सगुण मूर्तीला ( विश्वरुपावर दृढ प्रेम ठेवून नुसतें रिकामें ) नुसत्या देहसामग्रीनें ( नुसत्या रिकाम्या देहानें ) भेटावें. हे सुभद्रापते अर्जुना, ही जी तुला आम्हीं मागें शिकवण दिली होती, ती विसरलास !   

अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरुही होय साना ।

ऐसा आथि मना । चुकीचा भावो ॥ ६७५ ॥

६७५) अरे अविचारी अर्जुना, एवढा मोठा मेरु ( सोन्याचा पर्वत ) पण तो एकदा कां प्राप्त झाला म्हणजे त्याचें कांहीं महत्व वाटत नाहीं, अशी जी मनाची समजूत होते, तीं चुकीची आहे.    

तरि विश्र्वात्मक रुपडें । जें दाविलें आम्हीं तुजपुढें ।

तें शंभूही परि न जोडे । तपें करितां ॥ ६७६ ॥

६७६) तरी आम्हीं तुझ्यापुढें जें विश्वरुप दाखविले, तें शंकरालासुद्धां अनेक तपें केलीं तरी प्राप्त होत नाहीं.

आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणताती किरीटी ।

परि अवसरु नाहीं भेटी । जयाचिये ॥ ६७७ ॥

६७७) अर्जुना, योगी हे अष्टांग योगासारख्या संकटांना तोंड देऊन शिणतात; परंतु ज्या विश्वरुपाच्या दर्शनाचा प्रसंग त्यांना येत नाहीं;     

तें विश्र्वरुप एकादे वेळ । कैं देखों अळुमाळ ।

ऐसें स्मरतां काळ । जातसे देवां ॥ ६७८ ॥

६७८) तें विश्र्वरुप एखादे वेळीं तरी थोडेसें आम्ही केव्हां पाहूं, असें चिंतन करतांना देवांचा काळ जातो.

आशेचिया अंजुळी । ठेऊनि हृदयाचां निडळीं ।

चातक निराळीं । लागले जैसे ॥ ६७९ ॥

६७९) आशारुप ओंजळ हृदयरुप कपाळावर ठेवून चातक पक्षी जसे आकाशाकडे पाहातात,

तैसे उत्कंठानिर्भर । होऊनियां सुरनर ।

घोकीत आठही पाहार । भेटी जयाची ॥ ६८० ॥

६८०) त्याप्रमाणे देव व मनुष्य हे विश्वरुप दर्शनाच्या उत्कंठेनें आतुर होऊन आठहि प्रहर ( रात्रंदिवस ) विश्वरुपाची भेट होईल काय, म्हणून घोकीत बसतात.

परि विश्र्वरुपासारिखें । स्वप्नींही कोण्ही न देखे ।

तें प्रत्यक्ष तुवां सुखें । देखिलें हे ॥ ६८१ ॥

६८१) परंतु विश्वरुपासारखी गोष्ट कोणी स्वप्नांतसुद्धां पाहिली नाहीं. असें हें विश्वरुप तें हे तूं आज प्रत्यक्ष सुखानें पाहिलेंस. 

मूळ श्लोक

नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।

शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥ ५३ ॥

५३) ज्या प्रकारें तूं मला पाहिलेंस त्या प्रकारें वेद पठनानें, तपानें, दानानें अथवा यज्ञानें ( देखील ) मी ( कोणाला ) दिसणें शक्य नाहीं.  

पैं उपायासि वाटा । न वाहती एथ सुभटा ।

साहिसहित वोहटा । वाहिला वेदीं ॥ ६८२ ॥

६८२) परंतु अर्जुना, या विश्वरुपाच्या ठिकाणीं कोणत्याहि साधनाचा लाग नाहीं ( मार्ग सांपडत नाहीं ); व सहा शास्त्रांसह वेद, लाग न लागल्यानें, या विश्वरुपापासून मागें हटले.

मज विश्र्वरुपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा ।

तपांचियाही सर्वभारा । नव्हेचि लागु ॥ ६८३ ॥

६८३) मी जो विश्वरुप, त्या माझ्याकडे चालत येण्याला, अर्जुना, तपांच्या सर्व समुदायालासुद्धा सामर्थ्य नाही.

आणि दाना कीर कानडें । मी यज्ञींही तैसा न सांपडें ।

जैसेनि कां सुरवाडें । देखिला तुवां ॥ ६८४ ॥

६८४) आणि तूं जशा विस्तारानें मला पाहिलेंस, तसा मी दानांनी दिसण्यास खरोखर कठीण असून ; यज्ञांनीहि मी तसा पाहण्यास सांपडत नाहीं.

तैसा मी एकीच परी । आंतुडें मां अवधारीं ।

जरी भक्ति येऊनि वरी । चित्तातें गा ॥ ६८५ ॥

६८५) ( तूं ज्या विस्तारानें मला पाहिलेंस; ) तसाच मी एकाच प्रकारानें ( मार्गानें ) पाहावयास सांपडतों व तो प्रकार हाच कीं जर भक्ति येऊन चित्ताला वरील ( तरच मी पाहावयास सांपडतों ) हें लक्षात ठेव.

मूळ श्लोक

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।

ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥ ५४ ॥

५४) पण हे अर्जुना, अशा स्वरुपाचा जो मी, त्या मला हें ( अनन्य भक्तीच्या योगानेंच ) तत्त्वतः जाणणें, पाहाणें आणि माझ्यामध्यें लीन होणें शक्य आहे.

परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी ।

धरावांचूनि अनारिसी । गतीचि नेणे ॥ ६८६ ॥

६८६) परंतु तीच भक्ति अशी कीं, पावसाच्या वृष्ट्यास पृथ्वीवांचून अशी निराळी गतीच ठाऊक नसते, तशी ( म्हणजे त्या भक्तीला मजवांचून दुसरा विषयच नाही अशी ); 

कां सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्रातें गिवसिती ।

गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ॥ ६८७ ॥

६८७) अथवा सर्व जलरुप संपत्ति घेऊन भागीरथी जशी समुद्राचा शोध करीत करीत एकनिष्ठेने  समुद्रास मिळून पुन्हा मिळतच आहे;

तैसे सर्वभावसंभारें । न घरत प्रेम एकसरें ।

मजमाजीं संचरे । मीचि होऊनि ॥ ६८८ ॥

६८८) त्याप्रमाणे सर्व भावांच्या समुदायांसह अनावर प्रेम मद्रुप होऊन, एकसारखें माझ्यामध्यें प्रवेश करतें.

आणि तेवींचि मी ऐसा । थडिये माझारीं सरिसा ।

क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि ॥ ६८९ ॥

६८९) आणि क्षीरसमुद्र जसा कांठावर व मध्येही एकसारखा दूधमयच असतो, त्याप्रमाणें मी सारखा सर्वव्यापी आहें,

तैसे मजलागुनि मुंगीवरी । किंबहुना चराचरीं ।

भजनासि कां दुसरी । भ्रांति नाहीं ॥ ६९० ॥

६९०) त्याप्रमाणें माझ्यापासून तों मुंगीपर्यंत, फार काय

 सांगावें ? सर्व स्थावरजंगमात्मक जगामध्ये भजनाला

 माझ्याशिवाय दुसरें कांहीं ( नाहीं ) याबद्दल शंकाच

 नाही. 



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 32 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ३२

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 32 
Ovya 656 to 672 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ३२ 
ओव्या ६५६ ते ६७२

नातरी गुरुकृपेसवें । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें ।

स्फुरे तत्त्व तेवीं पांडवें । श्रीमूर्ति देखिली ॥ ६५६ ॥

६५६) अथवा गुरुकृपा झाल्याबरोबर, प्रपंचाचें सर्व ज्ञान ओसरल्याव, जसें एक ब्रह्ममात्र स्फुरतें, त्याप्रमाणें विश्वरुप ओसरल्यावर अर्जुनानें कृष्णमूर्ति पाहिली.

तया पांडवा ऐसें चित्तीं । आड विश्र्वरुपाची जवनिका होती ।

ते फिटोनि गेली परौती । हें भलें जाहलें ॥ ६५७ ॥

६५७) त्या अर्जुनाला मनांत असें वाटलें कीं, ( माझ्या आणि चतुर्भुज श्रीकृष्णमूर्तीच्या ) आड ( मध्यें ) जो विश्वरुपाचा पडदा होता, तो पलीकडे निघून गेला, हें चांगलें झालें. 

काय काळातें जिणोनि आला । महावातु मागां सांडिला ।

आपुलिया बाहीं उतरला । सात सिंधु ॥ ६५८ ॥

६५८) जसा काय काळाला जिंकून आला किंवा प्रचंड वार्‍यास मागें हटविलें, अथवा आपल्या हातांनीं सात समुद्र पोहून उतरुन आला;

ऐसा संतोषु बहु चित्तें । घेइजत असे पांडुसुतें ।

विश्र्वरुपापाठीं कृष्णातें । देखोनियां ॥ ६५९ ॥

६५९) अर्जुनानें विश्वरुपानंतर कृष्णरुपाला पाहून आपल्या मनानें असा फार आनंद मानला.

मग सूर्याचां अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं ।

तैसी देखों लागला अवनी । लोकांसहित ॥ ६६० ॥

६६०) मग सूर्य मावळल्यावर पुन्हां आकाशांत चांदण्या प्रकट होतात, त्यप्रमाणें अर्जुन हा लोकांसहित पृथ्वी पाहावयास लागला.

पाहे तंव तें कुरुक्षेत्र । तैसेंचि दोहीं भागीं झालें गोत्र ।

वीर वर्षताती शस्त्रास्त्र । संघाटवारी ॥ ६६१ ॥

६६१) अर्जुन पाहावयास लागला, तों तें कुरुक्षेत्र तसेंच होतें; दोन्ही बाजूंना नातलग मंडळी तशीच ( पूर्वीप्रमाणें ) उभी होती, आणि योद्धे, शस्त्रांचे व अस्त्रांचे समुदायच समुदाय वर्षाव करीत होते.

तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु आहे निवांतु ।

धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळीं ॥ ६६२ ॥   

६६२) त्या बाणांच्या मांडवाआंत रथ पूर्वीप्रमाणें स्थिर होता व घोडे हाकण्याच्या जागीं लक्ष्मीकांत श्रीकृष्ण विराजमान झाले होते व आपण खालीं होता.

अर्जुन उवाच

दृष्ट्वेदं मानुषं रुपं तव सौम्यं जनार्दन ।

इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः ॥ ५१ ॥

५१) अर्जुन म्हणाला, ‘ हे जनार्दना, हें तुझें सौम्य मानव रुप पाहून, आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत् सावध झालों आहें.   

एवं मागील जैसें तैसें । तेणें देखिलें वीर्यविलासें ।

मग म्हणे जियालों ऐसें । जाहलें आतां ॥ ६६३ ॥

६६३) पराक्रम करणें हाच ज्याचा खेळ आहे, त्या अर्जुनानें याप्रमाणें पूर्वी जसें होतें तसें कृष्णाचें रुप पाहिलें. मग श्रीकृष्णास म्हणाला आतां मी जगलों असें मला वाटतें.

बुद्धीतें सांडोनि ज्ञान । भेणें वघळलें रान ।

अहंकारेंसी मन । देशधडी जाहलें ॥ ६६४ ॥

६६४) माझें ज्ञान बुद्धीला सोडून भयानें रानोमाळ झालें होतें आणि मग हें आहंकारासह परागंदा झालें होते.

इंद्रियें प्रवृत्ती भुलली । वाचा प्राणा चुकली ।

ऐसी आपांपरी होती जाली । शरीरग्रामीं ॥ ६६५ ॥

६६५) इंद्रियें विषयांकडे धावण्याचें विसरलीं होती व वाचाहि प्राणास मुकली होती ( बंद पडली होती ), याप्रमाणें शरीररुपी गांवात दुर्दशा उडाली होती.

तियें आघवींचि मागुतीं । जिवंत भेटली प्रकृती ।

आतां जिताणें श्रीमूर्ती । जाहलें इयां ॥ ६६६ ॥

६६६) तीं ( बुद्धि, मन व इंद्रियें ) सर्वच पुन्हां टवटवीत होऊन आपल्या मूळ पदावर आलीं. आतां श्रीकृष्णा, यांना जिवंतपण प्राप्त झालें ( ही आपल्या स्वभावावर येऊन आपापलीं कामें करावयास लागलीं ). 

ऐसें सुख जीवीं घेतलें । मग कृष्णातें जी म्हणितलें ।

मियां तुमचे रुप देखिलें । मानुष हें ॥ ६६७ ॥

६६७) असा त्यानें मनांत आनंद मानला व मग तो कृष्णास म्हणाला, महाराज, तुमचें हें मनुष्यरुप ( एकदाचें ) माझ्या दृष्टीस पडलें.

हें रुप दाखवणें देवराया । कीं मज अपत्या चुकलिया ।

बुझावोनि तुवां माया । स्तनपान दिधलें ॥ ६६८ ॥

६६८) हें देवाधिदेवा, हें रुप दाखविणें म्हणजे मी जें चुकलेलें मूल, त्या मला तूं जी माझी आई, तिनें माझी समजूत घालून मला स्तनपानच दिलें.  

जी विश्र्वरुपाचां सागरीं । होतों तरंग मवित वांवेवरी ।

तों इयें निजमूर्तीचां तीरीं । निगालों आतां ॥ ६६९ ॥

६६९) महाराज, विश्र्वरुपी समुद्रांत जो मी हातानें लाटेमागून लाट आक्रमीत होतों, ( गटांगळ्या खात होतो,) तो मी या आपल्या चतुर्भुज मूर्तिरुप किनार्‍यास आतां लागलों.  

आइकें द्वारकापुरसुहाडा । मज सुकतीया जी झाडा ।

हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला ॥ ६७० ॥

६७०) हे द्वारकेच्या राजा, ऐक. ( विश्वरुपदर्शनानंतर या चतुर्भुज रुपाची भेट ) ही भेट नव्हे, तर मी जें सुकावयास लागलेलें झाड, त्या मला ही भेट म्हणजे मेघांचा वर्षाव होय.  

सावियाची तृषा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला ।

आतां जिणयाचा फिटला । आभरंवसा ॥ ६७१ ॥

६७१) तहानेने पीडलेला जो मी, त्या मला हा चतुर्भुज श्रीकृष्ण म्हणजे अमृताचा सागरच अकस्मात भेटला. आतां माझा जगण्याविषयींचा संशय दूर झाला.

माझां हृदयरंगणीं । होताहे हरिखलतांची लावणी ।

सुखेंसीं बुझावणी । जाहली मज ॥ ६७२ ॥    

६७२) माझ्या हृदयदेशांत आनंदाच्या वेलांची लावणी होत

 आहे. ( आज ) सुखाची व माझी गांठ पडत आहे.



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 31 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ३१

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 31 
Ovya 640 to 655 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ३१ 
ओव्या ६४० ते ६५५

श्लोक

संजय उवाच

इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रुपं दर्शयामास भूयः ।

आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥ ५० ॥

५०) संजय म्हणाला, ‘ असें बोलून याप्रमाणें वासुदेवानें पुन्हा स्वतःचे ( पूर्वीचे ) रुप दाखविलें; आणि तो महात्मा पुन्हा सौम्यस्वरुपधारी होऊन भयभीत अर्जुनाला धीर देता झाला.

ऐसें वाक्य जी बोलतखेंवो । मागुता मनुष्य जाहला देवो ।

हें ना परि नवलावो । आवडीचा तिये ॥ ६४० ॥

६४०) महाराज ( राजा धृतराष्ट्रा ), असें वाक्य बोलतांक्षणींच देव पुन्हा मनुष्य झाले, यात काही मोठेंसें आश्चर्य नाही. परंतु श्रीकृष्णास अर्जुनाविषयीं जें प्रेम होतें, त्या प्रेमाचेंच मोठें आश्चर्य आहे ( असें संजय म्हणाला ).  

श्रीकृष्णचि कैवल्य उघडें । वरी सर्वस्व विश्र्वरुपायेवढें ।

हातीं दिधलें कीं नावडे । अर्जुनासि ॥ ६४१ ॥

६४१) श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म होतेच. असे असूनसुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णानें विश्वरुपाएवढें आपले सर्वस्व अर्जुनाच्या हातीं दिलें, असें असून तें ( विश्वरुप ) अर्जुनाला आवडलें नाही.

वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्नासि दूषण ठेविजे ।

नातरी कन्या पाहूनियां म्हणिजे । मना न ये हे ॥ ६४२ ॥

६४२) ज्याप्रमाणें एखाद्या वस्तूचा स्वीकार करुन ( मग ती वाईट म्हणून ) टाकून द्यावी किंवा ज्याप्रमाणें अस्सल रत्नांत कांहीं तरी खोड काढीत बसावें, अथवा मुलीला पाहून मग ती आपल्याला पटत नाहीं, असें ज्याप्रमाणें म्हणावें;

तया विश्र्वरुपायेवढी दशा । करितां प्रीतीचा वाढु कैसा ।

सेल दीधली उपदेशा । किरीटीसि देवें ॥ ६४३ ॥

६४३) श्रीकृष्णांनीं आपल्या चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरुपाएवढा विस्तार केला, या गोष्टीवरुन अर्जुनाविषयीं श्रीकृष्णाच्या प्रेमाची वाढ कशी होती ( हें स्पष्ट दिसतें ). अर्जुनाला देवांनी विश्वरुप दाखविलें हा त्या शेलका ( अति उत्कृष्ट ) उपदेश केला.     

मोडोनि भांगाराचा रवा । लेणें घडिलें आपलिया सवा ।

मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढती ॥ ६४४ ॥

६४४) सोन्याची लगड मोडून त्याचा जसा आपल्या इच्छेनुरुप दागिना करावा व मग तो दागिना जर आपल्या मनाला आवडला नाहीं, तर तो पुन्हां जसा आटवून टाकावा;

तैसे शिष्याचिये प्रीती जाहलें । कृष्णत्व होतें तें विश्र्वरुप केलें ।

तें मना नयेचि मग आणिलें । कृष्णपण मागुतें ॥ ६४५ ॥  

६४५) त्याप्रमाणें शिष्याच्या प्रीतीकरतां वरील दृष्टांताप्रमाणें गोष्ट घडली. प्रथम सगुण श्रीकृष्णमूर्ति होती, त्याचें विश्वरुप केलें; तें अर्जुनाच्या मनाला येईना, मग सगुण कृष्णरुप पुन्हां आणलें.

हा ठाववरी शिष्याची निसी । सहाते गुरु आहाती कवणे देशीं ।

परी नेणिजे आवडी कैशी । संजयो म्हणे ॥ ६४६ ॥

६४६) येथपर्यंत शिष्यानें दिलेला त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशांत आहेत ? परंतु देवाचें अर्जुनाविषयीं कसें प्रेम आहे, तें कळत नाहीं, असें संजय म्हणाला.   

मग विश्र्वरुप व्यापुनी भोंवतें । जें दिव्य योगतेज प्रगटलें होतें ।

तेंचि सामावलें मागुतें । कृष्णरुपीं तिये ॥ ६४७ ॥

६४७) मग श्रीकृष्णानें विश्वरुपाचा पसारा घालून आपल्या सभोंवतीं जें अलौकिक योगाचें तेज प्रकट केले होतें, तेंच त्यानें पुन्हां त्या सगुण कृष्णरुपांत एकत्र करुन सांठविलें. 

जैसें त्वंपद हें आघवें । तत्पदार्थी सामावे ।

अथवा द्रुमाकारु साठवे । बीजकणिके जेवीं ॥ ६४८ ॥

६४८) ज्याप्रमाणें त्वम् हें सर्वपद ( अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र, परिच्छिन्न अशा जीवाचें लक्ष्य जें कूटस्थ चैतन्य तें ) तत् पदाच्या अर्थामध्यें ( सर्वज्ञ,सर्वशक्तिमान, स्वतंत्रविभु अशा ईश्र्वरतत्त्वाचें लक्ष्य जें ब्रह्म; त्यांत ) सामावतें अथवा वृक्षाचा सर्व आकार जसा बीजाच्या कणांत साठवतो;     

नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेइली जीवदशा ।

श्रीकृष्णें योगु तैसा । संहारिला तो ॥ ६४९ ॥

६४९) अथवा जीवाची जागृतावस्था ही स्वप्नाच्या सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते, त्याप्रमाणें तो योग ( विश्वरुपाचा विस्तार ) श्रीकृष्णांनी आपल्यांत सामावून घेतला.

जैसी प्रभा हारति बिंबीं । की जळदसंपत्ती नभीं ।

भरतें सिंधुगर्भों । रिंगालें राया ॥ ६५० ॥

६५०) ज्याप्रमाणें सूर्यादिकांचे तेज, हें सूर्यादिकांच्या बिंबांत सामावतें, किंवा मेघांचे समुदाय आकाशामध्यें लीन होतात; ( अथवा ) राजा धृतराष्ट्रा, समुद्राची भरती समुद्राच्या पोटात गडप होते;

हो कां ते कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्र्वरुपपटाची घडी ।

ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ॥ ६५१ ॥

६५१) त्याप्रमाणे कृष्णाकृतीच्या रुपानें जी विश्र्वरुपरुपी वस्त्राची घडी होती, ती अर्जुनाच्या पंसतीकरितां देवांनी उकलून दाखविली.

तंव परिमाणा रंगु । तेणें देखिला साविया चांगु ।

तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणोनि घडी केली पुढती ॥ ६५२ ॥

६५२) तेव्हां ( एखादें वस्त्र विकत घेणारें गिर्‍हाईक जसें त्या वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सहज पाहातें त्याप्रमाणें ) अर्जुनानें या विश्र्वरोरुपी वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सहज नीट पाहिला, त्या वेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभवच नाहीं; म्हणून देवांनीं विश्वरुप वस्त्राची सगुण कृष्णमूर्तिरुप पुन्हां घडी केली;  

तैसें वाढीचैनि बहुवसपणें । रुपें विश्र्व जिंतिलें जेणें ।

तें सौम्य कोडिसवाणें । साकार जाहलें ॥ ६५३ ॥

६५३) त्याप्रमाणेंआपल्या वाढीच्या अतिशय विस्तारानें ज्या कृष्णरुपानें विश्व जिंकलें होतें, तें विश्र्वरुपानें वाढलेलें कृष्णरुप ( पुन्हां ) शांत सगुण व सुंदर असें झालें.

किंबहुना अनंतें । धरिलें धाकुटपण मागुतें ।

परि आश्र्वासिलें पार्थातें । बिहालियासी ॥ ६५४ ॥

६५४) फार काय सांगावें ! श्रीकृष्णानें पुन्हां मर्यादित सगुण रुप धारण केलें, पण भ्यालेल्या अर्जुनाला धीर दिला.

तेथ जो स्वप्नीं स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला ।

तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी ॥ ६५५ ॥

६५५) त्या वेळीं स्वप्नांत स्वर्गांत गेलेला मनुष्य जसा

 अकस्मात जागा व्हावा ( म्हणजे तो जसा एकदम

 बदललेल्या परिस्थितीमुळें आश्चर्यचकित होतो ) तसें

 अर्जुनास आश्चर्य वाटलें. 

 


Custom Search