Friday, January 30, 2015

DeviMahatmya Adhyay 15 श्रीदेवीमाहात्म्ये अध्याय पंधरावा (१५)


DeviMahatmya Adhyay 15 
DeviMahatmya Adhyay 15 is in Marathi. It is a translation of DurgaSaptashi Adhyay 15 which is in Sanskrit. This Adhyay Markandey Rushi describes Dhyan and poojan of the Goddess. It is described that How to perform it and when and the falshruti. Goddess Mahakali, Mahalaxmi and Mahasaraswati Dhanyam are described first. Goddess Mahalaxmi, Goddess Mahakali and Goddess Mahasaraswati are all one same. Pooja is to be done of Goddess Mahalaxmi with Flowers, Deep, Naivedya, Argha and Gandha and Akashata. It is described that the devotee who perform pooja of Goddess Mahalaxmi is blessed as the leader of the world. Marathi Devi Mahatmya reading is very simple and without any rigid procedures and rules as such. However there are certain procedures are to be followed when devotee reads Saptashati in Sanskrit.
श्रीदेवीमाहात्म्ये अध्याय पंधरावा (१५)
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदेव्यै नमः ॥
सूत शौनकातें सांगत । मार्कंडेय शिष्या निरोपीत ।
मेधा सुरथासी कथीत । ध्यान पूजन देवीचें ॥ १ ॥
ऋषि म्हणे नृपालागुन । ऐकें देवीचें ध्यान पूजन ।
देवी असे त्रिगुणा आपण । राजसी तामसी सात्त्विकी ॥ २ ॥
त्रिप्रकारांची देवी जाण । विश्र्वस्वरुपें सर्व आपण ।
चंडिका दुर्गा भद्रा म्हणोन । बहुनामें वर्णिती ॥ ३ ॥
हरीची योगनिद्रा भगवती । ईस महाकाली म्हणती ।
ती तमोगणा असे निश्र्चितीं । मधु-कैटभमर्दिनी ते ॥ ४ ॥
मधु-कैटभनाशार्थ जाण । स्तविता जाहला कमलासन ।
तिचें स्वरुप करितों वर्णन । ध्यान ऐकें राजेन्द्रा ॥ ५ ॥
दशवदन दशभुज । दशपाद अनंत तेज ।
कृष्णवर्णा ती तेजःपुंज । विराजमान दिसतसे ॥ ६ ॥
तीन नेत्रांची शोभे माळा । यास्तव दिसतसे सोजवळा ।
तैशाचि दंतदाढा सकळा । भयंकर रुप दिसे ॥ ७ ॥
रुप-सौभाग्य-कांतीची । प्रतिष्ठा दिसतसे श्रीची ।
दाही हस्तकीं आयुधांची । प्रभा फांके दशदिशा ॥ ८ ॥
खङ्ग बाण गदा शूळ । शंख चक्र भृशंडी केवळ । 
परिघ कार्मुक शिरकमळ । गळत रुधिर धरी करीं ॥ ९ ॥
तीही प्रत्यक्ष वैष्णवी माया । महाकाली दुरत्यया ।
आराधितां पूजी जो तया । वश्य करी चराचर ॥ १० ॥
आतां सर्व देवशरिरांपासूनी । जी कां प्रकट जाहली भवानी । 
अमितप्रभा त्रिगुणरुपिणी । महालक्ष्मी प्रत्यक्ष ॥ ११ ॥
महिषमर्दिनी ती जाण । श्र्वेत असे तियेचे आनन ।
जियेचे भुजं नीलवर्ण । श्र्वेत स्तनमंडल जिचें ॥ १२ ॥
रक्तमध्य शरीर जाण । रक्त असती जियेचे चरण ।
जंघा ऊरु रक्तवर्ण । अत्यंत मद जियेचा ॥ १३ ॥
अत्यंत चित्र जियेचे जघन । चित्रमाल्यांबरभूषण । 
अंगी शोभे चित्रानुलेपन । कांतिरुप सौभाग्य शील ॥ १४ ॥
अष्टादशभुजा देवी । प्रेमभावें ती पूजावी ।
जी सहस्त्रबाहुवैभवीं । शोभतसे जगदंबा ॥ १५ ॥  
अष्टादशहस्तकीं जाण । आयुधें करीतसे धारण ।
दक्षिणाधःकरापासून । क्रमेंकरुन सांगिजेती ॥ १६ ॥
अक्षमाला कमल बाण । खङ्ग वज्र गदा धारण ।
चक्र त्रिशूल परशु जाण । शंख घंटा पाश तो ॥ १७ ॥
शक्ति दंड आणि चर्म । चाप पानपत्र कमंडलु उत्तम ।
हीं अष्टादश आयुधें परम । अलंकृत भुज तिहीं ॥ १८ ॥
सर्व देवतामयी जाण । ईशा महालक्ष्मी आपण ।
भावें करी जो आराधन । लोकस्वामी होय तो ॥ १९ ॥
सर्व लोकांचा होय पती । तो सर्व देवांचाही प्रभु निश्र्चिती ।
तयाची आज्ञा वागविती । इंद्रादि सर्व सुरवर ॥ २० ॥
आतां गौरीदेहापासून । जी कां जाहली उत्पन्न ।
जी सत्व गुणैकनिधान । महासरस्वती ती ॥ २१ ॥
जी शुंभासुरनिबर्हिणी । साक्षात् वर्णिली भवानी ।
जी अष्टभुजा आयुधपाणी । आयुधें तिचीं सांगतों ॥ २२ ॥
बाण मुसल शूल चक्र शंख । घंटा लांगल कार्मुक । 
अष्टहस्तकीं आयुधें देख । धरिती जाहली राजेंद्रा ॥ २३ ॥  
ही भक्तीनें आराधितां । सर्वज्ञत्व देतसे तत्त्वतां ।
शुंभ-निशुंभांसीं समरता । करिती जाहली जगदंबा ॥ २४ ॥
नरेंद्रा या प्रकारेंकरुन । मूर्तीचीं स्वरुपे केली वर्णन ।
या देवीचें उपासन । पृथक् पृथक् श्रवण करीं ॥ २५ ॥   
महालक्ष्मी अष्टादशभुजा । जेव्हां तियेची करावी पूजा ।
अथवा महाकाली महाराजा । अथवा सरस्वती पूजावी ॥ २६ ॥
मध्यदेवीच्या उत्तर-दक्षिण । अन्य दोघींचे करावें पूजन ।
पृष्ठभागीं त्रयमिथुन । पूजावें तें सांगतों ॥ २७ ॥
स्वरापत्नीसह चतुरानन । मध्यें तयाचें करावें पूजन ।
गौरीसहित पंचवदन । दक्षिणभागीं पूजावा ॥ २८ ॥
लक्ष्मीसहित नारायण । तयाचें वामभागीं पूजन । 
पुढें देवीचें त्रय मांडून । पूजा त्यांची करावी ॥ २९ ॥
जरी अष्टादशभुजा देवी । महालक्ष्मी स्थापावी ।
तिच्या वामभागीं पूजावी । महाकाली दशानना ॥ ३० ॥
दक्षिणभागीं सरस्वती । अष्टभुजा पूजावी निश्र्चितीं ।
आतां दुसरा प्रकार नृपती । तुजकारणें सांगतों ॥ ३१ ॥
महाकाली दशमुखा । मध्यें स्थापावी सुरेखा ।
अष्टादशभुजा देखा । ती दक्षिणभागीं स्थापावी ॥ ३२ ॥
अष्टबाहु सरस्वती । वामभागीं पूजावी निश्र्चितीं ।
तैसेंचि कालमृत्यूंतें पूजिती । दक्षिणोत्तरक्रमानें ॥ ३३ ॥
व्हावें सर्वारिष्टांचे निरसन । म्हणोनि काल-मृत्यूंचे पूजन ।
आणखी तिसरा प्रकार जाण । तुजलागीं सांगतों ॥ ३४ ॥
जेव्हां अष्टभुजा सरस्वती । जी शुंभातें जाहली मारिती ।
तियेची पूजा करावी निश्र्चितीं । ऐसें चित्तीं वाटेल ॥ ३५ ॥
तै तिसी मध्यें स्थापून । दक्षिणेसी करावें लक्ष्मीपूजन ।
वामभागीं काली पूर्ण । पूजावी भक्त नम्र होऊनियां ॥ ३६ ॥
अग्रभागीं देवीत्रय जाण । पृष्ठीं मिथुनत्रय पूजन ।
पूर्वी सांगितल्याप्रमाण । नवशक्ति पूजाव्या ॥ ३७ ॥
अथवा तियेच्या नवशक्ती । त्यांचे पूजन करावें निश्र्चितीं ।
सांगतों त्याच्या नामांप्रती । त्या नवदुर्गा जाणाव्या ॥ ३८ ॥
शैल्यपुत्री ब्रह्मचारिणी । चंद्रघंटा कूष्मांडा स्कंदजननी ।
सहावी जाणावी कात्यायनी । कालरात्रि सातवी ती ॥ ३९ ॥
महागौरी आठवी जाण । सिद्धिदात्री नववी पूर्ण । 
नवदुर्गा अनुक्रमेंकरुन । पूजाकाळीं पूजाव्या ॥ ४० ॥
अथवा वैश्र्वानरपीठाचे ठायी । नवशक्तींतें वर्णिले पाहीं ।
त्यांची नामें ऐक लवलाहीं । त्या पीठदेवता जाणाव्या ॥ ४१ ॥
पीता श्र्वेता अरुणा जाण । कृष्णा धूम्रा तीव्रा आपण ।
स्फुलिंगिनी रुचिरा पूर्ण । ज्वालिनी ती नववी पैं ॥ ४२ ॥
पूजन या नवशक्तींचें । अवश्य आधीं करावें साचें ।
रुद्र विनायक याही देवांचे । दक्षिणोत्तर पूजन करावें ॥ ४३ ॥
असो या प्रकारेंकरुन । सांगितलें पूजाविधान । 
' नमो देव्यै ' या स्तोत्रें जाण । महालक्ष्मी स्तवावी ॥ ४४ ॥
अवतारत्रयाची पूजा । जेव्हां करावी महाराजा ।
संपूर्णमंत्रे स्तोत्रें सहजा । ज्यांची त्यांसी म्हणावीं ॥ ४५ ॥
महालक्ष्मीचें आराधन । प्रेमभावें करावें पूजन ।
महालक्ष्मी तीचि महाकाली जाण । तीचि महासरस्वती ॥ ४६ ॥
मूळमाया एकचि साचार । तिचेचि हे तीन अवतार ।
कार्यार्थ घेतले समग्र । संशय नाहीं सर्वथा ॥ ४७ ॥
जो महालक्ष्मीची पूजा करी । तो या जगाचा प्रभु निर्धारी ।
त्या कारणास्तव पूजी सत्वरीं । चंडिकेतें सर्वदा ॥ ४८ ॥
ती भक्तवत्सला जगन्माता । तियेची पूजा करावी तत्त्वतां ।
अर्घ्यादि भूषणें गंधाक्षता । पुष्प धूप दीप नैवेद्य ॥ ४९ ॥
राजोपचारें यथाशक्ती । भावें पूजावी भगवती । 
नाना भक्ष्य भोग्यसमन्विती । नैवेद्य तियेसी अर्पावा ॥ ५० ॥ 
सुरा-मांस-रुधिराक्त । बलि करावा समर्पित ।
करुं नये ब्राह्मणें यथार्थ । क्षत्रियानें करावा ॥ ५१ ॥
यथाधिकारें बलि करुन । मग देवीसी करावें नमन ।
आचमनीय सुगंध चंदन । करोद्वर्तन अर्पावें ॥ ५२ ॥
सकर्पूर तांबूल अर्पण । भक्तिभावें करावें जाण ।
सद्गदित अंतःकरण । वारंवार असावें ॥ ५३ ॥
देवीच्या अग्रभागीं सत्वर । अथवा वामभागी निरंतर ।
छिन्नशीर्ष महिषासुर । पूजा त्याची करावी ॥ ५४ ॥
देवीची जी सायुज्यमुक्ती । तयासी प्राप्त असे निश्र्चितीं । 
म्हणोनि तो देवपंक्तीं । महिषासुर पूजावा ॥ ५५ ॥ 
देवीच्या अग्रभागीं जाण । अथवा दक्षिणभागीं आपण ।
देवीचें प्रिय सिंहवाहन । पूजा त्याची करावी ॥ ५६ ॥
जो मूर्तिमंत धर्म समग्र । जेणें धरिलें चराचर ।
घेऊनि सिंहाचा अवतार । सेवा करी जगदंबेची ॥ ५७ ॥
जें जें कांहीं करावें देवीस । व्हावें तेव्हां एकाग्रमानस ।
मग कृतांजलि सावकाश । होऊनि स्तवन करावें ॥ ५८ ॥ 
संस्कृत अथवा प्राकृत । पठण करावीं तिन्ही चरितें ।
जितुका असेल आपुला हेत । तितुकें प्राकृत वाचावें ॥ ५९ ॥
प्राकृत ग्रंथ वाचितां पाहीं । त्यासी नेम कांहीचि नाहीं ।
एक पत्र अथवा सर्वही । वाचितां जगदंबा संतोषे ॥ ६० ॥
संस्कृत सप्तशतीचा अर्थ । पुराणिक सांगती यथार्थ ।
जैसा अवकाश मनोरथ । तितुकीं पत्रें वाचिती ॥ ६१ ॥
म्हणोनि प्राकृत माहात्म्य जाण । पाहिजे तितुके करावें पठण ।
परी संस्कृताचें असे कठिण । येथें वर्णन केलें तें ॥ ६२ ॥
संस्कृत माहात्म्य करितां पठण । आधीं छंद ऋषि देवता ध्यान । 
बीज शक्ति शापमोचन । केल्यांवांचोन व्यर्थ तें ॥ ६३ ॥
या सप्तशतीस्तोत्राचा जाण । मेधा ऋषि असे आपण ।
गायत्र्यादि सप्त छंद पूर्ण । तिन्ही देवता अनुक्रमें ॥ ६४ ॥
प्रथम चरित्राचा जाण । ब्रह्मा ऋषि असे आपण ।
गायत्रीचा छंद पूर्ण । महाकाली देवता ॥ ६५ ॥
नंदा शक्ति रक्तदंतिका बीज । अग्नि तत्त्व जाण सुतेज । 
महाकालीप्रीत्यर्थ सहज । जपविनियोग करावा ॥ ६६ ॥
मध्यम चरित्राचा जाण । विष्णु ऋषि असे आपण ।
उष्णिक् नामें छंद पूर्ण । महालक्ष्मी देवता ॥ ६७ ॥
शाकंभरी शक्ति दुर्गा बीज । वायु तत्त्व असे सुतेज ।
महालक्ष्मीप्रीत्यर्थ सहज । जपविनियोग करावा ॥ ६८ ॥
अंत्यचरित्राचा जाण । रुद्र ऋषि असे आपण ।
अनुष्टुप् हाचि छंद पूर्ण । महासरस्वती देवता ॥ ६९ ॥
भीमा शक्ति भ्रामरी बीज । सूर्य तत्त्व असे सुतेज ।
महासरस्वतीप्रीत्यर्थ सहज । जपविनियोग करावा ॥ ७० ॥
ऐसे छंद ऋषि उच्चारुन । कवच अर्गला कीलक जपोन ।
सरहस्य करावें पठन । नाहींतरी व्यर्थ असे ॥ ७१ ॥
कोणी ऐसें जपती जाण । अर्गला कीलक कवच जपोन ।
मग रहस्य करिती पठन । त्यासही प्रामण असे कीं ॥ ७२ ॥
अक्षर रेफ विसर्ग चुकतां । तत्काळ विघ्न होय तत्त्वतां ।
शापमोचनावांचूनि हाता । फल न ये कदापि ॥ ७३ ॥
आणिक एक असे अटक । तेही सांगतों तुज सम्यक ।
पाठ संपुटित सकळिक । तो संस्कृताचा करावा ॥ ७४ ३
संपुटित म्हणिजे जाण । जो कां मंत्र असे नवार्ण ।
त्याचीं नव अक्षरें पूर्ण । मूळमंत्र जाणावा ॥ ७५ ॥
त्या मंत्राचे न्यास देख । एकादश असती सम्यक ।
ऋषि छंद देवता ध्यानादिक । अनुक्रमें करावें ॥ ७६ ॥
नवार्णमंत्राचा जप जाण । पाठापूर्वीं शत करुन ।
पाठाअंतींही शत आपण । जप करावा मंत्राचा ॥ ७७ ॥
तरीच चंडीपाठाचें फळ । प्राप्त होतसे शीघ्र केवळ ।
नाहींतरी व्यर्थ सकळ । अनुष्ठान पाठाचें ॥ ७८ ॥
यथाविधि ग्रंथपूजन । आद्यंतीं करावें संपूर्ण ।
आद्यंतीं प्रणव लावून । चंडीपाठ करावा ॥ ७९ ॥
उत्कीलन रात्रिसूक्त जाण । पाठारंभीं करावें पठण ।
पाठांतीं देवीसूक्त संपूर्ण । पठण निवेदन करावें ॥ ८० ॥
देवीकारणें जप-निवेदन । सुरभ्यादि अष्टमुद्रादर्शन ।
अथवा रात्रिसूक्त देवीसूक्त जाण । पाठानुक्रमें करावें ॥ ८१ ॥
सुरभि ज्ञान शूर्प योनी । कूर्म पंकज लिंग निर्याणी ।
ह्या अष्टमुद्रा तत्क्षणीं । जपाअंतीं दाखवाव्या ॥ ८२ ॥
एक चरित्र करणें पठण । तरी मध्यम वाचावें संपूर्ण ।
मध्यमचरित्राचा जाण । अर्धपाठ करुं नये ॥ ८३ ॥
अर्धपाठ केला असतां । विघ्न होतसे तत्त्वतां । 
तें मध्यमचरित्र वाचितां । तीन अध्याय असती पैं ॥ ८४ ॥
प्रथमचरित्राचा पाठ । एकचि करुं नये स्पष्ट ।
तीन वाचावीं चरित्रें श्रेष्ठ । अथवा दोन वाचावीं ॥ ८५ ॥
तैसाचि अंत्यचरित्राचा पाठ । एकचि करुं नये स्पष्ट ।
वाचावें तिन्ही पाठ वरिष्ठ । अथवा दोन वाचावें ॥ ८६ ॥
कोणत्याही चरित्राचा । पाठ नसावा अर्ध साचा । 
ऐसा प्रकार संस्कृताचा । प्राकृतीं तो असेना ॥ ८७ ॥
असो या माहात्म्यें स्तवन । करुनि करावी प्रदक्षिणा ।
साष्टांग घालूनियां नमन । मस्तकीं अंजलि धरावा ॥ ८८ ॥
' जगदंबे क्षमस्व ' म्हणोन । देवीचें करावें क्षमापन ।
वारंवार निरालस्य होऊन । प्रार्थावी ती जगदंबा ॥ ८९ ॥
प्रतिश्र्लोकीं करावें हवन । ऐसें येथें आहे वर्णन । 
या सप्तशतीचा जाण । हवनप्रकार सांगतों ॥ ९० ॥
डामरादि तंत्रसारग्रंथीं । मंडनकृत मालामंत्रपद्धती ।
भैरवादि सर्व तंत्रांची युक्ती । पाहूनि येथें सांगेन ॥ ९१ ॥
या सप्तशतींत साचार । सात अनुष्ठानांचे प्रकार ।
वर्णिले असती सविस्तर । अनुक्रमें परियेसीं ॥ ९२ ॥
एक नवरात्रविधान जाण । दुसरें नित्यचंडीविधान ।
तिसरें नवदुर्गानुष्ठान । कालरात्रि चवथी ती ॥ ९३ ॥
पांचवी नवचंडी ती जाण । सहावी शतचंडी आपण ।
सहस्त्रचंडी सातवी पूर्ण । हे सात प्रकार जाणावें ॥ ९४ ॥
सहस्त्रचंडीप्रकारेंकरुन । लक्ष-कोटिचंडी करावी पूर्ण । 
आतां या सातांचे अनुष्ठान । अनुक्रमें सागतो ॥ ९५ ॥
आश्र्विनशुक्ल प्रतिपदेपासून । नवरात्र नवमीपर्यंत जाण ।
उपवास अथवा नक्त करुन । अथवा एकभुक्त असावें ॥ ९६ ॥
उपवासाचें उत्तम फळ । नक्ताचें मध्यम असे केवळ ।
एकभुक्ताचें कनिष्ठ सकळ । फळ प्राप्त असे तें ॥ ९७ ३
एकभुक्त व्रताचरण । तिंही भक्षावें हविष्यान्न ।
अथवा अयाचित भक्षण । फळ उत्तम तयाचें ॥ ९८ ॥
न मागतां प्राप्त होईल । तेंचि अयाचित केवळ । 
स्वकीयवर्णदत्त सकळ । तेंचि उत्तम व्रतासी ॥ ९९ ॥
असो या प्रकारेंकरुन । करावें नवरात्रविधान ।
प्रतिदिनीं एकैक पाठ जाण । नव पाठ करावें ॥ १०० ॥
करुनि संपुटित मंत्र नवार्ण । कवच अर्गला कीलक जपोन ।
सरहस्य करावें पठण । विप्रद्वारा स्वयें वा ॥ १०१ ॥   
नवमीच्या पाठासुद्धां जाण । अष्टमीस करावे पाठ दोन ।
अष्टमीदिवसीं अधिवासन । होमारंभ करावा ॥ १०२ ॥
नवमीदिवसीं होमसमाप्ती । करोनि अर्पावी पूर्णाहुती ।
एक एक कुमारी निश्र्चितीं । प्रतिदिनीं जेववावी ॥ १०३ ॥
सुवासिनी ब्राह्मणभोजन । करावें यथाशक्ति आपण ।
परंतु मुख्य कुमारीपूजन । नवरात्रविधानीं बोलिलें ॥ १०४ ॥
नव सुवासिनी एक कुमारी । फळ समान असे निर्धारीं ।
पायस तिल घृत अवधारीं । हीं मुख्य द्रव्यें होमाचीं ॥ १०५ ॥
नवरात्राचें हवन उत्तम । येथें नाहीं दशांश होम ।
बहु पाठ करवितां उत्तम । प्रधानहोम एकचि ॥ १०६ ॥
स्वशाखेचा आचार्य जाण । तेणें स्वगृह्यविधि पाहून ।
मग करावें पात्रासादान । ऐसें येथें वर्णिलें ॥ १०७ ॥
सप्तशतीचें पुरश्र्चरण । चार प्रकारचें असे जाण । 
जप होम तर्पण मार्जन । उत्तरोत्तर अधिक फळ ॥ १०८ ॥
पाठ देवीचे आमंत्रण । हवन हें देवीचें भोजन । 
तर्पणेंकरुनि रोगशमन । कुष्ठ जाय मार्जनें ॥ १०९ ॥
जप यथोक्त पाठेंकरुन । होम तो मंत्रविभागें जाण ।
' ॐनमः स्वाहा ' म्हणोन । आहुति अर्पण करावी ॥ ११० ॥
' तर्पयामि ' ऐसें म्हणोन । मग करावें तर्पण ।
' मार्जयामि ' येणें मार्जन । देहशुद्धि होतसे ॥ १११ ॥
धनवंत तो तेणें पाहीं । होम करावा सर्वदाही ।
निर्धनासी कारण नाहीं । तेणें पाठ मात्र करावा ॥ ११२ ॥
सर्वाहूनि उत्तम देख । श्रवण-पठणाचें फल अधिक ।
बारावें अध्यायीं सकळिक । देवीनें स्वयें वर्णिलें ॥ ११३ ॥
नवरात्राचे ठायीं जाण । रात्रीं करावें देवीपूजन ।
त्याचें अधिक महिमान । जागरण करावें ॥ ११४ ॥
देवीकथा कराव्या श्रवण । अथवा कराव्या निरुपण । महोत्साह देवीचा जाण । यथाशक्ति करावा ॥ ११५ ॥
सर्व अनुष्ठानीं जाण । हाचि विधि सांगितला पूर्ण ।
ऐसें वर्णिलें नवरात्रविधान । आतां पुढें श्रवण करा ॥ ११६ ॥              
पाहूनि शुभ मास शुभ मुहूर्त । शुक्लचतुर्दशीपासूनि निश्र्चित ।
पुनः शुक्लचतुर्दशीपर्यंत । तीस दिवस नित्यचंडी ॥ ११७ ॥
प्रतिदिनीं एकैक पाठ करोनी । तिसावा पाठ करावा पूर्वदिनीं ।
तें दिवसीं अधिवासन योजुनी । पुण्याहवाचन करावें ॥ ११८ ॥
तिसावे दिवशीं दशांश होम । पायस-तिल-घृतें-उत्तम ।
दशांश तर्पण मार्जन परम । यथाशक्ति करावें ॥ ११९ ॥
नित्य एकैक कुमारीभोजन । व्रतस्थ असावें तीस दिन ।
सामर्थ्य नसतां ब्राह्मणभोजन । यथाशक्ति करावें ॥ १२० ॥
जयासी न घडे होम स्पष्ट । तेणें करावा दशांश पाठ ।
तर्पण-मार्जनाभावें निकृष्ट । दशांश पाठ करावा ॥ १२१ ॥
असो या प्रकारेंकरुन । सांगितलें नित्यचंडीविधान ।
पुढें नवदुर्गा-अनुष्ठान । श्रवण आतां करावें ॥ १२२ ॥
पाहूनि शुभ मास शुभ मुहूर्त । शुक्लषष्ठीपासूनि निश्र्चित ।
शुक्लचतुर्दशीपर्यंत । नव दिवस नवदुर्गा ॥ १२३ ॥
प्रतिदिनीं एकैक पाठ करोनी । नववा पाठ करावा पूर्वदिनीं ।
ते दिवसीं अधिवासन योजोनी । होमारंभ करावा ॥ १२४ ॥
नववे दिवसीं मुख्य होम । पायस-तिल-घृतें उत्तम ।
यथावकाशें तर्पण-मार्जन परम । दशांशता येथें नाहीं ॥ १२५ ॥
प्रतिदिनीं एक एक कुमारी- । पूजन करावें अवधारीं ।
नवदुर्गाव्रत यापरी । संकटनाशन करावें ॥ १२६ ॥
ऐसिया प्रकारें जाण । केलें नवदुर्गाव्रतवर्णन ।
आतां कालरात्रिनिरुपण । सांगतों तें श्रवण करा ॥ १२७ ॥
पाहूनि शुभ मास शुभ मुहूर्त । कृष्णष्ठीपासूनि निश्र्चित ।
कृष्णचतुर्दशीपर्यंत । नव दिवस कालरात्री ॥ १२८ ॥
एकैक पाठ प्रत्यहीं करुनी । नवम करावा पूर्वदिनीं ।
अष्टमदिनीं अधिवासनीं । पुण्याहवाचन करावें ॥ १२९ ॥
नवमदिनीं मुख्य होम । पायस-तिल-घृतें उत्तम ।
यथाविधि तर्पण मार्जन परम । नेम दशांशता येथें नसे ॥ १३० ॥
प्रतिदिनीं एकेक कुमारी- । पूजन करावें अवधारीं ।
संकटकाळी ही चतुरीं । कालरात्रि योजावी ॥ १३१ ॥
असो या प्रकारेंकरुन । कालरात्रीचें निरुपण । 
संक्षेपें केलें तुजलागून । हीं चार विधानें सांगितलीं ॥ १३२ ॥
या चहूं विधानांचे ठायीं । पाठ एकैक करावा पाहीं ।
एकैक कुमारीभोजन तेंही । प्रत्येक दिवसीं करावें ॥ १३३ ॥
होमाचीं मुख्य द्रव्यें जाण । त्यांचें केले निरुपण ।
समिधा उपद्रव्यांचें वर्णन । होमविधानी सांगूं तें ॥ १३४ ॥
आतां नवचंडीचें विधान । सांगतो मी तुजलागून ।
एकचित्तें करीं श्रवण । नवचंडीप्रकार तो ॥ १३५ ॥
आश्र्विनशुक्लप्रतिपदेपासून । नवमीपर्यंत जे नव दिन ।
नव दिवसवरी अनुष्ठान । नवचंडीचें बोलिलें ॥ १३६ ॥
प्रतिदिनीं एकोत्तर वृद्धिपाठ । नव दिन करवावे स्पष्ट ।
नवमदिनींचे नव पाठ वरिष्ठ । अष्टमदिनीं करवावे ॥ १३७ ॥
पाठार्थ वरावे ब्राह्मण । प्रतिदिनीं एकैक नूतन ।
नवमीच्या पाठाचा विप्र जाण । अष्टमीदिवसीं वरावा ॥ १३८ ॥
प्रथमदिवसीं एक पाठ । दुसरें दिवसीं दोन स्पष्ट । 
तृतीय दिनीं तीन वरिष्ठ । ऐसे एकाधिक प्रत्यहीं ॥ १३९ ॥
एवं नवमे दिवसीं नव पाठ । ते करावे अष्टमदिनीं स्पष्ट ।
अधिवासन करुनि नीट । पुण्याहवाचन करावें ॥ १४० ॥
नवमीदिवसीं दशांश होम । पूर्णाहुति करावी उत्तम ।
तर्पण-मार्जनांचा धर्म । दशांशमानें करावा ॥ १४१ ॥
प्रथमदिनीं कुमारी एक । द्वितीयदिनीं दोन देख ।
तृतीयेसी तीन सम्यक । चतुर्थदिनीं चार त्या ॥ १४२ ॥
ऐसी एकैकवृद्धि करुन । कुमारिकांचे करावें पूजन ।
नवमीदिवसीं नव जाण । कुमारिका पूजाव्या ॥ १४३ ॥
एवं पंचचत्वारिंशत । पाठ करवावे यथास्थित ।
तितुक्याचि कुमारी निश्र्चित । सुवासिनी तितुक्याचि ॥ १४४ ॥
ब्राह्मण पंचचत्वारिंशत । भोजनीं करावें सर्वां तृप्त ।
अथवा यथाशक्ति निश्र्चित । ब्राह्मण वरावे पाठार्थी ॥ १४५ ॥
असो या प्रकारेंकरुन । करावें नवचंडीव्रत जाण ।
करितां याचें अनुष्ठान । सर्व संकटें निरसती ॥ १४६ ॥
आतां शतचंडीचें अनुष्ठान । सांगतो मी तुम्हांलागून ।
शुभ मास मुहूर्त पाहून । आरंभावी शतचंडी ॥ १४७ ॥ 
सप्तशतीचे पाठ शत । संपवावे चहूं दिवसांत ।
पांचवे दिवसीं निश्र्चित । होमहवन करावें ॥ १४८ ॥
दहा ब्राह्मण आमंत्रून । दशोत्तरवृद्धि पाठ जाण ।
प्रतिदिवसीं करवावे पूर्ण । चतुर्थदिवसीं शत होती ॥ १४९ ॥
यापरी द्विजमुखेंकरुन । शत पाठ करवावे जाण । 
चतुर्थ दिवसीं संपवून । अधिवासन करावें ॥ १५० ॥
द्रव्यसामर्थ्य असतां पूर्ण । प्रथमदिवसीं दहा ब्राह्मण ।
दुसरें दिवसीं पाठालागून । वीस ब्राह्मण आमंत्रावे ॥ १५१ ॥
तिसरे दिवसीं तीस द्विज । चौथे दिनीं चाळीस सतेज ।
ऐसे शत द्विजमुखें पाठ सहज । करुनि शतचंडी करावी ॥ १५२ ॥
ऐसे शत पाठ संपवून । चतुर्थदिवसीं अधिवासन । 
नांदिश्राद्ध पुण्याहवाचन । चतुर्थदिनीं करावें ॥ १५३ ॥
पंचमदिनीं दशांश हवन । करावें दशांश तर्पण मार्जन ।
प्रतिदिनीं कुमारीभोजन । दशोत्तरवृद्धि करावे ॥ १५४ ॥
अथवा पांचवे दिवसीं जाण । नांदिश्राद्धान्त पुण्याहवाचन ।
करोनि दशांश होम तर्पण । पूर्णाहूति अर्पावी ॥ १५५ ॥
प्रथमदिवसीं कुमारी दश । दुसरे दिवसीं पूजाव्या वीस ।
तृतीयदिनीं कुमारी तीस । चतुर्थीसी चाळीस असाव्या ॥ १५६ ॥
कुमारीऐशाचि प्रतिदिनीं । दशोत्तरवृद्धि सुवासिनी ।
तैसेचि ब्राह्मण सर्व मिळोनी । समारंभ करावा ॥ १५७ ॥
जरी होम तर्पण मार्जन । कदा न घडे आपणासी जाण ।
तद्भावें दशांश पाठप्रमाण । ब्राह्मणभोजन यथाशक्ति ॥ १५८ ॥
असो या प्रकारेंकरुन । शतचंडीचे अनुष्ठान । 
करितां सर्वासी कल्याण । प्राप्त होय निर्धारें ॥ १५९ ॥
याचें करितां अनुष्ठान । सर्व बाधा जाती निरसून ।
सकळ संकटांपासून । मुक्तता होय तत्काळीं ॥ १६० ॥
आतां सहस्त्रचंडी-अनुष्ठान । सांगतों तें करावें श्रवण ।
पूर्ववत शुभ दिन पाहून । आरंभावी सहस्त्रचंडी ॥ १६१ ॥
सप्तशतीचे पाठ सहस्त्र । चहूं दिवसांत करावे समग्र ।
पांचवे दिवसीं होम सत्वर । दशांशभागें करावा ॥ १६२ ॥
शत ब्राह्मण आमंत्रून । शतोत्तरवृद्धि पाठ जाण । 
प्रतिदिवसीं करवावे पूर्ण । सहस्त्र होती चवथे दिवसीं ॥ १६३ ॥
प्रथमदिवसीं एक शत । द्वितीयदिनीं दोनशेंपर्यंत ।
तृतीयदिनीं त्रिशत निश्र्चित । चार शत चवथें दिनीं ॥ १६४ ॥
एक शत ब्राह्मणद्वारा । सहस्त्र पाठ वेगें करा ।
यद्वा शतोत्तरवृद्धि द्विजवरां । आमंत्रावें अनुक्रमें ॥ १६५ ॥
प्रथम दिवसीं शत ब्राह्मण । द्वितीयदिनीं दोनशेंपर्यंत ।
तृतीयदिनीं शतकें तीन । चार शतकें चौथे दिनीं ॥ १६६ ॥ 
चौथे दिवसीं  समाप्ती । करावी सहस्त्रचंडी निश्र्चितीं ।
स्वस्तिवाचन अधिवासस्थिती । चतुर्थदिनीं करावी ॥ १६७ ॥
पंचमदिनी दशांशहवन । दशांश करावें तर्पण-मार्जन ।
प्रतिदिनीं कुमारीभोजन । शतोत्तरवृद्धि करावें ॥ १६८ ॥
प्रथमदिनीं कुमारी शत । द्वितीयदिनी द्विशत निश्र्चित ।
तृतीयदिनीं त्रिशतपर्यंत । चार शतकें चौथेदिनीं ॥ १६९ ॥
आद्यदिनीं सुवासिनी शत । द्वितीयदिनीं द्विशत निश्र्चित ।
तिसरें दिनीं त्रिशतपर्यंत । चार शते चवथे दिनीं ॥ १७० ॥                 
एवं सहस्त्रसंख्या ब्राह्मण । सहस्त्रकुमारींचें पूजन ।
तितुक्याचि सुवासिनी जाण । ब्राह्मणभोजन यथाशक्ति ॥ १७१ ॥
जरी होम तर्पण मार्जन । कदा न घडे आपणासी जाण ।
तदभावीं दशांश पाठ पूर्ण । सहस्त्रचंडीचा करावा ॥ १७२ ॥
श्रवण-पठनांचे केवळ फळ । बारावें अध्यायीं वर्णिलें सकळ ।
म्हणोनि जें करावें तें सफळ । होत असे निश्र्चियें ॥ १७३ ॥
असो या प्रकारेंकरुन । सहस्त्रचंडीचें केलें वर्णन ।
याचें करितां अनुष्ठान । सर्व बाधा निरसती ॥ १७४ ॥
सहस्त्रचंडीचें अनुष्ठान । पाहोनि लक्षकोटिचंडी जाण ।
करावी सामर्थ्य असलिया पूर्ण । द्रव्यबळेंकरुनियां ॥ १७५ ॥
ब्रह्मचारियासी जाण । सिद्धि होय पाठेंकरुन ।
गृहस्थासी मुख्य हवन । तर्पण करणें वानप्रस्थी ॥ १७६ ॥
संन्यासियासी मार्जन । मुख्य बोलिलें असे जाण ।
आश्रमपरत्वें धर्म पूर्ण । सिद्धिकारणें निवेदिले ॥ १७७ ॥
अतिसंकट महोत्पात । महाभय जाहलिया प्राप्त ।
वंशवृद्धि व्हावया निश्र्चित । शतचंडी करावी ॥ १७८ ॥
अनावृष्टि महामारी । महारोग व्यापतां शरीरीं ।
बालग्रह ब्रह्मराक्षस फेपरी । यांसीं शतचंडी मुख्य असे ॥ १७९ ॥
शतचंडीचा मंडप जाण । सांगतों मी तुम्हांलागून ।
शुभ मास मुहूर्त पाहून । मंडप जाण करावा ॥ १८० ॥
षोडश स्तंभमंडित जाण । चतुर्द्वारें करावा निर्माण ।
शतचंडीमंडपप्रमाण । सांगितलें तुजलागीं ॥ १८१ ॥
सहस्त्रचंडीच्या मंडपा । विंशति स्तंभ निर्मावे नृपा ।
ध्वज पताका कटादि साक्षेपा । शोभा तयासी आणावी ॥ १८२ ॥
करावा चतुर्द्वारमंडित । वस्त्रादिकें शोभा बहुत ।
मंडपामध्ये वेदिका निश्र्चित । देवी तेथें पूजावी ॥ १८३ ॥
देवीच्या ईशान्येसी जाण । ग्रहपीठ करावें निर्माण ।
पाहोनियां नैऋत्यकोण । वास्तुपीठ निर्मावें ॥ १८४ ॥ देवीपीठाच्या पश्र्चिमेसी । कुंड निर्मावें होमासी ।
मेखलायोनिकंठासी । यथाविधि निर्मावें ॥ १८५ ॥
सहस्त्रोमाचे ठायीं जाण । चतुर्हस्त कुंड निर्माण ।
लक्षवृद्धीचे ठायीं प्रमाण । हस्तवृद्धि करावी ॥ १८६ ॥
सहस्त्रचंडीचे ठायीं जाण । चतुर्हस्त कुंडप्रमाण ।
शतचंडीकुंडाचें मान । दोन हस्त चतुरस्त्र ॥ १८७ ॥
शतचंडीचें दशांश हवन । त्यांहूनि जें हवन न्यून ।
हस्तमात्र कुंड प्रमाण । अथवा स्थंडिलें निर्मावीं ॥ १८८ ॥
पूर्वोक्त ईशान्यग्रहवेदिका । हस्तमात्र निर्मावी देखा ।
मध्यें देवीची वेदी सुरेखा । अष्टकोणा निर्मावी ॥ १८९ ॥
हस्त्तोच्चमात्र प्रमाण सकळ । तदुपरी निर्मावें वरुणमंडळ ।
अथवा सर्वतोभद्र केवळ । वेदीवरी निर्मावें ॥ १९० ॥
नाना दीप रंगमाळा काढून । विचित्र मंगलवाद्यें वाजवून ।
देवीचा महोत्सव संपूर्ण । यथाशक्ति करावा ॥ १९१ ॥
आतां सांगतों प्रतिमाप्रमाण । शिला-मृतिका-धातु-रत्न ।
काष्ट-वालुका-चित्रलेखन । मनोमय ह्या आठ जाणा ॥ १९२ ॥
शिलामय उच्च चतुरंगुळ । वितस्ति उच्च धातूचि केवळ ।
उच्च द्वादशांगुळ सकळ । काष्ठमयी निर्मावी ॥ १९३ ॥
काष्ठमय प्रतिमेचा विस्तार । चतुरंगुळ करावा सुंदर ।
मृत्तिकामय प्रतिमा साचार । चोवीस अंगुळें उच्च ती ॥ १९४ ॥
मृतिकाप्रतिमेचा विस्तार । षडंगुळ असावा साचार ।
रत्नांची प्रतिमा ती सुंदर । अंगुष्ठपर्वमात्र निर्मावी ॥ १९५ ॥
सकळ प्रतिमा ज्या त्यांहून । मृन्मय प्रतिमा वरिष्ठ जाण ।
ऐसें मंत्रलिंग असे पूर्ण । महीमयी म्हणोनि ॥ १९६ ॥
महीमयीचें आराधन । सुरथराजा करुनि जाण ।
सावर्णि मनु जाहला पूर्ण । चौदांमध्यें श्रेष्ठ तो ॥ १९७ ॥
असो महालक्ष्मीचा श्रेष्ठ महिमा । अष्टादशभुजा करावी प्रतिमा । 
अथवा अष्टभुजा असे सुगमा । यद्वा चतुर्भुज करावी ॥ १९८ ॥
ती एकचि करितां निर्माण । सर्व देवता संतुष्ट पूर्ण ।
आतां ऐका एकाग्र होऊन । एकचि ध्यान तिहींचें ॥ १९९ ॥
ध्यान 
या माता मधुकैटभप्रमथनी या माहिषोन्मूलिनी,
या धूम्रेक्षणचंडमुंडमथनी । या रक्तबीजाशनी ।
शक्तिः शुम्भनिशुम्भ दैत्यदलिनी या सिद्धिलक्ष्मीः परा, सा चण्डी नवकोटिमूर्तिशिता मां पातु विश्र्वेश्र्वरी ।
ऐसा वर्णिला ध्यानप्रकार । आतां सांगतो यंत्रोद्वार ।
जें यंत्र काढिता सत्वर । प्रत्यक्ष देवी बैसे वरी ॥ २०० ॥
यंत्री देवी स्थापिल्यावांचून । पाठाचे फळ न होय पूर्ण ।
ऐसें सकळ यंत्रीं वर्णन । केलें असे निश्र्चयें ॥ २०१ ॥
आंत मध्ये काढूनि त्रिकोण । त्याचेबाहेरी षटकोन जाण ।
त्याचे बाहेरी वृत्त वेष्टून । बाह्याष्टदळें काढावीं ॥ २०२ ॥
त्याचे बाहेर धरणित्रय । चतुरस्त्र काढितां होय । 
त्याचे बाहेर करावी सोय । चतुर्द्वारांची ॥ २०३ ॥
ऐसें यंत्र निर्मूनि निश्र्चित । पंचरंगे करावें शोभिवंत ।
तेथें देवी येऊनि बैसत । संशय नाहीं सर्वथा ॥ २०४ ॥
सुवर्ण रौप्य ताम्र जाण । त्याचें यंत्र करावें निर्माण ।
तें देवीचें कल्पोनि आसन । यंत्रावरी स्थापावी ॥ २०५ ॥
उदक अथवा गोमयेंकरुन । तेणें यंत्र करावें निर्माण ।
शंख-घंटा-कलशपूजन । यंत्रावरी करावें ॥ २०६ ॥
जितुके शक्तिपर पूजन । तितुकें यंत्रीं करावें जाण ।
अग्नीपासीं उष्णता पूर्ण । तैसी देवीयंत्रापासीं ॥ २०७ ॥
देवीपर असे जो कां होम । कुंड अथवा स्थंडिलें परम ।
संस्कारकाळीं यंत्र उत्तम । अवश्यमेव काढावें ।
॥ २०८ ॥
देवीच्या अष्टगंधे लिहून । जो आपणासीं करी रक्षण ।
भूत-प्रेत-पिशाच जाण । बाधा न करी तयासी ॥ २०९ ॥
अगरु कस्तूरी गोरोचन । कुंकुम मांसी नख चंदन ।
अष्टम तगराचें गंध जाण । गंधाष्टक देवीचें ॥ २१० ॥
आतां नाना होमद्रव्यें जाण । त्यांचें करितों निरुपण ।
पायस तिल घृत हीं पूर्ण । मुख्य द्रव्यें होमाचीं ॥ २११ ॥
दधि क्षीर आणि घृत । येणें वीर्यवृद्धि होय निश्र्चित ।
तिल-तंडुलें बळाद्भुत । यवें बंधुबळ पावें तो ॥ २१२ ॥
समिधा-अश्र्वत्थ-पलाश जाण । अर्क अपामार्ग दलेंकरुन ।
पलाशपुष्पें करी हवन । लक्ष्मी प्राप्त तयासी ॥ २१३ ॥
धत्तूरपुष्पें मल्लिका जाती । जपाकुसुमें होम करिती ।
शिव संतुष्ट होय निश्र्चितीं । शत्रुविनाश होतसे ॥ २१४ ॥
बिल्व नारिंग नारिकेळें । दाडिम द्राक्षें निंबुफळें ।
खर्जूर पूग बकुळें कमळें । होमितां तुष्टि होतसे ॥ २१५ ॥
दूर्वांकुर कुश आम्रफळ । करवीर भक्ष्य भोज्य गुग्गुळ ।
अन्न इक्षु गोधूमें सकळ । कार्यसिद्धि होतसे ॥ २१६ ॥
असो या प्रकारेंकककरुन । सामग्री सिद्ध करावी जाण ।
शाक्तधर्में करावें स्नान । अभ्यंग मर्दन करावें ॥ २१७ ॥
शाक्तधर्मे संध्योपासन । पश्र्चिमद्वारें सहब्राह्मण ।
करावें मंडपप्रवेशन । मंत्रघोषेंकरुनियां ॥ २१८ ॥
मंडपदेवतांचे पूजन । करावें यथाविधिकरुन ।
मग भूशुद्धि भूतशुद्धि जाण । प्राणप्रतिष्ठा करावी ॥ २१९ ॥
गणेशपूजा स्वतिवाचन । नांदिश्राद्धान्त करावें जाण ।
करोनि आचार्यादिवरण । ऋत्विगादि यथाविधि ॥ २२० ॥
अंतर्मार्तृका बहिर्मातृका । करावे केशवादि न्यास देखा ।
नवार्णाचे न्यास सकळिका । एकादश करावे ॥ २२१ ॥
मग करावें देवीचें ध्यान । मानसोपचारें पूजन । 
शंखपूजा करावी जाण । यंत्रावरी ते काळीं ॥ २२२ ॥
पीठदेवतांचे पूजन । मग सर्वतोभद्र मांडोन । ब्रह्मादिदेवता पूजून । कलशस्थापन यथाविधि ॥ २२३ ॥
पूर्णपात्रीं रक्तवस्त्रावरी । यंत्र काढावें अवधारीं । 
यंत्रावरी देवी सत्वरी । यथाविधि स्थापावी ॥ २२४ ॥
अनुक्रमें मंत्रपूजन । उष्णोदकें मंगलस्नान ।
श्रीसूक्त देवीसूक्त म्हणोन । अभिषेक करावा ॥ २२५ ॥
दुर्गा-सरस्वतीसूक्त जपोन । देवीस घालावें महास्नान ।
पुष्पापर्यंत पूजा आणोन । सहस्त्र पुष्पें अर्पावीं ॥ २२६ ॥
आवरणदेवतांचे पूजन । शेषपूजा करावी संपूर्ण ।
मग चतुःषष्टि योगिनी पूजून । बलिदान करावें ॥ २२७ ॥
करोनि कुमारीपूजन । कुंडसंस्कार करावा जाण ।
कुंडामध्यें यंत्र काढोन । अग्निस्थापन विधियुक्त ॥ २२८ ॥
सूर्यकांतापासूनि जाण । अग्नि करावा उत्पन्न ।
अथवा अग्निहोत्रगृहांतून । अग्नि आणोनि स्थापावा ॥ २२९ ॥
कवच अर्गला कीलक । मुख्य त्रयोदश अध्याय देख ।
रहस्यांचें अध्यायत्रिक । होम सर्वांचा करावा ॥ २३० ॥
किंवा तेरा अध्यायींकरुन । सातशें मंत्रांचें करावे हवन ।
कवच अर्गला कीलक वर्जोन । रहस्यत्रय वर्जावें ॥ २३१ ॥
अथवा सामर्थ्य नसतां जाण । नवार्णमंत्रे करावें हवन ।
अथवा ' नमो दैव्यै ' मंत्रेकरुन । हवन सर्वांचे करावें ॥ २३२ ॥
अथवा 'जयंती मंगला काली' । येणें करावा होम सकळीं ।
संतुष्ट होतसे महाकाली । महालक्ष्मी सरस्वती ॥ २३३ ॥
पीठदेवता आवरणदेवता । यांच्या नाममंत्रे होम तत्त्वतां ।
मुख्य होमाचे आद्यतीं करितां । घृताहुति अर्पाव्या ॥ २३४ ॥
नित्यचंडीहोमाचे ठायीं जाण । एकैकास तीस आहुति अर्पण ।
नवरात्रि-नवदुर्गाहवन । कालरात्रि तिसरी ती ॥ २३५ ॥
या तिन्हीं हवनांचे ठायीं । दशाहुति अर्पाव्या लवलाहीं ।
नवचंडीहवन करितां पाहीं । पन्नास आहुति अर्पाव्या ॥ २३६ ॥
शतचंडीचा होम करितां । शताहुति अर्पाव्या तत्त्वतां ।
आणि सहस्त्रचंडी होमितां । सहस्त्राहुति अर्पाव्या ॥ २३७ ॥
मग स्विष्टकृत पूर्णाहुती । यथाविधि होमसमाप्ती ।
पीठदान आचार्याप्रती । ऋत्विजांसी दक्षिणा ॥ २३८ ॥
सामर्थ्य असलिया जाण । वस्त्रें अलंकार भूषण ।
सर्वांसी करावें अर्पण । ब्राह्मणभोजन करावें ॥ २३९ ॥
आतां कामनापरत्वें हवन । मुख्यद्रव्यें करावें जाण ।
संपुटित करावा मंत्र नवार्ण । त्या मंत्रीं योजावा ॥ २४० ॥
विद्याकामना असतां जाण । वाग्भवसंपुटित करी पूर्ण ।
लक्ष्मी-पुत्रप्राप्तीलागून । कामराजसंपुटित ॥ २४१ ॥
'मधुकैटभविद्रावि' हा मंत्र । त्याचा जप करितां पवित्र ।
राज-चोरादिभय समग्र । नाश पावे सर्वही ॥ २४२ ॥
'जयंती मंगला' येणें देख । जाती महामार्यादि उपद्रव अनेक ।
देहि' ह्या अधिमंत्रे सम्यक । सौभाग्यकामना प्राप्त होती ॥ २४३ ॥
'वंदितांघ्रियुगे' येणें । राजसन्मान प्राप्त होणें ।
स्फोटादिव्याधिनाशाकरणें । 'रक्तबीजवधे' हा मंत्र ॥ २४४ ॥
अचिंत्यरुप हा जपतां मंत्र । जाय हृदयसंताप सर्वत्र ।
'नतेभ्यः' सर्वदा पवित्र । सर्वपापक्षय करी ॥ २४५ ॥
स्तुवद्भ्यो भक्ति' पढतां मंत्र । सर्व व्याधिनाश क्षिप्र ।
'चंडिके सततं' हा पवित्र । येणें संतुष्ट जगदंबा ॥ २४६ ॥
'देहि सौभाग्य' हा मंत्र । आरोग्यकामना पुरती सर्वत्र । 
'विधेहि द्विषतां' हा पवित्र । येणें उच्चाटन होतसे ॥ २४७ ॥
'विद्यावंते यश' हा मंत्र । विद्या यश लक्ष्मी सर्वत्र । 
'विधेहि देवि कल्याणं' हा पवित्र । येणें कुटुंब संरक्षा ॥ २४८ ॥
'प्रचंडदैत्यदर्पघ्ने' हा मंत्र । वादव्यवहारीं जय सर्वत्र । 
'चतुर्भुजे चतुर्वक्र' । येणें पुरुषार्थसिद्धि ती ॥ २४९ ॥
'कृष्णेन संस्तुते' हा मंत्र । येणें मंत्रसिद्धि सर्वत्र । 
'हिमाचलसुता' हा पवित्र । जपतां तपयोगसिद्धि ती ॥ २५० ॥
'सुरासुरशिरो' हा मंत्र । येणें जन वश होती सर्वत्र । 
'इंद्राणीपति' येणें पवित्र । चित्तशुद्धि होतसे ॥ २५१ ॥
'देवी प्रचंडदोर्दंड' मंत्र । जलोदर नाशी सर्वत्र ।
'देवी भक्तजनो' हा पवित्र । येणें पर्ज्यन्यवृष्टि ती ॥ २५२ ॥
'पत्नीं मनोरमां' हा मंत्र । याचा जप करितां पवित्र ।
पत्नी प्राप्त होय क्षिप्र । संशय नाहीं सर्वथा ॥ २५३ ॥
प्रतिश्र्लोकीं प्रतिचरितीं । मंत्र योजावे आदिअंतीं ।
अथवा लक्षजप केलिया निश्र्चितीं । दशांश होम करावा ॥ २५४ ॥
प्रथमाध्यायीं मंत्रसाधन । सांगितले तुजलागून ।
तैसेंचि येथें करितां पूर्ण । मंत्रसिद्धि होतसे ॥ २५५ ॥
आतां तुम्हीं करावें श्रवण । जे कां नियमधारी ब्राह्मण ।
सप्तशतीचा पाठ आपण । नियम धरुन जे करिती ॥ २५६ ॥
त्यांसीच फल होय प्राप्त । इतरांचें व्यर्थ जात ।
ते नियम सांगतो निश्र्चित । श्रवण आतां करावें ॥ २५७ ॥
क्षमा सत्य दया दान । शौच इंद्रियनिग्रह जाण ।
देवपूजा अग्निहवन । संतोष चौर्यवर्जन तें ॥ २५८ ॥
आमिषवर्जन करावें । येथें नेमिलें असे स्वभावें ।
मुख्य आमिष तें जाणावें । मांस ऐसें म्हणती तया ॥ २५९ ॥
धान्यांमध्यें आमिष जाण । मसूर माष हें प्रमाण । 
फळांमध्यें जंबीर आपण । निंबुभेद जाणावा ॥ २६० ॥   रसांमध्यें महिषीदुग्ध । दुसरें अजाक्षीर अशुद्ध ।
परी गोदुग्ध असे शुद्ध । महिषीदुग्ध अपवित्र ॥ २६१ ॥
शाकांमध्यें आमिष जाण । दोडका घोळ शेपू आपण ।
अफु राजगीरपत्र पूर्ण । शाका आमिष जाण ॥ २६२ ॥
पलांडु आणि लशुन । तेणें पुण्यक्षय होय जाण । सांगितलें पदार्थवर्जन । अवश्यमेव करावें ॥ २६३ ॥
हिंसा करुं नये जाण । शाप देऊं नये आपण ।
असत्य बोलूं नये पूर्ण । नख रोमें न छेदावीं ॥ २६४ ॥
अस्थिकपालांचें स्पर्शन । क्रोध करुं नये आपण ।
महोदकीं प्रवेशूनि स्नान । करुं नये कदापि ॥ २६५ ॥
चांडाळाशीं संभाषण । अघौतवस्त्रांचें धारण ।
अन्याची माळा वस्त्र आसन । पूर्वोक्त सर्व वर्जावीं ॥ २६६ ॥
उच्छिष्ट आणि चंडिकान्न । शूद्रें आणिले तें आपण ।
आमिष पिपीलिकायुक्त जाण । भक्षूं नये कदापि ॥ २६७ ॥
अंजलीनें उदकपान । करुं नये कदापि आपण ।
उच्छिष्ट असूं नये जाण । मुक्तकेश असूं नये ॥ २६८ ॥
आचमना वांचून । राहूं नये कदापि जाण ।
अथवा श्रोत्रांचे स्पर्शन । आचमनाभावीं करावें ॥ २६९ ॥
गंध-भस्मांचें धारण । वारंवार करावें जाण ।
दक्षिण-पूर्व करुनि चरण । निजूं नये सर्वथा ॥ २७० ॥
करुनि पादप्रक्षालन । मग बैसावें आसनीं जाऊन ।
सांगितलें नियम पूर्ण । अवश्यमेव करावे ॥ २७१ ॥
पूर्वोक्त नियम धारण करितां । फल प्राप्त होय तत्त्वतां ।
ही संस्कृतपाठाची व्यवस्था । सांगितली तुजलागीं ॥ २७२ ॥
करावें प्राकृताचें पठन । त्यासी नाहीं नियमधारण ।
सांगितलें होमविधान । तेंही प्राकृतीं असेना ॥ २७३ ॥
असो पावस तिल घृतें जाण । प्रतिश्र्लोकीं करावें हवन ।
याचें सांगितलें विधान । यथाशक्ति करोनियां ॥ २७४ ॥
आतां सिंहावलोकनेंकरुन । सांगतो ग्रंथाचें वर्णन ।
स्तोत्र मंत्रे करावें हवन । देवीकारणें शुभ हवि ॥ २७५ ॥
पुन्हां नाममंत्रे जाण । करावें देवीचें पूजन ।
आपण एकाग्र होऊन । शुद्ध असावें मानसीं ॥ २७६ ॥
बद्धांजलि नमस्कार । करावा देवीतें सादर । 
देवीचें स्वरुप सुचिर । आपुले ठायीं भावावें ॥ २७७ ॥
होऊनि तन्मय सत्वर । जो या प्रकारें निरंतर । 
पूजा करीतसे सादर । भक्तिनम्र होऊनियां ॥ २७८ ॥
तो मनासारिखे भोग भोगुनी । देवीसायुज्य पावे जनीं ।
ऐसी व्यासाची हे वाणी । संशय कांहीं असेना ॥ २७९ ॥
जो नित्य चंडिकेलागुन । पूजा न करी दुर्जन ।
त्याच्या सर्व पुण्याचे दहन । करी क्षणार्धें जगदंबा ॥ २८० ॥
यथाशक्ति राजोपचार । देवीसी अर्पावे प्रियकर ।
षोडशोपचारें पूजाप्रकार । करुनि देवीतें पूजावें ॥ २८१ ॥
'खङ्गिनी शूलिनी' हा मंत्र एक । 'शूलेन पाहि' हे मंत्र चार देख ।
'सर्वस्वरुपे' हे मंत्रपंचक । तिहीं चरित्रीं अनुक्रमें ॥ २८२ ॥
या दश मंत्रेकरुनि जाण । करावें पंचवार प्रदक्षिण ।
'नमो देव्यै' पंचक म्हणोन । नमस्कार घालावे ॥ २८३ ॥
'सर्वस्वरुपे' हे मंत्रपंचक । येणें स्तोत्रें स्तवावें देख ।
द्रव्यहीन मंत्रे सकळिक । पूजा देवीसी समर्पावी ॥ २८४ ॥
ऐसें नित्य देवीचें पूजन । जो कां करितसे अनुदिन ।
तयासी देवीचें सायुज्य जाण । प्राप्त होय निर्धारे ॥ २८५ ॥
या कलियुगीं मुख्य । देवीचें आराधन सम्यक । 
तैसें इतर देवांचे देख । पूजन नाहीं बोलिलें ॥ २८६ ॥
जैसे देवीचे मंत्र फलती । इच्छिलें फल तत्काल देती ।
तैसे इतर देवांचे मंत्र निश्र्चितीं । न होती तत्काल सफलित ॥ २८७ ॥
असो या अध्यायाचे ठायीं जाण । केलें वैकृतिकरहस्य वर्णन ।
पुढील अध्यायीं निरुपण । मूर्तिरहस्य परिसावें ॥ २८८ ॥
याचें करितां श्रवण पठन । सर्व बाधा जाती निरसून ।
सकळ संकटांपासून । मुक्त होय निर्धारें ॥ २८९ ॥
आणि तयासी होमाचे फळ । प्राप्त होतसे तत्काळ ।
देवी ऐके बैसोनि जवळ । हें द्वादशाध्यायीं निरुपिलें ॥ २९० ॥
मानसीं इच्छिले सकलार्थ । देवी पूर्ण करी समर्थ । 
सिद्ध होती सर्व पुरुषार्थ ॥ याच्या श्रवणपठनें पैं ॥ २९१ ॥
श्रीदेवीनें जैसे वदविलें । तैसेंचि येथें निरुपिलें । 
त्या देवीसी नमन वहिलें । राम करी सर्वदा ॥ २९२ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरें देवीभगवतीमाहात्म्ये वैकृतिकरहस्यं तथा होमादिविधानवर्णनं नाम पंचदशोऽध्यायः ॥
॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ 

॥ शुभं भवतु ॥ 

DeviMahatmya Adhyay 15 
श्रीदेवीमाहात्म्ये अध्याय पंधरावा (१५)


Custom Search

Tuesday, January 27, 2015

DeviMahatmya Adhyay 14 श्रीदेवीमाहात्म्ये अध्याय चौदा (१४)


DeviMahatmya Adhyay 14 
DeviMahatmya Adhyay 14 is in Marathi. It is a translation of DurgaSaptashi Adhyay 14 which is in Sanskrit. This Adhyay Markandey Rushi describes Pradhanik Rahasya. Here devotees are asking Rushi; to tell them which avatar of Goddess Durga is greatest since Goddess has eight avatars. Further they also asked for the procedure to perform Pooja, Tapas, and Sadhana of Goddess Durga. All troubles and all difficulties of the devotees who recite or listen this adhyay are vanished.
श्रीदेवीमाहात्म्ये अध्याय चौदा (१४)
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदेव्यै नमः ॥
जय अखिलार्थदायक भगवती । तव नामस्मरण आणितां चित्तीं । 
सकल विघ्नांची होऊनि शांती । पुरती इष्ट मनोरथ ॥ १ ॥
मग भक्तीचे ठायीं तत्पर । जे असती निरंतर ।
त्यांची थोरवी मी पामर । काय वर्णू शकेन ॥ २ ॥
ऐसा देवी तुझा महिमा । न कळे वेदादिकांसी सीमा ।
लीन होऊनि स्वयें ब्रह्मा । तव चरणीं स्थिरावला ॥ ३ ॥
तेथें माझी काय प्रोढी । जाया तव गुणनिधीचे पैलथडीं ।
तरी तूंचि दासमुखें आवडी । काय वदवीं दयाळें ॥ ४ ॥
असो पूर्वाध्यायाचे शेवटी जाण । सुरथ वैश्य लाधलें वरप्रदान ।
आतां प्राधानिकरहस्य पूर्ण । वर्णियेलें सुरस बहु ॥ ५ ॥
शौनक बोले सूतासी । शिष्य पुसे मार्कंडेयासी ।
संशय प्राप्त जाहला आम्हांसी । तो तुम्हांसी निरुपितों ॥ ६ ॥
मेधाऋषीसी पुसून । सुरथ वैश्य गेले तपालागुन ।
तीन वर्षें आराधन । केलें त्यांनीं देवीचें ॥ ७ ॥
देवी होऊनि प्रसन्न । राज्य दिधलें नृपालागुन ।
वैश्यासी देऊनि परम ज्ञान । धन्य केले दोघेही ॥ ८ ॥
ही कथा ऐकिली पूर्ण । परी संशय जाहला उत्पन्न ।
कैसे करावें आराधन । तयांसी कैसें निवेदिलें ॥ ९ ॥
स्वामींनी हें कृपा करुन । आम्हांसी करावें निवेदन ।
ऐकोनि शौनकाचा प्रश्र्न । सूत बोलता जाहला ॥ १० ॥
तुम्हांऐंसाचि सुरथें । प्रश्र्न केला मेधाऋषीतें ।
म्हणे ऋषिवोग्य र्या कृपामूर्ते । प्रश्र्न आमुचा सांगावा ॥ ११ ॥
चंडिकेचे अष्टावतार । आम्हांलागीं वर्णिले साचार । 
परी तयांत कोण थोर । स्वभाव कैसा कवणाचा ॥ १२ ॥
हें सांगावें आम्हांलागुन । महादेवीचें स्वरुप वर्ण ।
पूजावयासी योग्य कवण । तें अम्हां सांगावें ॥ १३ ॥
कोणत्या विधीनें कवण । आराधावें स्वरुप पूर्ण ।
सर्व सांगावें आम्हांलागुन । यासी तूं योग्य आहेसी ॥ १४ ॥
ऐकोनि ऋषि बोले वचन । राजा हें श्रेष्ठ रहस्य जाण ।
अन्यासी करुं नये कथन । ऐसें वर्णिलें पुराणीं ॥ १५ ॥
परंतु तूं आहेसी भक्त । म्हणोनि सांगतो निश्र्चित ।
नाहीचि अवाच्य किंचित । तुजलागीं नराधिपा ॥ १६ ॥
सकळांच्या आदींची जाण । महालक्ष्मी असे आपण । 
सर्व जगाची ईश्र्वरी पूर्ण । त्रिगुणस्वरुपा आहे ती ॥ १७ ॥ 
त्रिगुणस्वरुपें वर्णिली । परी मुख्य सात्त्विकी बोलिली ।
देवतास्वरुपें उत्पन्न जाहली । लक्ष्यालक्ष्यरुपा ती ॥ १८ ॥
भक्तासी स्वरुप आहे लक्ष्य । अभक्तासी असे अलक्ष्य ।
सर्व व्यापोनि सर्वसाक्ष्य । स्वरुप असे राहिलें तें ॥ १९ ॥
मातुलिंग गदा खेट । पानपात्रधारी स्पष्ट ।
नाग लिंग योनी वरिष्ठ । धरिती जाहली मस्तकीं ॥ २० ॥
तप्तसुवर्णासारिखा वर्ण । तप्पसुवर्णाचीं भूषणे जाण ।
सकळ लोक शून्य पाहून । आपुल्या तेजें पूर्ण केला ॥ २१ ॥
शून्य पाहूनि सकळ लोक । दुसरें स्वरुप धरिलें देख ।
केवळ तमोगुणा सकळिक । कृष्णवर्णा जाहली ती ॥ २२ ॥
ती तंव महाकाली जाण । भिन्नांजनासारिखा वर्ण ।
विक्राळ दाढायुक्त वदन । विशाल लोचन तियेचे ॥ २३ ॥ 
तनूचे ठायीं मध्यम आपण । नारी दिसे शोभायमान ।
कबंधहारांतें उरेंकरुन । धारण करिती जाहली ॥ २४ ॥
शिरांची माळा घातली जाण । एके हस्तीं खङ्ग घेऊन ।
दुजे हस्तीं पानपात्र धारण । करिती जाहली जगदंबा ॥ २५ ॥
तिसरे हस्तीं धरिलें शिर । चौथे हस्तीं खेटक सुंदर ।
अलंकृत चतुर्भुज समग्र । शोभतसे महाकाली ॥ २६ ॥
ती प्रमदोत्तमा काली तामसी । बोलती जाहली महालक्ष्मीसी । 
नामकर्म देई मजसी । माते तुजला नमो नमः ॥ २७ ॥
महाकालीचें ऐकोनि वचन । मग महालक्ष्मी बोले आपण ।
नामकर्मातें तुजलागुन । देतें आतां श्रवण करीं ॥ २८ ॥
महामाया महाकाली उत्तम । महामारी क्षुधा तृषा हें नाम ।
निद्रा तृष्णा एकवीरा परम । कालरात्री दुरत्यया ॥ २९ ॥
हीं दहा तुझीं नामें जाण । कर्मेंकरुनि प्रतिपाद्य पूर्ण ।
या तुझ्या नाम-कर्मातें जाणून । पठण करी तो सुख पावे ॥ ३० ॥
यापरी बोलूनि कालीप्रत । महालक्ष्मी काय करीत ।
महासरस्वतीचें रुप त्वरित । घेऊनि तिसरी जाहली ॥ ३१ ॥
अतिशुद्ध सत्त्वगुणें करुन । महासरस्वती जाहली जाण ।
चंद्रासारिखी प्रभा पूर्ण । धारण करिती जाहली ॥ ३२ ॥
अक्षमाला अंकुशधारी । वीणा पुस्तक घेऊनि करीं ।
होती जाहली ती श्रेष्ठ नारी । नामें ऐका तियेचीं ॥ ३३ ॥
महाविद्या कामधेनु भारती । आर्या ब्राह्मी वाक् सरस्वती ।
महावाणी वेदगर्भा निश्र्चितीं । धीश्र्वरी हें दहावें ॥ ३४ ॥
यानंतर महालक्ष्मी आपण । बोलती जाहली दोघींलागुन 

तुम्ही उभयतांहीं जाण । कन्यापुत्र निर्मावे ॥ ३५ ॥  
त्या दोघींतें ऐसें बोलून । स्वयें महालक्ष्मी आपण ।
कन्यापुत्रांतें आपणापासून । निर्मिती जाहली तत्काळ ॥ ३६ ॥
पुत्र तो ब्रह्मदेव जाण । कन्या ती लक्ष्मी सगुण ।
त्या दोघांतें नामाभिधान । ठेविती जाहली जगदंबा ॥ ३७ ॥
विधि हिरण्यगर्भ विरिंचि धाता । ऐसीं पुत्राचीं नांवें ठेवी माता ।
श्री पद्मा कमला लक्ष्मी तत्त्वतां । कन्येचीं नांवे ठेविलीं ॥ ३८ ॥
त्यानंतर महाकाली आपण । कन्यापुत्रांतें आपणापासुन ।
उत्पन्न करिती जाहली जाण । मनेंकरुन क्षणमात्रें ॥ ३९ ॥
पुत्र तो महादेव देख । कन्या ती सरस्वती सम्यक ।
त्या दोघांते नामें अनेक । ठेविती जाहली महामाया ॥ ४० ॥
नीलकंठ रक्तबाहु शंकर । श्र्वेतांग कपदीं चंद्रशेखर । 
त्रिलोचन रुद्र स्थाणु ईश्र्वर । नामें ठेविलीं पुत्राची ॥ ४१ ॥
सरस्वती त्रयीविद्या स्वरा । कामधेनु आणि भाषाक्षरा ।
नामें ठेवी ती सुंदरा । कन्येलागीं तें काळीं ॥ ४२ ॥ 
त्यानंतर महासरस्वती । कन्यापुत्रातें जाहली निर्मिती ।
पुत्र तो महाविष्णु निश्र्चितीं । कन्या गौरी परियेसा ॥ ४३ ॥
नंतर त्या उभयतांसी । नामें ठेविती जाहली कैसीं ।
तीचि ऐकावीं वेगेंसीं । स्वस्थचित्तेंकरुनियां ॥ ४४ ॥
विष्णु कृष्ण हृषीकेश । वासुदेव जगन्निवास ।
जनार्दन हीं नामें विशेष । पुत्रालागीं ठेविलीं ॥ ४५ ॥
उमा सती चंडी गौरी । सुभगा शिवा आणि सुंदरी ।
हीं कन्येचीं नामें सत्वरी । ठेविती जाहली तेधवां ॥ ४६ ॥
या प्रकारें युवती जाण । पुरुषत्व पावल्या आपण ।
ज्ञाते पाहती तयांचे ज्ञान । ज्ञाननयन जयांसी ॥ ४७ ॥
महामायेच्या स्वरुपातें । ज्ञानें जाणती जे जाणते । 
इतर ज्ञानी नेणते । न जाणती तें कदापि ॥ ४८ ॥
नंतर महालक्ष्मी जी तिणें । सरस्वती दिधली ब्रह्म्याकारणें ।
विष्णूही तिचेचि आज्ञेने । लक्ष्मीतें वरिता जाहला ॥ ४९ ॥
भ्रतार गौरीचा आपण । महादेव जाहला जाण । 
ऐसे महालक्ष्मीच्या आज्ञेकरुन । तिचेही जाहले कुटुंबी ॥ ५० ॥
उत्पत्ति-स्थिति-प्रलयास । सामर्थ्य दिधलें तिघांस ।
ब्रह्मा घेऊनि सरस्वतीस । यथासुखें राहिला ॥ ५१ ॥
सरस्वतीसहवर्तमान । एकत्र होऊनि चतुरानन । ब्रह्मांडातें करुनि उत्पन्न । चराचरातें निर्मिले ॥ ५२ ॥
ब्रह्मांडासहित जें जें सर्व । त्या त्या संहारी महादेव ।
गौरीसहित होऊनि अपूर्व । प्रलय करिता जाहला ॥ ५३ ॥
ब्रह्मांडामध्यें जें जें निर्माण । स्थावरजंगमादि असे जाण ।
त्यातें त्यातें नारायण । पालन करी लक्ष्मीसह ॥ ५४ ॥
सर्व सत्त्वमयी आपण । महालक्ष्मी असे जाण ।
सकळांची ईश्र्वरी पूर्ण । महामाया जगदंबा ॥ ५५ ॥
तीच मूळप्रकृति साचार । असती जाहली निराकार ।
पुढें होती जाहली साकार । तीच गुणमयी प्रकृति ॥ ५६ ॥
जें जें दृश्यमान पाहावें । आणि श्रोत्रें श्रवण करावें ।
जें जें मानसीं कल्पावें । मायास्वरुप तितुकेंही ॥ ५७ ॥
जें जें नामरुपात्मक सकळ । तें तें मायेचें स्वरुप केवळ ।
ब्रह्मा विष्णु महेश्र्वर सुढाळ । मायापुत्र हेही पैं ॥ ५८ ॥
असो या प्रकारेंकरुन । महालक्ष्मी श्रेष्ठ जाण ।
सर्वदा तियेचें आराधन । प्रेमभावें करावें ॥ ५९ ॥
या अध्यायीं निरुपिलें । प्राधानिकरहस्य वहिलें ।
पुढील अध्यायीं गायिलें । वैकृतिरहस्य अपूर्व जें ॥ ६० ॥
याचें करितां श्रवण पठन । सर्व बाधा होती शमन ।
आणि सर्व संकटांपासून । मुक्त होय क्षणमात्रें ॥ ६१ ॥
त्या महालक्ष्मीसी नमस्कृती । सर्वदा माझी असो निश्र्चितीं ।
राममुखें ग्रंथ पुढती । चालवीं माते आवडीनें ॥ ६२ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरें देवीभगवतीमाहात्म्ये प्राधानिकरहस्यवर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥

॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥

DeviMahatmya Adhyay 14 
श्रीदेवीमाहात्म्ये अध्याय चौदा (१४)


Custom Search