Friday, January 16, 2015

DeviMahatmya Adhyay 11 श्रीदेवीमहात्म्य अध्याय (११) अकरावा


DeviMahatmya Adhyay 11 
DeviMahatmya Adhyay 11 is in Marathi. It is a translation of DurgaSaptashi Adhyay 11 which is in Sanskrit. This adhyay is also called as Narayani Stuti. This Narayani stuti is done by all Gods. Goddess was pleased with this stuti. She gave them the blessing that in future also she will take new avtaras and destroy the demons. She also described her future births in which the demons will be killed by her.
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (११) अकरावा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीमहासरस्वत्यै नमः ॥ 
श्रीदेव्यै नमः ॥
जय भवदुःख विनाशके । भक्तपालके दुष्टांतके ।
उत्पत्ति-स्थिति-संहारके । जय अंबे तुज नमो ॥ १ ॥
तूं अनंत अवतार धरुन । दुष्टजनां करिसी शासन ।
आणि निजदासांचे रक्षण । आनंदें करिसी अंबे तूं ॥ २ ॥
असो आतां श्रोते सज्जन । तुम्ही होऊनि सावधान ।
पहा मागील अनुसंधान । सिंहावलोकनेंकरुनियां ॥ ३ ॥
गतकतार्थ सम्यक । देवीनें शुंभ मारिला देख ।
देव हर्ष पावले सकळिक । हें निरुपण जाहलें ॥ ४ ॥
आतां पुढील सुरस कथा । मेधा सांगे राजा सुरथा ।
तीच विस्तारें तुम्हां समस्तां । सांगतो मी निश्र्चयें ॥ ५ ॥
देवीनें शुंभ निशुंभ असुर । मारिले असतां इंद्रादि सुरवर ।
अग्न्यादि दिक्पाळ समग्र । स्तविते जाहले देवीतें ॥ ६ ॥
इष्टलाभें प्रसन्नमुख । आशा पूर्ण जाहल्या देख । 
तेव्हां मिळोनि सकळिक । कात्यायनी स्तवियेली ॥ ७ ॥
देवि जे शरण येती तूतें । त्यांच्या नाशिसी तूं दुःखांतें ।
आतां प्रसन्न हो आम्हांतें । शरण आलों तुजलागीं ॥ ८ ॥
तूं सकळ जगाची माता । चराचरीं वागे तुझी सत्ता । 
विश्र्वाची ईश्र्वरी तत्त्वतां । आम्हांलागीं प्रसन्न हो ॥ ९ ॥
तूं विश्र्वजनक माया खरी । तुज शरण आलों निर्धारीं ।
प्रसन्न होऊनियां झडकरी । आम्हांलागीं तारावें ॥ १० ॥
तूं जगासी आधारभूत । पृथ्वीरुपें विश्र्व धरीत ।
उदकरुपें तूं निश्र्चित । या विश्र्वासी वाढविसी ॥ ११ ॥
तूं वैष्णवी शक्ति उत्तम । अनंत तुझा पराक्रम ।
या जगाचें बीज परम । थोर माया अससी तूं ॥ १२ ॥
तुझ्या मायामोहेंकरुन । मोहिला असे समस्त जन ।
तूं जरी होसी प्रसन्न । तरीच मुक्ति जगासी ॥ १३ ॥
सकळ विद्या तुझे भेद । तूं समस्त स्त्रियां प्रसिद्ध ।
तूं एक विश्र्वव्यापक अगाध । तुझी स्तुति तूं करिसी ॥ १४ ॥
जेव्हां तूं सर्वभूतरुपिणी । भोगमोक्षप्रदायिनी ।
तव स्तुतीसी आमुच्या वाणी । सदा तत्पर असोत ॥ १५ ॥
सर्वजनांचे हृदयीं जाण । तूं बुद्धिरुपें अससी पूर्ण ।
तूं स्वर्ग मोक्ष देणार आपण । नारायणी तुज नमो ॥ १६ ॥
नारायणाची पत्नी म्हणोन । तुज नारायणी हें अभिधान ।
वेदरुपें नारायण । ठेविता जाहला तुजलागीं ॥ १७ ॥
कला-काष्ठादिरुपें परम । करिसी विश्र्वाचा परिणाम ।
काळरुपें संहारधर्म । नारायणी तुज नमो ॥ १८ ॥
सर्व मंगळांचे तूं मंगळ । शिवे तूं साधिसी अर्थ सकळ ।
त्रंबके गौरी शरण केवळ । नारायणी तुज नमो ॥ १९ ॥
तूं उत्पत्ति-स्थिति-प्रलयाची । शक्ति अनादि अससी साची ॥ २० ॥
शरणागत जो असे दीन । त्याच्या पीडेचें तूं परित्राण ।
करिसी सर्वांची पीडा हरण । नारायणी तुज नमो ॥ २१ ॥
तूं हंसयुक्त विमानवाहिनी । तूं ब्रह्मशक्तिरुपधारिणी ।
तूं कुशोदकें क्षयकारिणी । नारायणी तुज नमो ॥ २२ ॥ 
तूं रुद्रशक्तिरुपेंकरुन । केलें त्रिशूलचंद्रसर्पधारण । 
आणि महावृषभ वाहन । नारायणी तुज नमो ॥ २३ ॥
तूं कौमारीरुप धरिसी । मयूर कुक्कुट पालन करिसी ।
हस्ताचे ठायीं शक्ति धरिसी । नारायणी तुज नमो ॥ २४ ॥ 
शंखचक्रादि शार्ङ्ग प्रसिद्ध । ग्रहण करुनि आयुधें विविध । 
होसी तूं वैष्णवीरुप अगाध । नारायणी तुज नमो ॥ २५ ॥ 
घेऊनि महा उग्र चक्रा । दाढेनें सांवरिली वसुंधरा । 
वराहरुप तूं भयंकरा । नारायणी तुज नमो ॥ २६ ॥ 
उग्र नृसिंहरुप धरुन । हिरण्यकशिपु मारिला जाण ।
त्रैलोक्याचें केलें त्राण । नारायणी तुज नमो ॥ २७ ॥
किरीट वज्र सहस्रनयन । ऐसें त्वां इंद्ररुप घेऊन ।
केला वृत्राचा प्राण हरण । नारायणी तुज नमो ॥ २८ ॥
शिवदूतीच्या रुपें केवळ । मारिले दैत्य महाबळ ।
घोर शब्द केला तत्काळ । नारायणी तुज नमो ॥ २९ ॥
दाढा भयंकर वदनें । शिरोमाला विभूषणें ।
चामुंडे चंड-मुंडमथने । नारायणी तुज नमो ॥ ३० ॥
लक्ष्मी लज्जे महाविद्ये । श्रद्धे पुष्टि ध्रुवे स्वधे ।
महारात्रि महाअविद्ये । नारायणी तुज नमो ॥ ३१ ॥
तूं मेधा तूं श्रेष्ठा सरस्वती । भ्रममानाची तूं संपत्ती ।
ईशे तूं प्रसन्न होय नियतीं । नारायणी तुज नमो ॥ ३२ ॥
सर्वस्वरुप तूं सर्वेश्र्वरी । सर्वशक्तियुक्त अवधारीं ।
भयापासूनि आम्हांसी तारी । दुर्गे देवी तुज नमो ॥ ३३ ॥
हें तुझे सौम्य वदन । शोभायमान त्रिलोचन । 
करावें सर्वभूतरक्षण । कात्यायनी तुज नमो ॥ ३४ ॥
कतऋषीची कन्या म्हणोनी । नाम असे कात्यायनी ।
त्या तुजप्रती भवानी । नमस्कार आमुचा ॥ ३५ ॥
तुझा त्रिशूल भयंकर । ज्वाला कराल अति उग्र । 
सर्व दैत्यनाश करो सत्वर । भद्रकाली नमोऽस्तु ते ॥ ३६ ॥
भद्र म्हणजे कल्याण । तें होय कालाहीपासून । 
जिच्या भक्तांचें म्हणोन । भद्रकाली नाम तुझे ॥ ३७ ॥
देवी जी घंटा शब्देंकरुन । जगातें करुनियां पूर्ण ।
दैत्यतेजातें नाशी जाण । तुझी घंटा जगदंबे ॥ ३८ ॥
ती घंटा पापांपासून । सर्वदाही पुनीत करुन ।
आमुचें करो संरक्षण । पुत्रापरी निश्र्चयें ॥ ३९ ॥
असुररक्तवसार्पंक । तेणें माखिला खङ्ग सम्यक ।
शुभाकारणें होवो देख । चंडिके तुज शरण आम्ही ॥ ४० ॥
तूं संतुष्ट जाहलीस असतां । सर्व रोग नाशिसी तत्त्वतां ।
सर्वकामांतें तुझी रुष्टता । नाश करी जगदंबे ॥ ४१ ॥
तुझे जे कां आश्रित जन । त्यांसी नाहीं विपत्ति जाण ।
ते तव आश्रयातें पावोन । धन्य होती त्रैलोक्यीं ॥ ४२ ॥
त्वां बहुशक्तिरुप घेतलें । धर्मद्वेष्टे असुर भले । 
यांशीं बळें कंदन केलें । तुजऐसी कोण दुजी ॥ ४३ ॥
विद्या शास्त्रें विवेकदीप । आद्य वाक्यांत तुझे रुप ।
महांधकार ममत्वकूप । यांत विश्र्व भ्रमले हें ॥ ४४ ॥
या भवसमुद्राचे ठायीं । असती महाविकारी अही ।
शत्रु चोर दावानलही । तेथें तूं रक्षिसी विश्र्वातें ॥ ४५ ॥ 
तूं विश्र्वाची स्वामिनी जाण । यास्तव जगाचें करिसी पालन ।
विश्र्वात्मिका अससी म्हणून । धारण करिसी जगत्रया ॥ ४६ ॥
ब्रह्मादिक जे जगदाधार । यांसींही तू स्तुत्य साचार ।
याकारणें तव चरणीं तत्पर । ते नम्र होऊनि राहती सदा ॥ ४७ ॥
देवी तूं प्रसन्न होऊन । शत्रूंपासूनि करिसी पालन ।
जैसें आतांचि दैत्य वधून । रक्षण केले आमुचे ॥ ४८ ॥
सकल जगाच्या पापांतें । उत्पात आणि उपसर्गातें ।
शीघ्र आतां त्वां शांतीतें । पाववावें जगदंबे ॥ ४९ ॥
तूं विश्र्वपीडाहारिणी पाहीं । शरणागतांसी प्रसन्न होई ।
त्रैलोक्यवासी लोकांतेंही । वरप्रदान करावें ॥ ५० ॥
असो ऐसी देवांची स्तुती । ऐकोनि तेव्हां श्रीभगवती ।
प्रसन्न होऊनि होय बोलती । सुरगणांतें तेधवा ॥ ५१ ॥
वरदानी तुम्हांलागुनी । तरी वर मागावा ये क्षणीं । 
जो कां इच्छित तुमचे मनीं । आणि जनीं उपकारक ॥ ५२ ॥
मागाल त्या वरातें देईन । तुमचा अर्थ पूर्ण करीन ।
ऐसें देवीचें ऐकोनि वचन । देव बोलते जाहले ॥ ५३ ॥
तूं त्रैलोक्याची अखिलेश्र्वरी । सर्व बाधा प्रशमन करीं ।
विनाशावे आमुचे वैरी । हेंचि कार्य करावें ॥ ५४ ॥
तुजसीं मागतों हाचि वर । जेव्हां आम्हांसी संकट थोर ।
पडेल तेव्हां तूं अवतार । घेऊनि विघ्न निवारावें ॥ ५५ ॥
ऐकोनि सर्व देवांची वाणी । देवी बोलती जाहली ते क्षणीं ।
पूर्वी तीन अवतार धरुनी । दैत्य मारिले दुरात्मे ॥ ५६ ॥
मधु-कैटभ-महिषासुर । दोन अवतारीं हे दैत्यवर ।
मारिले पूर्वी आतां सत्वर । शुंभ-निशुंभ मारिले हे ॥ ५७ ॥
पुढेंही बहुत अवतार । तुम्हांसाठीं धरीन साचार ।
त्यांचा सांगतें मी विस्तार । श्रवण करा देव हो ॥ ५८ ॥ 
वैवस्वत मनूमाझारीं । अठ्ठाविसावे युगांतरीं । 
द्वापारांती गोकुलपुरीं । उत्पन्न होईन नंदगृहीं ॥ ५९ ॥
प्रथम भूतळीं येऊन । देवकीचा गर्भ काढीन ।
रोहिणीच्या उदरीं घालीन । मग उत्पन्न होईन मी ॥ ६० ॥
नंदगोपाची पत्नी जगांत । यशोदा नामें जी विख्यात ।
तिचे पोटीं अवतार निश्र्चित । मी घेईन मध्यरात्रीं ॥ ६१ ॥
तेव्हां वसुदेव कृष्णातें आणिल । यशोदेचे पुढे ठेवील ।
आणि मजला घेऊनि जाईल । मथुरेलागीं वेगेंसीं ॥ ६२ ॥
देतां देवकीचे जवळ । कंस येईल उताविळ ।
मातें घेऊनि तत्काळ । शिळेवरी आपटूं पाहे ॥ ६३ ॥
तै गगनीं जाईन वरिचेवरी । कंस भय पावेल अंतरीं ।   
देच गंधर्व ते अवसरीं । स्तवन माझें करितील ॥ ६४ ॥
शुंभ निशुंभ दोघे दैत्य । पुन्हां उत्पन्न होतील सत्य ।
त्यांचा वध करावा अगत्य । जगदंबे त्वां निर्धारें ॥ ६५ ॥
ऐसी देवस्तुति ते काळीं । ऐकूनि येईन विंध्याचळीं ।
तेथें राहूनि तत्काळीं । वधीन शुंभ-निशुंभांतें ॥ ६६ ॥
ज्यासाठीं चौथा अवतार । तो वधूनि शुंभासुर । 
देवभक्तांसी हर्ष थोर । करीन मीच ते समयीं ॥ ६७ ॥
चौथे अवतारीं सत्य जाण । ' नंदा ' ऐसें नामाभिधान ।
माझे असंख्य नाम गुण । अंत न कळे कोणासी ॥ ६८ ॥
पांचव्या अवताराचें कारण । सांगते मी तुम्हांलागून ।
कश्यपाची स्त्री दनु जाण । पुत्र तियेचे एकसष्ट ॥ ६९ ॥
दनूचे म्हणोनि दानव । पराक्रमी असती सर्व । 
त्यांत वैप्रचित्त जयाचें नांव । महागर्विष्ट असुर तो ॥ ७० ॥
जाहले तद्वंशापासाव । असुर पराक्रमी अभिनव ।
त्यांहीं पराभवितां देव । मजला शरण येतील ते ॥ ७१ ॥
तेव्हां ' रक्तदंतिका ' नामें सत्वर । पांचवा मी घेईन अवतार ।
भूमीएवढें करुनि शरीर । स्थावर जंगम व्यापीन मी ॥ ७२ ॥
मेरुएवढे करीन स्तन । घोर रुप पृथ्वीप्रमाण । 
दानवांचे घेईन प्राण । चावोनि गिळीन सगळेचि ॥ ७३ ॥
तेव्हां दानवांतें भक्षितां । रक्त दंत होतील तत्त्वतां ।
म्हणोनि नाम रक्तदंता । तेव्हां होईल मजलागीं ॥ ७४ ॥
ऐसे सर्व दानव मारिल्यावर । सुखी व्हाल तुम्ही अपार ।
तुमचीं संकटें वारंवार । निवारण करीन मी ॥ ७५ ॥
सहाव्या अवताराचें कारण । सांगते मी तुम्हांलागून ।
शतवर्षे पर्जन्य जाऊन । अनावृष्टि होईल ॥ ७६ ॥
तेव्हां क्षुधेतृषेनें व्यापून । स्तवितील सर्व ऋषिगण ।
कित्येक सोडितील प्राण । अन्नावांचोनि ते काळीं ॥ ७७ ॥
तै अयोनि ' शताक्षी ' अवतार । घेऊनियां मीच सत्वर । 
शतनेत्रांनीं मुनिवर । कृपादृष्टीनें पाहीन पैं ॥ ७८ ॥
तेव्हां शताक्षी हें नाम । मातें ठेवितील परम ।
मग अन्नशाकादि उत्तम । आपुले देहीं करीन मी ॥ ७९ ॥
वृष्टीवांचूनि शाक अन्न । स्वशरीरापासूनि उत्पन्न ।
करोनि पोशीन ब्राह्मण । भरण करीन सर्वांचें ॥ ८० ॥
तेव्हां ' शाकंभरी ' हें नाम । माझें होईल विख्यात परम ।
तेव्हांचि असुर दुर्गम । त्यातें मारीन निश्र्चयें ॥ ८१ ॥
दैत्य दुर्गमाख्य मारीन । म्हणोनि ' दुर्गादेवी ' हे अभिधान ।
मातें प्राप्त होईल पूर्ण । सर्वजनीं विख्यात जें ॥ ८२ ॥
सातव्या अवताराचें कारण । आतांचि तुम्हांतें सांगेन ।
राक्षस बहु होतील जाण । पृथ्वीवरी एकदां ॥ ८३ ॥
धेनुब्राह्मणांते भक्षितील । यज्ञयागादि विध्वंसितील । 
तेव्हां सर्व ऋषि स्तवितील । मजकारणें पुनरपि ॥ ८४ ॥
तेव्हांही मागुती भयंकर । रुप धरुनियां दुर्धर । 
राक्षस भक्षीन समग्र । ऋषिरक्षणाकारणें ॥ ८५ ॥ 
मग सहजचि ऋषिगण । स्तवितील मजलागून ।
' भीमादेवी ' नामाभिधान । विख्यात तेव्हां होईल ॥ ८६ ॥
आठव्या आवताराचा हेत । सांगतें मी तुम्हांप्रत । 
अरुणनामें प्रचंड दैत्य । उत्पन्न होईल एकदां ॥ ८७ ॥
तो त्रैलोक्यासी पीडा करील । सर्व देवांसी त्रासवील ।
गाईब्राह्मणांते  भक्षील । भ्रष्ट करील स्त्रियांते ॥ ८८ ॥
तेव्हां देव-ऋषि-प्रजागण । मजकारणें येतील शरण । 
मग मी आठवा अवतार धरीन । भ्रमररुप ते समयीं ॥ ८९ ॥
असंख्यात होऊनि भ्रमर । चित्रविचित्रवर्णीं अपार ।
मारीन तो महाअसुर । त्रैलोक्यहिताकारणें ॥ ९० ॥      अरुणदैत्यासी मारितां यापरी । मज लोक म्हणतील ' भ्रामरी ' ।
स्तवन माझें नानापरी । या त्रिलोकीं करितील ॥ ९१ ॥
ऐसे केवळ त्रैलोक्यहिता । मी अवतार धरीन तत्त्वतां ।
अष्टावतारांची कथा । तुम्हांकारणें निरुपिली ॥ ९२ ॥
देवही या प्रकारेंकरुन । जेव्हां जेव्हां दानवांपासून ।
तुम्हांसी पीडा होईल जाण । धर्म अवघा लोपेल ॥ ९३ ॥
तेव्हां तेव्हां अवतार धरुन । करीन शत्रूंचें निर्दळण ।
मुख्यत्वें अंशबळेंकरुन । उत्पन्न होईन ते काळी ॥ ९४ ॥
कार्यानुसार अवतार । मी घेतसे निरंतर ।
ऐसें देवी बोलिली साचार । देवांलागीं तेधवा ॥ ९५ ॥
असो या प्रकारेंकरुन । या अध्यायीं निरुपण ।
देवीनें  स्वमुखें आपण । अवतार कथिले देवांसी ॥ ९६ ॥
पुढें बारावें अध्यायीं जाण । त्वचरिताचें महिमान ।
देवी सांगेल देवांलागून । एकचित्तें श्रवण करा ॥ ९७ ॥
हा अध्याय सुरस जाण । याचें करितां श्रवण पठण ।
सर्व बाधा जाती निरसून । देवीही श्रवण करीतसे ॥ ९८ ॥
ऐसी देवीची ही वाणी । पुढील अध्यायीं पहा शोधुनी । 
देवीनें स्वमुखेंकरुनी । चरित्र वर्णन केलें जें ॥ ९९ ॥
व्यासें जैसें वर्णन केलें । आणि देवीनेंही बोलविलें ।
तैसेंचि येथें निरुपिलें । यांत संशय असेना ॥ १०० ॥
यास्तव सज्जनीं अवधान । देऊनि ग्रंथ करावा श्रवण ।
निरंतर राम ब्राह्मण । हेंचि प्रार्थी सर्वासीं ॥ १०१ ॥
त्या देवीसी नमस्कार । माझे असोत निरंतर ।
जिनें कृपा करुनि निजदासावर । हा गोड ग्रंथ वदविला ॥ १०२ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये महासरस्वत्याख्याने एकादशोऽध्यायः ॥

॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥

DeviMahatmya Adhyay 11 
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (११) अकरावा


Custom Search

No comments: