Friday, January 9, 2015

DeviMahatmya Adhyay 10 श्रीदेवीमहात्म्य अध्याय (१०) दहावा


DeviMahatmya Adhyay 10 
DeviMahatmya Adhyay 10 is in Marathi. It is a translation of DurgaSaptashi Adhyay 10 which is in Sanskrit. This adhyay describes war between Demon Shumbha and Goddess Durga; Finally Demon Shumbha was killed by Goddess.
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (१०) दहावा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदेव्यै नमः ॥
नमो श्रीदेवी भवानी । अखिल जगत्रयाची जननी ।
हरिहरब्रह्मादिकांलागूनी । इच्छामात्रें वर्तविसी ॥ १ ॥
आणि सृष्टीचा दुर्गम । चालविसी अनुक्रम ।
त्या तुज माझे प्रणाम । जगन्मातें सर्वदा ॥ २ ॥
असो पूर्वाध्यायीं कथन । श्रीमहासरस्वतीचे आख्यान ।
त्यांत निशुंभाचें मरण । श्रोतयांसी निवेदिलें ॥ ३ ॥
आतां पुढीलिया इतिहासा । श्रोते हो सादर तुम्ही परिसा ।
कमलपुष्पसुधासीं जैसा । भ्रमर लुब्ध होतसे ॥ ४ ॥
मेधा ऋषि होय सांगता । म्हणे एकाग्र ऐकें गा सुरथा ।
निशुंभ रणीं पडला असतां । क्रोध नावरे शुंभासी ॥ ५ ॥ ससैन्य बंधु पडला पाहून । बोलता जाहला तेव्हां वचन ।
दुष्टे बलावलेपेंकरुन । दुर्गे गर्व करुं नको ॥ ६ ॥    
अन्यशक्तींच्या बळें बहुत । तूं युद्ध करिसी अद्भुत ।
त्यांच्याचि योगें मान निश्र्चित । पावसी हें तुज योग्य नव्हे ॥ ७ ॥
देवी बोलती जाहली त्यासी । मी एकचि आहें परियेसीं ।
मजवांचूनि तूं दुसर्‍यांसी । कैसा पहासी अज्ञाना ॥ ८ ॥
अन्य ज्या ज्या शक्ति पाहीं । तें तें माझेचि रुप असे सर्वही ।
दुष्टा सावध पाहें लवलाहीं । शक्ति प्रवेश मत्स्वरुपीं ॥ ९ ॥
इतुक्यांत सर्व शक्ति जाण । ब्रह्मशक्ति आदिकरुन ।
देवीशरीरीं जाहल्या लीन । एकटी अंबिका राहिली ॥ १० ॥
ती शुंभासी म्हणे माझ्या विभूती । अनेक मत्स्वरुपें असती ।
त्या सर्व माझ्या ठायीं निश्र्चितीं । लय पावल्या निर्धारें ॥ ११ ॥
आतां मी एकटी आहें रणीं । तरी युद्ध करावें स्थिर होऊनि ।
ऋषि म्हणें सुरथालागूनी । युद्ध तेव्हां प्रवर्तलें ॥ १२ ॥
देवी आणि शुंभासुराचें । युद्ध मांडले उभयतांचें ।
अतिघोर युद्ध तें साचें । देव दैत्य पाहती ॥ १३ ॥
तीक्ष्ण शरांचे वर्षाव । टाकिती शस्त्रास्त्रें सर्व ।
अंबिका शुंभाचें अभिनव । घोर युद्ध मांडलें ॥ १४ ॥
तें युद्ध दुर्धर बहुत । सर्व लोक भय पावत ।
दिव्य अस्त्रांते त्वरित । देवी सोडिती जाहली ॥ १५ ॥
गदा शक्ति आणि नांगर । मुसळ खेटक आणि तोमर ।
परशु पाश भाला शर । त्रिशूळ क्रोधें मारिला ॥ १६ ॥
शार्ङ्ग धरोनियां हातीं । बाण सोडिले नेणों किती ।
ऐसीं दिव्य अस्त्रें भगवती । सोडिती जाहली सक्रोध ॥ १७ ॥
असो तेव्हां तो शुंभ जाण । तद्वातक अस्त्रें योजून । 
देवीच्या अस्त्रांचे खंडन । करिता जाहला क्षणार्धें ॥ १८ ॥
यानंतर शुंभासुर । करिता जाहला संग्राम थोर ।
अनेक शस्त्रास्त्रें दुर्धर । देवीवरी सोडिलीं ॥ १९ ॥
त्याच्या शस्त्रास्त्रांचा सत्वरी । नाश इच्छूनि परमेश्र्वरी ।
उग्र हुंकार उच्चार करी । तेणें नाशिलें सर्वांतें ॥ २० ॥
शुंभें सोडूनि शत शर । झांकण केलें देवीवर ।
देवीनें बाण मारोनि सत्वर । धनुष्य त्याचें छेदिलें ॥ २१ ॥
धनुष्य छेदिलें असतां जाण । दैत्येंद्र धांवला शक्ति घेऊन ।
देवीनें चक्रातें सोडून । शक्ति छेदून पाडिली ॥ २२ ॥
त्यानंतर शुंभासुर । खड्ग घेतसे तीव्रधार ।
शत चंद्र-दिवाकर । रेखिले असती जयावरी ॥ २३ ॥
ऐशी तो तरवार देवीसी । मारिता जाहला निश्र्चयेंसी । 
देवीनें शर सोडोनि वेगेंसी । खड्ग छेदूनि पाडिला ॥ २४ ॥
आणखीही सोडोनि शर । चर्म छेदूनि केलें चूर ।
सूर्याचे किरण ज्यावर । झळके ढाल तेणें ती ॥ २५ ॥
पुन्हां देवीनें सोडोनि बाण । अश्र्व सारथी मारिले जाण ।
त्याचें धनुष्यही छेदून । टाकिती जाहली क्षणमात्रें ॥ २६ ॥
शुंभ क्रोधासी पावला । मुद्गर घेऊनि धांविन्नला ।
देवीनें बाण सोडोनि वहिला । मुद्गर छेदिला क्षणमात्रे ॥ २७ ॥
तथापि तो शुंभ दैत्य । मुष्टी वळोनि धांवला त्वरित ।
केला अति निष्ठुर आघात । देवीहृदयीं तत्काळ ॥ २८ ॥
तेव्हां देवीनें तलप्रहार । उरावरी मारिला सत्वर ।
दैत्य पडला धरणीवर । हाहाकार पै जाहला ॥ २९ ॥
तो दैत्यराज अति दारुण । पुन्हां उठला न लागतां क्षण ।
सवेंचि करुनि उड्डाण । देवी उचलोनि घेतली ॥ ३० ॥
देवीतें नेऊनि आकाशीं । शुंभ मारुं पाहे तियेसी ।
निराधारा देवी शुंभाशीं । युद्ध आकाशीं करितसे ॥ ३१ ॥
देवीचे आणि शुंभाचें । युद्ध गगनीं जाहलें साचें । 
परस्परां घात शस्त्राचें एकमेकांसी मारिती ॥ ३२ ॥
मुनि सिद्धादि देव पाहती । जय सर्व चंडिकेसी इच्छिती ।
देवीनें युद्ध अनेकरीतीं । तया शुंभासीं मांडिलें ॥ ३३ ॥
संग्राम करोनि वाढ वेळ । देवीनें उड्डाण केलें तत्काळ ।
आणि दैत्य उचलोनि सबळ । आकाशमार्गी भ्रमविला ॥ ३४ ॥
नंतर त्याते धरुनि चरणीं । चक्राकृती फिरवूनि गगनीं ।
भूमीसी टाकिला क्रोधेंकरुनी । धरणीकंप जाहला तैं ॥ ३५ ॥
पुन्हां तो होऊनि सावधान । वेगें धांवला मुष्टी वळोन ।
देवीतें मारावें म्हणोन । क्रोध धरिता जाहला ॥ ३६ ॥   
शुंभ धांवूनि आला जवळ । ऐसें देवीनें पाहूनि तत्काळ ।
क्रोधें हृदयीं मारुनि शूळ ॥ भूमीवरी पाडिला तो ॥ ३७ ॥
शुंभ पडतां धरणीवर । असुरदळीं आकांत थोर ।
एकचि जाहला हाहाकार । प्रलय अनिवार वर्तला ॥ ३८ ॥    
सप्तसमुद्र सप्तद्वीप । पृथ्वी पावली चलकंप ।
शुंभाच्या शरीराचा क्षेप । होतां पर्वत थरारले ॥ ३९ ॥
तो दुरात्मा पडिला असतां । जग प्रसन्न जाहलें तत्वतां । 
सर्व विश्र्वासी जाहली स्वस्थता । आकाशही निर्मळ जाहलें ॥ ४० ॥
उल्कांसहित मेघउत्पात । पूर्वीं होत असती जे बहुत ।
ते सकळही जाहले शांत । सरितामार्ग चालिला ॥ ४१ ॥
शुंभ पडला हें ऐकोनी । आनंद जाहला त्रिभुवनीं ।
सर्व देवांच्याही श्रेणी । अत्यंत हर्षांतें पावल्या ॥ ४२ ॥
ऐसी देवांसी जाहलिया तुष्टी । केली देवीवरी पुष्पवृष्टी ।
सर्व ऋषींच्याही कोटी । आनंदें स्तविती देवीतें ॥ ४३ ॥
दुंदुभि वाजले अपार । गंधर्व गाती मधुरस्वर । 
अप्सरांचें नृत्य सुंदर । स्वर्गी होतें जाहलें ॥ ४४ ॥
अनेक सुगंधांसहित वात । येते जाहले परमाद्भुत ।
अग्नीही होऊनियां शांत । स्वयें कुंडांत प्रकाशले ॥ ४५ ॥ 
प्रभायुक्त सूर्य जाहला । दिग्जनित शब्द शांतवला ।
सकळ लोक आनंदला । हर्ष जाहला त्रैलोक्यीं ॥ ४६ ॥
असो या प्रकारेंकरुन । शुंभ दैत्याचे केलें हनन । 
पुढील अध्यायीं निरुपण । नाराय गीस्तुति असे ॥ ४७ ॥
हें महासरस्वतीचें आख्यान । श्रवणें पठणें करी पावन ।
सकल मनोरथांचें पूरण । येणेंकरुन होत असे ॥ ४८ ॥
रणीं आपणां होऊनि विजय । शत्रूंचा होतसे पराजय ।
सर्व दुःखांचा नाश होय । पठनमात्रेंकरुनियां ॥ ४९ ॥
जैसें व्यासें वर्णन केलें । तैसेंचि येथें निरुपिलें ।
सज्जनीं पाहिजे परिसिलें । कृपा करुनि सर्वदा ॥ ५० ॥
श्रीअंबिकेसी नमस्कार । माझे असोत निरंतर ।
राम ब्राह्मण वर्णेकर । तिचे चरणीं लीन सदा ॥ ५१ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये महासरस्वत्याख्याने दशमोऽध्यायः ॥

॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥

DeviMahatmya Adhyay 10 
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (१०) दहावा


Custom Search
Post a Comment