Sunday, February 18, 2018

Samas Navava Yatna Shikavan समास नववा यत्नशिकवण


Dashak Barava Samas Navava Yatna Shikavan 
Samas Navava Yatna Shikavan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Yatna. Yatna means efforts. The importance of Yatna i.e. taking efforts to do something to achieving it, is nicely told by Samarth Ramdas. It changes our life for betterment.
समास नववा यत्नशिकवण 
श्रीराम ॥
दुर्बल नाचारी वोडगस्त । आळसी खादाड रिणगस्त ।
मूर्खपणें अवघें वेस्त । कांहींच नाहीं ॥ १ ॥
१) कोणाचा आधार नसलेला एक दुर्बळ माणूस होता. त्याची सर्व बाजूंनी ओढाताण होती. तो आळशी, खादाड व कर्जबाजारीही होता. मूर्खपणाच्या वागणूकीनें त्याचे जीवन अस्ताव्यस्त झाले होते. कांहींच व्यवस्थित नव्हते.  
खाया नाहीं जेवाया नाहीं । लेया नाहीं नेसाया नाहीं ।
अंथराया नाहीं पांघराया नाहीं । कोंपट नाहीं अभागी ॥ २ ॥
२) त्या अभागी माणसाला कांहीं खायला नाहीं, जेवायला नाहीं, अंगावर घ्यायला व नेसायला वस्त्र नाहीं. अंथरायला, पांघरायला नाहीं, राहायला झोपडी पण नाहीं अशी त्याची दीनवाणी अवस्था झाली होती. 
सोयेरे नाहीं धायेरे नाहीं । इष्ट नाहीं मित्र नाहीं ।
पाहातां कोठे वोलखी नाहीं । आश्रयेंविण परदेसी ॥ ३ ॥
३) त्याला कोणी सगे सोयरे, मित्र नव्हतें, कोणाचा आश्रय नव्हता त्यामुळें स्वदेशांत असूनही तो परदेशी असल्यासारखा जगत होता. 
तेणें कैसें करावें । काये जीवेंसीं धरावें ।
वाचावें किं मरावें । कोण्या प्रकारें ॥ ४ ॥
४) अशा माणसानें काय करावें? कोणत्या आशेने जगावें? कोणत्या रीतीनें त्यानें जगावें कां मरुन जावें?  
ऐसें कोणीयेकें पुसिलें । कोणीयेके उत्तर दिधलें ।
श्रोतीं सावध ऐकिलें । पाहिजे आतां ॥ ५ ॥
५) असें प्रश्र्ण कोणी एकानें विचारलें. त्यास जी उत्तरें दिली आहेत. ती श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावीत. 
लाहानथोर काम कांहीं । केल्यावेगळें होत नाहीं ।
करंट्या सावध पाहीं । सदैव होसी ॥ ६ ॥
६) मानवी जीवनाचा असा नियम आहे कीं, कोणतेंही काम मग तें लहान असो वा मोठे असो, केल्याशिवाय होत नाहीं. ज्या अभागी माणसाला भाग्यवान व्हायचे असेल त्यानें हें समजून घेतलें पाहिजे.   
अंतरीं नाहीं सावधानता । येत्न ठाकेना पुरता ।
सुखसंतोषाची वार्ता । तेथें कैंची ॥ ७ ॥
७) चांगला प्रयत्न होण्यास मनांत दक्षता पाहिजे. मनुष्याजवळ सावधानता नसेल तर त्याच्या हातून पुरेसे प्रयत्न होत नाहीत. मगत्यांना जीवनांत सुखसंतोषाचा अनुभव येत नाही. 
म्हणोन आळस सोडावा । येत्न साक्षेपें जोडावा ।
दुश्र्चितपणाचा मोडावा । थारा बळें ॥ ८ ॥
८) म्हणून माणसानें आळस झाडून टाकावा. मोठ्या चिवटपणें प्रयत्न करावा. मनांत येणारे संशय वगैरेला थारा देऊं नये. 
प्रातःकाळीं उठत जावें । प्रातःस्मरामि करावें ।
नित्य नेमें स्मरावें । पाठांतर ॥ ९ ॥
९) नेहमी सकाळीं लवकर उठावें. भगवंताचें स्मरण करावें. पूर्वी जो अभ्यास, पाठांतर केले असेल त्याची उजळणी करावी.
मागील उजळणी पुढें पाठ । नेम धरावा निकट ।
बाष्कळपणाची वटवट । करुंच नये ॥ १० ॥
१०) उजळणी व नविन कांहीं पाठ करणें. असा नित्य नेम धरावा. वायफळ बोलणें सोडून द्यावें. 
दिशेकडे दुरी जावें । सुचिस्मंत होऊन यावें ।
येतां कांहीं तरी आणावें । रितें खोटें ॥ ११ ॥
११) मग लांब कोठेतरी शौचास जावें.अणि निर्मळ होऊन यावें. परत येतांना कांहींतरी घेऊन यावे. रिकाम्या हातानें येऊं नये. 
धूतवस्त्रें घालावीं पिळून । करावें चरणक्षाळण । 
देवदर्शन देवार्चन । येथासांग ॥ १२ ॥
१२) पाय धुवावें. आपले धुवून आणलेले कपडे पिळून वाळत घालावेत. नंतर देवपूजा व व्यवस्थित देवदर्शन करावें.  
कांहीं फळाहार घ्यावा । पुढें वेवसाये करावा ।
लोक आपला परावा । म्हणत जावा ॥ १३ ॥
१३) नंतर कांहीं फळाहार घ्यावा. मग आपला व्यवसाय करावा. जनांमध्यें आपला कोण व आपला कोण नाहीं हें ओळखून चालावें.  
सुंदर अक्षर ल्याहावें । पष्ट नेमस्त वाचावें ।
विवरविवरों जाणावें । अर्थांतर ॥ १४ ॥
१४) लिहीणें सुंदर अक्षरांत करावें. वाचतांना स्पष्ट बरोबर वाचावें. पुनः पुनः विचार करुन मनन करुन त्याचा खरा अर्थ समजून घ्यावा. 
नेमस्त नेटकें पुसावें । विशद करुन सांगावें ।
प्रत्ययेंविण बोलावें । तेंचि पाप ॥ १५ ॥
१५) कोणाल कांहीं विचारयाचें तें नेमकें व स्पष्टपणें विचारावें. कोणाला कांहीं सांगावयाचे असल्यास नेमके, नीट उकलून व स्पष्ट करुन सांगावें. स्वतःला अनुभव असल्याशिवाय ज्ञानाच्या गप्पा मारणें म्हणजें पापच होय.  
सावधानता असावी । नीतिमर्यादा राखावी ।
जनास माने ऐसी करावी । क्रियासिद्धि ॥ १६ ॥
१६) नेहमी सावध असावें. नीतीची मर्यादा राखून वागावें. कोणतेंही काम करावयाचे ते लोकांना पसंत पडेल अशारीतीनें करावें. 
आलियाचें समाधान । हरिकथा निरुपण ।
सर्वदा प्रसंग पाहोन । वर्तत जावें ॥ १७ ॥
१७) जो कोणी आपल्याकडे येईल त्याचे समाधान करावें. भगवंताची कथा करतअसावें. अध्यात्माचे निरुपण चालूं ठेवावें. नेहमी प्रसंग पाहून वागावें.  
ताळ धाटी मुद्रा शुद्धा । अर्थ प्रमये अन्वये शुद्ध ।
गद्यपद्यें दृष्टांत शुद्ध । अन्वयाचे ॥ १८ ॥
१८) ताल, धाटी, शुद्ध मुद्रा, अर्थ, प्रमेय, शुद्ध अन्वय, गद्य, पद्य, शुद्ध व उचित दृष्टांत,
गाणें वाजवणें नाचणें । हस्तन्यास दाखवणें ।
सभारंजकें वचनें । आडकथा छंदबंद ॥ १९ ॥
१९) गाणें, बजावणें, नाचणें, हातांचा अभिनय दाखवणें, श्रोत्यांच्या मनाला प्रसन्न करणारी वचनें सांगणें, छंद व बंद या सार्‍या गोष्टी भगवंताची कथा करतांना वापराव्या.   
बहुतांचें समाधान राखावें । बहुतांस मानेल तें बोलावें ।
विलग पडों नेदावें । कथेमधें ॥ २० ॥
२०) पुष्कळांचें समाधान होईल अशी कथा करावीं. पुष्कळांना आवडेल व पसंत पडेल असें बोलावें. आपल्या कथेंत विसंगति येऊं देवू नये. 
लोकांस उदंड वाजी आणूं नये । लोकांचे उकलावें हृदये ।
तरी मग स्वभावें होये । नामघोष ॥ २१ ॥
२१)  श्रोत्यांना फार कंटाळा येईल अशी कथा करुं नये. उलट लोकांचे मनोगत उकलेल असें मार्मिक बोलावे. मग लोक भगवंताचा नामघोष सहजच करतील.
भक्ति ज्ञान वैराग्य योग । नाना साधनाचे प्रयोग ।
जेणें तुटे भवरोग । मननमात्रें ॥ २२ ॥
२२) आपल्या कथेंत, निरुपणांत भक्ति, ज्ञान, वैराग्य, योग आणि अजुनकांहीं गोष्टींचा उपयोग करावा. कीं, ज्यायोगे श्रोत्यांच्या मननाने त्यांचा भवरोग नष्ट होईल. 
जैसें बोलणें बोलावें । तैसेंचि चालणें चालावें ।
मग महंतलीळा स्वभावें । आंगीं बाणे ॥ २३ ॥
२३) आपण जसें बोलतों तसें वागावें. मग महंताला शोभेल असें वागणें सहजच अंगीं बाणते. 
युक्तिवीण साजिरा योग । तो दुराशेचा रोग ।
संगतीच्या लोकांचा भोग । उभा ठेला ॥ २४ ॥
२४) महंतपणाचा योग येणें उत्तम पण महंताच्या अंगीं वागण्याचे कौशल्य नसेल तर तो योग नाहीं तो दुराशेचा रोगच समजावा. अशा महंताची संगत करणार्‍या लोकांचा कांहींतरी भोगच उभा राहिला असें समजावे.  
ऐसें न करावें सर्वथा । जनास पावऊं नये वेथा ।
हृदईं चिंतावें समर्था । रघुनाथजीसी ॥ २५ ॥
२५) महंतानें लोकांना त्रास व दुःख होईल असें कधीहीं वागू नये. त्यानें आपल्या हृदयामध्यें श्रीरघुनाथाचे चिंतन करण्याचा अभ्यास ठेवावा.  
उदासवृत्तीस मानवे जन । विशेष कथानिरुपण ।
रामकथा ब्रह्मांड भेदून । पैलाड न्यावी ॥ २६ ॥
२६) विरागी व अनासक्त वृत्ति लोकांना आवडते. भगवंताची कथा व निरुपण त्यांना आवडते. म्हणून ब्रह्मांडाचा भेद करुन श्रीरामाची कथा त्याच्याहि पलिकडे नेऊन सोडावी. 
सांग महंती संगीत गाणें । तेथें वैभवास काय उणें ।
नभामाजी तारांगणें । तैसे लोक ॥ २७ ॥
२७) अशा सर्व गुणांनी मंडित महंतपणा असून त्यामधें संगीताची, गायनाची जोड असेल तर मग वैभवाला कमी पडणार नाहीं. चंद्राभोवती जशा तारा जनतात, त्याचप्रमाणें अशा महंताभोवती लोक जमतात.    
आकलबंद नाहीं जेथें । अवघेंचि विश्कळित तेथें ।
येकें आकलेविण तें । काये आहे ॥ २८ ॥
२८) जो मनुष्य बुद्धिनें संपन्न नसतो, त्याच्याजवळ सगळी अव्यवस्थाच असते. जगांत एक हुषारी पाहिजे. हुषारीवाचून कशाला महत्व नाहीं.
घालून अकलेचा पवाड । व्हावें ब्रह्मांडाहून जाड ।
तेथें कैंचें आणिलें द्वाड । करंटपण ॥ २९ ॥
२९) आपल्या बुद्धीचे सामर्थ्य खूप वाढवावे. आपण ब्रह्मांडाहून विशाल होऊन जावें, इतका बुद्धिचा विकास करावा. असें झाल्यावर त्या ठिकाणीं नतद्रष्ट करंटेपणा उरणारच नाहीं.  
येथें आशंका फिटली । बुद्धि येत्नीं प्रवेशली ।
कांहींयेक आशा वाढली । अंतःकर्णी ॥ ३० ॥
३०) अशा रीतीनें मूळ शंकेचे येथें निराकरण झालें. प्रयत्न करायला हवा. हें बुद्धीला पटलें. त्यामुळें आपल्याला भाग्याचे दिवस येतील अशी आशा अंतःकरणांत उदय पावली.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे येत्नसिकवणनाम समास नववा ॥
Samas Navava Yatna Shikavan
समास नववा यत्नशिकवण 


Custom Search

Thursday, February 15, 2018

Samas Aathava KalaRup Nirupan समास आठवा काळरुप निरुपण


Dashak Barava Samas Aathava KalaRup Nirupan 
Samas Aathava KalaRup Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Kala or time. How we count Days,Months and Years and so on. How it is started? And how Maya is related to it?
समास आठवा काळरुप निरुपण
श्रीराम ।
मूलमाया जगदेश्र्वर । पुढें अष्टधेचा विस्तार ।
सृष्टिक्रमें आकार । आकारला ॥ १ ॥
१) परब्रह्मामध्यें प्रथम मूळ माया निर्माण झाली.मूळमायेमधील शुद्ध जाणीव तो जगदीश्र्वर होय. यानंतर अष्टधा प्रकृतीचा विस्तार झाला. त्यांत जी सृष्टिरचना झाली, तिच्यांत पुढें आकार निर्माण झाले. 
हें अवघेंच नस्तां निर्मळ । जैसे गगन अंतराळ ।
निराकारीं काळवेळ । कांहींच नाहीं ॥ २ ॥
२) अभ्र नसतांना आकाश जसें निर्मळ अंतराळ असतें त्याचप्रमाणें प्रकृति व तिचा पसारा नसतांना निर्मळ परब्रह्म असतें. निराकार स्वरुपांत काळवेळ कांहीं आढळत नाहीं.  
उपाधीचा विस्तार जाला । तेथें काळ दिसोन आला ।
येरवीं पाहातां काळाला । ठावचि नाहीं ॥ ३ ॥
३) उपाधीचा विस्तार झाला म्हणजे काळ दिसूं लागतो. एरवी काळाला स्थानच नाहीं. उपाधि म्हणजे माया किंवा प्रकृति, सद्वस्तुवर आलेलें पांघरुण होय.
येक चंचळ येक निश्र्चळ । यावेगळा कोठें काळ ।
चंचळ आहे तावत्काळ । काळ म्हणावें ॥ ४ ॥
४) एकंदर दोनच प्रकार अस्तित्वांत आहेत. एक निश्र्चळ ब्रह्म व दुसरी चंचळ माया. या व्यतिरिक्त काळ म्हणून तिसरा प्रकार अस्तित्वांत नाहीं. जोंपर्यंत चंचळ असतें तोपर्यंत काळाचें अस्तित्व जाणवते.  
आकाश म्हणिजे अवकाश । अवकाश बोलिजे विलंबास ।
त्या विलंबरुप काळास । जाणोनि घ्यावें ॥ ५ ॥
५) आकाश म्हणजे अवकाश किंवा विस्तार होय. विलंबाला अवकाश म्हणतात. काळ विलंबरुप आहे. त्याचें स्वरुप समजून घ्यावें. 
सूर्याकरितां विलंब कळे । गणना सकळांची आकळे ।
पळापासून निवळे । युगपरियंत ॥ ६ ॥
६) सूर्याच्या योगानें आपणास विलंब कळतो. विलंब हा मूळ धरुन आपल्याला गणना करतां येते. एका पळापासून युगापर्यंत गणना मोजता येते. 
पळ घटिका प्रहर दिवस । अहोरात्र पक्ष मास ।
शड्मास वरि युगास । ठाव जाला ॥ ७ ॥
७) पळ, घटका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष किंवा पंधरवडा, मास किंवा महिना, सहा महिने अशा रीतीनें आपण युगापर्यंत काळ मोजूं शकतो.  
क्रेत त्रेत द्वापार कळी । संख्या चालिली भूमंडळी ।
देवांचीं आयुष्यें आगळीं । शास्त्रीं निरोपिलीं ॥ ८ ॥
८) त्यानंतर कृत, त्रेता, द्वापार,व कलि अशीं चार युगें पृथ्वीवर चालली. त्याचप्रमाणें शास्त्रांत देवांची आयुष्यें देखील खूप सांगितलीं आहेत.  
ते देवत्रयाची खटपट । सूक्ष्मरुपें विलगट ।
दंडक सांडितां चटपट । लोकांस होते ॥ ९ ॥
९) ब्रह्मा, विष्णु व महेश या तीन देवांचे कार्य सूक्ष्मरुपानें वेगवेगळें चालूं आहे.  त्यांचा नियमभंग केला कीं लोकांना काळजी वाटूं लागते. 
मिश्रित त्रिगुण निवडेना । तेणें आद्यंत सृष्टिरचना ।
कोण थोर कोण साना । कैसा म्हणावा ॥ १० ॥
१०) सत्व, रज व तम हे तिन्ही गुण एकमेकांत मिसळलेले असतात. एकमेकांपासून त्यांना वेगळें करतां येत नाहीं. सुरवातीपासून शेवटपर्यंत सारी सृष्टिरचना त्रिगुणांच्या मिश्रणानें बनलेली आहे. त्यांत कोणी मोठा वा कोणी लाहान असें म्हणतां येत नाहीं. तिन्ही देव एकाच योग्यतेचे व महत्वाचे आहेत. 
असो हीं जाणत्याचीं कामें । नेणता उगाच गुंते भ्रमें ।
प्रत्यये जाणजाणों वर्में । ठाईं पाडावीं ॥ ११ ॥
११) असो. या गोष्टी बरोबर समजणें हीं शाहाण्याची कामें आहेत. अज्ञानी माणूस उगाच भ्रमाच्या पायीं गुंतून पडतो. म्हणून सृष्टीमधिल गूढ गोष्टी स्वतः अनुभव घेऊन निश्र्चितपणें समजून घ्याव्यांत. 
उत्पन्नकाळ सृष्टिकाळ । स्थितिकाळ संव्हारकाळ ।
आद्यंत अवघा काळ । विलंबरुपी ॥ १२ ॥
१२) उत्पन्नकाळ, सृष्टिकाळ, स्थितिकाळ, संहारकाळ असा हा सगळा काळ आरंभापासून शेवटपर्यंत विलंबरुप आहे. 
जें जें जये प्रसंगीं जालें । तेथें काळाचें नांव पडिलें ।
बरें नसेल अनुमानलें । तरी पुढें ऐका ॥ १३ ॥
१३) ज्या प्रसंगीं जें घडतें त्याचे नांव काळास देण्यांत येते. हें जर बरोबर ध्यानांत येत नसेल तर पुढें ऐकावें. 
प्रजन्यकाळ शीतकाळ । उष्णकाळ संतोषकाळ ।
सुखदुःखआनंदकाळ । प्रत्यये येतो ॥ १४ ॥
१४) पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोषकाळ, सुखदुःख आनंदकाळ, या काळांचा अनुभव येतो. 
प्रातःकाळ माध्यानकाळ । सायंकाळ वसंतकाळ ।
पर्वकाळ कठिणकाळ । जाणिजे लोकीं ॥ १५ ॥
१५) प्रातःकाळ, माध्यान्हकाळ, सायंकाळ, वसंतकाळ, पर्वकाळ कठीणकाळ हे काळ लोक जाणतात.   
जन्मकाळ बाळत्वकाळ । तारुण्यकाळ वृधाप्यकाळ ।
अंतकाळ विषमकाळ । वेळरुपें ॥ १६ ॥
१६) जन्मकाळ, बालपणाचा काळ, तारुण्यकाळ, वृद्धपणाचा काळ, अंतकाळ, विषमकाळ हे सगळे वेळरुप काळ आहेत. 
सुकाळ आणि दुष्काळ । प्रदोषकाळ पुण्यकाळ ।
सकळ वेळा मिळोन काळ । तयास म्हणावें ॥ १७ ॥
१७) सुकाळ व दुःकाळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ या सगळ्यां वेळांना मिळून काळ असे म्हणावें.  
असतें येक वाटतें येक । त्याचें नांव हीन विवेक ।
नाना प्रवृत्तीचे लोक । प्रवृत्ति जाणती ॥ १८ ॥
१८)  जेव्हां वस्तु एक असते पण दिसते भलतीच. तेव्हां त्यास हीन विवेक म्हणतात. हीन विवेक म्हणजे अविद्या किंवा अध्यास होय. नाना प्रकारच्या मनोरचनेचे लोक प्रवृत्ति काय आहे तेवढेंच जाणतात.  
प्रकृति चाले अधोमुखें । निवृत्ति धावे ऊर्ध्वमुखें ।
ऊर्ध्वमुखें नाना सुखें । विवेकी जाणती ॥ १९ ॥
१९) प्रवृत्ति अधोमुख चालते. सूक्ष्माकडून स्थूलाकडे धांव घेते. निवृत्ति ऊर्ध्वमुखानें चालते. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाते. सूक्ष्माकडे जाण्यांत अनेक प्रकारची सुखें आढळतात. ही गोष्ट विवेकी माणसें जाणतात.   
ब्रह्मांडरचना जेथून जाली । तेथें विवेकी दृष्टि घाली ।
विवरतां विवरतां लाधली । पूर्वापर स्थिति ॥ २० ॥
२०) या ब्रह्मांडाची रचना ज्या मूळमायेपासून झाली तेथें विवेकी माणूस आपली ज्ञानदृष्टि नेऊन पोचवतो. अशा रीतीनें सूक्ष्म मनन आणि निदिध्यासन करतां करतां त्याला आरंभीची भ्रह्मरुप अवस्था प्राप्त होते.  
प्रपंची असोन परमार्थ पाहे । तोहि ये स्थितीतें लाहे ।
प्रारब्धयोगें करुन राहे । लोकांमधें ॥ २१ ॥
२१)  प्रपंचांत राहून जो परमार्थाची साधना करतो. त्याससुद्धा ही अवस्था प्राप्त होते. प्रारब्धाचा जसा योग असेल त्याप्रमाणें लोकांत राहून तो प्रपंच करतो.  
सकळांचें येकचि मूळ । येक जाणते येक बाष्कळ ।
विवेकें करुन तत्काळ । परलोक साधावा ॥ २२ ॥
२२) सर्वांचे मूळ एकच आहे. विवेकी तें जाणतो तर विवेकहीन ते जाणत नाहीं. म्हणून शाहाण्यानें विवेक वापरुन लवकर परमार्थ साधावा.
तरीच जन्माचें सार्थक । भले पाहाती उभये लोक ।
कारण मुळींचा विवेक । पाहिला पाहिजे ॥ २३ ॥ 
२३) परमार्थ साधला तरच जन्माचे सार्थक होते. यासाठीं भले लोक प्रपंच व परमार्थ दोन्ही साधतात. दोन्ही साधण्यास विवेक करीत मूळापर्यंत गेले पाहिजे.           
विवेकहीन जे जन । ते जाणावे पशुसमान ।
त्यांचें ऐकतां भाषण । परलोक कैंचा ॥ २४ ॥
२४) विवेकहीन माणसें जनावरासारखी जगतात. त्यांचें म्हणणे ऐकून परमार्थ साधणें शक्य नाहीं.
बरें आमचे काये गेलें । जें केलें तें फळास आलें ।
पेरिलें तें उगवलें । भोगिती आतां ॥ २५ ॥
२५) असो. विवेकहीनपणें कोणी जगला तर आमचे कांहीं नुकसान नाहीं. मनुष्य जें करतो त्याचे फळ त्यास मिळते. जें पेरलेले असतें तेंच उगवते. त्याचें फळ माणूस आतां भोगतोच.
पुढेंहि करी तो पावे । भक्तियोगें भगवंत फावे ।
देव भक्त मिळतां दुणावें । समाधान ॥ २६ ॥
२६) यानंतरसुद्धां माणूस जर परमार्थ करील तर तो त्यास साधेल. तो जर भक्ति करेल तर त्यास भगवंताची प्राप्ती होईल. भक्ताचें भगवंताशी ऐक्य घडून आलें कीं भक्ताचे समाधान दुपट्टप्रमाणांत वाढते. भक्त पूर्ण समाधानी बनतो.   
कीर्ति करुन नाहीं मेले । उगेच आले आणि गेले ।
शाहाणे होऊन भुलले । काये सांगावें ॥ २७ ॥
२७) भक्त म्हणून जे नांव कमावून मेले नाहींत ते उगीच जन्मास आले व  तसेंच गेले. शहाण्या माणसांना देखील येथें भुरळ पडतें. याला काय म्हणावें. 
येथील येथें अवघेंचि राहातें । ऐसें प्रत्ययास येतें ।
कोण काये घेऊन जातें । सांगाना कां ॥ २८ ॥
२८) या जगांत सगळें कांहीं येथेंच राहतें, बरोबर कांहीं येत नाहीं. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. कोणी कांहींतरी बरोबर घेऊन जातो कां? तें सांगा.  
पदार्थीं असावें उदास । विवेक पाहावा सावकास ।
येणेंकरितां जगदीश । अलभ्य लाभे ॥ २९ ॥
२९) म्हणून माणसानें दृश्य वस्तूविषयीं अनासक्त वृत्ति ठेवावी. अगदी शांतपणें सूक्ष्म विवेक करावा. असें केल्यानें परमेश्र्वराचा लाभ होतो. हा मोठा अलभ्य लाभ होय.
जगदीशापरता लाभ नाहीं । कार्याकारण सर्व कांहीं । 
संसार करित असतांहि । समाधान ॥ ३० ॥
३०) परमेश्र्वर प्राप्तीसारखा मोठा लाभ या जगांत दुसरा नाहीं. प्रपंचांत जरुर असणारी कर्में योग्य प्रमाणांत करायला हरकत नाहीं. ती परमार्थाच्या आड येत नाहींत. असें वागलें तर संसार करीत असतांना सुद्धा समाधान कायम टिकते.  
मागां होते जनकादिक । राज्य करितांहि अनेक ।
तैसेचि आतां पुण्यश्र्लोक । कित्येक असती ॥ ३१ ॥
३१) पूर्वीं जनकादि अनेक राजे होऊन गेले. राज्य करीत असूनही त्यांनीं आपलें समाधान टिकवले. आत्ता सांप्रतकाळींसुद्धां असें पुण्यश्र्लोक पुरुष हयात आहेत. 
राजा असतां मृत्य आला । लक्ष कोटी कबुल जाला ।
तरि सोडिना तयाला । मृत्य कांहीं ॥ ३२ ॥
३२) समजा एखाद्या राजानें अंतःकाळीं मृत्यु टळावा म्हणून लक्षावधि रुपये देण्याची तयारी दर्शविली तरी कांहीं केल्यासुद्धा मृत्यु त्यास सोडीत नाही.
ऐसें हें पराधेन जिणें । यामधें दुखणें बाहाणें । 
नाना उद्वेग चिंता करणें । किती म्हणोनि ॥ ३३ ॥
३३) माणसाचें जगणें असें हें पराधीन आहे. तसेंच दुखणेंबाहणें, तसेंच अनेक तर्‍हेची दुःखें आणि काळज्या यांनीं तें व्यापलें आहे. सगळें सांगणें शक्य नाहीं.
हाट भरला संसाराचा । नफा पाहावा देवाचा ।
तरीच या कष्टाचा । परियाये होतो ॥ ३४ ॥
३४) संसाराचा बाजार भरला आहे. त्यांत देवाचा नफा पाहावा. तरच संसारांत केलेल्या कष्टाचा खरा मोबदला मिळतो. नाहीं तर केलेले श्रम खरोखरीच वाया गेल्यासारखें होतात.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे काळरुपनाम समास आठवा ॥
Samas Aathava KalaRup Nirupan 
 समास आठवा काळरुप निरुपण


Custom Search

Tuesday, February 13, 2018

Samas Satava VishayaTyyga Nirupan समास सातवा विषयत्याग


Dashak Barava Samas Satava VishayaTyyga Nirupan 
Samas Satava VishayaTyyga Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us Vishaya Tyaga. There is a feeling in the minds of people that For succsess in Parmarth, one needs to make a sacrifice with the bodily pleasures. That is called as Vishaya Tyaga. Samarth is telling us about it.
समास सातवा विषयत्याग 
श्रीराम ।
न्यायें निष्ठुर बोलणें । बहुतांस वाटे कंटाळवाणें ।
मळमळ करितां जेवणें । विहित नव्हे ॥ १ ॥
१) अगदी तर्कशुद्ध असलेले स्पष्ट बोलणें लोकांना आवडत नाहीं. पण ज्याप्रमाणें पोटांत मळमळत असरांना जेऊ नये, त्याप्रमाणें मनांत शंका असतांना श्रवण करणें बरें नव्हें. 
बहुतीं विषय निंदिले । आणि तेचि सेवित गेले ।
विषयत्यागें देह चाले । हें तों घडेना ॥ २ ॥
२) पुष्कळ लोक विषयाची किंवा देहसुखाची निंदा करितात. पण स्वतः मात्र त्याचे सेवन करत जगतात. खरें म्हणजे विषयाचा त्याग केला तर देह चालणार नाहीं.
बोलणें येक चालणें येक । त्याचें नांव हीन विवेक ।
येणें करितां सकळ लोक । हांसों लागती ॥ ३ ॥
३) बोलण्याचालण्याचा मेळ नसतो त्याला हीनविवेक म्हणतात. अशा हीन विवेकी माणसाला सगळें लोक हसतात. 
विषयत्यागेंविण तों कांहीं । परलोक तो प्राप्त नाहीं ।
ऐसें बोलणें ठाईं ठाईं । बरें पाहा ॥ ४ ॥  
४) विषयाचा त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाहीं. असें सगळीकडे सांगितलेले आढळतें.  
प्रपंची खाती जेविती । परमार्थी काये उपवास करिती ।
उभयता सारिखे दिसती । विषयाविषयीं ॥ ५ ॥
५) पण प्रश्र्न असा कीं प्रपंच करणारे तेवढे खातात पितात आणि परमार्थ करणारे काय उपाशी राहतात ? विषय सेवनाच्या बाबतींत दोघेही सारखेंच दिसतात.
देह चालतां विषय त्यागी । ऐसा कोण आहे जगीं ।
याचा निर्वाह मजलागीं । देवें निरोपावा ॥ ६ ॥ 
६) मनुष्य जिवंत असेंपर्यंत विषय सुटणें अशक्य आहे. देह जिवंत आहे पण विषय सोडून दिला आहे असा कोणी या जगांत आहे का ? या प्रश्र्नाचे उत्तर गुरुदेवांनी आम्हाला द्यावें.
विषय अवघा त्यागावा । तरीच परमार्थ करावा ।
ऐसें पाहातां गोवा । दिसतो किं ॥ ७ ॥
७) विषयाचा संपूर्ण त्याग केला तरच परमार्थ करतां येतो, असें म्हटलें तर फारच गोंधळ होतो.  
ऐसा श्रोता अनुवादला । वक्ता उत्तर देता जाला ।
सावध होऊन मन घाला । येतद्विषईं ॥ ८ ॥
८) श्रोत्यानें आपली शंका सविस्तर मांडली. वक्त्यानें तिचे निरसन केलें. वक्त्याचें म्हणणे श्रोत्यांनी एकाग्र मनानें व त्या विषयांत लक्ष घालून ऐकावें. 
वैराग्यें करावा त्याग । तरीच परमार्थयोग ।
प्रपंचत्यागें सर्व सांग । परमार्थ घडे ॥ ९ ॥
९) वैराग्याच्या पार्श्वभूमीवर विषयांचा त्याग केला तरच परमार्थ साधण्याचा योग येतो. प्रपंचाचा त्याग केल्यानेंच  सर्वांगीण परमार्थ घडतो.  
मागें ज्ञानी होऊन गेले । तेंहि बहुत कष्ट केले ।
तरी मग विख्यात जाले । भूमंडळीं ॥ १० ॥
१०) पूर्वीं जें मोठमोठे ज्ञानी होऊन गेले त्यांनी परमार्थासाठीं पुष्कळ कष्ट सोसलें. त्यानंतर तें जगांत महान झाले. 
येर मत्सर करितांच गेलीं । अन्न अन्न म्हणतां मेलीं ।
कित्येक भ्रष्टलीं । पोटासाठीं ॥ ११ ॥
११) बाकींचे प्रापंचिक लोक आपापसांत मत्सर करीत राहीलें. कांहीं अन्नानदशा होऊन मरण पावलें. तर कांहीं पोटासाठीं भ्रष्ट झालें.  
वैराग्य मुळींहून नाहीं । ज्ञान प्रत्ययाचें नाहीं ।
सुचि आचार तोहि नाहीं । भजन कैंचे ॥ १२ ॥ 
१२) ज्या लोकांना अंगचे खरें वैराग्य नाही. स्वतःच्या अनुभवाचे ज्ञान नाहीं. शुद्ध आचार नाहीं, भजनपूजन नाहीं, 
ऐसे प्रकारीचे जन । आपणास म्हणती सज्जन ।
पाहों जाता अनुमान । अवघाच दिसे ॥ १३ ॥
१३) अशा प्रकारची माणसें सज्जन म्हणून मिरवून घेतात. पण खरें पाहिलें तर हा सज्जनपणा काल्पनिकअसतो. वास्तविक नसतो. 
जयास नाहीं अनुताप । हेंचि येक पूर्वपाप ।
क्षणक्ष्णा विक्षेप । पराधीकपणें ॥ १४ ॥
१४) आपलें आजपर्यंतचे आयुष्य वाया गेले असा अनुताप न होणें हें त्या माणसामचे एक महापापच समजावें. दुसर्‍याचा उत्कर्ष पाहून त्यांच्या मनांत विक्षेप उत्पन्न होतो. त्यांचा मत्सर जागा होतो. 
मज नाहीं तुज साजेना । हें तों अवघें ठाउकें आहे जना ।
खात्यास नखातें देखों सकेना । ऐसें आहे ॥ १५ ॥
१५) " जें मला नाहीं तें तुलाही शोभत नाहीं " हा मत्सराचा दृष्टीकोन सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्याला खायला अन्न मिळत नाहीं तो अन्न खाणार्‍याला निर्मळ मनानें पाहूं शकत नाहीं, त्यातलाच हा प्रकार आहे.  
भाग्यपुरुष थोर थोर । त्यास निंदिती डीवाडखोर ।
सावास देखतां चोर । चर्फडी जैसा ॥ १६ ॥
१६) भाग्यवंत अशा निरनिराळ्या थोर पुरुषांची टवाळखोर निंदा करतात. सज्जन माणसाला पाहून चोर चरफडतात. तशांततलाच हा प्रकार आहे. 
वैराग्यापरतें नाहीं भाग्य । वैराग्य नाहीं तें अभाग्य ।
वैराग्य नस्तां योग्य । परमार्थ नव्हे ॥ १७ ॥
१७) वैराग्यासारखें भाग्य नाहीं. वैराग्य नसेल तें दुर्भाग्य होय. कारण वैराग्याच्या अभावी योग्य रीतीनें परमार्थ होत नाहीं.  
प्रत्ययेज्ञानी वीतरागी । विवेकबळें सकळ त्यागी ।
तो जाणीजे माहांयोगी । ईश्र्वरी पुरुष ॥ १८ ॥
१८) ज्याच्यापाशीं अनुभवाचे ज्ञान आहे, ज्याची आसक्ती सुटलेली आहे, विवेकाच्या जोरावर ज्यानें सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, असा पुरुष महायोगी समजावा. तो ईश्र्वरी पुरुष असतो.  
अष्टमा सिद्धीची उपेक्षा । करुन घेतली योगदीक्षा ।
घरोंघरीं मागे भिक्षा । माहादेव ॥ १९ ॥
१९) श्रीशंकर हा वैराग्याचा परम आदर्श आहे. आठ मोठ्या सिद्धिंना बाजूस सारुन श्रीमाहादेवानें योगदिक्षा घेतली आणि तो घरोघर भिक्षा मागत फिरतो.  
ईक्ष्वराची बराबरी । कैसा करील वेषधारी ।
म्हणोनिया सगट सरी । होत नाहीं ॥ २० ॥
२०) महादेवासारखा वेष धारण करणारा त्याची बरोबरी करुं शकणार नाहीं. म्हणून बाहेरुन सारखेपणा दिसला तरी सर्वांची योग्यता सारखीं नसते. 
उदास आणी विवेक । त्यास शोधिती सकळ लोक ।
जैसें लालची मूर्ख रंक । तें दैन्यवाणें ॥ २१ ॥
२१) जो अंतरी वैराग्यसंपन्न व विवेकी असतो अशा  पुरुषाला पुष्कळ लोक शोघीत येतात. याच्या उलट जो लोभी, आसक्त व विचेकहीन असतो असा भाग्यहीन दिनवाणें जीवन जगत असतो.   
जे विचारापासून चेवले । जे आचारापासून भ्रष्टले ।
विवेक करुं विसरले । विषयलोभी ॥ २२ ॥
२२) जी माणसें उच्च विचारांपासून खाली घसरलेली असतात, जी आचारनें भ्रष्ट असतात, ती माणसें विषयांच्या लोभानें आत्मानात्मविचार करुं शकत नाहींत. सारासार विचाराचा त्यांना विसर पडतो.  
भजन तरी आवडेना । पुरश्र्चर्ण कदापि घडेना ।
भल्यांस त्यांस पडेना । येतन्निमित्य ॥ २३ ॥ 
२३) त्यांना भजनपूजन आवडत नाहीं. त्यांच्या हातून पुरश्र्चरण कधीं घडत नाहीं. याच कारणाने त्यांचे संत-सज्जनांशी जमत नाहीं.    
वैराग्यें करुन भ्रष्टेना । ज्ञान भजन सांडिना ।
वित्पन्न आणि वाद घेना । ऐसा थोडा ॥ २४ ॥
२४) वैराग्यसंपन्न असून जो भ्रष्ट होत नाहीं, ज्ञानी असून जो भगवमताचे भजन सोडत नाहीं, स्वतः विद्वान असून जो कधीं वादांत पडत नाहीं, अशीं माणसें फार थोडी आढळतात. 
कष्ट करितां सेत पिके । उंच वस्त तत्काळ विके ।
जाणत्या लोकांच्या कौतुकें । उड्या पडती ॥ २५ ॥
२५) कष्ट केलें तर शेतांत उत्तम पीक येते. भारी वस्तु असेल तर ती बाजारांत लगेच विकली जाते. त्याचप्रमाणें जो विवेक व वैराग्य या दोन्हीनीं संपन्न असतो, त्याच्याकडे जाणत्या लोकांच्या उड्या पडतात.  
येर ते अवघेंचि मदले । दुराशेनें खोटे जाले ।
कानकोंडे ज्ञान केलें । भ्रष्टाकारें ॥ २६ ॥
२६) हें ज्यांच्यापाशीं नसते तें लोक निस्तेजपणें मागें पडतात. मनांत आशा वागवल्यानें तें खोटे पडतात. वैराग्यभ्रष्ट झाल्यानें त्यांचे ज्ञान मिंधें बनते. तें कानकोडे होतें.  
सबळ विषय त्यागणें । शुद्ध कार्याकारण घेणें ।
विषयत्यागाची लक्षणें । वोळखा ऐसीं ॥ २७ ॥
२७) मर्यादा सोडून असणारे, प्रमाणाबाहेर जाणारे देहसुख सोडावें. शरीराचे धारण करण्यास जरुर तेवढेंच देहसुख सेवावें. विषयत्यागाची लक्षणें अशी आहेत हें ओळखून असावें.  
सकळ कांहीं कर्ता देव । नाहीं प्रकृतीचा ठाव ।
विवेकाचा अभिप्राव । विवेकी जाणती ॥ २८ ॥
२८) हें झालें वैराग्य आतां विवेक ऐकावा. जें जेम कांहीं घडतें त्याचा कर्ता ईश्र्वर आहे. प्रकृतिच्या पसार्‍याला खरें अस्तित्व नाहीं. असा निश्र्चय अंतर्यामी 
स्थिर होणें हा विवेक होय. जे खरे विवेकी असतात त्यानांच हा विवेकाचा अर्थ बरोबर कळतो.   
शूरत्वविषईं खडतर । त्यास मानिती लाहानथोर ।
कामगार आणि आंगचोर । येक कैसा ॥ २९ ॥
२९) सर्व प्रसंगीं जो शौर्य दाखवतो त्याला लहान मोठे सर्वजण शूर मानतात. जो खरे कष्ट करणारा आहे तो आणि जो अंगचोर आहे तो, या दोघांची बरोबरी करतां येत नाहीं.  
त्यागात्याग तार्किक जाणे । बोलाऐसें चालों जाणे ।
पिंडब्रह्मांड सकळ जाणे । येथेयोग्य ॥ ३० ॥
३०) कशाचा त्याग करावा व कशाचा करुं नये हें जो शुद्ध तर्कानें जाणतो, आपण जसें बोलतो तसें वागण्याचें जो जाणतो, पिंडब्रह्मांडाची रचना जो यथार्थपणें जाणतो,
ऐसा जो सर्व जाणता । उत्तमलक्षणी पुरुता ।
तयाचेनि सार्थकता । सहजचि होये ॥ ३१ ॥
३१) असें सर्व जाणणारा असून जो उत्तम गुणांनी पूर्ण संपन्न असतो त्याच्या संगतीनें आपल्या आयुष्याचें सार्थक घडतें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विषयत्यागनिरुपणनाम समास सातवा ॥
    Samas Satava VishayaTyyga  Nirupan 
   समास सातवा विषयत्याग 
Custom Search

Monday, February 12, 2018

Samas Sahava Srushtikram Nirupan समास सहावा सृष्टिक्रम निरुपण

Dashak Barava Samas Sahava Srushtikram Nirupan 
Samas Sahava Srushtikram Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us How this world came into extiencs.
समास सहावा सृष्टिक्रम निरुपण
श्रीराम ।
ब्रह्म निर्मळ निश्र्चळ । शाश्वत सार अमळ विमळ ।
अवकाश घन पोकळ । गगनाऐसें ॥ १ ॥
१) परब्रह्म अत्यंत निर्मळ व निश्र्चळ आहे. तें शाश्वत असून अत्यंत मलरहित आहे. तसेंच तें सर्वांचे सार असून आकाशाप्रमाणें सगळीकडे भरलेले व अत्यंत सूक्ष्म आहे.  
तयास करणें ना धरणें । तयास जन्म ना मरणें ।
तेथें जाणणें ना नेणणें । सुन्यातीत ॥ २ ॥
२) ब्रह्माला करणें नाहीं व धरणें नाहीं. त्यास जन्म नाही अथवा मरण नाहीं. त्याला ज्ञान नाहीं व अज्ञान नाहीं. तरी तें शून्य नाहीं. शून्याच्या पलीकडे आहे. 
तें रचेना ना खचेना । तें होयेना ना जायेना ।
मायातीत निरंजना । पारचि नाहीं ॥ ३ ॥
३) तें रचत नाहीं वा खचत नाहीं. तें होत नाहीं व जात नाहीं. नाहींसे होत नाहीं अशा त्या मायेपलीकडे असणार्‍या ब्रह्माला शेवट नाहीं.
पुढें संकल्प उठिला । षडगुणेश्र्वर बोलिजे त्याला ।
अर्धनारीनटेश्र्वराला । बोलिजेतें ॥ ४ ॥
४) अशा ब्रह्मामध्यें संकल्प उठला, त्या अर्धनारीनटेश्र्वराला षड्गुणैश्र्वर महणतात.
सर्वेश्र्वर सर्वज्ञ । साक्षी द्रष्टा ज्ञानघन ।
परेश परमात्मा जगजीवन । मूळपुरुष ॥ ५ ॥
५) शिवाय सर्वेश्र्वर, सर्वज्ञ, साक्षी, द्रष्टा, ज्ञानघन, मुळपुरुष अशीहीं त्यास नांवें आहेत. 
ते मूळमाया बहुगुणी । अधोमुखें गुणक्षोभिणी ।
गुणत्रये तिजपासूनि । निर्माण जाले ॥ ६ ॥
६) मूळमाय बहुगुणी आहे. खालीं तोंड करुन ती गुणक्षोभिणी बनते. सत्व, रज व तम हे तीन गुण तिच्यापासून प्रगट होतात. 
पुढें विष्णु जाला निर्माण । जाणतीकळा सत्वगुण ।
जो करिताहे पाळण । त्रैलोक्याचें ॥ ७ 
७) पुढें विष्णु जन्मास आला. विष्णु म्हणजे सत्वगुण, शुद्ध जाणीव होय. तो त्रैलोक्याचें पालन करतो. 
पुढें जाणीवनेणीवमिश्रित । ब्रह्मा जाणावा नेमस्त ।
त्याच्या गुणें उत्पत्ति होत । भुवनत्रैं ॥ ८ ॥
८) नंतर ब्रह्मदेव जन्मास आला. त्याच्या ठिकाणी जाणीव व नेणीव या दोहींचे मिक्षण असते. हें खात्रीनें समजावें. त्याच्या कर्तृत्वानें तिन्ही भुवनें उत्पन्न होतात. 
पुढें रुद्र तमोगुण । सकळ संव्हाराचें कारण ।
सकळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ ९ ॥
९) पुढें रुद्र जन्मास आला. तो तमोगुणी आहे. तो सगळ्या संहाराचें मूळ कारण आहे. विश्वामधील सारें कर्तेपण रुद्रापाशीं असते.   
तेथून पुढें पंचभूतें । पावलीं पष्ट दशेतें ।
अष्टधा प्रकृतीचें स्वरुप तें । मुळींच आहे ॥ १० ॥
१०) यानंतर पंचभूतें व्यक्तदशेला आली. अव्यक्तरुपानें ती अष्टधा प्रकृतीचें मूळस्वरुपच पंचभूतात्मक आहे.   
निश्र्चळीं जालें चळण । तेंचि वायोचें लक्षण ।
पंचभूतें आणि त्रिगुण । सूक्ष्म अष्टधा ॥ ११ ॥
११) निश्चळ ब्रह्मामध्यें जें चळण होतें तेंच वायूचें लक्षण होय. पांच भूतें व तीन गुण मिळून बनणारी अष्टधा प्रकृति प्रथम सूक्ष्म असते. 
आकाश म्हणिजे अंतरात्मा । प्रत्ययें पाहावा महिमा ।
त्या आकाशापासून जन्मा । वायो आला ॥ १२ ॥
१२) आकाश म्हणजे अंतरात्मा होय. तो किती मोठा आहे. हें अनुभवानें बघावें. त्या आकाशापासून वायु झाला. 
तया वायोच्या दोनी झुळुका । उष्ण सीतळ ऐका ।
सीतळापासून तारा मंयका । जन्म जाला ॥ १३ ॥  
१३) उष्ण व थंड असें वायुचें दोन प्रकार आहेत. थंड वायुपासून चंद्र व तारकांचा जन्म झाला.    
उष्णापासून रवि वन्ही । विद्युल्यता आदिकरुनि ।
सीतळ उष्ण मिळोनि । तेज जाणावें ॥ १४ ॥
१४) उष्ण वायुपासून सूर्य, अग्नि, वीज इत्यादि निर्माण झाले. तेजदेखील उष्ण व थंड असें दोन प्रकारचे आहे. 
तया तेजापासून जालें आप । आप आळोन पृथ्वीचें रुप ।
पुढें औषधी अमूप । निर्माण जाल्याा ॥ १५ ॥ 
१५) त्या तेजापासून पाणी झाले. पाणी घट्ट होऊन पृथ्वी झाली. पृथ्वीवर असंख्य वनस्पती उगवल्या. 
औषधीपासून नाना रस । नाना बीज अन्नरस ।
चौर्‍यासि लक्ष योनीचा वास । भूमंडळीं ॥ १६ ॥
१६) वनस्पतींपासून नाना रस, बीजें आणि अन्नरस उत्पन्न झाले. पृथ्वीवरील चौर्‍यांशी लक्ष जीवप्राणी अन्नरसावरच जगतात.   
ऐसी जाली सृष्टिरचना । विचार आणिला पाहिजे मना ।
प्रत्ययेंविण अनुमाना । पात्र होइजे ॥ १७ ॥
१७) अशा क्रमानें पृथ्वीची रचना झाली. साधकानें या क्रमाचा नीट विचार करावा. खरा अनुभव नसेल तर उगीच कल्पना करीत बसावें लागतें. 
ऐसा जाला आकार । येणेंचि न्यायें संव्हार ।
सारासारविचार । यास बोलिजे ॥ १८ ॥
१८) अशा पायरीपायरीनें विश्व आकाराला आलें. याच पद्धतीनें त्याचा संहार देखील होतो. आकार व संहार यांचा नीट विचार करण्याला सारासार विचार असें म्हणतात. 
जें जें जेथून निर्माण जालें । तें तें तेथेंचि निमालें ।
येणेंचि न्यायें संव्हारलें । माहाप्रळईं ॥ १९ ॥
१९) जें ज्याच्यांतून येते तें त्याच्यांतच विलीन होते. याच पद्धतीनें महाप्रलयाच्यावेळीं सर्व विश्र्वाचा संहार घडून येतो. 
आद्य मध्य अवसान । जें शाश्वत निरणजन ।
तेथें लावावें अनुसंधान । जाणते पुरुषीं ॥ २० ॥
२०) विश्वरचनेच्या आरंभी, मध्यें व शेवटीं शाश्वत ब्रह्म अत्यंत मलरहित राहते. जानत्या पुरुषानें त्याचें एकाग्र मनानें अखंड चिंतन करावें.   
होत जाते नाना रचना । परी ते कांहींच तगेना ।
सारासार विचारणा । याकारणें ॥ २१ ॥
२१) या विश्वामध्यें अनंत प्रकारच्या रचना होतात व जातात. कोणतीही रचना कायमपणें टिकत नाहीं. म्हणून सार कोणतें व असार कोणतें याचा विचार करावा लागतो. 
द्रष्टा साक्षी अंतरात्मा । सर्वत्र बोलती महिमा ।
परी हे सर्वसाक्षिणी अवस्ता मां । प्रत्ययें पाहावी ॥ २२ ॥
२२) अंतराळ हा केवळ द्रष्टा आहे. असा त्याचा महिमा सगळेजण  सांगतात. पण तो कांहीं शुद्ध ब्रह्म नव्हे. हे प्रत्ययास येण्यासाठीं सर्वसाक्षिणी अवस्थेचा स्वतः अनुभव घ्यावा.  
मुळापासून सेवटवरी । अवघी मायेची भरोवरी ।
नाना विद्या कळाकुंसरी । तयेमधें ॥ २३ ॥
२३) विश्वाच्या अगदी मूळापासून तें शेवटपर्यंत सगळा मायेचाच विस्तार आहे. तिच्यामध्यें ानेक विद्या, कला व कौशल्य भरलेले आहे. तें सारें विश्वांतआढळते.   
जो उपाधी सेवट पावेल । त्यास भ्रम ऐसें वाटेल ।
जो उपाधीमध्यें आडकेल । त्यास काढिता कवण ॥ २४ ॥
२४) पण हें सगळें उपाधीरुप आहे. त्यानें शुद्ध ब्रह्मावर पांघरुण पडते. जो कोणी विवेकानें उपाधीचा शेवट गांठतो त्यास हा विश्वपसारा भ्रम आहे असें समजते. पण जो उपाधींत अडकतो, गुंतून राहतो, ती उपाधी खरी आहे असे धरुन चालतो  त्याला तिच्यांतून बाहेर पडणें कठीण आहे. 
विवेकप्रत्ययाचीं कामें । कैसीं घडती ल अनुमानभ्रमें ।
सारासारविचाराचेन संभ्रमें । पाविजे ब्रह्म ॥ २५ ॥
२५) विवेक वाढवून प्रत्यक्ष अनुभव घेण्याचें जें काम आहे तें केवळ भ्रमात्मक कल्पना करण्यानें साधणार नाहीं. सारासार विचाराच्या सामर्थ्यानेंच परब्रह्माची प्राप्ती होत असते.  
ब्रह्मांडींचें माहाकारण । ते मूळमाया जाण ।
अपूर्णास म्हणती ब्रह्म पूर्ण । विवेकहीन ॥ २६ ॥
२६) ब्रह्मांडाच्या महाकारण देहाला मूळमाया म्हणतात. तो देह अपूर्णच आहे. पण त्या अपूर्णाला विवेकहीन माणसें पूर्णब्रह्म म्हणतात.      
सृष्टीमधें बहुजन । येक भोगिती नृपासन ।
येक विष्टा टाकिती जाण । प्रत्येक्ष आतां ॥ २७ ॥
२७) जगामध्यें पुश्कळ माणसें आहेत. त्यांपैकीं कांहीं सिंहासनाचा भोग घेतात. तर इतर कांहीं घाण उपसत बसतात. असें प्रत्यक्ष आढळतें. विवेकहीन लोक दुसर्‍याप्रकारचे समजावेत. 
ऐसे उदंड लोक असती । आपणास थोर म्हणती ।
परी ते विवेकी जाणती । सकळ कांहीं ॥ २८ ॥
२८) स्वतःला मोठे म्हणवून घेणारे लोक जगांत पुष्कळ आहेत. परंतु विवेकी पुरुष खरा मोठा कोण हें बरोबर जाणतात. 
ऐसा आहे समाचार । कारण पाहिजे विचार ।
बहुतांच्या बोलें हा संसार । नासूं नये॥ २९ ॥
२९) या विषयाची कथा अशी आहे. सांगण्याचें कारण हें कीं, माणसाला सूक्ष्म विचार आवश्यक आहे. पुष्कळ लोकांच्या नादीं लागून आपल्या संसाराचा विचार करुं नये.  
पुस्तकज्ञानें निश्र्चये धरणें । तरी गुरु कासया करणें ।
याकारणें विवरणें । आपुल्या प्रत्ययें ॥ ३० ॥
३०) अनुभवावांचून या परमात्मस्वरुपाचा निश्चय होत असता तर सद्गुरु करण्याची आवश्यकताच राहीली नसती. पण पुस्तकी ज्ञान लटकें असतें म्हणून स्वतः अनुभव घ्यावा. आणि मग सारासार विचार करावा. आपला विवेक आपल्या प्रत्ययावर आधारलेला असावा.   
जो बहुतांच्या बोलें लागला । तो नेमस्त जाणावा बुडाला । 
येक साहेब नस्तां कोणाला । मुश्यारा मागावा ॥ ३१ ॥   
३१) जो अनेकांच्या नादीं लागतो तो खात्रीनें बुडतो असें पक्के समजावें. ज्याचा एकच मालक नाहीं त्याला कोणाकडेहि मेहनतीचा मोबदला मागता येत नाहीं.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सृष्टिक्रमनिरुपण नाम समास सहावा ॥
Samas Sahava Srushtikram Nirupan
समास सहावा सृष्टिक्रम निरुपण


Custom Search