Saturday, March 13, 2021

AyodhyaKanda Part 12,Doha 65 to 70,अयोध्याकाण्ड भाग १२,दोहा ६५ ते ७०

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 12 
Doha 65 to 70 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग १२ 
दोहा ६५ ते ७०

दोहा—खग मृग परिजन नगरु बनु बलकल बिमल दुकूल ।

नाथ साथ सुरसदन सम परनसाल सुख मूल ॥ ६५ ॥

हे नाथ, तुमच्यासोबत असताना मला पक्षी व पशू हे माझे कुटुंबीय असतील, वन हेच नगर व वृक्षांच्या साली याच निर्मळ वस्त्रे असतील आणि पर्णकुटी ही स्वर्गासारखी सुखाचे माहेर असेल. ॥ ६५ ॥

बनदेबीं बनदेव उदारा । करिहहिं सासु ससुर सम सारा ॥

कुस किसलय साथरी सुहाई । प्रभु सँग मंजु मनोज तुराई ॥

वनात उदार मनाच्या वनदेवी व वनदेव हे सासू-सासर्‍यांप्रमाणे माझा सांभाळ करतील, आणि कुश व पानांचा सुंदर बिछाना प्रभूंच्या संगतीमुळे कामदेवाच्या मनोहर गादीप्रमाणे वाटेल. ॥ १ ॥

कंद मूल फल अमिअ अहारु । अवध सौध सत सरिस पहारु ॥

छिनु छिनु प्रभु पद कमल बिलोकी । रहिहउँ मुदित दिवस जिमि कोकी ॥

कंद-मुळे व फळे ही अमृतासमान आहार असेल आणि पर्वत हेच अयोध्येमधील शेकडो राजमहालासारखे असतील. क्षणोश्रणी प्रभूंच्या चरणकमलांना पाहून दिवस जशी चकवी आनंदित असते, तशी मी आनंदात राहीन. ॥ २ ॥

बन दुख नाथ कहे बहुतेरे । भय बिषाद परिताप घनेरे ॥

प्रभु बियोग लवलेस समाना । सब मिलि होहिं न कृपानिधाना ॥

हे नाथ, तुम्ही वनातील पुष्कळशी दुःखे, बरेच भय, विषाद व दुःखे सांगितली, परंतु हे कृपानिधान, हे सर्व जरी एकत्र केले तरी प्रभू, तुमच्या वियोगाच्या दुःखापुढे लवलेशही नाहीत. ॥ ३ ॥

अस जियँ जानि सुजान सिरोमनि । लेइअ संग मोहि छाड़िअ जनि ॥

बिनती बहुत करौं का स्वामी । करुनामय उर अंतरजामी ॥

असा मनात विचार करुन हे नाथ, मला तुमच्यासोबत घेऊन चला. येथे सोडून जाऊ नका. हे स्वामी, मी आणखी काय विनवणी करु ? तुम्ही करुणामय आहात आणि सर्वांच्या मनातील जाणणारे आहात. ॥ ४ ॥

दोहा—राखिअ अवध जो अवधि लगि रहत न जनिअहिं प्रानु ।

दीनबंधु सुंदर सुखद सील सनेह निधान ॥ ६६ ॥

हे दीनबंधु, हे सुंदर, हे सुखदायक, हे शील व प्रेमाचे भांडार, जर चौदा वर्षांचा अवधी पूर्ण होईपर्यंत मला अयोध्येमध्ये ठेवाल, तर मी जिवंत राहणार नाही, असे समजा. ॥ ६६ ॥

मोहि मग चलत न होइहि हारी । छिनु छिनु चरन सरोज निहारी ॥

सबहि भॉंति पिय सेवा करिहौं । मारग जनित सकल श्रम हरिहौं ॥

क्षणोक्षणी तुमचे चरणकमल पाहात राहिल्यामुळे मला वाटेत चालताना थकवा वाटणर नाही. हे प्रियतम, मी सर्व प्रकारे तुमची सेवा करीन आणि वाट चालताना येणारा थकवा दूर करीन. ॥ १ ॥

पाय पखारि बैठि तरु छाहीं । करिहउँ बाउ मुदित मन माहीं ॥

श्रम कन सहित स्याम तनु देखें । कहँ दुख समउ प्रानपति पेखें ॥

मी तुमचे पाय धुऊन झाडांच्या सावलीत बसून मनात प्रसन्न होऊन तुम्हांला वारा घालीन. तुमचे स्वेद-बिंदू झळकणारे श्याम शरीर पाहात प्राणप्रिय पतीचे दर्शन घेताना मला दुःखासाठी जागाच कुठे राहील ? ॥ २ ॥

सम महि तृन तरुपल्लव डासी । पाय पलोटिहि सब निसि दासी ॥

बार बार मृदु मूरति जोही । लागिजहि तात बयारि न मोही ॥

सपाट जमिनीवर गवत व झाडांची पाने अंथरुन ही दासी रात्रभर तुमचे पाय चेपीत राहील. वारंवार तुमची कोमल मूर्ती पाहून मला कधी उकाडा जाणवणार नाही. ॥ ३ ॥     

को प्रभु सँग मोहि चितवनिहारा । सिंघबधुहि जिमि ससक सिआरा ॥

मैं सुकुमारि नाथ बन जोगू । तुम्हहि उचित तप बयारि न मोही ॥

आपण सोबत असताना माझ्याकडे डोळे वर करुन तरी कोण पाहाणार आहे ? ससे व कोल्हे सिंहिणीकडे कधी बघू शकत नाहीत. मी सुकुमारी आहे आणि तुम्ही वनात जाण्याजोगे आहात काय ? मग तुमच्यासाठी तेवढी तपस्या योग्य व मला विषय-भोग योग्य आहेत, असे तुम्हांला वाटते काय ? ॥ ४ ॥

दोहा—ऐसेउ बचन कठोर सुनि जौं न हृदउ बिलगान ।

तौ प्रभु बिषम बियोग दुख सहिहहिं पावँर प्रान ॥ ६७ ॥

तुमचे असे हे कठोर बोलणे ऐकूनही माझे हृदय विदीर्ण झाले नाही, त्यावरुन हे प्रभु माझे हे क्षुद्र प्राण तुमच्या वियोगाचे दुःख सहन करु शकतील असे वाटते. ‘ ( अर्थात तुमच्या विरहाने माझे प्राण राहाणार नाहीत. ) ॥ ६७ ॥

अस कहि सीय बिकल भइ भारी । बचन बियोगु न सकी सँभारी ।

 देखि दसा रघुपति जियँ जाना । हठि राखें नहिं राखिहि प्राना ॥

असे म्हणून सीता फार शोकाकुल झाली. ती बोलण्यातील वियोगसुद्धा सहन करु शकली नाही, तिची अवस्था पाहून श्रीरघुनाथांनी मनात जाणले की, हिला आग्रहाने इथे ठेवल्यास हिचे प्राण वाचणार नाहीत. ॥ १ ॥

कहेउ कृपाल भानुकुल नाथा । परिहरि सोचु चलहु बन साथा ॥

नहिं बिषाद कर अवसरु आजू । बेगि करहु बन गवन समाजू ॥

तेव्हा कृपाळू सूर्यकुलाचे स्वामी श्रीरामचंद्र म्हणाले, ‘ काळजी करणे सोडून देऊन माझ्याबरोबर वनात चल. ही विषाद मानण्याची वेळ नाही. लगेच वनगमनाची तयारी कर. ‘ ॥ २ ॥

कहि प्रिय बचन प्रिया समुझाई । लगे मातु पद आसिष पाई ॥

बेगि प्रजा दुख मेटब आई । जननी निठुर बिसरि जनि जाई ॥

श्रीरामचंद्रांनी प्रिय बोलून सीतेला समजाविले. नंतर मातेचे पाय धरुन आशीर्वाद घेतला. कौसल्या म्हणाली, ‘ मुला ! लवकर परत येऊन प्रजेचे दुःख दूर कर. या निष्ठुर आईला तुझा विसर न पडो. ॥ ३ ॥

फिरिहि दसा बिधि बहुरि कि मोरी । देखिहउँ नयन मनोहर जोरी ॥

सुदिन सुघरी तात कब होइहि । जननी जिअत बदन बिधु जोइहि ॥

हे विधात्या, माझी ही दशा कधी बदलेल काय ? मी आपल्या डोळ्यांनी या मनोहर जोडप्याला पुन्हा पाहू शकेन काय ? हे पुत्रा, तुझी आई जिवंतपणी तुझा मुखचंद्र पुन्हा पाहू शकेल, तो सुंदर दिवस व शुभ क्षण केव्हा येईल ? ॥ ४ ॥

दोहा—बहुरि बच्छ कहि लालु कहि रघुपति रघुबर तात ।

कबहिं बोलाइ लगाइ हियँ हरषि निरखिहउँ गात ॥ ६८ ॥

बाळा ! ‘ वत्स ‘ म्हणून, ‘ लाला ‘ म्हणून, ‘ रघुपती ‘ म्हणून, ‘ रघुबर ‘ म्हणून मी तुला पुन्हा केव्हा हृदयाशी धरीन ? व आनंदाने तुला पाहू शकेन ? ‘ ॥ ६८ ॥

लखि सनेह कातरि महतारी । बचनु न आव बिकल भइ भारी ॥

राम प्रबोधु कीन्ह बिधि नाना । समउ सनेहु न जाइ बखाना ॥

माता प्रेमाने अधीर असून इतकी व्याकूळ झाली आहे की, तिच्या तोंडातून शब्द फुटत नाही. तेव्हा श्रीरामचंद्रांनी अनेक प्रकारे मातेला समजावले. त्या प्रसंगाचे व प्रेमाचे वर्णन करणे अशक्य. ॥ १ ॥

तब जानकी सासु पग लागी । सुनिअ माय मैं परम अभागी ॥

सेवा समय दैअँ बनु दीन्हा । मोर मनोरथु सफल न कीन्हा ॥

मग जानकी सासूच्या पाया पडून म्हणाली,  ‘ आई ! ऐका. मी मोठी दुर्दैवी आहे. तुमची सेवा करण्याच्या वेळी देवाने मला वनवास दिला. माझे मनोरथ पूर्ण केले नाहीत. ॥ २ ॥

तजब छोभु जनि छाड़िअ छोहू । करमु कठिन कछु दोसु न मोहू ॥

सुनि सिय बचन सासु अकुलानी । दसा कवनि बिधि कहौं बखानी ॥

तुम्ही क्षोभ सोडा, परंतु माझ्यावरील कृपा सोडू नका. कर्माची गती कठीण आहे, माझाही काही दोष नाही. ‘ सीतेचे हे बोलणे ऐकून सासू व्याकूळ झाली. तिच्या अवस्थेचे वर्णन मी कसे करणार ? ॥ ३ ॥

बारहिं बार लाइ उर लीन्ही । धरि धीरजु सिख आसिष दीन्ही ॥

अचल होउ अहिवातु तुम्हारा । जब लगि गंगा जमुना जल धारा ॥  

कौसल्येने सीतेला वारंवार हृदयाशी धरले व धीर धरुन उपदेश केला, आणि आशीर्वाद दिला की, ‘ जोपर्यंत गंगा व यमुनेचा प्रवाह वाहात राहील, तोपर्यंत तुझे सौभाग्य अढळ राहील. ‘ ॥ ४ ॥

दोहा—सीतहि सासु असीस सिख दीन्हि अनेक प्रकार ।

चली नाइ पद पदुम सिरु अति हित बारहिं बार ॥ ६९ ॥

सासूने सीतेला अनेक प्रकारचे आशीर्वाद व उपदेश दिले. आणि सीता मोठ्या प्रेमाने सासूच्या चरणी मस्तक ठेवून निघाली. ॥ ६९ ॥

समाचार जब लछिमन पाए । ब्याकुल बिलख बदन उठि धाए ॥

कंप पुलक तन नयन सनीरा । गहे चरन अति प्रेम अधीरा ॥

जेव्हा लक्ष्मणाला ही बातमी सनजली, तेव्हा तो व्याकूळ व उदास होऊन धावला. शरीर थरथरत होते, रोमांच आले होते आणि नेत्र अश्रूंनी भरले होते. प्रेमाने अत्यंत अधीर होऊन त्याने श्रीरामांचे चरण धरले. ॥ १ ॥

कहि न सकत कछु चितवत ठाढ़े । मीनु दीन जनु जल तें काढ़े ॥

सोचु हृदयँ बिधि का होनिहारा । सबु सुखु सुकृतु सिरान हमारा ॥

तो काही बोलत नव्हता, उभ्या पाहात होता. जळातून बाहेर काढल्यावर मासा जसा मलूल होतो, तसा तो दीनवाणा झाला होता. मनात विचार करीत होता की, हे विधात्या, काय होणार आहे ? आमचे सर्व सुख व पुण्य संपून गेले काय ? ॥ २ ॥

मो कहुँ काह कहब रघुनाथा । रखिहहिं भवन कि लेहहिं साथा ॥

राम बिलोकि बंधु कर जोरें । देह गेह सब सन तृनु तोरें ॥

मला श्रीराम आता काय सांगतील ? घरी ठेवतील की सोबत नेतील ? ‘ श्रीरामांनी लक्ष्मणाला हात जोडून उभा असलेला व घरचीच नव्हे, तर शरीराचीही सर्व नाती तोडून आलेला आहे, असे पाहिले. ॥ ३ ॥

बोले बचनु राम नय नागर । सील सनेह सरल सुख सागर ॥

तात प्रेम बस जनि कदराहू । समुझि हृदयँ परिनाम उछाहू ॥

तेव्हा नीति-निपुण आणि शील, स्नेह, सरळपणा आणि सुखाचे सागर असलेले श्रीराम म्हणाले, ‘ बंधो ! तू येथे राहण्यामुळे परिणामी होणार्‍या लाभाचा विचार मनात ठेवून तू प्रेमाने अधीर बनू नकोस. ॥ ४ ॥

दोहा—मातु पिता गुरु स्वामि सिख सिर धरि करहिं सुभायँ ।

लहेउ लाभु तिन्ह जनम कर नतरु जनमु जग जायँ ॥ ७० ॥

जे लोक माता, पिता, गुरु आणि स्वामी यांचा उपदेश मनःपूर्वक शिरोधार्य मानून त्याचे पालन करतात, त्यांनीच जन्माचे सार्थक केले. नाहीतर जगात जन्म घेणे व्यर्थ आहे. ॥ ७० ॥

अस जियँ जानि सुनहु सिख भाई । करहु मातु पितु पद सेवकाई ॥

भवन भरतु रिपुसूदनु नाहीं । राउ बृद्ध मम दुखु मन माहीं ॥

हे बंधू, हे लक्षात आणून माझे म्हणणे ऐक व माता-पित्यांच्या चरणांची सेवा कर. भरत आणि शत्रुघ्न हे घरी नाहीत. महाराज वृद्ध आहेत आणि त्यांच्या मनात माझ्या वनगमनाचे फार दुःख आहे. ॥ १ ॥

मैं बन जाउँ तुम्हहि लेइ साथा । होइ सबहि बिधि अवध अनाथा ॥

गुरु पितु मातु प्रजा परिवारु । सब कहुँ परइ दुसह दुख भारु ॥

अशा अवस्थेमध्ये मी तुला बरोबर घेऊन वनात गेलो, तर अयोध्या सर्व प्रकारे अनाथ होईल. गुरु, माता, पिता, प्रजा व परिवार या सर्वांवर दुःखाचे असह्य ओझे पडेल. ॥ २ ॥

रहहु करहु सब कर परितोषू । नतरु तात होइहि बड़ दोषू ॥

जासु राज प्रिय प्रजा दुखारी । सो नृपु अवसि नरक अधिकारी ॥

तेव्हा तू येथेच राहा आणि सर्वांचे समाधान कर. नाहीतर बंधो ! फार मोठा दोष पदरी येईल. ज्याच्या राज्यात प्रजा दुःखी असते, तो राजा नक्कीच नरकास पात्र ठरतो. ॥ ३ ॥

रहहु तात असि नीति बिचारी । सुनत लखनु भए ब्याकुल भारी ॥

सिअरें बचन सूखि गए कैसें । परसत तुहिन तामरसु जैसें ॥

बंधो ! या नीतीचा विचार करुन तू घरीच रहा. ‘ हे

 ऐकताच लक्ष्मण फार व्याकुळ झाला. दवामुळे कमळ

 जसे करपून जाते, त्याप्रमाणे श्रीरामांच्या शीतल

 वचनामुळे तो करपून गेला. ॥ ४ ॥



Custom Search

AyodhyaKanda Part 11 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ११

 

AyodhyaKanda Part 11 
Doha 59 to 64 
श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ११ 
दोहा ५९ ते ६४ 
ShriRamCharitManas AyodhyaKanda

दोहा—करि केहरि निसिचर चरहिं दुष्ट जंतु बन भूरि ।

बिष बाटिकॉं कि सोह सुत सुभग सजीवनि मूरि ॥ ५९ ॥

हत्ती, सिंह, राक्षस इत्यादी अनेक दुष्ट जीव-जंतू वनात वावरत असतात. बाळा ! त्या विषाच्या वाटिकेमध्ये संजीवनीची मुळी कशी शोभून दिसेल ? ॥ ५९ ॥

बन हित कोल किरात किसोरी । रचीं बिरंचि बिषय सुख भोरी ॥

पाहनकृमि जिमि कठिन सुभाऊ । तिन्हहि कलेसु न कानन काऊ ॥

वनामध्ये ब्रह्मदेवाने विषयसुखाशी अपरिचित असणार्‍या कोल व भिल्ल यांच्या मुली निर्माण केल्या आहेत. त्यांचा स्वभाव पाषाण-किड्याप्रमाणे कठोर असतो. त्यांना वनात कधी त्रास वाटत नाही. ॥ १ ॥

कै तापस तिय कानन जोगू । जिन्ह तप हेतु तजा सब भोगू ॥

सिय बन बसिहि तात केहि भॉंती । चित्रलिखित कपि देखि डेराती ॥

 किंवा तपस्वांच्या स्त्रिया वनात राहण्यास योग्य आहेत. त्यांनी तपस्येसाठी सर्व भोग सोडून दिलेले  असतात. हे पुत्रा, जी चित्रातील माकड पाहून घाबरते, ती सीता वनात कशी राहू शकेल ? ॥ २ ॥

सुरसर सुभग बनज बन चारी । डाबर जोगु कि हंसकुमारी ॥

अस बिचारि जस आयसु होई । मैं सिख देउँ जानकिहि सोई ॥

देवसरोवरातील कमलवनात संचार करणारी हंसी डबक्यात राहण्यास योग्य आहे काय ? याचा विचार करुन जर तुझी आज्ञा असेल, तर मग मी जानकीला तसा उपदेश देईन.’ ॥ ३ ॥

जौं सिय भवन रहै कह अंबा । मोहि कहँ होइ बहुत अवलंबा ॥

सुनि रघुबीर मातु प्रिय बानी । सील सनेह सुधॉं जनु सानी ॥

कौसल्या म्हणाली, ‘ जर सीता घरी राहिली, तर मला मोठा आधार होईल.’ श्रीरामांनी जणू शील व स्नेहरुपी अमृताने ओथंबलेली मातेची प्रिय वाणी ऐकून ॥ ४ ॥

दोहा—कहि प्रिय बचन बिबेकमय कीन्हि मातु परितोष ॥

लगे प्रबोधन जानकिहि प्रगटि बिपिन गुन दोष ॥ ६० ॥

विवेकपूर्ण प्रिय वचन बोलून मातेचे समाधान केले. मग वनातील गुण-दोष सांगून ते सीतेला समजावीत म्हणू लागले. ॥ ६० ॥

मास पारायण, चौदावा विश्राम

मातु समीप कहत सकुचाहीं । बोले समउ समुझि मन माहीं ॥

राजकुमारि सिखावनु सुनहू । आन भॉंति जियँ जनि कछू गुनहू ॥

मातेसमोर सीतेला काही बोलण्यास श्रीराम संकोचत होते. परंतु मनात त्यांनी विचार केला की, हीच वेळ योग्य आहे. म्हणून ते म्हणाले, ‘ हे राजकुमारी, माझे म्हणणे ऐक. मनात उगाच दुसरे काही आणू नकोस. ॥ १ ॥

आपन मोर नीक जौं चहहू । बचनु हमार मानि गृह रहहू ॥

आयसु मोर सासु सेवकाई । सब बिधि भामिनि भवन भलाई ॥

जर तुला माझे व स्वतःचे भले व्हावे अशी इच्छा असेल, तर माझे म्हणणे मानून तू घरी राहा. हे भामिनी, त्यामुळे माझ्या आज्ञेचे पालन होईल; सासूची सेवा घडेल. घरी राहण्यात सर्व प्रकारे कल्याण आहे. ॥ २ ॥

एहि ते अधिक धरमु नहिं दूजा । सादर सासु ससुर पद पूजा ॥

जब जब मातु करिहि सुधि मोरी । होइहि प्रेम बिकल मति भोरी ॥

आदराने सासू-सासर्‍यांच्या चरणांची सेवा करण्याहून दुसरा कोणताही श्रेष्ठ धर्म नाही. जेव्हा जेव्हा मातेला माझी आठवण येईल आणि प्रेमाने व्याकूळ झाल्यामुळे तिला स्वतःचा विसर पडेल, ॥ ३ ॥

तब तब तुम्ह कहि कथा पुरानी । सुंदरि समुझाएहु मृदु बानी ॥

कहउँ सुभायँ सपथ सत मोही । सुमुखि मातु हित राखउँ तोही ॥

तेव्हा तेव्हा हे सुंदरी, तू कोमल वाणीने पूर्वीच्या कथा सांगून तिला समजव. हे सुमुखी, तुला माझी शंभर वेळा शपथ आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की, मी तुला फक्त मातेच्या सेवेसाठीच घरी ठेवतो. ॥ ४ ॥

दोहा—गुर श्रुति संमत धरम फलु पाइअ बिनहिं कलेस ।

हठ बस सब संकट सहे गालव नहुष नरेस ॥ ६१ ॥

माझी आज्ञा मानून घरी राहिल्यामुळे गुरु व वेद यांनी मान्य केलेल्या धर्माच्या आचरणाचे फळ तुला क्लेशाविना मिळेल. परंतु हट्टाने वनात आलीस, तर तुला क्लेश भोगावे लागतील. हट्टामुळे गालाव मुनी राजा महुष इत्यादी सर्वांना फार संकटे भोगावी लागली आहेत. ॥ ६१ ॥

मैं पुनि करि प्रवान पितु बानी । बेगि फिरब सुनु सुमुखि सयानी ॥

दिवस जात नहिं लागिहि बारा । सुंदरि सिखवनु सुनहु हमारा ॥

हे सुमुखी, हे बुद्धिमती, ऐक. मीसुद्धा वडिलांचे वचन पूर्ण करुन लवकरच परत येईन. दिवस सरायला वेळ लागणार नाही. हे सुंदरी, माझे हे म्हणणे ऐक. ॥ १ ॥

जौं हठ करहु प्रेम बस बामा । तौ तुम्ह दुखु पाउब परिनामा ॥

काननु कठिन भयंकरु भारी । घोर घामु हिम बारि बयारी ॥

हे प्रिय, जर प्रेमामुळे तू हट्ट करशील, तर परिणामी तुला दुःख भोगावे लागेल. वन फार क्लेशदायक व भयंकर आहे. तेथील ऊन, थंडी, पाऊस आणि वारे हे सर्व भयानक आहे. ॥ २ ॥

कुस कंटक मग कॉंकर नाना । चलब पयादेहिं बिनु पदत्राना ॥

चरन कमल मृदु मंजु तुम्हारे । मारग अगम भूमिधर भारे ॥

रस्त्यात सराटे, काटे-कुटे, खडे फार असतात. त्यावरुन अनवाणी पायी चालावे लागेल. तुझे चरण कमलासारखे कोमल च सुंदर आहेत आणि वाटेत मोठ-मोठे दुर्गम पर्वत आहेत. ॥ ३ ॥

कंदर खोह नदीं नद नारे । अगम अगाध न जाहिं निहारे ॥

भालु बाघ बृक केहरि नागा । करहिं नाद सुनि धीरजु भागा ॥

पर्वतांमधील गुहा, दर्‍या, नद्या, आणि ओढे हे अगम्य व खोल आहेत. त्यांच्याकडे पाहावतसुद्धा नाही. अस्वले, वाघ, लांडगे, सिंह आणि हत्ती असे भयानक ओरडत असतात की, ते ऐकूनच धैर्य गळून जाते. ॥ ४ ॥

दोहा—भूमि सयन बलकल बसन असनु कंद फल मूल ।

ते कि सदा सब दिन मिलहिं सबुइ समय अनुकूल ॥ ६२ ॥

जमिनीवर झोपायचे, झाडांच्या सालींची वस्त्रे घालायची आणि कंद, मुळे, फळे खायची आणि सर्व काळ ते नेहमी मिळणार काय ? सर्व काही आपापल्या कालानुरुप असेच मिळेल. ॥ ६२ ॥

नर अहार रजनीचर चरहीं । कपट बेष बिधि कोटिक करहीं ॥

लागइ अति पहार कर पानी । बिपिन बिपति नहिं जाइ बखानी ॥

तेथे माणसांना खाणारे निशाचर राक्षस फिरत असतात. ते पुष्कळ प्रकारचे कपट-वेश घेतात. पर्वताचे पाणी फार बाधते. वनातील संकटे सांगता येत नाहीत.॥ १ ॥

ब्याल कराल बिहग बन घोरा । निसिचर निकर नरि नर चोरा ॥

डरपहिं धीर गहन सुधि आएँ । मृगलोचनि तुम्ह भीरु सुभाएँ ॥

वनात भीषण सर्प, भयानक पक्षी आणि स्त्री-पुरुषांचे अपहरण करणार्‍या राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी असतात. वनातेल भयानकतेची आठवण येताच धैर्यवान पुरुषही घाबरुन जातात. मग हे मृगलोचने, तू तर स्वभावतःच घाबरुन जाणारी आहेस. ॥ २ ॥

हंसगवनि तुम्ह नहिं बन जोगू । सुनि अपजसु मोहि देइहि लोगू ॥

मानस सलिल सुधॉं प्रतिपाली । जिअइ कि लवन पयोधि मराली ॥

 हे हंसगामिनी, तू वनात जाण्याच्या योग्यतेची नाहीस. तू वनात जाणार असे समकल्यावर लोक मला नावे ठेवतील. मानससरोवराच्या अमृतासमान पाण्यावर पोसलेली हंसी कधी खार्‍या समुद्रात जगू शकेल काय ? ॥ ३ ॥

नव रसाल बन बिहरनसीला । सोह कि कोकिल बिपिन करीला ॥

रहहु भवन अस हृदयँ बिचारी । चंदबदनि दुखु कानन भारी ॥

नव्याने बहरलेल्या आमराईत विहार करणारी कोकिळा काटेरी झाडांच्या जंगलात शोभून दिसेल काय ? हे चंद्रमुखी, मनात असा विचार करुन तू घरीच राहा. वनात फार कष्ट असतात. ॥ ४ ॥

दोहा—सहज सुहृद गुर स्वामि सिख जो न करइ सिर मानि ।

सो पछिताइ अघाइ उर अवसि होइ हित हानि ॥ ६३ ॥

मनापासून हित चिंतिणारे गुरु व स्वामी यांचे बोलणे जो शिरोधार्य मानीत नाही, तो पश्र्चात्ताप पावतो आणि त्याच्या कल्याणाची हानी होते. ‘ ॥ ६३ ॥

सुनि मृदु बचन मनोहर पिय के । लोचन ललित भरे जल सिय के ॥

सीतल सिख  दाहक भइ कैसें । चकइहि सरद चंद निसि जैसें ॥

प्रियतम श्रीरामांचे कोमल व मनोहर बोलणे ऐकून सीतेचे सुंदर नेत्र पाण्याने डबडबले. चक्रवाक पक्षिणीला शरदऋतूची चांदणी जशी होरपळून काढते, त्याप्रमाणे श्रीरामांचे हे शांत बोलणे सीतेला जाळू लागले. ॥ १ ॥

उतरु न आव बिकल बैदेही । तजन चहत सुचि स्वामि सनेही ॥

बरबस रोकि बिलोचन बारी । धरि धीरजु उर अवनिकुमारी ॥

जानकीला काही उत्तर देता येईना. माझ्या पवित्र व प्रेमळ स्वामींना मला सोडून जाण्याची इच्छा आहे. असे तिला वाटून ती व्याकूळ झाली. डोळ्यांतील पाणी मोठ्या कष्टाने आवरुन ती पृथ्वीकन्या सीता मन घट्ट करुन, ॥ २ ॥

लागि सासु पग कह कर जोरी । छमबि देबि बड़ि अबिनय मोरी ॥

दीन्हि प्रानपति मोहि सिख सोई । जेहि बिधि मोर परम हित होई ॥

सासूच्या पाया पडून व हात जोडून म्हणू लागली की, ‘ सासूबाई ! माझ्या या धारिष्ट्याबद्दल क्षमा करा. माझे परम हित ज्यात आहे, असेच माझ्या प्राणप्रिय पतीने सांगितले आहे. ॥ ३ ॥

मैं पुनि समुझि दीखि मन माहीं । पिय बियोग सम दुखु जग नाहीं ॥

परंतु मी मनात विचार करुन पाहिला की, पतीच्या विरहासारखे जगात कोणतेही दुःख नाही. ॥ ४ ॥

 दोहा—प्राननाथ करुनायततन सुंदर सुखद सुजान ।

तुम्ह बिनु रघुकुल कुमुद बिधु सुरपुर नरक समान ॥ ६४ ॥

हे प्राणनाथ, हे दयाधाम, हे सुंदर, हे सुखदायक, हे सज्जनशिरोणी, हे रघुकुलरुपी कुमुदांना प्रफुल्लित करणारे चंद्रमा, तुमच्याविना मला स्वर्गसुद्धा नरकासमान आहे. ॥ ६४ ॥

मातु पिता भगिनी प्रिय भाई । प्रिय परिवारु सुहृद समुदाई ॥

सासु ससुर गुर सजन सहाई । सुत सुंदर सुसील सुखदाई ॥

माता-पिता,बहीण, प्रिय भाऊ, आवडता परिवार, मित्र-मंडळी, सासू-सासरा, गुरु, स्वजन, सहाय्यक आणि सुंदर, सुशील व सुखद पुत्र, ॥ १ ॥

जहँ लगि नाथ नेह अरु नाते । पिय बिनु तियहि तरनिहु ते ताते ॥

तनु धनु धामु धरनि पुर राजू । पति बिहीन सबु सोक समाजू ॥

हे नाथ, जितकी म्हणून नाती आहेत, ती सर्व पतीविना स्त्रीला सूर्याहून तापदायक आहेत. शरीर, धन, घर, पृथ्वी, नगर आणि राज्य हे सर्व स्त्रीला पतीविना शोकाचा समुदाय आहे. ॥ २ ॥                

भोग रोगसम भूषन भारु । जम जातना सरिस संसारु ॥

प्राननाथ तुम्ह बिनु जग माहीं । मो कहुँ सुखद कतहुँ कछु नाहीं ॥

भोग हे रोगासारखे आहेत, दागिने भाररुप आहेत, संसार हा यम-यातनेसारखा आहे. हे प्राणनाथ, तुमच्याविना मला या जगात काहीही सुखाचे नाही. ॥ ३ ॥

जिय बिनु देह नदी बिनु बारी । तैसिअ नाथ पुरुष बिनु नारी ॥

नाथ सकल सुख साथ तुम्हारें । सरद बिमल बिधु बदनु निहारें ॥

ज्याप्रमाणे जिवाविना देह आणि पाण्याविना नदी असते,

 त्याप्रमाणे हे नाथ, पुरुषाविना स्त्री असते. हे नाथ

, तुमच्यासोबत राहून तुमचे शरद पौर्णिमेच्या निर्मल

 चंद्रासारखे मुख पाहण्यामुळे मला सर्व सुखे आपोआप

 मिळतील. ॥ ४ ॥



Custom Search

AyodhyaKanda Part 10 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग १०

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 10 
Doha 53 to 58 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग १० 
दोहा ५३ ते ५८

दोहा—बरष चारिदस बिपिन बसि करि पितु बचन प्रमान ।

आइ पाय पुनि देखिहउँ मनु जनि करसि मलान ॥ ५३ ॥

चौदा वर्षे वनात राहून आणि वडिलांची प्रतिज्ञा खरी करुन मी परत येईन व तुझ्या चरणांचे दर्शन घेईन. तू मला दीनवाणे करुन घेऊ नकोस. ‘ ॥ ५३ ॥

बचन बिनीत मधुर रघुबर के । सर सम लगे मातु उर करके ॥

सहमि सूखि सुनि सीतलि बानी । जिमि जवास परें पावस पानी ॥

रघुकुलातील श्रेष्ठ श्रीरामचंद्रांचे हे अत्यंत नम्र व गोड बोलणे मातेच्या हृदयाला बाणाप्रमाणे रुतू लागले. ती शीतल वाणी ऐकून कौसल्या घाबरुन अशी गर्भगळित झाली की, ज्याप्रमाणे पावसाचे पाणी पडताच जवास वाळून जाते. ॥ १ ॥

कहि न जाइ कछु हृदय बिषादू । मनहुँ मृगी सुनि केहरि नादू ॥

नयन सजल तन थर थर कॉंपी । माजहि खाइ मीन जनु मापी ॥

तिच्या हृदयातील विषादाचे वर्णन करणे अशक्य होते. जणू सिंहाची गर्जना ऐकून हरिणी बावरुन जावी. डोळ्यांत पाणी आले. शरीर थरथरु लागले. जणू मासोळी पहिल्या पावसाचा फेस खाल्ल्यामुळे बेशुद्ध झाली होती. ॥ २ ॥

धरि धीरजु सुत बदनु निहारी । गदगद बचन कहति महतारी ॥

तात पितहि तुम्ह प्रान पिआरे । देखि मुदित नित चरित तुम्हारे ॥

धीर धरुन व पुत्राच्या मुखाकडे पाहात सद्गदित वाणीने ती म्हणू लागली, ‘ बाळा ! तू तर पित्याला प्राणांसारखा प्रिय आहेस. तुझे वागणे पाहून ते नित्य प्रसन्न असतात. ॥ ३ ॥

राजु देन कहुँ सुभ दिन साधा । कहेउ जान बन केहिं अपराधा ॥

तात सुनावहु मोहि निदानू । को दिनकर कुल भयउ कृसानू ॥

तुला राज्य देण्यासाठी त्यांनीच शुभ दिवस शोधला होता. मग आता कोणत्या अपराधासाठी वनात जाण्यास सांगितले आहे ? बाळा ! मला कारण सांग. सूर्यवंशरुपी वनाला जाळण्यासाठी आग कोण ठरले ? ॥ ४ ॥

दोहा—निरखि राम रुख सचिवसुत कारनु कहेउ बुझाइ ।

सुनि प्रसंगु रहि मूक जिमि दसा बरनि नहिं जाइ ॥ ५४ ॥

तेव्हा रामचंद्रांचे मनोगत ओळखून मंत्र्यांच्या पुत्राने सर्व कारण समजावून सांगितले. तो प्रसंग ऐकून कौसल्या मुकी होऊन गेली. तिची अवस्था काही सांगता येण्यासारखी नव्हती. ॥ ५४ ॥

राखि न सकइ न कहि सक जाहू । दुहूँ भॉंति उर दारुन दाहू ॥

लिखत सुधाकर गा लिखि राहू । बिधि गति बाम सदा सब काहू ॥

ती श्रीरामांना ठेवूनही घेऊ शकत नव्हती आणि वनात जाण्यास सांगूही शकत नव्हती. दोन्ही प्रकारे फार मोठा मनस्ताप होत होता. ती मनात विचार करु लागली की, ‘ बघा, विधात्याची चाल नेहमी सर्वांसाठी वाकडीच असते. ते लिहीत होते चंद्रमा, परंतु त्याऐवजी लिहिले गेले राहू.’ ॥ १ ॥

धरम सनेह उभयँ मति घेरी । भइ गति सॉंप छुछुंदरि केरी ॥

राखउँ सुतहि करउँ अनुरोधू । धरमु जाइ अरु बंधु बिरोधू ॥

धर्म व स्नेह दोन्हींनी कौसल्येच्या बुद्धीला घेरुन टाकले. इकडे आड, तिकडे विहीर अशी तिची स्थिती झाली. साप व चिचुंद्री यांच्या गोष्टीसारखी तिची अवस्था झाली. ती विचार करु लागली की, जर मी हट्टाने मुलाला ठेवून घेतले तर धर्माला बाध येतो आणि भावांमध्ये वितुष्ट येते, ॥ २ ॥

कहउँ जान बन तौ बड़ि हानी । संकट सोच बिबस भइ रानी ॥

बहुरि समुझि तिय धरमु सयानी । रामु भरतु दोउ सुत सम जानी ॥

आणि वनात जाण्यास सांगितले, तर फार मोठी हानी घडते. अशा प्रकारे धर्मसंकटात सापडून राणी फार काळजीत पडली. मग बुद्धिमती कौसल्येने पातिव्रत्यधर्म श्रेष्ठ जाणून आणि राम व भरत या दोन्ही पुत्रांना समान मानून, ॥ ३ ॥

सरल सुभाउ राम महतारी । बोली बचन धीर धरि भारी ॥

तात जाउँ बलि कीन्हेहु नीका । पितु आयसु सब धरमका टीका ॥

सरळ स्वभावाची श्रीरामांची माता कौसल्या हिने अत्यंत धीर धरुन म्हटले, ‘ हे पुत्रा ! माझ्या कायेची तुझ्या धर्मनिष्ठेवरुन कुरवंडी उतरावी. तू चांगले केलेस. पित्याच्या आज्ञेचे पालन करणे हेच सर्व धर्मांत श्रेष्ठ आहे. ॥ ४ ॥         

दोहा—राजु देन कहि दीन्ह बनु मोहि न सो दुख लेसु ।

तुम्ह बिनु भरतहि भूपतिहि प्रजहि प्रचंड कलेसु ॥ ५५ ॥

त्यांनी तुला राज्य देण्याचे सांगून वन दिले, याचे मला लेशमात्र दुःख नाही, दुःख एवढेच आहे की, तुझ्याविना भरताला, महाराजांना व प्रजेला फार मोठे दुःख होईल. ॥ ५५ ॥

जौं केवल पितु आयसु ताता । तौ जनि जाहु जानि बड़ि माता ॥

जौं पितु मातु कहेउ बन जाना । तौ कानन सत अवध समाना ॥

बाळ ! जर फक्त पित्याची आज्ञा असेल, तर माता ही पित्यापेक्षा मोठी आहे असे मानून वनात जाऊ नकोस. परंतु माता-पिता या दोघांनी वनात जाण्यास सांगितले असेल, तर वन हे तुझ्यासाठी शेकडो अयोध्येच्या राज्यांच्या बरोबरीचे आहे. ॥ १ ॥

पितु बनदेव मातु बनदेवी । खग मृग चरन सरोरुह सेवी ॥

अंतहुँ उचित नृपहि बनबासू । बय बिलोकि हियँ होइ हरॉंसू ॥

वनातील देव हे तुझे पिता असतील आणि वनदेवी या माता असतील. तेथील पशु-पक्षी तुझ्या चरण-कमलांचे सेवक होतील. राजाने वृद्धावस्थेत वनवास करावा, हे योग्यच आहे. फक्त तुझी सुकुमार अवस्था पाहून मनात दुःख वाटते. ॥ २ ॥

बड़भागी बनु अवध अभागी । जो रघुबंसतिलक तुम्ह त्यागी ॥

जौं सुत कहौं संग मोहि लेहू । तुम्हरे हृदयँ होइ संदेहू ॥

हे रघुवंशाच्या तिलका, वन हे मोठे भाग्यशाली आहे आणि जिने तुझा त्याग केला ती अयोध्या अभागी होय. हे पुत्रा, जर मी तुला म्हटले की, मलाही बरोबर घेऊन चल, तर तुला संशय येईल की, आई मला या निमित्ताने थांबवू इच्छिते. ॥ ३ ॥

पूत परम प्रिय तुम्ह सबही के । प्रान प्रान के जीवन जी के ॥

ते तुम्ह कहहु मातु बन जाऊँ । मैं सुनि बचन बैठि पछिताऊँ ॥

हे पुत्रा, तू सर्वांनाच प्रिय आहेस, प्राणांचा प्राण आणि हृदयाचे जीवन आहेस. तोच तू प्राणाधार म्हणत आहेस की माते, मी वनात जातो आणि मी तुझे बोलणे ऐकून पश्चात्ताप करीत बसली आहे. ॥ ४ ॥

दोहा—यह बिचारि नहिं करउँ हठ झूठ सनेहु बढ़ाइ ।

मानि मातु कर नात बलि सुरति बिसरि जनि जाइ ॥ ५६ ॥

असा विचार करुन व खोटे प्रेम दाखवून मी काही हट्ट करीत नाही. मुला, तुझ्यावरुन जीव ओवाळून टाकते. मातेचे नाते मानून मला विसरुन जाऊ नकोस. ॥ ५६ ॥

देव पितर सब तुम्हहि गोसिईं । राखहुँ पलक नयन की नाईं ॥

अवधि अंबु प्रिय परिजन मीना । तुम्ह करुनाकर धरम धुरीना ॥

हे लाडक्या, पापण्या जशा डोळ्यांचे रक्षण करतात, त्याप्रमाणे देव व पितर तुझे रक्षण करोत. तुझ्या वनवासाचा चौदा वर्षांचा काळ हा जणू जल आहे आणि प्रियजन व कुटुंबीय मासे आहेत. तू दयेची खाण आहेस व धर्माची धुरा धारण करणारा आहेस. ॥ १ ॥

अस बिचारि सोइ करहु उपाई । सबहि जिअत जेहिं भेंटहु आई ॥

जाहु सुखेन बनहि बलि जाऊँ । करि अनाथ जन परिजन गाऊँ ॥

असा विचार करुन आम्ही सर्वजण जिवंत असेतोपर्यंत भेटण्याचा उपाय कर. मी जीव ओवाळून सांगते, तू सेवकांना, आप्तांना व नगरवासीयांना अनाथ करुन सुखाने वनात जा. ॥ २ ॥

सब कर आजु सुकृत फल बीता । भयउ कराल कालु बिपरीता ॥

बहुबिधि बिलपि चरन लपटानी । परम अभागिनि आपुहि जानी ॥

आज सर्वांची पुण्याई संपली. हा कठीण काळ आमच्यावर ओढवला .’ अशा प्रकारे पुष्कळ विलाप करीत आणि स्वतःला दुर्दैवी मानून माता कौसल्येने श्रीरामांचे चरण घट्ट धरले. ॥ ३ ॥

दारुन दुसह दाहु उर ब्यापा । बरनि न जाहिं बिलाप कलापा ॥

राम उठाइ मातु उर लाई । कहि मृदु बचन बहुरि समुझाई ॥

हृदयामध्ये भयानक असह्य दुःख भरले होते. त्यावेळी तिने केलेल्या विलापाचे वर्णन करणे शक्य नाही. श्रीरामांनी मातेला उठवून हृदयाशी धरले आणि कोमल शब्दांनी तिची समजूत घातली. ॥ ४ ॥

दोहा—समाचार तेहि समय सुनि सीय उठी अकुलाइ ।

जाइ सासु पद कमल जुग बंदि बैठि सिरु नाइ ॥ ५७ ॥

ही वार्ता ऐकताच सीता व्याकूळ झाली आणि सासूजवळ येऊन तिच्या चरण-कमलांना वंदन करुन मान खाली घालून बसली. ॥ ५७ ॥

दीन्हि असीस सासू मृदु बानी । अति सुकुमारि देखि अकुलानी ॥

बैठि नमितमुख सोचति सीता । रुप रासि पति प्रेम पुनीता ॥

सासूने कोमल वाणीने तिला आशीर्वाद दिला. सीतेची अत्यंत सुकुमार अवस्था पाहून ती व्याकूळ झाली. रुपाची खाण असलेली आणि पतीवर पवित्र प्रेम करणारी सीता ही मान खाली घालून बसून विचार करीत होती. ॥ १ ॥

चलन चहत बन जीवननाथू । केहि सुकृती सन होइहि साथू ॥

की तनु प्रान कि केवल प्राना । बिधि करतबु कछु जाइ न जाना ॥

प्राणनाथ श्रीराम वनात जाऊ इच्छितात. पाहूया, कोणत्या पुण्यवानाची त्यांना सोबत घडेल ? शरीर व प्राण दोन्ही बरोबर जाणार की फक्त प्राणानेच यांची सोबत होईल ? विधात्याची करणी काही कळत नाही. ॥ २ ॥

चारु चरन नख लेखनि धरनी । नूपुर मुखर मधुर कबि बरनी ॥

मनहुँ प्रेम बस बिनती करहीं । हमहि सीय पद जनि परिहरहीं ॥

सीता आपल्या सुंदर चरणांच्या नखांनी जमीन कुरतडत होती. असे करताना तिच्या नूपुरांचा मधुर ध्वनी होत होता. कवी त्याचे वर्णन असे करतो की, जणू प्रेम-वश होऊन नूपुर विनंती करीत होते की, सीतेच्या चरणांनी आम्हांला कधी सोडून देऊ नये. ॥ ३ ॥

मंजु बिलोचन मोचति बारी । बोली देखि राम महतारी ॥

तात सुनहु सिय अति सुकुमारी । सास ससुर परिजनहि पिआरी ॥

सीतेच्या सुंदर नेत्रांतून पाणी वाहात होते. तिची दशा पाहून श्रीराम-माता कौसल्या श्रीरामांना म्हणाली, ‘ पुत्रा ! सीता ही अत्यंत सुकुमार आहे आणि सासू, सासरे आणि कुटुंबीयांची आवडती आहे. ॥ ४ ॥

दोहा—पिता जनक भूपाल मनि ससुर भानुकुल भानु ।

पति रबिकुल कैरव बिपिन बिधु गुन रुप निधानु ॥ ५८ ॥

हिचे वडील जनक हे राजांचे शिरोमणी आहेत. सासरे सूर्यकुलाचे सूर्य आहेत आणि पती सूर्यकुलरुपी कुमुदवनास प्रफुल्लित करणारे चंद्र व गुण आणि रुपाचे भांडार आहेत. ॥ ५८ ॥       

मैं पुनि पुत्रबधू प्रिय पाई । रुप रासि गुन सील सुहाई ॥

नयन पुतरि करि प्रीति बढ़ाई । राखेउँ प्रान जानकिहिं लाई ॥

शिवाय रुपराशी, सुंदर गुण आणि शीलसंपन्न लाडकी सून मला लाभली आहे. मी हिला आपल्या डोळ्यांच्या बाहुलीप्रमाणे जतन करुन हिच्यावर प्रेम केले आहे. माझे प्राण हिच्यामध्ये गुंतले आहेत. ॥ १ ॥

कलपबेलि जिमि बहुबिधि लाली । सींचि सनेह सलिल प्रतिपाली ॥

फूलत फलत भयउ बिधि बामा । जानि न जाइ काह परिनामा ॥

कल्पलतेसारखे मी हिला मोठ्या लाडाने स्नेहरुपी जलाने शिंपून पाळले आहे. आता या लतेच्या फुलण्या-फळण्याचा काळ आला, तर विधाता प्रतिकूल झाला. याचा काय परिणाम होणार आहे, हे कुणास ठाऊक ? ॥ २ ॥

पलँग पीठ तजि गोद हिंडोरा । सियँ न दीन्ह पगु अवनि कठोरा ॥

जिअनमूरि जिमि जोगवत रहऊँ । दीप बाति नहिं टारन कहऊँ ॥

सीतेने पलंग, मांडी आणि झोपाळा सोडून कधी कठीण भूमीवर पाय ठेवला नाही. मी नेहमी संजीवनी मुळीप्रमाणे अत्यंत काळजीने हिची राखण केली. मी हिला कधी दिव्याची वात विझवायलासुद्धा सांगत नसे. ॥ ३ ॥

सोइ सिय चलन चहति बन साथा । आयसु काह होइ रघुनाथा ॥

चंद किरन रस रसिक चकोरी । रबि रुख नयन सकइ किमि जोरी ॥

तीच सीता आता तुझ्याबरोबर वनात जाऊ पाहाते. हे रघुनाथा, तिला काय आज्ञा आहे ? चंद्रम्याच्या किरणांतील अमृत इच्छिणारी चकोरी सूर्याकडे कसे पाहू शकेल ? ॥ ४ ॥



Custom Search