Friday, April 30, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 7 Part 7 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग ७

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 7 Part 7 
Ovya 180 to 210 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग ७ 
ओव्या १८० ते २१०

मूळ श्लोक

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः ।

प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥ ३० ॥ 

३०) जे अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ ह्यांसह मला जाणतात ते स्वस्थ चित्तानें युक्त असलेले पुरुष, प्रयाणकालींहि मला जाणतात.

जिहीं साधिभूता मातें । प्रतितीचेनि हातें ।

धरुनि अधिदैवातें । शिवतलें गा ॥ १८० ॥

१८०) अधिभूतासह ( शरीरासह ) मला परमात्म्याला अनुभवांच्या द्वारां यथार्थ जाणून, त्यांनीं अधिदैवाला ( जीवाला ) आकलन केलें ( जाणले ) ; 

जया जाणिवेचेनि वेगें । मी अधियज्ञु दृष्टी रिगे ।

ते तनूचेनि वियोंगें । विरहे नव्हती ॥ १८१ ॥

१८१) ज्यांस वरील ज्ञानाच्या बळानेअधियज्ञ जो मी, तो अनुभवास येतो, ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुःखी होत नाहीत.

एर्‍हवीं आयुष्याचें सूत्र बिघडतां । भूतांची उमटे खडाडता ।

काय न मरतयाहि चित्ता । युगांतु नोहे ॥ १८२ ॥

१८२) सहज विचार करुन पाहिलें तर आयुष्याची दोरी तुटली की ( मरणार्‍या ) प्राण्यांची खळबळ उडते. ( ती पाहून ) न मरणार्‍यांच्याहि चित्ताला प्रलयकाळ ओढवला असे वाटत नाहीं काय ?

परी नेणों कैसें पैं गा । जे जडोनि गेले माझिया आंगा ।

ते प्रयाणींचिया लगबगा । न सांडितीच मातें ॥ १८३ ॥

१८३) परंतु ज्ञानी पुरुषांच्या बाबतींत कोण जाणें कसें होतें तें ! जे माझ्या स्वरुपाशीं एकरुप होऊन गेले आहेत. ते अंतःकरणाच्या गडबडीत मला विसरतच नाहींत ! 

एर्‍हवीं तरी जाण । ऐसे जे निपुण ।

तेचि अंतःकरण--। युक्त योगी ॥ १८४ ॥

१८४) सहज विचार करुन पाहिलें तर, असें जे निपुण आहेत, तेच ( माझ्या ठिकाणीं ) स्थिर अंतःकरण झालेले योगी आहेत, असे समज.

तंव इये शब्दकुपिकेतळीं । नोडवेचि अवधानाची अंजुळी ।

जे नावेक अर्जुन तये वेळीं । मागांचि होता ॥ १८५ ॥

१८५) ( ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात ) त्या वेळीं श्रीकृष]णाने सांगितलेल्या शब्दरुपी कुपीच्या खालीं अर्जुनाची लक्षरुपी ओंजळ प्राप्त झाली नाही; कारण अर्जुन त्या वेळीं क्षणभर मागेंच होता. ( देवाच्या सांगण्याकडे अर्जुनाचे लक्ष नव्हते. ) 

जेथ तद् ब्रह्मवाक्यफळें । जियें नानार्थरसें रसाळें ।

बहकाते आहाती परिमळें । भावाचेनि ॥ १८६ ॥

१८६) त्या ठिकाणीं तीं ब्रह्माचें प्रतिपादन करणारीं वाक्यें हीच कोणीं फळें नाना प्रकारच्या अर्थरुपी रसानें भरलेली होती; व तीं अभिप्रायाच्या सुगंधानें वरवळलीं होतीं. 

सहज कृपामंदानिळें । कृष्णद्रुमाचि वचनफळें ।

अर्जुनश्रवणाचिये खोळे । अवचित पडिलीं ॥ १८७ ॥

१८७) अशी ही श्रीकृष्णरुप वृक्षाचीं वचनरुपी फळें, सहज कृपारुपी मंद वार्‍यानें, अर्जुनाच्या कानरुपी ओटींत, अकस्मात पडली.  

तियें प्रमेयाचींच हो कां वळलीं । कीं ब्रह्मरसाचां सागरीं चुबुकळिलीं ।

मग तैसींच का घोळिली । परमानंदे ॥ १८८ ॥

१८८) तीं वाक्यरुपीं फळें तत्त्वज्ञानाच्या सिद्धान्ताचींच जणू काय बनविलेली असून ब्रह्मसाच्या समुद्रांत बुडवून मग तशींच तीं जणूं काय परमानंदानें घोळलेली होती.

तेणें बरवेपणें निर्मळें । अर्जुना उन्मेषाचे डोहळे ।

घेताति गळाळे । विस्मयामृताचे ॥ १८९ ॥

१८९) त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणानें अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते डोहाळे आश्र्चर्यरुपी अमृताचे घुटके घेऊं लागले.

तिया सुखसंपत्ति जोडलिया । मग स्वर्गा वाती वांकुलिया ।

हृदयाचां जीवी गुतकुलिया । होत आहाती ॥ १९० ॥

१९०) त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळें मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवूं लागला व त्याच्या हृदयाच्या जीवांत गुदगुल्या होऊं लागल्या.  

ऐसें वरचिलिचि बरवा । सुख जावों लागलें फावा ।

तंव रसस्वादाचिया हांवा । लाहो केला ॥ १९१ ॥

१९१) याप्रमाणें त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचें अर्जुनास सुख अनुभवास येऊं लागलें, तों इतक्यांत त्या फळांच्या रसाची रुची घेण्याच्या तीव्र इच्छेनें त्वरा केली,      

झाकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्यफळें ।

प्रतीतिमुखीं एक वेळे । घालूं पाहिलीं ॥ १९२ ॥

१९२) ताबडतोब अनुमानाच्या तळहातांत तीं वाक्यफळें घेऊन अनुभवरुपी मुखांत तीं एकदम घालावयास ( अर्जुन ) पाहूं लागला.

तंव विचाराचिया रसना न दाटती । परी हेतूचांहि दशनीं न फुटती ।

ऐसें जाणोनि सुभद्रापती । चुंबीचिना ॥ १९३ ॥

१९३) तेव्हां विचारांच्या तोंडांत तीं फळें मावेनात. आणखी हेतूच्याहि दातांनीं ती फळें फुटेनात. ( म्हणजे भगवंताचा हेतु काय आहें हें त्याला कळेना. ) असें जाणून अर्जुन, तीं वाक्यरुपीं फळें तोंडाला लावीना.        

मग चमत्कारला म्हणे । इये जळींचीं मा तारांगणें ।

कैसा झकविलों असलगपणें । अक्षरांचेनि ॥ १९४ ॥

१९४) मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, हीं वाक्यें म्हणजे पाण्यांत पडलेलें तार्‍यांचे प्रतिबिंब होय. मी अक्षरांच्या सुलभपणानें ( नुसत्या अक्षरांवरुन ) कसा फसलों ?  

इयें पदें नव्हती फडिया । गगनाचियाचि घडिया ।

येथ आमुची मति बुडिया । थाव न निघे ॥ १९५ ॥

१९५) हीं खरोखर वाक्यें नाहींत, तर ह्या आकाशाच्या घड्याच आहेत. तेथें आमच्या बुद्धीनें किती जरी धडपड केली, तरी तिला थांग लागत नाहीं.

वांचुनि आणावयाची कें गोठी । ऐसें जीवी कल्पूनि किरीटी ।

तिये पुनरपि केली दृष्टी । यादवेंद्रा ॥ १९६ ॥

१९६) असें जर आहे, तर मग तीं वाक्यें कळावयाची गोष्ट कशाला ? असा अर्जुनानें मनांत विचार करुन, त्यानें पुन: भगवंताकडे दृष्टी केली.

मग विनविलें सुभटें । हां हो जी यें एकवाटें ।

सातही पदें अनुच्छिष्टें । नवलें आहाती ॥ १९७ ॥

१९७) मग अर्जुनानें विनंती केली कीं, अहो देवा, हीं सातहि पदें ( १ ब्रह्म, २ अध्यात्म, ३ कर्म, ४ अधिभूत, ५) अधिदैव, ६) अधियज्ञ, ७) प्रयाणकालीं योग्यंना होणारें तुझें स्मरण ) एकसारखीं कधीं न ऐकलेलीं अशीं आश्र्वर्यकारक आहेत.   

एर्‍हवीं अवधानाचेनि वहिलेपणें । नाना प्रमेयांचे उगाणे ।

काय श्रवणाचेनि आंगणें । बोलों लाहाती ॥ १९८ ॥

१९८) सहज विचार करुन पाहिलें तर या सात वाक्यांतील निरनिराळ्या प्रमेयांचा उलगडा, वेगानें अवधान देऊन श्रवण केलें असतां, त्या श्रवणाच्या बलानें कांहीं बोलतां येईल. ( असें मला वाटले होतें. )  

परि तैसें हें नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा ।

आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥ १९९ ॥

१९९) पण देवा, हें तसें नव्हे. मी अक्षरांचा समुदाय पाहिला आणि ( माझ्या ) आश्रचर्याच्या जीवाला आश्र्चर्य झालें,

कानाचेनि गवाक्षद्वारें । बोलाचे रश्मी अभ्यंतरें ।

पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठकलें ॥ २०० ॥

२००) कानाच्या झरोक्यावाटें शब्दाचे किरण आंत प्रवेश करतात न करतात तोंच, माझें लक्ष चमत्कारानें चकित झालें  

तेविंचि अर्था चाड मज आहे । ते सांगताही वेळु न साहे ।

म्हणूनि निरुपण लवलाहें । कीजो देवा ॥ २०१ ॥

२०१) त्याचप्रमाणें अर्थाची मला इच्छा आहे. ( ती इच्छा किती आहे ) तें सांगतांना जो वेळ लागेल, तितका वेळ देखील विलंब सहन होत नाही. म्हणून अहो देवा, आपण त्याचें निरुपण लवकर करावें.

ऐसा मागील पडताळा घेउनी । पुढां अभिप्रावो दृष्टी सूनी ।

तेविंचि माजि शिरवुनी । आतीं आपुली ॥ २०२ ॥

२०२) अशा रीतीनें देवानें मागे काय सांगितलें, याचा विचार करुन व देव काय सांगतील, त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याचप्रमाणें आपली इच्छाहि मध्यें शिरकावून, 

कैसी पुसती पाहे पाहें पां जाणिव । भिडोचि तरी लंघो नेदी शिंव ।

एर्‍हवीं कृष्णहृदयासि खेंव । देवों सरला ॥ २०३ ॥

२०३) अर्जुनाची प्रश्न करण्याची ही चतुराई कशी आहे पाहा ! तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करीत नाही, एर्‍हवीं श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला. 

अगा गुरुतें जैं पुसावें । तैं येणें मानें सावध होआवें ।

हें एकचि जाणे आवघें । सव्यसाची ॥ २०४ ॥

२०४) अहो, श्रीगुरुला जेव्हां विचारावयाचें असेल, त्या वेळीं असें अवधान ठेवावें लागतें; हें सर्व एक अर्जुन जाणतो.

आतां तयाचें तें प्रश्र्ण करणें । वरी सर्वज्ञा हरीचें बोलणें ।

हें संजयो आवडलेपणें । सांगेल कैसें ॥ २०५ ॥

२०५) आतां त्या अर्जुनाचें खुबीदार प्रश्न करणें व त्या सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचें बोलणें, हें संजयास आवडल्यामुळें तो तें बोलणें कशा प्रेमाने सांगेल,

तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट मर्‍हाटी ।

जैसी कानाचे आधीं दृष्टी । उपेगा जाये ॥ २०६ ॥

२०६) तें सरळ मराठी भाषेंत सांगितलें जाईल; त्या निरुपणाकडे लक्ष द्यावें. जसें कानाच्या आधीं दृष्टीचा उपयोग होतो;

बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा ।

अक्षरांचियाचि भांवा । इंद्रियें जिती ॥ २०७ ॥

२०७) ( तसें ) बुद्धीच्या जिव्हेनें शब्दांतील अर्थ न चाखतां केवळ अक्षरांच्याच शोभेनें इंद्रियें जगतील ( इंद्रियांचे समाधान होईल )

पहा पां मालतीचे कळे । घ्राणासि कीर वाटले परिमळें ।

परि वरचिली बरवा काइ डोळे । सुखिये नव्हती ॥ २०८ ॥

२०८) अहो, असे पाहा कीं, मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधानें चांगल्या वाटल्या; पण त्यांच्या वरच्या शोभेने डोळ्यांना आल्हाद वाटत नाहीं काय ?

तैसें देशियेचिया हवावा । इंद्रियें करिती राणिवा ।

मग प्रमेयाचिया गांवा । लेसा जाइजे ॥ २०९ ॥

२०९) त्याप्रमाणें मराठी भाषेच्या सौंदर्यानें इंद्रियें राज्य करतील व मग सिद्धान्ताच्या गांवाला त्यास चांगल्या तयारीनें जातां येईल.

ऐसेनि नागरपणें । बोलु निमे तें बोलणें ।

ऐका ज्ञानदेव म्हणे । निवृत्तीचा ॥ २१० ॥

२१०) जेथें शब्द नाहींसा होतो, तें बोलणें अशा सुंदर रीतीनें मी सांगेन, तें तुम्ही ऐका, असें निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव म्हणाला.

॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषद्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥ ( श्लोक ३०, ओव्या २१० )

॥ सच्चिदानंदार्पणमस्तु ॥   



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 7 Part 6 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग ६

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 7 Part 6 
Ovya 151 to 179 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग ६ 
ओव्या १५१ ते १७९

मूळ श्लोक

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।

परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ २४ ॥

२४) अविनाशी, अत्यंत उत्तम व श्रेष्ठ असें माझें स्वरुप न जाणणारे, अल्पबुद्धि लोक अव्यक्त असलेल्या मला व्यक्त स्वरुपानें ओळखतात.

 परी तैसें न करिती प्राणिये । वायां आपुलां हीतीं वाणिये ।

पैं पोहताती पाणिये । तळहातींचेनि ॥ १५१ ॥

१५१) पण लोक तसें करीत नाहींत. व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात. तें त्यांचें करणें तळहातांतील पाण्यांत पोहण्याप्रमाणें आहे;

नाना अमृताचां सागरीं बुडिजे । मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे ।

आणि मनीं तरी आठविजे । थिल्लरोदकांतें ॥ १५२ ॥‘

किंवा, अमृताच्या समुद्रामध्ये बुडी द्यावी आणि कां मग तोंड घट्ट मिटून धरावें ? आणि मनांत तर डबक्यांतील पाण्याची आठवण कां धरावी ?   

हें ऐसें काइसेया करावें । जें अमृतींही रिगोनि मरावें ।

तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ॥ १५३ ॥

१५३) अमृतांत शिरुन तोंडांत अमृत जाऊं न देतां मरावें, असें हें कशाला करावें ? तर अमृतामध्यें सुखानें अमृत ( अमर ) होऊन कां राहूं नये ?  

तैसा फळहेतूचा पांजरा । सांडूनिया धनुर्धरा ।

कां प्रतीतिपाखीं चिदंबरा । गोसाविया नोहावें ॥ १५४ ॥ 

१५४) अर्जुना, त्याप्रमाणें फलाशेचा पिंजरा टाकून, आत्मानुभवरुपी पंखानें चिदाकाशांत हवा तसा संचार करणारा समर्थ कां होऊं नये ? 

जेथ उंचावतेनि पवाडें । सुखाचा पैसारु जोडे ।

आपुलेनि सुरवाडें । उडों ये ऐसा ॥ १५५ ॥

१५५) त्या चिदाकाशांत जितकें आपण उंच जाऊं, तितका आपणाला सुखानें संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो.  

तया उमपा माप कां सुखावें । मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें ।

सिद्ध असतां कां निमावें । साधनवरी ॥ १५६ ॥

१५६) त्या अमर्याद स्वरुपाला माप कां घालावें ? मला निराकाराला साकार कां समजावें ? मी स्वतःसिद्ध असतां माझ्या प्राप्तीकरितां साधनें करुन कां मरावें ?  

परि हा बोल आघवा । जरी विचारीजतसे पांडवा ।

तरी विशेषें या जीवां । न चोजवे गा ॥ १५७ ॥

१५७) अर्जुना, पण ह्या सर्व बोलण्याचा विचार केला, तर बहुतकरुन ह्या जीवांना ही गोष्ट समजत नाहीं.

मूळ श्लोक

नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृत्तः ।

मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ २५ ॥

२५) सर्वांना माझें ज्ञान नाहीं; कारण योगमायेनें मी आच्छादित झालों आहें; म्हणूनच हें मूढ जग जन्मरहित व नाशरहित अशा मला जाणत नाहीं.  

कां जे योगमायापडळें । हे जाले आहाती आंधळे ।

म्हणोनि प्रकाशेचेनिहि देहबळें । न देखती मातें ॥ १५८ ॥

१५८) कारण कीं, ते योगमायेच्या पडद्यानें आंधळे झाले आहेत, म्हणून ( स्वरुप ) प्रकाशानें भरलेल्या दिवसाच्या बळानेदेखील ते मला पाहात नाहींत.

एर्‍हवीं मी नसें ऐसें । कांहीं वस्तुजात असे ।

पाहें पां कवण जळ रसें-। रहित आहे ॥ १५९ ॥

१५९) सहज विचार करुन पाहिले तर, ज्यामध्यें मी नाहीं, असा कांहीं पदार्थमात्र आहे काय ? असें पाहा कीं, रसाशिवाय पाणी कोठें आहे काय ?

पवन कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि ।

हें असो एक मीचि । विश्र्वीं असें ॥ १६० ॥

१६०) वारा कोणाला शिवत नाहीं ? आकाश कोठे व्यापीत नाहीं ? हें बोलणें राहूं दे, मीच एक सगळ्या विश्र्वास व्यापून आहें.

मूळ श्लोक

वेदाहंसमतीतानि वर्तमानानि चार्जुन ।

भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ २६ ॥

२६) हे अर्जुना, मागें झालेल्या, सध्या असलेल्या व होणार्‍या प्राण्यांना मी जाणतों; पण मला कोणी जाणत नाही.

येथें भूतें जियें अतीतलीं । तियें मीचि होऊनि ठेलीं ।

आणि वर्तत आहाति जेतुलीं । तींहि मीचि ॥ १६१ ॥

१६१) ह्या जगांत जितके प्राणी होऊन गेले, ते मीच होऊन राहिले; आणि हल्ली जितके प्राणी हयात आहेत, तेहि मीच आहेत,

भविष्यमाणें जियें ही । तींही मजवेगळीं नाहीं ।

हा बोलचि एर्‍हवीं कांहीं । होय ना जाय ॥ १६२ ॥

१६२) पुढें जे प्राणी होणार आहेत, तेहि माझ्यापासून निराळे नाहींत, हें सर्व फक्त बोलावयाचेंच वास्तविक कांहीं होत नाहीं व जात नाहीं. 

दोराचिया सापासी । डोंबा बडी ना गव्हाळा ऐसी ।

संख्या न करावे कोण्हासी । तेवीं भूतांसि मिथ्यत्वें ॥ १६३ ॥

१६३) दोरीवर भासणारा साप कोणत्या जातीचा आहे, म्हणजे डोंबा ( काळा ) आहे कीं बडी ( कवड्या ) आहे, कां गव्हाळा ( गव्हासारखा ठिपक्यांचा ) आहे, असा कोणताहि निश्र्चय करतां येत नाहीं. त्याप्रमाणें प्राण्यांसंबंधी निश्र्चय करतां येत नाही; कारण प्राणी मिथ्या आहेत.    

ऐसा मी पंडुसुता । अनुस्यूत सदा असतां ।

यां संसार जो भूतां । तो आनें बोलें ॥ १६४ ॥

१६४) अर्जुना, याप्रमाणें मी सदा अखंडित असतांना, या प्राण्यांच्या मागेजन्ममरणरुपी संसार लागला आहे. तो वेगळ्या प्रकारानें.

आतां थोडी ऐसी । गोठी सांगिजेल परियेसीं ।

जैं अहंकारतनूंसी । वालम पडिलें ॥ १६५ ॥

१६५) ( त्यासंबंधीं ) आतां थोडीशी गोष्ट सांगतों, ऐक. जेव्हां अहंकार आणि देह यांचें प्रेम एकमेकांवर जडलें,  

मूळ श्लोक

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।

सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥ २७ ॥

२७ हे  शत्रुतापना, भारता, इच्छा व द्वेष यांपासून उत्पन्न झालेल्या ( सुखदुःखादि ) द्वंद्वरुपी मोहाच्या योगानें ( या सृष्टीमध्यें ) जन्माला येत्या वेळींच सर्व प्राणी मोह पावतात.  

तै इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली ।

तेथ द्वेषेंसीं मांडिली । वराडिक ॥ १६६ ॥

१६६) तेव्हां त्यांना इच्छा ही मुलगी झाली; नंतर ती इच्छा कामरुपी तारुण्याला आली; त्या वेळीं तिचें द्वेषाशीं लग्न लावलें.

तया दोघांस्तव जन्मला । ऐसा द्वन्द्वमोह जाला ।

मग तो आजेयानें वाढविला । अहंकारें ॥ १६७ ॥

१६७) त्या दोघांपासून द्वंद्वमोह जन्मला; मग त्याचा आजा जो अहंकार त्यानें त्याला वाढविलें.

जो धृतीसि सदां प्रतिकूळु । नियमाही नागवे सळु ।

आशारसें दोंदिलु । जाला सांता ॥ १६८ ॥

१६८) तो द्वंद्वमोह सात्त्विक धैर्याला नेहमीं प्रतिकूल असतो आणि आशारुपी रसानें पुष्ट झाला असतां, तो छळणारा द्वंद्वमोह जुमानीत नाही.

असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होवोनी धनुर्धरा ।

विषयांचा वोवरां । विकृतीसी असे ॥ १६९ ॥

१६९) अर्जुना, असंतोषरुप दारुच्या योगानें उन्मत्त होऊन पंचविषयरुपी खोलीमध्यें विकाररुपी स्त्रीसह राहतो. 

तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरले विकल्पाचे कांटे।

मग चिरिले आव्हांटे । अप्रवृत्तीचे ॥ १७० ॥

१७०) त्या द्वन्द्वमोहानें अंतःकरणशुद्धीच्या वाटेवर विकल्परुपी कांटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले केले.

तेणें भूतें भांबावलीं । म्हणोनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं ।

मग महादुःखाचां । घेतलीं दांडेवरी ॥ १७१ ॥

१७१) त्यायोगानें प्राणी भांबावले, म्हणून संसाररुपी अरण्यांत पडले; आणि मग मोठमोठाल्या दुःखांच्या दांडक्यानें बडवले गेले.

मूळ श्लोक

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।

ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रतः ॥ २८ ॥

२८) परंतु ज्या पुण्यकर्म करणार्‍या लोकांच्या पापाचा नाश झालेला असतो, ते ( सुखदुःखादि ) द्वंद्वरुपी मोहानें रहित होऊन निश्र्चयपूर्वक माझी भक्ति करतात. 

ऐसे विकल्पाचे वायांणे । कांटे देखोनि सणाणे ।                          

जे मतिभ्रमाचें पासवणें । घेतीचिना ॥ १७२ ॥

१७२) असे विकल्पांचे पोकळ अणकुचीदार कांटे पाहून जे बुद्धिभ्रंशरुपी माघार घेतच नाहींत ( म्हणजे बुद्धिला भ्रंश पडूं देत नाहीत ),

उजू एकनिष्ठतेचां पाउलीं । रगडूनि विकल्पाचिया भालीं ।

महापातकांची सांडिली । अटवीं जिहीं ॥ १७३ ॥

१७३) ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनीं विकल्परुपी काट्यांची टोकें चेंगरुन मोठमोठ्या पातकांचें अरण्य ( मागें ) टाकलें आहे,    

मग पुण्याचे धांवा घेतले । आणि माझी जवळीक पातले ।

किंबहुना ते चुकले । वाटबघेयां ॥ १७४ ॥

१७४) नंतर ज्यांनीं पुण्यरुपी धांव घेतली आणि जे माझ्याजवळ प्राप्त झाले; फार काय सांगावें ? असे ते भक्त या ( काम, द्वंद्वमोह वगैरे ) वाटमार्‍यांच्या तडाख्यांतून सुटले.   

मूळ श्लोक

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।

ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥२९ ॥

२९) जे जरा व मरण यांपासून मुक्त होण्याकरितां माझा आश्रय करुन यत्न करतात, ते त्या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात.

एर्‍हवीं तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा ।

ऐसिया प्रयत्नातें आस्था । विये जयांची ॥ १७५ ॥

१७५) अर्जुना, सहज विचार करुन पाहिलें तर, ज्या प्रयत्नानें जन्ममरणाची कथा संपते, अशा प्रयत्नास ज्यांची इच्छा उत्पन्न करते,  

तयां तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्रें परब्रह्में फळे ।

जया पिकलेया रसु गळे । पूर्णतेचा ॥ १७६ ॥

१७६) मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरुप फळानें फलद्रुप होतो.तें परब्रह्मरुपी फळ पिकलें असतां त्यांतून पूर्णतेचा रस गळतो.

ते वेळीं कृतकृत्यता जग भरे । तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे ।

कर्माचें काम सरे । विरमे मन ॥ १७७ ॥

१७७) त्यावेळीं कृतकृत्यतेनें जग मरुन जातें व ब्रह्माच्या सहजस्थितीची अनोळख फिटते, कर्मांचें प्रयोजन संपतें व मन नाहीसें होतें. 

ऐसा अध्यात्मलाभ तया । होय गा धनंजया ।

भांडवल जया । उद्यमीं मी ॥ १७८ ॥  

१७८) अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतों, त्याला असा अध्यात्माचा लाभ होतो.  

तयातें साम्याचिये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी ।

तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तो ॥ १७९ ॥

१७९) त्याला साम्याच्या वाढीमुळें ऐक्याचा व्यापार

 साधतो. त्या ऐक्याच्या ठिकाणीं तो भेदाचें दारिद्र्य 

जाणतच नाहीं. 



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 7 Part 5 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग ५

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 7 Part 5 
Ovya 119 to 150 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग ५ 
ओव्या ११९ ते १५०

उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।

अस्थिनः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥ १८ ॥

१८) हे सर्वहि भक्त उत्कृष्ट आहेत; पण ( त्यांपैकी ) ज्ञानी तर केवळ माझा आत्माच होय, असे मी समजतों. कारण ( ‘ मीच  ब्रह्म ‘ अशा बुद्धीनें ) माझ्या ठिकाणीं स्थिर झालेला तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य जो मी, त्या मलाच प्राप्त झालेला असतो.     

म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभें । मज आवडे तोही भक्त झोंबे ।

परी मीचि करी वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ॥ ११९ ॥

११९) म्हणून आपापल्या हिताच्या इच्छेनें वाटेल तो भक्त मला झोंबतो; परंतु मीच ज्याच्यावर प्रेम करतो, असा त्यांपैकीं ‘ ज्ञानी ‘ भक्त होय. 

पाहें पां दुभतेयाचिया आशा । जगचि धेनूसि करीताहे फांसा ।

परि दोरेंविण कैसा । वत्साचा बळी ॥ १२० ॥

१२०) असें पाहा, अर्जुना, दुभत्याच्या आशेनें लोकच गायीला फासा घालतात; परंतु दोरांवाचून वांसराचा पाश कसा बळकट आहे. ! ( किंवा दोरावाचून त्याचा भाग त्याला सहज मिळतो. ) 

कां जे तनुमनुप्राणें । तें आणिक कांहींचि नेणे ।

देखे तयातें म्हणे । हे मायाचि कीं माझी ॥ १२१ ॥

१२१) याचें कारण एवढेंच कीं तें वांसरु शरीरानें, मनानें, व प्राणानें दुसर्‍या ( आपल्या आईखेरिज ) कोणासहि जाणत नाही. जें त्याला पुढे दिसेल, त्याला ‘ ही माझी आईच आहे ‘ , असे तें म्हणतें.  

तें येणें मानें अनन्यगती । म्हणूनि धेनूही तैसीचि प्रीती ।

यालागीं लक्ष्मीपती । बोलिले साच ॥ १२२ ॥

१२२) तें वासरुं इतकें ( गायीच्या ठिकाणीं ) अनन्य गति असतें म्हणून गायीचीहि त्याच्यावर तशीच प्रीति असते. म्हणून श्रीकृष्ण जें वर म्हणाले तें खरें आहे. ( असे ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात.)  

हें असो मग म्हणितलें । जे कां तुज संगितले ।

तेही भक्त भले । पढियंते आम्हां ॥ १२३ ॥

१२३) तर भगवंतांनीं म्हटलें, हे असो; इतर तीन भक्त जे तुला सांगितले, तेदेखील आम्हाला चांगले आवडते आहेत.

परि जाणोनियां मातें । जो पाहों विसरला मागौतें ।

जैसें सागरा येऊनि सरिते । मुरडावें ठेलें ॥ १२४ ॥

१२४) परंतु, मला जाणून जो ज्ञानी ( ज्ञानी भक्त ) मागें पाहावयास विसरला ( देहेंद्रियादि प्रपंचाला  विसरला ); ज्याप्रमाणें नदी समुदराला निळाल्यावर माघारी वळत नाहीं,

तैसी अंतःकरणकुहरीं उपजली । जयाची प्रतीतिगंगा मज मिनली ।

तो मी हें काय बोली । फार करुं ॥ १२५ ॥

१२५) त्याप्रमाणें अंतःकरणरुपी गुहेमध्ये उत्पन्न झालेली, ज्याची अनुभवरुपी गंगा मला मिळाली आहे, तो मी आहे, हे शब्दानें विचार करुन काय सांगू !    

एर्‍हवीं ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझें ।

हें न म्हणावें परि काय कीजे । न बोलणे बोलों ॥ १२६ ॥

१२६) वास्तविक पाहिलें तर ज्ञानी म्हणून जो म्हणतात तो माझा केवळ आत्माच आहे; ही गोष्ट शब्दांनीं सांगण्यासारखी नाही; परंतु काय करावें ? ही न बोलण्यासारखी गोष्ट पण तुला सांगितली.

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।

वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ १९ ॥

१९) अनेक जन्म घेतल्यानंतर , ‘ सर्व ( विश्र्व ) वासुदेव होय. ‘ असे ज्ञान प्राप्त होऊन, तो ज्ञानी मला शरण येतो. ( मला येऊन पोंचतो ); असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे.

जे तो विषयांची मोट झाडी- । माजीं कामक्रोधांचीं सांकडीं ।

चुकावूनि आला पाडी । सद्वासनेचिया ॥ १२७ ॥

१२७) कारण तो विषयांच्या दाट झाडींतून, काम, क्रोध यांची संकटें टाळून, चांगल्या वासनारुपी डोंगरावर आला.  

मग साधुसंगें सुभटा । उजू सत्कार्माचिया वाटा ।

अप्रवृत्तीचा अव्हांटा । डावलूनि ॥ १२८ ॥

१२८) अर्जुना, मग संतांच्या संगतीनें विहित कर्मांच्या सरळ मार्गानें, निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून,

आणि जन्मशतांचा वाहतवणा । तेविंचि आस्थेचिया न लेचि वाहणा ।

तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी ॥ १२९ ॥

१२९) आणि शेकडों जन्मांचा ( कर्ममार्गानें ) प्रवास करीत असतां, तो फलाशेच्या वहाणा ( अंतःकरणरुपी ) पायांत घालीत नाहीं, अशा स्थितींत ( स्वर्गादि ) फलांच्या हेतूंचा हिशेब कोणी करावा ?   

ऐसा शरीरसंयोगाचिये राती-। माजें धांवतां सडिया आयती ।

तंव कर्मक्षयाची पाहती । पाहांट जाली ॥ १३० ॥

१३०) ह्याप्रमाणें देहतादात्म्यरुप रात्रींत सर्वसंग परित्यागरुपी तयारीनें धांवत असतांना, कर्माच्या क्षयाची उजाडती पहाट आली.   

तैसी गुरुकृपाउखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली ।

तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ॥ १३१ ॥

१३१) त्याचप्रमाणें गुरुकृपारुप उषःकाल झाला; व ज्ञानरुपी कोंवळें ऊन पडलें, तेव्हा त्याप्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचें ऐश्र्वर्य दिसूं लागलें  

ते वेळीं जयाकडे वास पाहे । तेउता मीचि तया एक आहे ।

अथवा निवांत जरी राहे । तरी मीचि तया ॥ १३२ ॥

१३२) त्या वेळीं तो जिकडे जिकडे पाहील, तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे; अथवा तो जरी निवांत राहिला तरीहि त्याला मीच आहें.

हें असो आणिक कांहीं । तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं ।

जैसें सबाह्य जळ डोहीं । बुडालिया घटा ॥ १३३ ॥

१३३) हें बोलणें असो; त्याला ठिकाणीं माझ्या वांचून दुसरें कांहीं एक नाहीं. ज्याप्रमाणे डोहांत घट बुडाला असतां त्याच्या आंत बाहेर जसें पाणीच असतें; 

तैसा तो मजभीतरीं । मी तया आंतुबाहेरीं ।

हें सांगिजे बोलवरी । तैसें नव्हे ॥ १३४ ॥

१३४) त्याप्रमाणें तो माझ्यामध्यें असतो व मी त्यांच्या आंतबाहेर असतों; ही स्थिति शब्दानें सांगतां येईल, अशी नाही.

म्हणोनि असो हें यापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी ।

तेणें संसरलेनि करी । आपु विश्र्व ॥ १३५ ॥

१३५) म्हणून हें राहूं दे; याप्रमाणें तो ज्ञानाचें भांडार पाहातो व त्या योगानें सांवरल्यामुळें सर्व जग आत्मरुप पाहातो.

हें समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो ।

म्हणोनि भक्तांमाजीं रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥ १३६ ॥

१३६) हें संपूर्ण विश्व श्रीवासुदेव आहे, अशा अनुभवरुपी रसाचा त्याचा भाव ओतलेला असतो; म्हणून सर्व भक्तांमध्यें तो राजा आहे आणि ज्ञानीहि तोच आहे.   

जयाचिये प्रतीतीचां वाखौरां । पवाडु होय चराचरा ।

तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ॥ १३७ ॥

१३७) ज्याच्या अनुभवरुपी भांडारांत स्थावरजंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो, हे अर्जुना, तो महात्मा दुर्लभ आहे.

येर बहु जोडती किरीटी । जयांचीं भजनें भोगासाठीं ।

जे आशातिमिरें दृष्टी-। मंद जाले ॥ १३८ ॥

१३८) ज्यांची भजनें भोगासाठीं असतात व ज्यांची दृष्टी आशारुपी नेत्ररोगानें मंद झालेली असते, असे इतर भक्त पुष्कळ मिळतात.   

मूळ श्लोक

कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।

तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ २० ॥

२०) ( जन्मांतरी मिळविलेल्या संस्कारांनीं प्राप्त झालेल्या ) स्वतःच्या स्वभावानें नियंत्रित झालेले आणि निरनिराळ्या ( विषयांच्या ) अभिलाषांनी ज्ञान नष्ट झालेले ( लोक ), निरनिराळ्या नियमांचा आश्रय करुन, ( माझ्याहून ) वेगळ्या अशा देवतांची भक्ति करतात.   

आणि फळाचिया हांवा । हृदयीं कामा जाला रिगावा ।

कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥ १३९ ॥

१३९) आणि फलाविषयींच्या तीव्र इच्छमुळें अंतःकरणांत कामानें प्रवेश केला आणि त्याच्या संसर्गानें ज्ञानाचा दिवा गेला.

ऐसे उभयतां आंधारीं पडले । म्हणोनि पासींचि मातें चुकले ।

मग सर्वभावें अनुसरले । देवतांतरां ॥ १४० ॥

१४०) ( बाहेर आशारुपी नेत्ररोगानें व आंत अविवेकानें ) असें दोन्ही प्रकारांनी ( अज्ञानरुपी ) अंधारांत ते पडले; म्हणून त्यांच्या जवळच असणारा जो मी, त्या मला ते चुकले. नंतर ( इच्छित फल देणार्‍या ) निरनिराळ्या देवतांना सर्व भावानें भजूं लागले.  

आधींच प्रकृतीचे पाइक । वरे भोगालागीं तंव रंक ।

मग तेणें लोलुप्यें कौतुक । कैसे भजती ॥ १४१ ॥

१४१) अगोदरच देहात्मबुद्धिचे दास, त्याशिवाय आणखी भोगाकरितां दीन झालेले, असे ते लोक मग त्या विषयसुखाच्या लालसेनें इतर देवांचे कशा कौतुकानें भजन करतात ( तें पाहा. ).

कवणी तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि ।

कां अर्पण यथाविधि । विहित करणें ॥ १४२ ॥

१४२) त्या त्या देवतेच्या आराधनेविषयीं जो जो नियम प्रसिद्ध आहे, त्याचा त्याचा आश्रय करुन, कोणते कोणते उपचार अर्पण कसें करावेत ; तें समजून घेऊन, शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणें कर्में करतात.   

मूळ श्लोक

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।

तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ २१ ॥

२१) जो जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धेने भक्ति करण्याची इच्छा करतो, त्या त्या भक्ताची श्रद्धा त्या त्या देवतेच्या ठिकाणीं मी स्थिर करतो.

पैं जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी ।

तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ॥ १४३ ॥

१४३) परंतु, जो ज्या अन्य देवतांना भजावयाची इच्छा करतो, त्याची ती इच्छा पूर्णपणे पुरविणारा मीच आहे. 

देवोदेवी मीचि पाहीं । हाही निश्र्चय त्यासि नाहीं ।

भाव ते ते ठायीं । वेगळाला धरी ॥ १४४ ॥

१४४) देवदेवतान्तरांतून मीच आहें, हा निश्र्चय देखील त्यास नसतो; त्या त्या देवताविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असते.  

मूळ श्लोक

स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।

लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥ २२ ॥

२२) तो भक्त त्या श्रद्धेनें युक्त होऊन त्या देवतेचें आराधन करतो; आणि मग ( त्या देवतेपासून ) मीच निर्माण केलेली इच्छित फळें त्याला मिळतात.

मम श्रद्धायुक्त । तेथिंचें आराधन जें उचित ।

तें सिद्धीवरी समस्त । वर्तों लागे ॥ १४५ ॥

१४५) मग ( त्या देवतेचे ) जें योग्य आराधन असेल, तें ( तो ) श्रद्धेनें आपली कार्यसिद्धि होईपर्यंत संपूर्ण आचरतो. 

ऐसें जेणें जें भाविजे । तें फळ तेणें पाविजे ।

परी तेंही सकळ निपजे । मजचिस्तव ॥ १४६ ॥

१४६) याप्रमाणें ज्यानें ज्याची इच्छा करावी, त्याला तें फळ मिळते . पण तें देखील सर्व माझ्यामुळेंच होतें.   

मूळ श्लोक

अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।

देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥ २३ ॥

२३) परंतु त्या अल्पबुद्धि मनुष्यांना तें मिळालेलें फल विनाशी ठरतें. देवतांची भक्ति करणारे देवतांप्रत जातात आणि माझी भक्ति करणारे मजप्रत येतात.

परी ते भक्त मातें नेणती । जे कल्पनेबाहेरी न निघती ।

म्हणोनि कल्पित फळ पावती । अंतवंत ॥ १४७ ॥

१४७) पण ते भक्त मला जाणत नाहींत, कारण ते कल्पनेच्या बाहेर पडत नाहींत व म्हणून त्यांना नाशवंत असें इच्छिलेले फळ प्राप्त होतें.   

किंबहुना ऐसें जें भजन । ते संसाराचेंचि साधन ।

येर फळभोग तो स्वप्न । नावभरी दिसे ॥ १४८ ॥

१४८) फार काय सांगावें ! असें जे भजन आहे. तें जन्ममरणाला देणारे आहें आणि त्या भजनानें मिळणारा हा ऐहिक पारत्रिक फळभोग क्षणभर दिसणारें स्वप्नच आहे..

हें असो परौतें । मग हो का आवडे तें ।

परि यजी जो देवतांतें । तो देवत्वासीचि ये ॥ १४९ ॥

१४९) हें एक बाजूला राहूं दे. मग वाटेल तें कां दैवत असेना, परंतु जो ज्या देवतांना भजतो, त्या त्या देवतास प्राप्त होतो.

येर तनुमनप्राणीं । जे निरंतर माझेयाचि वाहणीं ।

ते देहाचां निर्वाणीं । मीचि होती ॥ १५० ॥

१५०) दुसरे जे शरीरानें, मनानें व प्राणानें अखंड माझ्या

 भजनाच्या मार्गांत आहेत, ते देह पडल्यावर मीच

 होतात.  


Custom Search