Friday, April 2, 2021

AyodhyaKanda Part 14 अयोध्याकाण्ड भाग १४

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 14 
Doha 77 to 82 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग १४ 
दोहा ७७ ते ८२

दोहा—औरु करै अपराधु कोउ और पाव फल भोगु ।

अति बिचित्र भगवंत गति को जग जानै जोगु ॥ ७७ ॥

परंतु यावेळी उलटे घडत आहे. अपराध कुणी इतराने करावा आणि त्याचे फळ तिसर्‍या कोणी भोगावे. भगवंताची लिला फार विचित्र आहे. ती जाणणारा जगांत कोण आहे ? ‘ ॥ ७७ ॥

रायँ राम राखन हित लागी । बहुत उपाय किए छलु त्यागी ॥

लखी राम रुख रहत न जाने । धरम धुरंधर धीर सयाने ॥

राजांनी अशा प्रकारे श्रीरामचंद्रांना ठेवून घेण्यासाठी निष्कपटपणे खूप प्रयत्न केले, परंतु त्यांनी धर्मधुरंधर, धीर व बुद्धिमान श्रीरामांचा एकंदर कल पाहिला. ते थांबतील असे काही त्यांना वाटले नाही. ॥ १ ॥

तब नृप सीय लाइ उर लीन्ही । अति हित बहुत भॉंति सिख दीन्ही ॥

कहि बन के दुख दुसह सुनाए । सासु ससुर पितु सुख समुझाए ॥

तेव्हा राजांनी सीतेला हृदयाशी धरले आणि मोठ्या प्रेमाने पुष्कळ प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. वनातील दुःसह दुःखे वर्णन करुन सांगितली.नंतर सासू, सासरे. पिता यांच्याजवळ राहण्यामधील सुख समजावून दिले. ॥ २ ॥

सिय मनु राम चरन अनुरागा । घरु न सुगमु बनु विषमु न लागा ॥

औरउ सबहिं सीय समुझाई । कहि कहि बिपिन बिपति अधिकाई ॥

परंतु सीतेचे मन श्रीरामांच्या चरणीं अनुरुक्त होते. म्हणून तिला घरी राहाणे आवडले नाही. आणि वनही भयानक वाटले नाही. नंतर इतर सर्व लोकांनीही वनात असलेल्या संकटांचे खूप वर्णन करुन सीतेला समजावले.॥ ३ ॥

सचिव नारि गुर नारि सयानी । सहित सनेह कहहिं मृदु बानी ॥

तुम्ह कहुँ तौ न दीन्ह बनबासू ॥ करहु जो कहहिं ससुर गुर सासू ॥

मंत्री सुमंताची पत्नी, गुरु वसिष्ठांची पत्नी अरुंधती आणि इतरही चतुर स्त्रियांनी प्रेमाने व कोमल वाणीने सांगितले की, ‘ राजांनी तर तुला वनवास दिलेला नाही. म्हणून सासरे, सासू व गुरु जे सांगतात,  तसे कर. ‘ ॥ ४ ॥

दोहा—सिख सीतलि हित मधुर मृदु सुनि सीतहि न सोहानि ।

सरद चंद चंदिनि लगत जनु चकई अकुलानि ॥ ७८ ॥

हे शीतल, हितकारक, मधुर व कोमल बोळणे ऐकून सीतेला बरे वाटले नाही. शरद ऋतूच्या चंद्राच्या चांदण्यांचा स्पर्श होताच जशी चकवी व्याकूळ होते, त्याप्रमाणे सीता व्याकूळ झाली. ॥ ७८ ॥

सीय सकुच उतरु न देई । सो सुनि तमकि उठी कैकेई ॥

मुनि पट भूषन भाजन आनी । आगें धरि बोली मृदु बानी ॥

संकोचामुळे सीतेने काही उत्तर दिले नाही, परंतु या गोष्टी ऐकून कैकेयी चडफडली. तिने मुनींची वस्त्रे, माला-मेखला ही आभूषणे आणि कमंडलू आणून श्रीरामांच्या समोर ठेवला आणि कोमलपणे म्हणाली, ॥ १ ॥

नृपहि प्रानप्रिय तुम्ह रघुबीरा । सील सनेह न छाड़िहि भीरा ॥

सुकृतु सुजसु परलोकु नसाऊ । तुम्हहि जान बन कहिहि न काऊ ॥

‘ हे रघुवीरा, राजांना तू प्राणप्रिय आहेस. प्रेमामुळे त्यांचे मन दुर्बल बनले आहे. ते स्वभाव व प्रेम सोडणार नाहीत. पुण्य, सुंदर कीर्ती आणि परलोक नष्ट झाला, तरी ते तुला वनात जाण्यास कधीच सांगणार नाहीत. ॥ २ ॥

अस बिचारि सोइ करहु जो भावा । राम जननि सिख सुनि सुखु पावा ॥

भूपहि बचन बान सम लागे । करहिं न प्रान पयान अभागे ॥

असा विचार करुन तुला जे योग्य वाटेल ते कर. ‘ कैकेयी मातेचा उपदेश ऐकून श्रीरामांना आनंद वाटला. परंतु राजांना हे बोलणे बाणाप्रमाणे बोचले. त्यांनी विचार केला की, माझे दुर्दैवी प्राण अजुनही का जात नाहीत ? ॥ ३ ॥

लोग बिकल मुरुछित नरनाहू । काह करिअ कछु सूझ न काहू ॥

रामु तुरत मुनि बेषु बनाई । चले जनक जननिहि सिरु नाई ॥

महाराज बेशुद्ध झाले. लोक व्याकूळ झाले. काय करावे, हे कुणाला काही सुचत नव्हते. श्रीरामांनी पटकन मुनीचा वेश धारण केला आणि माता-पित्यांना नमस्कार करुन ते निघाले. ॥ ४ ॥

दोहा—सजि बन साजु समाजु सबु बनिता बंधु समेत ।

बंदि बिप्र गुर चरन प्रभु चले करि सबहि अचेत ॥ ७९ ॥

वनात उपयोगी पडणारे सर्व सामान घेऊन पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह श्रीरामचंद्र ब्राह्मण व गुरु यांच्या चरणांना वंदन करुन आणि सर्वांना सुन्न करुन निघाले ॥ ७९ ॥

 निकसि बसिष्ठ द्वार भए ठाढ़े । देखे लोग बिरह दव दाढ़े ॥

कहि प्रिय बचन सकल समुझाए । बिप्र बृंद रघुबीर बोलाए ॥

राजमहालातून बाहेर पडल्यावर श्रीरामचंद्र वसिष्ठांच्या द्वारी जाऊन उभे राहिले. सर्व लोक वियोगाच्या अग्नीमध्ये होरपळून असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी गोड शब्द बोलून सर्वांना समजावून सांगितले. नंतर श्रीरामांनी ब्राह्मण मंडळींना बोलाविले. ॥ १ ॥

गुर सन कहि बरषासन दीन्हे । आदर दान बिनय बस कीन्हे ॥

जाचक दान मान संतोषे । मीत पुनीत प्रेम परितोषे ॥

गुरुंना सांगून त्या सर्वांना वर्षभरासाठी अन्न दिले आणि आदर, दान व विनयाने त्यांना प्रभावित केले. त्यानंतर त्यांनी याचकांना दान व मान देऊन संतुष्ट केले आणि मित्रांना पवित्र प्रेमाने प्रसन्न केले. ॥ २ ॥

दासीं दास बोलाइ बहोरी । गुरहि सौंपि बोले कर जोरी ॥

सब कै सार सँभार गोसाईं । करबि जनक जननी की नाईं ॥

नंतर त्यांनी दास-दासींना बोलावून त्यांना गुरुंच्याकडे सोपवून हात जोडून म्हटले, ‘ हे गुरुवर्य ! माता-पित्याप्रमाणे या सर्वांचा सांभाळ करीत राहा. ‘ ॥ ३ ॥

बारहिं बार जोरि जुग पानी । कहत रामु सब सन मृदु बानी ॥

सोइ सब भॉंति मोर हितकारी । जेहि तें रहै भुआल सुखारी ॥

श्रीरामचंद्रांनी वारंवार हात जोडून सर्वांना कोमल वाणीने सांगितले की,  ‘ ज्याच्या प्रयत्नामुळे माझे वडिल सुखी होतील, तोच सर्व प्रकारे हितकारक मित्र असेल. ॥ ४ ॥

दोहा—मातु सकल मोरे बिरहँ जेहिं न होहिं दुख दीन ।

सोइ उपाउ तुम्ह करेहु सब पुर जन परम प्रबीन ॥ ८० ॥

हे चतुर पुरवासी गृहस्थानों, माझ्या सर्व माता विरहाने दुःखी होऊ नयेत, असा तुम्ही उपाय करा. ‘ ॥ ८० ॥

एहि बिधि राम सभि समुझावा । गुर पद पदुम हरषि सिरु नावा ॥

गनपति गौरि गिरीसु मनाई । चले असीस पाइ रघुराई ॥

अशा प्रकारे श्रीरामांनी सर्वांना समजावले आणि आनंदित होऊन गुरुंच्या चरणी मस्तक ठेवले. नंतर गणेश, पार्वती व कैलासपती महादेवांची प्रार्थना केली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन श्रीरघुनाथ निघाले. ॥ १ ॥

राम चलत अति भयव बिषादू । सुनि न जाइ पुर आरत नादू ॥

कुसगुन लंक अवध अति सोकू । हरष बिषाद बिबस सुरलोकू ॥

श्रीराम निघताच फार मोठा हलकल्लोळ माजला. नगरात उडालेला हाहाकार ऐकवत नव्हता. लंकेमध्ये वाईट शकुन होऊं लागले. अयोध्येमध्ये अत्यंत शोक पसरला आणि देवलोकी सर्वजण राक्षसांचा नाश होणार म्हणून हर्ष पावले व अयोध्यावासीयांचा शोक पाहून विषादामध्ये बुडून गेले. ॥ २ ॥

गइ मुरुछा तब भूपति जागे । बोलि सुमंत्रु कहन अस लागे ॥

रामु चले बन प्रान न जाहीं । केहि सुख लागि रहत तन माहीं ॥

राजांची मूर्छा दूर झाली, राजे शुद्धीवर आले आणि सुमंत्राला बोलावून म्हणू लागले, ‘ श्रीराम वनात निघून गेले, परंतु माझे प्राण कांही जात नाहीत. आतां कोणते सुख मिळविण्यासाठी हे शरीरात राहिले आहेत, कोणास ठाऊक ? ॥ ३ ॥

 एहि तें कवन ब्यथा बलवाना । जो दुखु पाइ तजहिं तनु प्राना ॥

पुनि धरि धीर कहइ नरनाहू । लै रथु संग सखा तुम्ह जाहू ॥

यापेक्षा अधिक मोठी व्यथा कोणती असेल बरे की, तिच्यामुळे प्राण शरीराचा त्याग करतील, ‘ नंतर धीर धरुन महाराज म्हणाले,  ‘ मित्रा, तू रथ घेऊन श्रीरामासोबत जा. ॥ ४ ॥

दोहा—सुठि सुकुमार कुमार दोउ जनकसुता सुकुमारि ।

रथ चढ़ाइ देखराइ बनु फिरेहु गएँ दिन चारि ॥ ८१ ॥

अत्यंत सुकुमार असलेल्या दोन्ही कुमारांना आणि सुकुमारी जानकीला रथात बसवून व वन दाखवून चार दिवसांनी परत घेऊन ये. ॥ ८१ ॥

जौं नहिं फिरहिं धीर दोउ भाई । सत्यसंघ दृढ़व्रत रघुराई ॥

तौ तुम्ह बिनय करेहु कर जोरी । फेरिअ प्रभु मिथिलेसकिसोरी ॥

श्रीराम प्रतिज्ञेचा पक्का व नियमांचे कठोर पालन करणारा आहे. तेव्हा जरी ते दोघे धैर्यवान भाऊ परत आले नाहीत, तर तू त्यांना हात जोडून विनंती कर की, हे प्रभो, जनककुमारी सीतेला तरी परत पाठवा. ॥ १ ॥

जब सिय कानन देखि डेराई । कहेहु मोरि सिख अवसरु पाई ॥

सासु ससुर अस कहेउ सँदेसू । पुत्रि फिरिअ बन बहुत कलेसू ॥

जेव्हा सीता वन पाहून घाबरेल, तेव्हां संधी पाहून माझा निरोप तिला सांग की, ‘ बाळे, तू परत ये. वनात फार क्लेश होतील. ‘ असा तुझ्या सासू-सासर्‍यांनी निरोप दिला आहे. ॥ २ ॥

पितुगृह कबहुँ कबहुँ ससुरारी । रहेहु जहॉं रुचि होइ तुम्हारी ॥

एहि बिधि करेहु उपाय कदंबा । फिरइ त होइ प्रान अवलंबा ॥

‘ कधी माहेरी तर कधी सासरी, जिथे तुझी इच्छा असेल, तिथे राहा. ‘ अशाप्रकारे सर्व प्रकारचे उपाय तू कर. जर सीता परत आली, तर एखादे वेळी माझ्या प्राणांना आधार मिळेल. ॥ ३ ॥

नाहिं त मोर मरनु परिनामा । कछु न बसाइ भएँ बिधि बामा ॥

अस कहि मुरछि परा महि राऊ । रामु लखनु सिय आनि देखाऊ ॥

नाहीतर माझे मरणच ओढवेल. दैव प्रतिकूल झाले की, काही चालत नाही. अरेरे, राम, लक्ष्मण व सीता यांना मला आणून दाखवा. ‘ असे म्हणून महाराज बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. ॥ ४ ॥

दोहा—पाइ रजायसु नाइ सिरु रथु अति बेग बनाइ ॥

गयउ जहॉं बाहेर नगर सीय सहित दोउ भाइ ॥ ८२ ॥

राजांची आज्ञा होताच सुमंत्र त्यांना नमस्कार करुन लगेच रथ जोडून नगराबाहेर गेला. तेथे सीता व राम-लक्ष्मण होते. ॥ ८२ ॥  

तब सुमंत्र नृप बचन सुनाए । करि बिनती रथ रामु चढ़ाए ॥

चढ़ि रथ सीय सहित दोउ भाई । चले हृदयँ अवधहि सिरु नाई ॥

तेथे पोहोचल्यावर सुमंत्राने राजांचे म्हणणे रामांना सांगितले आणि विनंती करुन त्यांना रथात बसविले. सीतेसह दोघे बंधू रथात बसून मनातल्या मनात अयोध्येस प्रणाम करुन निघाले. ॥ १ ॥

चलत रामु लखि अवध अनाथा । बिकल लोग सब लागे साथा ॥

कृपासिंधु बहुबिधि समुझावहिं । फिरहिं प्रेम बस पुनि फिरि आवहिं ॥

श्रीरघुनाथ जात आहेत व अयोध्येला कोणी त्राता नाही, असे पाहून सर्व लोक व्याकूळ होऊन त्यांच्याबरोबर निघाले. कृपासिंधू श्रीरामांनी त्यांना तर्‍हेतर्‍हेने समजावले. तेव्हा ते अयोध्येकडे जायला निघत, परंतु प्रेमामुळे परत येत. ॥ २ ॥

लागति अवध भयावनि भारी । मानहुँ कालराति अँधिआरी ॥

घोर जंतु सम पुर नर नारी । डरपहिं एकहि एक निहारी ॥

त्यांना अयोध्यापुरी फार भयानक वाटू लागली. जणू अंधकारमय कालरात्रच असावी. नगरांतील स्त्री-पुरुष भयानक प्राण्यांप्रमाणे परस्परांना पाहून घाबरत होते. ॥ ३ ॥

घर मसान परिजन जनु भूता । सुत हित मीत मनहुँ जमदूता ॥

बागन्ह बिटप बेलि कुम्हिलाहीं । सरित सरोबर देखि न जाहीं ॥

घर म्हणजे स्मशान, कुटुंबीय जणू भूत-प्रेत, हितचिंतक

 आणि मित्र जणू यमदूताप्रमाणे वाटत होते. बागांमधील

 वृक्ष व वेली कोमेजू लागल्या. नदी व तलाव फार

 भयानक वाटत होते. त्यांच्याकडे पाहावतसुद्धा नव्हते. ॥

 ४ ॥



Custom Search

No comments: