Saturday, April 3, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 7 Part 1 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग १

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 7 Part 1 
Ovya 1 to 30 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ 
भाग १ ओव्या १ ते ३०

मूळ श्लोक

श्रीभगवानुवाच

मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन् मदाश्रयः ।

असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ १ ॥

१) श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, ज्या तुझें मन माझ्या ठिकाणीं आसक्त झालें आहे व माझा आश्रय करुन जो योग तूं आचरण करणार आहेस, तो तूं कोणत्या प्रकारानें मला पूर्णत्वानें आणि शंका न राहतां जाणशील, तो प्रकार ऐक.  

ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः ।

यत् ज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते ॥ २ ॥

२) प्रपंचज्ञानासह हें ( मद्वविषयक ) ज्ञान मी तुला पूर्णत्वानें सांगतों. हे ज्ञान झाल्यावर या लोकीं पुन्हां दुसरें जाणण्याला योग्य असें ( ज्ञान ) शिल्लक राहात नाहीं. 

आइकां मग तो अनंतु । पार्थातें असे म्हणतु ।

पैं गा तूं योगयुक्तु । जालासि आतां ॥ १ ॥

१) ऐक, मग ते श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे, तूं आतां योगाच्या ज्ञानानें युक्त झाला आहेस.

मज समग्रातें जाणसी ऐसें । आपुलिया तळहातीचें रत्न जैसें ।

तुज ज्ञान सांगेन तैसें । विज्ञानेंसीं ॥ २ ॥

२) आपल्या तळकातांत घेतलेल्या रत्नाप्रमाणें मला संपूर्णाला तूं जाणशील, असें प्रपंचज्ञानासह तुला स्वरुपज्ञान सांगतों.

एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें ।

तरी पैं आधीं जाणावें । तेंचि लागे ॥ ३ ॥

३) येथें विज्ञानाशीं काय करावयाचें आहे, अशी जर तुझी मनापासून समजूत असेल, तर तेंच अगोदर समजणें जरुर आहे.  

मग ज्ञानाचि वेळे । झांकती जाणिवेचे डोळे ।

जैसी तीरीं नाव न ढळे । टेकली सांती ॥ ४ ॥

४) कारण कीं, स्वरुपज्ञानाच्या वेळीं बुद्धीचे डोळे झांकतात. ज्याप्रमाणें नाव नदीच्या तीराला टेकली असतां पुढें सरकत नाहीं, 

तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुतां पाउलीं निघे ।

तर्कु आयणी नेघे । आंगीं जयाचां ॥ ५ ॥

५) त्याप्रमाणें जेथें बुद्धीचा प्रवेश होत नाहीं व विचार जेथून मागें फिरतो आणि ज्याच्या संबंधानें तर्काचें चातुर्य चालत नाहीं,

अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान ।

तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ६ ॥

६) अर्जुना, त्याचें नांव ज्ञान होय. त्याहून दुसरा जो प्रपंच, तें विज्ञान आहे आणि प्रपंच्याच्या ठिकाणीं खरेपणाची जी बुद्धि तिला अज्ञान म्हणतात, हेंहि तूं समज.

आतां अज्ञान अवघें हरपे । विज्ञान निःशेष करपे ।

आणि ज्ञान तें स्वरुपें । होऊनि जाइजे ॥ ७ ॥

७) आतां अज्ञान संपूर्ण नाहींसें होईल व प्रपंच पूर्णपणें बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वतःच होऊन जाऊं;

ऐसें वर्म जें गूढ । तें कीजेल वाक्यारुढ ।

जेणें थोडेन पुरे कोड । बहुत मनींचें ॥ ८ ॥

८) असें जें गूढ वर्म आहे तें शब्दांत आणलें जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादनानेंच मनाचें पूर्ण समाधान होईल. 

जेणें सांगतयाचें बोलणें खुंटे । ऐकतयाचें व्यसन तुटे ।

हें जाणणें सानें मोठें । उरों नेदी ॥ ९ ॥

९) ज्यामुळें व्याख्यात्याचें प्रतिपादन थांबतें व ऐकणाराचा ऐकण्याचा छंद नाहींसा होतो, हें ज्ञान लहानमोठा ( असा भेद ) राहूं देत नाहीं.

मूळ श्लोक

मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद् यतति सिद्धये ।

यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः ॥ ३ ॥

३) सहस्त्रावधि मनुष्यांमध्यें एखादा ( ज्ञानाच्या ) सिद्धीसाठी यत्न करतो. ( त्या ) यत्न करणार्‍या सिद्ध मनुष्यांमध्यें एखादा मला खर्‍याप्रकारें जाणतो.   

पैं गा मनुष्यांचिया सहस्त्रशां-। माजि विपाइलेयाची येथ धिंवसा ।

तैसेयां धिवसेकरां बहुवसां-। माजि विरळा जाणे ॥ १० ॥

१०) अरे अर्जुना, हजारों मनुष्यांत एखाद्यासच याविषयीं इच्छा असते व अशा अनेक इच्छा करणार्‍यांमध्ये स्वरुज्ञानास एखादाच जाणतो.

जैसा भरलेया त्रिभुवना । आंतु एकएकु चांगु अर्जुना ।

निवडूनि कीजे सेना । लक्षवरी ॥ ११ ॥

११) ज्याप्रमाणें संपूर्ण त्रैलोक्यांत, अर्जुना, एक एकचांगला सैनिक निवडून लक्षावधि सैन्य तयार करावें.

कीं तयाही पाठीं । जे वेळीं लोह मांसातें धांटी ।

ते वेळीं विजयश्रियेचां पाटीं । एकुचि बैसे ॥ १२ ॥

१२) असें सैन्य निवडल्यानंतर ज्या वेळीं लोखंडाच्या शस्त्राचे अंगावर घाव होतात, त्यावेळीं विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो;  

तैसे आस्थेचां महापुरीं । रिघताती कोटिवरी ।

परी प्राप्तीचां पैलतीरीं । विपाइला निगे ॥ १३ ॥

१३) त्याप्रमाणें स्वरुपज्ञानाच्या इच्छारुपी पुरांत कोट्यावधि लोक प्रवेश करतात, पण स्वरुपज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या कांठाला ( त्यांतून ) एखादाच निघतो.  

म्हणऊनि सामान्य गा नोहे । हें सांगतां वडिल गोठी गा आहे ।

परी तें बोलों येईल पाहें । आतां प्रस्तुत ऐकें ॥ १४ ॥

१४) म्हणून हें ( ज्ञानाचे कथन ) सामान्य नाहीं. सांगावयास गेलें असतां ही गोष्ट फार महत्वाची आहे, परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढें सांगतां येईल. प्रस्तुत तुला ( विज्ञानाची गोष्ट ) सांगतों ती ऐक.

मूळ श्लोक

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।

अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥ ४ ॥     

ही माझी प्रकृति पृथ्वी, उदक, तेज, वायु, आकाश, मन बुद्धि आणि अहंकार अशा आठ प्रकारांनीं विभागलेली आहे.

तरी अवधारीं गा धनंजया । हे महदादिक माझी माया ।

जैसी प्रतिबिंबे छाया । निजांगाची ॥ १५ ॥

अर्जुना, तर ऐक. हे महत् तत्त्वादि ही माया माझी आहे. ज्याप्रमाणें आपल्या अंगाची पडछाया पडते ( त्याप्रमाणें ती माझी छाया आहे. )

आणि इयेतें प्रकृति म्हणिजे । जे अष्टधा भिन्न जाणिजे ।

लोकत्रय निपजे । इयेस्तव ॥ १६ ॥

१६) आणि हिला प्रकृति असें म्हणतात. ही आठ प्रकारांनीं वेगवेगळीआहे, असे समज; हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होतें.    

हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसीं ।

तरी तेचि गा आतां परियेसीं । विवंचना ॥ १७ ॥

१७) ही आठ प्रकारांनी वेगळीं कशी, असा विचार जर तुझ्या मनांत असेल तर त्यांचें विवेचन तूं आतां ऐक.

आप तेज गगन । मही मारुत मन ।

बुद्धि अहंकार हे भिन्न । आठै भाग ॥ १८ ॥

१८) पाणी, अग्नि, प्रकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धि आणि अहंकार हे ते आठ वेगळे वेगळे भाग आहेत.

मूळ श्लोक

अपरेयमितत्स्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।

जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥ ५ ॥

५) हे अर्जुना, ही ( माझी ) प्रकृति अपरा होय. जिनें हें सर्व जग धारण केलें आहे, अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता परा प्रकृति आहे, असे समज.

आणि या आठांची जे साम्यावस्था । ते माझी परम प्रकृति पार्था ।

तिये नाम व्यवस्था । जीवु ऐसी ॥ १९ ॥ 

१९) आणि हे आठ भाग ज्या ठिकाणीं लीन होऊन असतात, तीच माझी श्रेष्ठ प्रकृति असून, तिला जीव असें नांव आहे.

जे जडातें जीववी । चेतनेतें चेतवी ।

मनाकरवीं मानवी । शोक मोहो ॥ २० ॥ 

२०) ती जडाला सजीव करते, जीवाला ( आभासाला ) सज्ञान करते व मनाकडून शोक, मोह मानावयाला लावते;

पैं बुद्धीचां अंगीं जाणणें । तें जियेचिये जवळिकेचें करणें ।

जिया अहंकाराचेनि विंदाणें । जगचि धरिजे ॥ २१ ॥ 

२१) बुद्धिमध्यें जी जाणण्याची शक्ति आहे, ती हिच्या सान्निध्यामुळें आहे व तिनें अहंकाराच्या कौशल्यानें जगत् धरले आहे.    

मूळ श्लोक

एतद्योनिनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।

अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ६ ॥

सर्व प्राणिमात्र या दोन प्रकृतेमपासून निर्माण झाले आहेत असें जाण. त्याप्रमाणें सर्व जगाचा आदि व अंत मी आहें ( असें समज ). 

ते सूक्ष्म प्रकृति कोडें । जैं स्थूळाचिया आंगा घडे ।

तैं भूतसृष्टीची पडे । टांकसाळ ॥ २२ ॥

२२) ती सूक्ष्म प्रकृति ( जीवरुपी प्रकृति ) कौतुकानें स्थूल प्रकृतीच्या ( अष्टधा प्रकृतीच्या ) परिणामास जेव्हां पावते, तेव्हां प्राणीवर्गरुपी नाणीं पाडण्याची टांकसाळ सुरुं होते.

चतुर्विधु ठसा । उमटों लागे आपैसा ।

मोला तरी सरिसा । परि थरचि आनान ॥ २३ ॥

२३) चार प्रकारच्या आकृति ( अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज ) त्या टांकसाळूंन आपोआप व्यक्तत्वाला येऊं लागतात. त्या चार आकृति सारख्याच किमतीच्या असतात; परंतु ( त्यांचे ) आकारमात्र वेगवेगळे असतात.

होती चौर्‍यांशी लक्ष थरा । येरा मिति नेणिजे भांडारा ।

भरे आदिशून्यांचा गाभारा । नाणेयांसी ॥ २४ ॥

२४) चौर्‍यांशी लक्ष योनींचे आकार तयार होतात, इतर आणखी नाण्यांचे आकार त्या टांकसाळीच्या भांडारात जें तयार होतात, त्यांची गणती नाहीं, त्या सर्व प्राणीरुप नाण्यांनीं मायेचा गाभारा भरुन जातो.   

ऐसे एकतुके पांचभौतिक । पडती बहुवस टांक ।

मग तिये समृद्धीचे लेख । प्रकृतीचि धरी ॥ २५ ॥

२५) याप्रमाणें पंचमहाभूतांचीं एकाच योग्यतेचीं अनेक नाणीं तयार होतात. मग त्यांच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते, 

जें आंखूनि नाणें विस्तारी । पाठीं तयांची आटणी करी ।

माजी कर्माकर्माचिया व्यवहारीं । प्रवर्तु दावी ॥ २६ ॥

२६) ती प्राणिरुप नाण्यांच्या आकृतीची योजना करुन त्यांचा प्रसार करते व मग त्या आकृतींची आटणी करते व दरम्यान ( स्थितीकाळीं ) प्राण्यांकडून कर्माकर्माचा व्यवहार करुन दाखविते.  

हें रुपक परी असो । सांगों उघड जैसें परियेसों ।

तरी नमरुपाचा अतिसो । प्रकृतीच कीजे ॥ २७ ॥

२७) हें रुपक असो; परंतु तुला कळेल असें स्पष्ट सांगतों; तर नामरुपाचा विस्तार प्रकृतीच करते, 

आणि प्रकृति तंव माझां ठायीं । बिंबे येथ आन नाहीं ।

म्हणोनि आदि मध्य अवसान पाहीं । जगासि मी ॥ २८ ॥

२८) आणि प्रकृति तर माझ्या ठिकाणीं भासते, यांत अन्यथा नाहीं; म्हणून जगाचा आदि, मध्य व शेवट मीच आहे, असें समज.

मूळ श्लोक

मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय ।

मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७ ॥    

७) हे धनंजया, माझ्याहून वेगळें असें दुसरें कांहीं नाहीं. ( सोन्याच्या ) दोर्‍यामध्यें ज्याप्रमाणें ( सोन्याच्या ) मण्यांचा समुदाय ( गुंफावा ) त्याप्रमाणें हें सर्व ( जग ) माझ्यामध्यें गुंफलेलें आहे.  

हें रोहिणीचें जळ । तयाचें पाहतां येईजे मूळ ।

तैं रश्मि नव्हती केवळ । होय तो भानु ॥ २९ ॥

२९) या मृगजळाचें मूळ पाहूं गेलें असतां तें सूर्यकिरणें नसून, तो केवळ सूर्यच आहे.,

तयाचिपरी किरीटी । इया प्रकृति जालिये सृष्टी ।

जैं उपसंहरुनि कीजेल ठी । तैं मीचि आहें ॥ ३० ॥

३०) त्याप्रमाणे अर्जुना, ज्या वेळीं या ( स्थूलाच्या परिणामाला पावलेल्या परा ) प्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट होतो, त्या वेळीं पाहिलें असतां मीच आहे. 



Custom Search

No comments: