Sunday, February 19, 2023

Lanka Kanda Part 4 Doha 8 to 10 लङ्काकाण्ड भाग ४ दोहा ८ ते १०

 

Lanka Kanda Part 4 
ShriRamCharitManas 
Doha 8 to 10 
लङ्काकाण्ड भाग ४ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ८ ते १०

दोहा--- सब के बचन श्रवन सुनि कह प्रहस्त कर जोरि ।

नीति बिरोध न करिअ प्रभु मंत्रिन्ह मति अति थोरि ॥ ८ ॥

सर्वांचे ऐकल्यावर रावण-पुत्र प्रहस्त हात जोडून म्हणू लागला, हे प्रभू, नीतीविरुद्ध काहीही करु नये. मंत्र्यांना अक्कल फारच थोडी आहे. ॥ ८ ॥

कहहिं सचिव सठ ठकुरसोहाती । नाथ न पूर आव एहि भॉंती ॥

बारिधि नाघि एक कपि आवा । तासु चरित मन महुँ सबु गावा ॥

हे सर्वजण खुशामत करणारे मंत्री तोंडदेखले बोलणारे आहेत. बाबा ! अशा गोष्टींनी काही होणार नाही. एकच वानर समुद्र ओलांडून आला होता, त्याचे चरित्र सर्व लोक अजुनी मनातल्या मनात गात आहेत. ॥ १ ॥

छुधा न रही तुम्हहि तब काहू । जारत नगरु कस न धरि खाहू ॥

सुनत नीक आगें दुख पावा । सचिवन अस मत प्रभुहि सुनावा ॥

वानर हे जर तुमचे भोजन आहे, तर मग त्यावेळी तुमच्यापैकी कुणाला भूक लागली नव्हती काय ? तो नगर जाळत होता, तेव्हा त्याला पकडून का खाल्ले नाही ? या मंत्र्यांनी तुम्हांला असा सल्ला दिला आहे की, जो ऐकायला चांगला परंतु परिणामी दुःखदायक. ॥ २ ॥

जेहिं बारीस बँधायउ हेला । उतरे सेन समेत सुबेला ॥

सो भनु मनुज खाब हम भाई । बचन कहहिं सब गाल फुलाई ॥

ज्याने सहजासहजी समुद्राला बांध घातला आणि जो सेनेसह सुवेळ पर्वतावर येऊन ठेपला आहे, तो काय मनुष्य आहे ? बंधूंनो, सांगा. त्याला आम्ही काय खाऊ शकू ? सांगा ना. सर्वजण वेड्याप्रमाणे वटवट करीत आहात ते. ॥ ३ ॥

तात बचन मम सुनु अति आदर । जनि मन गुनहु मोहि करि कादर ॥

प्रिय बानी जे सुनहिं जे कहहीं । ऐसे नर निकाय जग अहहीं ॥

हे तात, माझे बोलणे नीट लक्ष देऊन ऐका. मला मनातून भित्रा समजू नका. जगात अशी माणसे ढिगाने आहेत की, जी गोड वाटणार्‍या गोष्टी ऐकत व बोलत असतात. ॥ ४ ॥

बचन परम हित सुनत कठोरे । सुनहिं जे कहहिं ते नर प्रभु थोरे ॥

प्रथम बसीठ पठउ सुनु नीती । सीता देइ करहु पुनि प्रीती ॥

हे प्रभो, ऐकण्यास कठोर व परिणामी परम हितकारी बोलणे, जे बोलतात व ऐकून घेतात, अशी माणसे फारच थोडी असतात. राजनीती सांगते ते ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे प्रथम दूत पाठवा आणि सीतेला सोपवून श्रीरामांशी समेट करा. ॥ ५ ॥

दोहा—नारि पाइ फिरि जाहिं जौं तौ न बढ़ाइअ रारि ।

नाहिं त सन्मुख समर महि तात करिअ हठि मारि ॥ ९ ॥

जर पत्नी मिळाल्यावर ते परत जात असतील तर विनाकारण भांडण वाढवू नका. नाही तर मग हे तात, युद्धभुमीवर समोरासमोर निश्चितपणे युद्ध करा. ॥ ९ ॥           

यह मत जौं मानहु प्रभु मोरा । उभय प्रकार सुजसु जग तोरा ॥

सुत सन कह दसकंठ रिसाई । असि मति सठ केहिं तोहि सिखाई ॥

हे प्रभो, जर तुम्ही माझे मत मानाल तर, जगात दोन्ही प्रकारे तुमची कीर्ती होईल.’ रावण रागाने पुत्राला म्हणाला, ‘ अरे मूर्खा, तुला असली बुद्धी कुणी शिकविली ? ॥ १ ॥

अबहीं ते उर संसय होई । बेनुमूल सुत भयहु घमोई ॥

सुनि पितु गिरा परुष अति घोरा । चला भवन कहि बचन कठोरा ॥

आतापासून तुझ्या मनात भय उत्पन्न झाले ? हे पुत्रा, तू तर वेळूच्या मुळाशी लागलेली कीड झालास. ‘ पित्याची अत्यंत व कठोर वाणी ऐकून प्रहस्त स्पष्टपणे असे म्हणत घरी गेला की, ॥ २ ॥

हित मत तोहि न लागत कैसें । काल बिबस कहुँ भेषज जैसें ॥

संध्या समय जानि दससीसा । भवन चलेउ निरखत भुज बीसा ॥

‘ हिताचा सल्ला तुम्हांला मानवत नाही; ज्याप्रमाणे मरणाच्या दारी असलेल्या रोग्याला औषध आवडत नाही. ‘ संध्याकाळ झाल्याचे पाहून रावणही आपल्या वीस भुजांकडे पाहात महालाकडे गेला. ॥ ३ ॥

लंका सिखर उपर आगारा । अति बिचित्र तहँ होइ अखारा ॥

बैठ जाइ तेहिं मंदिर रावन । लागे किंनर गुन गन गावन ॥

लंकेच्या शिखरावर एक अत्यंत सुंदर महाल होता. तेथे नाच-गाण्याचा अड्डा जमे. रावण त्या महालात जाऊन बसला. किन्नर त्याचे गुण-गान करु लागले. ॥ ४ ॥

बाजहिं ताल पखाउज बीना । नृत्य करहिं अपछरा प्रबीना ॥

टाळ, मृदंग आणि वीणा ही वाद्ये वाजत होती, नृत्यात प्रवीण असलेल्या अप्सरा नाचत होत्या. ॥ ५ ॥

दोहा---सुनासीर सत सरिस सो संतत करइ बिलास ।

परम प्रबल रिपु सीस पर तद्यपि सोच न त्रास ॥ १० ॥

रावण शेकडो इंद्रांप्रमाणे नित्य भोग-विलास करीत होता. श्रीरामांसारखा अत्यंत प्रबळ शत्रू डोक्यावर होता, परंतु त्याला त्याची चिंता किंवा भीती नव्हती. ॥ १० ॥

इहॉं सुबेल सैल रघुबीरा । उतरे सेन सहित अति भीरा ॥

सिखर एक उतंग अति देखी । परम रम्य सम सुभ्र बिसेषी ॥

इकडे सुवेळ पर्वतावर प्रचंड सेनेसह श्रीराम उतरले. पर्वताचे एक फार उंच, परमरमणीय, सपाट व उजळ शिखर पाहून ॥ १ ॥

तहँ तरु किसलय सुमन सुहाए । लछिमन रचि निज हाथ डसाए ॥

ता पर रुचिर मृदुल मृगछाला । तेहिं आसन आसीन कृपाला ॥

तेथे लक्ष्मणाने वृक्षांची कोमल पाने व फुले आपल्या हातांनी सजवून अंथरली त्यावर सुंदर व कोमल मृगचर्म घातले. त्या आसनावर कृपाळू श्रीराम विराजमान झाले होते. ॥ २ ॥

प्रभु कृत सीस कपीस उछंगा । बाम दहिन दिसि चाप निषंगा ॥

दुहुँ कर कमल सुधारत बाना । कह लंकेस मंत्र लगि काना ॥

प्रभूंनी वानरराज सुग्रीवाच्या मांडीवर आपले डोके ठेवले होते त्यांच्या डावीकडे धनुष्य व उजवीकडे बाणांच भाता ठेवलेला होता. ते आपल्या दोन्ही कर-कमलांनी बाण व्यवस्थित करीत होते. बिभीषण त्यांच्याशी एकांतात सल्लामसलत करीत होता. ॥ ३ ॥

बड़भागी अंगद हनुमाना । चरन कमल चापत बिधि नाना ॥

प्रभु पाछें लछिमन बीरासन । कटि निषंग कर बान सरासन ॥

परम भाग्यशाली अंगद व हनुमान अनेक प्रकारे प्रभूंची चरण-कमले चेपत होते. लक्ष्मण कमरेला भाता बांधून व हातामध्ये धनुष्यबाण घेऊन वीरासनात प्रभूंच्या मागे शोभून दिसत होता. ॥ ४ ॥



Custom Search

Lanka Kanda Part 3 Doha 5 to 7 लङ्काकाण्ड भाग ३ दोहा ५ ते ७

 

Lanka Kanda Part 3 
ShriRamCharitManas 
Doha 5 to 7 
लङ्काकाण्ड भाग ३ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ५ ते ७

दोहा---बॉंध्यो बननिधि नीरनिधि जलधि सिंधु बारीस ।

सत्य तोयनिधि कंपति उदधि पयोधि नदीस ॥ ५ ॥

‘ वननिधी, नीरनिधि, जलधी, सिंधू, वारीश, तोयनिधी, कंपाती, उदधी, पयोधी, नदीश याला खरोखरंच बांधले आहे ? ‘ ॥ ५ ॥

निज बिकलता बिचारि बहोरी । बिहँसि गयउ गृह करि भय भोरी ॥

मंदोदरीं सुन्यो प्रभु आयो । कौतुकहीं पाथोधि बँधायो ॥

मग आपली व्याकुळता जाणून वर वर हसत, भय विसरुन रावण महालात गेला. जेव्हा मंदोदरीने हे ऐकले की, प्रभू रामचंद्र आले आहेत आणि सहजासहजी समुद्राला बांध घातला आहे. ॥ १ ॥

कर गहि पतिहि भवन निजआनी । बोली परम मनोहर बानी ॥

चरन नाइ सिरु अंचलु रोपा । सुनहु बचन पिय परिहरि कोपा ॥

तेव्हा ती पतीचा हात पकडून आपल्या महालात घेऊन गेली आणि मधुर वाणीने म्हणाली. ती त्याचे पाय धरुन पदर पसरुन म्हणाली, ‘ हे प्रियतम, क्रोध सोडून माझे म्हणणे ऐका. ॥ २ ॥

नाथ बयरु कीजे ताही सों । बुधि बल सकिअ जीति जाही सों ॥

तुम्हहि रघुपतिहि अंतर कैसा । खलु खद्योत दिनकरहि जैसा ॥

हे नाथ, ज्याला बुद्धी व बळाने जिंकता येईल त्याच्याशीच वैर करावे. पण तुमच्यात आणि श्रीरघुनाथ यांच्यात अंतर आहे, ते काजवा व सूर्याप्रमाणे. ॥ ३ ॥

अति बल मधु कैटभ जेहिं मारे । महाबीर दितिसुत संघारे ॥

जेहिं बलि बॉंधि सहसभुज मारा । सोइ अवतरेउ हरन महि भारा ॥

ज्यांनी विष्णुरुपाने अत्यंत बलवान अशा मधू व कैटभ दैत्यांना मारले आणि वराह व नृसिंहरुपाने महान शूर, दितीचे पुत्र हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू यांचा संहार केला, ज्यांनी वामनरुपाने बलीला बांधून टाकले आणि परशुरामरुपाने सहस्रबाहुला मारले, तेच भगवान पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी रामरुपाने प्रकट झाले आहेत. ॥ ४ ॥

तासु बिरोध न कीजिअ नाथा । काल करम जिव जाकें हाथा ॥

ज्यांच्या अधीन काल, कर्म व जीव आहेत, हे नाथ, त्यांचा विरोध पत्करु नका. ॥ ५ ॥

दोहा--- रामहि सौंपि जानकी नाइ कमल पद माथ ।

सुत कहुँ राज समर्पि बन जाइ भजिअ रघुनाथ ॥ ६ ॥

श्रीरामांना शरण जाऊन त्यांना जानकी समर्पण करा आणि तुम्ही पुत्राला राज्य देऊन, वनात जाऊन श्रीरामांचे भजन करा. ॥ ६ ॥

नाथ दीनदयाल रघुराई । बाघउ सनमुख गएँ न खाई ॥

चाहिअ करन सो सब करि बीते । तुम्ह सुर असुर चराचर जीते ॥

हे नाथ, श्रीरघुनाथ हे दीनांवर दया करणारे आहेत. शरण गेल्यावर वाघसुद्धा खात नाही. तुम्हांला जे काहीकरायचे होते, ते तुम्ही केलेले आहे. तुम्ही देव, राक्षस व चराचर सर्वांना जिंकले आहे. ॥ १ ॥

संत कहहिं असि नीति दसानन । चौथेंपन जाइहि नृप कानन ॥

तासु भजनु कीजिअ तहँ भर्ता । जो कर्ता पालक संहर्ता ॥

हे नाथ, वृद्धापकाळी राजाने वनात जायला हवे. अशी नीती संत सांगतात. वनात तुम्ही सृष्टीची रचना, पालन व संहार करणार्‍या श्रीरामांचे भजन करावे. ॥ २ ॥        

सोइ रघुबीर प्रनत अनुरागी । भजहु नाथ ममता सब त्यागी ॥

मुनिबर जतनु करहिं जेहि लागी । भूप राजु तजि होहिं बिरागी ॥

हे नाथ, तुम्ही विषयांची सर्व ममता सोडून शरणागतावर प्रेम करणार्‍या भगवंतांचे भजन करा. ज्यांच्यासाठी श्रेष्ठ मुनी साधना करतात आणि राजेसुद्धा राज्य सोडून वैरागी होतात, ॥ ३ ॥

सोइ कोसलाधीस रघुराया । आयउ करन तोहि पर दाया ॥

जौं पिय मानहु मोर सिखावन । सुजसु होइ तिहुँ पुर अति पावन ॥

तेच कोसलाधीश श्रीरघुनाथ तुमच्यावर दया करण्यास आले आहेत. हे प्रियतम, जर तुम्ही माझे म्हणणे मान्य कराल, तर तुमची अत्यंत पवित्र व सुंदर कीर्ती तिन्ही लोकी पसरेल. ‘ ॥ ४ ॥

दोहा---अस कहि नयन नीर भरि गहि पद कंपित गात ।

नाथ भजहु रघुनाथहि अचल होइ अहिवात ॥ ७ ॥

असे म्हणत नेत्रांमधून अश्रू ढाळत आणि पतीचे चरण धरुन थरथरा कापत असलेल्या मंदोदरीने म्हटले, “ हे नाथ, श्रीरघुनाथांचे भजन करा. त्यामुळे माझे सौभाग्य अखंड राहील. “ ॥ ७ ॥  

तब रावन मयसुता उठाई । कहै लाग खल निज प्रभुताई ॥

सुनु तैं प्रिया बृथा भय माना । जग जोधा को मोहि समाना ॥

तेव्हा मंदोदरीला उठवून तो दुष्ट तिला आपली महती सांगू लागला, ‘ हे प्रिये, तू विनाकारण भीती बाळगतेस. माझ्यासारखा योद्धा जगात कोण आहे, ते सांग. ॥ १ ॥

बरुन कुबेर पवन जम काला । भुजबल जितेउँ सकल दिगपाला ॥

देव दनुज नर सब बस मोरें । कवन हेतु उपजा भय तोरें ॥

वरुण, कुबेर, वायू, यमराज इत्यादी दिक् पालांना व कालालाही मी आपल्या भुजबळाने जिंकले आहे. देव, दानव, मनुष्य सर्व माझ्या अधीन आहेत. मग तुला ही भीती का वाटते ? ‘ ॥ २ ॥

नाना बिधि तेहि कहेसि बुझाई । सभॉं बहोरि बैठ सो जाई ॥

मंदोदरीं हृदयँ अस जाना । काल बस्य उपजा अभिमाना ॥

मंदोदरीने पुष्कळ प्रकारे समजावून सांगितले, तरी रावणाने तिचे काही ऐकले नाही, मग तो सभेत जाऊन बसला. मंदोदरीला कळून चुकले की, कालाच्या अधीन असल्यामुळे पतीला अभिमान झालेला आहे. ॥ ३ ॥

सभॉं आइ मंत्रिन्ह तेहिं बूझा । करब कवन बिधि रिपु सैं जूझा ॥

कहहिं सचिव सुनु निसिचर नाहा । बार बार प्रभु पूछहु काहा ॥

कहहु कवन भय करिअ बिचारा । नर कपि भालु अहार हमारा ॥

सभेत आल्यावर रावणाने मंत्र्यांना विचारले की, शत्रूबरोबर कशा प्रकारे युद्ध करावे ? मंत्री म्हणाले, ‘ हे राक्षसराज ! ऐका. आपण हे वारंवार काय विचारता ? सांगा तरी, असे कोणते मोठे भय उत्पन्न झालेआहे की ज्याचा विचार करावा ? मनुष्य व वानर हे तर आपले भोजन आहेत. ‘ ॥ ४-५ ॥




Custom Search

Friday, February 10, 2023

Lanka Kanda Part 2 Doha 2 to 4 लङ्काकाण्ड भाग २ दोहा २ ते ४

 

Lanka Kanda Part 2 
ShriRamCharitManas 
Doha 2 to 4 
लङ्काकाण्ड भाग २ 
श्रीरामचरितमानस 
दोहा २ ते ४

दोहा—संकरप्रिय मम द्रोही सिव द्रोही मम दास ।

ते नर करहिं कलप भरि घोर नरक महुँ बास ॥ २ ॥

ज्यांना शंकर प्रिय आहेत, परंतु जे माझे द्रोही आहेत आणि जे शिवांचे द्रोही आहेत आणि माझे दास बनू इच्छितात, ते मनुष्य कल्पापर्यंत घोर नरकात जातात. ॥ २ ॥

जे रामेस्वर दरसनु करिहहिं । ते तनु तजि मम लोक सिधरिहहिं ॥

जो गंगाजलु आनि चढ़ाइहि । सो साजुज्य मुक्ति नर पाइहि ॥

जे लोक मी स्थापन केलेल्या या रामेश्वराचे दर्शन घेतील, ते शरीर सोडल्यावर माझ्या लोकी जातील आणि जो गंगाजल या रामेश्र्वराला अर्पण करील, तो मनुष्य सायुज्य मुक्ती प्राप्त करुन माझ्यामध्ये एकरुप होईल. ॥ १ ॥

होइ अकाम जो छल तजि सेइहि । भगति मोरि तेहि संकर देइहि ॥

मम कृत सेतु जो दरसनु करिही । सो बिनु श्रम भवसागर तरिही ॥

जे कपट सोडून निष्काम मनाने श्रीरामेश्र्वराची सेवा करतील, त्यांना शंकर माझी भक्ती देतील आणि जे मी बनविलेल्या सेतूचे दर्शन घेतील, ते विनासायास संसाररुपी समुद्र तरुन जातील. ‘ ॥ २ ॥

राम बचन सब के जिय भाए । मुनिबर निज निज आश्रम आए ॥

गिरिजा रघुपति कै यह रीती । संतत करहिं प्रनत पर प्रीती ॥

श्रीरामांचे बोलणे सर्वांना मनापासून आवडले. त्यानंतर श्रेष्ठ मुनी आपल्या आश्रमाला गेले. शिव म्हणतात, ’ हे पार्वती, शरणागतावर नेहमी प्रेम करणे, ही रघुनाथांची रीतच आहे. ‘ ॥ ३ ॥

बॉंधा सेतु नील नल नागर । राम कृपॉं जसु भयउ उजागर ॥

बूड़हिं आनहि बोरहिं जेई । भए उपल बोहित सम तेई ॥

चतुर नल व नील यांनी सेतू बांधला, श्रीरामांच्या कृपेमुळे त्यांची उज्ज्वल कीर्ती सर्वत्र पसरली. जे पाषाण बुडतात आणि दुसर्‍यांनाही बुडवितात, तेच पाषाण जहाजाप्रमाणे स्वतः तरणारे व दुसर्‍यांना तारुन नेणारे झाले. ॥ ४ ॥

महिमा यह न जलधि कइ बरनी । पाहन गुन न कपिन्ह कइ करनी ॥

हा काही समुद्राचा महिमा नाही, दगडांचा गुण नाही की, ही वानरांची करामत नाही. ॥ ५ ॥

दोहा—श्री रघुबीर प्रताप ते सिंधु तरे पाषान ।

ते मतिमंद जे राम तजि भजहिं जाइ प्रभु आन ॥ ३ ॥

श्रीरघुवीरांच्या प्रतापाने पाषाणसुद्धा समुद्रावर तरले. अशा श्रीरामांना सोडून जो दुसर्‍या कुणा स्वामीकडे जाऊन त्याला भजतो, तो खरोखरच मंदबुद्धीचा होय. ॥ ३ ॥

बॉंधि सेतु अति सुदृढ़ बनावा । देखि कृपानिधि के मन भावा ॥

चली सेन कछु बरनि न जाई । गर्जहिं मर्कट भट समुदाई ॥

नल-नील यांनी सेतू बांधून तो मजबूत बनविला. तो पाहून श्रीरामांना फार बरे वाटले. सेना निघाली. तिचे वर्णन करणे कठीण. योद्धे असलेल्या वानरांचे समूह गर्जना करीत होते. ॥ १ ॥ 

सेतुबंध ढिग चढ़ि रघुराई । चितव कृपाल सिंधु बहुताई ॥

देखन कहुँ प्रभु करुना कंदा । प्रगट भए सब जलचर बृंदा ॥

कृपाळू श्रीरघुनाथ सेतुबंधनाच्या तटावर चढून समुद्राचा विस्तार पाहू लागले. करुणानिधी प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी सर्व जलचरांचे समूह पाण्याबाहेर आले. ॥ २ ॥

मकर नक्र नाना झष ब्याला । सत जोजन तन परम बिसाला ॥

अइसेउ एक तिन्हहि जे खाहीं । एकन्ह कें डर तेपि डेराहीं ॥

बर्‍याच प्रकारच्या मगरी, नक्र, मासे आणि सर्प होते. त्यांची विशाल शरीरे शंभर-शंभर योजने होती. काही असेही जंतू होते, जे त्यांनाही खाऊन टाकत. काहींच्या भीतीने तेसुद्धा घाबरत होते. ॥ ३ ॥

प्रभुहि बिलोकहिं टरहिं न टारे । मन हरषित सब भए सुखारे ॥

तिन्ह कीं ओट न देखिअ बारी । मगन भए हरि रुप निहारी ॥

ते सर्वजण वैर विसरुन प्रभूंचे दर्शन घेत होते. हाकलले तरी जात नव्हते. सर्वांची मने आनंदित होती. सर्वजण सुखी झाले. त्यांच्या आच्छादनामुळे पाणी दिसत नव्हते. ते सर्व भगवंताचे रुप पाहून आनंद-प्रेममग्न झाले होते. ॥ ४ ॥

चला कटकु प्रभु आयसु पाई । को कहि सक कपि दल बिपुलाई ॥

प्रभू श्रीरामांची आज्ञा झाल्यावर सेना निघाली. वानरसेना प्रचंड होती. तिची गणना कोण करणार ? ॥ ५ ॥

दोहा--- सेतुबंध भइ भीर अति कपि नभ पंथ उड़ाहिं ।

अपर जलचरन्हि ऊपर चढ़ि चढ़ि पारहि जाहिं ॥ ४ ॥

सेतुबंधावर मोठी गर्दी झाली. त्यामुळे काही वानर आकाश-मार्गाने उडू लागले आणि काही तर जलचर जीवांना ओलांडून पलीकडे जात होते. ॥ ४ ॥   

अस कौतुक बिलोकि द्वौ भाई । बिहँसि चले कृपाल रघुराई ॥

सेन सहित उतरे रघुबीरा । कहि न जाइ कपि जूथप भीरा ॥

कृपाळू श्रीराम व बंधू लक्ष्मण हे कौतुक पाहात हसत निघाले. श्रीराम सेनेसह समुद्रपार गेले. वानर आणि त्यांच्या सेनापतींची गर्दी तर काही विचारु नका. ॥ १ ॥

सिंधु पार प्रभु डेरा कीन्हा । सकल कपिन्ह कहुँ आयसु दीन्हा ॥

खाहु जाइ फल मूल सुहाए । सुनत भालु कपि जहँ तहँ धाए ॥

प्रभूंनी समुद्र पार करुन मुक्काम ठोकला आणि सर्व वानरांना आज्ञा दिली की, ‘ तुम्ही जाऊन चांगली फळे-मुळे खाऊन घ्या. ‘ हे ऐकताच अस्वले व वानर इकडे-तिकडे धावत निघाले. ॥ २ ॥  

सब तरु फरे राम हित लागी । रितु अरु कुरितु काल गति त्यागी ॥

खाहिं मधुर फल बिटप हलावहिं । लंका सन्मुख सिखर चलावहिं ॥

श्रीरामांच्या सेवेसाठी सर्व वृक्ष ॠतु-काल नसतानाही फळांनी बहरले. वानर व अस्वले गोड गोड फळे खात होते, वृक्ष हालवीत होते आणि पर्वतांची शिखरे लंकेकडे टाकीत होते. ॥ ३ ॥

जहँ कहुँ फिरत निसाचर पावहिं । घेरि सकल बहु नाच नचावहिं ॥

दसनन्हि काटि नासिका काना । कहि प्रभु सुजसु देहिं तब जाना ॥

फिरत असताना कोठे एखादा राक्षस भेटला, तर सर्वजण त्याला घेरुन खूप नाचवत होते आणि दातांनी त्याचे नाक-कान कापून प्रभूंची सुकीर्ती सांगून त्यांना जाऊ देत होते. ॥ ४ ॥

जिन्ह कर नासा कान निपाता । तिन्ह रावनहि कही सब बाता ॥

सुनत श्रवन बारिधि बंधाना । दस मुख बोलि उठा अकुलाना ॥

ज्या राक्षसांचे नाक-कान कापले होते, त्यांनी जाऊन सर्व

 वृत्तांत रावणाला सांगितला. समुद्रावर सेतु बांधल्याचे

 ऐकून रावण दहा तोंडांनी म्हणाला, ॥ ५ ॥



Custom Search

Lanka Kanda Part 1 Sholak 1 to 3 लङ्काकाण्ड भाग १ श्र्लोक १ ते ३

 

Lanka Kanda Part 1 
ShriRamCharitManas 
Sholak 1 to 3 Doha 1 
लङ्काकाण्ड भाग १ 
श्रीरामचरितमानस 
श्र्लोक १ ते ३ दोहा १

श्लोक

रामं कामारिसेव्यं भवभयहरणं कालमत्तेभसिंहं ।

योगीन्द्रं ज्ञानगम्यं गुणनिधिमजितं निर्गुणं निर्विकारम् ॥

मायातीतं सुरेशं खलवधनिरतं ब्रह्मवृन्दैकदेवं ।॥

वन्दे कन्दावदातं सरसिजनयनं देवमुर्वीशरुपम् ॥ १ ॥

१) कामदेवाचे शत्रू असणार्‍या शिवांचे आराध्य दैवत, जन्म-मृत्युरुपी भवाचे भय हरण करणारे, कालरुपी हत्तीसाठी सिंहासमान, योगीश्र्वर, ज्ञानाने जाणता येणारे, गुणांचे निधी, अजेय, निर्गुण, निर्विकार, मायातीत, देवांचे स्वामी, दुष्टांचा वध करण्यात तत्पर, ब्राह्मणवृदांचे एकमात्र देव, सजल मेघासमान सुंदर श्याम, कमलसदृश नेत्रांचे, राजाच्या रुपातील परमदेव श्रीराम यांना मी वंदन करतो.

शङ्खेन्द्वाभमतीवसुन्दरतनुं शार्दूलचर्माम्बरं ।

कालव्यालकरालभूषणधरं गङ्गाशशाङ्कप्रियम् ॥

काशीशं कलिकल्मषौघशमनं कल्याणकल्पद्रुमं ॥।

नौमीड्यं गिरिजापतिं गुणनिधिं कन्दर्पहं शङ्करम् ॥ २ ॥

२) शंख आणि चंद्र यांच्यासारखी कांती असणारे, अत्यंत सुंदर शरीराचे, व्याघ्रांबर धारण करणारे, कालसमान भयानक सर्पांचे भूषण धारण करणारे, गंगा व चंद्र यांचे प्रेमी काशीपती, कलियुगातील पाप-समूहाचा नाश करणारे, कल्याणाचा कल्पवृक्ष, गुणांचे निधान आणि कामदेवाला भस्म करणारे, पार्वतीपती, पूज्य श्रीशंकर यांना मी नमस्कार करतो. ॥ २ ॥

यो ददाति सतां शम्भुः कैवल्यमपि दुर्लभम् ।

खलानां दण्डकृद्योऽसौ शङ्करः शं तनोतु मे ॥ ३ ॥ 

३) जे सत्पुरुषांना अत्यंत दुर्लभ अशी कैवल्यमुक्तीसुद्धा देऊन टाकतात आणि जे दुष्टांना दंड देणारे आहेत, ते कल्याणकारी श्रीशंभू माझ्या कल्याणाचा विस्तार करोत. ॥ ३ ॥

दोहा—लव निमेष परमानु जुग बरष कलप सर चंड ।

भजसि न मन तेहि राम को कालु जासु कोदंड ॥

लव, निमेष, परमाणू, वर्ष, युग आणि कल्प हे ज्यांचे प्रचंड बाण आहेत आणि काळ हेज्यांचे धनुष्य आहे, हे मना ! तू त्या श्रीरामांचे भजन कां करीत नाहीस ?

सोपान—सिंधु बचन सुनि राम सचिव बोलि प्रभु अस कहेउ ।

अब बिलंबु केहि काम करहु सेतु उतरै कटकु ॥

समुद्राचे बोलणे ऐकून प्रभू श्रीरामांनी मंत्र्यांना बोलावून घेतले आणि म्हटले, ‘ आता उशीर कशासाठी ? सेतू तयार करा. त्यामुळे सेना पलीकडे जाऊ शकेल ‘ .

सुनहु भानुकुल केतु जामवंत कर जोरि कह ।

नाथ नाम तव सेतु नर चढ़ि भव सागर तरहिं ॥

जांबवान हात जोडून म्हणाला, ‘ हे सूर्यकुलाचे ध्वजस्वरुप श्रीराम, ऐकून घ्या. हे नाथ सर्वांत मोठा सेतु तर तुमचे नावच आहे. त्याचा आधार घेऊन मनुष संसाररुपी समुद्र पार करतो.

यह लघु जलधि तरत कति बारा । अस सुनि पुनि कह पवनकुमारा ॥

प्रभु प्रताप बड़बानल भारी । सोषेउ  प्रथम  पयोनिधि बारी ॥

मग हा लहानसा समुद्र पार करण्यास कितीसा वेळ लागेल ?’ हे ऐकून पवनकुमार श्रीहनुमान म्हळाला, ‘ प्रभूंचा प्रताप हा प्रचंड वडवानलासारखा आहे. त्याने पूर्वीच समुद्राचे पाणी शोषून घेतले आहे. ॥ १ ॥

तव रिपु नारि रुदन जल धारा ।  भरेउ बहोरि भयउ तेहिं खारा ॥

सुनि अति उकुति पवनसुत केरी । हरषे कपि रघुपति तन हेरी ॥   

 परंतु तुमच्या शत्रूंच्या स्त्रियांच्या अश्रूंच्या धारांनी हा पुन्हा भरला आहे आणि त्यामुळे खारा आहे.’ हनुमानाचे अलंकारपूर्ण बोलणे ऐकून श्रीरघुनाथांच्याकडे पाहात सर्व वानर आनंदित झाले. ॥ २ ॥

जामवंत बोले दोउ भाई । नल नीलहि सब कथा सुनाई ॥

राम प्रताप सुमिरि मन माहीं । करहु सेतु प्रयास कछु नाहीं ॥

जांबवानाने नल-नील या दोघा भावांना बोलावून सर्व सांगितले आणि म्हटले, ‘ मनात श्रीरामांच्या प्रतापाचे स्मरण करुन सेतू बनवा. रामांच्या प्रतापामुळे काहीही कष्ट होणार नाहीत.’ ॥ ३ ॥   

बोलि लिए कपि निकर बहोरी । सकल सुनहु बिनती कछु मोरी ॥

राम चरन पंकज उर धरहू । कौतुक एक भालु कपि करहु ॥

नंतर वानरांच्या समूहांना बोलावून घेतले आणि सांगितले की, ‘ तुम्ही सर्वजण माझी विनंती ऐका. आपल्या मनात श्रीरामांचे चरण-कमल धारण करा आणि सर्व अस्वले व वानर मिळून एक कौतुक करा. ॥ ४ ॥

धावहु मर्कट बिकट बरुथा । आनहु बिटप गिरिन्ह के जूथा ॥

सुनि कपि भालु चले करि हूहा । जय रघुबीर प्रताप समूहा ॥

बलवान वानरांच्या समूहांनी धावत जाऊन वृक्ष व पर्वतांचे समूह उपटून आणावेत.’ हे ऐकताच वानर व अस्वले हुंकार करीत आणि श्रीरघुनाथांच्या प्रतापाचा जयजयकार करीत निघाले. ॥ ५ ॥

दोहा १

अति उतंग गिरि पादप लीलहिं लेहिं उठाइ ।

आनि देहिं नल नीलहि रचहिं ते सेतु बनाइ ॥

ते उंच उंच पर्वत व वृक्ष लीलया सहजपणे उपटून घेत होते आणि नल व नील यांना आणून देत होते. ते दोघे चांगल्याप्रकारे पर्वत, वृक्ष रचून सेतू बनवू लागले. ॥ १ ॥

सैल बिसाल आनि कपि देहीं । कंदुक इव नल नील ते लेहीं ॥

देखि सेतु अति सुंदर रचना । बिहसि कृपानिधि बोले बचना ॥

वानर मोठमोठे पर्वत आणून देत होते आणि नल-नील ते चेंडूप्रमाणे सहज घेत होते. सेतूची सुंदर रचना पाहून कृपासिंधू श्रीराम हसून म्हणाले. ॥ १ ॥

परम रम्य उत्तम यह धरनी । महिमा अमित जाइ नहिं बरनी ॥

करिहउँ इहॉं संभु थापना । मोरे हृदयँ परम कलपना ॥

‘ येथील भूमी परम रमणीय व उत्तम आहे. तिचा महिमा अगाध आहे. मी येथे श्रीशंकरांची स्थापना करतो. माझ्या मनात हा महान संकल्प आहे. ‘ ॥ २ ॥

सुनि कपीस बहु दूत पठाए । मुनिबर सकल बोलि लै आए ॥

लिंग थापि बिधिवत करि पूजा । सिव समान प्रिय मोहि न दूजा ॥

श्रीरामांचे बोलणे ऐकून वानरराज सुग्रीवाने पुष्कळ दूत पाठविले. त्यांनी सर्व श्रेष्ठ मुनींना बोलावून आणले. शिवलिंगाची स्थापना करुन विधिपूर्वक त्याची पूजा केली. मग भगवान म्हणाले, ‘ शिवांसारखा दुसरा कोणी मला प्रिय नाही. ॥ ३ ॥

सिवा द्रोही मम भगत कहावा । सो नर सपनेहुँ मोहि न पावा ॥

संकर बिमुख भगति चह मोरी । सो नारकी मूढ़ मति थोरी ॥

जो शिवांचा द्रोह करतो आणि स्वतःला माझा भक्त म्हणवून घेतो, तो मनुष्य स्वप्नातही मला प्राप्त करु शकत नाही. शंकरांना विन्मुख होऊन जो माझी भक्ती प्राप्त करु इच्छितो , तो नरकगामी, मूर्ख आणि अल्पबुद्धीचा होय. ॥ ४ ॥ 

    


Custom Search

Friday, January 20, 2023

BhaktiYoga Part 12 Adhyay 12 Ovya 241 to 247 भक्तियोग भाग १२ अध्याय १२ ओव्या २४१ ते २४७

 

BhaktiYoga Part 12 
Shri Dnyaneshwari Adhyay 12
Ovya 241 to 247 
भक्तियोग भाग १२ 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १२ 
ओव्या २४१ ते २४७

जो धर्मकीर्तिधवळु । अगाध दातृत्वें सरळु ।

अतुलबळें प्रबळु । बळिबंधनु ॥ २४१ ॥

२४१) ज्याची ( धर्मरक्षक म्हणून ) कीर्ति उज्ज्वल आहे, अपार औदर्याने जो वैषम्यभावरहित आहे, तुलना करतां यावयाची नाहीं, अशा पराक्रमानें जो बलाढ्य आहे व जो बळीच्या बंधनांत राहिला;

जो पैं सुरसहायशीळु । लोकलालनलीळु ।

प्रणतप्रतिपाळु । हा खेळु जयाचा ॥ २४२ ॥

२४२) देवांना साह्य करणें हा ज्याचा स्वभाव आहे. लोकांचे संगोपन करणें ही ज्याची लीला आहे, शरण आलेल्याचा प्रतिपाळ करणें हा ज्याचा खेळ आहे;

जो भक्तजनवत्सलु । प्रेमजनप्रांजलु ।

सत्यसेतु सरळु । कलानिधि ॥ २४३ ॥

२४३) जो भक्तांविषयीं मायाळू आहे व जो प्रेमळ जनांना सुलभ आहे आणि ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हाच सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे;

तो कृष्णजी वैकुंठींचा । चक्रवर्ती निजांचा ।

सांगतुसे येरु दैवाचा । आइकतु असे ॥ २४४ ॥

२४४) तो भक्तांचा सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्णपरमात्मा सांगत आहे व भाग्यवान अर्जन ऐकत आहे.

आतां ययावरी । निरुपिती परी ।

संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥ २४५ ॥

२४५) आतां यानंतर भगवंतांचा व्याख्यान करण्याचा प्रकार ऐका, असें संजय धृतराष्ट्रास म्हणाला.

तेचि रसाळ कथा । मर्‍हाठिया प्रतिपथा ।

जाणिजेल आतां । अवधारिजो ॥ २४६ ॥

२४६) तीच रसानें भरलेली कथा मराठी भाषेच्या रुपांतरांत आणली जाईल; ती आपण ऐकावी.

ज्ञानदेव म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्ही ।

हें पढविलों जी स्वामी । निवृत्तिदेवीं ॥ २४७ ॥

२४७) ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात; महाराज, प्रभु निवृत्तिदेवांनीं आम्हाला हे शिकविलें आहे कीं, आम्हीं तुम्हां संताची सेवा करावी.  

॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादेभक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥ ( श्लोक २०; ओव्या २४७ )

॥ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥   



Custom Search