Sunday, November 29, 2020

SaptaShloki Purushottam Stotra,सप्तश्र्लोकी पुरुषोत्तम स्तोत्र

 

SaptaShloki Purushottam Stotra 
सप्तश्र्लोकी पुरुषोत्तम स्तोत्र
SaptaShloki Purushottam Stotra it is from Padmpuran. Bhagyashri Jangam well wisher of my channel sent me this stotra and requested to upload it on my channel. Thanks to Bhagyshri Jangam for sending such a beautiful stotra. It is said in the stotra, that whosoever recites this stotra daily; becomes sinless by the grace of God Purushottam and after death goes to Vishnu Loka.
सप्तश्र्लोकी पुरुषोत्तम स्तोत्रम्
नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्र्वभावन ॥
नमस्तेऽस्तु हृषीकेश महापुरुषपूर्वज् ॥ १ ॥
येनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितम् ॥
लयमेष्यति यत्रैतत् तं प्रपन्नोऽस्मि केशवम् ॥ २ ॥
परेशः परमानंदः परात्परतरः प्रभुः ।
चिद्रूपश्र्चित्परिज्ञेयो स मे कृष्णः प्रसीदतु ॥ ३ ॥
कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवम् ।
नृसिंहं वामनं विष्णुं स्मरन् याति परां गतिम् ॥ ४ ॥
वासुदेवं वराहं च कंसकेशिनिषूदनम् ।
पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोस्म्यहम् ॥ ५ ॥
अनादिनिधनं देवं शंखचक्रगदाधरम् ।
त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनम् ॥ ६ ॥
य इदं कीर्तयेन्नित्यं स्तोत्राणामुत्तमोत्तमम् ।
स सर्व पापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते ॥ ७ ॥
॥ इति श्रीपद्मपुराणोक्त पुरुषोत्तमस्तोत्रं संपूर्णम् ॥ 
SaptaShloki Purushottam Stotra,
सप्तश्र्लोकी पुरुषोत्तम स्तोत्र



Custom Search

Saturday, November 28, 2020

Shri RamCharitManas Part 64 श्रीरामचरितमानस भाग ६४

 

Shri RamCharitManas Part 64
Doha 288 to 292
श्रीरामचरितमानस भाग ६४
दोहा २८८ ते २९२
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

सौरभ पल्लव सुभग सुठि किए नीलमनि कोरि ।

हेम बौर मरकत घवरि लसत पाटमय डोरि ॥ २८८ ॥

नीलमणी कोरुन अत्यंत सुंदर आंब्याची पाने बनविली होती. सोन्यापासून आंब्याचा मोहोर तयार केला होता आणि रेशमाच्या दोरीने बांधून पाचूच्या फळांचे बनविलेले गुच्छ शोभून दिसत होते. ॥ २८८ ॥

रचे रुचिर बर बंदनिवारे । मनहुँ मनोभवँ फंद सँवारे ॥

मंगल कलस अनेक बनाए । ध्वज पताक पट चमर सुहाए ॥

अशी सुंदर व उत्तम तोरणे बनविली होती की, जणू कामदेवाने फासे सजवून ठेवले असावेत. अनेक मंगल-कलश, सुंदर ध्वज, पताका, पडदे आणि चवर्‍या बनविल्या होत्या. ॥ १ ॥

दीप मनोहर मनिमय नाना । जाइ न बरनि बिचित्र बिताना ॥

जेहिं मंडप दुलहिनि बैदेही । सो बरनै असि मति कबि केही ॥

रत्नांनी बनविलेल्या सुंदर दिव्यांमुळे त्या विलक्षण मंडपाचे वर्णनच करता येणे अशक्य होते. ज्या मंडपामध्ये जानकी नवरी बनून येणार त्याचे वर्णन करु शकण्याची बुद्धी कुणा कवीमध्ये असेल ? ॥ २ ॥

दूलहु रामु रुप गुन सागर । सो बितानु तिहुँ लोक उजागर ॥

जनक भवन कै सोभा जैसी । गृह गृह प्रति पुर देखिअ तैसी ॥

ज्या मंडपामध्ये रुप व गुणांचा सागर श्रीरामचंद्र वर म्हणून असतील, तो त्रैलोक्यात प्रसिद्धच असायला हवा. जनकांच्या महालाची जशी शोभा होती, तशीच शोभा नगरातील प्रत्येक घरात दिसत होती. ॥ ३ ॥

जेहिं तेरहुति तेहि समय निहारी । तेहि लघु लगहिं भुवन दस चारी ॥

जो संपदा नीच गृह सोहा । सो बिलोकि सुरनायक मोहा ॥

त्यावेळी ज्याने मिथिला प्रदेश पाहिला, त्याला चौदा भवनही तुच्छ वाटले. जनकपुरातील दरिद्री लोकांच्या घरातही त्यावेळी जी संपत्ती शोभत होती, ती पाहून इंद्रसुद्धा मोहून जात होता. ॥ ४ ॥

दोहा—बसइ नगर जेहिं लच्छि करि कपट नारि बर बेषु ।

तेहि पुर कै सोभा कहत सकुचहिं सारद सेषु ॥ २८९ ॥

ज्या नगरीत प्रत्यक्ष लक्ष्मीने मानवी स्त्रीचे सुंदर रुप धारण करुन निवास केलेला आहे, त्या नगरीच्या शोभेचे वर्णन करण्यास सरस्वती आणि शेष हेसुद्धा संकोच करतात. ॥ २८९ ॥

पहुँचे दूत राम पुर पावन । हरषे नगर बिलोकि सुहावन ॥

भूप द्वार तिन्ह खबरि जनाई । दसरथ नृप सुनि लिए बोलाई ॥

जनकाचे दूत श्रीरामचंद्रांची पवित्र नगरी अयोध्येमध्ये पोहोचले. सुंदर नगर पाहून ते आनंदित झाले. राजद्वारावर जाऊन त्यांनी निरोप पाठविला. राजा दशरथांनी तो ऐकताच दूतांना बोलावून घेतले. ॥ १ ॥

करि प्रनामु तिन्ह पाती दीन्ही । मुदित महीप आपु उठि लीन्ही ॥

बारि बिलोचन बॉंचत पाती । पुलक गात आई भरि छाती ॥

दूतांनी प्रणाम करुन पत्र दिले. प्रसन्न होऊन राजांनी ते स्वतः उठून घेतले. पत्र वाचताना त्यांच्या नेत्रांमध्ये प्रेम व आनंदाचे अश्रू आले. शरीर रोमांचित झाले आणि ऊर भरुन आला. ॥ २ ॥

रामु लखनु उर कर बर चीठी । रहि गए कहत न खाटी मीठी ॥

पुनि धरि धीर पत्रिका बॉंची । हरषी सभा बात सुनि सॉंची ॥

हृदयामध्ये राम व लक्ष्मण आहेत, हातात सुंदर पत्र आहे. राजा ते हातात घेऊन तसेच राहिले. बरे-वाईट काहीच बोलता येईना, म्हणून स्तब्ध राहिले. नंतर धैर्य धरुन त्यांनी पत्र वाचले. संपूर्ण सभा सत्य ऐकून हर्षित झाली. ॥ ३ ॥

खेलत रहे तहॉं सुधि पाई । आए भरतु सहित हित भाई ॥

पूछत अति सनेहँ सकुचाई । तात कहॉं तें पाती आई ॥

भरत आपल्या मित्रांसोबत व बंधू शत्रूघ्नसोबत जेथे खेळत होते, तेथे वर्तमान समजताच ( राजा दशरथांजवळ ) येऊन पोहोचले. फार प्रेमाने संकोच वाटून त्यांनी विचारले, बाबा, पत्र कुठून आले आहे ? ॥ ४ ॥

दोहा—कुसल प्रानप्रिय बंधु दोउ अहहिं कहहु केहिं देस ।

सुनि सनेह साने बचन बाची बहुरि नरेस ॥ २९० ॥

आमचे प्राणप्रिय दोन्ही भाऊ खुशाल आहेत ना ? ते कोणत्या देशात आहेत ? ‘ ते स्नेहपूर्ण वचन ऐकून राजांनी पुन्हा पत्र वाचले. ॥ २९० ॥

सुनि पाती पुलके दोउ भ्राता । अधिक सनेहु समात न गाता ॥

प्रीति पुनीत भरत कै देखी । सकल सभॉं सुखु लहेउ बिसेषी ॥

पत्रातील मजकूर ऐकून दोघे भाऊ रोमांचित झाले. प्रेम इतके दाटून आले होते की, मनात मावत नव्हते. भरताचे पवित्र प्रेम पाहून संपूर्ण सभा सुखावून गेली. ॥ १ ॥

तब नृप दूत निकट बैठारे । मधुर मनोहर बचन उचारे ॥

भैआ कहहु कुसल दोउ बारे । तुम्ह नीकें निज नयन निहारे ॥

मग राजांनी दूतांना जवळ बसवून घेऊन मन मोहून टाकणार्‍या मधुर शब्दांत विचारले. बंधूंनो, दोघे मुलगे खुशाल आहेत ना ? तुम्ही त्यांना आपल्या डोळ्यांनी नीट पाहिले आहे ना ? ॥ २ ॥

स्यामल गौर धरें धनु भाथा । बय किसोर कौसिक मुनि साथा ॥

पहिचानहु तुम्ह कहहु सुभाऊ । प्रेम बिबस पुनि पुनि कह राऊ ॥

सवळ्या व गोर्‍या रंगाचे ते दोघे धनुष्य व भाते धारण करतात, किशोर वयाचे आहेत, विश्र्वामित्र मुनींच्या सोबत आहेत. तुम्ही त्यांना ओळखत आहात, तर त्यांचा स्वभाव सांगा बरे ! ‘ अशाप्रकारे प्रेमविवश होऊन महाराज दूतांना विचारु लागले. ॥ ३ ॥

जा दिन तें मुनि गए लवाई । तब तें आजु सॉंचि सुधि पाई ॥

कहहु बिदेह कवन बिधि जाने । सुनि प्रिय बचन दूत मुसुकाने ॥

‘ अरे बाबांनो, ज्या दिवसापासून मुनी त्यांना घेऊन गेले आहेत, तेव्हापासून आजच आम्हांला त्यांची वार्ता समजत आहे. जनक महाराजांनी त्यांना कसे ओळखले ? ‘ हे प्रेमाचे बोलणे ऐकून दूतांना हसू आले. ॥ ४ ॥

दोहा—सुनहु महीपति मुकुट मनि तुम्ह सम धन्य न कोउ ।

रामु लखनु जिन्ह के तनय बिस्व बिभूषन दोउ ॥ २९१ ॥

ते म्हणाले, ‘ हे राजांचे मुकुटमणी, ऐका. तुमच्यासारखा धन्य कोणी नाही. राम-लक्ष्मणांसारखे पुत्र तुम्हांला आहेत. कारण विश्वाला ललामभूत असे ( ते आहेत. ). ॥ २९१ ॥

पूछन जोगु न तनय तुम्हारे । पुरुषसिंघ तिहु पुर उजिआरे ॥

जिन्ह के जस प्रताप कें आगे । ससि मलीन रबि सीतल लागे ॥

आपल्या पुत्रांबद्दल विचारण्याची गरजच नाही. ते पुरुषसिंह तिन्ही लोकांना प्रकाशस्वरुप आहेत. त्यांच्या कीर्तीपुढे चंद्र मलिन आणि प्रतापापुढे चंद्र शीतल वाटतो. ॥ १ ॥

तिन्ह कहँ कहिअ नाथ किमि चीन्हे । देखिअ रबि कि दीप कर लीन्हे ॥

सीय स्वयंबर भूप अनेका । समिटे सुभट एक तें एका ॥

हे नाथ, तुम्ही विचारले की, त्यांना राजा जनकांनी कसे ओळखले. हातात दिवा घेऊन सूर्याला पाहावे लागते काय ? सीतेच्या स्वयंवरात अनेक राजे आणि एकापेक्षा एक मोठे योद्धे एकत्र जमले होते. ॥ २ ॥

संभु सरासनु काहुँ न टारा । हारे सकल बीर बरिआरा ॥

तीनि लोक महँ जे भटमानी । सभा कै सकति संभु धनु भानी ॥

परंतु भगवान शिवांचे धनुष्य कोणीही हलवू शकले नाही. सर्व बलवान हरले. तिन्ही लोकांत जे वीरतेची घमेंड बाळगणारे होते, त्या सर्वांची शक्ती शिव-धनुष्याने मोडीत काढली. ॥ ३ ॥

सकइ उठाइ सरासुर मेरु । सोउ हियँ हारि गयउ करि फेरु ॥

जेहिं कौतुक सिवसैलु उठावा । सोउ तेहि सभॉं पराभउ पावा ॥

सुमेरु पर्वत उचलू शकणारा ‘ बाणासुर ‘सुद्धा मनातून पराजित होऊन प्रदक्षिणा घालून निघून गेला. ज्याने मजेने कैलास पर्वत उचलला होता, तो रावणसुद्धा सभेमध्ये पराभूत झाला. ॥ ४ ॥

दोहा—तहॉं राम रघुबंसमनि सुनिअ महा महिपाल ।

भंजेउ चाप प्रयास बिनु जिमि गज पंकज नाल ॥ २९२ ॥

हे महाराज, ऐका. तेथे रघुवंशरत्न श्रीरामचंद्रांनी विनासायास शिव-धनुष्य असे मोडून टाकले की, ज्याप्रमाणे हत्ती कमळाचा देठ तोडून टाकतो. ॥ २९२ ॥

सुनि सरोष भृगुनायकु आए । बहुत भॉंति तिन्ह आँखि देखाए ॥

देखि राम बलु निज धनु दीन्हा । करि बहु बिनय गवनु बन कीन्हा ॥

धनुष्य मोडल्याचे ऐकताच परशुराम रागारागाने आले त्या दोघांवर ताव काढू लागले. शेवटी त्यांनी श्रीरामांचे सामर्थ्य लक्षात येताच आपले धनुष्य त्यांना दिले व अनेक प्रकारे त्यांना विनवून स्वतः वनात गमन केले. ॥ १ ॥

राजन रामु अतुलबल जैसें । तेज निधान लखनु पुनि तैसें ॥

कंपहिं भूप बिलोकत जाकें । जिमि गज हरि किसोर के ताकें ॥

हे राजन, ज्याप्रमाणे श्रीरामचंद्र अतुलनीय बलवान आहेत, तसेच तेजो निधान लक्ष्मणसुद्धा आहेत. ज्याप्रमाणे हत्ती एखाद्या सिंहाच्या छाव्याची नजर पडताच कापू लागतात, त्याप्रमाणे श्रीराम-लक्ष्मण यांनी पाहताच राजे लोक घाबरत होते. ॥ २ ॥

देव देखि तव बालक दोऊ । अब न आँखि तर आवत कोऊ ॥

दूत बचन रचना प्रिय लागी । प्रेम प्रताप बीर रस पागी ॥

हे देव, तुमचे दोन्ही मुलगे पाहिल्यावर आता नजरेत दुसरे कोणी भरतच नाहीत. ‘ प्रेम, प्रताप आणि वीर-रसाने ओथंबलेले दूतांचे वर्णन सर्वांना खूप आवडले. ॥ ३ ॥

सभा समेत राउ अनुरागे । दूतन्ह देन निछावरि लागे ॥

कहि अनीति ते मूदहिं काना । धरमु बिचारि सबहिं सुखु माना ॥

ते ऐकून संपूर्ण सभा व राजा दशरथ प्रेमामध्ये बुडून गेले 

आणि दूतांची प्रशंसा करु लागले. ते पाहून ‘ आमची 

प्रशंसा नीतिविरुद्ध आहे’ असे म्हणत दूत आपले कान 

बंद करु लागले. त्यांचे धर्मानुकूल आचरण पाहून सर्वांना 

आनंद वाटला. ॥ ४ ॥



Custom Search

Shri RamCharitManas Part 63 श्रीरामचरितमानस भाग ६३

 

Shri RamCharitManas Part 63 
Doha 284 to 287 
श्रीरामचरितमानस भाग ६३ 
दोहा २८४ ते २८७ 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

दोहा—जाना राम प्रभाउ तब पुलक प्रफुल्लित गात ।

जोरि पानि बोले बचन हृदयँ न प्रेमु अमात ॥ २८४ ॥

त्यांनी श्रीरामांचा प्रभाव जाणला. तेव्हा त्यांचे अंग आनंदाने रोमांचित झाले. ते हात जोडून म्हणाले. त्यांच्या हृदयांत प्रेम मावत नव्हते. ॥ २८४ ॥

जय रघुबंस बनज बन भानू । गहन दनुज कुल दहन कृसानू ॥

जय सुर बिप्र धेनु हितकारी । जय मद मोह कोह भ्रम हारी ॥

‘ हे रघुकुलरुपी कमलवनाच्या सूर्या, हे राक्षस कुलरुपी दाट जंगलाला जाळून टाकणार्‍या अग्ने, तुमचा विजय असो. हे देव, ब्राह्मण व गाई यांचे हित करणारे, तुमचा विजय असो. हे मद, क्रोध आणि भ्रम यांचे हरण करणारे, तुमचा विजय असो. ॥ १ ॥

बिनय सील करुना गुन सागर । जयति बचन रचना अति नागर ॥

सेवक सुखद सुभग सब अंगा । जय सरीर छबि कोटि अनंगा ॥

हे विनय, शील, कृपा इत्यादी गुणांचे समुद्र आणि बोलण्यात अत्यंत चतुर, तुमचा विजय असो. हे सेवकांना सुख देणारे, सर्वांगसुंदर व शरीरामध्ये कोट्यावधी कामदेवांचे लावण्य धारण करणारे, तुमचा विजय असो. ॥ २ ॥

करौं काह मुख एक प्रसंसा । जय महेस मन मानस हंसा ॥

अनुचित बहुत कहेउँ अग्याता । छमहु छमामंदिर दोउ भ्राता ॥

मी एका मुखाने तुमची प्रशंसा कशी करु ? हे महादेवांच्या मनरुपी मानस-सरोवरातील हंसा, तुमचा विजय असो. मी नकळत तुम्हांला पुष्कळ अनुचित बोललो. हे क्षमेचे मंदिर असलेल्या दोन्ही बंधूंनो, मला क्षमा करा.

कहि जय जय जय रघुकुलकेतू । भृगुपति गए बनहि तप हेतू ॥

अपभयँ कुटिल महीप डेराने । जहँ तहँ कायर गवँहिं पराने ॥

हे रघुकुळाचे प्रतापस्वरुप श्रीरामचंद्र, तुमचा विजय असो, जय असो, जय असो. ‘ असे म्हणून परशुराम तप करण्यासाठी वनात निघून गेले. परशुरामांनाही पराजित करणार्‍या श्रीरामांचा द्वेष केल्यामुळे दुष्ट राजे विनाकारण घाबरुन जाऊन हळूच इकडे-तिकडे पळून गेले. ॥ ४ ॥

दोहा—देवन्ह दीन्हीं दुंदुभीं प्रभु पर बरषहिं फूल ।

हरषे पुर नर नारि सब मिटी मोहमय सूल ॥ २८५ ॥

देवांनी नगारे वाजविले व प्रभूंच्यावर फुलांचा वर्षाव करु लागले. जनकपुरीचे सर्व स्त्री-पुरुष आनंदित झाले. त्यांचे अज्ञानामुळे उत्पन्न झालेले दुःख दूर झाले. ॥ २८५ ॥

अति गहगहे बाजने बाजे । सबहिं मनोहर मंगल साजे ॥

जूथ जूथ मिलि सुमुखि सुनयनीं । करहिं गान कल कोकिलबयनीं ॥

जोरजोराने वाद्ये वाजू लागली. सर्वांनी मंगल श्रृंगार केला. सुंदर वदनी, सुंदर नयनी आणि कोकिळेसारखा मधुर आवाज असणार्‍या स्त्रिया झुंडींनी जमून सुंदर गाणी गाऊ लागल्या. ॥ १ ॥

सुखु बिदेह कर बरनि न जाई । जन्मदरिद्र मनहुँ निधि पाई ॥

बिगत त्रास भइ सीय सुखारी । जनु बिधु उदयँ चकोरकुमारी ॥

जनक राजांचा आनंद अवर्णनीय होता. जणू जन्माने गरीब असलेल्याला धनाचा खजिना सापडला. सीतेचे भय विरु लागले. तिला इतका आनंद झाला, जसा चंद्रोदयामुळे चकोरीला होतो. ॥ २ ॥

जनक कीन्ह कौसिकहि प्रनामा । प्रभु प्रसाद धनु भंजेउ रामा ॥

मोहि कृतकृत्य कीन्ह दुहुँ भाईं । अब जो उचित सो कहिअ गोसाईं ॥

जनकराजांनी विश्र्वामित्रांना प्रणाम केला आणि म्हटले, ‘ प्रभूंच्या कृपेनेच श्रीरामचंद्रांनी धनुष्य मोडले. दोन्ही भावांनी मला कृतार्थ केले. हे स्वामी, आता योग्य असेल ते सांगा. ‘ ॥ ३ ॥

कह मुनि सुनु नरनाथ प्रबीना । रहा बिबाहु चाप आधीना ॥

टूटतहीं धनु भयउ बिबाहू । सुर नर नाग बिदित सब काहू ॥

मुनी म्हणाले, ‘ हे चतुर राजा, तसे पाहता विवाह हा धनुर्भंगावर अवलंबून होता. धनुष्य भंग पावताच विवाह झाला. देव, मनुष्य, नाग या सर्वांना हे माहीत आहे. ॥ ४ ॥

दोहा—तदपि जाइ तुम्ह करहु अब जथा बंस ब्यवहारु ।

बूझि बिप्र कुलबृद्ध गुर बेद बिदित आचारु ॥ २८६ ॥

तरीही तुम्ही जाऊन आपल्या कुलाचा जो आचार असेल, तो ब्राह्मणांना, कुलातील वयोवृद्धांना आणि गुरुंना विचारुन तसेच वेदात सांगितल्याप्रमाणे जसा असेल, तसा करा. ॥ २८६ ॥

दूत अवधपुर पठवहु जाई । आनहिं नृप दसरथहि बोलाई ॥

मुदित राउ कहि भलेहिं कृपाला । पठए दूत बोलि तेहि काला ॥

अयोध्येला दूत पाठवा. राजा दशरथांना बोलावून आणा. ‘ राजांनी प्रसन्न होऊन म्हटले, ‘ हे कृपाळू, फार छान.’ आणि त्याचवेळी दूतांना बोलावून अयोध्येला पाठविले. ॥ १ ॥

बहुरि महाजन सकल बोलाए । आइ सबन्हि सादर सिर नाए ॥

हाट बाट मंदिर सुरबासा । नगरु सँवारहु चारिहुँ पासा ॥

नंतर महाराजांनी सर्व श्रेष्ठींना बोलाविले. सर्वांनी येऊन राजाला आदराने अभिवादन केले. राजांनी सांगितले, बाजार, रस्ते, घरे, देवालये आणि नगर यांना चोहीकडून सजवा. ॥ २ ॥

हरषि चले निज निज गृह आए । पुनि परिचारक बोलि पठाए ॥

रचहु बिचित्र बितान बनाई । सिर धरि बचन चले सचु पाई ॥

श्रेष्ठी प्रसन्न होऊन आपापल्या घरी आले. त्यानंतर राजांनी नोकरांना बोलावून आज्ञा दिली की, सुंदर मंडप सजवून तयार करा. ‘ ते ऐकून सर्वांनी आज्ञा शिरसावंद्य मानून ते आनंदाने गेले. ॥ ३ ॥

पठए बोलि गुनी तिन्ह नाना । जे बितान बिधि कुसल सुजाना ॥

बिधिहि बंदि तिन्ह कीन्ह अरंभा । बिरचे कनक कदलि के खंभा ॥

त्यांनी अनेक कारागिरांना बोलाविले. ते सर्व मंडप बनविण्यांत वाकबदार होते. त्यांनी ब्रह्मदेवांना वंदन करुन काम सुरु केले आणि प्रथमतः सोन्याच्या केळींचे खांब तयार केले. ॥ ४ ॥

दोहा—हरित मनिन्ह के पत्र फल पदुमराग के फूल ।

रचना देखि बिचित्र अति मनु बिरंचि कर भूल ॥ २८७ ॥

हिरव्यागार पाचूंची पाने व फळे बनविली. माणकांची फुले बनविली. मंडपाची अत्यंत विलक्षण रचना पाहून ब्रह्मदेवांचे मनही भुलून गेले. ॥ २८७ ॥

बेनु हरित मनिमय सब कीन्हे । सरल सपरब परहिं नहिं चीन्हे ॥

कनक कलित अहिबेलि बनाई । लखि नहिं परइ सपरन सुहाई ॥

हिरव्या पाचूंपासून सरळ व गाठीचे वेळू असे बनविले की, ते खरे की पाचूचे हे ओळखून येत नव्हते. सोन्याच्या सुंदर नागवेली बनविल्या. पानांसह त्या इतक्या छान दिसत होत्या की, ओळखता येत नव्हत्या. ॥ १ ॥

तेहि के रचि पचि बंध बनाए । बिच बिच मुकुता दाम सुहाए ॥

मानिक मरकत कुलिस पिरोजा । चीरि कोरि पचि रचे सरोजा ॥

त्याच नागवेलींपासून कलाकुसर करुन बांधण्यासाठी दोर्‍या केल्या. मधून –मधून मोत्यांच्या सुंदर झालरी लावल्या. माणके, पाचू, हिरे आणि नीलमणी ही रत्ने कापून, कोरुन आणि कलाकुसर करुन त्यांपासून लाल, हिरवी, शुभ्र आणि निळ्या रंगांची कमळे बनविली गेली. ॥ २ ॥

किए भृंग बहुरंग बिहंगा । गुंजहिं कूजहिं पवन प्रसंगा ॥

सुर प्रतिमा खंभन गढ़ि काढ़ीं । मंगल द्रब्य लिएँ सब ठाढ़ीं ॥

भुंगे आणि अनेक रंगांचे पक्षी बनविले. ते हवेमुळे आपोआप गुंजारव व कूजन करीत होते. खांबांवर देवांच्या मूर्ती कोरल्या होत्या. त्या सर्व मूर्ती मंगल द्रव्ये घेऊन उभ्या होत्या. ॥ ३ ॥

चौकें भॉंति अनेक पुराईं । सिंधुर मनिमय सहज सुहाईं ॥

गजमुक्तांपासून सहज अशा अनेक प्रकारच्या रांगोळ्या 

काढल्या होत्या. ॥ ४ ॥



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 9 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ९

 

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 9 
Ovya 201 to 225 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ९ 
ओव्या २०१ ते २२५

तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें ।

संशयीं तो नोळखे । हिताहित ॥ २०१ ॥

२०१) त्याप्रमाणें खरें आणि खोटें, प्रतिकूल आणि अनुकूल, हित व अहित हीं संशयग्रस्त मनुष्याला ओळखतां येत नाहींत.

हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाऊबा नाहीं ।

तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ॥ २०२ ॥

२०२) पाहा, ही रात्र आणि हा दिवस असें जन्मांधाला ज्याप्रमाणें ठाऊक नसतें, त्याप्रमाणें जोंपर्यंत ( मनुष्य ) संशयग्रस्त आहे, तोपर्यंत त्याच्या मनाला काही पटत नाहीं.

म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।

हा विनाशाची वागुर । प्राणियासी ॥ २०३ ॥

२०२) म्हणून संशयापेक्षां मोठें असे दुसरे थोर पातक कोणतेंच नाहीं. हा संशय प्राण्याला विनाशाचें एक जाळेंच आहे.

येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाची एकु जिणावा ।

जो ज्ञानाचिया अभावा--। माजी असे ॥ २०४ ॥

२०४) एवढ्याकरितां तूं याचा त्याग करावा; जेथें ज्ञानाचा अभाव असतो, तेथेंच जो असतो, त्या ह्या एकट्याला पहिल्यानें जिंकावें.

जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे ।

म्हणोनि सर्वथा मागु मोडे । विश्र्वासाचा ॥ २०५ ॥

२०५) जेव्हां अज्ञानाचा गाढ अंधार पडतो, तेव्हां हा मनांत फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो.

हृदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिंवसूनि ठाये ।

तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥ २०६ ॥

२०६) हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असें नाहीं; तर बुद्धीलाहि व्यापून टाकतो. त्या वेळीं तिन्ही लोक संशयरुप होऊन जातात. 

ऐसा जरी थोरावे । तरी उपायें एकें आंगवे ।

जरी हातीं होय बरवें । ज्ञानखङ्ग ॥ २०७ ॥

२०७) एवढा जरी तो वाढला, तरी एका उपायानें तो जिंकता येतो. चांगलें ज्ञानरुप खङ्ग जर हातीं असेल, 

तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे ।

मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥ २०८ ॥

२०८) तर त्या ज्ञानरुपी तीक्ष्ण शस्त्रानें हा संपूर्ण नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ निःशेष नाहींसा होतो. 

याकारणें पार्था । उठी वेगीं वरौता ।

नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥ २०९ ॥

२०९) एवढ्याकरितां अर्जुना, अंतःकरणांत असलेल्या सर्व संशयांचा नाश करुन लौकर ऊठ पाहूं.

ऐसें सर्वज्ञानाचा बापु । जो कृष्ण ज्ञानदीपु ।

तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ॥ २१० ॥ 

२१०) ( संजय म्हणाला, ) राजा धृतराष्ट्रा, ऐक. सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच, असा जो श्रीकृष्ण तो मोठ्या कृपाळूपणानें ( याप्रमाणें ) अरजुनास म्हणाला.

तंव या पूर्वापर बोलाचा । विचारुनि कुमरु पंडूचा ।

कैसा प्रश्नु हन अवसरींचा । करिता होईल ॥ २११ ॥

२११) पुढें या मागच्यापुढच्या बोलण्याचा विचार करुन अर्जुन कसा समयोचित प्रश्न विचारील.

ते कथेची संगति । भावाची संपत्ति ।

रसाची उन्नति । म्हणिपेल पुढां ॥ २१२ ॥

२१२) ती संगतवार कथा, ती अर्थाची खाण, तो रसांचा उत्कर्ष, पुढें सांगण्यात येईल. 

जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची ओवाळणी ।

सज्जनाचिये आयणी । विसांवा जगीं ॥ २१३ ॥

२१३) ज्याच्या चांगलेंपणावरुन बाकीचे आठहि रस ओवाळून टाकले, जो या जगांत सज्जनांच्या बुद्धीचें विश्रांतिस्थान आहे;

तो शांतुचि अभिनवेल । ते परियसा मर्‍हाठे बोल ।

जे समुद्राहूनि खोल । अर्थभरित ॥ २१४ ॥

२१४) तो शांतरसच ज्यांत अपूर्वतेनें प्रकटेल, जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षां गंभीर आहेत, ते मराठी बोल ऐका.   

जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें ।

शब्दाची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ॥ २१५ ॥

२१५) सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसतें, तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरें पडतें; त्याचप्रमाणें या शब्दांची व्याप्ति आहे, असे अनुभवास येईल.

ना तरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा ।

बोलु व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावें ॥ २१६ ॥

२१६) अथवा इच्छा करणार्‍याच्या संकल्पाप्रमाणें कल्पवृक्ष फळ देतो, त्याप्रमाणें हे बोल व्यापक आहेत, म्हणून नीट लक्ष द्यावें.  

हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणती स्वभावें ।

तरी निकें चित्त द्यावें । हें विनंति माझी ॥ २१७ ॥

२१७) पण हें राहूं द्या. जास्त काय सांगावें ? जे सर्वज्ञ आहेत, त्यांना आपोआप समजतेंच आहे. तरी नीट लक्ष द्यावें, हीच माझी विनंति आहे.  

जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती ।

जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ॥ २१८ ॥

२१८) ज्याप्रमाणें ( एखादी स्त्री ) रुप, गुण आणि कुल यांनीं युक्त आणि पतिव्रता असावी, त्याप्रमाणें या बोलण्याच्या पद्धतीत शांतरसाला अलंकाराची जोड दिलेली दिसेल.  

आधींचि साखर आवडे । आणि तेचि जरी ओखदीं जोडे ।

तरी सेवावी ना कां कोडें । नावानावा ॥ २१९ ॥

२१९) आधींच साखर प्रिय, आणि त्यांत तीच जर औषध म्हणून मिळाली, तर मग आनंदानें तिचें वारंवार सेवन का न करावें ?

सहजें मलयानिलु मंद सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु ।

आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥ २२० ॥

२२०) मलय पर्वतावरील वारा स्वभावतःच मंद सुगंधी असतो, त्यांतच जर त्याला अमृताची गोडी प्राप्त होईल आणि दैवयोगानें त्याच्या ठिकाणींच सुस्वर उत्पन्न होईल;

तरी स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी ।

तेवींचि कानाकरवीं । म्हणवी बापु माझा ॥ २२१ ॥

२२१) तर तो आपल्या स्पर्शाने सर्व शरीर शांत करील, 

आपल्या गोडीने जीभेला नाचविल,त्याप्रमाणे कानांकडून 

वाहवा म्हणविल.

तैसें कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासि होय पारणें ।

आणि संसारदुःख मूळवणें । विकृतीविणें ॥ २२२ ॥

२२२) तसेच या कथेच्या श्रवणाने होणार आहे. एकतर कानाचें पारणें फिटेल आणि दुसरें अनायासें संसारदुःखाचें समूळ उच्चाटन होईल. 

जरी मंत्रेचि वैरी मरे । तरी वायांचि कां बांधावीं कटारें ।

रोग जाय दुधें साखरे । तरी निंब कां पियावा ॥ २२३ ॥

२२३) जर मंत्रप्रयोगानेच शत्रूस ठार करतां येईल, तर कमरेस कट्यार व्यर्थ कां बांधून ठेवावी ? जर दुधाने व साखरेनेंच रोग नाहींसा होईल तर कडूनिंबाचा रस पिण्याचे काय कारण ? 

तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दुःख न देतां ।

एथ मोक्षु असे आयता । श्रवणादिमाजी ॥ २२४ ॥

२२४) त्याप्रमाणे मनाला न मारतां, इंद्रियांना दुःख न देतां, येथें ( नुसत्या ) ऐकण्यानेंच घरबसल्या मोक्ष मिळणार आहे.  

म्हणोनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका ।

ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तिदासु ॥ २२५ ॥

२२५) म्हणून प्रसन्न मनानें हा गीतार्थ चांगला ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्र्वर म्हणतात. 

इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ श्र्लोक ४२; ओव्या २२५ )

॥ ॐश्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥   



Custom Search