Monday, November 2, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 4 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ४

 

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 4 
Ovya 76 to 100 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ४ 
ओव्या ७६ ते १००

तैसा समस्तां यां भजनां । मी साक्षिभूतु पैं अर्जुना ।

एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ॥ ७६ ॥

७६) त्याप्रमाणें अर्जुना, या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहें. येथें ज्याच्या त्याच्या भावनेला अनुसरुन फलाची प्राप्ति होते. 

आतां याचिपरी जाण । चार्‍ही आहेती हे वर्ण ।

सृजिले म्यां गुण-। कर्मभागें ॥ ७७ ॥

७७) आतां याचप्रमाणें तूं असें लक्षांत घे कीं, ब्राह्मणादि जे चार वर्ण आहेत, ते मी गुण व कर्म यांच्या विभागांच्या अनुरोधानें उत्पन्न केले आहेत.

जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें ।

कर्में तदनुसारें । विवंचिली ॥ ७८ ॥

७८) कारण कीं, निरनिराळें स्वधर्म व गुण यांच्या धोरणानें ( त्या चारी वर्णांच्या ) कर्मांची मी योजना केलीआहे. 

एथ एकचि हे धनुष्यपाणी । परी जाहले गा चहूं वर्णीं ।

ऐसी गुणकर्मीं कडसणी । केली सहजें ॥ ७९ ॥

७९) अर्जुना, हे सर्व लोक वस्तुतः एकच खरे; परंतु चार वर्णांत त्यांची विभागणी झाली. याप्रमाणें ही निवड स्वभावतः गुणकर्मांमुळें केलेली आहे.   

म्हणोनि आईकें पार्था । हे वर्णभेदसंस्था ।

मी कर्ता नव्हे सर्वथा । याचिलागीं ॥ ८० ॥

८०) म्हणून अर्जुना, ऐक. ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा कर्ता मी मुळींच नाहीं.

हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाही केलें ।

ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ॥ ८१ ॥

८१) ही व्यवस्था माझ्यामुळेंच रुढ झाली आहे, परंतु ही मी केलेली नाहीं; अरें अर्जुना, हें ज्यानें तत्त्वतः ओळखलें, तो ( कर्मबंधनापासून ) मुक्त झाला. 

मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐशियाचि जाणोनि मातें ।

कर्में केलीं समस्तें । धनुर्धरा ॥ ८२ ॥

८२) अर्जुना, पूर्वीं जे मुमुक्षु होऊनि गेले, त्यांनीं मला असाच आहे, हें जाणून सर्व कर्मांचें आचरण केलें,

परि तें बीजें जैसीं दग्धलीं । नुगवतीचि पेरिलीं ।

तैशीं कर्मेंचि परि तयां जाहलीं । मोक्षहेतु ॥ ८३ ॥

८३) परंतु भाजलेलें बीं जरी पेरलें, तरी उगवत नाहीं; त्याप्रमाणें तीं कर्में खरीं; परंतु त्याना कर्मबंधांतून सोडविण्याला तींच कारण झालीं.

एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना ।

आपुलिये चाडे सज्ञाना । योग्य नव्हे ॥ ८४ ॥

८४) या बाबतींत अर्जुना, आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. हा कर्माकर्माचा विचार जाणत्या पुरुषालादेखील आपल्या बुद्धीनें करतां येईल, असा नाहीं.   

कर्म म्हणिजे तें कवण । अथवा अकर्मा काय लक्षण ।

ऐसें विचारितां विचक्षण । गुंफोनि ठेले ॥ ८५ ॥

८५) कर्म कशाला म्हणावें, अथवा अकर्माचें लक्षण काय याचा विचार करतां करतां चिकित्सकहि घोटाळ्यांत पडतात.

जैसें कां कुडें नाणें । खर्‍याचेनि सारखेपणें ।

डोळ्याचेंहि देखणें । संशयीं घाली ॥ ८६ ॥   

८६) ज्याप्रमाणें खोटें नाणें हुबेहूब खर्‍या सारखेंच दिसत असल्यामुळें परीक्षकांच्याहि नजरेला संशयांत घालतें; 

तैसें नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें । गिंवसिजत आहाती कर्में ।

जे दुजी सृष्टि मनोधर्में । करुं शकती ॥ ८७ ॥

८७) त्याप्रमाणें केवळ मनाच्या संकल्पानें प्रतिसृष्टि उत्पन्न करण्याचें सामर्थ्य अंगीं असलेले ( पुरुषदेखील ) आम्ही नैष्कर्म्य स्थितीस पोहोचलेलों आहों या भ्रमामुळें कर्माच्या पाशांत सापडतात. 

वांचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी ।

म्हणोनि आतां तेचि परियेसीं । सांगेन तुज ॥ ८८ ॥

८८) या बाबतींत चांगलेचांगले दूरदर्शीदेखील मूढ बनतात, तेथें बिचार्‍या मूर्खांची कथा काय ? म्हणून आतां तीच गोष्ट ( कर्माकर्मविवेक ) तुला सांगतों. ऐक.

तरी कर्म म्हणिजे स्वभावें । जेणे विश्र्वाकारु संभवे ।

तें सम्यक आधीं जाणावें । लागे एथ ॥ ८९ ॥

८९) तर ज्याच्या योगानें स्वभावतः ( आपोआप ) हें विश्व आकाराला येतें, त्याला कर्म म्हणतात; या ठिकाणीं त्याच कर्माचे यथार्थ ज्ञान पहिल्यानें करुन घेतलें पाहिजे. 

मग वर्णाश्रमासि उचित । जें विशेष कर्म विहित ।

तेंही वोळकावें निश्र्चित । उपयोगेंसीं ॥ ९० ॥

९०) मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून ( वेदांत ) सांगितलें आहे, त्याचीदेखील त्याच्या उपयुक्ततेसह चांगली ओळख करुन घेतली पाहिजे.

पाठीं जे निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरुपें ।

येतुलेनि येथ कांहीं न गुंफे । आपैसेंचि ॥ ९१ ॥

९१) त्यानंतर ज्याला निषिद्ध ( कर्म ) म्हणतात त्यांचेहि स्वरुप ओळखणें जरुर आहे. या ठिकाणीं एवढें झालें म्हणजे ( मनुष्य ) मग सहजच कर्म करीत असला तरी त्यांत गुंतला ( कर्मानें बद्ध होत ) नाहीं. 

एर्‍हवीं जग हे कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन ।

परि तें असो आइकें चिन्ह । प्राप्ताचें गा ॥ ९२ ॥

९२) एर्‍हवीं हें सर्व जग कर्माच्या अधीन आहे, असा याचा ( या कर्माचा ) विस्तार दुर्बोध आहे, पण अर्जुना, ते राहूं दे, आता कृतकृत्य पुरुषाचें लक्षण ऐक.   

जो सकळकर्मीं वर्ततां । देखे आपुली नैष्कर्म्यता ।

कर्मसंगें निराशता । फळाचिया ॥ ९३ ॥

९३) सर्व कर्मांचें आचरण करीत असतांहि आपण ( खरोखर ) कर्म करीत नाहीं, हें जो जाणतो व कर्माबरोबर ( कर्म करीत असतां ) त्यांच्या फलाची आशा जो धरीत नाहीं;

आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं ।

ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी । बोधला असे ॥ ९४ ॥

९४) आणि कर्तव्य करण्याला जगांत ( आपल्याखेरीज ) दुसरेपणानें कांहींच नाहीं अशा नैष्यकर्म्यतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो,

परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा ।

तरी तो इहीं चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ॥ ९५ ॥

९५) तरी जो कर्मसमुदायाचें उत्तम प्रकारें आचरण करतांना दिसतो, तोच या लक्षणांवरुन ज्ञानी आहे असें जाणावें.

जैसा कां जळापाशीं ठाके । तो जरी आपणपें जळामाजिं देखे ।

तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहें ॥ ९६ ॥

९६) ज्याप्रमाणें जो पाण्यापाशीं उभा राहिलेला असतो, जरी आपण तो पाण्यांत आहों, असें पाहात असतो, तरी त्याला निःसंशय खरें ज्ञान असतें कीं, आपण वेगळें आहों ( पाण्यांत नाहीं. ) 

अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जातां देखे वेगें ।

तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥ ९७ ॥

९७) अथवा जो नावेंत बसून जातो, त्याला किनार्‍यावरचीं झाडें भरभर चाललीं आहेत असें दिसतें; पण वस्तुस्थिति जेव्हां तो पाहूं लागतो, तेव्हा ती झाडे स्थिर आहेत, असें तो म्हणतो. 

तैसें सर्व कर्मीं असणे । तें फुडें मानूनि वायाणें ।

मग आपणपें जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ॥ ९८ ॥

९८) त्याप्रमाणें, तो सर्व कर्माचें आचरण करीत असतो; पण तें कर्माचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे, असें मानून मग आपण कर्मरहित आहों, हें तो जाणतो.   

आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें । जैसें न चलतां सूर्याचें चालणें ।

तैसें नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मीचि असतां ॥ ९९ ॥

९९) आणि सूर्य उदय व अस्त पावतो, या एका प्रमाणावरुन तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाहीं; त्याप्रमाणें तो कर्माचरण करीत असतांहि आपलें नैष्कर्म्य जाणतो. 

तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे ।

जैसें जळीं जळामाजीं न बुडे । भानुबिंब ॥ १०० ॥

१००) ज्याप्रमाणें पाण्यांत सूर्याचें प्रतिबिंब पडलेले दिसतें, 

पण त्यावरुन प्रत्यक्ष बिंब त्यांत बुडालें असें होत नाहीं, 

त्याप्रमाणें तो दिसण्यांत सामान्य मानसासारखा दिसतो,

 पण त्याच्या ठिकाणीं मनुष्यत्व ( मनुष्याचे सामान्य गुण ) 

नसतें,



Custom Search

No comments: