Wednesday, November 18, 2020

ShriRamcharitmans Part 62 श्रीरामचरितमानस भाग ६२

 

ShriRamcharitmans Part 62 
Doha 280 to 283 
श्रीरामचरितमानस भाग ६२ 
दोहा २८० ते २८३ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—परसुरामु तब राम प्रति बोले उर अति क्रोधु ।

संभु सरासनु तोरि सठ करसि हमार प्रबोधु ॥ २८० ॥

मग परशुराम अत्यंत क्रोधाने श्रीरामांना म्हणाले,’ अरे धूर्ता ! शिवांचे धनुष्य मोडून तू उलट मलाच ज्ञान पाजतोस ? ॥ २८० ॥

बंधु कहइ कटु संमत तोरें । तू छल बिनय करसि कर जोरें ॥

करु परितोषु मोर संग्रामा । नाहिं त छाड़ कहाउब रामा ॥

तुझा हा भाऊ तुझ्याच संमतीने कटू वचन बोलतोय आणि कपटाने हात जोडून विनवणी करतो आहेस. एक तर युद्ध करुन माझे समाधान कर; नाही तर स्वतःला ‘ राम ‘ म्हणवून घेणे सोडून दे. ॥ १ ॥

छलु तजि करहि समरु सिवद्रोही । बंधु सहित न त मारउँ तोही ॥

भृगुपति बकहिं कुठार उठाएँ । मन मुसुकाहिं रामु सिर नाएँ ॥

अरे शिवद्रोह्या ! कपट सोडून माझ्याशी युद्ध कर, नाही तर भावासह तुलाही मारुन टाकतो.’ अशाप्रकारे परशुराम परशू उभारुन बडबड करीत होते आणि श्रीराम मान खाली घालून मनात हसत होते. ॥ २ ॥

गुनह लखन कर हम पर रोषू । कतहुँ सुधाइहु ते बड़ दोषू ॥   

टेढ़ जानि सब बंदइ काहू । बक्र चंद्रमहि ग्रसइ न राहू ॥

श्रीराम मनातल्या मनात म्हणत होते, अपराध लक्ष्मणाचा आणि राग माझ्यावर काढत आहेत. कधी कधी सरळपणामध्येही मोठा दोष असतो. वाकडा असणार्‍या कुणालाही सर्वजण नमस्कार करतात. वाकड्या चंद्राला राहूसुद्धा ग्रासत नाही. ॥ ३ ॥

राम कहेउ रिस तजिअ मुनीसा । कर कुठारु आगें यह सीसा ॥ 

जेहिं रिस जाइ करिअ सोइ स्वामी । मोहि जानिअ आपन अनुगामी ॥

श्रीरामांनी उघडपणे म्हटले, ‘ हे मुनीश्र्वर ! राग सोडून द्या. तुमच्या हाती कुर्‍हाड आहे आणि माझे शिर समोर आहे. हे स्वामी, ज्यामुळे तुमचा राग शांत होईल, ते करा. मला आपला दास समजा. ॥ ४ ॥

दोहा—प्रभुहि सेवकहि समरु कस तजहु बिप्रबर रोसु ।

बेषु बिलोकें कहेसि कछु बालकहु नहिं दोसु ॥ २८१ ॥

स्वामी आणि सेवक यांच्यांत युद्ध कसले ? राग सोडा. तुमचा वीरवेष पाहूनच हा मुलगा काही बोलला. खरे तर यात त्याचाही काही दोष नाही. ॥ २८१ ॥

देखि कुठार बान धनु धारी । भै लरिकहि रिस बीरु बिचारी ॥

नामु जान पै तुम्हहि न चीन्हा । बंस सुभायँ उतरु तेहिं दीन्हा ॥

आपल्याकडे कुर्‍हाड व धनुष्यबाण पाहून आपण वीर आहात, असे बाळ लक्ष्मणाला वाटले. त्यामुळे त्याला राग आला. तुमचे नाव त्याने ऐकले होते, पण तुम्हांला त्याने ओळखले नाही. त्यामुळे आपल्या रघुवंशाच्या स्वभावाप्रमाणे त्याने उत्तर दिले. ॥ १ ॥

जौं तुम्ह औतेहु मुनि की नाईं । पद रज सिर सिसु धरत गोसाईं ॥

छमहु चूक अनजानत केरी । चहिअ बिप्र उर कृपा घनेरी ॥

जर तुम्ही मुनीसारखे आला असता, तर या मुलाने तुमच्या चरणांची धूळ शिरोधार्य केली असती. नकळत झालेल्या चुकीबद्दल क्षमा करा. ब्राह्मणांच्या मनांत मुख्यतः दया असायला हवी. ॥ २ ॥

हमहि तुम्हहि सरिबरि कसि नाथा । कहहु न कहॉं चरन कहँ माथा ॥

राम मात्र लघु नाम हमारा । परसु सहित बड़ नाम तोहारा ॥

हे नाथा, आमची-तुमची बरोबरी कसली ? कुठे चरण व कुठे मस्तक, सांगा ना ? कुठे माझे फक्त ‘ राम ‘ असे छोटेसे  नाव आणि कुठे तुमचे परशूसह मोठे नाव. ॥ ३ ॥

देव एकु गुनु धनुष हमारें । नव गुन परम पुनीत तुम्हारें ॥

सब प्रकार हम तुम्ह सन हारे । छमहु बिप्र अपराध हमारे ॥

हे देव, आमच्याजवळ एकच गुणयुक्त ( दोरी असलेले ) धनुष्य आहे, आणि तुमचे तर परम पवित्र शम, दम, तप, शौच, क्षमा, सरलता , ज्ञान, विज्ञान आणि आस्तिकता हे नऊ गुण, आम्ही सर्व प्रकारेतुमच्यासमोर पराजित आहोत. हे विप्र, आमच्या अपराधांना क्षमा करा. ॥ ४ ॥

दोहा—बार बार मुनि बिप्रबर कहा राम सन राम ।

बोले भृगुपति सरुष हसि तहूँ बंधु सम बाम ॥ २८२ ॥

श्रीरामांनी परशुरामांना वारंवार ‘ मुनि ‘ व ‘ विप्रवर ‘ असे म्हटले. तेव्हा भृगुपती परशुराम रागावून म्हणाले, ‘ तू सुद्धा आपल्या भावासारखा वाकडाच आहेस. ॥ २८२ ॥

निपटहिं द्विज करि जानहि मोही । मैं जस बिप्र सुनावउँ तोही ॥

चाप स्त्रुवा सर आहुति जानू । कोपु मोर अति घोर कृसानू ॥ 

तू मला निव्वळ ब्राह्मणच समजतोस ? मी कसा ब्राह्मण आहे, ते सांगतो. माझे धनुष्यही स्त्रुवा, बाण ही आहुती आणि माझा क्रोध हा अत्यंत भयानक अग्नी आहे. असे समज. ॥ १ ॥

समिधि सेन चतुरंग सुहाई । महा महीप भए पसु आई ॥

मैं एहिं परसु काटि बलि दीन्हे । समर जग्य जप कोटिन्ह कीन्हे ॥

चतुरंगिणी सेना या समिधा आहेत. मोठमोठे राजे यज्ञातील पशू आहेत. परशूने कापून मी त्यांचा बळी दिला आहे. असे कोट्यावधी जपयुक्त रणयज्ञ मी केलेले आहेत. ( अर्थात ज्याप्रमाणे मंत्रोच्चारपूर्वक ‘ स्वाहा ‘ म्हणून आहुती दिली जाते, त्याप्रमाणे मी आवाहन करीत राजांचा बळी दिलेला आहे. ) ॥ २ ॥

मोर प्रभाउ बिदित नहिं तोरें । बोलसि निदरि बिप्र के भोरें ॥

भंजेउ चापु दापु बड़ बाढ़ा । अहमिति मनहुँ जीति जगु ठाढ़ा ॥

माझा प्रभाव तुला माहीत नाही. त्यामुळे तू ब्राह्मण म्हणून माझा अनादर करीत आहेस. धनुष्य मोडलेस, त्यामुळे तुला मोठी घमेंड आली आहे. जणू जग जिंकून उभा ठाकल्याप्रमाणे तुझा अहंकार वाढलेला आहे.  ॥ ३ ॥

राम कहा मुनि कहहु बिचारी । रिस अति बड़ि लघु चूक हमारी ॥

छुअतहिं टूट पिनाक पुराना । मैं केहि हेतु करौं अभिमाना ॥

श्रीरामचंद्र म्हणाले, ‘ हे मुनी, विचार करुन बोला. तुमचा क्रोध फार मोठा आहे आणि माझी चूक फार छोटी आहे. धनुष्य जीर्ण होते, हात लावताच ते मोडले. त्यात मी कशाला अभिमान धरु ? ॥ ४ ॥

जौं हम निदरहिं बिप्र बदि सत्य सुनहु भृगुनाथ ।

तौ अस को जग सुभटु जेहि भय बस नावहिं माथ ॥ २८३ ॥

हे भृगुनाथ, जर आम्ही ब्राह्मण म्हणून ( तुमचा ) अपमान करीत असू, तर सत्य ऐका. जगात असा कोणता योद्धा आहे, ज्याच्या भयाने आम्ही त्याच्यापुढे मस्तक नमवावे ? ॥ २८३ ॥

देव दनुज भूपति भट नाना । समबल अधिक होउ बलवाना ॥

जौं रन हमहि पचारै कोऊ । लरहिं सुखेन कालु किन होऊ ॥

देव, दैत्य, राजा किंवा पुष्कळसे योद्धे हे बळाने आमच्या बरोबरीचे असोत किंवा आमच्यापेक्षा जास्त बलवान असोत, जर कुणीही आम्हांला युद्धासाठी ललकारले, तर आम्ही आनंदाने त्याच्याशी लढू. मग तो काळ का असेना ? ॥ १ ॥

छत्रिय तनु धरि समर सकाना । कुल कलंकु तेहिं पावँर आना ॥

कहउँ सुभाउ न कुलहि प्रसंसी । कालहु डरहिं न रन रघुबंसी ॥

क्षत्रियशरीर धारण करुन युद्धाला जो घाबरला, त्या नीच पुरुषाने आपल्या कुळाला कलंक लावला. मी हे स्वाभाविकपणे म्हणतो, कुळाची प्रशंसा म्हणून नव्हे, रघुवंशी युद्धामध्ये मृत्यूलाही घाबरत नाहीत. ॥ २ ॥

बिप्रबंस कै असि प्रभुताई । अभय होइ जो तुम्हहि डेराई ॥

सुनि मृदु गूढ़ बचन रघुपति के । उघरे पटल परसुधर मति के ॥

ब्राह्मणवंशाचा असा महिमा आहे की, जो तुम्हांला घाबरतो, तो निर्भय होतो.’ श्रीरघुनाथांचे कोमल व गूढ वचन ऐकून परशुरामांच्या बुद्धीवरील अज्ञानाचा पडदा दूर झाला. ॥ ३ ॥

राम रमापति कर धनु लेहू । खैंचहु मिटै मोर संदेहू ॥

देत चापु आपुहिं चलि गयऊ । परसुराम मन बिसमय भयऊ ॥

परशुराम म्हणाले, ‘ हे राम, हे लक्ष्मीपतीचे धनुष्य हाती 

धरा आणि ओढा, म्हणजे माझा संशय दूर होईल.’ 

परशुराम जेव्हा धनुष्य देऊ लागले, तेव्हा ते आपोआप 

श्रीरामांच्या हाती गेले. परशुरामांना मनातून आश्र्चर्य 

वाटले. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: