Saturday, February 3, 2018

Samas Pahila Vimal Lakshan समास पहिला विमळ लक्षण


Dashak Barava Samas Pahila Vimal Lakshan 
Samas Pahila Vimal Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about prapancha and Parmartha. For any person Prancha and Parmarth both are important and essential.
समास पहिला विमळ लक्षण
श्रीराम ।
आधीं प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।
येथें आळस करुं नका । विवेकी हो ॥ १ ॥
१) विवेकी माणसानों आधीं प्रपंच व्यवस्थित करावा. नंतर विवेकाला परमार्थाकडे वळवावे. असें करण्यांत आळस नको. 
प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल ।
प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ २ ॥
२) प्रपंच सोडून परमार्थ कराल तर तुम्ही दुःखी, कष्टी व्हाल. प्रपंच व परमार्थ दोन्ही बरोबर कराल तरच तुम्ही विवेकी म्हणून ओळखले जाल.   
प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला ।
मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥ ३ ॥
३) प्रपंच टाकून परमार्थ केला तर पोटाला खायला कांहीं मिळणार नाहीं. मग अशा दुर्दैवी मानसाला परमार्थ साधणार नाही.
परमार्थ सांडून प्रपंच । तरी तूं येमयातना भोगिसी ।
अंतीं परम कष्टी होसी । येमयातना भोगितां ॥ ४ ॥
४) तसेंच परमार्थ टाकून नुसता प्रपंच केला तर जीवाला यमयातना भोगाव्या लागतात. व यमयातना भोगतांना जीवाला फार दुःख भोगावे लागते. 
साहेबकामास नाहीं गेला । गृहींच सुरवाडोन बैसला ।
तरी साहेब कुटील तयाला । पाहाती लोक ॥ ५ ॥
५) समजा एखादा नोकर मालकाकडे कामाला न जातां घरींच बसला तर मालक त्याला ठोकून काढेल व लोक तमाशा बघतील.  
तेव्हां महत्वचि गेलें । दुर्जनाचें हासें जालें ।
दुःख उदंड भोगिलें । आपुल्या जीवें ॥ ६ ॥
६) असें झालें तर लोकांत आपली अब्रू जाते. दुर्जन आपल्याला हसतात. त्यामुळें आपल्या जीवाला फार दुःख होते.  
तैसेंचि होणार अंतीं । म्हणौन भजावें भगवंतीं ।
परमार्थाची प्रचिती । रोकडी घ्यावी ॥ ७ ॥ 
७) परमार्थ सोडून नुसता प्रपंच करणारांची अवस्था अशीच होते. म्हणून भगवंताची भक्ति करावी व याच आयुष्यांत त्याचा अनुभव घ्यावा.  
संसारीं असतां मुक्त । तोचि जाणावा संयुक्त ।
अखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे ॥ ८ ॥
८) संसारामध्यें राहून जो मुक्तदशा अनुभवतो तोच खरा योगी समजावा. या जीवनांत आपल्याला योग्य काय व अयोग्य काय याचा सारासार विचार त्याच्या अंतरंगीं सतत जागृत असतो.     
प्रपंचीं जो सावधान । तो परमार्थ करील जाण ।
प्रपंचीं जो अप्रमाण । तो परमार्थीं खोटा ॥ ९ ॥  
९) जो माणूस प्रपंच सावधानतेनें करतो, तोच तेवढ्याच सावधानतेनें परमार्थही करुं शकतो. प्रपंचांत जो धड नसतो, त्याला परमार्थही धड साधत नाही.  
म्हणौन सावधानपणें । प्रपंच परमार्थ चालवणें ।
ऐसें न करितां भोगणें । नाना दुःखें ॥ १० ॥
१०) म्हणून माणसानें प्रपंच व परमार्थ मोठ्या सावधनतेने चालवावे. असें केलें नाहीं तर निरनिराळीं दुःखें भोगावी लागतात. 
पर्णाळि पाहोन उचले । जीवसृष्टि विवेकें चाले ।
आणि पुरुष होऊन भ्रमले । यासी काय म्हणावें ॥ ११ ॥
११) झाडाच्या पानावर बसलेला किडा पाय उचलतांना आधीं पुढें आधार आहे असें पाहूनच पाय उचलतो. आणि पुढें सरकतो. जगांतील सर्व प्राणी असेंच विचारपूर्वक वागतात. मात्र सर्व प्राण्यांत श्रेष्ठ असणारा माणूसच अविचारानें वागतो. याला काय म्हणावे ? 
म्हणौन असावी दीर्घ सूचना । अखंड करावी चाळणा ।
पुढील होणार अनुमाना । आणून सोडावें ॥ १२ ॥ 
१२) म्हणून माणसाच्या अंगी विवेकानें विकसीत झालेली दृष्टी असावी. भोवतालच्या परिस्थितीचा सतत विचार करावा. आणि पुढें काय घडणार आहे याचा विवेकानें विचार करावा. 
सुखी असतो खबर्दार । दुःखी होतो बेखबर ।
ऐसा हा लोकिक विचार । दिसतचि आहे ॥ १३ ॥
१३) परिस्थिती लक्षांत ठेवून त्याप्रमाणें जो वागतो, जगतो, तो सुखी होतो. जो बेसावधपणें वागतो, जगतो, तो दुःखी होतो.  लोकांच्या नेहमीच्या प्रापंचिक जीवनामध्यें याचा सतत अनुभव येतो.  
म्हणौन सर्वसावधान । धन्य तयाचें महिमान ।
जनीं राखो समाधान । तोचि येक ॥ १४ ॥
१४) म्हणून सर्वांगीण सावधतेनें जो जीवनांत वागतो व जगतो, तोच खरा महान होय. असा मनुष्य स्वतःचे व लोकांचे समाधान टिकवून ठेवतो.     
चाळणेचा आळस केला । तरी अवचिता पडेल घाला ।
ते वेळे सावरायाला । अवकाश कैंचा ॥ १५ ॥
१५) परिस्थिती नीट समजून घेण्याची हयगय केली तर कोणतें संकट कधीं येईल हें कांहीं समजणारच नाही. मग त्यांतून सावरायला वेळही उरणार नाही.    
म्हणौन दीर्घसूचनेचे लोक । त्यांचा पाहावा विवेक ।
लोकांकरितां लोक । शाहाणे होती ॥ १६ ॥ 
१६) यासाठीं दूरदृष्ट ठेवणारे लोक कसा विचार करतात तें पाहावें. त्यांच्यकडून शहाणपण शिकून घ्यावें. लोकांकडूनच लोक शिकतात ही रीतच आहे. 
परी ते शाहाणे वोळखावे । गुणवंताचे गुण घ्यावे ।
अवगुण देखोन सांडावे । जनामधें ॥ १७ ॥
१७) पण असे दूरदृष्टीचे लोक शोधून काढावेत. गुणवंताकडून गुण घ्यावेंत व लोकांमध्यें आढळणारे दुर्गुण सोडून द्यावेत.   
मनुष्य पारखूं राहेना । आणि कोणाचें मन तोडीना ।
मनुष्यमात्र अनुमाना । आणून पाहे ॥ १८ ॥
१८) आपल्याशी संमंध येणार्‍या माणसांची बरोबर परीक्षा करावी. मात्र असें करतांना कोणाचे मन दुखवू नये. 
दिसे सकळांस सारिखा । पाहातां विवेकी नेटका ।
कामी निकामी लोकां । बरें पाहे ॥ १९ ॥
१९) असा माणूस वरवर पाहिले तर चारचौघांसारखाच साधा दिसतो. पण त्याच्या अंतर्यामीं विवेक जागा असतो. त्यामुळें काम कोण करेल व कोण करणार नाहीं हें तो बरोबर ओळखून असतो. 
जाणोन पाहिजेत सर्व । हेंचि तयाचें अपूर्व ।
ज्याचें त्यापरी गौरव । राखों जाणे ॥ २० ॥   
२०) प्रत्येकाची लायकी, योग्यता पाहून तो सर्वांना जवळ करतो, हाच त्याचा अलौकिक गुण होय. ज्या माणसाला जेवढें महत्व किंवा मोठेपण द्यायचे तेवढें त्यास देण्याचें ज्ञान त्याच्यापाशीं बरोबर असते.     
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विमळलक्षणनाम समास पहिला ॥
Samas Pahila Vimal Lakshan
समास पहिला विमळ लक्षण


Custom Search

No comments: