Saturday, February 10, 2018

Samas Pachava AatmaNivedan समास पांचवा आत्मनिवेदन


Dashak Barava Samas Pachava AatmaNivedan 
Samas Pachava AatmaNivedan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Aatma Nivedan. Aatma Nivedan is of three steps, Sadhak has to start from first step and slowly proceed further.
समास पांचवा आत्मनिवेदन
श्रीराम ।
रेखेचें गुंडाळें केलें । मात्रुकाक्षरीं शब्द जाले ।
शब्द मेळऊन चाले । श्र्लोक गद्य प्रबंद ॥ १ ॥
१) रेषा वाकड्यातिकड्या काढल्या म्हणजे अक्षरें तयार होतात. आक्षरांपासून शब्द तयार होतात. अनेक शब्द अनेक प्रकारे एकत्र आणलें कीं श्लोक, गद्य, व प्रबंध तयार होतात.    
वेदशास्त्रें पुराणें । नाना काव्यें निरुपणें ।
ग्रंथभेद अनुवादणें । किती म्हणोनि ॥ २ ॥
२) वेद, शास्त्रें, पुराणें, नाना प्रकारची काव्यें, निरुपणें असें ग्रंथांचे पुष्कळ प्रकार आहेत. तें सगळें सांगणें शक्य नाहीं.   
नाना ऋषी नाना मतें । पाहों जातां असंख्यातें ।
भाषा लिपी जेथ तेथें । काये उणें ॥ ३ ॥
३) अनेक ऋषींची अनेक मतें आहेत. त्यांची संख्या मोठी आहे. जिकडे तिकडे भाषा व लिपी उपलब्ध असल्यानें ग्रंथांना कांहीं तोटा नाहीं.   
वर्ग ऋचा श्रुति स्मृति । अधे स्वर्ग स्तबक जाती ।
प्रसंग मानें समान पोथी । बहुधा नामें ॥ ४ ॥
४) वर्ग, ऋचा, श्रुति, स्मृति, सर्ग, स्तबक ( चंपू काव्याचे प्रकार ), जाति, प्रसंग, माने, समास (पोथ्यांतील प्रकरणांची नांवें ) पोथी अशी ग्रंथभेदाची नावें आहेत.
नाना पदें नाना श्र्लोक । नाना वीर नाना कडक ।
नाना साख्या दोहडे अनेक । नामाभिधानें ॥ ५ ॥
५) नाना प्रकारची पदें, श्लोक, बीर, कडक, साख्या, दोहे (हिंदी काव्यांतील छंद ) असे काव्याचे प्रकार आहेत.     
डफगाणें माचिगाणें । दंडिगाणें कथागाणें ।
नाना मानें नाना जसनें । नाना खेळ ॥ ६ ॥
६) शिवाय डफ गाणें, माचि गाणें, दिंडी गाणें, कथा गाणें, अनेक माने, अनेक उपकथा, अनेक खेळ असे गाण्यांचे प्रकार आहेत.  
ध्वनि घोष नाद रेखा । चहुं वाचामध्यें देखा ।
वाचारुपेंहि ऐका । नाना भेद ॥ ७ ॥
७) ध्वनि, घोष, नाद आणि रेखा असे चार प्रकार वाणीमध्यें आढळतात. आतां आपल्या वाणीची रुपें व प्रकार ऐका. 
उन्मेष परा ध्वनि पश्यंति । नाद मध्यमा शब्द चौथी ।
वैखरीपासून उमटती । नाना शब्दरत्नें ॥ ८ ॥
८) केवळ वायुरुप जाणिवेचें स्फुरण ही परावाचा होय. ती केवळ स्फुर्तिरुप आहे. पश्यन्ति ही ध्वनिरुप आहे. मध्यमा नादरुप आहे. आणी चौथी वैखरी ही शब्दरुप आहे. वैखरीपासून अनेक प्रकारचे शब्द उत्पन्न होतात व बाहेर पडतात. 
अकार उकार मकार । अर्धमात्रांचें अंतर ।
औटमात्र तदनंतर । बावन मात्रुका ॥ ९ ॥   
९) अकार, उकार, मकार या तीन मात्रा आणि ओंकारावरील चंद्र व बिंदूही ही अर्धमात्रा मिळून साडेतीन मात्रा होतात. या ओंकारामधून सोळा स्वर व छत्तीस व्यंजनें मिळून एकंदर बावन्न अक्षरें निर्माण होतात.   
नाना भेद रागज्ञान । नृत्यभेद तानमान ।
अर्थभेद त्त्वज्ञान ।  विवंचना ॥ १० ॥
१०) अनेक प्रकारच्या रागरागिण्यांमधील असणार्‍या भेदांचे ज्ञान, अनेक प्रकारच्या नृत्यांमधील फरकांचें ज्ञान, अनेक ताल व ताना यांचे ज्ञान, शब्दांचें अनेक प्रकारचे अर्थ, निरनिराळ्या तत्वज्ञानाचा विचारविमर्श या सगळ्या गोष्टी शब्दांच्या मदतीनें चालतात. 
तत्वांमध्यें मुख्य तत्व । तें जाणावें शुद्धसत्व ।
अर्धमात्रा महत्तत्व । मूळमाया ॥ ११ ॥
११) शुद्धसत्त्व हें तत्त्वांमध्यें मुख्य तत्त्व आहे. त्यालाच अर्धमात्रा, महत् तत्त्व किंवा मूळमाया असें म्हणतात.
नाना तत्वें लाहानथोरें । मिळोन अष्टहि शरीरें । 
अष्टधा प्रकृतीचें वारें । निघोन जातें ॥ १२ ॥
१२) निरनिराळ्या प्रकारची लहानमोठीं तत्त्वें कमीअधिक प्रमाणांत मिसळून पिंडब्रह्मांडाचे आठही देह बनतात. पांच भूतें, आणि तीन गुण मिळून अष्टधा प्रकृति बनते. तिच्यामध्यें जाणीवरुप वायु असतो, तो चंचळ असल्यानें नाहींसा होतो. 
वारें नस्तां जें गगन । तैसें परब्रह्म सघन ।
अष्ट देहाचें निर्शन । करुन पाहावें ॥ १३ ॥
१३) वारा नसतांना जसें आकाश केवळपणानें राहते त्याचप्रमाणें आठ देहांचे निरसन झाल्यावर केवळ दाट परब्रह्म तेवढें उरतें त्याचा अनुभव घ्यावा. 
ब्रह्मांडपिंडभार । पिंडब्रह्मांडसंव्हार ।
दोहिवेगळें सारासार । विमळब्रह्म ॥ १४ ॥
१४) पिंडब्रह्मांडाची उभारणी कशी होते व संहारणी कशी होते याचा सूक्ष्म विचार करावा. उभारणी व संहारणी या दोन्हींहून वेगळें असें सर्वांचे सार असणारें परब्रह्म शुद्ध, निर्मळ ब्रह्म अनुभवास आणावें.   
पदार्थ जड आत्मा चंचळ । विमळब्रह्म तें निश्र्चळ ।
विवरोन विरे तत्काळ । तद्रूप होये ॥ १५ ॥
१५) दृश्य पदार्थ पंचभूतात्मकअसल्यानें जड असतात. त्यांच्या अंतर्यामी सत्तारुपानें असणारा अंतरात्मा चंचळ असतो. या दोन्हीच्या पलीकडें राहणारें विमल ब्रह्म मात्र निश्चळ असतें. या तीन पातळींचा वारंवार विवेक केला असतां जड व चंचळ त्वरित विरुन जातात आणि विचार करणारा निश्चळ परब्रह्माशी तत्काळ तद्रूप होतो. 
पदार्थ मनें काया वाचा । मी हा अवघाचि देवाचा ।
जड आत्मनिवेदनाचा । विचार ऐसा ॥ १६ ॥
१६) मी आणि माझें सगळें, म्हणजे पदार्थ, अथवा वस्तु, माझें मन, माझी काया व वाचा अर्थात् मी आणि माझा प्रपंच हा देवाच्या मालकीचा आहे. ही भावना ठेवून जगणें यास जड आत्मनिवेदन म्हणतात.  
चंचळकर्ता तो जगदीश । प्राणीमात्र त्याचा अंश ।
त्याचा तोचि आपणास । ठाव नाहीं ॥ १७ ॥
१७) या दृश्य विश्वाला चालविणरा अंतरात्मा चंचळ आहे. सर्व जीव त्याचे अंश आहेत. अंतरात्म्याची सत्ता सर्व ठिकाणीं चालते. त्यामुळें आपल्या मीपणाला जागाच नाहीं.  
चंचळ आत्मनिवेदन । याचें सांगितलें लक्षण ।
कर्ता देव तो आपण । कोठेंचि नाहीं ॥ १८ ॥
१८) म्हणून जें कांहीं घडतें त्याचा कर्ता अंतरात्मा आहे, देव कर्ता आहे, आपलें कर्तेपण मुळींच खरें नाहीं, अशी धारणा असणें हें चंचळ आत्मनिवेदन होय. 
चंचळ चळे स्वप्नाकार । निश्र्चळ देव तो निराकार ।
आत्मनिवेदनाचा प्रकार । जाणिजे ऐसा ॥ १९ ॥
१९) जें चंचळ आहे, तें स्वप्नवत आहे, नाशवंत आहे, पण निश्चळ परमात्मा तो तर निराकार आहे. त्याच्याशी तदाकार होणें हा निश्चळ आत्मनिवेदनाचा प्रकार होय. 
ठावचि नाहीं चंचळाचा । तेथें आधीं आपण कैंचा ।
निश्र्चळ आत्मनिवेदनाचा । विवेक ऐसा ॥ २० ॥  
२०) चंचळ मुळांतच जेथें मिथ्या आहे तेथें मीपणानें वावरणारा चंचळ जीव असणें शक्य नाहीं म्हणून मी, माझें नाहीं, चंचळ नाहीं, फक्त केवळ निश्चळ परब्रह्म आहे असा अनुभव घेणें हें निश्चळ आत्मनिवेदन समजावें.    
तिहिं प्रकारें आपण । नाहीं नाहीं दुजेपण ।
आपण नस्तां मीपण । नाहींच कोठीं ॥ २१ ॥ 
२१) आत्मनिवेदनाच्या या तिन्ही प्रकारांत आपल्या मीपणास स्थान नाहीं.आत्मस्वरुपाहून वेगळेपणास स्थान नाहीं. आपण वेगळेपणानें उरत नसल्यानें मीपणा कोठेंही आढळत नाहीं. मीपणाचा लोप करणें हेंच तिन्ही प्रकारच्या आत्मनिवेदनाचे मर्म आहे.  
पाहातां पाहातां अनुमानलें । कळतां कळतां कळों आलें ।
पाहातां अवघेंचि निवांत जालें । बोलणें आतां ॥ २२ ॥
२२) परब्रह्मस्वरुप शोधतां शोधतां प्रथम कल्पनेच्या कक्षेंत जरासें आलें त्यावर सूक्ष्म विवेक करतां करतां विचारानें त्याचे स्वरुप निश्चितपणें आकलन झालें. परंतु त्यानंतर साक्षात् अनुभव आला. तेव्हां मनाची धडपड निमाली. एकदम सगळें शांत झालें आणि बोलणें थंड पडलें.    
इति श्रीदासबोधें गुरुशिष्यसंवादे आत्मनिवेदननाम समास पांचवा ॥
Samas Pachava AatmaNivedan 
समास पांचवा आत्मनिवेदन


Custom Search

No comments: