Monday, February 5, 2018

Samas Dusara Pratyaya Nirupan समास दुसरा प्रत्यय निरुपण


Dashak Barava Samas Dusara Pratyaya Nirupan 
Samas Dusara Pratyaya Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us how to behave with others and how wise men should be careful in behaving with the people.
समास दुसरा प्रत्यय निरुपण
श्रीराम ॥ 
ऐका संसारासी आले हो । स्त्री पुरुष निस्पृह हो।
सुचितपणें पाहो । अर्थांतर ॥ १ ॥
१) संसार करणार्‍या स्त्री पुरुषांनो ! मी काय सांगतों तें निर्मळ मनानें व शांतपणें ऐका. माझ्या सांगण्याचा अर्थ नीट समजून घ्या.  
काये म्हणे वासना । काये कल्पिते कल्पना । 
अंतरींचे तरंग नाना । प्रकारें उठती ॥ २ ॥
२) आपली वासना कांहींतरी मागते, आपली कल्पना मनोराज्यें रचते. आपल्या मनामध्यें असें अनेक प्रकारचे तरंग उठतात. 
बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।
मनासारिखें असावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥
३) आपल्याला खायला प्यायला चांगलें मिळावें, आपल्याला नेसायला, पांघरायला चांगलें वस्त्र मिळावें सगळें कांहीं आपल्या मनासारखें मिळावें, असें आपल्याला वाटते.   
ऐसे आहे मनोगत । तरी ते कांहींच न होत ।
बरें करितां अकस्मात । वाईट होतें ॥ ४ ॥
४) आपलें मनोगत असें असले तरी त्याप्रमाणें कांहींच घडून येत नाहीं. उलट बरें करायला गेलें तर अनपेक्षितपणें भलतेंच घडून जातें. 
येक सुखी येक दुःखी । प्रत्यक्ष वर्ततें लोकी ।
कष्टी होऊनियां सेखीं । प्रारब्धावरी घालिती ॥ ५ ॥
५) एक सुखी असतो तर दुसरा दुःख भोगत असतो. ही गोष्ट प्रपंचांत दिसते. जे दुःखी होतात ते कष्ट भोगतात. आपल्या दुःखाचे कारण प्रारब्धावर टाकतात.
अचुक येत्न करवेना । म्हणौन केलें तें सजेना ।
आपला अवगुण जाणवेना । कांहीं केल्यां ॥ ६ ॥  
६) परंतु हे बरोबर नाहीं. माणूस योग्य प्रयत्न करत नाहीं. म्हणून तो जें करतो त्याचे चांगलें फळ त्याला मिळत नाहीं. दोष आपल्याकडे आहे आपला अवगुण आपल्या आड येतो ही गोष्ट कांहीं केल्या माणसाच्या लक्षांतच येत नाहीं. 
जो आपला आपण नेणे । तो दुसर्‍याचें काये जाणे ।
न्याये सांडितां दैन्यवाणे । होती लोक ॥ ७ ॥
७) आपण स्वतः कसें आहोंत हें ज्या माणसाला कळत नाहीं त्याला दुसरा कसा आहे हे कळणार नाहीं. योग्य मार्गानें जाणें सोडल्यानें माणसें दिनवाणी बनतात.    
लोकांचें मनोगत कळेना । लोकांसारिखें वर्तवेना ।
मूर्खपणें लोकीं नाना । कळह उठती ॥ ८ ॥
८) लोकांच्या मनांत काय आहे हे ज्यास कळत नाही. लोकांना जसें आवडते असा जो वागत नाही,  त्याच्या मूर्खपणामुळें त्याची लोकांशी भांडणें-तंटे होतात. 
मग ते कळो वाढती । परस्परें कष्टी होती ।
प्रेत्न राहातां अंतीं । श्रमचि होयें ॥ ९ ॥
९) हीं भांडणें वाढतच जातात व त्यामुळें तो व ते लोक दुःखीकष्टी होतात. यामुळें प्रपंचांत योग्य प्रयत्न घडत नाही व शेवटीं विनाकारण श्रम होतात. 
ऐसी नव्हे वर्तणुक । परीक्षावे नाना लोक ।
समजलें पाहिजे नेमक । ज्याचें त्यापरी ॥ १० ॥
१०) वागण्याचा हा प्रकार योग्य नव्हें. आपल्याशी ज्या लोकांचा संमध येतो त्या नाना प्रकारच्या लोकांची पारख करावी. कोण कसा आहे याची माहिती आपल्याला असणें बरें.  
शब्दपरीक्षा अंतरपरीक्षा । कांहीं येक कळे दक्षा ।
मनोगत नतद्रक्षा । काय कळे ॥ ११ ॥
११) चतुर व सावध माणसाला दुसर्‍याच्या बोलण्यावरुन व हेतूवरुन त्याची परीक्षा करता येते. बुद्धिहीन माणसाला दुसर्‍याच्या मनांतील हेतु कळत नाहीं.
दुसर्‍यास शब्द ठेवणें । आपला कैपक्ष घेणें ।
पाहों जातां लोकिक लक्षणें । बहुतेक ऐसीं ॥ १२ ॥
१२) दुसर्‍याला नांवे ठेवायची व आपलें ते खरें असें वागायचे असा सर्वसाधरण लोकांचा स्वभाव असतो.
लोकीं बरें म्हणायाकारणें । भल्यास लागतें सोसणें ।
न सोसितां भंडवाणें । सहजचि होयें ॥ १३ ॥
१३) ज्या चांगल्या लोकांना असें वाटतें कीं लोकांनी आपल्याला चांगलें म्हणावें त्यानें लोकांसाठी झीज सोसली पाहिजे. अशी झीज जो सोशीत नाहीं त्याची फजितीच होते. 
आपणास जें मानेना । तेथें कदापि राहवेना ।
उरी तोडून जावेना । कोणीयेकें ॥ १४ ॥
१४) जेथील लोकांचें वागणें आपल्याला पटत नाहीं, तेथें आपण कदापी राहूं नये. पण सर्वसाधारणपणें दुसर्‍याचे मन मोडून तेथून निघून जावेसे वाटत नाहीं. 
बोलतो खरें चालतो खरें । त्यास मानिती लहानथोरें ।
न्याये अन्याये परस्परें । सहजचि कळे ॥ १५ ॥
१५) ज्याचें बोलणं व वागणें खरें असतें, त्याला लहानथोरांतही मान मिळतो. बरोबर व योग्य काय आणि चूक व अयोग्य काय याचा निकाल मग आपोआप लागतो.  
लोकांस कळेना तववरी । विवेकें क्ष्मा जो न करी ।
तेणेंकरितां बराबरी । होत जाते ॥ १६ ॥
१६) आपण कोण आहोत व आपली लायकी काय आहे हे लोकांना जोपर्यंत कळत नाहीं, तोपर्यंत खर्‍या थोर पुरुषानें विवेकपूर्वक क्षमाशील असलें पाहिजें. जर तो क्षमाशील राहिला नाही, तर तो व इतर लोक यांत फरकच राहणार नाही. 
जंवरी चंदन झिजेना । तंव तो सुगंध कळेना ।
चंदन आणि वृक्ष नाना । सगट होती ॥ १७ ॥
१७) जोपर्यंत चंदन झीजत नाहीं तोपर्यंत लोकांना त्याचा सुगंध कळत नाही. आणि जोपर्यंत सुगंध कळत नाहीं तोपर्यंत लोकांना चंदन व इतर वृक्ष सारखेंच असतात.  
जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास काये कळे ।
उत्तम गुण देखतां निवळे । जगदांतर ॥ १८ ॥
१८) माणसांत असणारा उत्तम गुण जोपर्यंत लोकांत प्रगट होऊन त्यांना कळत नाहीं तोपर्यंत त्याच्या योग्यतेची कल्पना लोकांना नसते. पण एकदा कां तें उत्तम गुण लोकांना कळले कीं लोकांचे मन पालटू लागते.  
जगदांतर निवळत गेलें । जगदांतरीं सख्य जालें ।
मग जाणावें वोळले । विश्र्वजन ॥ १९ ॥
१९) आपल्याबद्दल लोकांचे मत स्वच्छ झालें म्हणजे लोकांची आपल्याला मान्यता मिळते व त्यांचे प्रेम प्राप्त होते. मग लोक आपले झाले, त्यांच्याशी जवळीक झाली हें समजावें. 
जनींजनार्दन वोलला । तरी काये उणें तयाला ।
राजी राखावें सकळांला । कठीण आहे ॥ २० ॥  
२०) अशा रीतीनें ज्या माणसाला जनतारुपी जनार्दन वश झाला त्याला काहींही कमी पडत नाहीं. परंतु सर्व लोकांना खूष ठेवणें कठीण आहे.    
पेरिलें तें उगवतें । उसिणें द्यावें घ्यावें लागतें । 
वर्म काढितां भंगतें । परांतर ॥ २१ ॥
२१) आपण जें पेरतो तेंच उगवते. जर आपण उसनें घेतलें तर तें फेडावें लागते. आपण जर कोणाचे वर्म, गुप्त रहस्य लोकांत प्रगट केलें तर त्याचें अंतःकरण दुखावलें जातें.  
लोकिकीं बरेंपण केलें । तेणें सौख्य वाढलें ।
उत्तरासारिखें आलें । प्रत्योत्तर ॥ २२ ॥  
२२) आपण लोकांशीं चागलें वागलो तर आपल्या जीवनांत सुखाची वाढ होते. उत्तरासारखेम उलट उत्तर येते हा तर नियमच आहे. 
हें आवघें आपणापांसीं । येथें बोल नाहीं जनासी ।
सिकवावें आपल्या मनासी । क्षणाक्षणा ॥ २३ ॥
२३) आपल्या जीवनांत सुख भोगावें कां दुःख हें सारें आपल्याच हातीं आहे. या बाबतींत दुसर्‍याला दोष देता येत नाही. आपण आपल्या मनाला ही गोष्ट सतत शिकवीत राहिलें पाहिजें.   
खळ दुर्जन भेटला । क्षमेचा धीर बुडाला ।
तरी मोनेंचि स्थळत्याग केला । पाहिजे साधकें ॥ २४ ॥
२४) समजा कोणी दुष्ट किंव  दुर्जन माणूस आपल्याला भेटला व त्याच्याशी वागतांना आपल्या क्षमाशीलतेचा तोल सुटूं लागला तर साधकानें मौन धरावें आणि ती जागा सोडून दुसरीकडें निघून जावें. 
लोक नाना परीक्षा जाणती । अंतरपरीक्षा नेणती ।
तेणें प्राणी करंटे होती । संदेह नाहीं ॥ २५ ॥
२५) सामान्यपणें माणसाला बाहेरील खुणांवरुन परीक्षा करता येते. परंतु माणसाच्या अंतरंगाची परीक्षा करता आली पाहिजे. ती पुष्कलांना करतां येत नाही. त्यामुळें माणसें भाग्यवान होत नाहीत. यांत संशय नाहीं.
आपणास आहे मरण । म्हणौन राखावें बरेंपण ।
कठिण आहे लक्षण । विवेकाचें ॥ २६ ॥
२६) आपण एक दिवस मरणार आहोत हें जाणिवेंत ठेवून लोकांशी प्रेमानें वागावें. हा विवेक टिकवून धरणें कठीण जातें.
थोर लाहान समान । आपलें पारिखे सकळ जन । 
चढतें वाढतें सनेधान । करितां बरें ॥ २७ ॥
२७) आपल्याहून लहानमोठे व आपल्या बरोबरीचे आपले व परकें अशा सर्व लोकांशी वाढतें प्रेमसंबंध असावेत हें चांगलें.    
बरें करितां बरें होतें । हें तों प्रत्ययास येते ।
आतां पुढें सांगावें तें । कोणास काये ॥ २८ ॥
२८) आपण दुसर्‍याचे चांगलें केलें तर आपलेंहि चांगलें होतें. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. यापेक्षां जास्त चांगलें सांगणें कांहीं नाही.  
हरिकथानिरुपण । बरेपणें राजकारण ।
प्रसंग पाहिल्याविण । सकळ खोटें ॥ २९ ॥
२९) भगवंताची कथा काय, निरुपण काय, उत्तम राजकारण काय या सगळ्या गोष्टी प्रसंग पाहून कराव्या. प्रसंग ओळखून केल्या तर त्यांत यश मिळते. पण प्रसंग न ओळखतां केल्यास त्या वाया जातात. 
विद्या उदंडचि सिकला । प्रसंगमान चुकतचि गेला ।
तरी मग तये विद्येला । कोण पुसे ॥ ३० ॥
३०) समजा, एखादा माणूस खूप विद्या शिकला, पण प्रसंगानुरुप त्याला वागता आलें नाहीं तर मग त्याचे शिकणें वायाच जाते. त्या विद्येला कोणी विचारत नाही.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रत्ययनिरुपणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara Pratyaya Nirupan 
समास दुसरा प्रत्यय निरुपण


Custom Search

No comments: