Wednesday, February 28, 2018

Samas Choutha Pralay Nirupan समास चौथा प्रलयनिरुपण


Dashak Terava Samas Choutha Pralay Nirupan 
Samas Choutha Pralay Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about the world and destruction of it. Destruction of the world happens step by step systematically.
समास चौथा प्रलयनिरुपण 
श्रीराम ॥
पृथ्वीस होईल अंत । भूतांस मांडेल कल्पांत ।
ऐसा समाचार साध्यंत । शास्त्रीं निरोपिला ॥ १ ॥
१) संहारकाळीं पृथ्वीचा अंत होईल. पंचभूतांचा कल्पांत होईल. याची सविस्तर माहिती शास्त्रांमध्यें सांगून ठेवलेली आहे.
शत वरुषें अनावृष्टि । तेणें जळेल हे सृष्टि ।
पर्वत माती ऐसी पृष्ठी । भूमीची तरके ॥ २ ॥
२) शंभर वर्षें पाऊस न पडल्यानें सृष्टि जळूं लागेल. पर्वत मोठमोठ्या भेगांमध्यें नाहींसे होतील. 
बारा कळीं सूर्यमंडळा । किर्णापासून निघती ज्वाळा ।
शत वरुषें भूगोळा । दहन होये ॥ ३ ॥
३) सूर्याच्या बारा कळांतील किरणांमधून ज्वाळा बाहेर पडतील. त्यामुळें शंभर वर्षें पृथ्वी जळत राहील.  
सिंधुरवर्ण वसुंधरा । ज्वाळा लागती फणिवरा ।
तो आहाळोन सरारां । विष वमी ॥ ४ ॥
४) पृथ्वी जळतांना त्या जाळाचा रंग शेंदरी दिसतो. शेंदरी रंगाचा तो जाळ शेषापर्यंत जातो. त्यानें शेष भाजून भराभर वीष ओकतो.    
त्या विषाच्या ज्वाळा निघती । तेणें पाताळें जळती ।
माहापावकें भस्म होती । पाताळ लोक ॥ ५ ॥
५) त्या विषांतून ज्वाळा भडकतात, त्यामुळें पाताळें जळतात. अशा या प्रचंड आगीनें पाताळें भस्म होतात. 
तेथें माहाभूतें खवळती । प्रळयेवात सुटती ।
प्रळयेपावक वाढती । चहुंकडे ॥ ६ ॥
६) मग महाभूतें खवळतात.  प्रलयाचा वारा सुटतो, प्रलयाचा अग्नि भडकतो सगळें व्यापून टाकतो.
तेथें अकरा रुद्र खवळले । बारा सूर्य कडकडिले ।
पावकमात्र येकवटले । प्रळयेकाळीं ॥ ७ ॥
७) त्यावेळीं अकरा रुद्र खवळतात. बारा सूर्य कडाडतात. अशा रीतीनें प्रलयकाल आला म्हणून सर्व अग्नि एकवटून येतात.  
वायो विजांचे तडाखे । तेणें पृथ्वी अवघी तरखे ।
कठिणत्व अवघेंचि फांके । चहुंकडे ॥ ८ ॥
८) वायु व विजा यांचे तडाखे बसतात. त्या योगानें सारी पृथ्वी तडकते, फूटूं लागते. तिचा कठिणपणा चारी बाजूला पसरतो. 
तेथें मेरुची कोण गणना । कोण सांभाळिल कोणा ।
चंद्र सूर्य तारांगणा । मूस आली ॥ ९ ॥ 
९) तेथें मेरुची किंमत उरत नाहीं. कोणी कोणास सांभाळू शकत नाहीं. चंद्र, सूर्य व तारेायांच एकच गोळा होऊन जातो.    
पृथ्वीनें विरी सांडिली । अवघी धगधगायेमान जाली ।
ब्रह्मांडभटी जळोन गेली । येकसरां ॥ १० ॥
१०) मग भयंकर महावृष्टी होते. त्या पाण्यांत जळून राख झालेली पृथ्वी विरुन जाते. 
जळोनि विरी सांडिली । विशेष माहावृष्टी जाली ।
तेणें पृथ्वी विराली । जळामधें ॥ ११ ॥
११) भाजलेला चुना जसा पाण्यांत चट्दिशी विरतो, त्याचप्रमाणें पृथ्वी प्रलयकालच्या अतिवृष्टीमध्यें चटकन विरुन जाते.  
भाजला चुना जळीं विरे । तैसा पृथ्वीस धीर न धरे ।
विरी सांडूनिया त्वरें । जळीं मिळाली ॥ १२ ॥
१२) शेष, कूर्म, वराह गेल्यानें पृथ्वीचा आधार नाहींसा होतो. आपला कठिणपणा सोडून ती पाण्यांत विरुन जाते.  
शेष कूर्म वार्‍हाव गेला । पृथ्वीचा आधार तुटला ।
सत्व सांडून जळाला । मिळोन गेली ॥ १३ ॥
१३) शेष, कूर्म, वराह गेल्यानें पृथ्वीचा आधार नाहींसा होतो. आपला कठिणपणा सोडून ती पाण्यांत विरुन जाते. 
तेथें प्रळयेमेघ उचलले । कठिण घोषें गर्जिनले ।
अखंड विजा कडकडिले । ध्वनि घोष ॥ १४ ॥
१४) मग आकाशांत प्रलयकालचे प्रचंड ढग प्रगट होतात. त्याच्यां घर्षाणाचा भयंकर गडगडाट होऊन विजांचाही कडकडाचा आवाज सारखा चालू राहतो.  
पर्वतप्राये पडती गारा । पर्वत उडती ऐसा वारा ।
निबिड तया अंधकारा । उपमाचि नाहीं ॥ १५ ॥
१५) डोंगराएवढ्या मोठ्या गारा पडूं लागतात. डोंगर उडतात असा प्रचंड वारा वाहुं लागतो. अगदीं घनदाट अंधार पडतो त्याला कांहीं उपमाच देता येत नाहीं. 
सिंधु नद्या एकवटल्या । नेणो नभींहून रिचवल्या ।
संधिच नाहीं धारा मिळाल्या । अखंड पाणी ॥ १६ ॥
१६) आकाशांतून एकत्र आल्याप्रमाणें समुद्र व सार्‍या नद्या एकरुप होतात. वेगळें प्रवाहच न राहील्यानें सगळीकडें पाणीच पाणी दिसते. 
तेथें मच्छ कूर्म सर्प पडती । पर्वतासारिखे दिसती ।
गर्जना होतां मिसळती । जळांत जळें ॥ १७ ॥
१७) तेथें मासे, कासवें, सर्प असे सर्व डोंगरासारखें दिसतात. पण मोठ्या घनगर्जनेबरोबर ते पाण्यांत गडप होतात.  
सप्त सिंधु आवर्णीं गेले । आवर्णवेडे मोकळे जाले ।
जळरुप जालियां खवळले । प्रळयेपावक ॥ १८ ॥
१८) सात समुद्र सपाटून वाढतात. व त्यांचें प्रवाहपाणी आवरणोदकापर्यंत वाढते. त्यामुळें विश्र्वाला वेढणारे आवरणोदक मोकळें होतें. असें सर्व जलमय झाल्यानें प्रळयाग्नि खवळतो. 
ब्रह्मांडाऐसा तप्तलोहो । शोषी जळाचा समूहो ।
तैसें जळास जालें पाहो । अपूर्व मोठे ॥ १९ ॥
१९) विश्र्वाचा तापलेला जणुं काय लोखंडाचा गोळा सागळे पाणी शोषून टाकतो. पाण्याच्याबाबतींत असें विलक्षण घडतें.  
तेणें आटोन गेलें पाणी । असंभाव्य माजल  वन्ही ।
तया वन्हीस केली झडपणी । प्रंयवातें ॥ २० ॥
२०) प्रलयाग्निमुळें सारें पाणी आटतें आणि मग कल्पना करतांच येणार नाहीं येवढी आग भडकते. त्या आगीला प्रलयकालचा वायु झडपतो.
दीपस पालव घातला । तैसा प्रळयेपावक विझाला ।
पुढें वायो प्रबळला । असंभाव्य ॥ २१ ॥
२१) पदराच्या वार्‍यानें जसा दिवा विझावा तसा प्रलयाग्नि विझतो. मग अकल्पनीय असा वारा वाहुं लागतो.  
उदंड पोकळी थोडा वारा । तेणें वितळोन गेला सारा  ।
पंचभूतांचा पसारा । आटोपला ॥ २२ ॥
२२) पण आकाशाची पोकळी अनंत असून वारा थोडा असतो. त्यामुळें वारा त्या पोकळींत नाहींसा होतो. अशा प्रकारें पंचमहाभूतांचा पसारा संपतो. 
महद्भूत मूळमाया । विस्मरणें वितुळें काया ।
पदार्थमात्र राहावया । ठाव नाहीं ॥ २३ ॥
२३) अंतरात्मा व मूळमाया यांना स्वतःचा विसर पडतो. आणि त्यांचा आकार किंवा देह वितळून जातो. मग कोणताही निर्मित पदार्थ राहण्यास जागाच उरत नाहीं. 
दृश्य हलकालोळें नेलें । जड चंचळ वितुळलें ।
याउपरी शाश्र्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २४ ॥  
२४) याप्रमाणें संहाराच्या धूमाकुळांत सारें दृश्य नाहींसे होते. जड व चंचळ वितळून जाते. सगळें नाहींसे झाल्यावर जें केवळ उरतें तेंच परब्रह्म होय.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रळयेनाम समास चौथा ॥
Samas Choutha Pralay Nirupan 
समास चौथा प्रलयनिरुपण 


Custom Search

No comments: