Friday, March 2, 2018

Samas Pachava Kahani Nirupan समास पांचवा कहाणी निरुपण


Dashak Terava Samas Pachava Kahani Nirupan 
Samas Pachava Kahani Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us Kahani i.e. Story.
समास पांचवा कहाणी निरुपण
श्रीराम ॥
कोणी येक दोघे जण । पृथ्वी फिरती उदासीन ।
काळक्रमणें लागून । कथा आरंभिली ॥ १ ॥
१) एकदां दोन मित्र अनासक्तपणें पृथ्वीवर फिरत होते. वेळ जावा, करमणूक व्हावी म्हणून एकानें दुसर्‍याला गोष्ट सांगायला सुरवात केली.
श्रोता पुसे वक्तयासी । काहाणी सांगा जी बरवीसी । 
वक्ता म्हणे श्रोतयासी । सावध ऐकें ॥ २ ॥
२) ऐकणारा संगणार्‍यास म्हणाला कीं, तुम्हीं एखादी चांगली गोष्ट सांगा. त्यावर सांगणारा म्हणाला कीं, मी अशी गोष्ट सांगतो, पण ती तूं लक्ष देऊन ऐकली पाहिजेस. 
येकें स्त्रीपुरुषें होतीं । उभयेतांमधें बहु प्रीति ।
येकरुपेंचि वर्तती । भिन्न नाहीं ॥ ३ ॥
३) एक स्त्री-पुरुष असें जोडपें होतें. त्यांचें एकमेकांवर अतिशय प्रेम होते. ते येवढें कीं, दोघांमध्यें वेगळेंपण मुळींच नव्हतें. 
ऐसा कांहीं येक काळ लोटला । तयांस येक पुत्र जाला ।
कार्यकर्त आणि भला । सर्वविषीं ॥ ४ ॥
४) बराच काळ गेल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. त्याचें नांव विष्णु. सर्वच बाबतींत तो चांगला असून मोठा कार्यकर्ता होता.  
पुढें त्यासहि जाला कुमर । तो पित्याहून आतुर ।
कांहीं तदर्ध चतुर । व्यापकपणें ॥ ५ ॥
५) पुढें विष्णुला पण मुलगा झाला. बापापेक्षां तो उतावीळ व चंचळ होता. तो अर्धा शाहाणा होता पण त्यानें व्याप फार वाढवला.  
तेणें व्याप उदंड केला । बहुत कन्यापुत्र व्याला ।
उदंड लोक संचिला । नाना प्रकारें ॥ ६ ॥ 
६) त्यानें व्याप फार केला. त्याला खूप मुलगें व मुली अशी संतती झाली. नाना प्रकारचे पुष्कळ लोक त्यानें निर्माण केलें.   
त्याचा पुत्र जेष्ठ । तो अज्ञान आणि रागिट । 
अथवा चुकता नीट । संव्हार करी ॥ ७ ॥
७) त्याचा मोठा मुलगा रुद्र. तो फार रागीट व अज्ञानी होता. कोणाचें कांहीं चुकलें कीं, संहार करणें हेच त्याचे काम होते. 
पिता उगाच बैसला । लेकें बहुत व्याप केला ।
सर्वज्ञ जाणता भला । जेष्ठ पुत्र ॥ ८ ॥
८) मूळपुरुष पिता स्वस्थ बसला होता. त्याच्या मुलानें म्हणजें विष्णुनें पुष्कळ व्याप केला. पण तो सर्वज्ञ, जाणता, चांगला व सर्वांत वडिल होता. 
नातु त्याचें अर्ध जाणे । पणतु तो कांहींच नेणें ।
चुकतां संव्हारणें । माहा क्रोधी ॥ ९ ॥
९) नातु, ब्रह्मदेव अर्धा जाणता होता. आणि पणतु रुद्र तर कांहींच जाणता नव्हता. तो भयंकर रागीट असल्यानें जरा चूक झाली कीं, संहार करण्यास तयार होता. 
लेक सकळांचें पाळण करी । नातु मेळवी वरिचावरी ।
पणतु चुकल्यां संव्हार करी । अकस्मात ॥ १० ॥
१०) मुलगा सगळ्यांचे पालन-पोषण करतो. नातु परस्पर मिळवून खातो, तर पणतु चुकलेल्यांचा तत्काळ संहार करतो.  
नेमस्तपणें वंश वाढला । विस्तार उदंडचि जाला ।
ऐसा बहुत काळ गेला । आनंदरुप ॥ ११ ॥
११) आपल्या या कुटुंबाचा वंश नियमितपणें वाढत गेला. आणि खूप पसारा वाढला. पसारा वाढला तरी प्रथम बराच काळ मोठ्या आनंदांत गेला. 
विस्तार वाढला गणवेना । वडिलांस कोणीच मानीना ।
परस्परें किंत मना । बहुत पडिला ॥ १२ ॥  
१२) पण विस्तार जेव्हां अमर्याद वाढला. तेव्हां मात्र काळ बदलला. वडिलांचें कोणी ऐकेना. त्यांना कोणी मान देईना. देवाला लोक विसरले. संशयानें आपापसांत कलह लागलें. 
उदंड घरकळ्हो लागला । तेणें कित्येक संव्हार जाला ।
विपट पडिलें थोरथोरांला । बेबंद जालें ॥ १३ ॥
१३) फार मोठ्या प्रमाणांत गृहकलह निर्माण झाला. कुटुंबसंस्था विघटीत होऊं लागली. त्यामुळें पुष्कळ लोक मारलें गेलें. मोठ्यांचें एकमेकांशी पटेना. त्यामुळें बेबंदशाही माजली. 
नेणपणें भरीं भरले । मग ते अवघेच संव्हारले ।
जैसे यादव निमाले । उन्मत्तपणें ॥ १४ ॥
१४) आपल्या वागण्याचा परिणाम फार वाईट होईल हें अज्ञानानें न कळल्यानें सारेजण भलत्या भरीस पडले व उन्मत्तपणानें यादव जसें समूल नाश पावलें तसाच यांचाही संहार झाला. 
बाप लेक नातु पणतु । सकळांचा जाला निपातु ।
कन्या पुत्र हेतु मातु । अणुमात्र नाहीं ॥ १५ ॥
१५) बाप, मुलगा, नातु, पणतु या सगळ्यांचा निःपात झाला. त्यामुळें त्यांच्या मुलीं, त्यांचे मुलगे, त्या मुलाबाळांचे हेतु व त्यांच्या जीवनकथा , यापैकीं कांहींही शिल्लक उरलें नाहीं.          
ऐसी काहाणी जो विवरला । तो जन्मापासून सुटला ।
श्रोता वक्ता धन्य जाला । प्रचितीनें ॥ १६ ॥
१६) ही कहाणी मी सांगितली. तिचें मनन करणारा जन्ममरणाच्या चक्रांतून मुक्त होतो. श्रोता व वक्ता स्वानुभवानें धन्य होतात. 
ऐसी काहाणी अपूर्व जे ते । उदंड वेळ होत जाते ।
इतुकें बोलोन गोसावी ते । निवांत जाले ॥ १७ ॥
१७) ही कहाणी मोठी अपूर्व आहे. ती सारखी घडत राहातें. इतकें सांगून स्वामींनी आपलें बोलणें थांबवले. 
आमची काहाणी सरो । तुमचे अंतरीं भरो ।
ऐसें बोलणें विवरो । कोणीतरी ॥ १८ ॥
१८) आमची कहाणी सरो. ती तुमच्या अंतःकरणांत भरो. या कहाणीवर कोणीतरी मनन करो.  
चुकत वांकत आठवलें । इतुकें संकळित बोलिलें ।
न्यूनपूर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ १९ ॥
१९) चुकतमाकत जेवढें आठवलें तेवढें एकत्र करुन सांगितलें. त्यांत जें कमीजास्त झालें असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी.
ऐसी काहाणी निरंतर । विवेकें ऐकती जे नर ।
दास म्हणे जग्गोधार । तेचि करिती ॥ २० ॥
२०) अशी ही कहाणी जे निरंतर विवेकानें ऐकतात तेच जगाचा उद्धार करतात. असें श्रीरामदास म्हणतात. 
त्या जगोद्धारचें लक्षण । केलें पाहिजे विवरण ।
सार निवडावें निरुपण । याास बोलिजे ॥ २१ ॥
२१) जगाचा उद्धार म्हणजें काय याचें विवेचन करणें जरुर आहे. सारअसारांच्या मिश्रणांतून सार निवडून बाजूस काढणें याचे नांव निरुपण होय.   
निरुपणीं प्रत्ययें विवरावें । नाना तत्वकोडें उकलावें ।
समजतां समजतां व्हावें । निःसंदेह ॥ २२ ॥
२२) माणसानें निरुपण ऐकावें. आपण जें ऐकलें तें प्रत्यक्ष अनुभव घेऊन समजून घ्यावें. विश्र्वरचनेंत आढळणार्‍या अनेक तत्वांची गुंतागुंत उकलावी. आणि कहाणी समजतां समजतां संपूर्ण संदेहरहित होऊन जावें.  
विवरोन पाहातां अष्ट देह । पुढें सहजचि निःसंदेह ।
अखंड निरुपणें राहे । समाधान ॥ २३ ॥
२३) पिंड व ब्रह्मांड मिळून असणारें हें आठ देह आहेत. त्यांचें विवरण केलें असतां माणसाला आपोआपच निःसंदेहता प्राप्त होते. साररुप ब्रह्म हातीं लागल्यानें मग अखंड समाधान मिळतें.
तत्वांचा गल्बला जेथें । निवांत कैंचें असेल तेथें ।
याकारणें गुल्लिपरतें । कोणीयेकें असावें ॥ २४ ॥
२४) ज्या ठिकाणीं तत्वांची गडबड आहे त्या ठिकाणीं निवांतपणा असणें शक्य नाहीं. म्हणून ज्याला समाधान हवें त्यानें या गोंधळाच्या अलीकडेच राहणें अवश्य आहे. 
ऐसा सूक्ष्म संवाद । केलाचि करावा विशद ।
पुढिले समासीं लघुबोध । सावध ऐका ॥ २५ ॥
२५) असें जें सूक्ष्म विवेचन आहे तें पुनः स्पष्ट करुन समजून घ्यावें. पुढील समासांत लघुबोध सांगणार आहे. तो लक्ष देऊन ऐकावा.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कहाणीनिरुपणनाम समास पांचवा ॥
Samas Pachava Kahani Nirupan
समास पांचवा कहाणी निरुपण


Custom Search

No comments: