Tuesday, March 6, 2018

Samas Sahava LaghuBodha समास सहावा लघुबोध


Dashak Terava Samas Sahava LaghuBodha 
Samas Sahava LaghuBodha, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Pancha Mahabhute . He is then asking us to find out what is immortal and has neither birth nor death.
समास सहावा लघुबोध
श्रीराम ॥ 
जें बोलिजेती पंचतत्वें । त्यांची अभ्यासाया नावें ।
तदुपरी स्वानुभवें । रुपें जाणावीं ॥ १ ॥
१) ज्यांना पंचतत्वें म्हणतात, त्यांची नांवे माहित करुन घ्यावी. त्यानंतर अनुभवानें त्यांचें स्वरुप समजून घ्यावें.  
यामधें शाश्र्वत कोण । आणी अशाश्र्वत कोण ।
ऐसें करावें विवरण । प्रत्ययाचें ॥ २ ॥
२) त्यांच्यामध्यें शाश्र्वत कोणतें व अशाश्र्वत कोणतें ते प्रत्यक्ष अनुभवानें निश्र्चित करावें.
पंचभूतांचा विचार । नांवरुप सारासार ।
तोचि बोलिला निर्धार । सावध ऐका ॥ ३ ॥
३) आतां पंचभूतांचा विचार करु. त्यांची नांवें, त्यंचें स्वरुप, त्यांच्यात सारासार काय, हें सगळें आतां निश्र्चितपणें सांगतों. तें लक्षपूर्वक ऐकावें. 
पृथ्वी आप तेजो वायो आकाश । नावें बोलिलीं सावकास ।
आतां रुपाचा विश्र्वास । श्रवणें धरावा ॥ ४ ॥
४) पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश अशीं त्या पंचभूतांची नांवें आहेत. आतां त्यांचे स्वरुप सांगतो, तें ऐका.
पृथ्वी म्हणिजे ते धरणी । आप म्हणिजे तें पाणी ।
तेज म्हणिजे अग्नि तरणी । सतेजादिक ॥ ५ ॥
५) पृथ्वी म्हणजे जमीन, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नि, सूर्य वगैरे तेजयुक्त पदार्थ समजावेत.
वायो म्हणिजे तो वारा । आकाश म्हणिजे पैस सारा ।
आतां शाश्वत तें विचारा । आपलें मनीं ॥ ६ ॥
६) वायु म्हणजे वारा, आकाश म्हणजे सारी जागा, आतां आपल्या मनांत शाश्र्वतपणाचा विचार करुं.  
येक शीत चांचपावें । म्हणिजे वर्म पडे ठावें ।
तैसें थोड्या अनुभवें । बहुत जाणावें ॥ ७ ॥
७) भाताचे एक शीत चाचपून बघितलें कीं, भात शिजला कां नाहीं तें समजते. त्याचप्रमाणें थोड्या अनुभवावरुन संपूर्ण विश्र्वाचा स्वभाव समजून घ्यावा.  
पृथ्वी रचते आणि खचते । हें तो प्रत्ययास येतें ।
नाना रचना होत जाते । सृष्टिमधें ॥ ८ ॥
८) पृथ्वीचा विचार केला तर असें समजतें कीं मातीची रचना करतां येते पण ती थोड्याच वेळांत मोडतें. त्यामुळें पृथ्वीवर अशा रचना होतात व कालांतरानें मोडतात.  
म्हणौन रचतें तें खचतें । आप तें हि आटोन जाते ।
तेज हि प्रगटोन विझतें । वारें हि राहे ॥ ९ ॥
९) म्हणून जें रचलें जातें तें मोडते हें पृथ्वीच्या बाबतींत अनुभवास येते. त्याचप्रमाणें पाणी आटून जाते. अग्नि पेटतो व विझून जातो. आणि वारा वाहतो व थांबतों. 
अवकाश नाममात्र आहे । तें हि विचारिता न राहे ।
एवं पंचभूतिक राहे । हें तो घडेना ॥ १० ॥
१०) आकाशामध्यें अवकाश नावापुरता असतो जरा विचार केल्यास तोही उरत नाहीं. यामुळें लक्षांत येतें कीं पंचभूतांपासून निर्माण झालेले कांहींहीं कायम टिकणारे नाहीं. कायम टिकेल हें शक्य नाहीं.  
ऐसा पांचा भूतांचा विस्तार । नासिवंत हा निर्धार ।
शाश्र्वत आत्मा निराकार । सत्य जाणावा ॥ ११ ॥
११) याप्रमाणें पांच भूतांचा पसारा नाशवंत आहे. हें अगदी निर्विवाद आहे. आत्मा मात्र शाश्वत आहे. सत्य आहे. पण तो निराकार आहे.  
तो आत्मा कोणास कळेना । ज्ञानेंविण आकळेना ।
म्हणोनियां संतजना । विचारावें ॥ १२ ॥
१२) तो आत्मा कळण्यास फार कठीण आहे. ज्ञानावांचून तो इतर कशानेंही आकलन होत नाहीं. म्हणून संतसज्जनांकडे जाऊन त्यांना आत्मा कसा ओळखावा हें विचारावें. 
विचारितां सज्जनांसी । ते म्हणती अविनासी ।
जन्म मृत्यु आत्मयासी । बोलोंच नये ॥ १३ ॥
१३) आत्मस्वरुप कसें आहे? हा प्रश्र्ण संतांना विचारला तर तें उत्तर देतात कीं, आत्मा अविनाशी आहे. आत्म्याला जन्म नाहीं तसा मृत्युपण नाहीं. 
निराकारीं भासे आकार । आणी आकारीं भासे निराकार ।
निराकार आणी आकार । विवेकें वोळखावा ॥ १४ ॥
१४) निराकारांत आकाराचा भास होतो. आणि आकारांत निराकाराचा भास होतो. दोन्ही एकमेकांत मिसळल्याप्रमाणें भासतात. म्हणून निराकार व आकार एकमेकांपासून विवेकानें वेगळें करावें. 
निराकार जाणावा नित्य । आकार जाणावा अनित्य ।
यास बोलिजे नित्यानित्य । विचारणा ॥ १५ ॥
१५) जें निराकार तें नित्य व शाश्वत असतें. व साकार तें अनित्य व अशाश्वत असतें. साकार निराकार हे गुणधर्म विवेकानें जाणणें यास नित्यानित्यविचार म्हणतात.   
सारीं भासे असार । आणि असारीं भासे सार ।
सारासार विचार । शोधून पाहावा ॥ १६ ॥
१६) त्याचप्रमाणें जें सार आहे त्यांत असाराचा भास होतो. आणि जे असार आहे त्यामधें साराचा भास होतो. पण माणसानें सारासार विचार करुन सार असार वेगळें शोधून काढावें.  
पंचभूतिक तें माइक । परंतु भासे अनेक ।
आणि आत्मा येक । व्यापून असे ॥ १७ ॥
१७) वास्तविक पांच भूतांपासून निर्माण झालेले सारें मायिक आहे. म्हणजें जें जसें दिसतें तसे नसते. तें एक नव्हें अनेक दिसते. याच्या अगदी उलट आत्मा  एकच आहे व तो सर्व विश्र्व व्यापून आहे.    
चहुं भूतांमधें गगन । तैसें गगनीं असे सघन ।
नेहटून पाहतां अभिन्न । गगन आणि वस्तु ॥ १८ ॥
१८) चारही भूतांच्या मधें आकाश व्यापून आहे. पण तें लगेच लक्षांत येत नाही. त्याचप्रमाणें आकाशांत आत्मस्वरुप अगदी गच्चपणें भरलेलें आहे. निश्र्चयानें सूक्ष्म विचार करुन पाहिल्यास आकाश आणि ब्रह्मवस्तु यांत भेदच नाहीअसा अनुभव येईल.  
उपाधीयोगेंचि आकाश । उपाधी नस्तां निराभास ।
निराभास तें अविनाश । तैसें गगन ॥ १९ ॥
१९) आकाश आपल्याला भासते. इंद्रियांना गोचर होते. म्हणजे तें स्थल कालाच्या उपाधीनें आवरलेलें आहे. ही उपाधी बाजूस सारली तर ते अतींद्रियच असतें. म्हणून अतीद्रिय, निरुपाधी, निराभास व अविनाशी राहतें तें ब्रह्म होय. 
आतां असो हे विवंचना । परंतु जें पाहातां नासेना ।
तें गे तेंचि अनुमाना । विवेकें आणावें ॥ २० ॥
२०) आतां हें विवेचन पुरें. परंतु जें अनुभव घेण्यास गेलें असतां अविनाश राहते तें ब्रह्म होय. तेंच ब्रह्मस्वरुप मनन, निदिध्यासनानें आपल्या अनुभवास आणावें.   
परमात्मा तो निराकार । जाणिजे हा विचार सार ।
आणि आपण कोण हा विचार । पाहिला पाहिजे ॥ २१ ॥
२१) परमात्मस्वरुप निराकार आहे. हाच सर्व सारासार विचाराचा मतितार्थ आहे. त्याचप्रमाणें आपण कोण हाही विचार करायला पाहिजे.   
देहास अंत येतां । वायो जातो तत्वता ।
हें लटिकें म्हणाल तरी आतां । स्वासोस्वास धरावा ॥ २२ ॥
२२) ज्यावेळीं देहाचा अंत होतो त्यावेळीं वायु देह सोडून जातो.  हें जर खरें वाटत नसेल तर आतांच श्वास कोंडून धरावा.  
स्वास कोंडतां देह पडे । देह पडतां म्हणती मडें ।
मड्यास कर्तुत्व न घडे । कदाकाळीं ॥ २३ ॥
२३) श्वास कोंडून धरला, श्वासोश्र्वास थांबला कीं देह पडतो. देह पडला कीं त्यास मढें म्हणतात. मढ्याच्या अंगी कधींच कर्तेपण दृष्टीस पडत नाहीं. 
देहावेगळा वायो न करी । वायोवेगळा देह न करी ।
विचार पाहातां कांहींच न करी । येकावेगळें येक ॥ २४ ॥
२४) देहाच्याशिवाय वायुला कांहींच करतां येत नाहीं. वायूच्याशिवात देहाला कांहीं करतां येणार नाहीं. म्हणून विचार केला तर असें दिसतें कीं, एकमेकांशिवाय एकमेकांना कांहीं करतां येत नाहीं.  
उगें च पाहातां मनुष्य दिसे । विचार घेतां कांहींच नसे ।
अभेदभक्तीचें लश्रण ऐसें । वोळखावें ॥ २५ ॥
२५) सहज पाहिलें तर माणूस दिसतो. विचार करुन पाहिलें तर कांहींच नाहींअसें दिसतें. यावरुन अभेद भक्तीचे लक्षण काय तें ओळखावें. 
कर्ता आपण ऐसें म्हणावें । तरी आपलें इच्छेसारिखें व्हावें ।
इच्छेसारिखें न होतां मानावें । अवघेंच वाव ॥ २६ ॥
२६) मी कर्ता आहे असें म्हटलें तर सर्व गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणें घडून आल्या पाहिजेत. परंतु त्या तशा घडत नसतील तर मी कर्ता आहे हें म्हणणें व्यर्थ आहे.  
म्हणोन कर्ता नव्हे किं आपण । तेथें भोक्ता कैंचा कोण ।
हें विचारावें लक्षण । अविचारें न घडे ॥ २७ ॥
२७) म्हणून मी कर्ता नाहीं हें आपोआपच अनुभवास येते. मी कर्ता नाहीं हें जसें तसेंच मी भोक्ता नाहीं हे पण खरें ठरते. परंतु सूक्ष्म विचार केल्यासच हें आकलन होईल. ज्याला असा विचार करतां येत नाहीं त्यास हें कळणार नाहीं.  
अविचार आणि विचार । जैसा प्रकाश अंधकार ।
विकार आणि निर्विकार । येक नव्हे कीं ॥ २८ ॥
२८) ज्याप्रमाणें प्रकाश व अंधार हें एकमेकाच्या उलट असतात. त्याचप्रमाणें सूक्ष्म विचार करणें व तसें न करणें हें एमकेमांच्या विरोधी आहेत. विकार पावणारें दृश्य पंचभूतिक विश्व आणि निर्विकार ब्रह्मवस्तु दोन्ही अगदी भिन्न आहेत. 
जेथें नाहीं विवंचना । तेथें कांहींच चालेना ।
खरें तेंचि अनुमाना । कदा न ये ॥ २९ ॥
२९) जेथें सारासाराचें सूक्ष्म मनन नाहीं, तेथें परमार्थ कांहींच नहीं. जें खरें स्वरुप आहे, त्याची कल्पना तेथें येणें शक्यच नाहीं. 
प्रत्ययास बोलिजे न्याये । अप्रत्यये तो अन्याये । 
ज्यात्यांधास परीक्षा काये । नाना रत्नाची ॥ ३० ॥
३०) सूक्ष्म वस्तूच्या अनुभवाला न्याय असें जर म्हटलें तर त्या वस्तूचा अनुभव नसणें हा अन्याय समजावा. जो जन्मांध आहे त्याला नाना प्रकारच्या रत्नांची परीक्षा करतां येणें शक्यच नसतें. 
म्हणोन ज्ञाता धन्य धन्य । जो निर्गुणेंसी अनन्य ।
आत्मनिवेदनें मान्य । परम पुरुष ॥ ३१ ॥
३१) म्हणून निर्गुण स्वरुपाशी अनन्य होणारा, निर्गुणाशी तद्रूप होणारा, ज्ञानी पुरुष त्रिवार धन्य होय. आत्मनिवेदन साधण्यानें तो मोठा श्रेष्ठ पुरुष म्हणून मान्यता मिळवतो.                      
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे लघुबोधनाम समास सहावा ॥
Samas Sahava LaghuBodha
समास सहावा लघुबोध


Custom Search

No comments: