Dashak Terava Samas Dahava Shikavan Nirupan
Samas Dahava Shikavan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about behavior. How a sadhak is expected to behave with the others.
समास दहावा शिकवण निरुपण
श्रीराम ॥
पालेमाळा सुमनमाळा । फळमाळा बीजमाळा ।
पाषाणमाळा कवडेमाळा । सूत्रें चालती ॥ १ ॥
१) झाडाचा पाला, फुलें, फळें, बीजें, पाषाण, आणि कवड्या यांच्या माळा करतात. पण त्या सगळ्या दोर्यामुळें - दोरा ओवल्यामुळें - होतात.
स्फटिकमाळा मोहरेमाळा । काष्टमाळा गंधमाळा ।
धातुमाळा रत्नमाळा । जाळ्या वोलि चांदोवे ॥ २ ॥
२) त्याचप्रमाणें स्फटिकमणी, मोहोरमणी, काष्ट, गंध, धातु, रत्नें यांच्यादेखील माळा करतात. शिवाय जाळ्या, ओळी आणि चांदवे, या वस्तुदेखील सुतापासून तयार करतात.
परी हे तंतूनें चालतें । तंतू नस्तां विष्कळित होतें ।
तैसें म्हणों आत्मयाते । तरी साहित्य न पडे ॥ ३ ॥
३) या माळांमध्यें दोरा ओवलेला असतो. दोरा नसेल तर मणी विस्कळीत होतात. त्याचप्रमाणें आत्मा सर्व वस्तुंमध्यें ओवलेला असतोअसें म्हणतात. पण दोर्याचा दृष्टांत आत्म्याला संपूर्णपणें लागूं पडत नाहीं.
तंतूस मणी वोविला । तंतूमध्येंचि राहिला ।
आत्मा सर्वांगी व्यापला । पाहाना कां ॥ ४ ॥
४) दोरा मण्यांतून जातो. मणी दोर्याच्या आधारानें राहतो. परंतु दोरा मण्याला व्यापून असत नाहीं. देहांत आत्मा राहातो. तो देहाचे सर्वांग व्यापून असतो. हें लक्षांत घ्यावें.
आत्मा चपळ सहजगुणें । दोरी काये चळों जाणे ।
म्हणोन दृष्टांत देणें । साहित्य न घडे ॥ ५ ॥
५) आत्म्याच्या ठिकाणी चेतना सहजपणें आहे. ती दोर्याच्या ठिकाणी नाहीं. म्हणून दोर्याचा दृष्टांत आत्म्याला लागू पडत नाहीं.
नाना वल्लींत जळांश । उसांमध्यें दाटला रस ।
परी तो रस आणी बाकस । येक नव्हे ॥ ६ ॥
६) अनेक प्रकारच्या वेलींत रस असतो, उसांतही रस असतो पण तो रस व रसहीन उसाची चिपाडें सारखी नसतात.
देही आत्मा देह अनात्मा । त्याहून पर तो परमात्मा ।
निरंजनास उपमा । असेचिना ॥ ७ ॥
७) देह अनात्मा तर देहांत राहणारा तो आत्मा होय. त्याहून परमात्मा, तो श्रेष्ठ आहे. निरंजन परमात्म्याला कशाचीच उपमा देता येत नाहीं.
रायापासून रंकवरी । अवघ्या मनुष्यांचियां हारी ।
सगट समान सरी । कैसी करावी ॥ ८ ॥
८) राजापासून रंकापर्यंत जिकडे तिकडे माणसांचे समुदाय आढळतात.पण त्या सगळ्यांना सरसकट सारख्या दर्जाचे किंवा लायकीचे मानतां येत नाहीं.
देव दानव मानव । नीच योनी हीन जीव ।
पापी सुकृति अभिप्राव । उदंड आहे ॥ ९ ॥
९) देव, दानव, मानव, नीच योनी, हीन जीव, पापी, पुण्यवान, वगैरे अनेक प्रकारचे भेद आहेत.
येकांशें जग चाले । परी सामर्थ्य वेगळालें ।
येकासंगे मुक्त केलें । येकासंगे रवरव ॥ १० ॥
१०) ईश्वराच्या एका अंशानें जग चालते. ईश्वराचा कांहीं भाग जग व्यापून आहे. हें अगदी खरें आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीचें व वस्तुचें सामर्थ्य वेगवेगळें आढळतें. एकाच्या संगतीनें मोक्ष मिळतो, तर एकाच्या संगतीनें नरकांत जावें लागते.
साकर माती पृथ्वी होये । परी तो माती खातां न ये ।
गरळ आप नव्हे काये । परी तें खोटें ॥ ११ ॥
११) साखर व माती दोन्ही पृथ्वीची रुपें आहेत. परंतु माती खाता येत नाहीं. सापाचे वीष व पाणी दोन्ही पाण्याचीच रुपें आहेत. पण तो सारखेपणा खोटा असतो.
पुण्यात्मा आणी पापात्मा । दोहिंकडे अंतरात्मा ।
साधु भोंदु सीमा । सांडूंच नये ॥ १२ ॥
१२) एखादा पुण्यवान माणुस व एखादा पापी माणुस या दोघांत अंतरात्मा एकच आहे. पण म्हणुन साधु व भोंदू या दोघांना समान मानता येत नाहीं. याना समान मानून मर्यादा मोडणें योग्य नाहीं.
अंतर येक तों खरें । परी सांगातें घेऊं न येती माहारे ।
पंडित आणि चाटें पोरें । येक कैसीं ॥ १३ ॥
१३) सगळ्यांमध्यें अंतरात्मा एकच आहे खरा, परंतु महार पंगतीस घेऊन जेवणें योग्य नाहीं.विद्वान व वात्रट पोरें ही सारख्या योग्यतेची मानतां येत नाहींत.
मनुष्य आणी गधडे । राजहंस आणि कोंबडें ।
राजे आणि माकडें । एक कैसीं ॥ १४ ॥
१४) माणूस आणि गाढव, राजहंस आणि कोंबडा, राजा आणि माकड यांची योग्यता एकच होऊं शकत नाहीं.
भागीरथीचें जळ आप । मोरी संवदणी तेंहि आप ।
कुश्र्चिळ उदक अल्प । सेववेना ॥ १५ ॥
१५) गंगेचे पाणी, मोरींतील पाणी व कपडे धुतलेले पाणी हें सर्व पाणीच असते. परंतु मोरींतील पाणी व कपडे धुतलेले पाणी घाणेरडे असते, ते पिता येत नाही.
ताकारणें आचारशुद्ध । त्याउपरी विचारशुद्ध ।
वीतरागी आणि सुबुद्ध । ऐसा पाहिजे ॥ १६ ॥
१६) सांगण्याचा मुद्दा असा कीं, शुद्ध आचार असलेला, शुद्ध विचार असलेला, अनासक्त मनाचा आणि शुद्ध बुद्धीचा माणूस इतर माणसांपेक्षां श्रेष्ठ दर्जाचा असतो.
शूरांहून मानिलें लंडी । तरी युद्धप्रसंगी नरकाडी ।
श्रीमंत सांडून बराडी । सेविला कैसें ॥ १७ ॥
१७) समजा, एखाद्या भित्र्या माणसाला खर्या शूर माणसापेक्षां मोठा दर्जा दिला तर युद्ध प्रसंगी फार फजिती होते. श्रीमंत माणसाऐवजी दरिद्री माणसाची सेवाचाकरी केली तर पदरांत कांहींच पडणार नाहीं.
येका उदकें सकळ जालें । परी पाहोन पाहिजे सेविलें ।
सगट अवघेंच घेतलें । तरी तें मूर्खपण ॥ १८ ॥
१८) एका पाण्यापासून सर्व निर्माण झालें हें जरी खरें असलें तरी जें खायचे तें नीट पाहूनच खाल्ले पाहिजे. सरसकट सगळें खाल्ले तर तो मूर्खपणाच होईल.
जीवनाचेंच जालें अन्न । अन्नाचें जालें वमन ।
परी वमनाचें भोजन । करितां न ये ॥ १९ ॥
१९) पाण्यापासून अन्न होते. अन्नाचीच ओकारी बनते. पण ओकारीचें भोजन करतां येत नाही.
तैसें निंद्य सोडून द्यावें । वंद्य तें हृदईं धरावें ।
सत्कीर्तीनें भरावें । भूमंडळ ॥ २० ॥
२०) त्याचप्रमाणें जें निंद्य आहे तें सोडून द्यावें , जें योग्य आहे तें अंतःकरणांत वागवावें. आणि अशारीतीनें जगांत आपली कीर्ति भरुन टाकावी.
उत्तमांसि उत्तम माने । कनिष्ठांस तें न माने ।
म्हणोन करंटे देवानें । करुन ठेवले ॥ २१ ॥
२१) उत्तम पुरुषाला जें उत्तम आहें तेंच आवडते. हीन माणसांना तें आवडत नाहीं.म्हणून देवानें तसलें करंटे निर्माण केलें आहेत.
सांडा अवघें करंतपण । धरावें उत्तम लक्षण ।
हरिकथा पुराण श्रवण । नीति न्याये ॥ २२ ॥
२२) शहाण्या माणसानें सारे करंटेपण सोडावें. उत्तम लक्षणें स्वीकारावीत. हरिकथा, निरुपण, नीति, न्याय ही उत्तम लक्षणें आहेत.
वर्तायाचा विवेक । राजी राखणें सकळ लोक ।
हळुहळु पुण्यश्र्लोक । करीत जावे ॥ २३ ॥
२३) सर्व लोकांना खुष ठेवणें हींच उत्तम विवेकानें वागण्याची किल्ली आहे. लोकांना हळुहळु पुण्यशील करावें.
मुलाचे चालीने चालावें । मुलाच्या मनोगतें बोलावें ।
तैसें जनास सिकवावें । हळुहळु ॥ २४ ॥
२४) लोकांचें मन व वागणें लहान मुलाप्रमाणें असतें तें ओळखून लोकांशी वागतांना मुलांच्या चालीनें चालावें. मुलांच्या मनाप्रमाणें बोलावें. अशारीतीनें लोकांना हळुहळु शिकवावे.
मुख्य मनोगत राखणें । हेंचि चातुर्याचीं लक्षणें ।
चतुर तो चतुरांगजाणे । इतर तीं वेडीं ॥ २५ ॥
२५) लोकसंग्रह करणार्यानें लोकांचे मनोगत राखलें पाहिजें. हेंच खरें चातुर्याचें लक्षण आहे. असा जो चतुर आहे तो साम, दाम, दंड व भेद यांसारखें सर्व मार्ग जाणतो. इतर सगळे वेडे समजावेत.
वेड्यास वेडे म्हणों नये । वर्म कदापि बोलों नये ।
तरीच घडे दिग्विजये । निस्पृहासी ॥ २६ ॥
२६) पण ज्याला लोकांचे मनोगत राकहावयाचें आहे त्यानें वेड्याला उघडपणें वेडा म्हणू नये. कुणाचेही वर्म उघडपणें प्रगट करुं नये. लोकांमध्यें वागण्याची अशी रीत ठेवली तरच निःस्पृह महंताला पुढारीपण मिळतें.
उदंड स्थळीं उदंड प्रसंग । जाणोनि करणें येथासांग ।
प्राणीमात्राचा अंतरंग । होऊन जावें ॥ २७ ॥
२७) वेगवेगळे प्रसंग वेगवेगळ्या ठिकाणी त्याला येतात. प्रसंग ओळखून त्यास योग्य असें वागावें. त्यानें प्राणीमात्रांच्या अंतरंगाशी अगदी एकरुप होऊन जावें.
मनोगत राखोन जातां । परस्परें होये अवस्ता ।
मनोगत तोडितां वेवस्था । बरी नाहीं ॥ २८ ॥
२८) दुसर्यांचे मनोगत ओळखून वागलें तर परस्परांमध्यें एकरुपता वाढते. दुसर्याचें मनोगत भंग पावलें तर परस्परांत संघर्ष निर्माण होतो व तो मग वाढतो.
याकारणें मनोगत । राखेल तो मोठा महंत ।
मनोगत राखतां समस्त । वोढोन येती ॥ २९ ॥
२९) म्हणून दुसर्याचे अंतःकरण न दुखवतां वागणारा महंत खरोखर थोर समजावा. मनोगत सांभाळलें तर सारे लोक आपोआप आकर्षिले जातात.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिकवणनिरुपणनाम समास दहावा ॥
Samas Dahava Shikavan Nirupan
समास दहावा शिकवण निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment