Saturday, March 10, 2018

Samas Aathava Karta Nirupan समास आठवा कर्ता निरुपण


Dashak Terava Samas Aathava Karta Nirupan 
Samas Aathava Karta Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Karta. Karta has created this world. We have to find out him by Pratyaya means experience. Parmarth is based on ones’ experience. Sadhak when acquires knowledge, all his doubts are cleared.
समास आठवा कर्ता निरुपण
श्रीराम ॥
श्रोता म्हणे वक्तयासी । कोण कर्ता निश्र्चयेंसीं ।
सकळ सृष्टि ब्रह्मांडासी । कोणें केलें ॥ १ ॥
१) श्रोत्यांनीं वक्त्याला असा प्रश्र्ण केला कीं, " हीं सगळीं सृष्टि आणि ब्रह्मांड कोणी रचले? निश्र्चितपणें याचा कर्ता कोण आहे? "  
तव बोलिले सभानायेक । जे बोलिके येकाहून येक ।
या बोलण्याचें कौतुक । श्रोतीं सादर ऐकावें ॥ २ ॥
२) तेव्हां सभेतून एकाहून एक हुशार असे लोक पुढें आले. आणि आपापल्या मतानें याचे उत्तर देऊं लागले. त्या उत्तराचे कौतुक श्रोत्यांनी सादर होऊन ऐकावे. 
येक म्हणती कर्ता देव । येक म्हणती कोण देव ।
आपुलाला अभिप्राव । बोलते जाले ॥ ३ ॥
३) एक म्हणाला कीं देव कर्ता आहे. त्यावर एकानें म्हटलें कीं हा देव कोण आहे?  प्रत्येकानें आपले आपले मत सांगितलें.  
उत्तम मध्यम कनिष्ठ । भावार्थें बोलती पष्ट ।
आपुलाली उपासना श्रेष्ठ । मानिती जनीं ॥ ४ ॥
४) ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणें ज्यानें त्यानें उत्तम, मध्यम किंवा कनिष्ठ देवांना कर्तेपण बहाल केलें.  प्रत्येकाला आपापला उपास्य देव श्रेष्ठ वाटणें हीं जनरीतच आहे. 
कोणीयेक ऐसें म्हणती । कर्ता देव मंगळमूर्ती ।
येक म्हणती सरस्वती । सर्व करी ॥ ५ ॥
५) कोणी असें म्हणतात कीं मंगलमूर्ती म्हणजे गणपती हा कर्ता आहे. तर कोणी म्हणतात कीं, सरस्वती सर्व करते.   
येक म्हणती कर्ता भैरव । येक म्हणती खंडेराव ।
येक म्हणती वीरेदेव । येक म्हणती भगवती ॥ ६ ॥
६) कोणी म्हणतात कीं, भैरव, किंवा खंडेराव किंवा बीरदेव किंवा भगवती. 
येक म्हणती नरहरी । येक म्हणती बनशंकरी ।
येक म्हणती सर्व करी । नारायेणु ॥ ७ ॥
७) किंवा नरहरी किंवा बनशंकरी किंवा नारायण सर्व कांहीं करतो. 
येक म्हणती श्रीराम कर्ता । येक म्हणती श्रीकृष्ण कर्ता ।
येक म्हणती भगवंत कर्ता । केशवराज ॥ ८ ॥
८) कोणी म्हणतात कीं, श्रीराम किंवा श्रीकृष्ण किंवा केशवराज भगवंत
येक म्हणती पांडुरंग । येक म्हणती श्रीरंग ।
येक म्हणती झोटिंग । सर्व करी ॥ ९ ॥
९) किंवा पांडुरंग किंचा श्रीरंग किंवा झोटिंग सर्व कांहीं करतो. 
येक म्हणती मुंज्या कर्ता । येक म्हणती सूर्य कर्ता ।
येक म्हणती अग्न कर्ता । सकळ कांहीं ॥ १० ॥
१०) कोणी म्हणतात कीं, मुंज्या किंवा सूर्य किंवा अग्नि 
येक म्हणती लक्ष्मी करी । येक म्हणती मारुती करी ।
येक म्हणती धरत्री करी । सर्व कांहीं ॥ ११ ॥
११) किंवा लक्ष्मी किंवा मारुती किंवा पृथ्वी 
येक म्हणती तुकाई । येक म्हणती येमाई ।
येक म्हणती सटवाई । सर्व करी ॥ १२ ॥
१२) किंवा तुकाई किंवा यमाई किंवा सटवाई सर्व कांहीं करते. 
येक म्हणती भार्गव कर्ता । येक म्हणती वामन कर्ता ।
येक म्हणती परमात्मा कर्ता । येकचि आहे ॥ १३ ॥
१३) कोणी म्हणतात कीं, भार्गव किंवा वामन परमात्मा कर्ता एकच आहे. 
येक म्हणती विरणा कर्ता । येक म्हणती बस्वंणा कर्ता ।
येक म्हणती रेवंणा कर्ता । सर्व कांहीं ॥ १४ ॥
१४) कोणी म्हणतात वीरण्णा किंवा बसवण्णा किंवा रेवण्णा 
कोणी म्हणती रवळया कर्ता । येक म्हणती स्वामी कार्तिक कर्ता ।
येक म्हणती वेंकटेश कर्ता । सर्व कांहीं ॥ १५ ॥
१५) किंवा रवळनाथ किंवा कार्तिकस्वामी किंवा व्यंकटेश किंवा
येक म्हणती गुरु कर्ता । येक म्हणती दत्त कर्ता ।
येक म्हणती मुख्य कर्ता । वोढ्या जगन्नाथ ॥ १६ ॥
१६) गुरु किंवा दत्त किंवा वोढ्या जगन्नाथ मुख्य कर्ता आहे.
येक म्हणती ब्रह्मा कर्ता । येक म्हणती विष्णु कर्ता ।
येक म्हणती महेश कर्ता । निश्र्चयेंसीं ॥ १७ ॥
१७) कोणी म्हणतात कीं, ब्रह्मा किंवा विष्णु किंवा महेश निश्र्चयानें कर्ता आहे.
येक म्हणती प्रजन्य कर्ता । येक म्हणती वायो कर्ता ।
येक म्हणती करुन अकर्ता । निर्गुण देव ॥ १८ ॥
१८) कोणी म्हणतात कीं, पर्जन्य किंवा वायु कर्ता आहे. कोणी म्हणतात कीं, निर्गुण देव सर्व करुन अकर्ता आहे. 
येक म्हणती माया करी । येक म्हणती जीव करी ।
येक म्हणती सर्व करी । प्रारब्धयोग ॥ १९ ॥
१९) कोणी म्हणतात कीं, माया किंवा जीव किंवा प्रारब्धयोग सर्व कांहीं करतो.  
येक म्हणती प्रेत्न करी । येक म्हणती स्वभाव करी ।
येक म्हणती कोण करी । कोण जाणे ॥ २० ॥
२०) कोणी म्हणतात कीं, प्रयत्न किंवा स्वभाव सर्व कांहीं करतो. तर कोणी म्हणतात कीं, हे सर्व कोण करतो कोण जाणे.
ऐसा कर्त्याचा विचार । पुसतां भरला बाजार ।
आतां कोणाचें उत्तर । खरें मानावें ॥ २१ ॥
२१) या सृष्टीचा कर्ता कोण? हा प्रश्र्ण विचारल्यावर असा उत्तरांचा बाजार भरला. आतां यांत कोणाचे उत्तर खरें मानायचे सांगा. 
जेहिं जो देव मानिला । कर्ता म्हणती तयाला ।
ऐसा लोकांचा गल्बला । वोसरेना ॥ २२ ॥
२२) जो ज्या देवाला मानतो त्याला तो कर्ता म्हणतो, अनेक देवांना मानणार्‍या अनेक लोकांचा हा गोंधळ कांहीं कमी होत नाहीं. 
आपुलाल्या साभिमानें । निश्र्चयेचि केला मनें ।
याचा विचार पाहाणें । घडेचिना ॥ २३ ॥
२३) प्रत्येक माणूस स्वतःच्या देवतेचा अभिमान धरतो. आणि सर्व कर्तेपण तिथेंच आहे असा आपल्या मनानें निश्र्चय करतो. पण तें खरें कीं खोटे याचा तो विचार करीत नाहीं.   
बहु लोकांचा बहु विचार । अवघा राहों द्या बाजार ।
परंतु याचा विचार । ऐसा आहे ॥ २४ ॥
२४) अशा प्रकारें पुष्कळ लोकांची पुष्कळ मतें आहेत. निरनिराळ्या मतांचा बाजार आपण बाजूस ठेवूं. मूळ प्रश्र्णाचा खरा विचार असा आहे.   
श्रोतीं व्हावें सावधान । निश्र्चयें तोडावा अनुमान ।
प्रत्यये मानावा प्रमाण । जाणते पुरुषीं ॥ २५ ॥
२५) क्षोत्यांनी आतां सावधान व्हावें. कर्त्याचा निश्र्चय करुन कल्पना सोडावी. जाणत्या पुरुषांनीं प्रत्यक्ष अनुभव पाहून कर्त्याचा निश्र्चय करावा.   
जें जें कर्तयानें केलें । तें तें त्याउपरी जालें ।
कर्त्यापूर्वीं आडळलें । न पाहिजे कीं ॥ २६ ॥
२६) कर्ता जें जें कांहीं निर्माण करतो तें तें त्याच्यानंतर निर्माण झालेले असते. कर्त्याच्या आधीं तें अस्तित्वांत नसतें.
केलें तें पंचभूतिक । आणि पंचभूतिक ब्रह्मादिक ।
तरी भूतांशें पंचभूतिक । केलें तें घडेना ॥ २७ ॥
२७) आपल्या अनुभवास येणारें हें दृश्य विश्र्व पंचभूतिक आहे. ब्रह्मादिदेव हे देखील पंचभूतिकच आहेत. म्हणून पंचभूतिक देवांनी पंचभूतिक विश्व निर्माण केलें असें होणार नाहीं. पंचभूतांच्या अंशांनी पंचभूतिक विश्र्व निर्माण करणें शक्य नाहीं.  
पंचभूतांस वेगळें करावें । मग कर्त्यास वोळखावें ।
पंचभूतिक तें स्वभावें । कर्त्यांत आले ॥ २८ ॥
२८) मग कर्ता शोधून काढण्यासाठीं पंचभूतांना बाजूस वेगळें काढावें आणि नंतर कर्ता कोण तें ओळखावें. याचें कारण असें कीं, पंचभूतें स्वतः जड असल्यानें ती स्वतः कांहीं निर्माण करत नाहींत. पण जो कोणी कर्ता आहे त्याच्यामध्यें ती सहजच अंतर्भूत आहेत. 
पंचभूतांवेगळें निर्गुण । तेथें नाहीं कर्तेपण ।
निर्विकारास विकार कोण । लाऊं शके ॥ २९ ॥
२९) पंचभूतांना वेगळें केलें कीं निर्गुण उरते. तेथें कर्तेपण नसतें. कर्तेपण हा विकार आहे. निर्विकार स्वरुपाला विकार लावता येत नाहीं.  
निर्गुणास कर्तव्य न घडे । सगुण जात्यांत सापडे ।
आतां कर्तव्यता कोणकडे । बरें पाहा ॥ ३० ॥
३०) येथें अडचण अशी कीं, निर्गुणाला कर्तेपण लावता येत नाहीं. सगुण हें निर्माण झालेले असल्यानें त्यास कर्तेपण देता येत नाहीं. मग अखेर कर्तेपण कोणाला द्यायचे हा प्रश्र्ण शिल्लक राहतो.  
लटिक्याचा कर्ता कोण । हें पुसणेंचि अप्रमाण ।
म्हणोनि हेंचि प्रमाण । जें स्वभावेंचि जालें ॥ ३१ ॥
३१) याचें उत्तर असें कीं, ब्रह्मवस्तूकडून पाहिलें तर सारें दृश्य विश्र्व लटकें आहे. भ्रम आहे. जें मुळांत नाहींच नाहीं, त्याचा कर्ता कोण हे विचारणे गैर आहे. म्हणून हें विश्र्व स्वभावतःच झालें असें म्हणणे योग्य आहे.   
येक सगुण येक निर्गुण । कोठें लाऊं कर्तेपण ।
या अर्थाचें विवरण । बरें पाहा ॥ ३२ ॥
३२) एक सगुण व दुसरे निर्गुण आहे. या दोन्हीपैकी कोणाकडेही सृष्टिचें कर्तेपण देतां येत नाहीं. या अर्थाचे विवेचन कसें तें पाहा. 
सगुणें सगुण केलें । तरी तें पूर्वींच आहे जालें ।
निर्गुणास कर्तव्य लाविलें । नवचे कीं कदा ॥ ३३ ॥
३३) सगुणानें सगुण निर्माण केलें असें म्हणावें तर सगुण आधीच निर्माण झालेलें आहे. याचा अर्थ असा कीं, सगुणाचा कर्ता सगुणाच्या आधींच असतो. तो सगुण निर्माण करतो. तो सगुणांत अंतर्भूत होत नाहीं. जें निर्गुण आहें तें निर्विकारी असल्यानें त्यास कर्तेपणाचा विकार स्पर्श करीत नाहीं. 
येथें कर्ताचि दिसेना । प्रत्यये आणावा अनुमाना ।
दृश्य सत्यत्वें असेना । म्हणोनियां ॥ ३४ ॥
३४) अशा रीतीनें विचार केला तर सृष्टिचा कोणी कर्ता आढळत नाहीं. या प्रत्ययावरुन असें अनुमान काढावें लागतें कीं, हें दृश्य विश्र्व खरें नाहीं. म्हणून अशी अडचण उत्पन्न होतें.   
केलें तें अवघेंच लटिकें । तरी कर्ता हें बोलणेंचि फिकें ।
वक्ता म्हणे रे विवेकें । बरें पाहा ॥ ३५ ॥
३५) कर्त्यानें जें केलें असें आपण म्हणतो तेंच जर मुळांत लटकें आहे, तर कर्ता कोण याची चौकशी व्यर्थ ठरते. वक्ता सांगतो कीं, याचा नीट विचार करुन तें समजून घ्या. 
बरें पाहातां प्रत्यये आला । तरी कां करावा गल्बला ।
प्रचित आलियां आपणाला । अंतर्यामी ॥ ३६ ॥
३६) नीट विचार करुन ही गोष्ट मनाला एकदां पटली कीं घोटाळा उरणार नाहीं. आपल्या अंतर्यामी याची प्रचीति मात्र आली पाहिजे.  
आतां असो हें बोलणें । विवेकी तोचि हें जाणे ।
पूर्वपक्ष लागे उडवणें । येरवीं अनुर्वाच ॥ ३७ ॥
३७) आतां हें बोलणें पुरें. जो विवेकीं असतो तोच हें जाणतो. पूर्वपक्षानें काढलेलें आक्षेप कसें सदोष आहेत हें दाखवावें लागतें. एरवी हा सिद्धांत शब्दानें वर्णन करतां येण्यासारखा नाहीं.    
तंव श्रोता करी प्रस्न । देहीं सुखदुःखभोक्ता कोण ।          
पुढें हेंचि निरुपण । बोलिलें असे ॥ ३८ ॥
३८) यावर श्रोत्यानें असा प्रश्र्ण केला कीं, " देहामध्यें सुख-दुःखाचा भोक्ता कोण? " पुढील समासांत या विषयाचे विवेचन आहे.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कर्तानिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava  Karta Nirupan
समास आठवा कर्ता निरुपण


Custom Search

No comments: