Tuesday, March 20, 2018

Samas Pahila Nispruha Lakshan समास पहिला निस्पृह लक्षण


Dashak Choudava Samas Pahila Nispruha Lakshan 
Samas Pahila Nispruha Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about the virtues of the Nispruha Sadhak . Nispruha means a Sadhak who has no attachment to the world and anybody, no wish and many more things. We will come to know in this Samas.
समास पहिला निस्पृह लक्षण
श्रीराम ॥
ऐका निस्पृहाची सिकवण । युक्ति बुद्धि शाहाणपण ।
जेणें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥
१) निस्पृह पुरुषाचे गुण कोणते तें आतां ऐका. ज्यामुळें मनाचे समाधान निरंतर टिकते. ती युक्ति, बुद्धि आणि शहाणपणाची स्थिती पुढीलप्रमाणें असतें.   
सोपा मंत्र परी नेमस्त । साधे वोषध गुणवंत ।
साधें बोलणें सप्रचीत । तैसें माझें ॥ २ ॥
२) एखादा मंत्र सोपा असतो परंतु खात्रीनें फळ देतो किंवा एखादे औषध साधे असते पण निश्र्चित गुण देते. त्याचप्रमाणें माझे बोलणे साधें आहे पण तें स्वानुभवाचे आहे.
तत्काळचि अवगुण जाती । उत्तम गुणाची प्राप्ती ।
शब्दवोषध तीव्र श्रोतीं । साक्षपें सेवावें ॥ ३ ॥
३) माझें बोलणें जर नीट ऐकलें तर अवगुण बघतां बघतां नाहींसे होतात. आणि उत्तम गुण अंगी जडतात. माझें बोलणें कडक औषधासारखें आहे. श्रोत्यांनी तें प्रयत्नपूर्वक ऐकावें.   
निस्पृहता धरुं नये । धरिली तरी सोडूं नये ।
सोडिली तरी हिंडों नये । वोळखीमधें ॥ ४ ॥
४) आधीं निःस्पृहता धरुं नये. पण जर धरली तर ती सोडूं नये. आणी जर ती सोडली तर ओळखीच्या लोकांत वावरु नये.  
कांता दृष्टी राखों नये । मनास गोडी चाखऊं नये ।
धारिष्ट चळतां दाखऊं नये । मुख आपुलें ॥ ५ ॥
५) बायकांच्याकडे डोळे भरुन पाहूं नये. कामवासनेच्या तृप्तीची गोडी मनाला लावूं नये. त्या बाबतींत आपलें मनसंयमन तुटलें तर लोकांना तोंड दाखवूं नये. 
येके स्थळीं राहों नये । कानकोंडें साहों नये । 
द्रव्य दारा पाहों नये । आळकेपणें ॥ ६ ॥
६) एका ठिकाणी फार दिवस राहूं नये. कोणाचे मिंधेपण सहसा करुं नये. पैसा आणि बायका यांच्याकडे आशाळभूत होऊन पाहूं नये.  
आचारभ्रष्ट होऊं नये । दिल्यां द्रव्य घेऊं नये ।
उणा शब्द येऊं नये । आपणावरी ॥ ७ ॥
७) आचारानें भ्रष्ट होऊं नये. कोणी द्रव्य दिल्यास तें घेऊं नये. कोणाचा उणा शब्द आपल्याकडे न येईल असेंच वागावें. 
भिक्षेविषीं लाजों नये । बहुत भिक्षा घेऊं नये ।
पुसतांहि देऊं नये । वोळखी आपली ॥ ८ ॥
८) भिक्षा मागण्यास लाजूं नये. भिक्षासुद्धा थोडी घ्यावी. कोणी चौकशी केली तर स्वतःबद्दल माहिती सांगू नये. 
धड मळिण नेसों नये । गोडअन्न खाऊं नये ।
दुराग्रह करुं नये । प्रसंगे वर्तावें ॥ ९ ॥
९) वस्त्र धड असावें मलिन असूं नये. गोड अन्न खाऊं नये. उगाच दुराग्रह नसावा व प्रसंग पाहून वागावें. 
भोगीं मन असों नये । देहदुःखें त्रासों नये ।
पुढें आशा धरुं नये । जीवित्वाची ॥ १० ॥
१०) सुख भोगावयास मिळावें असें मनांत असूं नये. देहदुःखाला कंटाळू नये. आपण आणखी जगावें अशी आशा धरुं नये.  
विरक्ती गळों देऊं नये । धारिष्ट चळों देऊं नये ।
ज्ञान मळिण होऊं नये । विवेकबळें ॥ ११ ॥
११) आपलें वैराग्य सांभाळून असावें. आपलें धैर्य खचूं देऊं नये. विवेकाच्या सामर्थ्यानें आपलें ज्ञान नेहमी ताजें ठेवावें, मलिन होऊं देवूं नये.  
करुणाकीर्तन सोडूं नये । अंतर्ध्यान मोडूं नये ।
प्रेमतंतु तोडूं नये । सगुणमूर्तीचा ॥ १२ ॥
१२) किर्तनामध्यें देवाची करुणा भाकावी. अंतःकरणांतील भगवंताचे ध्यान कधीं मोडूं नये. सगुणमूर्तीचा प्रेमसंबंध कधीं सोडूं नये. 
पोटीं चिंता धरुं नये । कष्टें खेद मानूं नये ।
समइं धीर सांडूं नये । कांहीं केल्यां ॥ १३ ॥
१३) मनामध्यें कशाची चिंता करुं नये. कष्ट पडले तर दुःख करुं नये. प्रसंग पडला असतां वाटेल तें झालें तरी धीर सोडूं नये.  
अपमानिता सिणों नये । निखंदिता कष्टों नये ।
धिःकारितां झुरों नये । कांहीं केल्यां ॥ १४ ॥ 
१४) कोणी अपमान केला तर नाराज होऊं नये. कोणी वर्म काढून बोललें तरी तें मनाला लावून घेऊं नये. कोणी तुच्छ लेखिलें तरी त्यामुळें झुरु नये.        
लोकलाज धरुं नये । लाजवितां लाजों नये ।
खिजवितां खिजों नये । विरक्त पुरुषें ॥ १५ ॥ 
१५) भकतीच लोक लाज बाळगूं नये. कोणी लाजवण्याचा प्रयत्न केला तरी त्यास बळी पडूं नये. कोणी चिडवण्याचा प्रयत्न केला तरी विरक्त पुरुषानें चिडूं नये. 
शुद्धमार्ग सोडूं नये । दुर्जनासीं तंडों नये ।
समंध पडों देऊं नये । चांडाळासी ॥ १६ ॥
१६) नेहमीं शुद्ध मार्गानेंच जावें. दुर्जनांशीं भांडण करुं नये. अति दुष्ट माणसाशी संबंध टाळावा.   
तपीळपण धरुं नये । भांडवितां भांडों नये ।
उडवितां उडऊं नये । निजस्थिती आपुली ॥ १७ ॥
१७) अंगीं तापटपणा नसावा. कोणी भांडण करण्याच्या भरीला घातलें तरी आपण भांडूं नये. आपलें स्वरुपानुसंधान भ्रष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी तें जसेंच्या तसें टिकवून धरावें.   
हांसवितां हासों नये । बोलवितां बोलों नये ।
चालवितां चालों नये । क्षणश्र्णा ॥ १८ ॥
१८) कोणी हसवण्याचा प्रयत्न केला तरी हंसूं नये. कोणी मुद्दाम बोलवण्याचा प्रयत्न केला तरी बोलूं नये. कोणी इकडे चला तिकडे चला असें म्हणून क्षणाक्षणाला चालवूं लागला तरी तसें करुं नये.  
येक वेष धरुं नये । येक साज करुं नये ।
येकदेसी होऊं नये । भ्रमण करावें ॥ १९ ॥
१९) एकच प्रकारचा वेश नसावा. एकच प्रकारची पद्धत (फँशन) नसावी. एकाच ठिकाणीं फार वेळ न राहतां हिंडत राहावें. 
सलगी पडों देऊं नये । प्रतिग्रह घेऊं नये ।
सभेमध्यें बैसों नये । सर्वकाळ ॥ २० ॥
२०) अतिपरिचय होऊं देऊं नये. कोणाकडून कांहीं घेऊं नये. सगळा वेळ सभेमध्यें, चार लोकांत बसूं नये.  
नेम आंगीं लाऊं नये । भरवसा कोणास देऊं नये ।
अंगीकार करुं नये । नेमस्तपणाचा ॥ २१ ॥
२१) कोणताही नियम लावून घेऊं नये. कोणाला आपल्या भरवश्यावर विसंबू देऊं नये. निश्र्चितपणाचा व नियमितपणाचा क्रम ठेवूं नये. 
नित्यनेम सांडूं नये । अभ्यास बुडों देऊं नये ।
परतंत्र होऊं नये । कांहीं केल्यां ॥ २२ ॥
२२) तरी नित्यनेम सोडूं नये. आपला साधनाभ्यास बुडूं देऊं नये. वाटेल तें झालें तरी परतंत्र होऊं नये. दुसर्‍याच्या आधीन जाऊं नये.  
स्वतंत्रता मोडूं नये । निरापेक्षा तोडूं नये ।
परापेक्षा होऊं नये । क्षणक्ष्णा ॥ २३ ॥
२३) आपली स्वतंत्रता सांभाळावी. आपली निरपेक्ष वृत्ति जोपासावी. पदोपदी दुसर्‍याकडून अपेक्षा करुं नये.  
वैभव दृष्टीं पाहों नये । उपाधीसुखें राहों नये ।
येकांत मोडूं देऊं नये । स्वरुपस्थितीचा ॥ २४ ॥
२४) वैभव, ऐश्र्वर्य डोळे भरुन पाहूं नये. उपाधीच्या सुखानें गुंतून राहूं नये. आपल्या स्वस्वरुपानुभवाचा एकान्त कधींच नाहींसा होऊं देऊं नये.   
अनर्गळता करुं नये । लोकलाज धरुं नये ।
कोठेंतरी होऊं नये । आसक्त कदां ॥ २५ ॥
२५) नितिबाह्य अमर्याद वर्तन करुं नये. लोकलाज बाळगूं नये. केव्हांही उगीच कोठे तरी गुंतून पडूं नये.  
परंपरा तोडूं नये । उपाधी मोडूं देऊं नये ।
ज्ञानमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥ २६ ॥
२६) आपणहून परंपरा तोडूं नये. उपासनेची उपाधी मोडूं देऊं नये. तरीपण ज्ञानमार्ग केव्हांही सोडूं नये.  
कर्ममार्ग सांडूं नये । वैराग्य मोडूं देऊं नये ।
साधन भजन खंडूं नये । कदाकाळीं ॥ २७ ॥
२७) कर्ममार्ग टाकूं नये. आपल्या वैराग्यास धक्का लागूं देऊं नये. आपलें साधन व भगवंताचे भजन कांहीं झालें तरी सोडूं नये.  
अतिवाद करुं नये । अनित्य पोटीं धरुं नये ।
रागें भरीं भरों नये । भलतीकडे ॥ २८ ॥
२८) कोणाशी फार वाद घालूं नये. अनीतिनें वागण्याची प्रवृत्ती नसावी. रागाच्या भरांत भलतीच गोष्ट करुं नये.   
न मनी त्यास सांगों नये । कंटाळवाणें बोलों नये ।
बहुसाल असों नये । येकें स्थळीं ॥ २९ ॥
२९) जो आपलें ऐकत नाहीं त्यास सांगण्याच्या नादीं लागूं नये. आपलें बोलणें उगाच कंटाळवाणें नसावें. एकाच ठिकाणी पुष्कळ काळ राहूं नये.  
कांहीं उपाधी करुं नये । केली तरी धरुं नये ।
धरिली तरी सांपडों नये । उपाधीमध्यें ॥ ३० ॥
३०) आधीं उपाधी निर्माण करुं नये. केली तर तिच्या मागें लागूं नये. तिच्यामागें लागलें तर तिच्यांत अडकूं नये. तिच्या आसक्तीमध्यें सांपडू नये.  
थोरपणें असों नये । महत्व धरुन बैसों नये ।
कांहीं मान इछूं नये । कोठेंतरी ॥ ३१ ॥
३१) आपण कोणी मोठे आहोत अशी भावना नसावी. आपलें महत्व घट्ट धरुन बसूं नये. कोठेंही कसल्याही मानाची इच्छा मनांत नसावी. 
साधेपण सोडूं नये । सानेपण मोडूं नये ।
बळात्कारें जोडूं नये । अभिमान आंगीं ॥ ३२ ॥
३२) आपलें साधेपण सोडूं नये. आपलें लहानपण मोडूं नये. उगीच जबरदस्तीनें अभिमान आपल्या अंगीं लावून घेऊं नये. 
अधिकारेवीण सांगों नये । दाटून उपदेश देऊं नये ।
कानकोंडा करुं नये । परमार्थ कदा ॥ ३३ ॥
३३) ज्याला ज्याची योग्यता नाहीं तें त्याला सांगूं नये. कोणासहि बळजबरीनें उपदेश देऊं नये. मिंधेपणाचा परमार्थ कधीहीं करुं नये. 
कठिण वैराग्य सोडूं नये । कठिण अभ्यास सांडूं नये ।
कठिणता धरुं नये कोणेकेविशइं ॥ ३४ ॥      
३४) वैराग्य प्रखर असावें. सपाटून अभ्यास करावा. कोणाशीहीं कठोरपणें वागूं नये. 
कठिण शब्द बोलों नये । कठिण आज्ञा करुं नये ।
कठिण धीरत्व सोडूं नये । कांहीं केल्यां ॥ ३५ ॥
३५) कोणालाही कठोर शब्द बोलूं नये. कोणाला पाळण्यास कठीण अशी आज्ञा करुं नये. वाटेल तें झालें तरी आपलें धैर्य मजबूत घट्ट ठेवावे.  
आपण आसक्त होऊं नये । केल्यावीण सांगों नये ।
बहुसाल मागों नये । शिष्यवर्गांसी ॥ ३६ ॥
३६) आपण कशांतही मनानें गुंतूं नये. आपण स्वतः केल्यावाचून दुसर्‍यास  सांगूं नये. शिष्याजवळ सहसा कांहीं मागूं नये.    
उत्धट शब्द बोलों नये । इंद्रियेंस्मरण करुं नये ।
शाक्तमार्गे भरों नये । मुक्तपणें भरी ॥ ३७ ॥
३७) उद्धट शब्द बोलूं नये. इंद्रियें व इंद्रियसुख यांचें स्मरण करुं नये. शाक्तमार्गानें जाऊन स्वच्छंदपणें वागण्याच्या भरीला पडूं नये. 
नीच कृतीं लाजों नये । वैभव होतां माजों नये ।
क्रोधें भरीं भरों नये । जाणपणें ॥ ३८ ॥
३८) हलकें काम करावयास लाजूं नये. वैभव मिळालें असतां उन्मत्त होऊं नये. समजून उमजून रागाच्या भरीला पडूं नये. 
थोरपणें चुकों नये । न्याये नीति सांडूं नये ।
अप्रमाण वर्तो नये । कांहीं केल्यां ॥ ३९ ॥
३९) मोठेपणामुळें गैरवर्तन करुं नये. नीतिन्यायाची मर्यादा सोडूं नये. वाटेल तें झालें तरी स्वैराचारानें वागूं नये. 
कळल्यावीण बोलों नये । अनुमानें निश्र्चय करुं नये ।  
सांगतां दुःख धरुं नये । मूर्खपणें ॥ ४० ॥
४०) जें कळलें नाहीं तें सांगूं नये. केवळ कल्पनेनें अमुक अमुक आहे असें निश्र्चितपणें सांगूं नये. कोणी कांहीं उत्तम गोष्ट सांगितली तर ती शिकावी, आपल्या अज्ञानाचें दुःख न मानावें. 
सावधपण सोडूं नये । व्यापकपण सांडूं नये ।
कदा सुख मानूं नये । निसुगपणाचें ॥ ४१ ॥
४१) सर्व बाबतींत दक्षता असावी. मनाचा मोठेपणा असावा. कधीहीं आळशीपणांत सुख वाटूं नये. 
विकल्प पोटीं धरुं नये । स्वार्थआज्ञा करुं नये ।
केली तरी टाकूं नये । आपणास पुढें ॥ ४२ ॥
४२) मनांत संशय धरुं नये. आपला स्वार्थ साधण्यासाठीं कोणास कांहीं आज्ञा करुं नये. तशी आज्ञा करण्याची वेळ आलीच तर तिच्यामध्यें फक्त आपल्याच पुरता फायदा नसावा. सगळ्यांचा असावा.  
प्रसंगेवीण बोलों नये । अन्वयेंवीण गाऊं नये ।
विचारेंवीण जाऊं नये । अविचारपंथे ॥ ४३ ॥
४३) प्रसंग पाहून बोलावें. योग्य असेल तर गावें. विचाराचा त्याग करुन अविचाराच्या मार्गानें जाऊं नये. 
परोपकार सांडूं नये । परपीडा करुं नये ।
विकल्प पडों देऊं नये । कोणीयेकासी ॥ ४४ ॥
४४) परोपकार करण्याचे सोडूं नये. दुसर्‍याला कधीं पीडा देऊं नये. दुसर्‍या कोणास आपल्याविषयीं विकल्प येऊं देवूं नये. 
नेणपण सोडूं नये । महंतपण सांडूं नये ।
द्रव्यासाठीं हिंडो नये । कीर्तन करीत ॥ ४५ ॥
४५) आपल्याला सर्व ज्ञान नाहीं ही भावना सोडूं नये. महंतपण सोडूं नये. पैसा मिळवण्यासाठीं कीर्तन करीत हिंडूं नये. 
संशयात्मक बोलों नये । बहुत निश्र्चये करुं नये ।
निर्वाहेंवीण धरुं नये । ग्रंथ हातीं ॥ ४६ ॥
४६) ऐकणार्‍याच्या मनांत संशय निर्माण होईल असें बोलूं नये. अनेक प्रकारचे निश्र्चय करुं नयेत. जेवढे निश्र्चय पाळणें शक्य आहे तेवढेंच करावेत. ग्रंथाचा उत्तम अभ्यास असल्याखेरीज तो लोकांना सांगण्यास हाती घेऊं नये. 
जाणपणें पुसों नये । अहंभाव दिसों नये ।
सांगेन ऐसें म्हणों नये । कोणीयेकासी ॥ ४७ ॥
४७) आपण सर्व जाणतो ही भावना धरुन कोणास प्रश्र्न विचारुं नये. आपल्या अहंकाराचे प्रदर्शन करुं नये. " मी सांगतों, त्यांत काय आहे " असे कोणास म्हणूं नये.   
ज्ञानगर्व धरुं नये । सहसा छळणा करुं नये ।
कोठें वाद घालूं नये । कोणीयेकासी ॥ ४८ ॥
४८) आपल्या ज्ञानाचा गर्व नसावा. सहसा कोणाचा बुद्धिभेद करुं नये. कोणाशीहिं कोठेहिं वाद घालूं नये. 
स्वार्थबुद्धी जडों नये । कारबारी पडों नये ।
कार्येकर्ते होऊं नये । राजद्वारीं ॥ ४९ ॥
४९) आपल्या अंगीं स्वार्थबुद्धि जडूं देऊं नये. कारभाराच्या कामांत पडूं नये. राजाच्या पदरीं काम स्वीकारु नये.  
कोणास भर्वसा देऊं नये । जड भिक्षा मागों नये ।
भिक्षेसाठीं सांगों नये । परंपरा आपुली ॥ ५० ॥
५०) कोणाला उगीच आश्र्वासनें देऊं नयेत. जड भिक्षा मागूं नये. भिक्षा घालावी म्हणून आपली गुरुपरंपरा व उपासना परंपरा सांगूं नये.  
सोइरिकींत पडों नये । मध्यावर्ति घडों नये ।
प्रपंचाची जडों नये । उपाधी आंगीं ॥ ५१ ॥
५१) कोणाची सोयरीक जमवण्यांत पडूं नये. कोठें मध्यस्थी करुं नये. प्रपंचाची उपाधी आपल्यामागे लागूं देऊं नये. 
प्रपंचप्रस्तीं जाऊं नये । बाष्कळ अन्न खाऊं नये ।
पाहुण्यासरिसें घेऊं नये । आमंत्रणें कदां ॥ ५२ ॥
५२) जेथें प्रपंचाचे प्रस्थ असेल तेथें आपण जाऊं नये. अपवित्र अन्न खाऊं नये. पाहुण्यांबरोबर आमंत्रणें घेऊं नयेत.  
श्राध पक्ष सटी सामासें । शांती फळशोबन बारसें ।
भोग राहाण बहुवसें । नवस व्रतें उद्यापनें ॥ ५३ ॥
५३) श्राद्ध, पक्ष, सटी, सहामास, शांति, फलशोभन, बारसें, नवस, भुताटकी, व्रतें, उद्यापनें वगैरे,  
तेथें निस्पृहें जाऊं नये । त्यांचें अन्न खाऊं नये ।
येळिलवाणें करुं नये । आपणासी ॥ ५४ ॥
५४) प्रसंगासाठीं निस्पृहानें जाऊं नये. ते थील अन्न खाऊं नये. तें अन्न खाल्ल्यानें ओशाळेपण येतें, तें येऊं देऊं नये. 
लग्नमुहूर्तीं जाऊं नये । पोटासाठीं गाऊं नये ।
मोलें कीर्तन करुं नये । कोठेंतरी ॥ ५५ ॥
५५) लग्नमुहुर्ताच्या प्रसंगीं जाऊं नये. पोटासाठीं गाणें गाऊं नये. कोठेही पैसे घेऊन किर्तन करुं नये.  
आपली भिक्षा सोडूं नये । वारें अन्न खाऊं नये ।
निस्पृहासि घडों नये । मोलयात्रा ॥ ५६ ॥
५६) आपलें भिक्षेचे व्रत सोडूं नये. वार लावून जेवूं नये. निस्पृहानें दुसर्‍याच्या पैशानें यात्रा करुं नये.   
मोठें सुकृत करुं नये । मोलपुजारी होऊं नये ।
दिल्हा तरी घेऊं नये । इनाम निस्पृहें ॥ ५७ ॥
५७) पैसे घेऊन पुण्यकर्म करुं नये. राजानेम किंवा इतर कोणी इनाम देऊं केलें तर निस्पृहानें तें घेऊं नये.  
कोठें मठ करुं नये । केला तरी तो धरुं नये ।
मठपती होऊन बैसों नये । निस्पृह पुरुषें ॥ ५८ ॥
५८) कोठेहीं मठ बांधूं नये. बांधल्यास त्याला धरुन राहूं नये. निस्पृह पुरुषानें मठपती बनून राहूं नये. 
निस्पृहें अवघेंचि करावें । परी आपण तेथें न संपडावें ।
परस्परें उभारावें । भक्तिमार्गासी ॥ ५९ ॥
५९) निस्पृहानें सारें कांहीं करावें पण मीपणानें आपण त्यामध्यें न सापडावे.  लोकांकडून परस्पर भक्तिमार्ग वाढीस लावावा. 
प्रेत्नेविण राहों नये । आळस दृष्टी आणूं नये ।
देह अस्तां पाहों नये । वियोग उपासनेचा ॥ ६० ॥ 
६०) त्यानें प्रयत्न केल्यावांचून राहूं नये. आळसाला समोरसुद्धा येऊं देवूं नये. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत उपासनेमधें खंड पडूं देवूं नये.  
उपाधीमध्यें पडो नये । उपाधी आंगीं जडों नये ।
भजनमार्ग मोडूं नये । निसंगळपणें ॥ ६१ ॥
६१) आपण उपाधीमध्यें पडूं नये. आपल्या अंगीं उपाधी चिकटू देऊं नये. भगवंताची उपासना व भजन नाकर्तेपणानें मोडूं नये.  
बहु उपाधी करुं नये । उपाधीविण कामा नये ।
सगुणभक्ति सोडूं नये । विभक्ति खोटी ॥ ६२ ॥
६२) निस्पृहानें फार उपाधी करुं नये. पण अगदी मुळींच उपाधीवाचून राहूं नये. त्यानें सगुणाची भक्ति सोडूं नये. पण देवाहून वेगळेंपणें राहणेही बरें नाहीं. सगुणाच्या भक्तिमध्यें देव आणि भक्त वेगळे असतात. पण अंतर्यामी भक्तानेम देवाशी तदाकार असावें.   
बहुसाल धांवों नये । बहुसाल राहों नये ।
बहुत कष्ट करुं नये । असुदें खोटें ॥ ६३ ॥
६३) फार धावाधाव नसावी. तसेंच फार एके ठिकाणी राहाणें नसावें. फार कष्ट करुं नयेत. तसेंच उगीच आळशी नसावें. 
बहुसाल बोलों नये । अबोलणें कामा नये ।
बहुत अन्न खाऊं नये । उपवास खोटा ॥ ६४ ॥
६४) फार बोलणें नसावें. तसेंच अगदी अबोल पण नसावें. फार अन्न खाऊं नये. तसेंच उपवास करुं नये. 
बहुसाल निजों नये । बहुत निद्रा मोडूं नये ।
बहु नेम धरुं नये । बाष्कळ खोटें ॥ ६५ ॥ 
६५) फार झोप घेऊं नये. तसेंच फार झोप मोडूं नये. फार नेम धरुं नयेत. तसेंच नियमविरहीत असूं नये. 
बहु जनीं असों नये । बहु आरण्य सेऊं नये ।
बहु देह पाळूं नये । आत्महत्या खोटी ॥ ६६ ॥
६६) फार वेळ लोकांत असूं नये. तसेंच सारखें अरण्यवासी होऊं नये. देहाला फार सांभाळूं नये. तसेंच त्याला मारुन टाकणेंही बरें नाही. 
बहु संग धरुं नये । संतसंग सांडूं नये ।
कर्मठपण कामा न ये । अनाचार खोटा ॥ ६७ ॥
६७) उगीच पुष्कळ लोकांची संगत धरुं नये. संतसज्जनांची संगत सोडूं नये. आचारामध्यें कर्मठपणा नसावा. तसेंच आचार विचारहीनही नसावा.  
बहु लोकिक सांडूं नये । लोकाधेन होऊं नये ।
बहु प्रीती काना नये । निष्ठुरता खोटी ॥ ६८ ॥
६८) फार लोकाचार सोडूं नये. पण अगदी लोकांच्या आधीन होऊं नये. कोणावरही फार प्रेम करुं नये. पण प्रेमहीनपणानेही वागूं नये. 
बहु संशये धरुं नये । मुक्तमार्ग कामा नये ।
बहु साधनीं पडों नये । साधनेंवीण खोटें ॥ ६९ ॥
६९) फार संशयी असूं नये. तसेंच अगदी बंधनरहितपणाही करुं नये. फार साधना करण्याच्या मागें लागूं नये. तसेंच साधनेवांचून राहूं नये. 
बहु विषये भोगूं नये । विषयत्याग करितां नये ।
देहलोभ धरुं नये । बहु त्रास खोटा ॥ ७० ॥
७०) फार इंद्रियसुख भोगूं नये. तसेंच इंद्रियसुख अगदी सोडूनही देऊं नये. देहाचा लोभ धरुं नये. पण देहाला फार त्रासही देऊं नये. 
वेगळा अनुभव घेऊं नये । अनुभवेंवीण कामा नये ।
आत्मस्थिती बोलों नये । स्तब्धता खोटी ॥ ७१ ॥
७१) प्रत्येक गोष्टीचा स्वतः वेगळा अनुभव घेण्याच्या मागें जाऊं नये. पण कांहीं गोष्टींचा अनुभव घेतल्याखेरीज राहूं नये. आपली अंतर्यामीची स्वरुपानुभूती उघडपणें बोलूं नये. पण तीच्याविषयीं अगदी मौन धरणेंही योग्य नव्हे.  
मन उरों देऊं नये । मनेंवीण कामा नये ।
अलक्ष वस्तु लक्षा नये । लक्षेंवीण खोटें ॥ ७२ ॥
७२) मन मारुन नाहींसे कराबें. मनाला शिल्लक उरुं देऊं नये. पण मनावांचून असतां कामा नये. सद्वस्तू ध्यानाच्या कक्षेंत येत नाहीं हें खरें पण ध्यानावांचून राहणें खरें नाहीं. 
मनबुद्धीअगोचर । बुद्धीवीण अंधकार ।
जाणीवेचा पडो विसर । नेणीव खोटी ॥ ७३ ॥
७३) ब्रह्मवस्तु मनाला आणि बुद्धीला आकलन होत नाहीं. मन व बुद्धी तिच्यापर्यंत पोचूं शकत नाहीत. पण बुद्धीनें विवेक केला नाहीं तर आंत बाहेर अज्ञानाचा अंधार राहतो. मीपणाच्या जाणीवेचा संपूर्ण विसर पडला पाहिजे. परंतु नुसती नेणीव बाळगणें खरें नाहीं.  
ज्ञातेपणा धरुं नये । ज्ञानेंवीण कामा नये ।
अतर्क्य वस्तु तर्का न ये । तर्केंवीण खोटें ॥ ७४ ॥
७४) " मी ज्ञाता आहे " असा ज्ञातेपणा अंगीं धरुं नये. पण ज्ञानावाचून असतां कामा नये. ब्रह्मवस्तु तर्काच्या पलीकडे असल्यानें तर्काच्या आवाक्यांत ती येत नाहीं. परंतु तर्काचा उपयोग केल्यावांचून राहाणें खरें नाहीं. 
दृश्यस्मरण कामा नये । विस्मरण पडों नये ।
कांहीं चर्चा करुं नये । केलीयावीण न चले ॥ ७५ ॥
७५) भगवंताच्या स्मरणा आड येते म्हणून दृश्याचें स्मरण करतां कामा नये. पण दृशाचे संपूर्ण विस्मरण होऊं नये. तसें झालें तर माणसाचा सर्व व्यवहार विस्कटेल. वायफळ चर्चा करुं नये. पण प्रसंगानुसार चर्चा केल्यावांचून चालत नाही. 
जगीं भेद कामा नये । वर्णसंकर करुं नये ।
आपला धर्म उडऊं नये । अभिमान खोटा ॥ ७६ ॥
७६) जगामध्यें भेद असतां कामा नये. पण भेद नको म्हणून वर्णसंकर करुं नये. आपण आपला धर्म सोडूं नये. पण धर्माचा दुराभिमान खरा नाहीं.   
आशाबद्धता बोलों नये । विवेकेंवीण चालों नये ।
समाधान हालों नये । कांहीं केल्यां ॥ ७७ ॥
७७) मनामध्यें स्वार्थीपणा किंवा कशाची अपेक्षा ठेवून बोलूं नये. विवेक केल्याखेरीज वर्तन करुं नये. काय वाटेल तें झालें तरी आपलें समाधान भंगूं देऊं नये. 
अबद्ध पोथी लेहो नये । पोथीवीण कामा नये ।
अबद्ध वाचूं नये । वाचिल्यावीण खोटें ॥ ७८ ॥
७८) अव्यवस्थितपणें ग्रंथ लिहूं नये. पण ग्रंथ लिहून घेतल्यावांचून राहूम नये. अव्यवस्थितपणेम ग्रंथ वाचूं नये. पण ग्रंथ वांचल्यावाचून राहूं नये.  
निस्पृहें वगत्रुत्व सांडूं नये । आशंका घेतां भांडों नये ।
श्रोतयांचा मानूं नये । वीट कदा ॥ ७९ ॥
७९) निस्पृह पुरुषानें निरुपण, प्रवचन करणें सोडूं नये. श्रोत्यांपैकी कोणी आक्षेप घेतल्यास त्यांच्याबरोबर भांडू नये. त्यांनी शंका घेणें हें अज्ञानाचे लक्षण आहे. श्रोत्यांचा कधी कंटाळा करुं नये. 
हे सिकवण धरितां चित्तीं । सकळ सुखें वोळगती । 
आंगीं बाणे महंती । अकस्मात ॥ ८० ॥
८०) जो कोणी ही शिकवण मनांत धारण करतो त्याला सगळी सुखें वश होतील. आणि त्याच्या अंगी एकदम महंतपणा बाणेल.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निस्पृहलक्षणनाम समास पहिला ॥
Samas Pahila Nispruha Lakshan
समास पहिला निस्पृह लक्षण


Custom Search

No comments: