Saturday, February 24, 2018

Samas Dusara Sarasar Nirupan समास दुसरा सारासार निरुपण


Dashak Terava Samas Dusara Sarasar Nirupan 
Samas Dusara Sarasar Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Sar and Asar. Samarth is asking us to think what is permanent and and what is temporary.
समास दुसरा सारासार निरुपण
श्रीरामसमर्थ ॥
ऐका सारासार विचार । उभारलें जगडंबर ।
त्यांत कोण सार कोण असार । विवेकें वोळखा ॥ १ ॥
१) आतां सारासार विचार ऐका. विश्र्वाचा हा जो मोठा पसारा समोर आहे, त्यांतून सार कोणतें व असार कोणतें हें विवेकानें ओळखावें.  
दिसेल तें नासेल । आणि येईल तें जाईल ।
जें असतचि असेल । तेंचि सार ॥ २ ॥
२) जें दिसतें तें नासतें, जें येतें तें जातें, हें असार होय. पण जें नेहमी सदैव आहेंच आहे तें सार होय.  
मागां आत्मानात्माविवेक बोलिला । अनात्मा वोळखोन सांडिला।
आत्मा जाणतां लागला । मुळींचा मूळतंतु ॥ ३ ॥
३) मागें आत्मानात्मविवेक सांगितला त्यांत जो अनात्मा त्याला ओळखून बाजूला काढला. आत्मा जाणून घेतां घेतां मुलांतील आरंभीचा धागा हाताला लागला. 
मुळीं जे राहिली वृत्ति । जाली पाहिजे निवृत्ति । 
सारासार विचार श्रोतीं । बरा पाहावा ॥ ४ ॥
४) वृत्ति मूळमायेपाशीं जाऊन बसली पण तेथून देखील ती निवृत्त झाली पाहिजे. यासाठीं श्रोत्यांनी सारासार विचारच केला पाहिजे.  
नित्यानित्य विवेक केला । आत्मा नित्यसा निवडिला । 
निवृत्तिरुपें हेत उरला । निराकारीं ॥ ५ ॥
५) नित्यानित्यविवेक बरोबर झाल्यानें नित्य अंतरात्मा निवडून तेथें वृत्ति चिकटवली, पण तेथून निवृत्त होऊन निराकारांत जावें हा हेतु शिल्लक राहतोच.   
हेत म्हणिजे तो चंचळ । निर्गुण म्हणिजे निश्र्चळ ।
सारासारविचारें चंचळ । होऊन जातें ॥ ६ ॥
६) हेतु हा अशाश्वतच असतो. आणि निर्गुण स्वरुप तर शाश्वत असतें. जें येतें तें जातें तें अशाश्वत असतें, हें सारासार विचार केल्यानें समजते.  
चळे म्हणोनि तें चंचळ । न चळे म्हणोनि निश्र्चळ ।
निश्र्चळीं उडे चंचळ । निश्र्चयेसीं ॥ ७ ॥
७) चळतें म्हणून त्यास चंचळ म्हणतात. चळत नाहीं म्हणून त्यास निश्र्चळ म्हणतात. निश्र्चळ स्वरुपांत चंचळतेला वाव नाहीं. हें निःसंशय समजावें.
ज्ञान आणि उपासना । दोनी येकचि पाहाना ।
उपासनेकरितां जना । जगोद्धार ॥ ८ ॥
८) अखेर ज्ञान व उपासना दोन्ही एकरुपच होतात. पण उपासनेमुळें जगाचा उद्धार होतों हें खरें. 
द्रष्टा साक्षी जाणता । ज्ञानधन चैतन्यसत्ता ।
ज्ञान देवचि तत्वता । बरें पाहा ॥ ९ ॥
९) द्रष्टा, साक्षी, जाणता, ज्ञानघन, चैतन्यसत्ता ज्ञान व देव ही सगळीं एकाच अंतरात्म्याची वेगवेगळीं नांवे आहेत. हें समजून घेणें जरुर आहे.  
त्या ज्ञानाचें विज्ञान होतें । शोधून पाहा बहुत मतें ।
चंचळ अवघें नासतें । येणें प्रकारें ॥ १० ॥
१०) या ज्ञानाचेच मग विज्ञान होतें. निरनिराळ्या अनेक मतांचा अभ्यास केला कीं असें आढळतें जेव्हां सारें चंचळ नाहींसे होतें तेव्हां ज्ञानाचे विज्ञान होते. 
नासिवंत नासेल किं नासेना । ऐसा अनुमानचि आहे मना ।
तरी तो पुरुष सहसा ज्ञाना । अधिकारी नव्हे ॥ ११ ॥
११) आत्मानात्मविवेकानें जें नाशवंत आहे असे ठरलें तें नाश पावतें किंवा नाहीं असा संदेह जोपर्यंत असतो तोपर्यंत माणूस ज्ञानाचा अधिकारी होत नाहीं.
नित्य निश्र्चये केला । संदेह उरतचि गेला ।
तरी तो जाणावा वाहावला । माहा मृगजळीं ॥ १२ ॥
१२) अनात्म नाशवंत आहे असा निश्र्चय नेहमी केला आणि तरीसुद्धा त्याबद्दल संशय राहीला, तर तो माणूस दृश्याच्या मोहांत अडकून वाहावला आहे असें समजावें.  
क्षयेचि नाहीं तो अक्षई । व्यापकपणें सर्वां ठाईं ।
तेथें हेत संदेह नाहीं । निर्विकारी ॥ १३ ॥
१३) परब्रह्माला कधीहीं क्षय नाहीं म्हणून तें अक्षय असतें. व्यापकपणें तें सर्वत्र भरुन राहीलेलें आहे. अशा त्या निर्विकार स्वरुपांत हेतु व संशय याला जागाच नाहीं. 
जें उदंड घनदाट । आद्य मध्य सेवट ।
अचळ अढळ अतुट । जैसें तैसें ॥ १४ ॥
१४) निश्चळ परब्रह्म अति विशाल आहे. आणि सगळीकडे अगदी दाटपणें भरुन आहे. आरंभ, मध्य व शेवट या तिन्ही अवस्थांत तें अगदी जसेंच्या तसें अचळ, अढळ व अतूट असतें. 
पाहाता जैसें गगन । गगनाहून तें सघन ।        
जनचि नाहीं निरंजन । सदोविरहदित ॥ १५ ॥
१५) त्याचा अनुभव आला म्हणजे तें आकाशासारखें वाटतें. परंतु आकाशापेक्षांही तें अधिक दाट आहे. आकाशाशिवाय एखादें ठिकाण सापडेल पण ब्रह्मविरहीत असें ठिकाण आढळणार नाहीं. ज्याच्या ठिकाणीं प्राण्यांचा संबंध नाहीं असें तें निरंतर निरंजनपणानें असतें.  
चर्मचक्षु ज्ञानचक्षु । हा तों अवघाच पूर्वपक्षु ।
निर्गुण ठाईंचा अलक्षु । लक्षवेना ॥ १६ ॥
१६) चर्मचक्षूनें अनुभव घेणें हीं देहबुद्धीची भूमिका, तर ज्ञानचक्षूनें अनुभव घेणें ही आत्मबुद्धीची भूमिका होय. पण या दोन्ही भूमिका ब्रह्मानुभवाच्या अलीकडील आहेत. निर्गुण ब्रह्मरुप हे स्वभावतःच जाणण्याच्या पलीकडे असल्यानें त्यास जाणूं म्हटलें तरी जाणता येत नाहीं.  
संगत्यागेंविण कांहीं । परब्रह्म होणार नाहीं । 
संगत्याग करुन पाहीं । मौन्यगर्भा ॥ १७  ॥
१७) मीपणाचा संपूर्ण त्याग झाल्यावाचून कोणालाही ब्रह्मस्वरुप होता येत नाहीं. म्हणून साधकानें मीपणाचा निःशेष त्याग करावा. आणि मौनगर्भ म्हणजे शब्दातीत असणारें परब्रह्म अनुभवावें.  
निर्शतां अवघेंचि निर्शलें । चंचळ तितुकें निघोन गेलें ।
निश्र्चळ परब्रह्म उरलें । तेंचि सार ॥ १८ ॥
१८) असाराचें निरसन करतां करतां सारें असार बाजूस सरलें, जेवढें अशाश्वत होतें, तें सगळें नाहीसें झालें; मगजें निश्र्चळ परब्रह्म उरलरं तेंच सार होय.  
आठवा देह मूळमाया । निर्शोन गेल्या अष्टकाया ।
साधु सांगती उपाया । कृपाळुपणें ॥ १९ ॥
१९) पिंडब्रह्मांडांच्या देहापैकी आठवा देह म्हणजे मूळमाया होय. तिच्यास आठही देहांचा निरास करण्याची तयारी झाल्यावर साधुपुरुष अतिकृपाळूपणें ब्रह्मज्ञानाचा उपाय सांगतात.  
सोहं हंसा तत्वमसी । तें ब्रह्म तूं आहेसी ।
विचार पाहातां स्थिति ऐसी । सहजचि होतें ॥ २० ॥
२०) सः अहं म्हणजे तो मी आहे, हंसः म्हणजे अहं सः म्हणजे मी तो आहे. तत्त्वमसि म्हणजे तें ब्रह्म तूंच आहेस. साधकानें सारासार विचार केल्यास आपलें ब्रह्मस्वरुप सहज अनुभवास येते.   
साधक असोन ब्रह्म उरलें । तेथें वृत्तिसुन्य जालें ।
सारासार विचारिलें । येणें प्रकारें ॥ २१ ॥
२१) साधकपणानें राहून संपूर्णसंग त्याग केला कीं केवल ब्रह्म उरतें. साधकाची वृत्तिशून्य अवस्था होते. सारासार विचारानें हेंच साधायचे असतें.  
तें तापेना ना निवेना । उजळेना ना नासेना ।
डहुळेना ना निवळेना । परब्रह्म तें ॥ २२ ॥
२२) तें परब्रह्म तापत नाहीं निवत नाहीं. तें चकचकीत होत नाहीं कीं काळवंडत नाहीं. तें ढवळून गढूळ होत नाहीं कीं निवळून स्वच्छ होत नाहीं. 
दिसेना ना भासेना । उपजेना ना काळवंडेना ।
तें येना ना जाईना । परब्रह्म तें  ॥ २३ ॥    
२३) तें इंद्रियांना दिसत नाहीं आणि मनाला भासत नाहीं. तें उत्पन्न होत नाहीं व नाश पावत नाहीं, तें येत नाहीं व जात नाही. 
तें भिजेना ना वाळेना । तें विझेना ना जळेना ।
जयास कोणीच नेईना । परब्रह्म तें ॥ २४ ॥
२४) तें भिजत नाहीं वा वाळत नाहीं, तें जळत नाहीं आणि विझत नाहीं, त्यास कोणीही कोठे नेऊं शकत नाहीं. 
जें सन्मुख चि चहुंकडे । जेथें दृश्य भास उडे ।
धन्य साधु तो पवाडे । निर्विकारीं ॥ २५ ॥
२५) चहुकडे जिकडे बघाल तिकडे तें समोर उभें राहातें. त्याच्या ठिकाणी सार्‍या दृश्याचा भास नाहींसा होतो. अशा त्या निर्विकार ब्रह्माशी तदाकार होतो तो मोठा साधु होय. 
निर्विकारी कल्पनातीत । तोचि वोळखावा संत ।
येर अवघेचि असंत । भ्रमरुप ॥ २६ ॥
२६) स्वतः कल्पनातीत होऊन जो निर्विकल्प ब्रह्मामध्यें लीन होतो तोच संत म्हणून ओळखावा. बाकीचे सगळे मायेच्या कक्षेंतील असंत समजावेत. ते भ्रमरुप असतात. 
खोटें सांडून खरें घ्यावें । तरीचं परीक्षवंत म्हणावें ।
असार सांडून सार घ्यावें । परब्रह्म तें ॥ २७ ॥ 
२७) जो खोटे बाजूल सारुन खरें ग्रहण करतो, त्याला परीक्षावंत म्हणतात. म्हणून जाणत्यानें भ्रमरुप असार टाकून परब्रह्मस्वरुप सार तें घ्यावें.
जाणतां जाणतां जाणीव जाते । आपली वृत्ति तद्रूप होते ।
आत्मनिवेदन भक्ति ते । ऐसी आहे ॥ २८ ॥
२८) सार जाणतां जाणतां अखेर आपली जाणीव नाहींशी होतें, वृत्ति ब्रह्मस्वरुपाशी तदाकार होतें. खरी आत्मनिवेदन भक्ति अशी आहे. 
वाच्यांशें भक्ति मुक्ति बोलावी । लक्ष्यांशें तद्रूपता विवरावी ।
विवरतां हेतु नुरावी । ते तद्रूपता ॥ २९ ॥
२९) भक्ति आणि मुक्ति यांचें शब्दांनीं वर्णन करावें. त्या शब्दांचा अर्थ ध्यानांत घेऊन तद्रूपता कशी असते तें बुद्धिनें आकलन करावें. त्यावर चिंतन करतांकरतां मी पण नाहींसें झालें की तद्रूपता साधते.  
सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप । स्वस्वरुप म्हणिजे आपलें रुप ।
आपलें रुप म्हणिजे अरुप । तत्वनिर्शनाउपरी ॥ ३० ॥
३०) जें परब्रह्म सद्रुप आहे व चिद्रूप आहे त्याच्याशी आपलें स्वस्वरुप तद्रूप आहे, पण सर्व तत्वांचें निरसन झाल्यावर आपलें रुप अरुपच आहे असा अनुभव येतो.    
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सारासारनिरुपणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara  Sarasar Nirupan 
समास दुसरा सारासार निरुपण


Custom Search

No comments: