Dashak Barava Samas Tisara Bhakta Nirupan
Samas Tisara Bhakta Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us that Prapancha and Parmarth both are essential. For a success in Prapancha you have to follow a knowledgeable person, while to be success in Parmarth Guru is required.
समास तिसरा भक्तनिरुपण
श्रीराम ।
पृथ्वीमधें बहुत लोक । तेंहि पाहावा विवेक ।
इहलोक आणि परलोक । बरा पाहावा ॥ १ ॥
१) जगांत पुष्कळ माणसें आहेत त्यांनी विवेकपूर्वक वागावे. इहलोक व परलोक या दोहीचा विचार करावा.
इहलोक साधायाकारणें । जाणत्याची संगती धरणें ।
परलोक साधायाकारणें । सद्गुरु पाहिजे ॥ २ ॥
२) या जगांत यश मिळविण्यासाठी जाणत्याची साथ धरावी. परमार्थांत यश मिळण्यासाठीं सद्गुरु अवश्य पाहिजे.
सद्गुरुसी काये पुसावें । हेंहि कळेना स्वभावें ।
अनन्यभावें येकभावें । दोनी गोष्टी पुसाव्या ॥ ३ ॥
३) सद्गुरुंना काय विचारावें हें कांहीं पुष्कळ लोकांना कळत नाहीं. त्यांच्याशी अनन्य होऊन या दोन गोष्टी त्यांना विचाराव्यात.
दोनी गोष्टी त्या कोण । देव कोण आपण कोण ।
या गोष्टीचें विवरण । केलेंचि करावें ॥ ४ ॥
४) त्या दोन गोष्टी अशा १) देव कोण ? २) आपण किंवा मी कोण ? विवेकानें या गोष्टींचे वारंवार मनन करावें.
आधीं मुख्य देव तो कोण । मग आपण भक्त तो कोण ।
पंचीकर्ण माहावाक्यविवरण । केलेंचि करावें ॥ ५ ॥
५) प्रथम मुख्य देव तो कोणता ? मग आपण भक्त तो कोण आहे ? हे दोन प्रश्र्न आहेत. यांची उत्तरे सांपडण्यास पंचीकरणाचा व महावाक्यांचा विचार पुनः पुनः करावा.
सकळ केलियाचें फळ । शाश्वत वोळखावें निश्र्चळ ।
आपण कोण हा केवळ । शोध घ्यावा ॥ ६ ॥
६) शाश्वत व निश्र्चळ परब्रह्म ओळखणें हेंच सर्व परमार्थ केल्याचे फळ आहे. केवळ शुद्ध मी कोण आहे याचाहि शोध घ्यावा.
सारासार विचार घेतां । पदास नाहीं शाश्वतता ।
आधी कारण भगवंता । वोळखिलें पाहिजे ॥ ७ ॥
७) शाश्वत काय व अशाश्वत काय याचा विचार केला तर असें आढळतें कीं या दृश्य विश्वांतील एकाही ठिकाणास शाश्वतता नाहीं. या सर्वांचे आदिकारण जो परमात्मा त्याला ओळखणें जरुर आहे.
निश्र्चळ चंचळ आणी जड । अवघा मायेचा पवाड ।
यामधें वस्तु जाड । जाणार नाहीं ॥ ८ ॥
८) या दृश्य विश्वांत निश्चल, चंचल आणि जड असा विविध भेद आढळतो. पण हा सगळा मायेचा पसारा आहे. शाश्वत ब्रह्म या पलीकडे आहे.
तें परब्रह्म धुंडावें । विविकें त्रैलोक्य हिंडावें ।
माईक विचारें खंडावें । परीक्षवंतीं ॥ ९ ॥
९) तें परब्रह्म शोधून काढावें, यासाठीं विवेकाच्या बळावर मनानें त्रैलोक्यांत हिंडून यावें. जें जें मायानिर्मित आहें तें तें विचारानें बाजूस सारावें हेंच खर्या परीक्षावंताचें काम समजावें.
खोटें सांडून खरें घ्यावें । परीक्षवंतीं परीक्षावें ।
मायेचें अवघेंचि जाणावें । रुप माईक ॥ १० ॥
१०) जो खरी परीक्षा करणार आहे त्यानें खरें खोटे तपासावें, खोटे बाजूस टाकून खरें तेवढें स्वीकारावें. मायेनें निर्माण केलेले सर्व पदार्थ खरें वाटलें तरी ते खरें कायमस्वरुपी नााहींत हें पक्के ओळखावे.
पंचभूतिक हे माया । माईक जाये विलया ।
पिंडब्रह्मांड अष्टकाया । नासिवंत ॥ ११ ॥
११) मायेचा पसारा पंचभूतांनीं भरलेला आहे. पांचभौतिक वस्तु सार्या नाशवंत असतात. या दृष्टीनें पिंड, ब्रह्मांड व त्यांचे आठ देह सारे नाशवंत आहेत.
दिसेल तितुकें नासेल । उपजेल तितुकें मरेल ।
रचेल तितुकें खचेल । रुप मायेचें ॥ १२ ॥
१२) जें जें इंद्रियांना दिसते तें तें नाश पावते. जें जन्मतें तें मरते. जें बनविलें जातें तें मोडतें. हें सगळें मायेचेच रुप आहे.
वाढेल तितुकें मोडेल । येईल तितुकें जाईल ।
भूतांस भूत खाईल । कल्पांतकाळीं ॥ १३ ॥
१३) जें वाढतें ते सर्व मोडतें. जें येते तें सर्व जातें. कल्पांच्यावेळीं एक महाभूत दुसर्यास गिळून टाकते.
देहधारक तितुके नासती । हे तों रोकडी प्रचिती ।
मनुष्येंविण उत्पत्ति । रेत कैंचें ॥ १४ ॥
१४) देह धारण करणारे प्राणी नाश पावतात. हें प्रत्यक्ष अनुभवास येते. माणसावाचून माणूस उत्पन्न होत नाही. वीर्यावाचून उत्पत्ती होत नाही.
अन्न नस्तां रेत कैंचें । वोषधी नस्तां अन्न कैंचें ।
वोषधीस जीणें कैंचें । पृथ्वी नस्तां ॥ १५ ॥
१५) अन्नावाचून वीर्य उत्पन्न होत नाही. वनस्पतीवाचून अन्न निर्माण होत नाहीं. पृथ्वीवाचून वनस्पती होत नाहीत.
आप नस्तां पृथ्वी नाहीं । तेज नस्तां आप नाहीं ।
वायो नस्तां तेज नाहीं । ऐसें जाणावें ॥ १६ ॥
१६) पाणी नाहीं तर पृथ्वी नाही. तेज नाहीं तर पाणी नाही. वायु नाहीं तर तेज नाहीं असा क्रम समजावा.
अंतरात्मा नस्तां वायो कैंचा । विकार नस्तां अंतरात्मा कैंचा ।
निर्विकारीं विकार कैंचा । बरें पाहा ॥ १७ ॥
१७) अंतरात्मा नसेल तर वायु उत्पन्न होत नाहीं. मूळमायेचा विकार नसेल तर अंतरात्मा असत नाहीं. परंतु निर्विकार परब्रह्मांत दिसणारा विकार खरा आहे कां याचा नीट विचार करावा.
पृथ्वी नाहीं आप नाहीं । तेज नाहीं वायो नाहीं ।
अंतरात्मा विकार नाहीं । निर्विकारीं ॥ १८ ॥
१८) निर्विकार परब्रह्मामध्यें पृथ्वी, आप, तेज व वायु ; तसेंच अंतरात्मा आणि मूळमाया यापैकीं काहींच आढळत नाही.
निर्विकार जें निर्गुण । तेचि शाश्वताची खूण ।
अष्टधा प्रकृति संपूर्ण । नासिवंत ॥ १९ ॥
१९) निर्गुण, निर्विकार वस्तु हीच शाश्वताची खूण आहे. अष्टधा प्रकृति संपूर्णपणें नाशवंत आहे.
नासिवंत समजोन पाहिलें । तों तें अस्तांचि नस्तें जालें ।
सारासारें कळों आलें । समाधान ॥ २० ॥
२०) सगळें दृश्य नाशवंत आहे हें ओळखून राहिलें म्हणजे तें असून नसल्यासारखें होते. सारासार विचारानें समाधान काय आहे तें बरोबर आकलन होतें.
विविकें पाहिला विचार । मनास आलें सारासार ।
येणें करितां विचार । सदृढ जाला ॥ २१ ॥
२१) शाश्वत शोधून काढण्यासाठीं विचार करुं लागल्यावर सार कोणतें व असार कोणतें याचा निश्चय मनांत होतो. हा निश्र्चय झाला कीं आत्मानात्म विचार बलवान बनतो.
शाश्वत देव तो निर्गुण । ऐसी अंतरीं बाणली खूण ।
देव कळला मी कोण । कळलें पाहिजे ॥ २२ ॥
२२) देव शाश्वत आहे, निर्गुण आहे अशी खूण स्वानुभवानें पटली, देव कोण तें कळलें. आतां मी कोण हें कळणें जरुर आहे.
मी कोण पाहिजे कळलें । देहतत्व तितुकें शोधिलें ।
मनोवृत्तीचा ठाईं आलें । मीतूंपण ॥ २३ ॥
२३) मी कोण हें कळायला पाहिजे असेल तर देहामधील तत्वें शोधलीं पाहिजेत. तीं शोधून पाहिलीं तर असें समजतें कीं मनांत उत्पन्न होणार्या वृत्तीमध्यें मी-तूंपणाचें मूळ आहे.
सकळ देहाचा शोध घेतां । मीपण दिसेना पाहातां ।
मीतूंपण हें तत्वता । तत्वीं मावळलें ॥ २४ ॥
२४) स्थूल, सूक्ष्म आणि कारण या सगळ्या देहांत शोध घेतला तर हा खोटा मीपणा कोठें दिसत नाहीं. त्या शोधांत सारें मी-तूंपण पंचत्त्वामधें विलीन होऊन जाते.
दृश्य पदार्थचि वोसरे । तत्वें तत्व तेव्हां सरे ।
मीतूंपण हें कैंचें उरे । तत्वता वस्तु ॥ २५ ॥
२५) त्याच शोधांत दृश्य पदार्थ मिथ्यापनें बाजूला सरतात. एक त्तव दुसर्यामध्यें लय पावतें, त्या ठिकाणीं मी तूंपणा उरण्यास जागाच राहात नाहीं. केवळ ब्रह्मवस्तु तेवढी शिल्लक उरते.
पंचीकर्ण तत्वविवर्ण । माहावाक्यें वस्तु आपण ।
निसंगपणें निवेदन । केले पाहिजे ॥ २६ ॥
२६) पंचीकरण, तत्वविवरण किंवा महावाक्या चिंतन या सर्वांचा भावार्थ असा आहे कीं, आपण परमात्मस्वरुप आहोत. तसा अनुभव येण्यास आपण अनासक्त होऊन आत्मवस्तुशी तदाकार झालें पाहिजे.
देवाभक्तांचे मूळ । शोधून पाहातां सकळ ।
उपाधीवेगळा केवळ । निरोपाधी आत्मा ॥ २७ ॥
२७) देव आणि भक्त यांचे मूळ शोधून पाहिलें तर सर्व उपाधीरहित असा आत्मा शिल्लक उरतो.
मीपण तें बुडालें । विवेकें वेगळेपण गेलें ।
निवृत्तिपदास प्राप्त जालें । उन्मनीपद ॥ २८ ॥
२८) अशा रीतीनें मीपण नाहींसे झालें आत्मानात्म विवेकानें वेगळेपण नाहींसे झालें. म्हणजे वृत्तिरहित अवस्था येऊन उन्मनीपद प्राप्त होते.
विज्ञानीं राहिलें ज्ञान । ध्येये राहिलें ध्यान ।
सकळ कांहीं कार्याकारण । पाहोन सांडिलें ॥ २९ ॥
२९) ज्ञानाचें रुपांतर विज्ञानांत होते. ध्यान ध्येयमय बनतें, कार्यकारण भावामध्यें अंतर्भूत होणारें सारें द्वैतमय दृश्य बाजूला सारलें जाते.
जन्ममरणाचें चुकलें । पाप अवघेंचि बुडालें ।
येमयातनेचें जालें । निसंतान ॥ ३० ॥
३०) जन्ममरणाचें चक्र संपतें, सगळें पाप विलयास जाते, यमयातनेच्या तावडींतून सुटका होते.
निर्बंद अवघाचि तुटला । विचारें मोक्ष प्राप्त जाला ।
जन्म सार्थकचि वाटला । सकळ कांहीं ॥ ३१ ॥
३१) सर्व प्रकारची बंधनें तुटतात. ब्रह्मविचारानें मोक्ष प्राप्त होतो. आणि जन्माचे संपूर्ण सार्थक झालें असें वाटते.
नाना किंत निवारले । धोके अवघेचि तुटले ।
ज्ञानविवेकें पावन जाले । बहुत लोक ॥ ३२ ॥
३२) नाना प्रकारचे संशय विलयास जातात. सर्व संकटें नाहीशी होतात. अशा रीतीनें आत्मज्ञान आणि आत्मानात्मविवेक यांच्या साहाय्यानें पुष्कळ लोक पावन झालें.
पतितपावनाचे दास । तेहि पावन करिती जगास ।
ऐसी हे प्रचित मनास । बहुतांच्या आली ॥ ३३ ॥
३३) पतितांना पावन करणार्या परमात्म्याचे दास देखील जगाला पावन करतात. असा प्रत्यक्ष अनुभव खूप लोकांना आलेला आहे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भक्तनिरुपणनाम समास तिसरा ॥
Samas Tisara Bhakta Nirupan
समास तिसरा भक्तनिरुपण

Custom Search
No comments:
Post a Comment