Tuesday, January 6, 2015

DeviMahatmya Adhyay 9 श्रीदेवीमहात्म्य अध्याय (९) नववा


DeviMahatmya Adhyay 9 
DeviMahatmya Adhyay 9 is in Marathi. It is a translation of Durga SaptaShati Adhyay 9 which is in Sanskrit. Translation is very nicely done by Shri Rambaba Vernekar.
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (९) नववा
श्रीगणेशाय नमः । श्रीचंडिकायै नमः ।
शौनकादि म्हणती सूतासी । सुरथ राजा म्हणे मेधाऋषी ।
विचित्र हे आख्यान आम्हांसी । निरुपिलें स्वामिया ॥ १ ॥
देवीचे हें चरित्र अगाध । त्यांत रक्तबीजाचा वध ।
तो आम्हीं ऐकिला सावध । चित्त आपुलें करुनियां ॥ २ ॥
पुन्हां ऐकावयालागून । इच्छीतसें माझें मन ।
रक्तबीज पावलिया मरण । पुढें काय वर्तले ॥ ३ ॥
शुंभ निशुंभ दोघे परम । काय करिते जाहले कर्म ।
त्यांचा आम्हां युद्धधर्म । निरुपावा स्वामिया ॥ ४ ॥
ऋषि म्हणे नृपालागूनी । आतां सावध व्हावें मनीं ।
रक्तबीज पडतां रणीं । सर्व सैन्य विध्वंसिले ॥ ५ ॥
नाश जाहला हें पाहून । क्रोधें भरला शुंभ जाण । 
रागें निशुंभही तत्क्षण । युद्धालागीं निघाला ॥ ६ ॥
त्यांच्या उभयभागी अग्रपृष्ठीं । असंख्य निघाले असुरजेठी ।
क्रोधें चावूनि ओष्ठपुटी । देवीवरी चालिले ॥ ७ ॥
शुंभही घेऊनि असुरसेना । क्रोधें निघता जाहला रणा ।
युद्ध देऊनि मातृगणा । देवीवरी धांवला ॥ ८ ॥
तेव्हां शुंभ-निशुंभांचे । युद्ध देवीशीं जाहलें निकराचें ।
भयेंकरुनि सकळ देवांचे । धैर्य खचले सर्वही ॥ ९ ॥
बाणपर्जन्याच्या धारा । त्यांमाजी शिरें वर्षती गारा ।
अशुद्धजळाचे एकसरा । चालिले पूर तुंबळ ॥ १० ॥
गज-तुरग-रथांसहित । पदातीही चालिले वाहात ।
असंख्य असुरांचा होय घात । प्रलय थोर वर्तला ॥ ११ ॥
देवीनें सोडोनि आपुले बाण । छेदिले दैत्यांचे शर निर्वाण ।
शुंभ-निशुंभांचे अंगी जाण । ताडण करिती जाहली ॥ १२ ॥
खड्ग घेऊनि तीव्रधार । निशुंभं धांवूनि सत्वर ।
क्रोधें सिंहाच्या मस्तकावर । ताडण करिता जाहला ॥ १३  ॥ 
मग देवीनें तीव्र शरेंकरुन । खड्ग पाडिला छेदून ।      अष्टचंद्र रेखित जाण । ऐसी ढालही छेदिली ॥ १४ ॥
ढाल तरवार छेदिली । पाहोनि शक्ति मोकलिलि ।   
जिची त्रैलोक्यीं प्रभा पडली । कडकडोनि आली ती ॥ १५ ॥
तंव त्या शक्तीतें पाहून । देवीनें सोडिलें सुदर्शन ।
वरचेवरी द्विधा करुन । क्षणमात्रें टाकिली ॥ १६ ॥
निशुंभ क्रोधावला ते अवसरीं । त्रिशूल टाकिला देवीवरी । 
देवीनें तो मुष्टिप्रहारीं । चूर्ण केला क्षणार्धे ॥ १७ ॥
मग गदा तोलोनि असुर । टाकिता जाहला देवीवर ।
ती देवीनें त्रिशूलें सत्वर । भस्म केली क्षणमात्रें ॥ १८ ॥
त्यानंतर परशु घेऊनी । धांवता जाहला तये क्षणीं ।
देवीनें तीव्र बाण मारोनी । भूमीवरी मूर्छित पाडिला ॥ १९ ॥   
निशुंभ पडतां भूमीवर । क्रोधें शुंभ धांवला सत्वरी । 
बैसोनियां रथांतरीं । आयुधें धरी करांत ॥ २० ॥
अष्टभुज तयालागून । त्यांत अतुल अष्टायुधें जाण ।
त्यांही व्यापोनि सर्व गगन । शोभता जाहला ते काळीं ॥ २१ ॥
शुंभ आला हें देखून । देवीनें शंख वाजविला पूर्ण ।
धनुष्यटणत्कारेंकरुन । ब्रह्मांड हें गाजविलें ॥ २२ ॥
त्यांत घंटानादाचा ध्वनी । नाद भरला दिग्गजकर्णी ।
तो नाद असुर ऐकोनी । पाठीं दडती शुंभाच्या ॥ २३ ॥
त्यांत वाद्यांचा घोष अपार । असुर गर्जती भयंकर ।
स्वर्ग मृत्यु पाताळ अंबर । नादें भरलें सर्वही ॥ २४ ॥
त्यांत सिंहाची आरोळी । नाद भरला ब्रह्मांडगोळीं ।
प्रतिध्वनी अंतराळीं । भयंकर जाहला ॥ २५ ॥
पृथिवी थरारली अंतरी । शेष टाकों पाहे सत्वरी । चतुर्दश लोकांभीतरी । प्रलयकाल वर्तला ॥ २६ ॥
दिग्गज जाहले मूर्च्छागत । इतरांचा जाहला अंत ।
गतप्राण असंख्यात । दैत्य जाहले ते काळीं ॥ २७ ॥
त्यांत काली उड्डाण करोन । दोहीं करांतें उभारुन ।
आकाश-पृथ्वीतें ताडन । करिती जाहली ते काळीं ॥ २८ ॥
ब्रह्मांड गर्जिले ऐसा नाद । पूर्वी जाहला जो प्रसिद्ध ।
कालीची गर्जना अगाध । पूर्वनाद लोपला ॥ २९ ॥
त्यांत शिवदूतीची गर्जना । त्रास पावली असुरसेना ।
क्रोधावला शुंभराणा । मारुं पाहे देवीते ॥ ३० ॥
देवी म्हणे तयालागून । तिष्ठ तिष्ठ असुरा क्षण ।
सर्व देवांनी मिळोन । जयशब्द केला तेधवां ॥ ३१ ॥
शुंभ धांवोनि तीव्र शक्ती । टाकिता जाहला देवीवरती ।
जिच्या ज्वाला आकाशीं धांवती । प्रलयअग्नीसारिख्या ॥ ३२ ॥
तैसीच देवीनें शक्ति सोडून । तिचें केले निवारण ।
शुंभाच्या सिंहनादेंकरुन । लोकत्रय व्यापिलें ॥ ३३ ॥
त्याच्या सैन्याचा शब्द दारुण । मारा म्हणोनि उठला जाण ।
निशुंभाच्या शब्दातें जिंकून । शब्द जाहला त्रिलोकीं ॥ ३४ ॥
शुंभें असंख्य बाण सोडिले । देवीने छेदूनि टाकिले ।
देवीचे सहस्त्र शर वहिले । शुंभें छेदिले क्षणमात्रें ॥ ३५ ॥
मग देवी क्रोध पावूनी । शूळ मारिती जाहली ते क्षणीं ।
तेणें शुंभ मूर्छा येऊनी । भूमीवरी पडियेला ॥ ३६ ॥
तों इतुक्यामध्ये जाण । निशुंभ जाहला सावधान । 
मग हाती धनुष्य घेऊन । बाण सोडी चपलत्वें ॥ ३७ ॥
चंडिकेतें आणि कालीतें । सिंह आणि इतर शक्तींतें ।
असंख्य बाण मारुनि त्वरितें । व्याप्त करिता जाहला ॥ ३८ ॥
निशुंभ अत्यंत मायावी जाण । दशसहस्त्र भुजेमकरुन ।
दहा सहस्त्र चक्रें सोडून । देवी झांकिली तयानें ॥ ३९ ॥
तेव्हां देवी क्रोध पावली । असंख्य बाण सोडिती जाहली ।
दश सहस्त्र चक्रें छेदिलीं । क्षणमात्र न लागतां ॥ ४० ॥
आणि आपुले बाणेंकरुन । टाकिले त्याचे शर छेदून । 
निशुंभ जाहला क्रोधायमान । गदा घेऊनि धांवला ॥ ४१ ॥
गदा प्रेरुनि चंडिकेवरी । निशुंभ तेव्हां गर्जना करी ।
देवीनें तीव्र खड्गधारीं । गदा छेदूनि पाडिली ॥ ४२ ॥
इतुक्यांत घेऊनियां शूळ । निशुंभ धांवला तत्काळ ।
तंव देवीनें हृदयकमळ । शूळ प्रेरुनि फोडिलें ॥ ४३ ॥
त्याच्या भिन्नहृदयापासून । दुसरा निशुंभ निघाला जाण ।      
महापराक्रमी बलसंपन्न । तिष्ठ तिष्ठ बोलिला ॥ ४४ ॥
सवेंचि चंडिकेनें हास्य करुनी । क्रोधें खड्ग मारिला धांवोनी ।
निशुंभाचे मस्तक छेदूनी । धरणीवरी पाडिलें ॥ ४५ ॥
तेव्हां असुरदळीं हाहाकार । आकांत वर्तता जाहला थोर ।
निशुंभराज महाअसुर । समरांगणीं पडियेला ॥ ४६ ॥
नवकोटी मूर्ती समवेत । चौसष्ट कोटी चामुंडांसहित ।
देवी रणांगणीं विलसत । अनंत शक्ति जियेच्या ॥ ४७ ॥
स्वर्गलोकीं आनंद थोर । देव वर्षती पुष्पभार ।
लागला वाद्यांचा गजर । स्तवन करिती सर्वही ॥ ४८ ॥
त्यानंतर देवीवाहन । सिंह क्रोधावला दारुण ।
असंख्य असुरांते भक्षून । टाकिता जाहला क्षणमात्रें ॥ ४९  ॥
तैसीचि काली शिवदूती । जाहली असुरांतें भक्षिती ।
कौमारीनें टाकोनि शक्ती । कोट्यावधी मारिले ॥ ५० ॥
ब्रह्मशक्तीच्या मंत्रबळें । असंख्यात ग्रासिले काळें ।
माहेश्र्वरीच्या त्रिशूळें । भस्म जाहले रणांगणीं ॥ ५१ ॥
महिषारुढ ते वाराही । असुर मारिले तुंडपायीं ।
दैत्यांतें खंडविखंड पाहीं । वैष्णवी करी चक्रानें ॥ ५२ ॥
इंद्रशक्ति वज्र सोडून । तेव्हां असुरांसी करी रण ।
कितीएक गेले मरोन । दृष्टिपातें नृसिंहीच्या ॥ ५३ ॥  
तेव्हां कितीएक नाश पावले । कित्येक रंणांतूनि पळाले ।
कित्येकांचे तुटोनि गेले । हस्तपाद रणांगणीं ॥ ५४ ॥
कितीएक कालीनें भक्षिले । कांहीं शिवदूतीनें विनाशिले ।
कितीएक सिंहानें खादले । विध्वंसिले सर्वही ॥ ५५ ॥
सर्व देवां हर्ष जाहला । मातृगणही आनंदला ।
असो या प्रकारें जाहला । निशुंभवध त्या समरीं ॥ ५६ ॥ 
आतां पुढील अध्यायीं जाण । शुंभ रणीं पावेल मरण ।
हें महासरस्वतीचें आख्यान । सांगता जाहलों तुजलागीं ॥ ५७ ॥
हें माहात्म्य सुरस बहुत । तैसेचि पवित्र निश्र्चित ।
श्रोत्यावक्त्यांसी करुनि पुनीत । सद्वासना पुरवी पैं ॥ ५८ ॥
व्यासें जैसे वर्णन केलें । तैसेचि येथें निरुपिलें ।
याच्या श्रवणपठणें वहिलें । देवी संतुष्ट होतसे ॥ ५९ ॥
त्या देवीसी नमस्कार । माझे असोत निरंतर ।  
तिचे पदस्मरणीं सादर । रान मनासी लावी कीं ॥ ६० ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये महासरस्वत्याख्याने नवमोऽध्यायः ॥

॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ 

DeviMahatmya Adhyay 9 
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (९) नववा


Custom Search

No comments: